गृहान्तर (भाग ३)

Submitted by Abuva on 15 November, 2026 - 02:51

दहावी झाली. मी सायन्स घेतलं. यथावकाश बारावी झाली. चांगले मार्क पडले. बरं, पण बारावीपर्यंत माझा क्लास मी बदलला नव्हता हं.
आता मोठे झालो होतो. हिंमत केली आणि सरांना म्हटलं, सर चला पार्टी देतो. बाहेर जेवायला जाऊ. सर म्हणाले चला.
एका रविवारी दुपारी श्रेयसला जेवलो. चालत चालत पूनमला येऊन पान घेतलं. जुन्या नव्या आठवणी चघळताना अपर्णाचा विषय निघाला. सरांनी जरा विचार केला. म्हणाले आता तुम्ही मोठे झाला आहात. सांगायला हरकत नाही.‌ पण अपर्णाला फूस लावून पळवलं होतं. अनुप जलोटा वगैरे सगळा बनाव होता. अपर्णा त्यात सामील असावी. तिच्या वडीलांना संशय आला आणि वेळीच त्यांनी हालचाल केली, अगदी पोलिसांपर्यंत गेले, त्यामुळे आफत वाचली. रेल्वे स्टेशनवरच त्यांना थांबवलं, नाही तर काय झालं असतं सांगता येत नाही. असो. वाच्यता नको. माणसाकडून चुका होतात. आणि पोरीचं शील महत्त्वाचं.
(भाग २: https://www.maayboli.com/node/89227)
हे ऐकून मला धक्का बसला. अपर्णानं माझा वापर करून घेतला होता का? कदाचित ती अभ्यासाच्या कारणानं त्यावेळी त्या मुलाला भेटली असेल? कदाचित तिनं आईच्या मर्मावर बोट ठेऊन तो बनाव रचला असावा का? तिला एवढं डोकं होतं? का तो जो कोण मुलगा आहे त्यानं कट रचला? खरंं तर ती सज्ञान नव्हती. तो मुलगा आयुष्यभरासाठी आत गेला असता. पण बहुतेक काका-काकूंनीच तोहमत येऊ नये म्हणून प्रकरण सोडलं असेल. पण किती भयाण, नाही?

----

जशी लोकसंख्या वाढली तसा बकालपणा वाढला. चोराचिलटांचा उपद्रव वाढला. मग त्या बंगल्यांच्या खिडक्यांना बाहेरून लोखंडी ग्रिल लागले, म्हणजे सहज आत हात घालता येऊ नये. ओपन व्हरांड्यांची ग्रिलं जाऊन काचेची तावदानं आली. मुख्य दरवाज्यासमोर कोलॅप्सिबल लोखंडी ग्रिल आले. बंदोबस्त वाढला.

----

इंजिनिअरिंग सुरू झालं. आता आम्ही मित्र संध्याकाळी कॉलेजच्या बाहेर कट्ट्यावर बसून लागलो होतो. समोरच्या गल्लीत जाताना मी एकदोनदा अपर्णाला पाहिलं होतं. एकदा ती आपणहून थांबली, बोलली. ती कुठल्याशा कॅंपातल्या कॉलेजात होती कॉमर्सला. इथे त्या अकौंटन्सीच्या क्लासला यायची. 

त्या वर्षीच्या फिरोदियात ती तिच्या कॉलेजकडून गायली आणि बक्षीस घेऊन‌ गेली.

एकदा अशीच थांबली. म्हणाली एक बोलू का?
सांग की.
एक मुलगा मला त्रास देतोय. तुला काही बघता येईल का?
मला तो चढाव, ती पंचरलेली सायकल ओढत चाललेली अपर्णा आठवली. पुरुषसुलभ स्त्रीदाक्षिण्यानं, त्वेषानं माझे बाहू फुरफुरले.
कोण? नाव सांग.
पण नाव ऐकल्यावर माझं अवसान गळालं. नगरसेविकेचा मुलगा होता तो! 
मी गुळमुळत म्हणालो. बघतो सांगून.
ती गेली.
आमचा मिल्या त्या गल्लीत रहायचा. सांडासारखा वाढला होता आणि पक्षाचं काम करायला लागला होता. विचार केला त्याला सांगून बघावं. मिल्या आठवतोय ना? पल्लवीचा पाय मुरगाळला होता तेव्हा तिला मदत करणारा? पुढे, बाय द वे, त्यांचं शुभमंगल लागलं! (ती वेगळी ष्टोरी)
तर मी मिल्याला सांगितलं.
तो म्हणाला आपली अपर्णा? बघतो. 
चार आठ दिवसांनी तो मला येऊन म्हणाला, साल्या, काय काम सांगितलंस.
का रे?
अरे तीच त्याला घुमवतेय. आणि पल्लवी म्हणाली, त्यालाच काय आणखी दोघा-चौघांनाही फिरवतेय!
बास, विषय संपला.

----

कधी तरी अपर्णाच्या बंगल्याला मातकट गुलाबी वा विटकरी रंग दिला हे दिसलं. त्याच डार्क रंगाचे हाय लाईट होते. पण बंगला उठून दिसत नव्हता. त्याला फ्रेशनेस नव्हता. मात्र मला पूर्वी  लक्षात न आलेलं आकांक्षा हे बंगल्याचं नाव आता ठळक उठून दिसत होतं.

----

इंजिनिअरिंग नंतर दोन-तीन वर्षांत मी रिवाजाप्रमाणे परदेशगमन केले. गाशा गुंडाळून परत यायला‌ दहा वर्षं लागली.‌ पण तशा वर्षा-दीड वर्षांनी खेपा व्हायच्या. कधी अपर्णाच्या घरावरून जाणं व्हायचं. एकदा पाहिलं तर बंगल्याला एक नवीन गेट काढलं होतं - कारच्या मापाचं. कार काही दिसली नाही. खरं तर अपर्णाची बातमी नव्हती. आता तसं तिच्याशी कॉन्टॅक्ट असणारं फार कुणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं. 
पुढच्या वेळी कारच्या जागेत एक भाजीचं दुकान चालू झालेलं दिसलं. ही वेळ यावी? इतक्या वर्षांत ना कधी अपर्णा दिसली, ना काका ना काकू. बंगल्यात जाग जाणवायची पण दिसलं मात्र नाही कोणी. कधी तरी समोरची बाग उद्ध्वस्त झाली होती. नुस्तं तारेचं कंपौंड राहिलं होतं. अगदी रस्त्यावर आल्यासारखा दिसत होता बंगला.
पुढच्या वेळी दुसऱ्या कोपऱ्यात एक शिंप्याचं दुकान होतं, लेडीज टेलर. त्या कोपऱ्यात छान बहरलेला आंबा आठवतोय मला. गेला तो?
आता अपर्णाचं लग्नही होऊन गेलं असेल असा विचार मनात यायचा. अपर्णा एकुलती एक होती. मग आता राहातं कोण? काका काकू आहेत ना? का भाड्याने दिलाय बंगला?

----

दहा वर्षांनी परत आलो. लग्न ठरलं. उशीरच झाला होता. पण ठरलं. लग्नापूर्वी आम्ही दोन चार जणं एकदा मिल्याबरोबर बसलो होतो सांच्याला. तोही आता मोठा झाला होता. पुढच्या इलेक्शनला नगरसेवक होणार असं घाटत होतं. इलेक्शनचा विषय आल्यावर तो अचानक म्हणाला, अरे अपर्णाचा डिव्होर्स झाला!
म्हणजे? तिचं लग्न झालं होतं?
लय हुशार तुम्ही इंजनेर! लग्नावाचून होतो का डिव्होर्स? तू इलेक्शनचं बोललास आन मला आठवलं की आपल्या आपोजिशनशीच लग्न झालंत तिचं.
कोणाशी त्या नगरसेविकेच्या मुलाशी? 
हां. पण तुला‌ वाटतो तो नाय. तिच्याबरोबरचा होता तो लहाना. तो फिरवायचा हिला. पण तिनं मोठ्याला गटवला.
काय सांगतोस! काय पोरगी आहे?! च्यायला‌, मी अभ्यासाला जायचो तेव्हा असं काही कधी वाटलं नाही रे! 
तुझी तर जान होती ती.. हा हा हा
ते उगाच तुम्ही कंड्या पिकवल्या होत्या. त्यात काही दम नव्हता.
अन् तुज्यात तो दम नवता.
तेही खरंच. मग डिव्होर्स का झाला?
तुझा विश्वास बसणार नाय. ॲडल्टरी.
काय?! काहीही...
हां. विश्वास बसत नाय ना? नवऱ्यानं ॲडल्टरी टाकून डिव्होर्स मागितला. आता बोल!
नाही रे! काहीच्या काही! प्रूफ मिळालं? 
मं! कोणाबरोबर? विचार कर
छ्या मी .. मला... आयला, शेजारी बसणारी मुलगी रे! तिच्या घरी जाऊन आलो मी दहा वेळा. पण तेव्हाही ती नटायची जास्त..
ते सोड. कोण ते ओळख.
जाऊ दे रे. कशाला त्या खातेऱ्यात पडायचं?
हे असंय तुमच्या पांढरपेशांचं. दम नाय तुमच्यात कटू सत्याला सामोरं जायला. अरे राजकारणात सगळ्यांचा हिशोब ठेवावा लागतो. बरा-वाईट, सगळा. हिंमत असेल ऐकायची तर सांगतो.
मी गप्प राहिलो.
ल्हान्या बरोबर!
माझा उघडलेला आ मिटायला तयार नव्हता.
त्याला सोडून मोठ्याला लागली, त्यानं हिसाब बराबर केला. फोटो दाखवले, म्हन्ला पोर माझंय. नवऱ्यानं मं पोट पाडाया लावलं. आणि केस टाकली. गेला ल्हाना आता दुबैला नोकरीला.
मी म्हणजे, कुठे बघावं कळेना झालं होतं.. माझ्या मध्यमवर्गीय पांढरपेशा जीवनात हे अतर्क्य अगम्य होतं.
सोड ते, नाय झेपणार तुला. एऽऽ, ग्लास भर...

---

हे बंगले बांधले तेव्हा गर्दी कुठे होती हो? शांत सोसायट्या असायच्या. कार ठेवायची सुद्धा सोय नसायची. जिथे टू-व्हीलर घरी असणे ही चंगळ होती, तिथे कारची सोय कोण करणार? मग जेव्हा कार आल्या त्या रस्त्यावरच उभ्या कराव्या लागल्या. एक वेळ ते ठीक आहे. पण वर्दळ आणि ट्रॅफिक इतकं वाढलं, की रस्ते मोठे करावे लागले. आणि त्यात या बंगल्यांची दुर्दशा झाली.
अपर्णाच्या बंगल्यासमोरची बाग सगळी गेली. कंपौंड पार ओट्याला येऊन टेकलं. जिथे शांत, सुनसान रस्ता होता तिथे दिवसाचे वीस तास घरघरती वर्दळ सुरू झाली. पार रया गेली.

---

माझा मुलगा वर्षा-दीडवर्षाचा होता. रात्री त्याला हगवण लागली. सकाळी सकाळी डॉक्टरांना फोन केला. त्यांनी लगेच एक औषध द्यायला सांगितलं आणि दहा वाजता क्लिनिकला घेऊन या म्हणाले. लवकर उघडणारं एक मेडिकलचं दुकान मला माहित होतं. तडक स्कूटरला किल्ली मारून मी तिथे गेलो. औषध घेऊन वळलो, ते समोर अपर्णा! मी क्षणभर तिचं अवलोकन केलं, त्या कालावधीत मेंदू सगळ्या आठवणींचा मुरांबा घेऊन तयार झाला होता. आमची नजरानजर झाली. एक क्षणार्ध मी घुटमळलो. पण मी तोंड उघडणार तेवढ्यात तिनं नजर काढून घेतली आणि अनोळखी माणसासारखी कौंटरकडे सरकली. माझा आ पुन्हा उघडाच राहिला. मी पूर्वीच्या मानानं जाड झालो होतो, केस विरळ झाले होते, चष्मा लागला होता. पण म्हणून तिनं मला ओळखलं नसेल? मी ओळखलं की तिला. तिचाही चेहरा फुगला होता, देहा प्रमाणेच. डोळे निस्तेज होते. 
स्कूटरवर बसून मी एक सेकंद तिचं निरीक्षण केलं. पण औषध घरी पोहोचवणं महत्त्वाचं होतं. जाताना विचार करत होतो. ती काहीतरी वेगळी दिसत होती. एखादी गृहिणी सकाळीच  घाईघाईत औषधांच्या दुकानात येताना जितकी आवरून येईल त्यापेक्षा ती सूतभर जास्त अव्यवस्थित होती. आणि गृहिणींचे जे व्हाईब्स असतात त्यापेक्षा काही तरी वेगळं होतं. तिचा आविर्भाव असेल, कपडे असतील...

तेवढ्यात घर आलं, विवंचना बदलल्या.

हो, परत आल्यावर एखाद्या फॉरेन रिटर्न्डला शोभेसा नवीन फ्लॅट मी घेतला होता. जो तसं बघायला आता अपर्णाच्या बंगल्याच्या जवळ होता. फक्त माझा रोजचा रस्ता तिच्या घरावरून जात नव्हता. क्वचितच तिच्या रस्त्याला जावं लागायचं. तेव्हा मात्र नजर त्या बंगल्यावर गेल्याशिवाय रहात नव्हती. तिथे एक लेडीज टेलरचं दुकान सुरू झालं होतं सांगितलं ना मी? आता त्या बंगल्यावर कसलीशी टेलरिंग स्कूल असा बोर्ड लागला होता. भव्यदिव्य नाही, जस्ट एक 'शिवणकामाची शिकवणी' या पद्धतीचा.

----

हे बंगले बांधले ते बहुतांश सुशिक्षित, पांढरपेशा लोकांनी. त्यांची पुढची पिढी ही त्यांच्या पेक्षाही जास्त शिकलेली निघाली. म्हणजे सर्वसाधारणपणे. बरोबरच आहे. त्यांना एक चांगला पाया मिळाला होता त्यांच्या उन्नतीसाठी. त्यामुळे अशा‌ बंगल्यांत, थोडंफार बदल करून, कुठे वकिलाचं ऑफिस, कुठे डॉक्टरचं क्लिनिक, कुठे सीएचं ऑफिस... कधी एखादा मजला वाढवून वरच्या मजल्यावर मोठं काही तरी सुरू झालं. कधी क्लासेस, एखादी सॉफ्टवेअर कंपनी वा इतर कोणती कंपनी. पण क्वचितप्रसंगी अशी जागा भाड्याने पण द्यावी लागली. अपर्णाचा बंगला दुसऱ्या कॅटेगरीत येत असावा.

---

आज अपर्णा इथे दिसली म्हणजे ती इथेच रहात असावी. ती तरी कुठे जाईल? हे तिचं हक्काचं घर होतं.
पुन्हा लग्न झालं असेल तिचं? कठीणै नै? 
आणि... तुला सांगू, ती वागली असेल अनोळखी माणसासारखी, पण मला वाटतं तिची नजर अनोळखी नव्हती!
त्या क्षणभर झालेल्या नजरानजरीत तिची नजर ओळख दाखवत होती, पण कदाचित मला तुझ्याशी आत्ता बोलायचं नाही हा संदेश देत होती.
खरंच का? आत्ता? म्हणजे या वेळेला? का या स्थळी? तिला माझ्याशी त्या क्षणी बोलायचं नव्हतं? पण मग ती नजरेतून संवाद साधत होती ना? म्हणजे तिला माझ्याशी बोलायचंय?
पण मला तिच्याबद्दल काही तरी वेगळं जाणवलं होतं, नाही का?
हो! स्लिव्हलेस! आज ती स्लीव्हलेस मध्ये होती. काकूंची आठवण झाली!
पण वीस-तीस वर्षांपूर्वी आणखी आज स्लीव्हलेस घालणं यातनं जो संदेश जातो त्यात जमीन-अस्मानचा फरक पडलाय रे.
हो. पण एक छोटा मुद्दा होता की तिच्या अं.. अंतर्वस्त्राचा पट्टा दिसत होता.
काय आहे नं, की परदेशगमनानंतर नजर मेली आहे. तरीही कोणी कुठे काय दाखवावं याचे संकेत डोक्यात पक्के आहेत ना!
तरीही, तरीही, मी समजू शकतो की स्त्रियांना इतकी सामाजिक व्यवधानं पाळावी लागतात, त्यामुळे एखादं वेळेला अभावितपणे हे होऊ शकतं. सकाळी, सकाळी, मेडिकल इमर्जन्सी असताना...
हो, हो...पण मला ते अभावितपणे घडलंय असं वाटलं नाही.
म्हणजे काय हेतुपुरस्सर दाखवत होती असं म्हणायचंय का?
आय मीन, अभावित आणि हेतूपूर्वक यांच्यापेक्षा अंगवळणी पडलेलं असणं...
आय मीन‌ काय आहे, की माणसाची‌ नजर आणि तो मेंदू हे असे काही घडलेले असतात की क्षणार्धात गोष्टी टिपून - मग त्यात कपडे आले, पायताणं, केशरचना, बॉडी लॅन्ग्वेज, यू नेम इट - तो पॅटर्न ओळखून एखाद्याला स्टिरिओटाईप करतात... केशरचना कशाला, साधा केसांचा बांधलेला बुचडा बरंच काही सांगून जातो!
आणि यात पूर्वग्रहदूषित नजर त्याचा भाग असतो ना?
हंऽऽ, हो असू शकतो.
अं हं, असतो! 
हे सगळं सगळं मान्य करूनही मला म्हणावसं वाटतं की ती साधी गृहिणी वाटली नाही, ना नव्या जमान्यातली हाऊसमेकर. तर तिचं असणं हे सामाजिक संकेतांच्या बॉर्डरलाईनवर वाटलं!
का?
मी पराचा कावळा करतोय का? सगळं मिळून दोन-तीन सेकंदांची भेट. भेट? दोन ओंडके समुद्रात एकमेकांवर आदळले, समेत्य च व्यपेयाताम् , बास. एवढाच काय तो संपर्क. 
पण आपली ही बालमैत्रिण कठीण परिस्थितीत आहे का?
बालमैत्रिण? खरंच का?
अं... वेल... हं. कोण आहे ती? चढावर सायकल ढकलताना मदतीची अपेक्षा ठेवणारी? की भरीला घालून कुठल्या तरी मुलाच्या पाठीमागे सोडणारी? का, का एक बट्टा लागलेली शील भ्रष्ट?
शील... तुझ्या.. भडव्या, अपर्णाला भ्रष्ट म्हणणारा तू कोण? काय माहिती आहे तुला? आणि समाज काय म्हणेल याची सदैव चिंता लागलेला दिवाभीत आहेस तू, तुला समाजातल्या अवहेलनेची काय कल्पना? का तोंड घालतोयस खातेऱ्यात?

---

घरांचं काय, माणसांचं काय, त्यांना नवोन्मेष लागतात. नवे विचार आत्मसात करणं जसं माणसाला ताजेतवानं ठेवतं, तशी डागडुजी, रंगकाम, बदल, वा नवा मजला म्हणा, हे बंगल्यांचा जिवंतपणा दर्शवतात. आज तुम्ही या जुन्या बंगल्यांच्या वसाहतींतून हिंडलात तर बऱ्याचदा हे चित्र दिसतं. एकेकाळी साधारणतः सारख्या आर्थिक, सामाजिक परिस्थिती असलेल्या समवयस्क लोकांनी एकत्र येऊन उभी केलेली वसाहत, कमी अधिक फरकाने सारखीच असायची. पण जशी वर्षं गेली, नवी पिढी, नव्हे पिढ्या राहू लागल्या तशा वास्तूंत बदल घडणं अनिवार्य होतं. पण काही बंगल्यातून त्या उन्नयनाला खीळ बसलेली सहज जाणवते. अपर्णाच्या बंगल्याला लागलेली उतरती कळा, आजूबाजूच्या बंगल्यांच्या तुलनेत जास्तच जाणवू लागली.

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप रे.
स्त्रियः चरित्रं पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः

हं.. इंटरेस्टिंग चालू आहे कथा. मुलींच्या नावाला बट्टा लागणं सोपं असतं आणि मग कदाचित कमी पर्याय उरत असतील.
एक सहज उदाहरण आठवलं. माझ्या ताईची एक मैत्रीण होती. तिचे वडील सरकारी खात्यात मोठे ऑफिसर होते. असाच बंगला होता त्यांचा, नव्वदच्या दशकातलीच गोष्ट. मी ताईबरोबर तिच्याकडे एकदा गेले होते. घरी व्हीसीआर वगैरे होता आणि माझ्यापेक्षाही लहान असणारा तिचा भाऊ एकट्याने तो व्हीसीआर सफाईने वापरत होता हे लक्षात आहे.
पुढे काही वर्षांनी ती मैत्रीण आमच्या गावाला आली होती फिरायला. तेव्हा तिचे वडील ज्या खात्यात होते त्या खात्याच्या आमच्या गावच्या ऑफिसने तिची बडदास्त ठेवली होती दोन तीन दिवस फिरायला जीप वगैरे देऊन Happy अर्थात फुकट. आणि ती ते सगळं हक्काने वापरत होती.
पुढे मग तिच्या वडिलांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले (जे खरे असावेत) आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. अपमानाच्या त्या धक्क्याने म्हणा किंवा कशाने, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते वारले. मधल्या काळात ताईचा तिच्याशी संपर्क राहिला नव्हता. पण एवढं सगळं झाल्यावर समजलंच. असो. सहज आठवलं.