गृहान्तर (अंतिम भाग)

Submitted by Abuva on 15 November, 2026 - 09:55

तो दिवस गणपती विसर्जनानंतरचा होता. लागून शनिवार रविवार आले होते. त्यामुळे अचानक लॉन्ग वीकेंड मिळाला होता. बायको आणि तिच्या मामे-मावस बहिणी मुलाबाळांना घेऊन महाबळेश्वरला गेल्या होत्या. चार दिवस दिलाला थंडावा होता. 
मिरवणूक दुपारीच संपली. नशिबानं गणपतीत पाऊस फार नव्हता, पण आज मात्र आठ नंतर तासभर तरी पडला होता. पण आत्ता तरी थांबला होता.
(भाग ३ - https://www.maayboli.com/node/89237)
मी मित्रांबरोबर चकल्लस करून परत येत होतो. दहा दिवस गरजणारे, झळकणारे गणपतीचे मांडव आता पडदानशीन झाले होते. चौकात वळलो. पुढच्या गल्लीच्या तोंडावर मांडव होता. म्हणजे, मांडवामागून गल्ली येत होती. गाडी रेझ केल्याचा आवाज आला. माझं लक्ष होतं. एक काळी एसयूव्ही फुरफुरत होती. ठीक‌ आहे. पण अचानक ती उडली, अक्षरशः उडली आणि दाणकन येऊन माझ्या स्कूटीवर आदळली! मी त्या क्षणार्धात ॲक्सिलरेटर देऊन पळण्याचा, वाचण्याचा प्रयत्न केला होता. पण तो इतका वेगात आला की मागच्या भागाला ठोकलंच. इतक्या जोरात आदळला की मी स्कूटीसकट गणपती ठेवण्याच्या देवळावर आपटलो. भेलकांडलो, पडलो आणि थोडा घासटत देवळाच्या कठड्यावर आपटलो. म्हणजे डोकं आपटलं. हेल्मेट? ह्या, पुण्यात कोणी हेल्मेट घालतं का?! रेनकोट होता म्हणून जरा वाचलो. नाही तर पूर्णच सोलपटून निघालो असतो.
पण डोकं आपटलं त्यामुळे पाच मिंटं भंजाळलो होतो. शुद्धीत होतो पण शॉकमधे गेलो असणार. भानावर आलो तेव्हा तिथल्या घराच्या ओट्यावर आडवा होतो. कुणी तोंडावर पाणी मारत होतं, कुणी रक्त येत होतं त्याला क्रीम लावत होतं. मी धडपडून उठलो. पहिल्यांदा दुखणाऱ्या भागांना हात लाऊन पाहिलं. कुठे मोडतोड वाटत नव्हती! नशीब माझं!! निश्वास सोडला तेव्हा कुठे मला इतरांचं बोलणं ऐकू यायला लागलं.
समोर नगरसेवक उभे होते. त्यांचाच गणपती, म्हणजे त्यांच्या मंडळाचा, होता. गल्लीतच त्यांचं निवासस्थान होतं. म्हणजे तसा बोर्ड मी बाहेर बघितला होता. त्यांची छबी दर चौकातल्या फ्लेक्सावर असायची त्यामुळे ओळखीची होती! कुणी तरी बाई सोलपटलेल्यावर क्रीम लावत होती. बर्नॉल?! मी चिडूनच बघितलं आणि नजरानजर झाली.
अपर्णा! अचानक मी तिच्याच बंगल्याच्या ओट्यावर असल्याचं मला लक्षात आलं. तो मंडळाचा मांडव तिथेच समोर असायचा. मी तोंड उघडणार तोच तिच्या डोळ्यांत परत तेच भाव, तोच इशारा दिसला. मी शब्द गिळून अहो, बर्नॉल काय लावताय, हळद लावा असं गुळमुळीत आवाजात म्हणालो. ती म्हणाली पाठवलंय बेटाडीन आणायला.
नगरसेवक म्हणाला सॉरी साहेब, जरा मुलाचा ताबा सुटला.. तो मुलगाही शेजारी उभा होता. त्याच्याही चेहऱ्यावरची मग्रुरी लोपली होती. मी काका तुमची स्कूटी रिपेअर करून देतो.
सगळे अवयव जागच्या जागी आहेत याचंच मला समाधान होतं. मी पण ताणलं नाही. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी खुर्च्या आणून मांडल्या होत्या. मानाचे गणपती स्थानापन्न झाले. नगरसेवकांनी आज्ञा सोडली, अपर्णाताईंना कॉफी करायला सांग. ती तोवर आत गेली होती. त्याही अवस्थेत मला काकूंच्या हातच्या कॉफीची आठवण आली. मी कशाला नको नको करत होतो. पण नगरसेवक महाशय ठाम होते. मी स्कूटी बघू म्हणून उठायला लागलो तर घोट्यानं बोंब मारली. बघितलं तर सोलवटलं होतंच. जरा हातानं दाबून पाहिलं, पण मोडल्यासारखं वाटत नव्हतं.
बसा हो, तुम्ही कसलीही काळजी करू नका. हे समोर गॅरेज आहे ते आपलंच आहे. नव्यासारखी स्कूटी करून देण्याची जबाबदारी माझी. मग काय बोलणंच खुंटलं.
नगरसेवक साहेबांनी फुल फिल्डिंग लावली की पोलीस तक्रार व्हायला नको. मी पण मध्यमवर्गीय विचार केला. उगा मोठ्या माणसांशी झगडा कशाला? पाण्यात राहून माशांशी वैर, महागात जाऊ शकतं. पण झालीच आहे ओळख तर गोडीत राहिलो तर गरज पडली तर फायदा होईल. लय खास.. आपलं डोकं ठिकाणावर आहे याची मला खात्री पटली!
मग दोन बंगले पलिकडे रहाणारे एक डॉक्टर आले. त्यांनी बयजवार तपासले. इथे दाबलं, तिथे दाब दिला. काही नाही, ठीक आहे म्हणाले. नॉर्मल ॲन्टिबायोटिक आणि पेनकिलर दिल्या, बेटाडीन चोपडलं. दोन दिवस सूज राहिली तर एक्सरे काढा म्हणाले. ताप आला तर क्रोसिन घ्या.
तेवढ्यात कुणी कार्यकर्ती आतनं कॉफी घेऊन आली. नावगावआडनावपत्ता वगैरे चौकशा सुरू झाल्या. काय करता, मग ह्याची त्याची ओळख निघाली. कॉफी संपली.
गाडीतून सोडतो म्हणाले. काही पर्यायच नव्हता. अपर्णा काही परत दिसली नाही. लंगडत, खुरडत कार्यकर्त्यांच्या मदतीनं गाडीत बसलो. नगरसेवक साहेब स्वतः चालवायला बसले. त्यांचा मुलगा परत येऊन सॉरी म्हणाला. जरा त्याला उपदेशामृत पाजलं. नगरसेवक साहेबांनीही त्याच्यावर डाफरून घेतलं.

निघताना मी बंगल्यावरून नजर फिरवली. उघड्या दरवाजातून आतल्या भडक रंगात रंगलेल्या खोल्यांमधले प्रकाश पडद्यांमधल्या गॅपमधून दिसत होते. सगळ्या खिडक्या घट्ट बंद होत्या. टेलरिंगच्या दुकानामागे शेड होती त्यात बायकांचे कपडे वाळत घातलेले दिसत होती. घरपणाची ओळखीची कुठलीच खूण तिथे दिसत नव्हती. म्हणजे मला तरी जाणवली नाही.
आकांक्षा मधला आ गळला होता! नुसती कांक्षा शिल्लक उरली होती.

----

घरी‌ कुणीच नव्हतं! माझा प्लॅन येताना कोपऱ्यावरच्या भाजीपोळी केंद्रातून काही तरी भाताचा प्रकार आणण्याचा होता. म्हणून साहेबांना जरा कोपऱ्यावर गाडी थांबवायला सांगितली. पण या सगळ्या भानगडीत उशीर झाल्यानं ते बंद झालं  होतं. माझी अडचण नगरसेवक साहेबाच्या लक्षात आली. त्यांनी मोबाईलवरून कुणाला तरी आदेश दिला. ताईंना जेवण बनवायला सांगा आणि साहेबांच्या घरी पोहोचतं करा. दोन दिवस साहेबांच्या घरी कोणी नाहीये, जरा काळजी घ्या.
मी कानकोंडला झालो होतो. पण बायकोला परत बोलावणं मलाही प्रशस्त वाटत नव्हतं. बघू काय होतंय! पुढच्या चौकातल्या मेडिकलमध्ये औषधं घेतली, त्यांनीच. घरी अगदी वरपर्यंत आणून सोडलं. वहिनी साहेब येईपर्यंत तुमची काळजी आमच्याकडे लागली, असं भरघोस आश्वासन दिलं. बरोबरच्या कार्यकर्त्याचा फोन दिला. त्याला कधीही फोन करा म्हणाले. येईलच कुणी तरी जेवण घेऊन, म्हणाले आणि निघाले. 

पण माझी हालत जरा बिकट होती. फाटलेले कपडे बदलून घरातले चढवावे तर खुरडत खुरडत आत जाणंही मुश्किल होतं. त्यात आता कोणी तरी जेवण घेऊन येईल. त्यांच्यासाठी दरवाजा उघडायला लागेल. म्हणून तसाच मुरगाळून बसलो. काय ते जेऊ, आणि आत जाऊन कपडे बदलून मग झोपू. अंग ठणकत होतं. पण खाल्ल्याशिवाय गोळी नको.

मन घुटमळत होतं. अचानक अपर्णाची भेट झाली. कॉफीची चव तशीच होती!
काहीही, तुला आठवते का ती चव? आता काय ती स्वीटहोम कॉफी कोण करतं. सगळे ब्लॅक कॉफी वर आलेत.
पण ती बर्नॉल काय लावत होती?
अरे ऐनवेळी हाताशी काही नसेल.
म्हणून काय दिसेल ते लावावं काय?
ती पण भंजाळली असेल. का? काय माहित.
आणि ताईंना जेवण बनवयला सांगितलंय त्या ताई कोण? अपर्णाच का?
मगाशी तर साहेबांनी बेधडक हुकूम सोडला होता. काय संबंध?
आपल्याला काय माहिती?
आणि ती दुसरी कार्यकर्ती तिथेच राहताना दिसत होती का?
च्यायला काय भानगड आहे?

तेवढ्यात बेल वाजली. घोटा करवादत होता. तसंच खुरडत जाऊन दार उघडलं. ती दुसरी कार्यकर्ती आणि तो कार्यकर्ता उभे होते.
मन जरा खट्टू झालं. मी नकळत अपर्णा येण्याची वाट पहात होतो.
मग तिनं हे कुठे ते कुठे करत जेवण मांडलं. मी त्या कार्यकर्त्याला आत धाडून कपडे आणवले. त्याच्याच मदतीनं कपडे बदलले. चार घास ढकलले. मी औषध घेतल्यावर कार्यकर्त्यानं मला आत नेऊन झोपवलं.
जाताना दार ओढून घेतो म्हणाला. साहेब उद्या सकाळी तुम्हाला दार उघडता येईल का? किल्ली देऊन ठेवता का?
मी विचार केला. ठिकाय, घेऊन जा. डाव्या कुशीवर झोपलो. आणि लगेच झोप लागली. पण रात्र कठीण गेली. 
सकाळी जाग आली तर मुका मार बोलू लागला होता. खरचटलेल्या जखमा ओके होत्या. पण अंग दुखत होतं. सात वाजता बेल वाजली. दरवाजा उघडून नितीन, तो कार्यकर्ता आत आला. त्यानं आवाज दिला मीच आहे. मला खरोखरच आश्चर्य वाटलं. इतकी सेवा?! थर्मासमध्ये चहा, बिस्किटं आणि कॅसेरोलमध्ये पोहे. मला उठून बसायला मदत करताना त्याला अंग गरम लागलं.
साहेब ताप चढतोय. खाऊन गोळी घ्या.
शरीराची त्या दुखण्यांशी मारामारी चालली होती. त्यांचा परिणाम होता हा ताप. मी तेवढ्यात आन्हिकं उरकून घेतली.
त्याच्याशी बोलताना कळलं. साहेबांनी अपर्णाताईंना जबाबदारी दिली आहे. हसून म्हणाला, बाईसाहेबांना नाही सांगितलं. काल लई ओरडा खाल्ला बाईसाहेबांचा. बाप अन् मुलगा दोघांनी!
पण मग अपर्णाताई का करतील?
वा, घरगुती संबंध आहेत त्यांचे.
हे म्हणून थांबला. म्हणजे, सगळ्या महिला कार्यकर्त्यांचं त्याच बघतात.
त्या पॉझमध्ये मी अर्थ शोधत होतो.
खाऊन गोळ्या घेऊन मी झोपलो. जाताना त्याला सांगितलं. वरण-भातच आण जेवायला.
अकरा -साडेअकराला जाग आली. घाम येऊन ताप उतरला. हात ठीक होता पण घोटा मात्र ठणकत होता. हेअर लाईन फ्रॅक्चर असेल का कुठे? बघू.
तसाच बाहेर येऊन खुर्चीत बसलो. झोपून झोपून पाठ दुखायला लागली होती. म्हणजे बरं होतोय याची लक्षणं! मी मनाला समजावलं.
बसलो. मग बायकोला फोन लावून शिव्या खाल्ल्या. पण नशिबाने तिला विश्वास बसला की काही इमर्जन्सी नाहीये. तिनं प्लॅन बदलला नाही. पण मग दर दोनपाच तासांनी तिचा फोन यायला लागला!
पेपर वाचत बसलो होतो. बेल वाजली. जेवणं आलं बहुतेक. नाही. दरवाजा उघडला गेला नाही. मग मीच उठलो. कामवाली बाई होती. माझी परिस्थिती बघून तिला‌ प्रश्न पडला. जेवणं करून देऊ का म्हणाली. मग कथा सांगितली तिला. ती आपलं काम आटपून अर्ध्या तासात निघून गेली. 

----

पुन्हा बेल वाजली. दरवाजा उघडून अपर्णा आत आली. मी चमकलो. आत्ता ती येईल अशी अपेक्षा नव्हती. चटकन उठून उभा राहिलो. पण बोललो काहीच नाही. पूर्वीचे अनुभव गाठीला होते ना! ती एकटीच होती. तिची‌ नजर सौम्य होती.
कसा आहेस, रवी?
बराय. बाहेर येऊन बसलोय म्हंजे बघ. तू कशाला आलीस? म्हणजे..
तिनं तो फेमस कटाक्ष टाकला. पण मग म्हणाली, नितीनला सेकंड होती. मीच म्हणाले मी जाते.
त्या कटाक्षाची‌ पॉवर कमी‌ झाली‌ नव्हती!
तिच्या हातात तीन पुडी डबा होता.
तिनं विचारलं, कुठे बसतोस जेवायला? इथे टीपॉयवर मांडू की डायनिंग टेबलवर?
येतो डायनिंग टेबलवर.
घरातल्या बाईसारखी तिनं ओढणी काढून खुर्चीवर ठेवली. आणि किचनमधे शिरली.
बाईंनी घासलेली भांडी तिथेच होती. तिनं ताट वाटी भांडं मांडलं. पाणी घेतलं. ताटात मीठ वाढलं. तोपर्यंत मी लंगडत येऊन बसलो.
तूप... म्हणत ती मागे वळली. तेवढ्यात तिला तुपलं दिसलं.
माझ्याकडे साजुक तूप नव्हतं. तुमच्याकडे असेल असा अंदाज होता. तिनं हलकं हसत म्हटलं. तसं येताना चितळेचा डबा घेऊन आले होते. 
मी नकळत तिचं निरीक्षण करत होतो. बॉबकट किंवा तत्सम कापलेले केस पातळ झाले होते. पांढऱ्या छटा दिसत होत्या. डोक्यावर काकूंसारखं मोठं कुंकू. वयाच्या मानानं चेहरा थकलेला होता. पण मेकअपच्या थरांत तो थकवा दडला होता. जरी आत्ता सौम्य भाव असले तरी डोळ्यांत कठोरतेची छाया लपत नव्हती. अन्... अं... सांगतोच. जरी मी निरीक्षण चेहेऱ्याचं करत होतो तरी जरा भडक पंजाबी ड्रेसचा जरुरीपेक्षा जास्त खोल गळा माझ्या नजरेतून सुटला नाही. अंगापिंडानं चांगली फिगर राखून होती. 
माझं निरीक्षण चालू असताना तिनं डबा सोडला. भात वाढला, त्यावर वरण घातलं, तुपाची धार धरली. एका डब्यात कोशिंबीर आणली होती. ती वाढली.
तू वरण भातच म्हणाला होतास. पण मी कोशिंबीर केली. जरा चव येईल. नाही तर त्या ॲन्टिबायोटिकनं तोंडाची पार चव जाते.
समोरची खुर्ची ओढून ती बसली.
मी अवघडून तू घे काही तरी खायला.. असं काहीसं बरळलो.
ती नुसतीच हसली. दोन्ही हात हनुवटीखाली गुंफून ती माझ्याकडे बघत होती. मी नजर चुकवली. तिला माझा अवघडलेपणा लक्षात आला. खुर्ची सरकवून ती उठली म्हणाली तू खा निवांत. माझा शनिवार आहे. 
मी तिला म्हटलं मला चमचा देतेस का? उजव्या हातानं खाताना त्रास होतोय. 
तिनं चमचा दिलाच, पण चटकन हात धुवून आली आणि वरण-भात कालवून द्यायला लागली
मी तिला अगं नको नको करत होतो. 
म्हणाली, वरण-भात नीट कालवला गेला नाही तर चांगला लागत नाही. 
हात धुवून आल्यावर खिडकीतून खाली‌ नजर टाकत ती म्हणाली, छान घर आहे तुझं.
मी उगाच हं, हं केलं
मला माहिती होतं तू इथे रहातोस. गेल्या निवडणुकांच्या प्रचाराला मी आले होते. तुझ्या बायकोला प्रज्ञाला भेटून गेले होते.
काय सांगतेस?
हो. तिच्या हातचा चहा घेतलाय मी. तुला खाता नाही येतै का?
मी डाव्या हातानं चमच्यानं खात होतो. जरा धडपड होत होती.
ए बाई, आता भरवून नको देऊस, मी हसत हसत म्हणालो. तुला स्वैपाक करायला लावलाय तेवढं बासै..
माझा अवघडलेपणा कमी झाला होता. तिलाही ते जाणवलं.
प्रज्ञाशी कशी काय ओळख?
आमच्या मंडळाच्या नवरात्रात त्यांचं श्री सूक्त पठण झालं होतं तेव्हा ओळख झाली. आणि राजकारणात ओळख ठेवावीच लागते.
मग मला ओळख दाखवली नाहीस? यावेळी कटाक्ष देण्याची वेळ माझी होती. पण तिचा प्रतिकटाक्ष तयार होता, भलताच पॉवरफुल. एक क्षण थांबून ती म्हणाली
वेळ योग्य नव्हती.
कशाची योग्य वेळ? मी जरा चिडून विचारलं.
ते तुला कळायचं नाही. 
मी गप्प बसलो.
मी बघितलंय तुला अनेक वेळा जाता-येता. तू तुझ्या नादात असतोस. पण माझं लक्ष असतं. आणि आमचा बंगला तू विसरला नाहीयेस हेही मला माहितेय!
काका-काकू...
गेले ते. बरीच वर्षं झाली. 
काल तुझ्या हातची कॉफी पिताना काकूंची आठवण झाली. त्यांची‌ कॉफी अशीच असायची नाही?
हं...
ती फ्रीजवरचा आमचा फॅमिली फोटो बघत होती. प्रज्ञा अर्णवला बाटलीतून दूध पाजत होती आणि मी प्रज्ञाला कोकाकोला! मागे दूरवर पसरलेला ग्रॅंड कॅन्यनचा नजारा होता.
अचानक ती थकल्यासारखी खुर्चीत बसली.
काय गं? काय झालं..
खूप प्रगती‌ केलीएस तू. कुठे तो सायकलवरचा रवी आणि‌ कुठे‌ हा आजचा.
होतं गं. दॅट्स लाईफ. मी काय आला दिवस जगत गेलो. फार विचार केला नाही.
तिचे डोळे विचारात गढले होते.
तिनं माझ्याकडे पहात म्हटलं, खरं आहे रे! मी पण फार विचार केला नाही, आला दिवस जगत गेले.. 
एक पॉझ होता. मला वाक्याचा उत्तरार्ध जाणवला होता. पण बघ तू कुठे पोचलास आणि मी कुठे...
ती म्हणाली नाही. पण शून्यात बघत होती. मी मान वळवली. विषय बदलावा का चेष्टेवारी न्यावा याचं उत्तर मला सापडलं नाही.. दोन्ही पर्यायात तिच्या भावनांची थट्टा झाली असती. मी भात चिवडत राहिलो.
थोड्या वेळानं भानवर येऊन ती म्हणाली, पोटभर झालं ना? मग कोशिंबीर संपवून टाक. आवडली ना?
या प्रश्नाचं उत्तर सोपं होतं.
ती उठली. समोरचे डबे उचलले आणि सिंकमध्ये घेऊन धुवायला लागली.
अगं राहू दे. बाई घासेल.
तिच्या नेहमीच्या आवाजात तिनं उत्तर दिलं, नको. मी डबा घेऊन जाते.
मी हात तोंड धुवून बाहेर कोचावर येऊन बसलो. औषधं घेतली. तिनं मागचं आवरलं. टेबलावरून फडकं फिरवलं. 
माझ्या घरात मीच बावचळलो होतो, आणि ती सराईतासारखं वागत होती. 
सगळं आटपल्यावर ती बेसिन वर जाऊन स्वच्छ तोंड धुवून आली. तिचे डोळे मात्र लालसर होते.
थकलास? खूप दुखतंय?
नाही ओके आहे. सकाळपेक्षा तं आता खूपच बरं आहे.
ए तुझं जुनं घर दिसतं का रे इथून? ती  सोफ्याशेजारच्या खिडकीशी जात म्हणाली. 
हो, मी उठलो आणि तिच्याशेजारी उभं रहातं तिला दाखवलं.
ती मोठी बिल्डींग दिसतेय? तिच्या मागे गेलीये आता आमची ती जुनी बिल्डिंग.
ठेवलंयस अजून? आईवडील कुठे असतात तुझे?
बाबा गेले, दोन वर्षं झाली. आई रहायला‌ आता जवळ आहे. पण सध्या बहिणीकडे अमरावतीला गेली आहे.
अमरावती? कुठे जवळ देता नाही का आली? ती हसत म्हणाली.
आता ते काय आपल्या हातात असतं का? ते वरतीच ठरलेलं असतं.
किती सोपं आहे नै सगळं नशिबावर सोडणं.. तिनं माझ्याकडे कटाक्ष टाकत म्हटलं. शेजारीच उभा असल्यानं तो कटाक्ष मला जास्त भेदी वाटला.
मी सोफ्यावर येऊन बसलो. दुखरा पाय टीपॉय वर उचलून ठेवला. 
हे बघ अपर्णा, मला कळतंय. तुझ्या आयुष्यात... अं तुझं आयुष्य सर्वसामान्यांपेक्षा वेगळं आहे. काही गोष्टी मी पण ऐकल्यात. म्हणजे कानावर आल्या आहेत. खरं खोटं ठरवायची माझी प्राज्ञा नाही. आज माझ्यासमोर परिस्थितीवश एक बालमैत्रिण उभी आहे. बास, माझ्यासाठी तेच खूप आनंदाचं आहे. या घरात तू अपर्णा आहेस जिच्याबरोबर मी अभ्यास केलाय. जी छान गायची.  जिचं एक सुंदर टुमदार घर होतं. आज सुमारे तीस वर्षांनी आपण भेटतोय, तर माझे जे पॉइंटर्स आहेत ते हे आहेत. आज तू खायला घालते आहेस, आनंदाचं भरतं आलंय मला! खूप गप्पा मारूयात, आठवणी काढून हसूयात. बाहेर तू कोण आहेस, काय आहेस, जाऊ दे ना!
मी सिन्सिअरली म्हणालो.
तिचा मात्र टोन बरा नव्हता.
बोलायला सोपं आहे रवीसाहेब! पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात ना? मला हा आज जो आहे ना एवढाच आहे. माझा काल विचार करवत नाही एवढा भीषण होता आणि उद्याचा भरवसा नाहीये. आज आत्ता जे आहे तेवढंच खरं. तू एवढा तत्वज्ञान पाजळतोएस ना? कॉलेजात असताना मी तुला मदत मागितली होती, आठवतंय? आलास माझ्या मदतीला? एवढ्या विश्वासानं मी तुझ्याकडे आले होते ना? पण तू काय केलंस? मग मीच ठरवलं आपणंच काय ते करायचं. पण त्या एका निर्णयानं माझं आयुष्य नासवलं. मग काय तुला जबाबदार ठरवू? आणि तुला, तुझ्या आयुष्यात काय फरक पडला रे? या पोरीची नियतच रांडेची हे जगभर बोंबलून सांगायला तुम्ही मोकळे.
त्या भडीमारासमोर मी मान खाली घातली. 
मी चांगली गात होते, ॲक्टिंग करायचे, छान रहाण्याची हौस होती, म्हणून तुम्ही मला रांड ठरवून मोकळे? तुम्ही स्वतःला सभ्य आणि सज्जन समजता नं? मग एक जण उभा राहिला का माझ्या बाजूनं? दहावीत मी जेव्हा चूक करून परत आले तर महारोग्यासारखी वागणूक दिली रे तुम्ही मला. आणि कॉलेजमध्ये तर काय मी गावजेवणच बनले. आज तुला माझं रंगलेलं थोबाड आणि ही घळ दिसते ना? तर ऐक. मी ठेवलेली बाई आहे नगरसेवकाची. रखेल! बायकोनं हाकलले की माझ्याकडे येतो तो हलवत. चारी पोरी ठेवल्यात त्याच्या कार्यकर्त्यांसाठी. त्याही अशाच अभागी. पण ज्यानं मला नासवलं आणि ज्यानं माझं पोट पाडलं त्यांना मातीत घातल्याशिवाय रहाणार नाही.
मी सुन्न झालो होतो.
ती बाजूच्या खुर्चीवर बसली. 
दोन मिनिटं शांतता होती.
आमचंही एक सुंदर घर होतं रे. पण घर म्हणजे चार खांब आणि एक छत नाही. माझ्या आईच्या गुणांचं मातेरं केलं माझ्या बाबांनी. आणि माझ्या आयुष्याची त्यांच्या भीरूपणानं नासाडी केली. जाऊ दे, त्यांना काय बोल लावायचे आता? ते समाजरीतीला घाबरत होते. पण ही पांढरपेशी वृत्ती आहे नं ती कारणीभूत आहे. तू सांग. करणारेस का नगरसेवकाच्या मुलावर केस? नाही ना? घातलीस ना शेपूट? आणि मी सांगते. ते घातलेलं शेपूट आतच ठेव. तुझं काम तमाम करायला एक मिनिट पुरेसं आहे त्याला. ही एवढी उच्चभ्रू सोसायटी आहे ना तुमची? सांगू का कोण कोणाबरोबर लागीर आहे ते? आहे हिम्मत ऐकायची? जाऊ दे. राजकारणात आम्हाला हिशोब ठेवावे लागतात आणि पुरे करावे लागतात. आणि एक सांगते आम्ही ही घाण झेलतो ना म्हणून तुम्ही हा सज्जनपणाचा बुरखा पांघरून जगू शकताय. मी तुला माझी जीवनकहाणी सांगायला आले नाहीये. तुला प्रश्न असतील वा नसतील, पण उत्तर द्यायला मी बांधील नाही. तुला वाटेल की मी चिखलात लोळतेय. पण लक्षात ठेव ते नगरसेवकाचं बुजगावणं माझ्या आधारावर उभं आहे. तुमच्या सारख्यांची सहानुभूती नकोय मला.
मला तिच्याकडे बघवत नव्हतं. मी खाली घातलेली मान वर करू शकत नव्हतो.

तिनं अचानक माझ्या हातावर हात ठेवला. मी चमकून वरती बघितलं. तिच्या चेहऱ्यावर मार्दव होतं. ते कठोर शब्द हीच बोलत होती यावर माझा क्षणभर विश्वास बसला नाही. 
तरीही मी तुला मित्र मानते. बालमित्र. आपण एकटे असताना तू कधीही माझा गैरफायदा घेतला नाहीस. मला माहितेय तुझे मित्र आपल्याविषयी काय बोलायचे! पण त्याचं प्रतिबिंब तू तुझ्या वागण्यात वा डोळ्यांत कधी पडू दिलं नाहीस. 
ती एकदम हसली
तुला प्रज्ञाचं स्थळ कुणी आणलं आठवतंय?
अं.. करंदीकर काकूंनी?
विचार त्यांना कुणी सांगितलं ते!
माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं.
होय! मित्र आहेस तू माझा. पण कधी माझ्या उपयोगी पडला नाहीस ना? 
मी काही बोलण्याच्या आतच ती म्हणाली जाऊ दे, विसर ते सगळं. पण लक्षात ठेव पब्लिकमध्ये मला कधीही ओळख दाखवू नकोस. तुला महागात जाईल. कारण मी कोण आहे, ते तुला कदाचित माहिती नव्हतं, पण बाकी सगळ्यांना माहिती आहे.
आता उठ. तुझं अंग गरम लागतंय. पुन्हा गोळी घे. आणि झोप. चहा करून ठेऊ का? 
मी काचकुचत हो म्हणालो.
थोड्या वेळानं ती गेली.

----

विधानसभेला तो नगरसेवक बंडखोरी करून उभा राहिला. पडला. अपर्णाचा जुना नवरा पक्षाचा उमेदवार होता, तो आमदार झाला. नंतर हा नगरसेवक महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभा राहिला. तिथेही पडला! एवढंच नाही तर क्रिमिनलमधे अडकला.

एक दिवस मी तिकडून गेलो. आकांक्षा बंगल्याचा नामोनिशाण उरला नव्हता. पत्रे लागले होते.
अपर्णा कुठे गेली पत्ता नाही. कधी तो नितीन भेटला तर विचारीन. दुसऱ्या कोणाला विचारणार?

----

तो बंगला. कुणाच्या तरी आकांक्षांचं प्रतिक होता. एका कुटुंबानं त्याला घडवलं. एका कुटुंबाला त्यानं घडवलं. चढत्या काळात, पडत्या काळात घर दिलं, निवारा दिला. पण माणसंच कोलमडून पडली, तर त्याच्या भिंती ढासाळायला कितीसा वेळ लागणारए? शेवटी माणसाचं काय किंवा बंगल्याचं काय, नशिब हे एक गौडबंगालच असतं.

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली कथा.

पण कुठेतरी अपर्णाने त्याला शेवटी शेवटी कठोर बोलणेही पटले नाही.
ज्याचे त्याचे निर्णय ( कधी परिस्थितीवश , कधी विचार करून घेतलेले ) आणि त्याचे परीणाम.
आयुष्य पुढे पुढे.
त्या काळाचा विचार करता मुलगे लोकांचा पेपर किंचित सोप्पा.

कथा जमली आहे..

झकास बरोबर सहमत.
रवीने मदत केली नाही म्हणून अपर्णाने त्याला बोलणे पटले नाही. तिने स्वतःच सावरायला हवे होते. तिचे एकूण वागणे बघता इतर कोणी तिला या बाबतीत का मदत करेल ?

अपर्णाचा जो काही शेवट झाला तो बघून वाईट वाटले. तिच्या आजूबाजूला तिला सावरणारा कोणी नसावा हे खटकले. ती कथानायकाकडे कुठल्या दृष्टीने बघत असेल ते स्पष्ट नाही. ती वाहवत गेली . तिची इच्छा असती तर तिला ह्या गर्तेतून सहज बाहेर पडता आले असते.
असे आयुष्य जगणे कठीण आहे,

अतिशय सुंदर कथा.
शीर्षक अगदी योग्य आहे.
प्रत्येक भागात बंगल्यात झालेल्या बदलाचं रूपक खूप काही सांगून जात.
८०-९० पासून आतापर्यंत चे बदल - माणसं आणि परिसर छान रेखाटले आहेत.

पण माणसंच कोलमडून पडली, तर त्याच्या भिंती ढासाळायला कितीसा वेळ लागणारए. +१
फार आवडलं
पण अपर्णाचं त्याला ओरडणं खटकलं

शाळेत कुठेही तिला तो किंवा त्याला ती आवडते असं म्हटलेलं नाही
त्यानेही मित्र चिडवत असूनही, घरच्यांची ओळख असूनही तिचा गैरफायदा घेतला नाही
उलट तिनेच त्याच्याबरोबर अभ्यास करायला म्हणून जाऊन मित्राला भेटल्याचा संशय आहे.
मग यात त्या काळातला मध्यमवर्गीय मुलगा काय आणि कशी मदत करणार होता
बाकी कथा खूपच सुंदर
सर्व भाग पूर्ण झाल्यावरच वाचल्याने पुढच्या भागाची वाटही पहावी लागली नाही
एका बैठकीत वाचून काढली
त्या काळात बंगल्यांच्या सोसायट्या ब-याच शहरात असाव्यात
मराठी वर्णन इतके छान आहे की कथा अशी वाटलीच नाही
त्या काळातली एखादी सिरीयल पाहते असेच वाटले

मला अपर्णाचा राग अनाठायी नाही वाटला. तिने विश्वासानेच मदत मागितली होती, प्रेम आहे म्हणून नव्हे. याने मदत केली नाही. त्याला शक्य नव्हते हा भाग वेगळा. पण त्याने तसेही सांगितले नाही. तिचे वडीलही बहुतेक असेच होते. त्यामुळे तिने त्यातून जसा सुचला तसा मार्ग काढला. आणि त्यावरून या लोकांनी ती "तसलीच" आहे, असं ठरवलं.
नकळत्या वयात झालेल्या चुकीमुळे तिच्यावर एक शिक्का बसला. आणि मग पुन्हा सावरण्याची संधीच मिळाली नाही.

सावरण्याची संधीच मिळाली नाही.
?????
अशी संधी मिळत नाही, स्वतःच निर्माण करावी लागते..

बाकी कथा अतिशय उत्तम जमली आहे.
बंगल्यांच्या रूपकातून बदलते जीवन आणि मूल्ये खूप चपखल पकडली आहेत.

अबुवा, तुमच्या सगळ्याच कथा नेहमी वाचल्या जातात आणि आवडतात. लेखकाचं नाव वाचुन विश्वासाने लिखाण वाचायला घ्यावं अशा मोजक्या लेखकांमधे तुमचं नाव येतं. शिवाय तुम्ही ल्वकर लवकर भाग टाकता त्यामुळे मजा टिकुन रहाते.

छान लिहिलेय कथा! सहसा स्त्रिया आपले frustration जवळच्या व्यक्तीवर काढतात. अपर्णाला कदाचित रवी जवळचा वाटला असावा.

कथा आवडली . मात्र अपर्णाचा स्टँड आवडला नाही. स्वतच्या चुका मान्य न करून दुसऱ्यांवर सगळा दोष टाकायचं ही वृत्ती दिसली तिच्या वागण्यात .

सगळ्या प्रतिक्रियांविषयी मनःपूर्वक आभार.
'न जान ना पहचान के' लोकं जेव्हा अस्मादिकांच्या लेखनाविषयी(!) चांगले उद्गार काढतात तेव्हा इट वार्म्स द कॉकल्स ऑफ माय हार्ट! नारायणाप्रमाणेच भावना व्यक्त करायला, परभाषेचा आधार बरा असतो!
या प्रतिसादांमधून लेखक म्हणून माझ्या मर्यादांचा मला अदमास घेता येतो. आणि म्हणून ही उहापोह:
अपर्णाच्या वागण्यावर, लाईफ-चॉईसेसवर सगळ्यांनी टिपण्णी केली आहे. योग्यच आहे. पण रवी? त्याच्या वृत्ती, प्रवृत्तींवर टीका तर सोडा, नोंद घेतली गेल्याचंही मला जाणवलं नाही! तो इतका तुमच्या-माझ्या हाडीमासी खिळलेला आहे का?!
वाचकांनी तीन-साडेतीन भाग अपर्णाला फक्त रवीच्या नजरेतून बघितलं आहे. रवीला जेवढी दिसली (आणि त्यानं जितकी मांडली) तेवढीच. ती खरी व्यक्त होते ती एकदाच आणि तोच कथेचा उत्कर्षबिंदू.
मग रवी हा कथेचा फक्त निवेदक आहे का नायक? का खलनायक?
अपर्णा ही (न)नायिका आहे की फक्त वर्ण्यविषय?

हा नवा/वेगळा दृष्टिकोन आहे की कथेत याचे पडसाद तुम्हाला जाणवले आहेत?

तुमचा मुद्दा बरोबर आहे.
मला तरी रवी कथेचा निवेदक वाटला. त्याला अपर्णा बद्दल काही हळव्या, घनिष्ट मैत्रीच्या किंवा कोणत्याच भावना जाणवल्या नाहीत. नंतर फक्त कुतूहल जाणवले.
तो तिला judge करत नाही, तिचे समर्थन करत नाही, तिचे चुकले असेही म्हणत नाही. फक्त जे घडले, जसे घडले तसे सांगतो... म्हणून फक्त निवेदक...

वाचली गोष्ट. वेगळीच आहे. छान लिहिलीय. आता जुन्या पण वाचते तुम्ही लिहिलेल्या शोधून.
आयुष्य संपन्न असेल किंवा साधं असेल, पण त्यात असे डिस्टरबन्सेस नसावेत यासाठी स्वतःच प्रयत्न करायला लागतात. शिकलेल्या ( तेही कॉन्व्हेन्ट म्हणजे अजून एक्स्पोजर थोडं जास्त ) मुलीचं एखाद्या चुकीने आयुष्य वहावत जाईल असं होतं? सुधारण्याच्या संधी असतात. नशिबापेक्षा तिचा आणि घरच्यांचा निष्काळजीपणा असावा. शिक्षणाची वाट सोडू नये. स्त्रियांनी तर अजिबातच.

छान कथा!
अपर्णाचे आयुष्य सावरायला हवे होते पण तसे झाले नाही. मात्र ती जबाबदारी खरे तर तिच्या पालकांची होती. एका टप्प्यानंतर तिची स्वतःचीही होती असे म्हटले तरी त्या वयात तिला तेवढी समजही नव्हती, गळ्यात गाणे होते, मोठी स्वप्ने होती पण त्यासाठीही चांगले मार्गदर्शन नव्हते.
तिच्या सध्याच्या परीस्थितीला ती रवीला जबाबदार धरत नाहीये पण बालमित्राला भेटून, त्याच्या डोळ्यातले प्रश्न पाहून तिचा बांध फुटतो. तिचा समाजावर राग आहे, ती रवीलाही बोल लावते कारण तिला डेट करुन, नाते अजमावून- वाईट नाते तोडून पुढे जायची संधी नाकारली जाते. तिचा रवीवर विश्वास आहे, तो आपला गैरफायदा घेणार नाही अशी खात्री आहे त्यामुळेच ती रवी कडे मदत मागते, मात्र मदत करायची रवीची कुवत नसते. त्यात त्याचे मित्रही सहजतेने तिच्यावर शिक्का मारुन मोकळे होतात. तिचे वडीलही तिच्यासाठी उभे रहात नाहीत. चुकीच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी तिला कुणाचीच मदत मिळत नाही, ती तिच्या अकलेने मार्ग काढते आणि अजूनच फसत जाते. पुढला स्लिपरी स्लोप तिला टाळता येत नाही.

खूप छान कथा..!

घराचं बदलतं रूप आणि त्यासोबत घरातल्या माणसांचं बदलणारं आयुष्य अतिशय कल्पकतेने मांडलं आहे.

कथा विचार करायला लावणारी आहे. ज्यावेळी अपर्णा घरातून मुंबईला मित्रासोबत गेली त्यानंतर मित्राकडून फसवणूक झाल्यावर घरी परतल्यावर पालकांनी तिला समजून घेतलं होतंच .. त्यांनी नुसतं समजून न घेता क्लासच्या सरांजवळ देखील इतरांनी देखील समजून घेऊन तिला तिच्या गायब असण्याबद्दल काही एक न विचारता तिला त्रास होऊ नये म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांकडून वचन देखील घेतलं होतं. ती स्वतः आपली एक पायरी खाली उतरली आणि त्यामुळे वडिलांनाही लज्जित व्हावं लागलं. तरीही समजू की, अल्पवयीन असल्याने फूस लावून पळवून नेलं .. पण प्रत्येकवेळी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जिथे वागण्या- विचारांत परिपक्वता यायला हवी तिथे प्रत्येकवेळी आपली पायरी उतरायची गरजच काय होती? ती चुकीची आहे असं नाहीये मात्र तिने आपली पायरी ओळखायला हवी होती असं वाटते. वाहवत जाणे टाळायला हवे होते. मित्राने फसवणूक केल्यानंतर तिने त्यातून धडा घ्यायला हवा होता. दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून प्यायला हवे होते. कथेचा नायक आणि अपर्णा दोघांमध्ये मैत्री जरी असली तरी त्या मैत्रीत एक अंतर जाणवतेयं.. तेवढी पारदर्शकता त्या नात्यात नाही आणि जर असती तर ती नायकाशी तिच्या प्रेमप्रकरणाबाबत काहीतरी नक्कीच म्हणाली असती. अपर्णाला चांगलं सुखवस्तू कुंटूंब लाभलं होतं.. ती एकुलते एक पाल्य असल्याने पालकांच्या प्रेमात इतर कुणीही वाटेकरी नव्हते. पण ती निर्णय घ्यायला चुकत गेली आणि आयुष्याची दुर्दशा तिने करून घेतली. प्रत्येकवेळी कुणीतरी मसीहा बनून आपलं आयुष्य सावरायला येईल असं घडत नाही.
आयुष्यातल्या काही लढाया ह्या आपल्या आपणच स्वतः लढायच्या असतात. अपर्णा इथे दुर्दैवी ठरली.

तरीही मित्रासाठी जोडीदार शोधून त्याच्या सांसारिक आयुष्याची घडी व्यवस्थित बसावी म्हणून प्रयत्न करणारी अपर्णाच मैत्री निर्मळ आहे यात शंका नाही मात्र तिचे आयुष्याबाबत घेतलेले निर्णय चुकले तेवढचं खरं आहे..!

कथा सुंदर आहेच यात शंका नाही.