पंचवीस वर्षांपासून मला वाटत आलेली वाचनाची ओढ अकस्मात एके दिवशी संपुष्टात आली. एके दिवशी जाणवलं की आपलं रूपांतर 'हातात पुस्तक धरू न वाटणाऱ्या माणसामध्ये' झालं आहे. आपलं मन आता, 'आयुष्यात कधीच काही न वाचणाऱ्या माणसाचं मन', झालं आहे. पंचवीस वर्षं म्हणजे काही जोक नाही.! एवढ्या काळात वाचन हा काही केवळ फावल्या वेळातला टाईमपास राहिलेला नव्हता. तो जगण्याचा भाग होऊन बसला होता. रिलॅक्सेशनचा एक खात्रीशीर मार्ग होऊन गेलेला होता. हळूहळू माझी माझ्यापुरती ओळख बनून गेलेला होता.
त्यामुळे आपल्यात काहीतरी घोटाळा झालेला आहे, एवढं लक्षात आलं; परंतु नक्की कळेना की हे काय झालं? म्हणजे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये हा कसलातरी ग्लिच आलाय ? की पूर्ण सिस्टीमच अपडेट व्हायला लागलीय? की आपल्यात रातोरात एखादा रॅडीकल चेंज घडून आला आहे? हे कळेना.
म्हणून काही काळ ह्या भावनेसोबत जाऊ दिला. ही भावना आत नीट मुरू दिली. काही महिने ही भावना अधूनमधून पारखत राहिलो. ह्या मधल्या काळात मानवप्राणी म्हणून, मानवी समाजाचा एक सदस्य म्हणून वरवर फंक्शनिंग व्यवस्थित चालू होतं. म्हणजे खाणं-पिणं, हसणं-बोलणं, लोकांना भेटणं, जॉब वगैरे.
फक्त आता मी वाचक म्हणून नीट फंक्शन करू शकत नव्हतो. वाचनाचं मनात जे स्थान होतं, जे नातं होतं, ते पूर्णपणे बदलून गेलं होतं. कळायला लागल्यापासून पुस्तकांबद्दल जे वाटत आलेलं होतं, ते वाटायचं एकाएकी बंद झालं होतं. आणि त्याजागी जाणवत होता, एक प्रकारचा डिस-इंटरेस्ट. इनडिफरन्स. उदासीनता.
परिस्थितीत काही सुधारणा झालीय का हे पडताळण्यासाठी मी अधूनमधून अंदाज घेऊन बघायचो. भीत भीत एखादं पुस्तक उचलून घायचो. परंतु उत्सुकतेनं दोन-चार पानं चाळून झाली की 'ह्याला काय अर्थाय?', असं वाटायला लागायचं. आणि मग पुस्तक मिटून बाजूला ठेवायचो. कितीही महान लेखकाचं कितीही महान पुस्तक असलं तरी साधारण असंच घडलेलं दिसून आलं.
कारण पंचवीस वर्षं गोष्टी, माहिती, विचार, कल्पना, संवेदना, अनुभव, निरीक्षणं, नोंदी हे सगळं पुस्तकांमधून शोषून घेत होतो. त्याच्यानं साहित्य या माध्यमातील मानवी भावभावनांचे पॅटर्न्स बऱ्यापैकी ओळखीचे झाले होते. मानवाचा जो कलेक्टिव्ह भावनिक इतिहास आहे, त्याचा एक बेसिक डाटाबेस मेंदूत डाउनलोड झाला होता. हे समजा झालं असेल फिक्शनच्या बाबतीत.
म्हणून मग नॉन-फिक्शन ट्राय करून बघितलं तर तिथंही रिबाऊंड व्हायला लागलं. डावे-उजवे, खालचे-वरचे, इकडचे-तिकडचे, तमाम दुनियाभरचे विचारवंत आपापल्या टोळ्यांचं मनोरंजन करण्याच्या नादात मोठमोठी भाषा वापरतात. आणि शेवटी आपल्या सोयीने ठरलेले, हास्यास्पद निष्कर्ष काढून मोकळे होतात. हे लोक फक्त पुस्तकांमध्येच नैतिकतेचा, साधुत्वाचा आव आणतात. मुळात त्यांच्या आत तसलं काही नसतंच. अशी धारणा घट्ट झाली.
अर्थात, चूक माझीही होती. सुरुवातीला आणि नंतरही बराच काळ वाचन हा फक्त आवडीचा भाग होता. परंतु एका पॉईंटनंतर वाचनाची ओढ अनावर होऊ लागली होती, तेव्हाच सावध व्हायला पाहिजे होतं. पेस स्लो-डाऊन करायला पाहिजे होती. पण ते जमलं नाही. मी अति करत गेलो. वाचन नावाच्या कृतीतून सुख मिळतंय म्हणून मी अक्षरशः त्यातलं सगळं दूध पिळून टाकलं. सवयीचा गुलाम झाल्यासारखं वाचन चालायचं. काही त्यात चव अशी राहिली नव्हती शेवटी शेवटी. त्यामुळे त्या गोष्टीतल्या हावऱ्या भिकाऱ्याची झोळी फाटते, तशी माझीही फाटली. झोळी.
म्हणजे मेंदूचं रिवायरिंग घडून आलं. न्यूरोप्लॅस्टिसिटी की काय म्हणतात तसलं काहीतरी. मेंदूनं घोषणा केली की आता बास्स. इनफ इज इनफ.! याउपर काहीही आत घ्यायला नको. गच्च झालंय सगळं. ही सवय आता काही कामाची राहिलेली नाही. असं म्हणून मेंदूनं आपली पावशतक जुनी आयडेंटिटी सोडून दिली. शांतपणे. सहजपणे. मागे कसलाही गिला-शिकवा न ठेवता.
रामकृष्ण परमहंसांची एक कहाणी आहे. ओशोंनी रंगवून रंगवून सांगितली आहे. मला तेवढं जमणार नाही. त्यातलं सार तेवढं सांगतो.
तर त्यांना निर्विकल्प समाधी घडत नव्हती. तोतापुरी गोसावींनी समस्या ओळखली आणि इलाज सांगितला. तुम्हाला कालीच्या मूर्तीचा अडथळा होतोय. आज ध्यानात जेव्हा कालीची मूर्ती दिसायला लागेल तेव्हा तलवार उचला आणि घाव घाला. परमहंस म्हणाले, आयुष्यभर जिच्यावर प्रेम केलं तिच्यावर तलवार कशी चालवू ? तोतापुरी म्हणाले, कल्पनेतली काली, तशी कल्पनेतली तलवार..! परमहंसांनी सल्ला ऐकला, त्याप्रमाणे कृती केली. आणि त्यानंतर जेव्हा कधी निर्विकल्प समाधितून बाहेर आले तेव्हा उच्चारले, आखिरी बाधा गिर गई. ! द लास्ट बॅरिअर हॅज फॉलन..!
तसंच हे ही समजा. (याठिकाणी काही बेरकी वाचकांना वाटलं असेल की मी किती हुशारीनं स्वतःला परमहंसांशी नेऊन जोडलं आहे. परंतु यात काही हुशारी बिशारी नसून, असलाच तर सरळसरळ एक निर्लज्ज प्रयत्न होता, हे मी नम्रपणे संबंधितांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो.)
तर वाचन थांबल्याची फेज आता स्थिरावली आहे. एवढ्या सहजपणे हे होईल, जुन्या प्रेयस्यांप्रमाणे पुस्तकांची आठवणही उरणार नाही, असं कधी वाटलं नव्हतं. पण झालं हे खरं. ज्यापद्धतीचं लिखाण आवडत असे- वैचारिक, कादंबऱ्या, ललित, अस्तित्ववादी, मनोविश्लेषणात्मक, जादुई वास्तववादी ते आता इर्रिलेवंट होऊन गेलं आहे. मला जे पाहिजे ते या दिग्गज साहित्यिकांपैकी, विचारवंतांपैकी कुणी देऊ शकत नाही, कारण मुळात त्यांच्याकडेही ते नाही. ते जे ऑफर करताहेत, त्यानं आता माझी गरज भागण्यासारखी नाही.
तर आहे हे सगळं असं आहे. काय माहित, कदाचित मी पुढच्या टप्प्यावर पोहोचलो असेन. उत्क्रांत बित्क्रांत झालो असेन. शब्दांच्या पदराआड एस्केप शोधण्याच्या अवस्थेतून पार होऊन पूर्ण तृप्तीच्या अवस्थेप्रत पोचलो असेन. कुणास ठाऊक.
आवडलं. पटलं.
आवडलं. पटलं.
लिहिलंय सॉलिड.पटलंय असं
लिहिलंय सॉलिड.पटलंय असं म्हणता येत नाही.पण कदाचित मी धागालेखक लेव्हलची सखोल वाचक नसल्याने ही प्रचिती मला येणार नाही.
काही दिवसांनी रिकिंडल होईल पण
काही दिवसांनी रिकिंडल होईल पण तेही डोळस पणे. परंतु,
एक दोन आठवड्यांची सुट्टी काढून कुठेतरी समुद्राकाठी फक्त गिळायला आणि वाचायला जायचं. बाकी काही करायचं नाही.
अति केलं आणि मसणात गेलं असं कुठल्याच गोष्टीचं होऊ द्यायचं नाही.
सुंदर लेख. हे अनुभवतो आहे.
सुंदर लेख. हे अनुभवतो आहे. गटण्याला दिलेला सल्ला आठवला. पुढील दहा वर्षे वर्तमानपत्र देखील वाचू नकोस बाबा! असा काहीसा. नैराश्य,उदासीनता, मरगळ,कंटाळा,नीरसता,निष्क्रियता,मानसिक थकवा, ओव्हर थिंकिंग, सॅच्युरेशन, अशा काही अर्धवट भावनांचे डायनॅमिक मिश्रण
तुम्ही प्रकाशक आहात असं वाटत
तुम्ही प्रकाशक आहात असं वाटत राहतं. तुम्हाला खरंच कंटाळा आलाय कि वाचकांची आवड जाणून घेण्यासाठी हा वळसा काढलाय?
बाकी तुम्ही जे लिहीलंय ते माझंच आहे असं वाटतं. फक्त असं एकट्याचंच होतंय का हे कळत नव्हतं. इथे तुकड्या तुकड्यात लिहीलेलं सुद्धा आहे.
पन्नाशीत पोहोचलो. एव्हढं वय झालं असं वाटतं. (खान मंडळी अक्षय देवगण आहेत [देव = चिरतरूण] आहेत. त्यांची गोष्ट वेगळी.) बरंच वाचायचं राहिलं आहे, पण जबाबदार्या प्रचंड आहेत. वाचनासाठी हवी ती एकाग्रता हरवली आहे.
पूर्वी लोकांचं वाचन नाममात्र असायचं तेचां खूप वाचणार्यांना सन्मान मिळायचा. असं वाटतम कि बरेच जण त्यासाठीच वाचतात कि काय. वाचनाने विश्लेषण, आकलन वाढायला हवं. भाबडे साहित्य वाचून ते वाढत नाही. पीअर प्रेशर न्हणून वाचूच नये या मताला येऊन पोहोचलो आहे.
वेगळाच अनुभव घेताय तुम्ही.
वेगळाच अनुभव घेताय तुम्ही.
>>>>>मानवी भावभावनांचे पॅटर्न्स बऱ्यापैकी ओळखीचे झाले होते. मानवाचा जो कलेक्टिव्ह भावनिक इतिहास आहे, त्याचा एक बेसिक डाटाबेस मेंदूत डाउनलोड झाला होता. हे समजा झालं असेल फिक्शनच्या बाबतीत.
मला नाही वाटत असे होउ शकेल. व्यक्तीला, अगणित चॉइसेस आहेत, व्यक्ती कशी वागेल सांगता येत नाही.
हे पण बदलतं काही काळाने...
हे पण बदलतं काही काळाने...
छान लेख. फक्त ह्याचे कारण
छान लेख. फक्त ह्याचे कारण आंतरजालाचा वापर हे नाही ना हे तपासून बघा. माझ्या बाबतीत - आंतरजालाची चटक लागल्यामुळे वाचन फिके वाटू लागले आहे.
खूपच वेगळा विषय खूपच छान
खूपच वेगळा विषय खूपच छान मांडला आहे !
*बाकी तुम्ही जे लिहीलंय ते माझंच आहे असं वाटतं.* +१ !
*...... मरगळ,कंटाळा,नीरसता,निष्क्रियता,मानसिक थकवा, ओव्हर थिंकिंग, सॅच्युरेशन, अशा काही अर्धवट भावनांचे डायनॅमिक मिश्रण..* - यातील ' सॅच्युरेशन ' अधिक संभवतो. अर्थात, प्रत्येक द्रवाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचाही हा सॅच्युरेशन पॉईंट वेगवेगळा असावा: काहींचा पंचविशीतच तर काहींचा साठीच्याही नंतर येत असेल. कुणी याचं शास्त्रीय कारण इथे दिलं , तर उत्तमच !
*जुन्या प्रेयस्यांप्रमाणे पुस्तकांची आठवणही उरणार नाही, असं कधी वाटलं नव्हतं. * इथे मात्र माझी स्थिती जरा वेगळी आहे ( प्रेयस्यांबद्दल नव्हे, पुस्तकांबद्दल ! ). मला वाचलेली पुस्तकं आठवतात व त्या आठवणी सुखदही वाटतात .
मनाला सहज भिडलेल्या लिखाणाबद्दल धन्यवाद !
फक्त ह्याचे कारण आंतरजालाचा
फक्त ह्याचे कारण आंतरजालाचा वापर हे नाही ना हे तपासून बघा >>
आंजा मुळे कितीतरी नाहिती मेंदूवर येऊन आदळते. मेंदूची क्षमता किती आहे माहिती नाही. पण तो थकत असेल तर वाचन, चित्रपट, नाटक, मालिका बघण्याची अनिच्छा होणे हे नैसर्गिक असेल असं वाटतं.
मला starting trouble आहे, जो
मला starting trouble आहे, जो आधी नव्हता, पहिली दहा पाने झाली की मग फडशा पडतो.... आधी एवढा अधीर नव्हतो
ह्या अनुभवातून गेले आहे मी. I
ह्या अनुभवातून गेले आहे मी. I tried literally everything to bring back the old me, nothing worked. So accepted this new me ! मला काहीही "ओरिजनल" सापडेना गेलं हळूहळू, आणि रस संपला.
रामकृष्ण परमहंसांच्याही स्टेजेस प्रमाणे एकेक गुरू दक्षिणेश्वरीला येऊन धडकायचे, नाही का ?
मनातलं बोलण्यासाठी केशवचंद्र सारखे विद्वान (आई, केशव गेला आता मी कुणाशी बोलू ?) , आधी त्या यशोदेसारख्या खा खा म्हणणाऱ्या संत बाई ( नाव विसरले- मातृत्व वात्सल्य भाव) , मग जटाधारी आणि रामलल्ला ( द्वैतभाव- मूर्ती), मग तोतापुरी आणि अद्वैत साधना. नंतर अंतरंग शिष्य......
स्टेज असतात सगळ्याच, आपल्याच असतात सगळ्याच.
>>>>>>रामकृष्ण परमहंसांच्याही
>>>>>>रामकृष्ण परमहंसांच्याही स्टेजेस
ओह या स्टेजेस माहीत नव्हत्या. रोचक आहेत.
अस्मिता, माझा कथासंग्रह
अस्मिता, माझा कथासंग्रह पुढच्या वर्षी येतोय. तो मात्र वाचशील ना? संप्रति कडून काही आशा उरलेली नाही आता. नेमकं आमची पुस्तकं यायला आणि यांनी वाचन बंद करायला एकच गाठ पडली. दुर्दैव (संप्रतिचं ) दुसरं काय!!
हो, नक्की वाचणार.
हो, नक्की वाचणार. माबोकरांसाठी काहीही.
उगाच म्हणत नाहीये, आवर्जून कळवा आल्यावर.