मराठी चित्रपट गोंधळ भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ऑस्करला जातोय , ही बातमी काहींनी वाचली असेल.
हा चित्रपट खरं तर गेल्या वर्षी रिलीझ झाला होता, फ्लॉपही झाला. आता पुन्हा रिलीझ झालाय, तोही सहा भारतीय भाषांत
आताही मोठ्या पडद्यावर दुसर्या आठवड्यात जाण्याची शक्यता कमीच असल्याने चित्रपट पाहून आल्या आल्या वेगळा धागा काढून लिहितोय
तर लग्न लागल्यावर गोंधळ घालायची परंपरा काही भागांत असते, त्याभोवती हा चित्रपट फिरतो. शिवाय लग्न म्हटल्यावर त्या मुलांचा विचार घेणं , न घेणं हे तर आहेच. सेक्सबद्दल चार चौघांत कोड लँग्वेजमध्ये तरीही ज्यांना कळायला हवं त्यांना कळेल असं बोलणं आहे.
रात्रीची वेळ. म्हातारा भिवाबा - किशोर कदम- आपल्या नातवाला घेऊन गोंधळ घालायला चालला आहे. त्याचे सहकारी पुढे गेले आहेत . गावात पाटलांचं मातब्बर घराणं. त्याला दोन शाखा. पहिल्या शाखेने बक्कळ हुंडा मागितल्याने न जुळलेली सोयरीक दुसर्या शाखेत जमते. भिवाबा रस्त्याने चालता चालता हे सांगत असतो. त्यातच त्याच्या मुलाच्या अपमृत्यूची केस सोडवण्यात पोलिस टंगळमंगळ करताहेत हेही कळतं.
तो गावी पोचल्यावर तिथे पूजेची तयारी दिसते. एकेक पात्र समोर येत जातं. शेवटी नवरी दिसते. हा २५ मिनिटांचा एकच टेक आहे, असं वाचलं होतं. चित्रपट पाहताना गावात आणि इन्डोर लोकेशनला आल्यावरच ते ठळक लक्षात आलं.
आता पात्रं. सत्तरच्या दशकांतल्या मराठी सिनेमात निळू फुले, मोहन कोठीवान, राजशेखर यांच्यासारखे खलनायक असत, आणि बहुतेक वेळा ते पाटलांच्या भूमिकेत असत , सावकारी करत, तसं काहीसं. दुसरीकडे अनेकदा मातब्बर पण सज्जन माणसाच्या भूमिकेतले दादा साळवी दिसतील. नायक नायिका खलनायकांत मला शापितमधले यशवंत दत्त, मधु कांबीकर आणि कुलदीप पवार दिसले.
हा जुनाच मसाला नव्याने आहे का? तर हो आणि नाही. कारण यात एकामागून एक जे ट्विस्ट येतात तीच चित्रपटाची गंमत आहे. नीट लक्ष देऊन पाहिलं , ऐकलं तर सगळे धागेदोरे जुळतात.
एक सामान्य प्रेक्षक म्हणून दिसलेल्या गोष्टी म्हणजे सिनेमात कुठे विजेच्या तारा, रस्त्यावर वा बहुतेक घरातही दिवे दिसत नाहीत.
सिनेमासाठी लायटिंग कसं केलं असेल असा प्रश्न पडला. मी कॉलेजात असताना दूरदर्शनवर आठवड्यातून एक दिवस आर्ट फिल्म्स दाखवायचे. मृणाल सेन , शाम बेनेगल, मणि कौल इ. तर एका सिनेमाबद्दल कॉलेजात असं वाक्य कानी पडलं की कालचा सिनेमा आम्ही टीव्हीवर टॉर्च मारून बघत होतो, काही दिसतंय का. गोंधळमध्ये मात्र सगळं व्यवस्थित दिसतं.
गोंधळात फिश पाँडसारखा प्रकार असतो. म्हणजे ज्याच्यावर जोक करायचाय त्याच्या नावाची चिठी गोंधळ्याला द्यायची - पैसे द्यायचे. मग गोंधळी त्या चिठीतल्या माणसाचा यथोचित अपमान करणारं स्किट सादर करतो. वर हे देवाचं कार्य म्हणून रागवायची सोय नाही. तरीही रागवणारे रागवतातच.
ओळखीचे अभिनेते फार नाहीत. किशोर कदम गोंधळी. नायक योगेश सोहोनीचा चेहरा ओळखीचा वाटला. टीव्ही मालिकेत मुख्य भूमिकेत होता. माधवी जुवेकर त्याच्या आईच्या भूमिकेत. एका गोंधळ्याच्या भूमिकेत कैलाश वाघमारे (खालिद के शिवाजी मधले खालिदचे सर).
चित्रपटाला इलाया राजाचं संगीत आहे. त्याने नक्की काय केलंय असा प्रश्न पडला. म्हणजे सगळी पारंपारिक वाटणारी गाणी , पारंपारिक वाद्य समोर दिसताहेत. कैलाश वाघमारे स्वतःच गातोय असं वाटलं. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला मधलाच जोश .
दोन गीते अजय गोगावलेंनी लिहिलीत. दोन दिग्दर्शक, संवाद आणि कथालेखक संतोष डावखर यांनी. गायक म्हणून अजय गोगावले , आर्या आंबेकर, अभिजीत कोसंबी यांची नावं श्रेयनामावलीत दिसली. पण चित्रपटात वेगळी गाणी आलीत, असं जाणवलंच नाही, म्हणून ती शोधून ऐकावी लागतील.
किशोर कदम यांच्या अभिनयाबद्दल वेगळं काय बोलायचं? नायक योगेश सोहोनीने मात्र सुखद धक्का दिला. नायिकेचं पात्र धीट आहे आणि इशिता देशमुखने ते पोचवलंय.
हा चित्रपट नक्की आवडला की नाही, तो ऑस्करच्या पातळीचा आहे की नाही, याबद्दल माझं मत बनत नाहीए. त्यातल्या वेगळेपणानेच प्रभावित केलंय. अर्थात मी फार कमी चित्रपट पाहतो, त्यामुळे मला जे वेगळं वाटलं ते तसं आहे का नाही, हे बघून ठरवा.
मी ऐकलेय या सिनेमाबद्दल पण
मी ऐकलेय या सिनेमाबद्दल पण उत्सुकता वाटली नव्हती. आता वाटतेय. हा गोंधळ आणि नवरात्रातला गोंधळ सादर करणारे गोंधळी एकच असतात ना? म्हणजे मी तो नवरात्रातला पाहिला आहे. हा आठवत नाहीये.
दोन गाणी (मल्हारी आणि चांदणं)
दोन गाणी (मल्हारी आणि चांदणं) यूट्यूबवर ऐकली आणि आवडली होती.
सिनेमा स्ट्रीमिंगवर आला की पाहीन.
गोंधळात ‘रोस्टिंग’ / फिशपाँड करतात ही माहिती मला नवीन आहे.
(आवडला की नाही हे ठरवता येत नाहीये म्हणजे नाही आवडलेला.
)
इथे मांडल्याबद्दल आभार. फारच
इथे मांडल्याबद्दल आभार. फारच रोचक वाटतो आहे. लोककलांबद्दल आत्मियता आणि कुतूहल आहेच देवीचा असल्याने एखादा गोंधळ अनुभवायची फार इच्छा आहे
हा बघायचा होता. सुरुवातीच्या
हा बघायचा होता. सुरुवातीच्या 25 मिनिटे वन टेक बद्दल आणि एकूणच ट्रीटमेंट बद्दल कौतुक ऐकले होते. एका मित्राने स्वतः बघून शिफारस सुद्धा केली होती. पण तेव्हा हे कानावर यायला उशीर झाल्याने गेला. आणि आताही पुन्हा रिलीज झाला तर जवळच्या कुठल्या थिएटरमध्ये नव्हता.
खूप दिवसांनी वेगळ्या
खूप दिवसांनी वेगळ्या चित्रपटाबद्दल उत्तम लेख वाचला.
टॉर्च लावून पाहिलेला चित्रपट बहुतेक खंडहर असेल.
अस्मिता , मला दोन्ही
अस्मिता , मला दोन्ही गोंधळांबद्दल माहीत नव्हतं.
टॉर्च लावून पाहिलेला सिनेमा पार. शबाना - नसीर. त्याचा शेवट अजूनही अंगावर येतो.
पार अंधारात आहे पण दिसतो.
पार अंधारात आहे पण दिसतो.
माझ्या आत्याच्या घरी
माझ्या आत्याच्या घरी माहूरची रेणुकामाता कुलदैवत आहे. तिच्या कडे दर नवरात्रात गोंधळ घालत असतात. ते गोंधळी रात्रभर देवीची भजनं, गाणी अजून काही काही करत असायचे. मला भाची -कुमारिका म्हणून बोलवत असल्याने मी काही वेळा पाहिला आहे. लग्नानंतरही बोलवत बहुतेक. पण तो आठवत नाही . शिवाय आपला घरचा गोंधळ काही कमी आहे का, वेगळे "गोंधळी" कशाला हवेत अशे जोकही मारायचे दरवेळी.
मला त्या वन टेक चे विशेष
मला त्या वन टेक चे विशेष कौतुक नाही. यात एक unearned बाललैंगिक शोषण आहे ज्याचा सिनेमाच्या मूळ गाभ्याशी आणि कथेशी काडीचाही संबंध नाही. त्यामुळे हा चित्रपट आवडला नाही आणि कदाचित याच कारणामुळे ऑस्कर मधून हा लवकरच बाहेर फेकला जाईल कारण तिथे असली बिनकामाची टोके चालत नाहीत.
ह्या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे
ह्या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे.
गोंधळात ‘रोस्टिंग’ / फिशपाँड करतात ही माहिती मला नवीन आहे.>>>+१