कॉर्पोरेट कंपन्यांचे मायाजाल - मल्टी टास्किंग आणि कम्फर्ट झोन

Submitted by निमिष_सोनार on 2 November, 2026 - 02:30

आजकाल एकाच कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे. कारण सकाळी उठल्यापासून मोबाइलमधली विविध इमेल आणि सोशल मीडिया ऍप्लिकेशनवरील नोटिफिकेशन आपल्याला काही सुचू देत नाहीत. त्यातील काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही हे आपल्याला समजेनासे होते आणि बराच वेळ त्यात निघून जातो. एक तर आजकाल सर्वांना लहानपणापासून रिटायरमेंटपर्यंत इतक्या विविध स्पर्धेचा सामना करावा लागतोय की, त्यामुळे दिवसाचे 24 तास कमी पडत आहेत. त्यात भर म्हणून एकाच वेळी अनेक कामे करण्याची सवय आपल्याला सतत विचलित करत आहे आणि आपल्या शरीराच्या नैसर्गिक बायोलॉजिकल कपॅसिटीला आपण नुकसानकारक आव्हान देत आहेत. जेव्हा खूप गोष्टी एकत्र येतात, तेव्हा हे लक्षात घ्या की, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नाही. हे आपल्या व्यक्तिगत, ऑफिसच्या किंवा व्यवसायाच्या कामासंदर्भात लागू आहे.

हातातले अर्धे काम सोडून नवीन गोष्टीवर काम करण्यासाठी कुणी तुमच्यावर दबाव टाकत असेल म्हणून जर तुम्ही आधीच सुरू केलेले काम सोडून नव्या कामावर लक्ष केंद्रित केले तर दोन्हीही कामे अपूर्ण राहतील किंवा झालीच तर त्यात चुका होतील. जर अनेक कामे असतील, तर त्यातील एका महत्त्वाच्या कामावर आधी लक्ष केंद्रित करणे सर्वोत्तम आहे.

"लक्ष केंद्रित करणे" म्हणजे आपले लक्ष एका वेळेस एकाच कामावर, कल्पनेवर किंवा ध्येयावर केंद्रित करणे. जेव्हा आपण एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्याला काही काळासाठी त्या विचलित करणाऱ्या गोष्टींना ‘नाही’ म्हणावे लागते. एकाग्रता म्हणजे फक्त एकच काम निवडणे नव्हे; ते एक काम होईपर्यंत इतर कामांकडे तात्पुरते पण संपूर्ण दुर्लक्ष करण्याची क्षमता होय. अनेक कामे एकावेळी करण्याची सवय मनाला सतत विचलित करते.

आपल्याला वाटते की, तांत्रिकदृष्ट्या आपण एकाच वेळी दोन किंवा तीन गोष्टी सहज करू शकतो. जसे स्वयंपाक करताना टीव्ही पाहणे आणि बाजूला पडलेल्या मोबाईल फोनवर व्हॉट्सॲपला उत्तर देणे. चहा पितांना ईमेलला उत्तर देणे आणि सोबत बाजूच्या नोटपॅडवर पेनाने पॉईंट्स लिहिणे. पण, एकाच वेळी दोन तीन कामांवर लक्ष केंद्रित करणे खरोखर शक्य नाही. मानवी शरीर, मन, मेंदू त्यासाठी बनलेले नाहीच. त्यामुळे मन सतत एका कामावरून दुसऱ्या कामावर जात राहते. या सततच्या बदलामुळे आपली ऊर्जा आणि वेळ वाया जातो.

ईमेलवर काम करत असताना आपल्याला फोन आला, आणि फोनवर बोलून झाल्यावर पुन्हा तर त्याच मानसिक स्थितीत (ईमेल लिहिणे) परत येण्यासाठी वेळ लागतो आणि जास्त शक्ती खर्च होते. याला ‘स्विचिंग कॉस्ट’ म्हणतात.

‘स्विचिंग कॉस्ट’ म्हणजे जेव्हा आपण आपले लक्ष एका कामावरून दुसऱ्या कामावर वळवतो, तेव्हा होणारा वेळेचा व्यत्यय आणि त्यामुळे शरीर आणि मेंदूची खर्च होणारी ऊर्जा. हा वेळ अंदाजे एक मिनिट इतका असतो, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

म्हणजे बघा, आधुनिक विज्ञान (मेडिकल सायन्स) आपल्याला आपल्या शरीराच्या क्षमतांची नव्याने जाणीव करून देत आहे आणि तेच आधुनिक विज्ञान (टेलिकम्युनिकेशन, इंटरनेट, 24x7 कनेक्टीव्हिटी) आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करायला भाग पाडते आहे.

विविध खासगी कंपन्यांनी कमी पगारात कर्मचाऱ्यांकडून जास्त काम करून घेण्यासाठी जाणून बुजून "मल्टी टास्किंगचा" फंडा सुरू केला आहे.

जास्त प्रॉब्लेम तेव्हा होतो, जेव्हा कंपनी कर्मचाऱ्याला सांगते की, त्याला दिलेले प्रत्येक काम जवळपास सारखेच महत्वाचे आहे आणि प्रत्येक कामाला पूर्ण करण्यासाठी डेडलाइन, टाईमलाईन किंवा डीलीव्हरी डेट आहे. कारण कस्टमर अर्जंट डिलिव्हरी मागतोय. अशा वेळेस नोकरी महत्वाची आहे आणि टिकवायची आहे म्हणून कर्मचारी सगळी कामे दबावाखाली एकदम करायला घेतो. मग दिवसाची रात्र होते. रात्रीचा दिवस होतो.

त्याने नकार दिला तर त्याला आणखी एक नवीन गोष्ट त्याला सांगितली जाते की, "तू स्वतःच्या कन्फर्ट झोन मधून बाहेर ये." कन्फर्ट झोन हा असा आणखी एक कन्सेप्ट आहे, जो कर्मचाऱ्याची पिळवणूक करण्यासाठी जाणून बुजून शोधला गेलाय. "आपल्या कन्फर्ट झोन मधून बाहेर या आणि बघा यश तुमच्यासाठी वाट बघतेय." अशी अनेक इन्स्टाग्राम रील किंवा यूट्यूब व्हिडिओ आपण पहिले असतीलच. आपल्या पर्सनल, कौटुंबिक, शारीरिक त्रासांकडे ऑफिसच्या कामासाठी दुर्लक्ष करा. कन्फर्ट झोनचा त्याग करा.

समजा एक्स्ट्रा वेळ काम करून, कन्फर्ट झोनचा त्याग करून आणि मल्टी टास्किंग करून एखादा कर्मचारी नोकरी जाण्याच्या भीतीपोटी सर्व कामे पूर्ण करेलही, पण असे बळजबरीचे आणि जास्त वेळ काम करून करून केलेले मल्टी टास्किंग हे कर्मचाऱ्याला मानसिकरित्या प्रचंड थकवते आणि कालांतराने ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो. शारीरिक समस्या सुरू होतात.

आजकाल एखाद्या कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये दुपारी वेळेवर जेवण न करता (स्वत:हून जेवण टाळून किंवा जेवण करायला वेळच न मिळाल्याने) एखादे ऑफिसचे महत्वाचे काम यशस्वीपणे पूर्ण करून दिले आणि मग दुपारचे जेवण संध्याकाळी 5 वाजता केले, तर त्याच्यावर सर्व मॅनेजर्स कडून कौतुकाचा वर्षाव होतो. असे सतत केल्यास पुढे त्याला विविध रोग जडणार असतात, पण कंपनीला त्या गोष्टीशी काही घेणे देणे नसते. कर्मचाऱ्यालाही ते उशिरा समजते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेलली असते. तसेच एखादा उच्च पदावरचा मॅनेजर त्याच्या टीमला सांगतो की, माझा जवळचा अमुक तमुक नातेवाईक वारला होता, तरी मी दुसऱ्या दिवशी कामावर हजर झालो होतो. याला म्हणतात कामाच्या प्रति कमिटमेंट. अशी मंडळी चुकीची उदाहरणे सेट करून इतरांनानाही असेच करण्यास भाग पडतात. मला एक काळात नाही की, आपण पोट भरावे आणि जगता यावे म्हणून काम करतोय की, काम करण्यासाठी म्हणून जगतो आहे??

मल्टीटास्किंगमुळे आपण खूप कामे करतोय, असा एक आभास निर्माण होतो. दिवसभर आपण सतत काही ना काही करत असतो. कधी ईमेल, कधी फोन, कधी मीटिंग, कधी रिपोर्ट, तर कधी अचानक आलेले एखादे अर्जंट काम. दिवस संपतो, आपण थकून जातो; पण दिवसाच्या शेवटी मागे वळून पाहिले तर एखादे महत्त्वाचे काम अपेक्षित गुणवत्तेने पूर्ण झालेले नसते. मग प्रश्न पडतो की, दिवसभर इतकी धावपळ करूनही समाधान का मिळत नाही? याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण काम करण्यात आणि काम पूर्ण करण्यात गल्लत करतो. दिवसभर व्यस्त असणे आणि दिवसभर उत्पादक असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मल्टीटास्किंगमध्ये आपले लक्ष सतत एका कामावरून दुसऱ्या कामाकडे जात असते. प्रत्येक वेळी मेंदूला नव्या कामाची माहिती समजून घ्यावी लागते, आधीच्या कामाचा संदर्भ बाजूला ठेवावा लागतो आणि पुन्हा नव्या कामात गुंतावे लागते. या प्रक्रियेत वेळ आणि मानसिक ऊर्जा खर्च होते. विशेषतः विचार करणे, निर्णय घेणे, विश्लेषण करणे किंवा एखादी गुंतागुंतीची समस्या सोडवणे अशा कामांमध्ये वारंवार होणारे व्यत्यय आपली कार्यक्षमता कमी करू शकतात.

समजा, तुम्ही एखादा महत्त्वाचा ऑडिट रिपोर्ट तयार करत आहात. त्यासाठी तुम्हाला अनेक कागदपत्रे तपासायची आहेत, पुरावे पडताळायचे आहेत आणि निरीक्षणांचे विश्लेषण करायचे आहे. इतक्यात मॅनेजरचा फोन येतो. फोन संपतो न संपतो तोच दुसऱ्या टीमचा मेसेज येतो. त्यानंतर एखाद्या नवीन कामाची डेडलाइन सांगितली जाते. तुम्ही प्रत्येकाला प्रतिसाद देता; पण मूळ रिपोर्टवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ लागतो. यात सर्वांत मोठा धोका कोणता?

एकाग्रता तुटल्यामुळे झालेली छोटीशी चूकही कधीकधी मोठ्या समस्येला कारणीभूत ठरू शकते. विशेषतः आर्थिक व्यवहार, वैद्यकीय सेवा, सायबर सुरक्षा, ऑडिट, कायदेशीर कामे आणि तांत्रिक विश्लेषण यांसारख्या क्षेत्रांत अचूकतेला अनन्यसाधारण महत्त्व असते. अशा ठिकाणी वेगापेक्षा योग्य पद्धतीने काम करणे अधिक महत्त्वाचे असते.

मल्टीटास्किंगचा आणखी एक तोटा म्हणजे मानसिक थकवा. सततच्या नोटिफिकेशन्स, बदलत्या प्राधान्यक्रमांमुळे आणि प्रत्येक गोष्ट तातडीची असल्याच्या दबावामुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. परिणामी चिडचिड वाढणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, कामात चुका होणे आणि वैयक्तिक आयुष्यातही लक्ष न लागणे अशा समस्या उद्भवू शकतात.

दीर्घकाळ कामाचा ताण आणि अपुरी विश्रांती, अपूर्ण झोप यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. काही व्यक्तींना झोपेच्या समस्या, सततचा थकवा किंवा तणावाशी संबंधित शारीरिक त्रास जाणवू शकतात. मग हळू हळू कर्मचारी ताण कमी करायला नशेच्या आहारी जाऊ लागतो. विविध अल्कोहोलिक पेयांना कॉर्पोरेट जगात आधीच प्रतिष्ठा लाभलेली आहे.

मग प्रश्न असा आहे की, अधिकाधिक कामे एकाच वेळी करण्याच्या नादात आपण आपली कार्यक्षमता, मानसिक शांतता आणि आरोग्य धोक्यात घालत असू, तर अशा मल्टीटास्किंगचा आणि "कम्फर्ट झोन" तोडण्याचा फायदा नेमका कोणाला होतो? कर्मचाऱ्याला की त्याच्याकडून अधिकाधिक काम करून घेणाऱ्या व्यवस्थेला?

त्यात भर म्हणून "एआयमुळे बेरोजगारी वाढली", "अमका शेयर बाजार कोसळला त्यामुळे मंदी", "युद्धामुळे मंदी", "शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले", "माथेफिरू राष्ट्राध्यक्षाने भारतीयांना त्यांच्या देशातून केवळ द्वेषापोटी हाकलून दिले", अशा बातम्यांचा भडिमार करून आधीच आपल्याला पत्रकारिता घाबरवून सोडत आहे. याचा वापर करून, कमी पगारात कर्मचाऱ्यांना पिळून काढण्यासाठी मल्टी टास्किंग आणि कम्फर्ट झोन ही दोन इंजेक्शन वापरले जातात.

कॉर्पोरेट जगतात एक गंमत असते. प्रत्येक विभागाला स्वतःचे काम सर्वांत महत्त्वाचे वाटते. प्रत्येक मॅनेजरला स्वतःच्या टीमचे काम आधी पूर्ण झाले पाहिजे असे वाटते. प्रत्येक कस्टमरला त्याची डिलिव्हरी लवकर हवी असते. आणि या सगळ्यांच्या अपेक्षांच्या मध्यभागी असतो तो कर्मचारी! प्रत्येक कामाला डेडलाइन असते. प्रत्येक कामाला प्राधान्य दिलेले असते. प्रत्येक कामासाठी संसाधने मात्र मर्यादित असतात. अशा परिस्थितीत कर्मचारी नेमके करायचे काय? एकाच वेळी दहा कामे करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कोणते काम आधी करायचे, कोणते नंतर करायचे आणि कोणत्या कामासाठी अधिक वेळ किंवा मनुष्यबळ आवश्यक आहे, हे ठरवणे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांमध्ये स्पष्ट संवाद असणे आवश्यक आहे. समजा, तुमच्याकडे आधीच तीन महत्त्वाची कामे आहेत आणि त्याच वेळी चौथे काम अर्जंट म्हणून दिले जाते. अशा वेळी डोळे झाकून चौथे काम सुरू करण्याऐवजी संबंधित व्यक्तीला वस्तुस्थिती सांगणे गरजेचे आहे.

"माझ्याकडे सध्या ही तीन कामे प्राधान्याने सुरू आहेत. नवीन कामही महत्त्वाचे असल्यास कृपया त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करा. त्यानुसार कोणते काम पुढे ढकलायचे, हे ठरवता येईल." असे सांगणे म्हणजे काम टाळणे नव्हे. उलट, उपलब्ध वेळेत योग्य गुणवत्तेने काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले व्यावसायिक नियोजन होय.

कामाची जबाबदारी कर्मचाऱ्याची असते; पण सर्व कामे एकाच वेळी पूर्ण करण्याची अशक्य अपेक्षा पूर्ण करणे ही त्याची वैयक्तिक जबाबदारी असू शकत नाही.

जर एखाद्या संस्थेला कमी वेळेत अधिक काम करून घ्यायचे असेल, तर तिने योग्य मनुष्यबळ, वास्तववादी डेडलाइन, स्पष्ट प्राधान्यक्रम आणि आवश्यक साधने उपलब्ध करून दिली पाहिजेत. केवळ कर्मचाऱ्याला मल्टी टास्किंग शिकवून किंवा त्याला सतत त्याच्या मर्यादांपलीकडे काम करण्यास सांगून संस्थेची उत्पादकता दीर्घकाळ वाढवता येत नाही.

पण एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्या कामाच्या मर्यादा सांगितल्या, अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली किंवा वैयक्तिक आयुष्याला वेळ देण्याचा प्रयत्न केला, तर तिला लगेच सांगितले जाते, "तू अजूनही तुझ्या कन्फर्ट झोनमध्ये आहेस. बाहेर ये! ग्रोथ हवी असेल, तर कन्फर्ट झोन सोडावाच लागतो."

खरे सांगायचे तर, कन्फर्ट झोन ही मानसशास्त्रात वापरली जाणारी संकल्पना आहे. ती पूर्णपणे काल्पनिक नाही; मात्र प्रत्येक वेळी एखाद्या व्यक्तीच्या मर्यादांकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्याचा वापर करणे हा नक्कीच भ्रम आहे. आपल्याला ज्या गोष्टींची सवय आहे, ज्या परिस्थितीत आपण सुरक्षित आणि परिचित असल्याचे अनुभवतो आणि जिथे अनिश्चितता तुलनेने कमी असते, त्या परिस्थितीला सामान्यतः कन्फर्ट झोन म्हटले जाते.

समजा, तुम्ही अनेक वर्षांपासून एखाद्या तांत्रिक क्षेत्रात काम करत आहात. तुम्हाला त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. तुमच्या जबाबदाऱ्या स्पष्ट आहेत आणि तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडता. आता तुम्हाला एखादे नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळते.

सुरुवातीला ते कठीण वाटू शकते. काही चुका होतील, अधिक वेळ द्यावा लागेल आणि नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. पण तुम्ही प्रयत्न करता आणि हळूहळू त्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवता. हा कन्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याचा सकारात्मक अनुभव आहे. यात शिकणे आहे, कौशल्यविकास आहे आणि स्वतःची क्षमता वाढवण्याची संधी आहे.

परंतु दुसरी परिस्थिती पाहा. तुमच्याकडे आधीच क्षमतेपेक्षा जास्त काम आहे. पुरेसे मनुष्यबळ नाही. डेडलाइन अवास्तव आहेत. तुम्हाला वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ मिळत नाही. तरीही तुम्ही कामाचा ताण कमी करण्यासाठी मदत मागितली, तर तुम्हाला सांगितले जाते, "कम्फर्ट झोनमधून बाहेर ये. मोठे व्हायचे असेल, तर त्याग करावाच लागतो."

आता हा प्रश्न शिकण्याचा किंवा स्वतःची क्षमता वाढवण्याचा राहिलेला नाही. हा प्रश्न उपलब्ध संसाधने, कामाचा योग्य भार आणि कर्मचाऱ्याच्या आरोग्याचा आहे. नवीन कौशल्य शिकण्यासाठी स्वतःच्या मर्यादांना आव्हान देणे आणि इतरांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मर्यादा मोडणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्या परिस्थितीत तुम्ही स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करत आहात. दुसऱ्या परिस्थितीत कदाचित तुम्ही केवळ दुसऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहत आहात.
म्हणूनच कन्फर्ट झोनचा त्याग करायचा असेल, तर तो स्वतःच्या प्रगतीसाठी करा. कोणीतरी तुमच्या चांगुलपणाचा, जबाबदारीच्या भावनेचा किंवा नोकरी गमावण्याच्या भीतीचा फायदा घेण्यासाठी सांगत आहे म्हणून करू नका.

आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते की, कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. हे खरे आहे. पण प्रत्येक कष्ट आपल्याला यशाकडे घेऊन जातोच असे नाही. कष्टांना योग्य दिशा, नियोजन आणि विश्रांतीची जोड आवश्यक असते. एखादा विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करताना रोज थोडा अधिक अभ्यास करतो, कठीण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि सरावाने स्वतःची क्षमता वाढवतो. हा प्रयत्न त्याच्या विकासासाठी उपयुक्त आहे. परंतु हाच विद्यार्थी दिवसाचे सोळा-सोळा तास झोप न घेता अभ्यास करत असेल, तर काही काळानंतर त्याच्या एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अगदी याच तत्त्वाचा उपयोग व्यावसायिक आयुष्यातही होतो.

नवीन जबाबदारी स्वीकारणे, कौशल्य वाढवणे, कठीण निर्णय घेणे आणि अडचणींचा सामना करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी सतत तणावाखाली राहणे, पुरेशी झोप न घेणे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे आणि स्वतःच्या आरोग्याची किंमत मोजणे आवश्यक नाही. प्रगतीसाठी आव्हाने आवश्यक असतात; पण प्रगतीच्या नावाखाली स्वतःला सतत थकवणे आवश्यक नसते. आपण एखाद्या आव्हानाला सामोरे जाताना काही काळ अस्वस्थ होऊ शकतो. परंतु ही अस्वस्थता आपल्याला शिकण्यास मदत करत आहे की आपल्याला आतून संपवत आहे, हे ओळखणे महत्त्वाचे आहे. कधी कधी थांबणे, विश्रांती घेणे, मदत मागणे किंवा एखाद्या गोष्टीला नकार देणे हेसुद्धा शहाणपणाचे लक्षण असते.

आपल्या आयुष्यात एक विचित्र विरोधाभास आहे. आपण चांगले घर मिळवण्यासाठी कष्ट करतो. घरात आरामदायी सोफा घेतो. चांगला बेड घेतो. सुट्टी मिळाली की पर्यटनाला जातो. आवडते पदार्थ खातो. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची इच्छा बाळगतो. निवृत्तीनंतर शांत आयुष्य जगता यावे म्हणून बचत करतो. म्हणजेच, आपल्या आयुष्याचा बराचसा संघर्ष आपण अधिक चांगल्या आणि आरामदायी जीवनासाठी करत असतो.

मग करिअरच्या बाबतीत मात्र आराम, समाधान आणि मानसिक शांतता या गोष्टी चुकीच्या कशा ठरतात? जर आपण चांगले आयुष्य जगण्यासाठी काम करत असू, तर काम करतानाही आयुष्य जगण्याचा अधिकार आपल्याला असायला नको का?

काम करणे महत्त्वाचे आहे. करिअरमध्ये प्रगती करणेही महत्त्वाचे आहे. आर्थिक स्थैर्य मिळवणे, नवीन कौशल्ये शिकणे आणि स्वतःला अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. पण या सगळ्या गोष्टींचा अंतिम उद्देश काय आहे? फक्त अधिक काम करणे? अधिक जबाबदाऱ्या स्वीकारणे? अधिक पैसा कमावणे की या सर्व गोष्टींच्या मदतीने स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य अधिक चांगले बनवणे?

जर आपण आयुष्यभर "भविष्यातील आरामदायी जीवन" मिळवण्यासाठी धावत राहिलो आणि त्या धावपळीत "वर्तमानातील आयुष्य" जगायलाच विसरलो, तर आपण नेमके काय मिळवले?

पगार वाढला, पद वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या; पण त्याचबरोबर तणाव वाढला, झोप कमी झाली, आरोग्य बिघडले आणि कुटुंबासाठी वेळच उरला नाही, तर या प्रगतीचा आनंद उपभोगायला वेळ कुठे आहे? आयुष्य हे केवळ भविष्यातील सुखासाठी केलेला संघर्ष नसून वर्तमानातही जगण्याचा एक सुंदर अनुभव आहे.

आयुष्य जगण्याचे सूत्र म्हणजे थोडा कम्फर्ट आणि थोडा एफर्ट! दोघांचे बॅलन्स!

माझ्या मते, आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी कम्फर्ट आणि एफर्ट या दोन्ही गोष्टींचे संतुलित मिश्रण आवश्यक आहे. केवळ कम्फर्टमध्ये राहिलो, तर कदाचित आपण नवीन गोष्टी शिकण्याची, आव्हाने स्वीकारण्याची आणि स्वतःची क्षमता वाढवण्याची संधी गमावू. पण केवळ एफर्ट करत राहिलो, तर आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकून जाऊ. प्रत्येक गोष्ट मिळवण्याच्या प्रयत्नात आपल्याकडे जे आहे, त्याचा आनंद घेण्याचेही विसरून जाऊ.

म्हणूनच, कधी स्वतःला आव्हान द्यावे आणि कधी स्वतःला विश्रांती द्यावी, हे समजणे महत्त्वाचे आहे. कधी नवीन तंत्रज्ञान शिकावे. कधी एखादे कठीण पुस्तक वाचावे. कधी नवीन जबाबदारी स्वीकारावी. कधी आपल्या क्षमतेपेक्षा थोडे अधिक प्रयत्न करावेत. पण त्याचबरोबर कधी आवडता चित्रपट पाहावा. कधी मित्रांसोबत गप्पा माराव्यात. कधी कुटुंबासोबत बाहेर जावे. कधी पुस्तक वाचत निवांत बसावे. कधी काहीही विशेष न करता स्वतःसाठी वेळ काढावा. यातील कोणतीही गोष्ट वेळेचा अपव्यय नाही, जर ती आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि मानसिक ताजेपणा आणत असेल.

प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे, प्रत्येक दिवस काहीतरी साध्य केलेच पाहिजे आणि प्रत्येक कृतीतून काहीतरी आर्थिक किंवा व्यावसायिक फायदा झालाच पाहिजे, असा अट्टहास कशासाठी?

आपण माणसे आहोत, यंत्रे नाही. यंत्रांना सतत चालवण्यासाठी वीज लागते. माणसांना काम करण्यासाठी ऊर्जा लागते; पण त्याचबरोबर विश्रांती, भावनिक समाधान, सामाजिक नाती आणि स्वतःच्या आवडींसाठी वेळही लागतो. म्हणूनच, कामाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान द्या; पण संपूर्ण आयुष्यच कामाच्या ताब्यात देऊ नका.

शेवटी, एकच गोष्ट लक्षात ठेवा!

मल्टीटास्किंगच्या नावाखाली प्रत्येक कामाला एकाच वेळी हात घालण्याची गरज नाही. कन्फर्ट झोनच्या नावाखाली प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याचीही गरज नाही. काही कामांना होकार देणे ही प्रगती असते, तर काही कामांना नकार देणे ही स्वतःच्या वेळेची आणि क्षमतेची जाणीव असते. काही वेळा अधिक मेहनत करणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडे थांबणे अधिक आवश्यक असते.

आपण आपल्या कामाचे नियोजन करू शकतो. प्राधान्यक्रम ठरवू शकतो. नवीन कौशल्ये शिकू शकतो. स्वतःच्या मर्यादा वाढवू शकतो. पण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असेलच असे नाही, हेही स्वीकारले पाहिजे. आपल्या कामात प्रगती व्हावी, आर्थिक स्थैर्य मिळावे, समाजात मान मिळावा आणि कुटुंबाला चांगले आयुष्य देता यावे, यासाठी प्रयत्न नक्कीच करा. पण या सगळ्या गोष्टी करताना स्वतःला हरवू नका! कारण शेवटी आपल्याला केवळ यशस्वी करिअर नको आहे, तर समाधानकारक आयुष्यही हवे आहे. "टाइम इज मनी" हे अर्ध सत्य आहे. पैशांना अवाजवी महत्व दिल्याने असे सुविचार निर्माण होतात. माझ्या मते, आयुष्य जगण्याचे खरे सूत्र म्हणजे थोडा कम्फर्ट, थोडा एफर्ट, थोडी महत्त्वाकांक्षा आणि थोडे समाधान! थोडे पैसे कमावणे आणि थोडे मनासारखे जगणे!

एफर्ट इतका असावा की, आपण पुढे जात राहू आणि कम्फर्ट इतका असावा की, त्या प्रवासाचा आनंदही घेता येईल. कारण आयुष्य ही कोणतीही शर्यत नाही, ज्यात सर्वांत आधी अंतिम रेषा गाठणाऱ्यालाच विजेता घोषित केले जाते. आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासात धावायचेही आहे, थांबायचेही आहे, शिकायचेही आहे आणि जगायचेही आहे.

शेवटी प्रश्न हा नाही की, तुम्ही तुमच्या ऑफिससाठी कन्फर्ट झोनच्या बाहेर किती वेळ राहिलात आणि किती मल्टी टास्किंग केले. खरा प्रश्न हा आहे की, स्वतःच्या आयुष्याचा आनंद घेत, जबाबदऱ्या पार पाडत पाडत तुम्ही किती दूरपर्यंत समाधानकारक प्रवास करू शकलात आणि आपल्या कुटुंबाला किती वेळ देऊ शकलात!

लेखक: निमिष सोनार, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काही वर्षांपूर्वी प्रथितयश न्यूरो सर्जन जॉन मेडिना यांच्या ब्रेन रूल्स या पुस्तकाचा अनुवाद केला होता. मल्टि टास्किंगच्या बाबतीत त्यांचे विचार असे आहेत.

डॉ. जॉन मदिना (John Medina) यांच्या 'ब्रेन रूल्स' (Brain Rules) या पुस्तकात मल्टीटास्किंग (एकच वेळी अनेक कामे करणे) याबद्दल असे म्हटले आहे की "मल्टीटास्किंग हा एक केवळ गैरसमज (Myth) आहे."
त्यांनी याविषयी मांडलेले मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
• मेंदू एका वेळी एकच काम करू शकतो: आपला मेंदू एका क्रमिक पद्धतीने (Sequential Processor) काम करतो, तो एकाच वेळी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आपण ज्याला मल्टीटास्किंग समजतो, तो प्रत्यक्षात एका कामावरून दुसऱ्या कामावर वेगाने लक्ष बदलण्याचा प्रकार असतो (Task-switching).
• चुकांचे प्रमाण ५०% वाढते: जेव्हा माणूस एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे काम करण्यातील चुकांचे प्रमाण ५०% पर्यंत वाढते.
• काम पूर्ण होण्यास दुप्पट वेळ लागतो: एकाच वेळी जास्त गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे कोणतीही गोष्ट नीट पूर्ण होत नाही आणि साधे काम करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागतो.
• ऊर्जेचा अपव्यय: एका कामावरून दुसऱ्या कामावर लक्ष नेल्यामुळे मेंदूची ऊर्जा खूप जास्त खर्च होते आणि परिणामकारकता कमी होते.
म्हणूनच, एका वेळी फक्त एकाच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे हेच मेंदूसाठी सर्वात प्रभावी ठरते.

छान मुद्दे आले आहेत लेखात.

रेव्यू यांचा प्रतिसादही माहितीपूर्ण.

Multitasking फारच कौतुक लाभलेला ओव्हररेटेड प्रकार आहे हे अगदी पटले आहे. पण सवयीमुळे आता single tasking प्रयत्नपूर्वक शिकावे लागते आहे. Re learning. आणि तसे केल्याने efficiency वाढते यात काही संशय राहिला नाही.