कम टू माय पार्लर.

Submitted by केशवकूल on 18 August, 2026 - 21:38

मी नेहमीप्रमाणे माझ्या नेहमीच्या हॉटेल मध्ये गेलो. संध्याकाळचे सहा वाजले असावेत. हॉटेलात मोजकीच गर्दी होती. समोरच्या टेबलावर तो बसला होता.
"शुक शुक, इकडे."
कुणाला बोलावत होता हा. मला?
"हो हो तुम्हीच. जरा इकडे याल का?"
त्याच्या स्वरात अशी काही अजिजी होती की मला जावेच लागले.
मी त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसलो.
"मी तुम्हाला ओळखले नाही. आपण पूर्वी कधी भेटलो होतो ?"
"पूर्वी भेटायला पाहिजेच असा विषय नाहीये हा. सांगतो. मी मसाला डोसा खाल्ला आणि चहाची ऑर्डर केली आहे. पण आता माझ्या लक्षात आले आहे की माझे पैशाचे पाकीट मी घरीच विसरलो आहे. तर माझे बिल तुम्ही चुकते कराल काय? तसा मी विसरभोळा नाहीये. पण हे लोक माझ्या मेमरीशी खेळ करतात. एकदा तर चोवीस तास मी विदाउट मेमरी भटकत होतो. मी कोण? कुठून आलो? कुठे जायचे? कशाचा कशाला पत्ता नाही. मी पण हरतो काय? माझ्याकडे पण एक डुप्लीकेट सेट आहे. अशावेळी तो कामाला येतो."
मी अनेक प्यॅरानोईड पेशंट पाहिले आहेत. पण हा हिरो म्हणजे कमाल होता.
खिशातून एक कागद काढून त्याने मला दाखवला.
"ह्यावर मी माझे नाव, माझा पत्ता, आजची तारीख आणि वार लिहून मी खिशात ठेवतो. "
मी वेटरला बोलावले आणि माझ्यासाठी चहा ऑर्डर केला.
"थँक्स इन अॅडवान्स. मी तसे माझ्याबद्दल अनोळखी माणसाशी बोलत नाही. पण तुम्ही त्यांच्या पैकी दिसत नाही,
तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणाने मला विचारलेत की आपली पूर्वी कधी भेट झाली होती का तेव्हाच मी ओळखल की तुम्ही त्यांच्यापैकी नाही आहात. मला तसा सिग्नल पण आला. मी गोविंद, मी गावात रहातो, फिरत फिरत इकडे आलो होतो चहा प्यायला."
माझ्या चांगुलपणाचा सिग्नल पकडणारा हा अजून एक माणूस.
"इतक्या लांब? केवळ चहा प्यायला म्हणून? तिकडेच घ्यायचा ना."
तो विचारात पडला असावा. बोलावे की नाही असे काही विचार त्याच्या डोक्यात आले असावे.
"हो, मी घराजवळ खायचं प्यायचं शक्यतो टाळतो. का वगैरे विचारू नका, विचारलेत तरी मी सांगणार नाही,"
बाबा रे तू कुठे चहा प्यायचा हा तुझा प्रश्न आहे. मला काय त्याचे. मी मनातल्या मनात म्हटले.
माझा चहा संपला होता. वेटरने बिल आणले. ऐशी रुपयात कथा लिहायला मला एक पात्र मिळाले होते.
नॉट बॅड. पुन्हा एकदा त्याने तोंडभरभरून आभार मानले आणि तो चालता झाला. तो गेला खरा पण मागे एक आठवण सोडून गेला.
हा माणूस वरून तरी शहाणा वाटत होता. हुशार दिसत होता. पण वेडेपणाची एक सुक्ष्म झलक होती. जाऊ द्या ज्याचे त्याचे नशीब. पण मला थोडे वाईट वाटले.
नंतर तो पुन्हा पुन्हा भेटत राहिला. कधी देवळाच्या बाजूला, कधी बागेत, पण बहुतांशी रस्त्याच्या बाजूच्या कट्ट्यावर. कधी चौकातल्या सिग्नलपाशी.
कुठेही भेटला तरी माझ्याकडून वडापाव आणि चहा मागायचा. त्याच्या बदल्यात मला काहीतरी नवीन ऐकवायचा.
"भाऊ, तुला ते दिसत नाहीत?"
"कोण?"
"कोण म्हणजे ते सरडे. सहा फूट उंचीचे. हिरव्या पिवळ्या रंगाचे, जाड शेपूट. आपल्या सारखेच मागल्या दोन पावलांवर उभे रहाणारे. माझ्या मागावर आहेत. मला शोधताहेत."
माझे डोके गरगरायला लागले.
"एक विचारू? ते तुमच्या मागे? कशासाठी?"
त्याने माझा हात धरून जरा बाजूला ओढले. "त्याना वाटतंय की त्यांचे सिक्रेट मला माहित झाले आहे. मी तुम्हाला सांगितले होते ना, की त्यांनी माझी मेमरी खेचून त्यांच्या लॅब मध्ये तपासणी केली. काहीही मिळाले नाही. कसे मिळणार. हा, मी माझे एक सिक्रेट सांगतो. तुम्हाला म्हणून. ते लोक समोर आले की माझे डोके ठणकायला लागते, पंधरा वीस फुटाच्या परिघात त्यांच्यापैकी कोणी असला की माझे डोके दुखायला लागते. त्याने जर अजून जवळीक केली तर डोक्यात कुणीतरी अक्षराशः घणाचे घाव घाव घालत आहेत अश्या वेदना होतात. त्यांना भीती वाटतेय की मी सरकारला ही बातमी सांगेन. भाऊ साहेब, तुम्हाला सांगतो, मी कुठेही वर खबर दिली तरी काही होणार नाही, सगळी यंत्रणा ह्यांनी ताब्यात घेतली आहे. उलट मलाच यडा ठरवतील आणि वेड्यांच्या इस्पितळात डांबतील. ह्यांचाच डॉक्टर, ह्यांचाच जज ह्यांचाच जेलर. सॉरी भाऊ, माफ करा मला. माझ्यामुळे तुम्ही पण धोक्यात याल. माझीच चूक. क्विक, बाजूला जा माझ्यापासून दूर जा." तो माझ्याशी बोलत होता खरा, पण त्याची नजर चोहीकडे भिरभिरत होती.
त्याचे मन मोडायचे नाही म्हणून मी जरा लांब जाऊन उभा राहिलो.
थोड्या वेळाने त्याने मला जवळ बोलावले. "वाचलो आपण, त्या काळ्या गाडीत होते ते."
कठीण आहे ह्या माणसाचे.
"गोविंद, माफ करा पण हे असे म्हणजे कुणीतरी आपल्या मागे लागले आहे, आपल्या प्रत्येक हालचालीवर कुणीतरी नजर ठेऊन आहे हे तुम्हाला कसे समजले? नाही म्हणजे, मी किंवा कुणीही म्हणू शकेल की, हे तुमच्या मनाचे खेळ आहेत."
"सांगतो, सविस्तर सांगतो. पण आधी मला एक चहा पाजा. माझ्याकडे पैसे नाहीयेत, "
आम्ही दोघे एका डबडा हॉटेल मध्ये जाऊन बसलो.
त्याने सुरवात केली.
"मी जे ब्राउजर वापरतो त्याच्या वरच्या बाजूला प्रथम त्यांची सिग्नेचर दिसली. "पुणे २६ डिग्रीज." म्हणजे त्याला माहित आहे की मी पुण्यात रहातो. वर तो काय विचारतो की तुमचे लोकेशन बघायची परवानगी पाहिजे. मी एकदा हॉटेलात गेलो नि कोथास कॉफी मागवली. हे त्यांनी ऐकले असणार लगेच माझ्यावर कॉफीच्या जाहिरातींचा मारा सुरु झाला. मला सायन्स फिक्शन वाचायला आवडतात. मी पुस्तके चाळत होतो, बाजूला एक तरुणी पण पुस्तके बघत होती, दुसऱ्या दिवशी माझ्यावर साय फाय चा मारा सुरु झाला. आता मला समजतंय की ती तरुणी त्यांची स्पाय असणार. मग मी ब्राउजर बदलला. टॉर माहिती आहे? ते ब्राउजर वापरायला सुरवात केली.
मग त्रास थोडा कमी झाला. भाऊ, एक शब्द बोलू नका. मला माहित आहे तुम्ही मला काय सांगणार आहात ते. "
"ह्याच्या पुढचे ऐका. आता मला धमक्या यायला सुरवात झाली. म्हणजे ट्वीटर फेसबुक वर लोकाना येतात तश्या नाहीत. मी ह्या सगळ्यातून केव्हाच बाहेर पडलो आहे. मी पाण्याचा नळ उघडला की त्यातून पाण्या ऐवजी धमक्या ऐकू यायला लागल्या. नंतर मला फोन यायला लागले. यायला लागले म्हणजे फोनची घंटी वाजायची पण कुणीच बोलत नसे. सुरवातीला दुर्लक्ष केले पण नंतर नंतर मीच फोनची वाट पहायला लागलो. वाट पाहायला लागलो की घंटी वाजत नसे. कामात गुंगलो की नेमकी घंटी वाजायची. मग मी फोनकडे दुर्लक्ष करायला सुरवात केली. म्हणालो वाजू दे. एकदा अशीच चार पाच वेळा फोनची रिंग वाजत राहिली. वैतागून घेतला तर पक्याचा फोन. इतक्या शिव्या खाल्ल्या. अखेर मनाचा हिय्या करून एकदा मीच फोनमध्ये ओरडलो. "#$@$, हिंमत असेल तर ये असा समोर." समोरून आवाज आला. "ओके." तुम्हाला सांगतो धिस वाज वर्स्ट काइंड ऑफ टॉर्चर. सिम्पली मॅडनिंग."
हे म्हणजे फारच आर्बिट मध्ये जायला लागले. त्याला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगण्याचीही मला लाज वाटू लागली.
"पुढे काय झाले."
मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही. खरं तर मी त्याला उत्तेजन द्यायला पाहिजे नको होतं पण...
"फोनची घंटी बंद झाली तर दारावरची घंटी सुरु झाली. दारावरची घंटी कर्कश्श वाजायला लागली तर मी शिव्या देत, धडपडत जाऊन दरवाजा उघडला, बाहेर चिटपाखरू सुद्धा नव्हते. पुन्हा वाजली. पुन्हा बघितले, पुन्हा शुकशुकाट.मग मी काय केलं, तर दरवाज्यापाशी उभा राहिलो, विचार केला, घंटी वाजली रे वाजली की दरवाजा उघडून त्याला पकडायचं. पण घंटी वाजली नाही. त्याना समजले असणार, की मी तयारीत उभा आहे. रात्रभर मी हा असा उभा होतो, वाट बघत. त्यांना खूप उत्साह असेल पण मला हा गेम खेळण्यात काही रस नव्हता. कपाटातून प्लायर आणली आणि घंटेच्या तारा कापून टाकल्या."
मला गोविंदची दया येऊ लागली, बिच्चारा.
"गोविंदराव, तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. हे सगळे मनाचे खेळ आहेत. अशा वेळी मनोनिग्रह महत्वाचा. तुम्हाला सांगतो, तुम्ही योग करत जा. भीती वाटायला लागली तर रामरक्षा नाहीतर भीमरुपी म्हणत जा. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, "भूत प्रेत समंधादि रोगव्याधि समस्तहि. नासती तुटती चिंता आनंदें भीमदर्शनें," देवाचं नाव घ्या आणि या दुःस्वप्नातून बाहेर पडा. चला, उशीर झाला आहे. आता मी जातो आणि तुम्ही पण घराकडे परता."
"भाऊ, आजच्या दिवस तुम्ही माझ्या बरोबर घरी चला, माझ्याच घरी झोपा. मला खूप भीती वाटताहे. मी उगाचच त्याना आव्हान दिले. माझी चूक झाली. मला सोबत करा." त्याच्या स्वरात निराशा ओतप्रत भरली होती. पण माझाही नाईलाज होता. त्याच्या घरी जाऊन त्याच्या वेडाचारात मला सहभागी व्हायचे नव्हते. ज्याचा त्याचा त्याचा क्रूस ज्याने त्यानेच वहायचा असतो.
त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा गाठ पडली. बर्वे रोडच्या कट्ट्यावर बसला होता. त्याची पार रया गेली होती. नेहमी शर्ट पँट मध्ये वावरणारा गोविंद आज चुरगळलेल्या झब्बा पायजम्यामध्ये होता. केस विस्कटलेले, डोळे लालसर, नजर शून्यात. मीच त्याला हटकले.
"गोविंदराव, काय हा अवतार करून ठेवला आहेस?"
तो एकदम भानावर आला. " भाऊ, मी तुमचीच वाट बघत होतो." त्याने माझे दोनी हात आपल्या हातात घेतले आणि तो ओक्साबोक्सी रडू लागला.
"शांत व्हा गोविंदराव, बापे लोक असे रडत नसतात. किती अशुभ वाटते. आधी रडू आवरा आणि मला काय झाले आहे ते सविस्तर सांगा पाहू."
"काय सांगू भाऊ, मी गेले तीन रात्र झोपलो नाहीये. घरी जायची भीती वाटते आहे. त्यांनी घराचा कब्जा घेतला आहे.
मी परवा म्हणत होतो ना मला सोबत म्हणून माझ्याबरोबर घरी चला. तुम्ही नाही आलात. त्याच दिवशी त्यांचा माणूस माझ्या बेडरुमच्या खिडकी बाहेर उभा होता. माझ्याकडे एकटक बघत होता. भीतीने माझा ताबा घेतला. क्षणार्धात माझा शक्तिपात झाला. कुठूनतरी किंकाळीचा आवाज आला. माझे शेजारी घावत आले. काय झाले? का ओरडलात असे विचारू लागले. कोण ओरडले हे समजायला मला पाच मिनिटे लागली, खिडकीतला माणूस नाहीसा झाला होता, शेजाऱ्यांनी माझी समजूत घातली, स्वप्न पडले असेल, होत कधी असे. घाबरायचे काम नाही. आम्ही आहोत णा. काळजी करू नका. मी घरातले सगळे दिवे लावले, अगदी बाथ रूम मधले संडासातले देखील.
घराचा दरवाजा सताड उघडा ठेवला. खिडकीवर नजर ठेऊन गादीवर पडलो. पण तो पुन्हा आला नाही. झोप येणे शक्य नव्हते. अखेर माझी हार मानली आणि घराबाहेर पडलो. तेव्हापासून भटकतो आहे. रात्रंदिवस. सगळे शहर पालथे घातले. आयुष्यात कधी फिरलो नसेन अश्या वस्तीतून भटकंती केली. तुमची वाट पहात इथे बसलो आहे. भाऊ मला एक सांग, मी जागा आहे की स्वप्नात जगात आहे? मृत आहे की जिवंत आहे? शेक्क्सपिअर म्हणतो की
"To sleep: perchance to dream: ay, there’s the rub;
For in that sleep of death what dreams may come."
"गोविंदराव . तुम्ही चूप बसा पाहू. एकदम चूप. हाताची घडी तोंडावर बोट. जग किती सुंदर आहे ते पहा. कल्पना करा की तुम्ही फुलांनी डवरलेल्या बगीच्यातून सैर करत आहात. फुलांचे रंग आणि सुगंध आठवा. आता मी आहे ना तुमच्या बरोबर. तुमच्या केसालाही कुणी हात लाऊ शकणार नाही. "
"भाऊ मला एक चहा पाजा. तेव्हढीच एक माझ्या जिवंतपणाची खूण आहे."
समोरच्या फूटपाथवर चहाचा एक ठेला होता. मी रस्ता ओलांडून पलीकडे गेलो. पॉलिथीनच्या थैलीतून चहाचे पार्सल घेतले दोन प्लास्टिकचे कप घेतले.
मी चहाचं पार्सल घेऊन परतत होतो तेव्हढ्यात बायकोचा फोन आला. तिथेच थांबून मी फोन घेतला. येताना काहीतरी सोप्पी भाजी घेऊन या हे सांगण्यासाठी फोन होता. "सोपी म्हणजे बटाटे आणू का, की मटकी मोडाची चालेल?"
"हे पण मी सांगायला पाहिजे?" " म्हणजे मी बटाटे आणले तर ..." तिने फोन केव्हाच कट केला होता. मी बंद फोनबरोबर बोलत होतो.
मी गोविंदरावापाशी पोहोचलो तर त्याच्या डोळ्यातून जणू ठिणग्या पडत होत्या.
"कुणाशी बोलत होतास?" त्याचा आवाज चढला होता.
"अरे बायकोशी बोलत होतो. रात्रीसाठी सोप्पी भाजी घेऊन या असे म्हणत होती."
"कुलकर्णी, तू काय मला मूर्ख समजतोस काय. तू रस्ता ओलांडलास आणि मला तुझे खरे रूप दिसले. ते काटेरी शेपूट. खवल्या खवल्यांचे शरीर. तुझे स्नाउट. म्हणे बायकोने फोन केला होता. कुठून दिल्ली ऑफिसकडून का मुंबईतून फोन होता. तू पण त्यांचा माणूस निघालास. अरेरे केव्हढा हा विश्वासघात. कुणावरही विश्वास ठेऊ नये हेच खरे, केव्हढा प्रामाणिकपणाचा आव आणला होतास. मी काय समजलो आणि तू काय निघालास. तुम्हा लोकांपेक्षा कुत्री मांजरे विश्वासू असतात. ती असा दारुण अपेक्षाभंग तरी करत नाहीत. "
माझा फोन पुन्हा वाजला. पुन्हा बायको.
"हो हो. अॅज यू विश. तसच करतो..."
माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असलेल्या गोविंदरावने एक गगन भेदी आरोळी ठोकली. " तुम्ही लोक माझा एनकाउंटर करण्याचा बेत करताय का? अरे पण का? तेव्हढे तरी कळूद्या. मग सुखाने मीच माझा एनकाउंटर करेन."
एक मुसंडी मारून गोविंदरावने पाळायला सुरवात केली. अगदी जीव खाऊन. It was sleep running. मी त्याला गाठायचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. त्याच्यात जणू चित्त्याचा आत्मा शिरला असावा. अख्खा बर्वे रोड अवाक झाला. सगळी ट्राफिक क्षणभारासाठी थबकली.
मी मनातल्या मनात म्हणालो जाऊ दे. उद्या उन्माद उतरला की नॉर्मलवर येईल. पण ह्या चहाचे काय करू?"
मी घराकडे परतलो. वाटेत नदीच्या लोखंडी पुलावर गर्दी जमली होती.
माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
कुणाला काही विचारण्यात अर्थ नव्हता. काय समजायचे ते मी समजून चुकलो. कधी कधी "Not to be is the Answer! मी पुलाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन चहाचं पार्सल पाण्यात सोडलं. ज्याचं त्याला पोचतं झालं की बस.
हात झटकले आणि खिशातून मोबाईल काढला आणि बॉसला फोन लावला.
"गुड न्यूज बॉस. गोविंदराव स्वतःच्या कर्मानेच मेला. रात्री त्याने मला सोबतीला बोलावले होते. तेव्हा त्याला खतम करायचा माझा बेत होता. पण मला काही करावं लागलं नाही, लोखंडी पुलावरून खाली उडी मारून त्याने स्वतः जीव दिला."
zzzzzzzzzzzzzzzz

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवान कथा. पण, कथेच्या शीर्षकाचा कथेशी संबंध कळला नाही. तसेच गोविंद ला का मारले? कोण त्याच्या वाईटावर होते?

जबरदस्त वेगवान कथा. शेवटपर्यन्त उत्सुकता टिकून ठेवली आहे.
कम टू माय पार्लर सेड द स्पायडर टू द फ्लाय ही कोळी माशीला भुलवून जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करत असतो त्याबद्दल कविता आहे. त्यामुळे शीर्षक एकदम समर्पक आहे

माबो वाचक
कथा वाचल्याबद्दल आभार.
"Will you walk into my parlour?" said a spider to a fly;
"The Spider and the Fly" is a poem by Mary Howitt (1799–1888), published in 1828.
ही त्या कवितेतील पहिली लाईन आहे. The story tells of a cunning spider who entraps a fly into its web through the use of seduction and manipulation.
किंवा तुम्ही कीटक खाणाऱ्या विनस फ्लाय ट्रॅप, पिचर प्लांट ह्या वनस्पतींची नावे ऐकली असणारच.
किंवा तुम्ही
Mikey And Nicky (1976) हा सिनेमा पहा.
https://www.youtube.com/watch?v=ztGLuzbCGzA
मित्र आपल्या मित्राला कसे मृत्युच्या सापळ्यात अडकवतात त्याची गोष्ट आहे.
aashu29! Happy
anjut
व्वा! Happy
आभार.
तुमचा प्रतिसाद आणि माझे क्लारीफिकेषन चुकामुक झाली.
तुम्ही ही कविता कुठे वाचली?

काही कळते आणि काही नाही.. तुमच्या बरेच कथाबाबत बरेच जणांचे असेच होत असावे Happy
पण तुमची लिखाणाची वेगवान शैली आवडतेच.

साधी सोपी गोष्ट, एक छिन्‍नमनस्कता' किंवा 'मनोभ्रंश' झालेला रुग्ण (स्किझोफ्रेनियाचा), त्याला समजून घेणारा, मदत करणारा दुसरा...
चांगली भावनिक गोष्ट चालली होती.
पण शेवटचा परिच्छेद वाचला आणि ही केकु ह्यांची कथा आहे ह्याची तीव्र जाणीव होते.

आमिष, विश्वास आणि सापळा ही मध्यवर्ती कल्पना, खूपच सुंदर संदर्भांची सांगड घातली आहे. केकू, तुमची कथा आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.

सगळ्यांचे आभार.
जे जे काही आपण बघतो ते सगळेच आपल्या जगातले असते असे नाही. तेव्हा सावध रहा,