ऑप्टोजेनेटिक्स - २०२६ चे शरीरक्रियाशास्त्र/ औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक

Submitted by अमितव on 6 October, 2026 - 21:56

माणसाच्या मेंदूत स्मृती, भावना कशा निर्माण होतात, त्या नक्की कुठे वास करतात आणि त्यावर आधारित त्याची वर्तणूक कशी ठरते, ती बदलणे शक्य होईल का? आणि हे सगळं नक्की कसं चालतं, याचा शोध विज्ञान संशोधक अनादि काळापासूनचे घेत आहेत. परवाच कार्ल डायसरोथ (Karl Deisseroth), पीटर हेगेमन (Peter Hegemann) आणि जॉर्ज नागेल (Georg Nagel) यांना ऑप्टोजेनेटिक्सच्या शोधासाठी २०२६ चे शरीरक्रियाशास्त्र / औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहिर झाले. या शोधामुळे जिवंत मेंदू मधील विशिष्ट मज्जापेशींचे (nerve cells) कार्य चालू किंवा बंद ( स्विच ऑन/ ऑफ) करणे शक्य झाले आहे. हे काहीतरी अभूतपूर्व क्रांतिकारक आहे असं वरवर वाचुन मला वाटलं म्हणून थोडी शोधाशोध करुन काय सापडलं - समजलं ते लिहित आहे. काही चुका असतील तर अवश्य सांगा.

आपल्या डोक्याच्या पोकळीत असलेला जेमतेम १.३ किलोग्रॅम वजनाचा हा अवयव बालपणातील आठवणी, स्वप्ने आणि सर्जनशीलता कशी काय जतन करतो? हा मेंदू आनंद, प्रेम आणि मत्सर या भावना, हृदयाच्या ठोक्यांचा वेग, श्वासोच्छवासाची लय आणि झोपेचे चक्र नक्की कसे नियंत्रित करतो? हे प्राचीन काळापासून संशोधकांना पडलेले कोडे. विसाव्या शतकात संशोधकांंनी मेंदूचे कोणते भाग विविध शरीरक्रियात्मक कार्ये नियंत्रित करतात हे यशस्वीरीत्या शोधून काढले. मेंदूला समजण्याच्या प्रक्रियेतील ही एक मोठी झेप नक्कीच होती पण यातुन मेंदूची जी प्रतिमा समोर आली ती एका धुसर छायाचित्रासारखी होती. आपण अजुनही विशिष्ट प्रकारच्य मज्जापेशी थेट एखादी विशिष्ट भावना किंवा वर्तणूक निर्माण करते हे सिद्ध करू शकत नव्हतो. ढोबळमानाने भावनांची केंद्र समजली तरी स्मॄती, भावना, एखादी क्षमता मेंदुत नक्की कुठल्या पेशींतून जागृत होते असे अनेक तपशील अजुनही गहाळच होते.

१९६२ चे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक (Francis Crick) यांनी १९५३ मध्ये डीएनए (DNA) च्या डबल हेलिक्स संरचनेचा क्रांतिकारक शोध लावला आणि नंतर त्यांनी मानवी जाणीवेच्या मुळाशी असलेल्या यंत्रणेचा तपास करण्यास सुरुवात केली. त्यांना जिवंत मेंदूमधील काही विशिष्ट मज्जापेशींना सक्रिय करण्याच्या पद्धतींची कल्पना सुचली. मेदुतील संदेशवहन करणार्‍या या मज्जापेशी अतीवेगवान संदेशवहन करतात. तेव्हा जर या मज्जापेशींत काही मूलभूत फेरफार केले की जेणे करुन या पेशी प्रकाशाला प्रतिसाद देऊ शकतील तर प्रकाशाच्या किरणांद्वारे आपण या पेशींवर नियंत्रण, आणि एकुणच मज्जासंस्थेच्या विशिष्ट भागावर/ एकाद्या इंद्रियावर/ एखाद्या क्रियेवर नियंत्रण मिळवू शकू, अशी त्याकाळी अशक्यप्राय वाटणारी कल्पना त्यांनी प्रथम मांडली.

त्यांची ही भविष्यावाणी आता प्रत्यक्षात आली आहे. कार्ल डायसरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना मज्जापेशींच्या रेणू संरचनेतील असा स्विच (molecular switch) शोधल्याबद्दल २०२६ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. प्रकाशाचा वापर करून, संशोधक आता मेंदूतील विशिष्ट मज्जासंस्थेचा भाग (neural circuits) सुरू किंवा बंद करू शकतात. ते आठवणी पुनरुज्जीवित करू शकतात, भावना निर्माण करू शकतात, वर्तणुकीस चालना देऊ शकतात आणि विविध मानसिक आजार व मज्जासंस्थेच्या आजारांमध्ये सहभागी असलेल्या मज्जापेशींच्या प्रकारांचा अभ्यास करू शकतात. ऑप्टोजेनेटिक्समुळे मेंदूबद्दलच्या आपल्या ज्ञानात मूलभूत बदल होत आहेत. याने मज्जासंस्था शरीराच्या इतर भागांतील पेशींशी (उदा. हृदय/ आतडे) कशी जोडली आहे याबद्दल ही बहुमूल्य माहिती आपल्याला मिळू लागली आहे.

प्रकाशाचा शोध
या सर्वांची सुरुवात एका संशोधकाच्या कुतूहलाने झाली. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला, मार्टिन्सरीड, जर्मनी येथील 'मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री' मधील पीटर हेगेमन यांनी एक साधा प्रश्न विचारला: 'क्लॅमिडोमोनास' हे एकपेशीय शेवाळ प्रकाशास इतक्या वेगाने प्रतिसाद कसा देऊ शकते?

क्लॅमिडोमोनास हे शेवाळे प्रकाशाच्या दिशेने पोहण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. हे शेवाळे एका पेट्री डिशमध्ये पाण्यात ढवळले तर फिकट हिरव्या रंगाचे दिसते. आता जर डिशच्या एका बाजूला प्रकाशझोत टाकला, तर हे सूक्ष्म शेवाळे प्रकाशाकडे पोहत गेल्यामुळे तो हिरवा रंग प्रकाशाच्या स्रोताकडे सरकतो. ही शेवाळे त्यांच्या पेशीच्या पृष्ठभागावरील 'आयस्पॉट' (एका लहान नारंगी ठिपक्या) द्वारे प्रकाश ओळखतात, ज्यामध्ये 'रेटिनल' नावाचा प्रकाश-पकडणारा रेणू असतो. हेगेमन यांनी शेवाळाच्या या आयस्पॉटवर इलेक्ट्रोड लावून प्रयोग करुन क्लॅमिडोमोनासमध्ये निर्माण होणारे विद्युत सिग्नल मोजले. आयस्पॉटवर प्रकाश पडल्यानंतर अवघ्या अर्ध्या मिलीसेंकंदात (0.5 ms) विद्युत लहरी निर्माण झाल्या.

संशोधकांना त्याकाळी माहिती असलेल्या इतर जैविक प्रणालींच्या तुलनेत, हा वेग आश्चर्यकारकपणे जास्त होता. उदाहरणार्थ, मानवी डोळ्यावर प्रकाश पडल्यावर अनेक वेगवेगळ्या टप्प्यांचा समावेश असलेली एक गुंतागुंतीची रासायनिक साखळी प्रक्रिया सुरू होते. या साखळीतील शेवटचे प्रथिन — एक आयन चॅनेल — पेशीच्या पृष्ठभागावर एक छिद्र तयार करते ज्यातून प्रभारित आयन वाहू शकतात आणि विद्युत सिग्नल तयार होतो. या संपूर्ण प्रक्रियेस किमान १० मिलीसेंकंद लागतात. मग क्लॅमिडोमोनास मधील प्रकाशाचा प्रतिसाद आपल्या डोळ्यांपेक्षा वीस पटीहून अधिक वेगवान कसा असू शकतो? ज्याअर्थी हा वेग इतका जलद आहे त्याअर्थी त्या शेवाळ्यात असे काही कॉम्प्लेक्स प्रोटिन असावे जे प्रकाश किरण पकडण्याचे आणि आयॉनिक चॅनल तयार करण्याचे दुहेरी काम करेल अशी संकल्पना (हायपोथिसिस) त्यांनी प्रथम मांडला. अर्थात तेव्हा असे कुठेलेच प्रथिन माहित नसल्याने त्याकडे संशयानेच पाहिले गेले.

आता पुढे काही सिद्ध करायचे असेल तर हे प्रथिन वेगळे करणे आले! ते प्रथिन अत्यंत अस्थिर असल्याने शेवाळ्यातून ते वेगळे करुन वापरण्यायोग्य ठेवणे हे महत्कर्म कठिण काम बनू लागले. याच दरम्याने जपानमध्ये या शेवाळ्यातील जनुकीय संरचनेचा तक्ता तयार झाला होता. यातुन हेगेमन गटाला दोन जनुके सापडली ज्यांचे प्रकाश पकडणाऱ्या प्रथिनांच्या ज्ञात जनुकांशी लक्षणीय साम्य होते. ते शोधत असलेल्या प्रथिनाचा कोड यांपैकी कशात असू शकतो का?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, हेगेमन यांनी फ्रँकफर्टमधील 'मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोफिजिक्स' मधील त्यांचे सहकारी जॉर्ज नागेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे मज्जासंस्था विज्ञानात क्रांती घडवून आणणाऱ्या पुढील निर्णायक पावलासाठी आवश्यक असलेले ज्ञान होते.

नागेल यांनी क्लॅमिडोमोनासची ही जनुके वेगवेगळ्या बेडकांच्या अंड्यांमध्ये टोचली. आता त्या अंड्यांमध्ये या दोन अनोळखी प्रथिनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. ही प्रथिने पेशींच्या पृष्ठभागावर जमा झाली आणि नागेल नंतर ती कशी कार्य करतात याचा तपास करू शकले. या प्रयोगांतुन हे सिद्ध झाले की हीच ती आयन चॅनेल्स होती जी प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर उघडत होती.

या प्रथिनांना चॅनेलरोडॉप्सिन-१ (channelrhodopsin-1) आणि चॅनेलरोडॉप्सिन-२ (channelrhodopsin-2) अशी नावे देण्यात आली. आपण पहिल्या प्रथिनाला बाजूला ठेवून दुसऱ्यावर लक्ष केंद्रित करूया, ज्याने ऑप्टोजेनेटिक्सचा मार्ग मोकळा केला. या प्रथिनावर प्रकाश पडल्यावर हे प्रथिन ०.२ मिलीसेकंदात कार्यरत होऊन धन प्रभारित चॅनल तयार झाला आणि विद्युत लहरी वाहू लागल्या. २००३ मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाल्यावर यापुढची धुरा स्टॅनफर्ड विज्ञापिठातील एका तरुण शास्त्रज्ञाने पुढे नेली.

१९९० च्या दशकात कार्ल डायसरोथ मज्जा-शल्यविषारद होण्याचे शिक्षण घेत होता आणि प्रशिक्षणाचा काही भाग मानसोपचारांची गरज रुग्णांबरोबर ही व्यतित करत होता. तिथे असताना रुग्णांचे मेंदू इतके वेगळे कसे काय काम करू शकतात, नैराश्य (depression) असलेले लोक आनंदाचा अनुभव घेणे का कठीण मानतात? ऑटिझम किंवा स्क्रिझोफेनिया मध्ये भ्रम कशामुळे निर्माण होतात? असे प्रश्न त्याला सतावू लागले. वैद्यकीय अभ्यासासोबतच त्याने न्यूरोसायन्समध्ये पीएचडी (PhD) पूर्ण केली. क्लिनिकमध्ये दिसणार्‍या आजारांना समजून घेण्यासाठी जिवंत मेंदूत मज्जापेशी कशा काम करतात हे अभ्यासणे आवश्यक आहे, हे त्यांच्या लक्षात आले. सध्या रुग्णांना जे उपचार मिळत होते ते क्वचितच प्रभावी ठरत असत आणि त्यांचे गंभीर दुष्परिणामही होत होते. त्यांना मदत करण्याचा चांगला मार्ग शोधायचा असेल, तर मेंदूची अधिक सखोल समज असणे आवश्यक होते हे त्याला समजुन चुकले.

संशोधनपर साहित्यात हे शेवाळ्यातील प्रकाशाने उत्प्रेरिक होणारे जनुक सापडल्यावर डायसरोथ आणि त्यांच्या अभ्यासगटाने जॉर्ज नागेल यांना पत्र लिहून प्रथिनाचे कोडिंग करणाऱ्या डीएनएची मागणी केली. हा डीएनए डायसरोथ यांनी पेट्री डिश मध्ये विकसित करुन उंदरांच्या मज्जापेशींत घातला. परकीय जनुकामुळे नाजूक मज्जापेशींवर वाईट परिणाम होईल अशी त्यांना भीती होती, परंतु कोणत्याही उघड समस्येशिवाय पेशींनी चॅनेलरोडॉप्सिन-२ चे उत्पादन सुरू केले. जेव्हा संशोधन गटाने मज्जापेशींवर निळा प्रकाश टाकला, तेव्हा पेशींनी त्वरित प्रतिसाद दिला. प्रकाशामुळे मज्जासंस्थेचा असा सिग्नल निर्माण झाला जो इतर मज्जापेशींपर्यंत पोहोचवला जाऊ शकत होता!!!

२००५ मध्ये, डायसरोथ यांच्या संशोधन गटाने त्यांचा हा शोध प्रकाशित केला. हा एक निर्णायक टप्पा असला तरी अजुन जिवंत प्राण्यांमधील मज्जापेशींच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्याचे ध्येय दूर होते. कार्ल डायसरोथ यांनी आता पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांच्यासह अनेक संशोधकांबरोबर काम चालू केले. संशोधकांना लवकरच अशी अधिक प्रथिने सापडली जी मज्जापेशींना उत्प्रेरित (ट्रिगर) करू शकत होती आणि जी प्रकाशाच्या विविध तरंगांनुसार (wavelengths) सक्रिय होत होती.

२००६ मध्ये, या नवीन पद्धतीला 'ऑप्टोजेनेटिक्स' (optogenetics) हे नाव देण्यात आले. एका वर्षानंतर, डायसरोथ यांनी जिवंत उंदरांच्या मेंदूतील मज्जापेशी यशस्वीरीत्या सक्रिय केल्या. त्यांच्या संशोधन गटाने चॅनेलरोडॉप्सिन-२ चे जनुक 'मोटर कॉर्टेक्स' मधील (मेंदूचा हालचालींवर नियंत्रण ठेवणारा भाग) विशिष्ट मज्जापेशींमध्ये प्रविष्ट केले. त्यानंतर त्यांनी कवटीतील एका लहान छिद्राद्वारे मेंदूत सोडलेल्या एका बारीक ऑप्टिकल फायबरच्या (optical fiber) साहाय्याने मज्जापेशींवर प्रकाश टाकला. यामुळे त्यांना उंदराच्या मिशांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.
त्याच वर्षी, इतर संशोधकांसोबत काम करताना, डायसरोथ यांनी झोपलेल्या उंदरांना नियंत्रित पद्धतीने जागे करण्यासाठी ऑप्टोजेनेटिक्सचा वापर केला. संशोधन गटाने चॅनेलरोडॉप्सिन-२ जनुक नुकत्याच शोधलेल्या अशा मज्जापेशींमध्ये प्रविष्ट केले, ज्या पेशी जागृतपणा नियंत्रित करतात असा त्यांना संशय होता. जेव्हा त्यांनी मज्जापेशींवर प्रकाश टाकला, तेव्हा उंदीर जागे झाले, प्रयोग यशस्वी झालेला होता!

२०१२ मध्ये सुसुमू तोनेगावा (Susumu Tonegawa - रोगप्रतिकारशास्त्रातील शोधांसाठी १९८७ चे नोबेल पारितोषिक विजेते) यांच्यासोबत, डायसरोथ यांनी 'एनग्राम' (engram - एखादी आठवण तयार होताना मज्जातंतूंच्या मार्गांची बनणारी विशिष्ट रचना) यशस्वीरीत्या सक्रिय केला. संशोधकांनी उंदरांना भीतीचा अनुभव येत असताना त्यांच्या मेंदूचा अभ्यास केला आणि या अनुभवाची आठवण कोणत्या मज्जापेशींनी तयार केली हे नोंदवून ठेवले. नंतर ते उंदिर जरी कोणती भिती उत्पन्न होईल अशा परिस्थिती न्हवते, तरी त्या मज्जापेशींना सक्रिय केल्यावर उंदरांनी भीतीची लक्षणे दाखवली. हा असा पहिला प्रयोग होता ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट आठवणीसाठी कोणत्या मज्जापेशी आवश्यक असतात हे संशोधक तंतोतंत दाखवू शकले.

मज्जासंस्था विज्ञानातील एक नवीन युग
अशा ठराविक मेंदूतील मज्जापेशी सक्रिय करण्याच्या क्षमतेने या अद्भुत अवयवाबद्दलची आपली समज मूलभूतपणे बदलून टाकली आहे. एका प्रौढ मानवी मेंदूत सुमारे ९० अब्ज मज्जापेशी असतात, ज्यांपैकी प्रत्येक पेशी इतर मज्जापेशींशी हजारो जोडण्या (connections) तयार करते. काही मज्जापेशीचा मार्ग मेंदूच्या पूर्णपणे वेगळ्या भागात जातो, तर संपूर्णपणे वेगवेगळ्या शारीरिक कार्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जापेशी एकमेकांत मिसळलेल्या असू शकतात. ऑप्टोजेनेटिक्समुळे, गुंतागुंतीच्या मज्जापेशींच्या जुडग्यामधील कोणत्या मज्जापेशी मेंदूची कोणती कार्ये नियंत्रित करतात हे संशोधक आता तंतोतंत शोधू शकतात. उदाहरणार्थ, त्यांनी वेदनेची जाणीव, सामाजिक वर्तणूक, तहान, अन्न सेवन, बक्षीस/आनंद आणि लक्ष केंद्रित करणे या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारे परिपथ (neural circuits) ओळखले आहेत. दैनंदिन जैविक घड्याळाच्या (circadian rhythm) नियंत्रणापासून ते प्रतिकारशक्ती सक्रिय झाल्यावर ताप येण्यापर्यंतच्या विविध कार्यांसाठी जबाबदार असलेल्या मज्जापेशी देखील शोधल्या आहेत.
जेव्हा संशोधकांनी अधिक गुंतागुंतीच्या वर्तणुकीचा अभ्यास केला, जसे की उंदीर त्यांच्या पिलांची काळजी कशी घेतात, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की वर्तणुकीचे विविध घटक वेगवेगळ्या मज्जा परिपथांद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, एक परिपथ उंदीर त्यांच्या पिलांना घरट्यात कसे गोळा करतात याचे नियंत्रण करतो, तर दुसरे परिपथ ते पिलांना कसे स्वच्छ करतात याचे नियमन करतो. ऑप्टोजेनेटिक्सचा वापर मेंदूच्या बाहेरील मज्जासंस्था आणि पेशींच्या कार्यांचा नकाशा तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. डायसरोथ यांनी हे दाखवून दिले आहे की हृदयाची लय आपल्या भावनांवर परिणाम करू शकते; जर हृदयाला अधिक वेगाने काम करण्यास भाग पाडले गेले, तर यामुळे भीती/काळजीची (anxiety) भावना वाढू शकते. इतर संशोधकांनी आतड्यातील विशिष्ट पेशी ओळखल्या आहेत ज्या हे स्पष्ट करू शकतात की काही लोक कृत्रिम गोडव्यापेक्षा (sweeteners) साखरेला का पसंती देतात — ही तर अशा अनेक उदाहरणांपैकी काही उदाहरणे!

भविष्यातील नविन उपचारांची दिशा
ऑप्टोजेनेटिक्सच्या वापराने निर्माण होणारे ज्ञान नवीन वैद्यकीय उपचारांकडे घेऊन जाईल ही आशा आता फलद्रूप होऊ लागली आहे. या पद्धतीने नैराश्य (depression), चिंता (anxiety), स्क्रिझोफेनिया, अल्झायमया आणि पार्किन्सन यांसारख्या मानसिक आणि मज्जासंस्थेच्या आजारांची वैशिष्ट्ये अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत केली आहे. संशोधकांनी ऑप्टोजेनेटिक्सचा वैद्यकीय उपचार म्हणून वापर करण्याच्या दिशेने पहिली पावले टाकली आहेत. सध्या सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये, ते 'रेटिनायटिस पिगमेंटोसा' (retinitis pigmentosa - असा आजार जो डोळ्यातील रॉड्स आणि कोन्स नष्ट करतो) मुळे अंध झालेल्या लोकांची दृष्टी परत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

जेव्हा एका अंध व्यक्तीच्या डोळ्याच्या पडद्यावर (retina) चॅनेलरोडॉप्सिनसारखे प्रथिन प्रविष्ट केले, तेव्हा त्या व्यक्तीला काही प्रमाणात दृष्टी परत मिळाली. प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या विशेष चष्म्याचा वापर करून (ती प्रथिने ट्रिगर करण्यासाठी), ती व्यक्ती टेबलवरील वस्तू ओळखण्यास आणि पकडण्यास सक्षम झाली. ऑप्टोजेनेटिक्समुळे 'कॉक्लीअर इम्प्लांट्स' (cochlear implants - कानाचे यंत्र) सुधारेल अशीही आशा आहे. सध्या, हे इम्प्लांट्स विजेचा वापर करून श्रवण मज्जातंतूला (auditory nerve) उत्तेजित करतात. जर त्याऐवजी ऑप्टोजेनेटिक्सचा वापर करणे शक्य झाले, तर इम्प्लांट अधिक तंतोतंतपणे श्रवण मज्जातंतूला सक्रिय करू शकेल.

या महत्त्वपूर्ण शोधासाठी कार्ल डायसरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना ०२६ चे शरीरक्रियाशास्त्र - औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे, ज्या शोधांमुळे मज्जासंस्था विज्ञानात आमुलाग्र बदल घडवून आणणारे एक अत्यंत शक्तिशाली साधन तयार झाले. मानवजातीच्या सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक — मेंदू कसा काम करतो — हे उलगडण्याचे काम ऑप्टोजेनेटिक्स सातत्याने करत आहे.

कार्ल डायसरोथ (KARL DEISSEROTH): जन्म १९७१. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, अमेरिका येथून १९९८ मध्ये Ph.D. आणि २००० मध्ये M.D. हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूट आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे डी.एच. चेन प्रोफेसर, बायोइंजिनिअरिंग आणि सायकियाट्री अँड बिहेवियरल सायन्सेसचे प्रोफेसर.

पीटर हेगेमन (PETER HEGEMANN): जन्म १९५४. १९८४ मध्ये मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री, मार्टिन्सरीड, जर्मनी येथून Ph.D. हम्बोल्ड युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन, जर्मनी येथे न्यूरोसायन्सचे हर्टी सिनियर प्रोफेसर. पारितोषिक विजेते शोध मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री, मार्टिन्सरीड, जर्मनी येथे लावले गेले.

जॉर्ज नागेल (GEORG NAGEL): जन्म १९५३. १९८८ मध्ये फ्रँकफर्ट युनिव्हर्सिटी, जर्मनी येथून Ph.D. युनिव्हर्सिटी ऑफ वुर्झबर्ग, जर्मनी येथील डिपार्टमेंट फॉर मॉलिक्युलर प्लँट फिजियोलॉजी अँड बायोफिजिक्स - बॉटनी I मध्ये मॉलिक्युलर प्लँट फिजियोलॉजीचे प्रोफेसर. पारितोषिक विजेते शोध मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोफिजिक्स, फ्रँकफर्ट, जर्मनी येथे लावले गेले.

हा लेख लिहिताना नोबेल प्राईझ डॉट ओआरजी वेबसाईट वरील माहिती, त्याच धाग्यावर दिलेली या शोधाची पॉप्युलर सायन्स बॅकग्राऊंड, जी मुक्तस्त्रोतात उपलब्ध आहे त्याचा वापर केला आहे. न्युयॉर्क टाईम्स आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या बातम्यांचा ही वापर केला आहे.
चित्रे प्रताधिकारमुक्त आहेत. नोबेल वेबसाईट वरुन साभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग रीड.

ऑप्टोजेनेटिक्सच्या सहाय्याने cochlear implants च्या होणाऱ्या प्रगतीवर लक्ष असेल.