थोड्या आठवणी...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हितगुजवर वाद हे नेहमीचेच. विशेषतः गुलमोहरवरील साहित्याचा दर्जा हा खास आवडीचा विषय... तिथल्या नुसत्याच साहित्याचाच नव्हे, तर तिथल्या अभिप्रायांचा दर्जा हा तर अधिकच जिव्हाळ्याचा (आणि जिव्हारीचा) विषय. त्यावर झालेल्या दोन जुन्या मोठ्या चर्चा अजूनही उपलब्ध आहेत. परवा तो विषय परत निघाला, मला परत त्या जुन्या चर्चा आठवल्या, वाचल्या, त्या निमित्ताने हे स्मृतीकांड.

मला जुने हितगुज, गुलमोहर आठवले म्हणजे ८-९ वर्षांपूर्वीचे. मी मायबोलीवर यायला लागलो ते मुख्यतः गुलमोहरमुळेच. तेव्हा कॉलेजात असल्याने कलेजा हा विषय जवळचा होता आतापेक्षाही, त्यामुळे कविता वाचण्याचा जास्त उत्साह असायचा मला. शिवाय माझा असा अंदाज आहे की गुलमोहर बहुधा सर्वात व्यस्त बाफ होता तेव्हा... निदान मीतरी बहुतेकवेळा गुलमोहरवरच यायचो वाचायला.

तेव्हा हितगुजवर, विशेषतः गुलमोहरवर नेमाने येणारे म्हणजे नेमाने लिहीणारे काही लोक नेहमीच आठवत राहतील. बेटी होती तेव्हा... मला आठवतय, तिच्या कविता वाचल्यावेळीच भावल्या होत्या... आवडल्या असं म्हणण्यापेक्षाही भावल्या असं म्हणेन. त्यात 'भिडण्याचा' भाव जास्त आहे. हळूहळू तिचं जबरदस्त वाचन, शब्दवैभव आणि एकंदरीतच झेप हे लक्षात आलं. ते एक वेगळंच रसायन होतं. ती कुठे गेली बरं ? जे लोक लिहीणं बंद झाल्याने माझं नुकसान झालं असं मला मनापासून वाटतं अशा लोकांमध्ये तिचा नंबर वरचा लागेल. पेशवा यायचा बर्‍यापैकी वेळा गुलमोहरवर. त्याच्या कविता आकळल्या कधीच नाहीत, पण त्यासुद्धा 'भावल्या' कॅटेगरीतल्या. तो लिहीतो का अजून ? बर्‍याच दिवसात त्याचं (साहित्य) काही वाचलं नाही... म्हणजे त्याने टाकलेही असेल गुलमोहरवर, मीच गेलो नाहीये खूप खूप दिवस. त्याची कविता आली की 'श्रीमंत, कळली नाही, पण मुजरा !!' अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया असायच्या. मग त्याचा आणि बेटीचा संवाद व्हायचा.... कविता जाऊच दे, तो संवादही मला कळायचा नाही. परागकण यायचा वाहत वाहत बर्‍याच वेळा... त्याच्या संकेतस्थळावर जाऊन त्याच्या कविता वाचायचो अधूनमधून. तो मात्र येतो अजूनही असं दिसतं... मध्यंतरी असच एकदा गुलमोहरवर गेलो होतो तेव्हा दिसला होता तिथे. त्याच्या कविता मला नैसर्गिक वाटतात, त्याच्या नावासारख्याच.

जबरदस्त अभ्यास असलेले आशिष चासकर, श्रीनि आठवतात. त्यांच्यामध्ये असलेली वैचारिक सुस्पष्टता आणि सुसुत्रता मी थोड्याच ठिकाणी पाहिली आहे. आशिषची समीक्षा/विश्लेषण असायचं... ते एक जबरदस्त काम होतं. त्याची विधाने चांगली टोकदार असायची कधीकधी. श्रीनि तेव्हा मायबोलीचा स्थायी झेनगुरू होता (zen master in residence). त्याच्या कथा उपलब्ध आहेत का अजून ? त्याने त्या बाफला लिहीलेली प्रस्तावना सुंदर होती... माझी झेन कोआनशी तिथेच ओळख झाली. खरच त्या बाफबद्दल विचारलं पाहिजे ऍडमिनना. अंतिम सत्याचा साक्षात्कार काय असो नसो, त्या कोआन मात्र आवडायच्या. तो दिसतो अजूनही, पण त्याला भन्ते कोणी म्हणत नाही आणि म्हणले तरी तो संदर्भ बहुतेकांना कळणारही नाही कदाचित. शिवाय असामी, मिलिंदा, शिल्पा, शमा, रार, rmd असायच्या... त्यांची खेचाखेची सुरू असायची नेहमी. शमा कविता करायची अस आठवतं. एक रानाजाधव म्हणूनही असायचे. तेही दिसत नाहीत आता. अज्जुका लिहायची कधीतरी सठीसहामाशी... मग तिने लिहील्यावर 'माते...' अशी साद घालत प्रतिक्रिया देणारा कोण बरं? बहुतेक मिलिंदा, असामी यांपैकी कोणीतरी. मग त्याला 'वत्सा, तुजप्रद कल्याण असो...' वगैरे आशीर्वादही मिळायचा अज्जुकाकडून. अरे हो... त्या 'कळत नकळत' मध्ये एकजण त्याच्या आईला 'माते' अशी हाक मारतो, ते पहिल्यांदा पाहून मला हेच आठवलं होतं. प्रसाद शिरगावकरच्या सुंदर गझला... भटांच्या 'रंग माझा वेगळा'च्या शेवटी गझलनियम सविस्तर दिले आहेत, ते एकदा समोर ठेऊन ते गुलमोहरवरच्या गझलांना तुंबड्यांसारखे लावून बघितलेलंही स्मरतय आता.

मायबोलीवर आल्यापासूनच ऍडमिनबद्दल तीव्र उत्सुकता होती. कोण आहेत, काय करतात इ.इ. कुतूहल. पण एक तर मी नवीनच होतो अन् ते कुतूहल भोचकपणाकडे झुकतय असं वाटत होतं, त्यामुळे कोणाला कसे विचारावे हेही कळत नव्हते. मग एकदा कुठल्यातरी पोस्टात त्यांच्या नावाचा उल्लेख होता, तिथून आणखी थोडी इ-भोचकगिरी करत त्यांच्याबद्दल माहिती काढली. फोटोही बघायला मिळाला... ते, त्यांच्या ऍडमिन आणि काही लोक भारतीय बैठकीत बसून कुठल्यातरी सांगितिक कार्यक्रमाची तयारी करत आहेत असा फोटो होता... सरवटे, किल्लेदार तेव्हा लिखित स्वरूपात दिसायचे. तांत्रिक प्रश्न आला की अनिलभाईंकडे धाव ठरलेली असायची. शिवाय बी, चंपक, वेल्डी वेलदोडा, वाकड्या, कलंदर, झक्की नागपुरी हेही असायचे नेहमी. त्यांचा एक gtp चालला असायचा... झक्की हे तेव्हाही आतासारखेच झक्की होते, वाकड्या म्हणजे नाव सार्थ करत असायचा. बीच्या कलेच्या पातळीला गेलेल्या malapropism ची सवय व्हायला वेळ लागला होता मला. तो वेल्डीही (एक सुगंधी नमुना) कुठे गायबला कोण जाणे ! यातले काहीजण नाही दिसत (वाकड्याचे काय झाले असावे याचा एक अंदाज आहे) किंवा ते ज्या बाफवर येत असतील तिथे माझे जाणे होत नाही असेही असेल. मध्यंतरी भाल्याला विचारलं की अरे तू एकदम गायबलास इथून... त्याच्याशी बोलल्यावर असं जाणवलं की इथे येणे हा एक विरंगुळा होय, पण हळूहळू विरंगुळ्याचे स्वरूप बदलू शकते. काही जणांसाठी हे स्वरूप बदलतं, काहींसाठी नाही. खासकरून संसारी व्याप मागे लागल्यावर हे जास्त लवकर होतं असं दिसतय. तेव्हा मला ऍडमिन आणि टीमची खरोखर कमाल वाटते. इतकी वर्षे हे काम स्वयंसेवक म्हणून सांभाळणे चेष्टा नाही.

यातल्या बहुतेकांना मी प्रत्यक्ष भेटलो नाहीये, प्रत्यक्ष तर दूरच राहिले, त्यांना माझे इ-मित्र म्हणण्याइतपतही माझा त्यांचा संपर्क नाही. जे काय दिसले, पाहिले ते इथे आणि फक्त इथेच. तरीपण लक्षात राहिले. इथे आलो तेव्हा दिसले की काही एक कारणाने आपल्याला पटेल, रुचेल अशा संवेदनशीलतेचे लोक इथे गोळा झाले आहेत. मतमतांतरे असणारच... त्या सगळ्याच्याही वर, नव्हे, त्या सगळ्याचा सामायिक छेद असलेली संवेदनशीलता मला इथे आकृष्ट करते. त्या सामायिकतेची खात्री असल्यामुळेच की काय, मला इथे भेटलेले लोक फक्त इथेच भेटत असले तरी पुरेसे भेटतात.

विषय: 
प्रकार: 

स्लर्टीचं स्फुट>> मला इथे भेटलेले लोक फक्त इथेच भेटत असले तरी पुरेसे भेटतात.>> मला तर वाटतं त्यांनी फक्त त्याच चेहर्‍यात मला भेट्त रहावं पण अदृश्य होऊ नये.

स्लर्टी, खरचं रे ती जुनी जनता वेगळीच होती. बेटी हे नाव कुणीच विसरू शकणार नाही. काय एक एक कविता होत्या तिच्या. काय शब्दकळा असायची तिच्या लिखाणात. तिचे विषय, तिची कळकळ, तिचे वाद घालण्याचे कसब आणि त्यातूनही दिसून येणारा प्रेमळपणा.. अगदी सुन्न करून टाकायचं मला तिचे लिखाण वाचताना.

श्रिनी अजून लिहितो पण पुर्वीइतका नियमित लिहित नाहे. शिल्पा, मैत्रेयी अधुनमधुन फक्त अभिप्राय लिहितात.

शमाके परवाने मधे शमा बोरकरी वळणाचा कविता लिहायची.
रुपा च्या कविता खूप सुंदर असायच्यात.

पुर्वीइतका गुलमोहर आता राहिला नाही. अभिप्राय देणारे आणि पचविणारेही बदलले आहेत. हे आहे तेही नसे थोडके पण जुने हितगुजकर आठवळे की मला तरी आवंढा येतो.

तु प्रिती उर्फ मिसेस बर्वेस विसरलास का? जावडेकर बद्दल लिहिले नाहीत. हेमंत पण छान लिहायचा. विन्या कवितांचे रसग्रहण छान करायचा. काकाजी आठवतात का? एकट्याच्या कथा?

अज्जुकाला माते म्हणणारा असामी, अजून आहे इथेच Happy आणि अजूनही म्हणतो कधीकधी. त्यासाठी अज्जुकाने काहीतरी वरचेवर लिहायला पाहिजे ना पण..

भांडकुदळ मिलिंदा हल्ली येत नाही Happy

पेशवा लिहितो अधुनमधुन पण त्याच्या कविता वाचून त्याला प्रतिकिर्या देणारे जुने मायबोलिकर त्याला विसरले असे वाटते. मी तो लिहितो तेंव्हा जरूर प्रतिकिर्या नोंदवितो जेणेकरून त्यानी परत एकदा 'श्रीमंत' व्हावे!

बेटीच्या कवितांचा संग्रह निघायला पाहिजे. कितीतरी कविता केल्या असतील तिने आता. त्या जर मिळाल्यात तर तो आनंद कशात बरे तोलाता येईल!!!!!!!

खूप भरून आलं मला तुझं हे स्फुट वाचून Sad

धन्यवाद बी. आता तू आठवण करून दिल्यावर आणखी आठवलं... हवाहवाई यायची खूप वेळा... शिवाय तिची कुजबूजही अधूनमधून ऐकायला मिळायची.

Nothing exists except atoms and empty space, everything else is opinion - Democritus.

हं हं येते अजून...
अरे पण तु आहेस ना इथे आता काही महिन्यांपासून.. हंहं ला पाहिल नाहीस का Happy कुबु पण लिहिते ती अधुनमधुन पण मसाला जरा कमी घालते Happy

स्लार्टी, मी तुझ्या इतका जुना नाही. पण मायबोलीवर सर्वात जास्ती तर्कशुद्ध लिहिणारा, इंग्रजी शब्दांना अतिशय समर्पक पर्यायी मराठी शब्द वापरणारा मनुष्य म्हणुन मला नेहेमीच तुझ्याबद्दल आदर वाटत आला आहे. आणि तुझी पोस्ट बघितली की त्याच्या आसपास आश्चिगची (महाबळ साहेब) पोस्ट असेल असे मला उगाचच वाटते नेहेमी.. कदाचित 'देव म्हणजे काय' ह्या बीबीवर तुम्ही दोघेच शेवटपर्यंत तर्काला न सोडता किल्ला लढवत होता त्यामुळे असेल Happy

बेटीचं, एसीचं आणि जयाचं नाव काढलंस.. जी भर आया!!
बेटी म्हणजे कशी आपल्या आतलं सगळं श्रीमंत करून टाकणारी..
एसी म्हणजे जुनी आतली खोल जखम कुरेदून स्वत:ला आरसा दाखवणारा..
आणि जया भान हरपून भिंगोरायला लावणारा.
माझ्या खुळ्या भिंगोर्‍यात त्या शब्दाचं कर्ज आहे माझ्यावर जयाकडून घेतलेल्या.

आता मायबोली नसणार्‍यांपैकी बेटी आणि एसी ची उणीव खरंच प्रचंड जाणवते.
जयाने कविता लिहीली की आत एक मुस्काडात बसायची लिही म्हणून मग माझ्यातला आळशी प्राणी ढोसला जायचा आणि काहीतरी खरडून परत सुस्त पडायचा.
आता जयाच लिहीत नाही तर माझ्या आळशी प्राण्याला कोण ढोसणार.

इथे दाद इतकं सुंदर लिहिते की आपण काही लिहून कशाला गालबोटं लावावं असंच वाटतं.
जयाने लिहिलं की त्याला उत्तर द्यावसं वाटायचं!
बघ बाबा तुझ्या न लिहिण्यामुळे महाराष्ट्र एका महान लेखिकेला मुकेल! (ह्या शेवटच्या ओळीचा दुसरा भाग केवळ विनोद म्हणूनच घ्यावा.)

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.

Nothing exists except atoms and empty space, everything else is opinion - Democritus.

स्लर्टी छान लिहीलय Happy )

तस म्हटल तर मी मायबोली/ हितगूज वर नवीन आहे (४ महीने) पण हे वाचल्यावर खूप छान वाटल त्यातल्या बर्‍याच जणांना ओळखत नसलो तरी : ) )

एक घाबरत घाबरत केलेली विनंती वजा सूचना : ) )

जर इतर व्यक्तीरेखांबद्दल लिहू शकलात तर ???

आम्हा नविन माय बोलीकरांना त्यांची ओळख होईल आणि जून्या माय बोली करांनाही मला वाटत त्याबद्दल वाचायला आवडेल (जूना अल्बम नाही का आपण आवडीने बघत सारखा सारखा अगदी तसच )

hmmmmmm ...... बेटीच्या जुन्याच कवितांचं पुन्हा एकदा पारायण केलं पाहिजे आता.

इथे दाद इतकं सुंदर लिहिते की आपण काही लिहून कशाला गालबोटं लावावं असंच वाटतं. > >अगदि अगदि माते .... अगदी प्रतिक्रियाही लिहून काही गढूळ करू नये .....

PK त्या कवितांचे रसग्रहण कर रे ..... मला यशोधरा अजून आठवते...

PK त्या कवितांचे रसग्रहण कर रे ..... मला यशोधरा अजून आठवते... >>>>>>>>> कोण सांगतंय? ... कुणाला सांगतंय? ... दिवस फिरलेत म्हणतात ते अशामुळेच बहुदा. (आमचं रसग्रहण 'रसना' पासून 'रसने'पर्यंतच Happy )

अरे सॉलिड nostalgic व्हायला झालं! बेटीची आठवण नेहमीच येते, कविता तर एक से एक आहेतच, मला तिची दीर्घकथा इदं न मम पण खूप आवडली होती. कुठे गायब झाली ती! शमा तर हल्ली बिझी झालिय वाटते , फार क्वचित येते.

PK त्या कवितांचे रसग्रहण कर रे ..... मला यशोधरा अजून आठवते...>>>
तिची यशोधरा काय कविता होती!!!! माझ्याकडे तिच्या बर्‍याच कविता अजूनही आहेत. पण सर्व नाहीत.
श्रीमंत सध्या ओझ्याखाली दबले आहेत असे ऐकून आहे. शमा पण फारच क्वचित दिसते आजकाल. छान आठवण काढलीस मित्रा स्लार्टी.

अरे, SLARTI इथे आठ नऊ वर्षापासून आहात...? तुमच्या profile मधे कालावधी ४ वर्षाचा दिला आहे...
असो. चान्गल्या जुन्या आठवणी काढल्यात...
"भूमीगत" झालेली अजून काही नावे:
eliza
tusharjoshi (नागपूरचे कवी)
dhruv
dhondopant (अधून मधून दिसतात)
champak
sayonara
wachak ,teerkas (अर्थात यान्ची अनुपस्थिती स्वागतार्ह आहे...):)
hems
arun
आणि इतर बरेच chioo, kaaoo, popat, raaghav होते.......

छान लिहिलय. बेटीच्या कथा आणि कविता वेगळ्याच पातळीवरच्या असायच्या. 'इदं न मम' तर कादंबरीच होती. त्याच्याआधी पण तिने एक कथा लिहीली होती, नाव आठवत नाही पण एक मुलगी आणि तिने लावलेल्या रोपाला फुले कशी येतात अशी काहीतरी होती. ती पण फार सुरेख होती.
बेटी कुठे असते सद्ध्या कुणाला माहित आहे का? आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे 'इथे का येत नाही'?
शमाच्या कविता पण मला अतिशय आवडायच्या.
श्रीनीच्या कथा, चासकरांचे भाषाप्रभुत्व, प्रसादच्या गझला, बरच काही मी miss करते. असो.

स्लर्टी, अजुन लिहा जुन्या मायबोलीकरांबद्दल.
बेटी बद्दल खुप ऐकलय पण बखर मध्ये तिचे काहीच साहित्य मिळत नाही. कोणी तिच्या कथा कविता साठवल्या असतील तर पुन्हा एकदा पोस्ट करता येतील का?
तुमचा हा लेख वाचुन काल बखर पिंजुन काढली. एलिझा, पुण्यनगरीकर, दिनेशदा, पमा सगळ्यांना एका रात्रीत वाचुन काढले. खुप मजा आली. आम्हा नव्या मायबोलीकरांना जुन्या मायबोलीत काय होते याची जाणीव दिल्याबद्दल तुम्हाला खास धन्यवाद. (मॉड्स, इथे कोणीही काहीही लिहण्या आधी एकदा बखर वाचणे बंधनकारक करता येईल काय Wink ? निदान सध्या जे वाचाव लागतय त्यापासुन सुटका तरी होईल.)
-प्रिन्सेस...

अरे योग, मी आहे रे इथेच.
नियमीत पणे मी सिंहगड रोड बीबी वर बागडत असतो .......... Happy

पण आवर्जून आठवण काढल्याबद्दल धन्स.......

--
अरूण

सर्वांना मनापासून धन्यवाद.
केदार, प्रिंसेस, मलाही आवडेल अजून वाचायला तुमच्यासारखेच Happy मी तसा मायबोलीवर खूप नियमितपणे यायचो नाही. तेव्हा माझ्या आठवणी धूसर आणि तुटक आहेत. त्यामुळे मी सर्वांची नावेसुद्धा लिहू शकलो नाहीये. पण इथे वर ज्यांनी ज्यांनी लिहीले आहे, त्या सर्वांकडे माझ्यापेक्षा विस्तृत खजिना आहे आठवणींचा आणि जास्त उत्तम लेखनकलादेखिल... तेव्हा आपण त्यांनाच लिहिण्याची विनंती करू या.... तोपर्यंत हे प्रतिसाद आहेतच, त्यातही खूप काही आहे.
योग, नोंदणी केली ४ वर्षांपूर्वी, पण त्याही आधीपासून येत आहे. तेव्हा रोमन होतो. Happy
बेटीच्या कविता वाचायला फार आवडेल. कोणी कृपया पोस्टू शकेल का ?

Nothing exists except atoms and empty space, everything else is opinion - Democritus.

बेटीच्या खूपशा कविता मला मुखपाठ आहेत इतक्या त्या मला आवडायच्या.

एक दोन चारोळ्या लिहित आहे तिच्याचं..

१.
आठवून हसता हसता
भाबडे सुख सलते,
पोर वयाच्या फांदीवर होते
माझ्याही स्वप्नांचे घरटे

२.
उभे जाळते उन
वास्तवं तेच आहे राणी,
झरता स्वप्नांचा मेघ
उरे डोळाभर पाणी

अश्विनी, बेटीच्या त्या कथेचे नाव आहे 'एका फुलण्याची गोष्ट'. खूप छान होती ती कथा. त्यानंतर गणपती उत्सवात, तिने तिच्या आजीवर एक कथा लेख लिहिला होता. तोही छान होता.

दिवाळी अंकात, 'लखलखती लाख दिवे' असा एक लेख आहे तिने लिहिलेला. बहुतेक २००४ की २००३ तीन च्या हितगुज दिवाळी अंकात मिळेल.

तिने पाळलेल्या कुत्र्यावर एक ललित तिने लिहिला होते. त्याचे नाव होते ग्यान्स. अतिशय करुण शेवट केला होता.

इदम न मम छान कादंबरी होती.

तरीही मला तिच्या कविताच अधिक आवडतात. कथांच्या बाबतीत मिसेस बर्वे खूप आवडायच्यात.

बेटी, जिथे कुठे तु असशील तिथे तु सदैव सुखात रहा. तुझी आठवण कधीच पुसल्या जाऊ शकणार नाही.. इतकी तुझी छबी हृदयावर कोरली गेली आहे.

- बी

बेटीच्या काही कविता 'आतल्यासहित' मी वापरल्या होत्या त्यामुळे माझ्याकडे आहेत पण तिच्या परवानगीशिवाय इथे परत टाकणं योग्य नाही तिला ते आवडणार नाही याची खात्री आहे मला. कारण... जाउदे ना कशाला!
तिची परवानगी घ्यायला तिचा माझा संपर्क पूर्ण तुटलाय.

गुलमोहरच्या फोटोग्राफी च्या बा फ वर Maverick यायचा. तिथे तांत्रीक चर्चा बहुदा त्यानेच चालु केली. बर्‍याच वर्षांपासुन तो गायब आहे.
चित्रकलेच्या बा फ वर मधे रुपेश तासकर ने चांगली चित्र टाकली होती, येका दिवाळि अंकाचे मुखपृष्ठही केले होते. (त्याची काही चित्र flickr वरच्या फोटोंचे डिजीटायझेशन होते जे खुप नंतर लक्षात आले ) तोही अचानक गायब झाला.

बेटीच्या .... कविता ........... माझ्याकडे आहेत पण तिच्या परवानगीशिवाय इथे परत टाकणं योग्य नाही >>>>>>>>>>> *ditto*

बरी आठवण केलीस. Dr. Mav ... शोध घेतला पाहिजे.

ज्यांच्याकडे बेटीच्या कविता आहे ते इथेही लिहित नाहीत आणि मेल केली तर त्याचेही उत्तर देत नाहीत. इतका भाव का बरे खायचा! ह्याला म्हणतात उग्र स्वभावाची माणसं. बेटीनी तिच्या कविता इथे पुर्वी पोष्ट केल्या होत्या मग त्याच कविता इथे परत लिहायला खरे तर बेटिची परवानगी घ्यायची काहीच गरज नाही. घ्यायची जरी झाले तरी तुम्हाला तिचा अतापता माहिती नाही. ती मेलवर देखील येत नाही. मग कुटुन परवानगी काढणार. पण उगाच 'आम्ही नाही जा' असा सुर काढण्यात काहींना फार आनंद वाटतो.

वर आम्ही काविताप्रेमी म्हणून आपल्याच पाठिवर थाप द्यायची.. Sad

काहीही म्हण रे!
दुसर्‍याची प्रायव्हसी आणि इच्छा जपणे याला आम्ही सुसंस्कृतपणा समजतो. आणि जेव्हा ती दुसरी व्यक्ती जिव्हाळ्याची मैतर असते तेव्हा तर नक्कीच.
कविताप्रेमी म्हणजे आपल्याकडे दुसर्‍याने विश्वासाने सोपवलेली कविता प्रेमाने जपून ठेवणं.
बघ समजतय का!

परवानगी घ्यावी हे मलाही मान्य. हा मुद्दा मी कविता टाकण्याची विनंती करण्याआधीच लक्षात घ्यायला पाहिजे होता. ती माझी चूक.
बी, असं बघ, याला दोन पैलू आहेत. पहिला असा, 'माझे साहित्य कोणीही माझ्या पूर्वपरवानगीशिवाय मला श्रेय देऊन कुठेही कधीही वापरू शकते' असे त्या साहित्यकाराने स्पष्ट केले असेल तरच आपल्याला परवानगीची आवश्यकता नाही. ते स्पष्ट केले नसेल तर ती परवानगी घेण्यास आपण बांधील आहोत. दुसरा पैलू असा, तेव्हा मायबोलीचे धोरण काय होते नक्की ? 'तुम्ही इथे जे देता ते मायबोली तुमच्या परवानगीविना (अर्थात तुम्हाला श्रेय देऊन) इथे आणि इतरत्र अनंत काळासाठी वापरू शकते' असे तेव्हाचे स्पष्ट धोरण असले तरच मायबोलीचे प्रशासन परवानगीविना काही करू शकते. हे झाले प्रशासनाबद्दल. एक सदस्य काहीही धोरण असले तरी परवानगीविना काही करू शकत नाही, जरी इथेच ते साहित्य आधी एकदा प्रकाशित झाले असले तरी. सदस्याला असा परवानगीविना प्रकाशनाचा हक्क (योग्य ठिकाणी श्रेय देऊनसुद्धा) नाही (अपवाद पहिल्या पैलूमध्ये उपस्थित केलेल्या स्थितीचा). असे काही साहित्य ऍडमिनच्या व्यक्तिगत संग्रहामध्ये असले तरी तेसुद्धा परवानगीविना काही करू शकत नाहीत (म्हणजे त्यांनी करू नये असे मला वाटते :)).
बाकी एखाद्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकत नाही अथवा ती व्यक्ती संपर्क ठेऊ इच्छित नाही, याने वाईट वाटणे हे साहजिक आहे. पण म्हणून आक्रस्ताळेपणा करणे समर्थनीय आहे असं मला वाटत नाही.

This signature was written entirely with recycled electrons.

आक्रस्ताळेपणा करू नये हे मान्य आहे पण मग कशाला हे लिहायचे की आमच्याकडे तिच्या कविता आहेत. असे लिहिले की नक्कीच तिच्या पंख्यांना ते साहित्य मिळवावसे वाटते. ही लोकं अभिमानाने सांगतात आमच्याकडे तिच्या कविता आहेत. मग मागितल्या तर अपमानित करतात. हे योग्य आहे का? सांगूच नये कुणाला की आमच्याकडे बेटिच्या कविता आहेत म्हणून. तितकीच तुमच्या सुसंस्कृतपणात भर पडेल.

इथे मायबोलिवर अख्खेच्या अख्खे कवितासंग्रह उतरवून काढलेले आहेत कित्येकांनी. ग्रेस, कुसुमाग्रज, पुशि रेगे, बापट, ईंदिरा संत आणि कित्येक कवि-कवयित्रिंच्या कविता उतरवून काढल्या आहेत. त्या वेळेस जर नेट असते तर त्यांनी देखील तशी टिप लिहिली असती की मायबोलिवर वा इतर कुठे ह्या कविता लिहू नका म्हणून. जर इथेच कविता वाचायला मिळत असतील तर कोण बरे काव्यसंग्रह विकत घेईल!

काहीतरी विसंगती वाटते मला.. म्हणून तुम्ही लिहिलेले दोन्ही पैलू पटले नाहीत.}

अरे, पण माझ्याकडे नाही अन् दुसर्‍याकडे आहे हे कळले तर दुसर्‍याला मी विनंती करू शकतो ते खाजगीपणे share करण्याची. त्याला प्रतिसाद कसा द्यावा हे दुसराच ठरवेल ना... ते मलाही बघायला मिळाले पाहिजे ही माझी तीव्र इच्छा आहे, पण तो माझा हक्क नव्हे. उलट दुसर्‍याने सांगितल्याने मला आता कळले तरी की काही जणांकडे ते उपलब्ध आहे... नशीब असेल तर मिळेल बघायला Happy
आता इतरत्र प्रकाशित साहित्य इथे प्रकाशित कसे होते, त्यामागे काय कायदे वगैरे आहेत याबद्दल ऍडमिनच सांगू शकतील अन् ते कळल्याशिवाय ह्या परिस्थितीची त्या परिस्थितीशी तुलना करण्याची घाई नको करायला.

This signature was written entirely with recycled electrons.

आम्ही कोणाला काय सांगावं हे तुझ्याकडून शिकण्याइतकी वाईट वेळ आली नाहीये अजून.
अपमानित? अर्थ तरी कळतो का? तुमच्या मनासारखं नाही झालं की तुम्ही अपमानित होता. तुम्हाला हवं तसंच प्रत्येक वेळेला दुसरा वागेल असं नाही हे स्वीकारता तुम्हाला येत नाही आणि शिमगा आमच्या नावाने.
साधी गोष्ट आहे की बेटीशी पत्रव्यवहार असूनही तिने तिच्या कविता तुला दिल्या नाहीत. आम्हा काही जणांकडे सोपवल्या याचा अर्थ त्या तुला मिळाव्यात अशी तिची इच्छाच नव्हती हे सरळ आहे.
तेव्हा स्लार्टीने लिहिलेल्या या सुंदर लेखाला फडतूस वाद घालून गालबोट न लावता गप्प बस.

एकदा का तो गालबोट शब्द सापडला तर त्याचा उल्लेख १० वेळा करायचा.

साहित्य हे एका जणाकडून दहा जणाकडे पसरत असते. जर प्रत्येक वाचक हा लेखकाला विनंती करून मागायला जाईल तर त्या लेखकाला ते जमू शकेल का प्रत्येक वाचकाशी संवाद करत बसायला.

तुम्ही इथे एकदा नाही दहावेळा सांगत बसता आमच्याकडे हे आहे आणि ते आहे.. ह्याचा अर्थ नक्की काय होतो? की पहा आम्ही किती महान! इतर कुणी मग त्याबद्दल माहिती विचारली किंवा ते साहित्य मागितले तर तुम्ही देत नाही. बेटीचे राहो पण मागे मी पद्मा गोळेंची कविता मागितली इथे कुणाला तरी लगेच गूड बाय! (आधीच काड्या टाकू नये (अर्थात काड्या करू नये)). हा अपमानच नाही तर काय..

Pages