हॉटेलमधला मोफत नाश्ता ही अशी जागा आहे जिथे लोक भुकेमुळे नाही, तर खोलीचं भाडं वसूल करण्याच्या इच्छेपोटी खातात. घरी टोस्टचे दोन तुकडे पुरेसे असतात, पण हॉटेलमध्ये, तुम्ही प्लेट उचलल्याबरोबर तुमच्यातला बकासूर जागा होतो.
सर्वात आधी, आपण फळं घेतो कारण आपल्याला निरोगी दिसायचं असतं. पण लगेच पुढचे काऊंटर खुणावत असतात मग त्याच्या शेजारी, आपण आलू पराठा, इडली, पोहे, सॉसेज आणि एक छोटा क्रोइसेंट ठेवतो, जो आपल्या ओळखीचा नसतो, पण तो मोफत असतो, म्हणून त्याचा आदर करायलाच हवा म्हणून आपण घेतो.
ही प्लेट संपताच, आपण दुसरी उचलतो आणि स्वतःला सांगतो, " आता फक्त ऑम्लेट." काउंटरवरचा कर्मचारी विचारतो, "व्हेज की चीज?" "कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, मशरूम." ऑम्लेट बनवून घेत नाही आहोत, तर जणू काही जीवनसाथी निवडत असल्यासारखी माहिती देत जातो.
मग तुम्ही टोस्टरमध्ये ब्रेड टाकता, तो खालून दिसेनासा होतो पण बाहेर येत नाही. तुम्ही मशीनसमोर वाकता आणि आत डोकावता, जणू एखादं लहान मूल बोअरवेलमध्ये पडलं आहे. मग मागून दुसऱ्या कोणाची तरी करपलेली भाकरी बाहेर येते, आणि ती व्यक्ती तुम्ही तिच्या भाकरीचं काय केलंत या विचारात तुमच्याकडे संशयाने पाहते.
कॉफी मशीनला सहा बटणं आहेत. एस्प्रेसो दाबल्यावर दोन चमचे कॉफी कपात पडते. कॅपुचिनो दाबल्यावर मशीन कण्हते, मग वाफा निघतात, आणि मग इतका फेस येतो की कॉफी कुठेतरी खालीच पडून राहते.
तुम्ही टेबलापाशी परत येता आणि समोरचा डोळे टवकारत जणू विचारतो की इतकं सगळं कोण खाणार आहे. तुम्ही डोळ्याने सुचवता मी अगदी थोडंच खाल्लं आहे, पण टेबल पाहून असं वाटतं की जणू संयुक्त राष्ट्रांनी दुष्काळात मदत साहित्य पाठवलं आहे. वेटर प्लेट उचलायला येतो, आणि तुम्ही, अर्धवट खाल्लेली इडली वाचवत म्हणता, "हे अजून चालूच आहे, हे अन्न आहे ज्याचा एखादा जुना हप्ता जो तुम्ही सोडू शकत नाही?"
शेवटी, पोटाने हार मानलेली असते पण आपली नजर गोड पदार्थांवर पडते, आपण एक मफिन न डोनट- जे तुम्ही बाप जन्मात विकत घेत नाही- भारतात तरी- नॅपकिनमध्ये गुंडाळून नंतर खाण्यासाठी ठेवतो, मग खोलीत परत येतो किंवा सहलीच्या बस मध्ये बसतो/वॉश रूमच्या पुढच्या स्टॉपची वाट पाहतो किंवा खोलीत असल्यास दोन तास अंथरुणावर सरळ झोपू शकत नाही आणि अभिमानाने सांगतो की आज दुपारच्या जेवणाची गरज नाही, हीच आहे हॉटेलच्या सकाळच्या नाश्त्याची खरी बचत, एका जेवणाचे पैसे वाचतात पण पचनसंस्थेला दोन दिवस अतिरिक्त काम करावे लागते!
पण दुसर्या दिवशी हेच रिपीट होतं.....
खरे आहे.
मॉटेलमध्ये, सकाळी सकाळी सगळे टवटवित आणि फार क्षुधात्रस्त दिसतात. मुलांचा तर इतका धिंगाणा चालू असतो. किती अन्न वाया घालवतात. योगर्टचे कप्स कधीही न पाहील्यासारखे प्रत्येकजण एक एक- दोन - दोन उचलत असतो. योगर्टच पहील्यांदा संपते.
हाहा छान निरीक्षण आणि उपमा
हाहा छान निरीक्षण आणि उपमा
छान ! वसूली करायची वृत्ती !
छान ! पूर्ण वसूली करायची वृत्ती !!

..परत येताना अजिबात माझ्या माहेरी डोकवायचं देखील नाही ! नेहमी तिथे जायला तुम्हाला कॉम्प्लिमेन्टरी ब्रेकफास्ट वाटला की काय तिथला !!!
भाऊ
भाऊ

आज हे Whatsapp मध्ये फॉरवर्ड
आज हे Whatsapp मध्ये फॉरवर्ड म्हणून आले, अगदी थोडे बदल करून. तुमचे नाव सुद्धा दिले नव्हते!
अश्याच प्रकारचा इंग्लिश लेख
अश्याच प्रकारचा इंग्लिश लेख फिटर नावाच्या फेसबुक ग्रुपवर पण आला आहे.तुमच्या लिखाणाचे इंग्लिश ai भाषांतर असू शकेल.
https://www.facebook.com/share/p/1BnuWkFjLv/
बुफे अनलिमिटेड प्रकारात
बुफे अनलिमिटेड प्रकारात हॉटेलने दीड हजार रुपये अगोदरच घेतलेले असतात. यावर फार विचार करू नये किंवा अशा हॉटेलात जाऊच नये. तर काही हॉटेलात फारच सुमार नाश्ता ठेवलेला असतो.( दगडी इडल्या, खोटा गुजरातचा आमरस, रोडगे पुऱ्या वगैरे)
मला हा प्रकार तद्दन गिल्ट
मला हा प्रकार तद्दन गिल्ट ट्रिपिंग वाटतो. आपण ग्राहक आहोत, आपण पैसे दिले आहेत, आपण उपभोग घेतोय. हॉस्पिटॅलिटी उद्योगात कोणी तोंडावर जज करणार नाही तुम्हाला.
कॉम्प्लीमेंटरी ब्रेकफास्ट हा खासकरून पर्यटन क्षेत्री जाता जीव वाचवणारा ठरू शकतो हा स्वानुभव आहे. कित्येक लोक सकाळी साईट सीइंगला निघण्याच्या अगोदर भरपेट नाश्ता करून निघतात आणि दुपारचे जेवण स्किप करतात. आम्ही स्वतः फिरायला गेलो की आमच्या पोरांच्या अंगात येते मस्ती, ती काही हॉटेलचे टाइमटेबल पाहून खाऊन घेत नसतात, त्यामुळे कुकीज, एखाद ड्राय सँडविच, किंवा फळे, ब्रेड, चीज स्लाईस आम्ही माफक प्रमाणात (इमानदारीत पोरे खातील इतके) बांधून पण घेतो राजरोसपणे कॅटरिंग स्टाफला सांगून.
ताज मानसिंह, दिल्ली किंवा लीला हॉटेल , ओबेरॉय सारख्या ठिकाणी व्यावसायिक कामानिमित्त फिरताना मी स्वतः बिझनेस आणि इंडस्ट्री मधल्या हुज हू ला सुद्धा असेच करताना (व्यस्त दिवस, मीटिंग शेड्युल्स इत्यादींत उडी घेण्याच्या अगोदर कॉम्प्लीमेंटरी ब्रेकफास्ट वर अतोनात आडवा हात मारताना) सुद्धा बघितले आहे. तिथे हजर कोणालाच त्यात काही गैर वाटले नव्हते, मला सुद्धा वाटले नाही.
फुल इंग्लिश म्हणा किंवा कॉन्टिनेन्टल म्हणा किंवा इंडियन म्हणा प्लेट भर नाश्ता चापून दिवसभर कामावर जायचा शिरस्ता मी पण पाळत आलो आहे, फक्त एकच दंडक पाळतो की प्लेट शिगोशिग करा किंवा पावच भरा जितके घेतले आहे ते संपवायचे अन् अन्नाची नासाडी टाळायची.
भारभर घेऊन घासभर खाणे करता हॉटेल स्टाफ पण वाईट नजरेने बघतो, अन् त्याहून मुख्य म्हणजे ते तात्विकदृष्ट्या प्रचंड मूर्खपणाचे आहे इतके मात्र सहमत आणि मान्य.
त्याला ब्रेक फास्ट न म्हणता
त्याला ब्रेक फास्ट न म्हणता ब्रंच म्हणा आणि एकदम प्लेट न भरता कोर्सेस मध्ये आणा फूड म्हणजे साजरं होईल सगळं.
मला त्यात फार गैर वाटत नाही.
दिवसभर साईट सीइंग करायचे असेल तर त्या आसपासच्या हॉटेलांमध्ये खूप गर्दी असते, क्वालिटी ची गॅरंटी नसते , वेळ खूप जातो त्यामुळे तिथे खाणं टाळलं जातं. उलट आपण उतरलेल्या हॉटेलच्या क्वालिटी ची आपल्याला त्यातल्या त्यात तरी गॅरंटी असते त्यामुळे तिथेच थोडं जास्त खाऊन लंच स्कीप करणे हा एक चांगला पर्याय आहे. पैसे वसूल करून घेण्याची वृत्ती, हॉटेल मधल्या गेस्टचा हा हावरटपणा वगैरे दिलेला रंग मला तरी पटला नाही. उलट हॉटेल ने दिलेली ही एक चांगली फॅसिलिटी आहे आणि गेस्ट तिचा योग्य तो उपयोग करून घेतात असंच मला वाटत. अर्थात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. काही असतील ही वसूल करणारे पण त्यांचे प्रमाण कमी असेल असे मला वाटते.
मनीमोहोर +१
मनीमोहोर +१
सुप्रसिद्ध (का कुप्रसिद्ध) पर्यटक स्थळांवर तर एक्सेसीबिलीटी इत्यादी बहाणे करून २०ची मॅगी १०० ला चिकटवण्याचे धंदे फोफावलेले दिसतात. हे एक वेगळेच.
ममो +१.
ममो +१.
वैयक्तिक बाब: मला दुपारच्या ऐवजी सकाळी जास्तीचा नाष्टा करून घेणे जमत नाही. पर्यटनाला गेलो असेल तर बॅगेत फुटाणे, शेंगदाणे/इतर सिड्स/सुकामेवा आणि सफरचंद ठेवतो. दुपारच्या जेवणाच्या वेळी चांगला पर्याय दिसला नाही तर त्यावर निभावून जातं, मिळालं तर योगर्ट.
एक लाइट हार्टेड म्हणून
एक लाइट हार्टेड म्हणून लिहिलेलं एवढं सिरियस वळण घेईल वाटलं नव्हतं..... असो
<<< एक लाइट हार्टेड म्हणून
<<< एक लाइट हार्टेड म्हणून लिहिलेलं एवढं सिरियस वळण घेईल वाटलं नव्हतं....
>>>
मलाही असेच वाटले मगाशी वरची चर्चा वाचून.
पण म्हटले तुम्हालाच हे लिहू द्यावे.
पण लेखाला अशी वळणे लागणे मायबोलीला काही नवीन नाही आणि त्यात एक मजाही आहे
एक लाइट हार्टेड म्हणून
एक लाइट हार्टेड म्हणून लिहिलेलं >> हो, पहिल्या दिवशी वाचला तेव्हा विनोदी लेखनात आहे याची नोंद घेतली होती.
आज त्याचा विसर पडला कॉमेंट्स वाचताना.
नाव comolimentry असले तरी
नाव comolimentry असले तरी त्याचे पैसे हॉटेलच्या रूम प्राईज मध्ये कवर केलेलेच असतात. फुकट काहीच कोणी देत नाही. सो खायचं बिनधास्त... तसंही कोणी पोटाच्या capacity पलीकडे नाहीच खाऊ शकत
विनोदी लेखन आहे हे मानव यांची
विनोदी लेखन आहे हे मानव यांची पोस्ट वाचली तेव्हा लक्षात आलं.. आता संपादनाची मुदत गेली असल्याने संपादित ही करता येणार नाही.
रेव्यू, सो सॉरी त्या साठी.