प्रा. यास्मिन शेख यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या कामाबद्दल लिहिलेला हा लेख 'नवभारत' या नियतकालिकाच्या ऑक्टोबर महिन्याच्या अंकात प्रकाशित झाला.
***
२००९ साली टेलिफोन डिरेक्टरीतून नंबर शोधून मी प्रा. यास्मिन शेख यांना फोन केला. त्यांचा आणि माझा तोवर परिचय नव्हता. ’मायबोली’ हे मराठीतलं पहिलं संकेतस्थळ त्यावेळी अतिशय लोकप्रिय होतं. मीही तिथे लिहीत असे. ’मायबोली’वर वेळोवेळी व्याकरण, मराठी आणि परकीय शब्दांचा वापर, मराठीसाठी रोमन लिपी आणि इंग्रजीसाठी देवनागरी यांचा वापर, सामान्यरूपं अशा विषयांवर चर्चा आणि वाद झडत. बहुतेकांसाठी आंतरजालावर लिहिणं नवीन होतं. अशाच एका वादावेळी मी प्रा. शेखांना फोन केला. पुढे २०२० साली कोव्हिडची साथ येईपर्यंत मी वेळोवेळी त्यांना फोन करून भाषा - व्याकरण - शब्द यांबद्दल शंका विचारत राहिलो आणि त्याही न चिडता माझ्या शंकांना उत्तरं देत राहिल्या. आंतरजालावर रुळलेले आणि नव्यानं तयार होणारे विशिष्ट शब्द, लघुरूपं यांबद्दल चर्चा करत राहिल्या.
मराठीच्या लेखी व्यवहारात गेल्या शतकभरात घडलेल्या स्थित्यंतरांचा एक मोठा ऐतिहासिक कालखंड त्यांनी स्वतः अनुभवला होता. खिळ्यांच्या मुद्रणयंत्रांच्या काळापासून ते पाठ्यपुस्तकांच्या बदलत्या पद्धतींपर्यंत आणि पुढे संगणक व डिजिटल लेखन यांच्या अवतारापर्यंत मराठीचा प्रत्यक्ष वापर बदलत गेला. अक्षरजुळणी, टंकलेखन, शब्दलेखन, आणि संपादन या सगळ्या पद्धती एकामागून एक बदलल्या. या तंत्रज्ञानात्मक बदलांसोबत प्रमाणलेखनाचा प्रश्न पुन्हा पुढे आला. प्रा. शेख यांची पिढी ज्या भाषिक शिस्तीत घडली होती, तिचा या नव्या डिजिटल भाषाव्यवहाराशी कसा उत्तम संवाद जुळू शकतो, हे मला त्यांच्याशी झालेल्या अनेक संभाषणांतून कळलं.
मराठी भाषा, तिचं व्याकरण, आणि मुद्रित रूप यांच्या विश्लेषणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ भाषाभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी प्रमाणभाषेचा आणि तिच्या व्यावहारिक उपयोजनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ निखळला आहे. पण एवढं म्हटल्यानं त्यांच्या निधनामुळे झालेलं नुकसान किती मोठं आहे, याची पुरेशी कल्पना येत नाही. एकशे एक वर्षांचं समृद्ध आयुष्य लाभलेल्या प्रा. शेख या मराठी भाषेच्या जागरूक अभ्यासक होत्या आणि त्यांनी निर्माण केलेले ग्रंथ, त्यांनी दिलेले भाषिक निर्णय आणि त्यांनी उपस्थित केलेले मूलभूत प्रश्न हे आगामी काळातही मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या संशोधक आणि लेखक यांच्यासाठी मार्गदर्शक ठरतील, शासनाचा 'डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार' आणि 'मराठी भाषा जीवनगौरव' यांसारख्या सन्मानांनी त्यांच्या प्रदीर्घ योगदानाचा गौरव केला गेला, ही वाक्यंही त्यांच्या कामाचं व्यापक स्वरूप पुरेसं स्पष्ट करत नाहीत.
एखादी भाषा संपन्न करण्यात योगदान असणाऱ्यांमध्ये कवी, ललितलेखक, इतिहासकार, किंवा राजकीय नेते यांची नावं आपण कायम घेतो. परंतु ती भाषा टिकून राहण्यासाठी तिच्या दैनंदिन वापराची शिस्त, तिचा शब्दसंग्रह, तिचं व्याकरण, आणि त्या भाषेतलं सकस शिक्षण यांचीही तितकीच गरज असते. व्याकरण लिहिणं हे सर्जनशील लेखन नसतं किंवा शब्दलेखनाचा कोश तयार करणं ही साहित्यनिर्मिती नव्हे, असा एक रूढ समज आपल्या समाजात दिसतो. पण भाषेची सार्वजनिक रचना बांधून ठेवणाऱ्या या कामाचं मोल जराही कमी नसतं. ललितलेखकाला शब्द निवडण्यासाठी भाषा आधीपासून सिद्ध असावी लागते. व्याकरणकार आणि कोशकार त्या भाषेच्या प्रत्यक्ष वापराची चौकट स्पष्ट करत असतात. शाळेत शिकणाऱ्या मुलापासून ते संपादक, पत्रकार, लेखक, शिक्षक, आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यापर्यंत सगळेजण या चौकटीचा आधार घेतात. प्रा. शेख यांच्या कामाचा मोठा भाग अशाच अपरिचित बौद्धिक श्रमांचा बनलेला होता. विसाव्या शतकाच्या मध्यावर भाषाशास्त्र आणि व्याकरण यांचा सार्वजनिक बौद्धिक अवकाश प्रामुख्यानं पुरुष अभ्यासकांनी व्यापला असताना हजारो विद्यार्थ्यांना वर्गात व्याकरण शिकवणं, पाठ्यपुस्तकांची, नियतकालिकांची वा संकेतस्थळांची भाषा तपासणं, शब्दलेखनातल्या अडचणी सोडवणं, लेखक-संपादकांना मार्गदर्शन करणं, आणि भाषावापरातल्या खाचाखोचांवर सातत्यानं लिहिणं, त्यांच्या यां कामांतून मराठीच्या सार्वजनिक स्वरूपाला आकार येत गेला. अशा दैनंदिन श्रमांची नोंद इतिहासाच्या पानांवर ठळकपणे उमटत नसली, तरी भाषा वापरणाऱ्या समाजाच्या रोजच्या व्यवहारात त्यांचे खोल ठसे कायम राहतात. तुलनेनं पडद्याआड राहणाऱ्या या क्षेत्रात प्रा. शेख यांनी प्रदीर्घ काळ काम करून मराठीचं संवर्धन केलं.
१९६२ साली साहित्य महामंडळानं शुद्धलेखनाचे नियम तयार केले, पण त्यानंतर महामंडळाची जुनी चौकट आणि प्रा. अशोक केळकर, ना. गो. कालेलकर यांच्यासारख्या आधुनिक भाषावैज्ञानिकांचे दृष्टिकोन यांच्यात सातत्यानं वाद झडत होते. एका बाजूला परंपरेची पकड आणि दुसऱ्या बाजूला संभाषणातल्या सैलपणामुळे मुद्रित मजकुरात येणारा विस्कळीतपणा, या पेचात प्रमाणलेखन अडकलं होतं. अशा वेळी महामंडळाच्या नियमांची व्यावहारिक अडचण ओळखून राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून प्रा. शेख यांनी जी मांडणी केली, तिनं या वादांना अभ्यासाची आणि उपयोजनाची वाट दाखवली.
एस. आय. ई. एस. महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून केलेलं अध्यापन असो किंवा 'बालभारती'च्या पाठ्यपुस्तक निर्मितीतलं योगदान असो, या सर्वांतून त्यांनी प्रमाणभाषेची निकड समाजाच्या अंगवळणी पाडली. त्यांचं अतिशय मोलाचं योगदान म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेनं प्रसिद्ध केलेली ’मराठी लेखन मार्गदर्शिका’ (१९९७) आणि ’मराठी शब्दलेखनकोश’ (२००७) हे दोन ग्रंथ. १९६२ सालचे शुद्धलेखनाचे नियम असोत किंवा त्यानंतर १९७२ आणि १९८९ साली झालेले वादविवाद असोत, या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना लेखक, मुद्रितशोधक, पत्रकार, आणि विद्यार्थी यांना कोणकोणत्या अडचणी येतात, याचा वस्तुनिष्ठ अभ्यास प्रा. शेख यांनी केला. या दोन ग्रंथांचं नातं सिद्धांत आणि प्रत्यक्ष उपयोजन असं होतं. 'मार्गदर्शिका' ही मुख्यतः नियमांमागचा कार्यकारणभाव आणि लेखनपद्धती स्पष्ट करणारी होती. विरामचिन्हं, जोडाक्षरं, अनुस्वार, ह्रस्व-दीर्घ स्वर यांविषयीचे संकेत स्पष्ट करतानाच फारसी, अरबी वा इंग्रजीतून येणारे 'इनाम', 'अर्ज', 'टेबल' किंवा 'हॉस्पिटल' यांसारखे शब्द मराठीत सामावून घेताना त्यांच्या उपान्त्य स्वरांचे नियम काय असावेत, याविषयीचे वस्तुनिष्ठ निकष त्यांनी त्यात मांडले.
’मराठी शब्दलेखनकोश’ हा त्या नियमांची एकोणीस हजारांहून अधिक शब्दांमधून पडताळणी करून देणारा संदर्भग्रंथ होता. तिथे त्यांनी केवळ शब्दांची प्रमाणरूपं दिली नाहीत, तर त्या रूपांमागचा ध्वनिशास्त्रीय आणि रूपशास्त्रीय तर्क उलगडून दाखवला. उदाहरणार्थ, 'नवीन' हा तत्सम शब्द दीर्घ लिहिला तरी त्यापासून बनणारे 'नवता' किंवा 'नवलाई' हे तद्भव शब्द कसे बदलतात, अथवा 'अकॅडेमी' आणि 'कॅलेंडर' यांसारख्या इंग्रजी शब्दांमधल्या विवृत्त स्वरांचे (ऍ/ॲ) मुद्रणातील नेमकं रूप कोणतं असावं, हे त्यांनी शब्दवार नोंदींमधून सिद्ध केलं. या दोन्ही ग्रंथांतून तत्सम, तद्भव, आणि परकीय भाषांमधून मराठीत रुळलेले शब्द यांचे अंत्यस्वर, उपान्त्य स्वर, अनुस्वारांची जागा, आणि पर-सवर्णाचा वापर यांविषयी त्यांनी ठरवून दिलेले निकष आजही मराठी मुद्रणविश्वात प्रमाण मानले जातात.
वृत्तपत्रं, मासिकं, आणि दृक्श्राव्य माध्यमं यांमध्ये इंग्रजी शब्दांचा विनाकारण आणि अवाजवी भडिमार सुरू असताना मराठीची स्वतःची वाक्यरचना आणि अर्थवाही शब्द कसे बाजूला फेकले जात आहेत, याविषयी प्रा. शेख सातत्यानं आवाज उठवत राहिल्या. 'अंतर्नाद' मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून काम पाहताना किंवा वयाच्या नव्वदीनंतरही ’लोकसत्ते’त 'भाषासूत्र' हे सदर चालवताना त्यांनी वाचकांच्या शंकांना दिलेली उत्तरं लक्षवेधी होती. त्यामागे भाषेच्या वापरात आलेल्या अनावश्यक विस्कळीतपणाबद्दलची काळजी होती. बोलताना सहज ओठावर येणारे इंग्रजी शब्द, उदाहरणार्थ, 'कन्फर्म करणे' किंवा 'डिसिजन घेणे', मुद्रित लेखनातही कसलाही विचार न करता शिरवणं हा भाषेचा आधुनिक विकास नव्हे, तर भाषिक आळस आणि वैचारिक दारिद्र्य आहे, हे त्या 'भाषासूत्र'मधून रोखठोक शब्दांत मांडत.
शब्दांचे सूक्ष्म अर्थभेद, संदर्भानुसार बदलणारे अर्थ, आणि वाक्यांच्या रचनेतले बारकावे यांवरही त्यांनी सतत लिहिलं. 'पाहिजे' आणि 'हवे' यांतले सूचक भेद, 'केवळ' आणि 'फक्त' यांच्या उपयोजनातल्या जागा, किंवा 'उद्देश' आणि 'उद्देश्य' या शब्दांमधली व्याकरणिक तफावत त्यांनी प्रत्यक्ष संदर्भासहित दाखवून दिली. भाषा म्हणजे केवळ शब्दांची गोळाबेरीज नसते. एखादा शब्द नेमका कुठे आणि कोणत्या संदर्भात वापरला जातो यावरच त्याचा आशय अवलंबून असतो. त्यामुळे व्याकरण आणि शब्दलेखन यांचा अभ्यास प्रत्यक्ष अर्थनिर्मितीच्या संदर्भापासून वेगळा करता येत नाही, हे त्यांचे लेख वाचून लक्ष्यात येतं.
प्रा. शेख या भाषिक शिस्तीच्या बाजूनं ठाम असल्या, तरी त्यांच्या मते शिस्त म्हणजे जुन्या नियमांना प्रश्न न विचारता चिकटून राहणं नव्हे, तर त्या नियमामागचा तर्क आणि कारणमीमांसा उलगडून दाखवणं होतं. व्याकरण नीट समजून घेण्यासाठी प्रत्येकानं भाषाशास्त्रज्ञ व्हायलाच हवं असं नाही, पण नियम सांगणाऱ्याला त्यामागचा कार्यकारणभाव समजावून सांगता आला पाहिजे. 'हे असंच लिहायचं असतं' एवढ्या उत्तरावर भाषेचं शिक्षण भागत नाही; 'का?' या प्रश्नाला सामोरं जाण्याची तयारी लागते. प्रा. शेख यांच्या लेखनातून भाषिक नियमांना अशी अभ्यासू बैठक मिळाली. विशेषतः ह्रस्व-दीर्घ स्वरांच्या नियमांबाबत पुनर्विचाराची भूमिका त्यांनी मांडली. मराठी लेखनातले काही जुने संकेत, उदाहरणार्थ, शब्दाच्या शेवटी येणारा 'इ'कार वा 'उ'कार नेहमी दीर्घ लिहिण्याचा १९६२ सालचा नियम, परंपरेनं आले असले, तरी ते प्रत्यक्षातल्या बोलण्यातल्या उच्चारांशी आणि भाषिक वास्तवाशी कितपत जुळतात, हे तपासलं पाहिजे, असं त्या सांगत. हा वाद वरवर तांत्रिक वाटला, तरी त्यामागे भाषेसाठी नियम असतात की नियमांसाठी भाषा आणि व्याकरणाचा अधिकार केवळ परंपरेतून ठरतो की प्रत्यक्ष वापराच्या कसोटीवरून, याविषयीची सैद्धांतिक तपासणी दडलेली होती. भाषेचे नियम तपासण्याची ही सवय भाषेपलीकडच्या विचारपद्धतीशी जोडली जाऊ शकते. एखादा शब्द असाच का लिहिला जावा किंवा एखादा रूढ नियम आजही का पाळावा, याविषयीची चिकित्सक सवय माणसाला भाषेच्या संदर्भांत अधिक डोळस बनवते. भाषिक नियमांची तपासणी त्यामुळे केवळ व्याकरणाचा विषय राहत नाही. ज्ञान कसं तयार होतं आणि कोणत्या गोष्टींना प्रमाण मानलं जातं, याविषयीच्या व्यापक चिकित्सेची ती सुरुवात ठरू शकते.
शालेय स्तरावर व्याकरण कसं शिकवलं जातं, याविषयी त्या कमालीच्या सजग होत्या. पारंपरिक शाळांमध्ये व्याकरणाला व्याख्या, नियम, आणि पाठांतर यांचा एक रुक्ष विषय बनवून टाकण्यात आलं होतं. व्याकरण विद्यार्थ्यांना दडपणाखाली आणण्यासाठी नसून भाषेची अंतर्गत रचना उलगडून दाखवणारी ती एक दुर्बीण असते, हा विचार त्यांनी 'बालभारती'च्या 'कार्यात्मक व्याकरण' या पद्धतीतून रुजवला.
मूल शाळेत येण्यापूर्वीच स्वतःची मातृभाषा बोलायला, समजायला, आणि वापरायला शिकलेलं असतं; व्याकरण हे त्याच्या या उपजत भाषिक क्षमतेची शिस्तबद्ध मांडणी करतं, हा दृष्टिकोन त्यांनी पाठ्यपुस्तकांत आणला.
नाम, सर्वनाम, विभक्तीचे प्रत्यय, समासांची घडण वा प्रयोगांचे प्रकार शिकवताना त्यांनी मोरो केशव दामले यांच्या ’शास्त्रीय मराठी व्याकरण’ किंवा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या व्याकरणातल्या जुन्या संस्कृतनिष्ठ व्याख्यांची पोपटपंची बाजूला सारून प्रत्यक्ष संभाषणातल्या जिवंत वाक्यांचा पाया घेतला. तर्खडकर आणि दामले यांनी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी भाषेला जी पायाभूत सैद्धांतिक चौकट दिली, ती प्रा. शेख यांनी आधुनिक मुद्रणसंस्कृती आणि शिक्षणाच्या प्रत्यक्ष गरजा यांच्याशी जोडून पुढच्या टप्प्यावर नेली. तर्खडकरांनी मराठीचं पहिलं पद्धतशीर व्याकरण मांडताना भाषेची प्राथमिक नियमावली सिद्ध केली, तर दामले यांनी त्यांच्या ’शास्त्रीय मराठी व्याकरण’ या ग्रंथातून संस्कृत न्यायशास्त्र आणि पाणिनीय परंपरा यांचा आधार घेत भाषेची तर्ककठोर आणि विद्वत्तापूर्ण रचना उभी केली. मात्र दोघांचीही दृष्टी ही मुख्यतः भाषेची सैद्धांतिक व्यवस्था मांडण्यावर केंद्रित होती. प्रा. शेख यांनी या पूर्वसुरींच्या व्याकरणिक शिस्तीचा आणि विश्लेषणाचा वारसा स्वीकारला खरा, पण त्या केवळ पांडित्यपूर्ण मांडणीत अडकून पडल्या नाहीत. त्यांनी व्याकरणाला संस्कृतनिष्ठ चौकटीतून आणि पाठांतराच्या रुक्षतेतून बाहेर काढून 'कार्यात्मक' रूप दिलं. तर्खडकर आणि दामले यांच्या काळांत प्रमाणभाषेचा संबंध विशिष्ट वर्गाच्या भाषिक व्यवहाराशी आणि अभिजन वर्गाच्या शिस्तीशी जोडलेला होता. प्रा. शेख यांनी मात्र आधुनिक भाषाविज्ञानाची जोड देत भाषेचं लोकशाहीकरण केलं. जिथे जुन्या व्याकरणकारांनी नियम हे परंपरेनं मिळालेलं अंतिम सत्य मानलं, तिथे प्रा. शेख यांनी बदलत्या मुद्रणमाध्यमांचा, प्रत्यक्ष उच्चारांचा, आणि बोलीभाषकांच्या व्यावहारिक अडचणींचा विचार करून नियमांकडे तपासणीच्या आणि संवादाच्या वैज्ञानिक दृष्टीनं पाहिलं.
प्रा. शेख यांच्या मांडणीतला एक मूलगामी पैलू म्हणजे ‘भाषेला जात नसते’ हा ठाम आग्रह. महाराष्ट्रात सत्तर-ऐंशीच्या दशकात दलित आणि ग्रामीण साहित्यानं प्रमाणभाषेच्या वर्चस्वाला आव्हान दिलं होतं. त्या काळात प्रमाणभाषेचा संबंध विशिष्ट उच्चवर्णीय, उच्चवर्गीय घटकांशी जोडला जात असताना, कोणाची भाषा प्रमाण, सभ्य वा उच्च मानायची आणि कोणाची बोली ग्राम्य वा दुय्यम ठरवायची, यामागे सामाजिक व सांस्कृतिक विषमतेची उतरंड कशी काम करते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मराठी भाषेच्या आधुनिक इतिहासात ‘शुद्ध’ आणि ‘अशुद्ध’ या संकल्पनांना मोठं वजन राहिलं आहे. प्राथमिक शाळा, पाठ्यपुस्तकं, परीक्षा, सरकारी कारभार, वर्तमानपत्रं, आणि ग्रंथनिर्मिती या सर्व क्षेत्रांतून भाषेचं एक प्रमाणरूप आकारास आलं. या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यात व्याकरणाची महत्त्वाची भूमिका होती, पण प्रमाणभाषेची जडणघडण निव्वळ तांत्रिक नसते. कोणती भाषा शाळेत शिकवली जाते, कोणत्या भाषेला स्पर्धा परीक्षांचं माध्यम बनवलं जातं, आणि कोणत्या शब्दांना प्रशासकीय मान्यता मिळते, हे प्रश्न त्यामुळेच केवळ व्याकरणाचे न राहता थेट राज्यव्यवस्थेशी जोडले जातात. 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स'मध्ये स्पर्धा परीक्षांच्या भावी अधिकाऱ्यांना शिकवताना हा पेच प्रा. शेख यांच्या रोजच्या पाहण्यात येत होता. ग्रामीण भागातून किंवा बहुजन स्तरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा प्रशासकीय चौकटीत कशी बसवायची, पण त्याचवेळी त्यांच्या अभिव्यक्तीचा संकोच कसा होऊ द्यायचा नाही, याचं नेमकं भान त्यांनी आपल्या शिकवणीतून दिलं. मराठी ही कोणत्याही एका जातीची किंवा वर्गाची मक्तेदारी नसून ती वापरणाऱ्या प्रत्येकाची आहे, हीच त्यांची निग्रही भूमिका होती. इतर भाषांमधून शब्द आले म्हणून भाषा विटाळत नाही, वेगळ्या सामाजिक घटकांनी ती आपल्या ढंगानं वापरली म्हणून तिचं सत्त्व संपत नाही आणि नव्या वापरामुळे तिची ओळख पुसली जात नाही; भाषेचं अस्तित्व तिच्या अखंड वापरातून आणि बदलांतूनच जिवंत राहतं. त्यामुळे बाह्य शुद्धतेचा अवाजवी हट्ट भाषिक संवादाची दारे बंद करतो याची जाणीव ठेवत, सार्वजनिक भाषेच्या जडणघडणीवर आपल्या कामाचा प्रभाव पडतो या सामाजिक जबाबदारीचं भान प्रा. शेख यांच्या संपूर्ण अध्यापनात आणि लेखनात सातत्यानं जाणवतं.
प्रा. शेख यांनी मराठी भाषेकडे केवळ परंपरेनं मिळालेला ठेवा म्हणून पाहिलं नाही, तर तिच्या अंतर्गत रचनेचा आणि प्रत्यक्ष वापराचा सखोल अभ्यास केला. ही दृष्टी आजच्या काळात अधिक महत्त्वाची ठरते. म्हणूनच त्यांना केवळ ’मराठीच्या राखणदार’ म्हणणं अपुरं ठरेल. राखणदाराचं काम आधीपासून असलेलं संचित जपणं असतं. प्रा. शेख यांचं काम त्यापेक्षा वेगळं होतं. त्या मराठीचा जिवंत नकाशा तयार करत होत्या. या भाषेची रचना कुठे कशी आहे, तिच्या शब्दसंपदेत कोणकोणत्या वाटांनी शब्द येऊन सामावले आहेत, तिच्या लेखनपद्धतीत कोणते नियम काम करतात, आणि प्रत्यक्ष वापरामुळे तिचं स्वरूप कुठे बदलतं आहे, हे त्या दाखवत होत्या. नकाशा तयार करणारा प्रत्येक वाटेला एकाच दिशेनं जाण्याची सक्ती करत नाही. तो वाटा, वळणं, फाटे, आणि बदलता भूगोल यांची नोंद ठेवतो. प्रा. शेख यांच्या भाषाविचारातही हा दृष्टिकोन होता. मराठी टिकवण्याचा त्यांचा आग्रह तिचं रूप गोठवण्याचा नव्हता. ती कशी जगते, बदलते, आणि नव्या वापरांतून स्वतःची रचना पुन्हा घडवते, हे समजून घेण्याचा होता. म्हणूनच प्रा. शेख यांनी आपल्याला निव्वळ नियम नव्हे, तर खरा भाषाविवेक शिकवला.
***
हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल 'नवभारत'चे व श्री. हेमंत राजोपाध्ये यांचे आभार.
प्रा. शेख यांची ओळख करून
प्रा. शेख यांची ओळख करून दिल्याबद्दल चिनूक्स आभार.
त्यांच्या कामाबद्दल अजिबातच माहिती नव्हती. त्या गेल्या तेव्हाच याची माहिती झाली हे आमचे दुर्दैव.
सध्याच्या AI आणि आंतरजालावर असणाऱ्या मराठीबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या चर्चांमध्ये हे नियम असावेत का? कसे लिहिले जावे? हे प्रश्न पडतात - तेव्हा अशाच मार्गदर्शकाची आवश्यकता आता अजूनच भेडसावेल.
>> उदाहरणार्थ, 'कन्फर्म करणे'
>> उदाहरणार्थ, 'कन्फर्म करणे' किंवा 'डिसिजन घेणे', मुद्रित लेखनातही कसलाही विचार न करता शिरवणं हा भाषेचा आधुनिक विकास नव्हे <<
>> इतर भाषांमधून शब्द आले म्हणून भाषा विटाळत नाही, वेगळ्या सामाजिक घटकांनी ती आपल्या ढंगानं वापरली म्हणून तिचं सत्त्व संपत नाही आणि नव्या वापरामुळे तिची ओळख पुसली जात नाही; भाषेचं अस्तित्व तिच्या अखंड वापरातून आणि बदलांतूनच जिवंत राहतं <<
या दोन परस्परविरोधी गोष्टी नाहीत का?
म्हणजे ही प्रमाण मराठी घडायला (म्हणजे ज्या भाषेत हा लेख लिहिला आहे आणि ज्या भाषेत हा प्रतिसाद देतो आहे) घडायला फारशी उर्दू शब्दांची प्रचंड उसनवारी झालेली आहे ती मुख्यत्वे राजकीय आणि व्यावरहारिक (किंवा अप्लाइड) उपयोगातून झालेली आहे. मग नेमके कन्फर्म करणे आणि डिसीजन घेणे यांनी काय घोडं मारलं आहे (घोडं मारणे हा मध्ययुगीन किंवा प्राचीन वाक्प्रचार अजूनही वापरात आहे. बहुतेक समाजाने घोडी वापरायचे बंद केले असले तरी) कारण हे ही व्यावसायिक गरजांतून आलेले शब्द आहेत नव्हे?
कन्फर्म करण्याला खरेच मला दुसरा चांगला पर्याय सुचतच नाही. अगदी आपसूक तोंडात येते. निर्णय घेणे हे एकवेळ ठीक आहे. तो अगदी सहज बोलीभाषेत देखील वापरतात.
कन्फर्म करणे = खात्री करणे
कन्फर्म करणे = खात्री करणे
भारी ओळख!
भारी ओळख!
हे असे काहीतरी कार्य कोणीतरी आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी करत असते याचीच माझ्यासारख्या कित्येकांना फारशी कल्पना नसते.
कन्फर्म करणे = खात्री करणे
कन्फर्म करणे = खात्री करणे
आयला होय की. मला तर अजिबातच सुचला नाही पण आता त्यामुळे मला एकदम मूर्खासारखेच वाटू लागले आहे. मी तर पूर्णच गंडलो आहे म्हणजे.
सुरेख लेख. त्यांची
सुरेख लेख. त्यांची वर्तमानपत्रातील सदरे, त्यातुन एखादा शब्द 'तसा आहे' इथे सोडून न देता तो 'तसा का आहे?' याचा उहापोह, आणि ती कारणे देताना ते उदाहरणांसह समजावून सांगणे हे आठवतं. त्यात अट्टाहास जाणवत नसे.
>>मराठी टिकवण्याचा त्यांचा आग्रह तिचं रूप गोठवण्याचा नव्हता. ती कशी जगते, बदलते, आणि नव्या वापरांतून स्वतःची रचना पुन्हा घडवते, हे समजून घेण्याचा होता. म्हणूनच प्रा. शेख यांनी आपल्याला निव्वळ नियम नव्हे, तर खरा भाषाविवेक शिकवला. >> खरं आहे.
>> हे त्यांचे लेख वाचून लक्ष्यात येतं. >> हे लक्षात येत हवं का? लक्ष्यात येते म्हणजे कदाचित लक्ष्याच्या टप्प्यात येते असा अर्थ असेल का?
फारच सुंदर ओळख. धन्यवाद.
फारच सुंदर ओळख. धन्यवाद.
लोकसत्तातील भाषासूत्र सदरातून त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर अनेक लेख व व्हिडिओमधून अधिक माहिती मिळाली. त्यांचे कार्य अफाट आहे.
यावर्षीच मधुरा वेलणकर यांनी त्यांची मुलाखत घेतली होती.
महाराष्ट्र शासनाने प्रमाणीकृत मराठी बाबत एक अध्यादेश काढला होता. मला वाटते याबाबत शासनाकडून देखील फारशी जागरूकता करण्यात आली नाही.
लेख आवडला.
लेख आवडला.
यांच्यावर तू नक्की लिहिशील अशी खात्री होती.
नवभारत करता लिहिलास म्हणून शब्दमर्यादा असावी.
तुझ्याकडून अजून सविस्तर आणि विस्तारपुर्वक लिखाणाची अपेक्षा
होतीआहे.प्रा. यास्मिन शेख गेल्यानंतर
प्रा. यास्मिन शेख गेल्यानंतर त्यांच्याबद्दलचे अनेक लेख वाचनात आले. त्यातला हा सगळ्यात जवळचा वाटला. मायबोलीवर अशा चर्चा होत, अजूनही होतात , त्यामुळेच व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांबद्दल एक सजगता आली आणि त्यांबद्दल विचारा करावा , ते समजून घ्यावे असे वाटले. त्याबरोबरच किंवा त्या आधीपासून अंतर्नाद मासिकात- खरं तर त्याच्या दिवाळी अंकांत याबद्दल चर्चा वाचली आहे.
या लेखातली भाषाशैली यास्मिन शेख यांच्या कार्याला मानवंदना वाटावी अशी आहे.
काही काही वाक्ये अगदी अधोरेखित करावी असे वाटले. काही दोनतीनदा वाचून , समजून घेऊन मग पुढे गेलो.
वाचताना शंकाही येत गेल्या - उदा : शब्दाच्या शेवटी येणारा 'इ'कार वा 'उ'कार नेहमी दीर्घ लिहिण्याचा १९६२ सालचा नियम - या नियमाने मराठी शुद्धलेखनाची संस्कृतच्या जोखडातून सुटका केली,असे म्हणता येईल का? त्याचीची शब्दाच्या उच्चारानुसार चिकित्सा व्हावी असे त्यांचे म्हणणे होते का?
उपयोजनसारख्या काही शब्दांचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी मला त्यासाठीचा इंग्रजी प्रतिशब्द आठवावा लागला, इतके ते अपरिचित आहेत.
राज्य मराठी विकास संस्थेच्या अत्यंत अनाकर्षक, वाचायला कठीण अशा जाहिराती ललितच्या दिवाळी अंकात असत. त्यात प्रा. शेखांच्या पुस्तकांची नावं वाचून ही संग्रही असायला हवीत म्हणून ती जाहिरात कापून ठेवली होती. पुस्तकं घ्यायचं राहून गेलं.
लोकसत्तेतलं भाषासूत्र हे सदर आवर्जून वाचलं जायचं.
नवभारत बद्दल कधी ऐकलं नव्हतं. शोधलं तर अगदी किचकट प्रकार दिसतो आहे. त्यातला तत्त्वज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा हा लेख प्रा. शेख यांनी वाचला असता, तर त्यांची प्रतिक्रिया काय असती, असं वाटून गेलं.
या लेखाबद्दल धन्यवाद चिनूक्स.
लेख आवडला.
लेख आवडला.
लोकसत्तेतलं “भाषासूत्र“
लोकसत्तेतलं “भाषासूत्र“ नियमित वाचत असे.
हा लेख आवडला.
छान लेख. ह्यांच्या मुलाखती
छान लेख. ह्यांच्या मुलाखती पाहिल्या आहेत यूट्यूब वर. आवडल्या होत्या सगळ्याच.
>> नवभारत बद्दल कधी ऐकलं
>> नवभारत बद्दल कधी ऐकलं नव्हतं. शोधलं तर अगदी किचकट प्रकार दिसतो आहे. त्यातला तत्त्वज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा हा लेख प्रा. शेख यांनी वाचला असता, तर त्यांची प्रतिक्रिया काय असती, असं वाटून गेलं <<
मी उत्सुकतेने अंक विकत घेण्यासाठी कार्ट मधे टाकला तर ८० रुपयांचा अंकाची एकूण किमंत ६०० रुपये डिलीवरी चार्ज सहित दाखवल्यावर कृत्रिम प्रज्ञा आणि तत्त्वज्ञानाविषयी श्रीमती जेमिनी क्लॉडकर यांच्याशीच गप्पा माराव्या असं ठरवलं.