सोन्याचे सफरचंद (चातुर्य कथा)

Submitted by निमिष_सोनार on 14 November, 2026 - 10:48

कोणे एके काळी भारतातील एका समृद्ध संस्थानात राजा वीरेंद्रसिंह राज्य करत होता. राजा शूर, न्यायप्रिय आणि प्रजेची काळजी घेणारा होता; पण त्याला एक विचित्र छंद होता—नवनवीन कोडी, गंमती आणि बुद्धीचे खेळ खेळण्याचा.

एकदा दरबारात बसलेला असताना त्याने मंत्र्यांना विचारले,

“आपल्या राज्यात सर्वांत हुशार माणूस कोण आहे?”

प्रधान म्हणाला, “विद्वान पंडित!”

सेनापती म्हणाला, “रणांगणात शत्रूला चकवणारा सैनिक!”

राजवैद्य म्हणाला, “आजारी माणसाचा आजार ओळखणारा वैद्य!”

राजा हसला.

“मला वाटतं, या सगळ्यांपेक्षा वेगळा एक माणूस शोधायला हवा—जो इतकं भन्नाट खोटं बोलेल की, खरं काय आणि खोटं काय, हेच ठरवता येणार नाही! मला बुद्धीने खोटे बोलणारा माणूस हवा आहे."

दरबारात हशा पिकला.

दुसऱ्याच दिवशी राज्यभर दवंडी पिटवण्यात आली.

“ऐका हो ऐका! महाराजांची खास घोषणा! जो कोणी स्वतःला राज्यातील सर्वांत मोठा खोटारडा सिद्ध करील, त्याला महाराजांच्या हस्ते शुद्ध सोन्याचं सफरचंद बक्षीस म्हणून देण्यात येईल!”

घोषणा ऐकताच गावोगाव चर्चा सुरू झाली.

“अरे, हे तर माझंच काम!”

“माझ्यापेक्षा मोठा खोटारडा या राज्यात नाही!”

“मी तर लहानपणापासून खोटं बोलण्यात पटाईत आहे!”

काही दिवसांत राजवाड्याबाहेर माणसांची रांग लागली.

पहिला आला एक व्यापारी.

तो म्हणाला, “महाराज, माझ्या दुकानात एवढं सोनं आहे की त्याचा ढीग करून ठेवला तर एक पर्वताएवढा आकार होईल!”

राजा शांतपणे म्हणाला, “छान. पण मला ते खोटं फार मोठं खोटं वाटत नाही आहे”

दुसरा आला एक शेतकरी.

“महाराज, माझ्या शेतात एकदा एवढा भोपळा निघाला की त्याच्या आतमध्ये मी, माझी बायको आणि आमची चार मुलं आठ दिवस राहिलो!”

दरबारात हशा पिकला.

राजा म्हणाला, “असं असेल तर तो भोपळा कुठे आहे?”

शेतकरी गडबडला.

“तो... तो भोपळा आता... परदेशात प्रदर्शनाला गेला आहे!”

राजा पुन्हा हसला, "भोपळा दाखव!"

दिवसेंदिवस नवनवीन खोट्या गोष्टी ऐकून राजा कंटाळला. कुणी म्हणे त्याने नदी उलटी वाहवली, कुणी म्हणे तिने सूर्याला दोन दिवस उगवू दिलं नाही, तर कुणी म्हणे त्याने वाघाला शेपटीला धरून गावभर गोल फिरवलं.

पण राजाला वेगळंच काहीतरी हवं होतं.

एक दिवस राजा म्हणाला, “बस! आता ही स्पर्धा बंद करा. या राज्यात खोटारडे पुष्कळ आहेत; पण बुद्धीने खोटं बोलणारा एकही नाही.”

तेवढ्यात दरबाराच्या दाराशी एक कृश, फाटके कपडे घातलेला माणूस दिसला.

त्याच्या काखेत मातीची सुरई, डोक्यावर जुनाट फडकी टोपी आणि पायात झिजलेल्या चपला होत्या.

दरबारातील सैनिकांनी त्याला अडवलं.

“कुठे चाललास?”

तो शांतपणे म्हणाला,

“महाराजांना भेटायचं आहे.”

“कशासाठी?”

“त्यांच्याकडून माझे सोन्याचे मडके परत घ्यायला.”

सैनिक हसले.

“अरे, महाराजांच्या दरबारात सोन्याचे मडके मागायला आलास?”

“हो.”

ही बातमी राजापर्यंत पोहोचली.

राजाने त्याला आत बोलावलं.

“काय नाव तुझं?”

“गणू.”

“कुठून आलास?”

“जवळच्या गावातून.”

राजाने विचारलं,

“माझ्याकडे काय काम आहे?”

गणूने आश्चर्याने राजाकडे पाहिलं.

“महाराज, तुम्ही विसरलात?”

“काय?”

“तुम्ही माझे सोन्याचे मडके परत केले नाही. ते घ्यायला आलो आहे.”

राजाच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“मी तुझे सोन्याचे मडके कधी घेतले?”

गणू म्हणाला,

“अहो महाराज, गेल्या वर्षी दुष्काळात मी तुमच्याकडे दान द्यायला आलो होतो. माझ्याकडचचे सोन्याचे एक मडके तुम्ही राज्याच्या खजिन्यात ठेवून घेतले होते. बदल्यात आभाराचे चिन्ह म्हणून मला मातीची सुरई दिली होती. आता मी ते मडके परत घ्यायला आलोय.”

राजा चिडला.

“अरे मूर्खा! मी तुला या आधी कधी पाहिलंही नाही. तू धादांत खोटं बोलतोस!”

गणूने क्षणभर विचार केला आणि शांतपणे म्हणाला,

“म्हणजे मी खोटं बोलतोय?”

“हो!”

“मग मला सोन्याचं सफरचंद द्या.”

राजा थबकला.

दरबारात कुजबुज सुरू झाली.

राजा म्हणाला,

“कसलं सफरचंद?”

गणू हसला.

“महाराज, घोषणा तुम्हीच केली ना? जो सर्वांत मोठा खोटारडा सिद्ध होईल त्याला सोन्याचं सफरचंद! मी खोटं बोलत असल्याचं तुम्ही स्वतः सिद्ध केलं आहे. मान्य केलं आहे!"

जर गणू खोटं बोलतोय, तर मग गणूला नियमानुसार सोन्याचं सफरचंद द्यावं लागणार होतं.

राजा काही क्षण शांत राहिला. मग अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

“गणू!”

“जी महाराज?”

“तू खरोखरच बुद्धिमान खोटारडा आहेस.”

गणू नम्रपणे वाकला आणि म्हणाला,“धन्यवाद महाराज.”

राजाने खजिनदाराला इशारा केला.

“सोन्याचं सफरचंद आणा.”

खजिनदाराने सोन्याचं सुंदर सफरचंद आणून राजासमोर ठेवलं.

राजाने ते गणूच्या हातात देत म्हटलं,

“आजपासून तू या राज्याचा अधिकृत ‘बुद्धीमान खोटारडा’ आहेस!”

दरबारात जोरदार हशा पिकला.

गणूने सोन्याचं सफरचंद हातात घेतलं.

गणूने नम्रपणे राजाला मुजरा केला.

“महाराज, खोटं बोलणं सोपं असतं. पण असं खोटं बोलणं, ज्यातून समोरच्याला स्वतःच्या शब्दांचा अर्थ पुन्हा शोधावा लागतो—ते थोडं कठीण असतं!”

राजा म्हणाला, “आणि म्हणूनच हे सोन्याचं सफरचंद आजपासून तुझं.”

लेखक: निमिष सोनार, पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

कळली नाही. राजाने तर ओळखलं होतं की गणू धादांत खोटं बोलतोय. त्याला काही स्वतःच्या शब्दांचा अर्थ पुन्हा शोधावा लागला नाही. मग गणू बुद्धिवान खोटारडा कसा? उलट नरो वा कुंजरो वा बोलणारा बुद्धिवान खोटारडा. समोरच्याला खरा अर्थ कळेपर्यंत तो (द्रोणाचार्य) मेलाच.

महाराज आपण मूर्ख आहात, हे विधान खोटे म्हणून राजाला ऐकवायचे. खुद्द राजा सुद्धा ते खरे आहे असे म्हणू शकणार नाही. Happy

राजाला ऋन्मेऽऽषच्या शंभरेक धाग्यांच्या लिंक पाठवल्या असत्या तर त्यात लिहिलेले काय खरे आणि काय खोटे हे आयुष्यभर शोधत बसला असता आणि प्रजा सुद्धा असल्या राजापासून सुटली असती..

Lol