घेतोस श्वास सध्या, ती फक्त भीक आहे

Submitted by बेफ़िकीर on 20 August, 2026 - 04:07

घेतोस श्वास सध्या, ती फक्त भीक आहे
लक्षात ठेव मित्रा, मृत्यू नजीक आहे

देहात कोंडलेला, आत्मा स्वतःस सांगे
भलत्यासवेच झाली ही सोयरीक आहे

रडती मनामधे अन हसती जगापुढे ह्या
त्या सर्व माणसांची तब्येत ठीक आहे

आम्ही तुम्हास बघणे, ठरते इथे चुकीचे
तुम्ही वळून बघणे, ठरते सटीक आहे

होत्या किती अपेक्षा दुनियेकडून माझ्या
तीही पडीक आहे, मीही पडीक आहे

कित्येक जन्म अजुनी असतील खास चटके
तू भोगतोस सध्या, ती कोवळीक आहे

जो 'बेफिकीर' नसतो, तो हे विधान करतो
"माझेच शेत आहे, माझेच पीक आहे"
=====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो 'बेफिकीर' नसतो, तो हे विधान करतो
"माझेच शेत आहे, माझेच पीक आहे"

हा फारच आवडला, बाकी सर्वच शेर छान आहेत

सुंदर...

आवडली. गंभीर चिंतन आहे.
काही शेरांतून या धरातलावरची सर्व कामे आटोपली आहेत आणि आता पलिकडची ओढ लागली आहे असे जाणवते.

रडती मनामधे अन हसती जगापुढे ह्या
त्या सर्व माणसांची तब्येत ठीक आहे >> छान आहे हा शेर. पण तब्येत ऐवजी सौंदर्य वाढवणारा शब्द आवडला असता. अर्थात ही सूचना फक्त.

जबरदस्त गझल!

श्वास, वळून बघणे, चटके
हे शेर अधिक आवडले.

मस्त गझल.

('सटीक'चा मराठीतला अर्थ हिंदीपेक्षा निराळा आहे माझ्या माहितीनुसार, इथे हिंदीतला अर्थ अभिप्रेत असावा असं वाटतंय.)

>>> सटीक'चा मराठीतला अर्थ हिंदीपेक्षा निराळा आहे माझ्या माहितीनुसार, इथे हिंदीतला अर्थ अभिप्रेत असावा असं वाटतंय.

मला माहीतच नव्हता अर्थ. वैभवच्या भाषेत यमकहरामगिरी करताना असे आढळले की त्याचा अर्थ 'अचूक' असा आहे.

मग काय, वाढवला एक शेर! Proud

रडती मनामधे अन हसती जगापुढे ह्या
त्या सर्व माणसांची तब्येत ठीक आहे

संपूर्ण गझल आवडलीच पण वरचा शेर विशेष आवडला. धन्यवाद.