
तुम्ही म्हणाल ही द्विरुक्ती आहे तर दोष माझा नाही.
सगळे म्हणतात करण जोहर नेहमी फ्लफी, सोबो आणि साऊथ देल्ही क्राऊड दाखवणारे पिक्चर काढतो. आता तो तिथेच राहत होता ना? सकाळी कल्याण नाहीतर भायंदरवरून २० किलोची सॅक घेऊन ८:१७ ची लोकल पकडून वझे केळकर, पाटकर, रुईया नाहीतर इंटिग्रेटेडवाले ॲलन, फिजीक्सवाला गाठणारे विद्यार्थी त्याला कुठे माहिती? शहाड, नायगाव तर त्याने ऐकलं पण नसेल. मग निम्मं मुंबईकर महाविद्यालयीन पब्लिक क्रिकेट नाहीतर फुटबॉल खेळत असताना तो बास्केटबॉल खेळणारे, झेवियर्समधे
वावरणारे स्टुडंटसच दाखवणार ना? त्याचा बिचाऱ्याचा काय दोष?
पण झालं काय की सोनम कपूरलापण नॅशनल अवॉर्ड मिळालं. तेव्हापासून हिरूआंटींनी किटी पार्टीत जाणं बंद केलं. तसा ‘कुछ कुछ होता हैं’ला बेस्ट पॉप्युलर फिल्म म्हणून अवॉर्ड मिळाला होता. आता नॅशनल अवॉर्ड्समध्ये पॉप्युलर फिल्म म्हणजे
गावकुसाबाहेरची वस्ती, ओळख असली तरी मान नाही, ताऱ्यांच्या प्रभावळीत त्यांना स्थान नाही. घरात ‘कल की आयी हुई लडकी’चा गजर सुरू झाला. ढिगाने मिळवलेल्या फिल्मफेअर आणि स्क्रीनच्या बाहुल्यांवर कुणी फडकं मारेना. छान छान सुंदऱ्या आणि सुंदरांसोबत सुखाने गॉसिप करत लाते प्यायला जावी तर नेमकी समोर काऊचवर कंगना यावी आणि अमेरिकानोचा घोट घ्यायला लागावं तसं आयुष्य झालं.
कुणीतरी सांगितलं की सन्माननीय उल्लेख हवा असेल मल्याळी पिक्चर काढला पाहिजे. पण मल्याळी म्हणजे मद्रासी नाही (हे पण रहमानमुळे माहीत झाले) हाच त्याच्यासाठी शोध होता. विमनस्क मनस्थितीत चॅनेल्स सर्फ करत असताना खत्रीकाका ‘वड्डी वड्डी जमीनें थी हमारी’ असं कायतरी म्हणाले आणि बिंगो (युरेका म्हणण्यासाठी आर्किमिडीज नाव माहीत असावं लागतं) आपण सिंधी --> सिंध --> पार्टीशन --> विषय मिळाला. आणि आपला USP रोमान्स. चला पार्टीशनमधली प्रेमकथा काढू. तेवढ्यात लेखक कुजबुजला.
ले: सन्नी पाजीचा गदर येऊन गेलाय ऑलरेडी.
कजो: हैं? रोमान्स था क्या? मैं तो हैंडपंप उखाड़ने का सीन देखने के लिए गया था. हम रिअल रोमान्स दिखाएंगे. तिकडे सकीना अमृतसरवरून लाहोरला गेली आणि परत आली. आपण हिरोईनला लाहोरवरून अमृतसरला पाठवू. हाकानाका?
ले: पण सर लाहोर सिंधमध्ये येत नाही.
कजो: मग काय झालं? ट्रेन लाहोरवरूनच येते ना?
ले: ट्रेनच कशाला पाहिजे?
कजो: हे बघ, मूव्हीच्या शेवटी हिरोईन पळत येऊन ट्रेनमध्ये चढली की मूव्ही हिट होते. जब जब फूल खिले, DDLJ देखी नही क्या?
ले: पण सर सिंध?
कजो: प्रांतीयवाद करू नकोस. आपला उद्देश नॅशनल अवॉर्ड आहे. चल आलिया आणि वरुणला फोन लाव.
कास्टिंग डिरेक्टर: (मनात 'आलिया भोगासी') सर वरूणपेक्षा पगडी जड होईल.
कजो: असं म्हणतोस? एक काम कर वरुणला मुस्लिम कर. डोळ्यात सुरमा घालू आणि पठाणी देऊ.
काडि: पण अभिनय कोण करणार?
कजो: अभिनय?
काडि: नॅशनल अवॉर्ड, सर.
कजो: एक काम कर श्री मॅमना फोन लाव. नको थांब, बोनी अंकल आपली स्क्रिप्ट चोरतील. माधुरी मॅमना फोन लाव. त्यांना पण नॅशनल अवॉर्ड हवंय.
काडि: सर माधुरी मॅम आल्या तर संजू अंकलना घेऊया का? कास्टिंग कू होईल.
कजो: चालेल. लाव फोन.
ले: पण माधुरी मॅम आणि संजू अंकलना रोल काय द्यायचा?
कजो: मॅमना तवायफ करू. एक चंद्रमुखी स्टाईल डान्स होऊन जाईल. आधा अधूरा प्यार पण दाखवू. एकदम हिट जोडी.
ले: पण ते पार्टीशन?
कजो: दाखवू रे बाबा ते पण. काय घाई आहे?
असिस्टंट डायरेक्टर: सर शत्रू अंकलचा फोन आहे. बोलायचं आहे म्हणतात तुमच्याशी.
कजो: दे त्यांना. दोस्तानामुळे सोबोमध्ये आलो आम्ही.
हां, शत्रू अंकल
हो, हो. नवीन मूव्ही काढतोय.
पिरियड फिल्म आहे.
सोनाक्षी?
अच्छा ठीक आहे. नो प्रॉब्लेम.
एडी त्या लेखकाला बोलव जरा.
ले: बोला साहेब.
कजो: त्या सोनाक्षीला घेतोय आपण पिक्चरमध्ये. तिला वरुणच्या अपोझिट छोटासा काहीतरी रोल दे.
ले: सर 'वहिनीच्या बांगड्या' बनवूया का?
कजो: क्काय? Let me think.
नॅशनल अवॉर्ड??? गांधीजी?
मला सांग गांधीजींची फिलॉसॉफी काय होती?
ले: सत्य आणि अहिंसा
कजो: अहिंसा नाव कसं वाटतंय? नको. सत्या बरं वाटेल त्यापेक्षा.
एक काम कर तिला सत्याचा रोल दे.
काडि: सत्या? त्यापेक्षा भिकु म्हात्रे जास्त हिट होता.
कजो: एय हिरो. रामूवाला सत्या नाही. गांधीजींचा सत्या.
ले: 'सत्य' असतं ते.
कजो: तेच ते. ती सत्याचा आवाज बनेल. नॅशनल अवॉर्ड…
ले: सत्याचा आवाज? तिला पत्रकार बनवू का?
कजो: जर्नलिस्ट? गुड आयडिया. पण नको. आपण आलूबेबीला जर्नलिस्ट बनवू. तिचे पणजोबा काढायचे पेपर.
ले: सोनाक्षीचं काय?
कजो: एक काम कर. तिला संजू अंकलची बहू बनव.
ले: पण संजू अंकलना बेटा कुठाय?
कजो: मग दे त्याला एक बेटा.
काडि: सिद्धार्थला फोन करू?
कजो: नको. आजकाल फारच उडतोय तो. स्वतःचं स्क्रिप्ट घेऊन फिरतोय म्हणे. एक काम कर. तो आशिकी २ वाला आदित्य आहे त्याला फोन कर. सोनाक्षीसमोर तसा दणकट माणूसच पाहिजे. शिवाय त्याला घेतलं तर viacom18 ला विचारता येईल की
डिस्ट्रिब्यूट कराल का म्हणून.
काडि: येस्सर..
एडी: viacom18! गुड आयडिया सर.
कजो: कमिंग बॅक टू आलूबेबी. तिला आपण इंग्रजांविरुद्ध वर्तमानपत्र काढायला लावू.
ले: पत्रकार बातम्या लिहतात. पब्लिशर्स पेपर काढतात.
कजो: एक काम कर. संजू अंकलना पब्लिशर करून टाक.
ले: बरं.
कजो: बरं ते आलूबेबीचं पिक्चरमधलं नाव हुस्ना ठेव. साधना आण्टीचं मेरे मेहबूबमध्ये तेच नाव होतं. किती क्यूट दिसायच्या
साधना आण्टी.
ले: हुस्ना आपल्यात नसतं सर. साधना आण्टी मुस्लिम सोशलमध्ये होत्या.
कजो: मग आलूबेबीला मुस्लिम कर.
ले: सर मग तिला अमृतसरवरून लाहोरला पाठवायला लागेल.
कजो: काय शिंची कटकट आहे? हुस्नाचं हिंदीत काय होईल?
ले: रूपा कसं वाटतं?
काडि: रूपा नको सर. झिनीबेबी आठवून लोकांच्या अपेक्षा भलत्याच वाढतील.
एडी: रूप ठेवूया का सर?
कजो: रूप नाईस नेम. पण मला हुस्ना पाहिजे कुठे तरी.
ले: माधुरी मॅमचं ठेवूया का?
काडि : नको. हुस्ना + तवायफ. लोकांना एकदम 'दीदार ए यार' आठवेल.
एडी: गावाचं नाव हुस्नाबाद ठेवूया का जिथे आलूबेबी आणि माधुरी मॅम सारख्या सुंदर बायका राहतात?
कजो: चालेल. नेक्स्ट पिक्चरचा तुलाच डायरेक्टर करतो.
ले: सर पण लाहोरमधली स्टोरी आहे ना? हुस्नाबादवरुन कुठली ट्रेन?
कजो: लाहोरच्या जवळ हुस्नाबाद गावातली स्टोरी आहे असं लिही मग.
ले: (स्वतःचे केस उपटत) ओके सर
तेवढ्यात सुट्टा मारायला गेलेल्या सेट डिझायनरला रद्दीवाल्याकडे चातुर्मासाच्या कहाण्यांचे पुस्तक मिळाले.
सेडि: सर हे बघा काय?
कजो: व्हॉट इज चातुर्मास?
सेडि: सर ते सोडा. काय लिहिलंय ते वाचा. ‘निर्मल मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे’
कजो: लेट्स डू धिस. या वेळी भन्साळीला टफ कॉम्पिटिशन देऊया.
१९४४ लाहोरजवळ हुस्नाबाद …..
सोनाक्षीला समजलं आहे की रोल छोटा करण्यासाठी तिला मारणार आहेत पिक्चरमध्ये. त्यामुळे ती 'मरते हुए को अपने कर्म ठीक करने चाहिए, ना की तबियत, जो मेरे हाथ में हैं' अश्या प्रचंड कन्फ्युजिंग पण ठाम बाण्याने वावरत आहे. एरवी तेरवी मारायचंच आहे तर कशाला इतर ऍक्टर्सच्या शिफ्टचा वेळ फुकट घालवा म्हणून डॉक्टरकडे जातानाही तिला कुणाची सोबत दिलेली नाही. त्या काळात चांगल्या घरातल्या बायकामुली केस मोकळे सोडून फिरायच्या नाहीत असं कानावर आल्यामुळे हेअर स्टायलिस्ट
प्रचंड अपसेट झाला आणि त्याने आत्ता सुटेल की मग सुटेल एवढी लूज वेणी घालून दिली आहे. चंदेरी रंगाची बॉर्डर लावलेली फेक शिफॉनची साडी नेसवून आणि बंगालमध्ये फेमस असलेले लेसचे ब्लाऊज देऊन कॉश्च्यूम डिरेक्टरने तिच्याबाबतीतला राष्ट्रीय एकात्मतेचा कोटा पूर्ण केलेला आहे. तिला आपल्या पतीसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून ती माहेरी राजपुतान्यात आली आहे. भलतीच एकात्मता.
फायनली आलूबेबी स्क्रीनवर अवतरते. अच्छे घर की बहुबेटियों के कायदे तिला लागू नसावेत. कारण समोर किती वयाचा माणूस आहे त्यावर किती लांबीचा घुंगट घ्यायचा हे ठरवणाऱ्या राजपुतान्यात ती केस मोकळे सोडून आणि ओढणी दूरदर्शनवर समूहगीत गाताना घडी घालतात तशी घडी घालून एका खांद्यावर अडकवून 'लाई दे रजवाड़ी ओढ़नी' करत नाचत सुटली आहे. बाई आहे ती तर नीट वापरायला शिक आधी.
गाण्यात पतंग फ़ेकताहेत, रंग खेळताहेत. नेमका कसला सीझन सुरु आहे याचा पत्त्या लागू देत नाहीत. पण विनोद प्रधानचे
छायाचित्रण सुंदर आहे. गाणं गाऊन आणि बागडून झाल्यावर ती घरी येते तर तिथे राखाडी रंगाची साडी नेसलेली आणि यावेळी केस मोकळी सोडलेली सोनाक्षी आहे. एक पगडी घालून राजपुतान्यातल्या भर उन्हाळ्यात जॅकेट आणि वरून कुलूची शाल
घेतलेला माणूस पण आहे. सोनाक्षीला रूपला आपल्यासोबत घेऊन जायचे आहे. आणि रूपच्या बाबांची याला सहमती आहे. ते शास्त्रीय संगीत शिकवतात आणि त्या कमाईवर आपल्या मुलींचे लग्न करू शकत नाहीत. सोनाक्षीच्या वडिलांचे त्यांच्यावर उपकार आहेत. रूपचा याला ठाम नकार आहे. बरोबर आहे म्हणा. कोण मुलगी अश्या भलत्याच ठिकाणी कुणाच्या घरात जाऊन राहील आणि नेमकं JD काय आहे यावर कुणी बोलतच नाही.
फायनली रूप तिला अट घालते की तुझ्या नवऱ्याने माझ्याशी आत्ताच लग्न केलं तर मी तिथे येईन. अशीच येणार नाही. सोनाक्षी तिला समजावू पाहते की तू आत्ता त्याला समजावून घे आणि माझ्यानंतर तो तुझ्याशी लग्न करेल. पण रूपचं डोकं ठिकाणावर आहे. ती म्हणते की तू जाशील तेव्हा तू दिलेलं वचन कोण निभावणार?
रूप तिची पुस्तकं जाळून टाकते. पण पतंग उडवण्याऐवजी त्या डिक्शनरीएवढ्या जाड्या पुस्तकांचा वापर करून नोकरी का नाही मिळवली तिने हा प्रश्न अनुत्तरित आहे. सोनाक्षी स्वतःच्या नवऱ्याचं तिच्याशी लग्न लावून देते. अश्रुभरित नयनांनी लग्न करणारा हा पहिलाच फिल्मी नवरा. चाणाक्ष प्रेक्षक आणि वाचक यावरून रूपची वैवाहिक स्थिती ओळखतील. चाणाक्ष नसलेल्यांनी सहन करण्याची क्षमता असल्यास संलीभचा देवदास बघावा.
रुपला सुहागरातसाठी तयार करताना पडद्यावर एंट्री होते ती वरुण धवन उर्फ जफरची. त्याला लखनवी चिकनकारी केलेला पठाणी ड्रेस देऊन राष्ट्रीय एकात्मतेला हातभार लावलेला आहे. तो अरिजित सिंगच्या आवाजात 'बाकी सब फस्क्लास हैं' गातो. इथे माझा धीर सुटायला लागलेला आहे. प्रत्येकाच्या इंट्रोडक्शनला एक गाणं परवडणार नाही हे लक्षात घेऊन आता बाकीच्यांचं पण इंट्रोडक्शन उरकून घेत आहेत. त्यात एकगठ्ठा नाचणाऱ्या तवायफ आहेत. उगीचच मध्ये आलेली कियारा अडवाणी आहे. एकाच
मुलाचं दोन वेळा लग्न लावून जेरीस आलेला संजय दत्त आहे. आणि गढीसदृश महालात राहणारी माधुरी दीक्षित आहे. तिच्या
गढीसमोर छोटं तळंसदृश प्रकार आहे. तिच्या घरात राहणारे आणि तिचे सर्व चाहते लॉन्ग जम्पची प्रॅक्टिस करत असतील का? जफर आणि माधुरीमध्ये काहीतरी खुन्नस आहे.
कियारा आणि जफर फ्रेंड्स विथ बेनेफिट्स आहेत. तिच्याकडून त्याला समजतं की देव चौधरी (आदित्य) लंडनवरून शिकून आलेला आहे, त्याने परत आल्यापासून बंटवारे के खिलाफ आर्टिकल्स लिहिली आहेत, त्याची बायको काही दिवसांची सोबती आहे आणि म्हणून त्याचे दुसरे लग्न आपल्या हिरोईनीशी करवले गेले आहे. बीबीसीवर द्यायचे का या न्यूज?
मध्यरात्री बाल्कनीत ५० मेणबत्त्या लावून माधुरी गाण्याचा रियाझ करत आहे. विझत कश्या नाहीत मेणबत्त्या?
इकडे आदित्य येऊन डिक्लेअर करतो की मैं अपनी पत्नी से बहोत प्यार करता हूँ. या घरात तुला मान सन्मान मिळेल पण मी प्रेम देऊ शकणार नाही. अरे गाढवा ३-४ तासापूर्वी तू ह्या बाईलाही पत्नी बनवलंस हे विसरलास का? असो. आदित्य सफेद
शेरवानीमध्ये छान दिसतो. पण मला प्रश्न वेगळाच पडला आहे. ट्रान्स्परन्ट काचेचे दरवाजे असलेल्या खोलीत सुहागरात कोण
साजरी करतं? तो निघून गेला म्हणून ठीकाय. पण घरातली सगळी डोक्यावर पडलीत का? का पडदे घ्यायचे पैसे पण उरले नाहीत २-२ लग्न करवून.
हिरामंडीतल्या तवायफ़ांसोबत जिस्मानी ताल्लुक़ात प्रस्थापित करणे, अरिजीतच्या आवाजात गाणे यातून वेळ मिळाला तर जफर लोहारकामही करतो, खास करून तलवारी बनवतो. आमच्या लहानपणी लोहार बैलगाडीच्या चाकांना रीपा बसवणे, कुदळी-घण बनवणे वगैरे अहिंसक कामं करायचे. वर्ष ६ महिन्यातून एखाद कोयती बनवली तरी खूप.
आता आपलं इंट्रोडक्शन अब्दुलशी (कुणाल खेमूशी) होतं, तोही सुरमा लावत असतो. तो अवामी हक़ पार्टीचा कार्यकर्ता असतो, बँटवारे के पक्ष में असतो आणि मीटिंगा घेत असतो. तो म्हणतो की ‘औजार बनाने की मशीने आ गयी तो हमारे कारखाने बंद हो जायेंगे| इस बार हमारी कौम पे नहीं हमारे पेट पे हमला होगा’ कजोला मध्येच आपण पार्टीशनवर पिक्चर बनवतोय की नया दौर याचं विस्मरण झालं बहुतेक.
यावर जफरचं उत्तर असं की 'अगर हम मेहनत करें कभी बेरोज़गार नहीं होंगे| मैं हरामी हूँ जिसे अपने बाप ने नाम नहीं दिया| जो अपने हक़ के लिए नहीं लड़ सका, वो अवाम के लिए क्या लड़ेंगा'? 'शहाणा गं बाळ माझा' म्हणेस्तोवर तो अब्दुलला फुकट सल्ला देतो की 'अपनी आवाज़ दुनियातक पहुंचाने के लिए बलराज चौधरी के अखबार से ज्यादा बेहतर तरीका नहीं हैं' आणि हा पण की ‘इन्क़िलाब खून बहा के लाया जाता हैं, बातों से नहीं’. संवादलेखक त्याच्या गोळ्या घ्यायला विसरला असावा बहुतेक. तो पुढे
म्हणतो की 'भाई हैं आप मेरे| आप के लिए जान भी दे सकता हूँ| लेकिन ये चौधरियों के झमेले से मुझे दूर रखिये' मी
आल्मोस्ट माझ्या गोळ्या शोधायला लागले.
इकडे बलराज चौधरीला (संजय दत्त) लेकाचा ‘एक मुल्क, एक अवाम’ विचार पसंत नाही. इन्ग्रजांशिवाय आपण आपला देश
सांभाळू शकत नाही आणि आपला मुलगा सगळ्यांना बहकवतोय असं बापाचं म्हणणं आहे. गांधीजींनी पूर्ण स्वातंत्र्याचा ऐलान करून २ वर्ष झालीत हे बिचाऱ्याच्या गावी नसावं. सोनाक्षी दोघांकडे बघतेय. खादीसदृश चेक्सच्या जॅकेटमध्येही आदित्य चांगला दिसतो. आणि घरात नवीन आणलेल्या सुनेला कुणी नाश्त्याला पण बोलावत नाही हे पाहून माझं मन भरून आलेय. पण पुढच्या
संवादात रूप नाश्त्याला खाली येऊ इच्छित नाही हे एस्टॅब्लिश होतं आणि माझा जीव जरा भांड्यात पडतो. १ वर्षाची मुदत दिलेली सोनाक्षी अगदी टवटवीत दिसते आहे.
फारसा मेकअप नसलेली रूपही सुंदर दिसते आहे आणि तिच्या रूमची खिडकी तर अप्रतिम. तिला वाऱ्यासोबत कुठून तरी गाण्याचे सूर ऐकू येतात. त्याबद्दल चौकशी केली तर अचिंत कौर AI मोड मध्ये जाऊन आवाज डिकोड करून तो बहार बेगम (माधुरीचा) असल्याचे तिला सांगते. मला उगीचच मुगल ए आझम मधली निगार सुलताना आठवली. माधुरी तेवढी तिखट दिसत नाही. अजून थोडी चौकशी केल्यावर ती हिरामंडीमध्ये राहते आणि तो बदनाम इलाका आहे वगैरे जाहीर करते. अचिंत कपूरला BMC हॉस्पिटलमधल्या आया नेसतात तशी सुती गुलाबी साडी दिली आहे आणि कोरा चेहरा तिचा स्वतःचा आहे.
आता अचानक सगळ्यांना आठवतं की बँटवाऱ्यासाठी हिंदू मुस्लिम यांच्यात काहीतरी तेढ निर्माण झालेली दाखवणे गरजेचे आहे. म्हणून एक मुन्शी तलवारी विकत घेण्याचा सौदा करताना उगीचच जफरच्या नाज़ायज़ असण्याचा उल्लेख करून वर तो मुस्लिम आहे, माझे पैसे घेऊन पळून गेला तर वगैरे डवायलॉक मारतो. आणि डायलॉग कोणासमोर? तर अब्दुलसमोर. परिणामी जाफर त्याला नडतो. मग त्याला पेढीवरून हाकलताना परत तो मुन्शी त्याच्या नाज़ायज़पणाचा उल्लेख करतो. तिकडून बहार येत असते. तिच्यासमोर अश्या शिव्या घातल्याने जाफर सरकॅस्टिकली हसतो. चाणाक्ष प्रेक्षकांना काय गुपित आहे हे समजले असेल. पण
त्याहीपेक्षा मोठे गुपित म्हणजे पेढीवरले मुन्शी कधीपासून तलवारी घ्यायला लागले? पेढी जनरली अमुकतमुक लाला किंवा सेठची असायची आणि मुन्शीजी कारकुनी करत असायचे. बोरूला टोक काढायला तलवारीची गरज काय? पण असो.
इकडे सोनाक्षी रुपला आपल्या अखबारमध्ये काम करण्याचा सल्ला देते. त्या निमित्ताने तुझी देवशी जवळीक होईल हे सांगते.
रुपला गाणे शिकायचे आहे. ती रुपसाठी एखादा चांगला गुरु शोधून देईन असं सांगते. पण रूपने लग्नापूर्वी दाखवलेला सगळा शहाणपणा बासनात गुंडाळून ठेवला आहे.
तिला हिरामंडीमध्ये जाऊन बहार बेगमकडून गाणे शिकायचे आहे. सोनाक्षी साफ नकार देते. रूप म्हणते की तसं असेल तर मी अखबारमध्ये काम करणार नाही. सोनाक्षी म्हणते नको करूस. पहिल्यांदा सोनाक्षी काहीतरी सेन्सिबल बोलली आहे. पूर्ण सीनमध्ये प्रकाशयोजना अप्रतिम आहे आणि रूप खरोखर सुंदर दिसते. ती विमनस्क मनाने आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पण सोनाक्षी रदबदली करून संजय दत्तकडून तिला हिरामंडीमध्ये जायची परमिशन मिळवून देते. अरे पण बहार बेगमला विचारलंय का कुणी कि तू हिला गाणं शिकवशील का? आणि मुळात काही मैलांवरून आलेल्या सुरांनी रुपला कसं समजलं की ही चांगली
गायिका आहे?
रूप हिरामंडीत येते तेव्हा अब्दुल अजून स्टीलचे कारखाने आणि अवामी हक़ यांचं फ्यूजन करण्यात गुंतलेला आहे. तिकडे चौधरी यांच्या पेपरला जाहिराती कमी पडताहेत. एक व्हिस्कीवाला जाहिराती देण्यासाठी तयार आहे. पण त्या जाहिराती
पाहून मुस्लिम लोक पेपर घेणार नाहीत म्हणून एका बोर्ड मेम्बरचा विरोध आहे. देव (आदित्य)ही त्याच मताचा आहे.
बहुतेक तो जिनांना भेटला नसावा कधी.
हिंदी चित्रपटांच्या परंपरेनुसार रूप तिथे येऊन आपण पेपरात साड्या आणि मेकअपच्या जाहिराती देऊया असं सांगते. इथे लक्स साबणाची प्रॉडक्ट प्लेसमेंट केलेली आहे. तर बोर्ड मीटिंग मध्ये ती देवला भेटायचं आहे असं त्यालाच सांगते. तो ही तिला तू कोण विचारतो. ती सांगते मी त्याची पत्नी. तिची साडी का शरारा जे काय आहे ते फार सुंदर आहे. बोर्ड मेम्बर थक्क झालेले आहेत.
अब आगे….
तरी एक बोर्ड मेम्बर म्हणतोच की 'कमाल हैं एक दुसरे को नहीं जानते'. पण हे पार्टीशनपूर्व काळातले लोक असल्याने त्यांना 'घूंघट की आड़ से दिलबर का दीदार अधूरा रहता हैं' हे समीरभाईंनी सांगितलेले वैश्विक सत्य माहिती नाही. त्यामुळे त्यातला व्हिस्की
विरोधी अहमद (हितेन तेजवानी) म्हणतो की 'निकाह हुआ हैं इनका शायद| उस दिन अगर परदे के पीछे आप भी होते तो देवसाब को पता नहीं चलता'. व्हि वि अहमद पुढच्या जन्मात नक्कीच मायबोलीवर घाऊक पिसं काढून देत असेल.
मध्येच कुणाला तरी आठवतं की सोनाक्षीचा रोल आपल्याला लवकर संपवायचा आहे त्यामुळे ती खोकत बाथरूमकडे पळत जाते. सामान्य परिस्थितीत एवढ्या धनाढ्य घरात आजारी बाईच्या उशापायथ्याशी ४ लोक नुसते बसून असतील. पण इतर एक्टर्सचा वेळ वाया जायला नको म्हणून इथेही ती एकटीच आहे. तिची बेज/लाईटेस्ट ब्लू किंवा पिस्ता कलरची साडी आणि डार्क आमसुली रंगाचं ब्लाऊज फार सुंदर आहे.
इकडे रूप बग्गीत बसून हिरामंडीत आली आहे. सोबत शॅपरॉन म्हणून अचिंत कौर आहे. ती रूपला सांगते की आज हिरामंडीका सबसे बडा त्योहार हैं दशहरा. फक्त हिरामंडीचा? चौधरींकडे सुनांना सणवार साजरे करावे लागत नाहीत का? इथे माधुरीचं
पाठमोरं दर्शन होतं. ती एका आयताकार स्विमिंग टॅंक सदृश प्रकारावर टांगलेल्या झोपाळ्यावर बसून झोके घेतेय. तिची एक ओढणी झोपाळ्यावरून टॅन्कमध्ये लोळते आहे आणि ओढणीवर व टॅन्कभर गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या आहेत. माधुरी गाते आहे 'रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाये पर वचन न जाई'
थोडक्यात उदकाचे तळे फार सुंदर दाखवले आहे. नाहीतर आपल्याकडे नुसते असे सांगायचे आणि भलते भलते उपास तापास करायला लावायचे, ते सोडायला परत अमुक शेर तूप आणि तमुक शेर गहू याचे पदार्थ करायला लावायचे.
इकडे बाहेर हिरामंडीत दोऱ्यावरून लटकणारे पुरुष, एशियन पेंटचा रॉयल ब्लू फासलेला राम, लक्ष्मण व सीता त्यांच्या
स्वागताकरता ढोल वाजवणारे पुरुष आणि नाचणाऱ्या बायका, पांढऱ्या रिच लेहेंग्यात गोड दिसणारी रूप आणि तिच्यावर एक नजर पडल्यावर 'कुण्या गावाचं आलं पाखरू' करत तिच्या मागे मागे फिरणारा जफर असा फुल्ल उत्सवी माहौल आहे.
कट टू बहार बेगमची हवेली. आता ती बैठकीवर बसली आहे आणि तराणा गात आहे. माझ्या डोक्यात प्रश्नांचं मोहोळ उठलंय की झोपाळ्यावरून उतरून पाय आणि लेहंगा न भिजवता ती तळ्यातून बाहेर आली कशी? दुसरी ओढणी बऱ्याच वेळ पाण्यात राहिली तर रंग जाईल का? त्या गुलाबाच्या पाकळ्या कोण गोळा करणार नंतर? तिला कसली चिंता नाही. तिने आता 'घर मोरे परदेसिया, आओ पधारो पिया' गायला घेतलेलं आहे.
आता मैलभर अंतरावरून तिच्या आवाजाने इम्प्रेस झालेली रूप साहजिकच इतक्या जवळून तिच्या आवाजाने खेचली जाणार यांत नवल ते काय? अचिंत कौर बहुतेक जत्रेत भिंगरी घ्यायला थांबली असावी, कुठे दिसत नाही. तर बहारच्या हवेलीच्या दिशेने
एकटीच जायला निघालेली रूप 'रामलीला - एक पथनाट्य' मधली लक्ष्मणरेषा लिटरली आणि मेटॅफोरिकली ओलांडते. डायरेक्शन डायरेक्शन म्हणतात ते हेच.
दिवसा बहारच्या हवेलीच्या बाहेरचं तळं ओलांडण्यासाठी छोट्या होड्या नाविकांसहित तैनात असतात. आपल्या दाराबाहेर कुंडीत जरी पाणी असलं तरी मनपा नोटीस काढते, इथे प्लास्टिक कमळांसोबत अख्खं तळं आहे तर फ्युमिगेशन करून घ्या पण सांगत नाही. गरिबाला कुणी वालीच नाही. तर रूप होडीत बसून बहारच्या हवेलीत जाते. हाऊसबोटी आणि शिकाऱ्यांचा टाय अप असतो तसा बहारची हवेली आणि होडीवाल्यांचा टाय अप असावा कारण रूप होडीवाल्याला पैसे देत नाही.
गाणं ऐन भरात आहे तर न राहवून रूपही जॉईन करते. दोघींचं घराणं एकच असावं बहुतेक. अगदी तानापलटेही एका सुरात घेत आहेत. नाचणाऱ्या इतर तवायफ़ांना बघून रूपही नाचायला लागते. अगं बाई तू शास्त्रीय गायकाची मुलगी आहेस आणि खानदानी बहू आहेस, नच बलियेची काँटेन्स्टन्ट नाहीस. बरं झालं अचिंत कौर नाहीये सोबत. तिला फेफरं आलं असतं. असो, तिचा नाच
इफेक्टिव्ह वाटावा म्हणून बहार बेगमना नुसतंच गायला लावलं आहे.
तर हिचा परफॉर्मन्स संपल्यावर बहार म्हणते 'आवाज अच्छी हैं, बस नमक थोड़ा कम हैं. और राग में नमक लाने के लिए नमकीन ज़िन्दगी जिनि पड़ती हैं'. आँ? १४ वर्ष झाली दांडी यात्रेला. अजूनही तुम्हांला नमक कमीच पडतंय? मग लक्षात येतं की ती देश का नमक विषयी बोलत नाहीये तर गुलज़ार अंकलनी सांगितलेल्या नमकविषयी बोलतेय. रूप म्हणते 'और नमक ज्यादा हो जाए तो कड़वी हो जाती हैं ज़िन्दगी.' ती आणि संवादलेखक आयुष्यात कधी स्वयंपाकघरात गेले नसावेत. खारट असा शब्द आहे गं बाई त्यासाठी. मग ती बहारला सांगते की 'मैं आप से संगीत सीखने आयी हूँ'. बहार म्हणते 'हमारे यहां संगीत को गाना कहते हैं'. एवढे क्यूज देतेय बहार पण ही ऐकायचं नाव घेत नाही. मग बहार विचारते 'आप शादीशुदा हैं? हमारा तजुर्बा यह हैं के एक बार जो उस आग के फेरे काट ले, उसके अंदर की आग बुझ जाती हैं'. बहारने नवऱ्यांचं जनरल मत विचारात घेतलं असतं तर तिचा असा
गैरसमज झाला नसता. असो. रूप म्हणते 'उसी बुझी हुई आग को फिर से जगाने आ गयी हूँ'. बहार आहे का गारगोटी? येथे
ठिणग्या पाडून मिळतील?
एकदाची अचिंत कौर येते. भिंगरी मिळालेली दिसत नाही. ती म्हणते 'शाम हो रहीं हैं, हमें चलना चाहिए|' मग जरा लवकर निघायचं ना घरातून बाई.
बहार रूपला कटवते की ‘उद्या परत ये. उद्याही तुझा आवाज आवडला तर शिकवेन तुला.’ संपूर्ण सीनमध्ये बहारचे कपडे जास्त मॉडेस्ट आहेत. दागिनेही मोजके परंतु उठावदार आहेत आणि चौधरीची सून उघड्या गळ्याने फिरते आहे. अर्थात दोघींचे कपडे खूप सुंदर आहेत. बाकीच्या तवायफांचे कपडेही हलका गुलाबी ते हलका ऑरेंज/ पीच या शेडमध्ये आहेत. महागड्या डिनर सेटचा
राखाडी निळा रंग आणि गोल्ड ट्रिमिंग असते साधारण त्या डिझाईनचा फ्लोअर पॅटर्न आहे. झुंबरं, समया, नटराज सगळंच फार
अस्थेटिक आहे.
अचिंत कौर परत गायब झालेली आहे. (क्या शॅपरॉन बनेगी रे तू?) तिची पण चूक नाही म्हणा. उद्या तिच्या घरच्यांनी बघितलं तर तिचे वांधे.
रूप बहारकडून परत निघत असताना अचानक तळ्यातून १०-१५ राम आग लावलेले बाण आणि धनुष्य घेऊन बाहेर येतात आणि त्या पार्श्वभूमीवर जफरही तिच्याकडे येतो आहे. त्याची आणि रूपची नजरानजर होते, ती डोळे चुकवून पुढे जायला बघते तर तो
म्हणतो 'मैंने इस बाज़ार के सभी तवायफों के गाने सुने हैं| आप की आवाज़ में दर्द से ज्यादा इश्क़ हैं| कैसे?' आता भलेही हिरामंडीत आलेली असेल पण तवायफ नसलेल्या एखाद्या बाईची तवायफशी कम्पॅरिझन केली तर ती पटकन तोंड उघडून सांगेल की नाही की बाबा तू जे समजतो आहेस ती मी नाही. पण नेमकी इथे ती मुग गिळुन बसते. सरळ आहे त्याचं धारिष्ट्य वाढतं. तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो 'जितना दूर जाएँगी उतनाही नज़दीक पाएंगी आप मुझे| अपनी आँखों की कशिश को अपने पलकों के ऐतराज़ से छुपाने की कोशिश न कीजिये|' एवढं सलग वाक्य म्हणून दाखवलं. टाळ्या. आता याचा अर्थ पण सांग भौ. इतकं सगळं झाल्यावरही ती त्याला हडकवत नाही.
घरी आल्यावर ती नवऱ्याला सांगते की मला हिरामंडीतल्या लोकांवर लेख लिहायचा आहे. एक बहार बेगम सोडल्यास तुला कोण माहिती आहे गं हिरामंडीतलं? तो ही म्हणतो वाचण्यासारखा असेल तर छापेन मी. ती नवऱ्याला हे ही सांगते की मला माहिती आहे हे लग्न आपल्यासाठी समझोता आहे. माझी काही स्वप्नं नाहीत. तुम जब चाहो इस समझौते से रिहा हो सकते हो| इथे ओरिजिनल देव असता तर 'तेरी ज़ुल्फ़ों से जुदाई तो नहीं मांगी थी' वगैरे गाऊन मोकळा झाला असता. नाहीतरी ती केस मोकळे सोडून आली होती. पण हा सपोजेडली सोनाक्षीच्या प्रेमात पडलेला देव असल्याने तो फक्त 'मैंने इस रिश्ते से रिहायत की बात तो नहीं की थी|
लेकिन आप के ख़याल जानकार ख़ुशी हुई|' असं म्हणून विषय टांगत ठेवतो. तो मोकळा झाला तर तू जाणार कुठे याचा विचार
केलास का कधी बाई?
दरम्यान त्या सोनाक्षीला कुठे गायब केलंत नेमकं? तिच्याकडे लक्ष ना नवऱ्याचं लक्ष, ना सासऱ्याचं. हिच्याकडून तर अपेक्षाच नाही.
रूप आपल्याला वाटते तेवढी बिनडोक नाही. हिरामंडीवर लिहिण्यासाठी ती अब्दुलचा पत्ता शोधत येते. तिलाही माहितेय की नेमकं कोण इन्फ्लुअन्शिअल आहे.
अब्दूल अर्थातच जफरच्या कारखान्यात पडीक असतो का तो अब्दुलचा कारखाना असतो? कुणास ठाऊक. आता जफर बाकायदा लोहार असल्याने त्याला त्याची बॉडी दाखवण्याची संधी आहे आणि तो ती पुरेपूर वापरतो. पण त्याचं लोहारकाम म्हणजे फक्त भट्टीत कोळसे ढकलणे. त्यासाठी शर्ट कशाला काढायला पाहिजे? अख्ख्या चित्रपटात तो एकदाच ऐरणीचा वापर करताना
दिसलाय तेव्हा तो ठोकण्यासाठी हातोडी वापरतो. तिच्यापेक्षा मोठी हातोडी प्लेझोनमध्ये मुलांना खेळायला देतात.
जफर तिला पाहून परत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा फायनली बया त्याला सांगते ‘मैं शादीशुदा हूँ’. तो म्हणतो ‘तो मुझे
कौनसा निकाह पढ़ना था आपसे?’ अट्टाबॉय. अशी क्लॅरीटी पाहिजे एन्ड गोल विषयी. नाही तर मग इस्लामाबाद टॉक्स कराव्या लागतात.
आता त्याचे डायलॉग संपल्यामुळे तो तिला अब्दूलकडे पाठवतो. ती अब्दूलला सांगते की मी पत्रकार आहे, मला हिरामंडीवर
लिहायचं आहे. तो परत अम छोड़ेगा नहीं जी करत कारखाना, मशिन अमुक तमुक यांविषयी बोलून ‘क्या आप का अखबार ये छाप
पाएगा’ असं म्हणून तिला उडवून लावतो.
रूप निराश होऊन परत जात असताना जफर येऊन तिला सांगतो की मी इथेच वाढलो. या भागाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखणार? सियासी मसलों से दूर इस इलाके में कुछ ऐसी खास चीजें हैं अगर आप देखना चाहती हैं तो? रूप लगेच तयार होते. पुढच्या शुक्रवारी ते कलाम वादीमध्ये भेटायचं ठरवतात. बाई तुला हिरामंडीवर लेख लिहायचा होता ना? कलाम वादी कुठून आली मध्येच. निघताना तो तिला सांगतो की 'फ़िक्र ना करें| मैं इज़ाज़त या कीमत के बगैर औरतों को हाथ नहीं लगाता'. आता याबद्दल तुला व्हिक्टोरिया क्रॉस द्यावा की काय? आणि काल तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हा तू थेट तिचा हात पकडला होतास हे विसरलास?
अगले जुम्मे से पहले वरुण, करण, पटकथाकार, लेखक, संवादलेखक, एडी, गीतकार यांची मिटींग चालली आहे.
वः करण दोन दिवस झाले मी उघडा फिरतोय. आलिया काय इंप्रेस होईना. डास मात्र चावले. आता कलाम वादीत जाऊन काय करू?
कः लेखक काय करणार होता हा कलाम वादीत?
लेः मला काय माहित. माझ्या स्टोरीत असलं काय नव्हतं.
पः सर तुम्ही कायतरी ‘वादी ए इश्क’ म्हटला होतात. शुटच्या दिवशी डिटेल्स बघू म्हटला होतात.
कः त्या लिरिसिस्टला एक गाणं लिहायला सांग ‘ये हसीं वादियाँ’ टाइप.
एडीः सर तिकडे फक्त उघडे बोडके डोंगर आहेत. तुम्हीच हेलिकॉप्टर राईड घेताना चूज केलं होतंत लोकेशन.
संलेः तरी मी सांगत होतो तो कशिश, ऐतराजवाला डायलॉग फ्लर्ट करताना वापरू नका. इकडे वापरला असता. तेव्हा नाही ऐकलंत माझं. २ दिवस रेख्तावर आरएनडी केली होती मी.
कः ते जाऊ दे. आता काय करायचं ते बोल.
संलेः मी काय सांगू?
एडीः रेस लावूया का?
कः नको. फरहानने पार्टीशन आणि रेसचा कॉपीराईट घेतलाय.
एडीः सर कुस्ती करवुया का?
कः कुणाशी?
पः आदित्य आहे ना? जो जिंकेल त्याला फायनली आलियाबरोबर सेटल करू.
कः आपण परदेस काढतोय का? शिवाय त्याची मान्यवरची ऍड आपल्याच सेटवर शुट होतेय. कपडे खराब होतील त्याचे.
एडीः सर ग्लॅडीएटरसारखी सिंहाबरोबर फाईट करवायची का?
लेः लाहोरच्या झूमध्ये पण सिंह नाहीये सर.
पः रडू नको रे. सर स्पेनमधे बुलफाईट करतात. बुलफाईट चालेल का?
कः गुड आयडीया. बुल इट इज.
आपण आता कलाम वादीमध्ये आलोय. तिथे नदीच्या काठावर जोधा अकबर टाईप खूप सारे तंबू आहेत. कलाम वादी लाहोरपेक्षा खैबर पख्तुनवा किंवा तोरा बोरा मध्ये असेल असं वाटतं. आजूबाजूचे पुरुष पण पठाणी ड्रेस आणि पगडी घातलेले आहेत, हातात कलाश्निकोव्ह नाहीये एवढंच. बायका मात्र शरारा घालून फिरताहेत. तिथे ग्लॅडिएटर इन्स्पायर्ड अर्धच स्टेडियम आहे. तर रूप
जफरच्या गँगबरोबर थांबलेली आहे. तिला नेमकं काय होणार आहे याची खबर नाही त्यामुळे ती साधारण मैत्रिणीच्या लग्नाला
जाताना घालतो तितपत हेवी शरारा घालून आलेली आहे.
बुलफाईट सुरु होते. जफर या सांडासमोर ७ सेकंद टिकला तर तो जिंकेल असं जफरचा एक मित्र रूपला सांगतो. सांडाला काबूत आणण्याच्या पहिल्याच प्रयत्नात सांड जफरला मैदानाच्या कडेवरून सरळ दरीत उडवून टाकतो. रूपचा श्वास अडकलाय. त्याचे
मित्र थोडेफार चिंतेत असले तरी दरीच्या कडेला जाऊन बघावं, गरज पडल्यास जफरला मदत करावी असं काय त्यांच्या डोक्यात येत नाही. आपल्यालाही माहिती आहे की अजून पावणेदोन तासाचा पिक्चर बाकी आहे, जफरला काय होत नसतंय.
तिकडे जफर घोरपडीसारखा कातळाला चिकटून वर येतो. सांड तयारीतच असतो. यावेळी जाफर त्याच्यावर चढून बसतो पण सांड त्याला भिरकावून देतो. त्याला पुढच्या दोन खुरांनी तुडवतो, तेही छातीवर. एखादा डॉक्टर तिथे असता तर त्याने ऍम्ब्युलन्सऐवजी थेट शववाहिनी बोलावली असती. पण जफर हिरो आहे. तो एट पॅक्स दाखवत उठतो आणि बैलाच्या शिंगांना धरून त्याच्यावर स्वार होतो. ७ सेकंद झाल्यावरच खाली पडतो. सांड बहुतेक प्रौढ शिक्षा अभियानात जाऊन आकडे मोजायला शिकला असावा. कारण यावेळी वरुण खाली पडल्यावर त्याच्यावर हल्ला न करता तो निमूटपणे त्याच्या एनक्लोजरमध्ये परत जातो.
दरीत पडून आणि सांडाकरवी तुडवून घेतल्यवरही वरुणच्या अंगावर मामुली स्क्रॅचशिवाय काही जखम झालेली नसते. तर तो नदीवर हातपाय धूत असताना आलीया तिथे येऊन त्याला एकेरीत शिव्या घालते, म्हणते 'तुम मर सकते थे'. तो म्हणतो 'मौत से डर नहीं लगता'. ती म्हणते 'जिस दिन मोहोब्बत हो जाएगी, उस दिन मक़सद भी मिल जाएगा और मौत से डर भी लगेगा'.
अब्दुल तिथे येऊन त्याला फाईट जिंकल्याचे पैसे देतो आणि सांगतो 'कम से कम इसे छोड़ दे'. वरुण म्हणतो 'एक दिन छोड दूंगा'. अब्दुल म्हणतो 'अच्छी लडकी हैं| सुना हैं के शादीशुदा हैं| आप जानते हैं ना आप क्या कर रहे हैं|' कलाम वादीतून रात्री बेरात्री घरी पोहोचलेल्या रूपला पाहून देव फक्त घड्याळात पाहून तिला जाणीव करून देतो.
हिरामंडीवर लेख लिहिण्याच्या निमित्ताने रूप आणि जफर भेटत राहतात. रूप हळूहळू जफरकडे आकर्षित होते आहे. इकडे
वृत्तपत्राच्या ऑफिसमध्येही तिच्या सूचना लक्षात घेतल्या जाताहेत, व्ही वि अहमद सारखे कलीग तिला ऑफिसमध्ये सामावून घेत आहेत, सोनाक्षी आपल्या नात्यात माघार घेते आहे आणि रुपला देवसोबत पार्टीजना वगैरे पाठवते आहे. देव स्वतःच्याही नकळत रुपला एक पार्टनर म्हणून पाहू लागला आहे पण सोनाक्षीवरचं त्याचं प्रेम त्याला रुपबरोबर पुढे जाऊ देत नाही. या सगळ्या
पार्श्वभूमीवर अरिजीतच्या आवाजातलं टायटल सॉन्ग हा या चित्रपटातला एकमेव हाय पॉईंट म्हणता येईल.
आगे की स्टोरी ब्रेक के बाद....
याची गाणी छान आहेत. स्पेशली
याची गाणी छान आहेत. स्पेशली याचे टायटल साँग आधीही फार आवडीचे होते. आता हा धागा सारखा नजरेस पडून पुन्हा ऐकू लागलो आहे. Addictive आहे. स्पेशली शेवटी जेव्हा मै तेरा मै तेरा सुरू होते त्याचा एक वेगळाच फॅन बेस आहे. आज लावले होते तेव्हा मै तेरा मै तेरा भाग येताच मुलगी सुद्धा सोबत गाऊ लागली. तिचे पाठ होते याचा अर्थ इन्स्टा रीळमधून वायरल झालेले असणार.
https://youtu.be/b4hrUSBP4nc?si=Ip7yJ88ORkEghSqw
आगे की स्टोरी................
आगे की स्टोरी..................
रूपचं संगीत शिक्षणही सुरु आहे. ती गात असताना बहार बेगम म्हणते की “कुछ बदल गया हैं, आप की आवाज़ में नहीं, आप के मन में”. कुठल्या जगात असतात असले संगीत शिक्षक? आमच्याकडे किती वेळ रियाझ केला होतास यापलीकडे प्रश्न विचारला तर जगबुडी होईल अश्या अविर्भावात वावरायचे. रूप हा प्रश्न उडवून लावते. पण पुढच्याच शॉटमध्ये रूप जफरच्या हाताचा आधार घेऊन बोटीत उतरताना बहारला दिसते. पार्श्वभूमीवर तिच्या महालाच्या आणि आजूबाजूच्या भिंतीतील कोनाड्यात भर दिवसा लुकलुकणाऱ्या पणत्या, तुळशी वृंदावनटाईप स्ट्रक्चर्समध्ये यज्ञकुंडासारखी पेटवलेली आग, उदकाचे तळे, त्यातली प्लॅस्टिकची कमळे वगैरे जामानिमा आहेच. करण जोहरला एक तर 'मैं तुलसी..' पिक्चर आवडत असावा किंवा मग रूप जफरच्या आयुष्यातल्या अंधारात आलेलं प्रेम आता वणव्याचं स्वरूप घेणार आहे असा काहीतरी क्रिप्टीक संदेश असावा. पण तो अर्थातच आपल्याला समजत नाही. बहारच्या चेहऱ्यावर सुटेबल कन्सर्न लाईन्स दिसू लागल्या आहेत.
इकडे रूप तिचा तो सो कॉल्ड हिरामंडीवरील रिपोर्ट नवऱ्याच्या ऑफिसमध्ये सबमिट करते. काय लिहिलं होतं त्यात देवच जाणे. कारण पुढच्याच शॉटमध्ये ये छापनेलायक नहीं हैं म्हणून तो रिपोर्ट तिच्या डेस्कवर आणून आदळतो. रूप ऑफ़ेन्ड होते. संजय दत्त याचं काही होऊ शकत नाही या अर्थाने मान हलवतो. कमाल आहे. पेपर आहे ना तुझा? आत्तापर्यंत तुम्ही स्टील फॅक्टरी आणावी की नाही, पूर्ण स्वातंत्र्य मागावे की नाही या अर्थाची आर्टिकल्स छापत होतात. आता सुनेसाठी म्हणून एकदम बुल फाइट्स वगैरे छापायला लागणार का?
आता करण जोहरला आठवतं की आपण संजय माधुरीची लव्ह स्टोरी दाखवण्यासाठी त्या दोघांना पिक्चरमध्ये घेतलं आहे. त्यामुळे त्या दोघांवर फोकस केला पाहिजे.
जनरली रात्री तवायफांकडे गाणी-बजावणी होतात अशी आपली पूर्वापार समजूत. त्यामुळे माधुरी रात्री बिझी असणे अपेक्षित आहे. पण कजो तिला सफाई कर्मचाऱ्यांचे काम वाचवण्यासाठी रात्रीच दुपट्ट्याने गल्ली झाडत कुठे तरी पाठवतो आणि संजय दत्त खानदानी रईस असल्याने त्याला फक्त घराचा लांबलचक जिना उतरवत देवच्या खोलीत पाठवतो.
इकडे संजय दत्त देवला ‘हिरामंडीतल्या लोहारांचे गाऱ्हाणे ऐकून घे नाहीतर ते आपल्या मुस्लिम स्टाफला संप करायला भाग पाडतील’ असा सल्ला देतो. आपल्याला हा संवाद लॉजिकल वाटेल की बापाला आपल्या सध्या पोरगा बघत असलेल्या व्यवसायाची चिंता आहे. पण एवढं लॉजिकल वागायला लागले तर तो श्याम बेनेगल वगैरेंचा सिनेमा होईल करण जोहरचा नाही. त्यामुळे देव त्याला विचारतो की तुम्हांला नक्की कोणत्या विषयासंबंधी बोलायचे आहे? संजय दत्त म्हणतो 'रूप'.
तोवर माधुरी जफरकडे पोहोचली आहे. जफर अपमान करून बहारला हाकलतो पण ती म्हणते ‘रूप को बख़्श दे जफर.’ इकडे संजय दत्त देवला विचारतो ‘किती दिवस खऱ्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणार आहेस?’ देव म्हणतो 'जोपर्यंत वर्तमान जिवंत आहे.' वरून टोमणा मारतो 'तुमच्याकडूनच शिकलोय.' इकडे जफर बहारला विचारतो ‘तुला रूपची एवढी चिंता कशाला?’ बहार म्हणते 'या सगळ्यात रूपची काही चूक नाही.' जफर म्हणतो 'या सगळ्यात माझीही काही चूक नव्हती.' पण हे सगळं म्हणजे काय हे अजुनी गुलदस्त्यातच आहे.
इकडे संजय दत्त म्हणतो 'शिकायचंय आहे तर मर्द बनून आपल्या प्रॉब्लेम्सशी लढायला शिक. आपल्या आयुष्याची जबाबदारी इतरांवर ढकलू नकोस'. या पिक्चरमध्ये पहिल्यांदाच कुणीतरी काहीतरी सेन्सिबल बोलले आहे. पण देव त्याचा पोपट करतो. 'तुमच्यासारख्या मर्दाकडून मला काहीच शिकायचं नाही.' वास्तविक संजय दत्तने ‘माझ्याकडे बघ आणि शिक’ असं काही सांगितलं नव्हतं.
इकडे बहार जफरला विचारते 'तू अब्दुलला वापरून अवामला त्यांच्याविरुद्ध भडकावतो आहेस. तरी मी तुला काही बोलले नाही. पण रूप? दुसऱ्यांच्या गुन्ह्यांची सजा तिला का देतोस?' जफर म्हणतो 'दुसऱ्यांच्या नाही तिला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळते आहे, अम्मी.' ज्या प्रेक्षकांनी आत्तापर्यंत जफर आणि बहारचं नातं ओळखलं नव्हतं त्यांच्यासाठी ते ठळकपणे एकदाचं सांगितलेलं आहे. शिवाय हे ही एस्टॅब्लिश झालेलं आहे चित्रपटातील तिन्ही प्रमुख पात्रं आपापल्या एकल पालकांवर नाराज आहेत.
आता जफर सांगतो 'तू एका विवाहित माणसावर प्रेम केलंस आणि मुलाला जन्म देऊन रस्त्यावर फेकून दिलंस.' बहार म्हणते मी १७ वर्षांची होते. माझं प्रेम जडलं होतं त्याच्यावर. अजूनही त्यातून बाहेर पडले नाहीये मी. तिकडे संजय दत्त म्हणतो 'चुक झाली माझी. मी ती आजतागायत सुधारू शकलो नाही.' म्हणजे अजूनही संजय माधुरीचं एकमत नाहीच आहे या विषयावर. तिकडे देव मात्र ठाम आहे की 'डोकं ताळ्यावर असताना केलेल्या चुकीला बेईमानी म्हणतात. आणि तुम्ही अजूनही तुमचा गुन्हा कबूल केलेला नाहीत.' रूप या विषयावरून गाडी घरंगळलेली आहे. पण तसा तर अख्खा पिक्चरच घरंगळतो आहे. त्यात रुपचं काय विशेष?
तर बहार बरळतेच आहे की ‘मी प्रेमात स्वार्थी झाले. मला वाटलं मुलाच्या निमित्ताने तरी मी बलराजच्या (संजय दत्तचं नाव आपल्याला फायनली समजतं) अजून जवळ जाईन. पण त्यामुळे तो माझ्यापासून अधिकच दुरावला. मला वाटलं की मुलाची भानगड नको म्हणून तो टाळतो आहे. तुलाच आयुष्यातून बाजूला केलं तर तो परत येईल. मला उशिरा समजलं की तो तुझ्यापासून नाही तर माझ्यापासून लांब जात होता. मी तुला न्यायला परत आले.'
इथे जफरच्या रागाचा स्फोट होतो. तो म्हणतो 'फेकलेल्या गोष्टी सडून जातात. आपलं नातंही सडलंय. तुझ्या अंत्ययात्रेसाठीच मी आता तुझ्याकडे परत येईन.' एखादा नाजूक विषय कसा हाताळू नये याचं जिवंत उदाहरण म्हणजे बहारचा हा सीन.
इकडे संजय दत्तने त्याच्या परीने विषयाचा इस्कोट करण्यास हातभार न लावून कसं चालेल? तो देवला सांगतो की 'माझं लग्नही जबरदस्तीने झालं होतं. म्हणून मी घराबाहेर प्रेम शोधलं. रूपसोबत असं होऊ नये. या नात्याला वाचवायचा प्रयत्न कर'. पण देव अजून वाळूत डोकं खुपसुनच बसलेला आहे. म्हणे 'कम से कम मैं रूप की इज़्ज़त करता हूँ. तुम्ही माझ्या आईचा कधीच मान ठेवला नाहीत. तिने पूर्ण आयुष्य स्वतःला दोष देत घालवलं. तुमच्या मुलालाही ती आपलं मानून घ्यायला तयार होती. तुम्ही ऐकलं असतंत तर आपलं घर वाचलं असतं. पण तुम्ही आपल्या गर्विष्ठपणामुळे ती संधी गमावलीत. त्या मुलाची चूक नव्हती. पण आता त्याला भेटलो तर तुमच्याविषयीचा राग वाढेल.'
मी इथे डोके खाजवते आहे की बलराजने बहारला झिडकारलं होतं ऑलरेडी. मग देवची आई त्यांच्या मुलाला कशी काय ऍक्सेप्ट करणार होती? आणि इथे तिसरं प्रेमपात्रही नाही मग बहारला सोडून गेला बलराज कुणीकडे? यातून एवढंच समजलं की देव त्याच्या सावत्र भावाला कधी भेटलेला नाही. त्यासाठी एवढा लंबाचौडा डायलॉग? फायनली देव त्याला सांगतो की 'मी माझी नाती कशी संभाळावीत हा सल्ला तुम्ही मला देऊ नका.' फेअर पॉईंट. शिवाय बापाचा सल्ला मानून रूपकडे लक्ष दिलं तर दिग्दर्शक पुढचा दीड तास काय दाखवणार?
संपला एकदाचा सीन म्हणून आपण हुश्श करणार तेवढ्यात वरुण वैतागला ना. मला एका डायलॉगवर निपटवता का? तो म्हणतो 'माझ्या बापाने त्याच्या औरस मुलाला त्याची संपत्ती, मानसन्मान दिला. आता मी त्याची सून हिरावून त्याचं घर बरबाद करणार. एके काळी ज्या माणसाने मला नाकारलं त्याला मी असे तडाखे देईन की तो माझ्याकडे माफी मागत येईल आणि तेव्हा मी त्याला माफ करणार नाही. मी नरकापेक्षाही भयंकर सूड घेईन.' बहार म्हणते की 'त्याने तुझं काय भलं होणार आहे? तुला तुझा बाप, तुझं बालपण, सन्मान मिळणार आहे का?' जफर म्हणतो 'माझ्याकडे तर गमावण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे मला माझं उध्वस्त होणं मंजूर आहे.'
दरम्यान आपण कुणाविषयी बोलत आहोत याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून आलियाला झोपेतून दचकून जागं होताना दाखवलं आहे.
अख्ख्या सीनमध्ये आलियाला सॉफ्ट व्हाईट, सोनाक्षीला कलर्ड एम्ब्रॉयडरीवाले व्हाईट, देवला स्टिफ व्हाईट, बलराजला व्हाईट कुर्त्यावर काळी शाल, बहारला पूर्ण काळे कपडे देऊन दिग्दर्शकाने आपल्या परीने कोण चूक कोण बरोबर ठरवलेले आहे. जफरला बेज कलर का दिला कुणास ठाऊक.
तर पूर्ण काळ्या कपड्यातली बहार आर्टिस्टिक ग्रे-गोल्ड टीसेट सदृश फ्लोअरवर बसून रडून दुःख व्यक्त करते. बलराज गंभीरपणे कुठेतरी बघतो म्हणजे त्याला पश्चात्ताप झालाय की राग आलाय की वाईट वाटतंय हे आपलं आपण समजून घ्यायचं.
रूपकरवी बलराज अँड सन्सना
रूपकरवी बलराज अँड सन्सना उध्वस्त करण्याचा प्लान अंमलात आणण्यासाठी जफर आता अब्दूलला भरीस घालतो. तो लोहार, मशिन्स, इन्ग्रज असा नेहमीचाच अनाकलनीय घोळ घालत आहे. पण त्यामुळे बलराज चौधरी केवळ पब्लिशर नसून त्यांच्या काही फॅक्टऱ्या आहेत हा ही शोध आपल्याला लागतो. मग बलराज आणि देव दोघेही पब्लिशिंग हाऊसमध्येच का पडीक असतात याचा मात्र शोध लागत नाही.
आता एडी स्वतःचेच केस उपटत : सर हम बँटवारे पे फिल्म बना रहे हैं|
कजो : हाँ तो?
एडी: फाळणीत धार्मिक दंगली झाल्या होत्या?
कजो : मग?
एडी: सर स्टोरीमध्ये अजून धार्मिक अँगल आलाच नाही.
कजो: नाही कसा? जफर आणि बहार विरुद्ध बलराज, देव आहेत ना?
एडी: बॅडमिंटन मिक्सड डबल्स करवतोय का आपण इथे?
कजो: त्या लेखकाला बोलाव आणि त्याला डायलॉग ऍड करायला सांग 'बलराज चौधरी जैसे लोग अपने मजहब को ही अपना मक़सद बना लेते हैं| अगर वो लोग अपने मजहब के लिए लड़ रहे हैं तो हम क्यों नहीं?'
एडी: क्काय? पेपर काढण्यात कसला आलाय मजहब-मक़सद?
कजो: तुला मजहब हवा होता ना? मग जास्त बोलू नकोस. त्या डायलॉग रायटरला बोलवलं तर अजून पैसे घेईल.
ऍज एक्सपेक्टेड अब्दुललाही हा डायलॉग समजलेला नाही त्यामुळे तोही आपण नेमकं काय लॉजिक सांगून लोकांना यावरून चिथवावं असा गंभीर विचार करतो.
इथे पटकथाकार पिसाटला आहे कारण हे सगळं डिस्कशन पिवळ्या कपड्यात तयार होऊन सुरु आहे.
प: सर, हे काय चाललंय?
कजो: आता काय झालं?
प:अर्ध्या एक तासाने धर्मावरून दंगल करायची आहे ना? मग हिंदू मुस्लिम दोघेही वसंतोत्सवासाठी पिवळे कपडे घालून का फिरताहेत? जरा तरी धार्मिक तेढ नको का दाखवायला?
कजो: किसने कहा? वन शूड नेव्हर मिस अ चान्स टू ड्रेस अप. दंगल काय होत राहील. तू जा.
रूपकडे आता आर्टिकल लिहिण्याचा बहाणाही नाही. तरी देवने बापाचं बोलणं मनावर घेतलं नसल्यामुळे ती परत हिरामंडीमध्ये आलेली आहे. तिथे जफर सत्याविषयी विचारून रूपला नवऱ्याविरुद्ध फितवायचा प्रयत्न करतो. रूप त्याला 'मेरी ज़िन्दगी हैं क्या एक कटीपतंग' टाइप उत्तर देऊन झुलवते. तो ही 'यहां के लोगों को पतंगों की उड़ान से ज्यादा दूसरों की काटने में मज़ा आता हैं| मैं पतंगों की तरह इश्क़ लड़ाता हूँ, कटता नहीं' वगैरे अगम्य लॉजिक देऊन I care less dude बनण्याचा प्रयत्न करतो.
ती मात्र 'जो लोग दूसरों की बर्बादी को अपनी जीत मानते हैं वो अंदर से बर्बाद होते हैं' असं सुनावते. दोघेही मानसिक आकर्षणाच्या पायऱ्या ओलांडत असताना जफर स्वतःला सावरतो.
रूप आता बहारकडे मन मोकळं करण्याचा प्रयत्न करते की 'तू म्हटलेलीस ते खरं होतं. काहीतरी बदललं आहे माझ्यात. जफरमुळे.' बहार बेगम तिला अडवत सांगते की 'बाई तुझं लग्न झालेय.' रूप म्हणते 'ते लग्न नव्हतं तो व्यवहार होता.' बहार म्हणते की 'या गोष्टी मनातही आणणं चुकीचं आहे.' रूप म्हणते की 'मला वाटलं तुला समजेल.' बहार खडसावते की 'मी कोठेवाली आहे तरीही अश्या गोष्टींशी सहमत होणार नाही.' वर सांगते की 'तुझा नवरा चांगला माणूस आहे.' रूप विचारते 'फक्त चांगला माणूस असणे पुरेसे आहे का आयुष्यभरासाठी.' इथे जफरला कियारासोबत गुटर्रघू करणे आवडेनासे झाले आहे.
इकडे कन्फ्यूज्ड अब्दूल देवला भेटायला आलेला आहे. तो म्हणतो की ‘फॅक्टऱ्या आल्या तर सगळे लोहार बेरोजगार होतील ही बातमी छापण्यालायक नाही का?’ देव म्हणतो ‘पण फॅक्टऱ्या आल्या तर देशाची प्रगती होईल. लोहारांनाही त्यात काम मिळेल.’ अब्दूल म्हणतो की ‘आम्ही गुलामी नाही स्वीकारणार. पहिल्यांदा ईंग्रजांची आणि आता हिंदूंची.’ देव म्हणतो ‘प्रत्येक गोष्टीत धर्म आणला तर देशाची प्रगती कशी होणार?’ त्यावर अब्दूल म्हणतो की ‘मुस्लिम लीगने निवडणूक जिंकल्या आहेत. आता तुम्ही देशाची चिंता करू नका, स्वतःची करा.’
इथे कजो लॉजिकपुढे मी पार हरले. मुस्लिम लीग राज्यकर्ते होणार आहेत तर फॅक्टऱ्या आल्या काय किंवा नाही, मुस्लिम लोहारांनी हिंदूंची गुलामी करण्याचा प्रश्न काय येतो?
देव म्हणतो की ‘मी सगळ्यांची चिंता करतो कारण इतरांच्या वाईट परिस्थितीचा गैरफायदा घेत नाही.’ फायनली अब्दूल सांगतो की ‘गोष्टी आता धर्मावरच उतरल्या आहेत. आमचा मुल्क झाला की तुम्हांला कोण दाद देणार?’
तिथेच अब्दुलला कळतं की रूप देवची दुसरी बायको आहे. याचा काय सिग्निफिकन्स आहे देव जाणे कारण तिचं लग्न झालंय हे तर त्याला ऑलरेडी माहित असतं.
बोरूबहाद्दूर मुन्शीकडे स्वतः जामीन राहून रूप जफरला तलवारींचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देते. जफरला तिच्या चांगुलपणावर विश्वास नाही की जगावरच विश्वास नाही कोणास ठाऊक. पण सूडाच्या भावनेतून आता प्रेमाची कोवळी पालवी त्याच्याही मनात फुटू लागली आहे.
इथे घरात आणि देव फायनली नॉर्मल बोलायला लागतात. ती ही त्याला सांगते की 'आज़ादी की कीमत बँटवारा हैं'. तुझा 'एक मुल्क एक अवाम' विचार त्यांना पटणार नाही.
एवढे होऊन बँटवारा झालाच तर काय होईल, आपण काय करायचं हा विचार दोघांपैकी कुणाच्याही डोक्यात येत नाही. इकडे सोनाक्षीही त्यांना बोलताना पाहून इमोशनल होते. टायटल सॉन्गचा दुसरा पार्ट इथे घडतो.
अब्दूल रूपला हिरामंडीत येताना पाहून जफरला सावध करण्याचा प्रयत्न करतो. तिच्या नवऱ्याला पाहिलं आहेस का विचारतो. जफर सांगतो पाहायची इच्छाही नाही. अब्दूल देवला ओव्हरराईड करून आर्टिकलसाठी बलराजकडे जातो. मला समजतच नाही की नाही छापलं बलराजच्या पेपरने तुमचं आर्टिकल तर काय एवढं? सत्ता तर तुमची येते आहे ना?
आता जफरही रूपपासून राहण्याचा प्रयत्न करतो आहे.
फायनली कजोच्या टीममध्ये कुणालातरी डायरेक्ट एक्शन डे नामक काहीतरी प्रकार आठवतो आणि पिक्चरमध्ये संजय दत्त सांगतो की आपल्याला कदाचित हुस्नाबाद सोडावे लागेल. पण तोवर सोनाक्षी सिन्हा गंभीर आजारी झाल्याने आणि तिला प्रवास झेपणार नसल्याने देव हुस्नाबाद सोडायला नकार देतो. देव विरुद्ध जनमत पेटवलेलेच असते. त्यातून वेळोवेळी व्ही वि अहमद आणि अनंगपाल त्याला वाचवत असतात.
रूप जफरला गाठते आणि सांगते की तिला हुस्नाबाद सोडावे लागेल. पण तिला हुस्नाबाद सोडायचे नाही कारण तिचं तिच्या नवऱ्यावर आणि त्याचं तिच्यावर प्रेम नाही. ती जफ़रकडे आपल्या प्रेमाची कबुली देते. पण जफर तिला नकार देतो. तिला हे ही सांगतो की मी स्वार्थासाठी तुझ्याकडे आलो होतो. ती जफ़रला प्रेम न करण्याची कारणं सांगू नकोस, प्रेम करण्याचं कारण शोध असं सांगून घरी येते.
इकडे माझ्या वाटचा संसार रूपबरोबर कर, माझी स्वप्नं तिच्यामार्फत पुरी कर सांगून सोनाक्षी फायनल एक्झिट घेते.
जाण्यापूर्वी तुम्ही लवकरात लवकर हुस्नाबाद सोडा हा सल्ला देण्यास ती ही विसरत नाही. पण देव कुठल्या जगात जगतो कुणास ठाऊक.
सिक्सर पे सिक्सर..
सिक्सर पे सिक्सर..
माझेमन, एक कॉमेडी सीरियलचा भारी एपिसोड होईल यावर...
कुठल्या जगात असतात असले संगीत
कुठल्या जगात असतात असले संगीत शिक्षक? >>>>
भिंतीतील कोनाड्यात भर दिवसा लुकलुकणाऱ्या पणत्या, तुळशी वृंदावनटाईप स्ट्रक्चर्समध्ये यज्ञकुंडासारखी पेटवलेली आग, उदकाचे तळे, त्यातली प्लॅस्टिकची कमळे वगैरे जामानिमा आहेच >>>>
माझ्या बापाने त्याच्या औरस मुलाला त्याची संपत्ती, मानसन्मान दिला. आता मी त्याची सून हिरावून त्याचं घर बरबाद करणार >>> इथे मधेच "त्रिशूल" डोकावला.
धमाल लिहीले आहे. पुढचेही नीट वाचायचे आहे पिक्चर बघून. कारण आत्तापर्यंत वाचताना असेच जाणवले की पिक्चर बघिल्याशिवाय हे नीट कळणार नाही.
मात्र उदकाचे तळे, प्लॅस्टिकची कमळे वरून श्रावणातील कहाण्या आठवल्या. तशाच ढंगात मुद्दाम लिहीले आहे ना?
करण जोहरचा चित्रपट - कलंक
करण जोहरचा चित्रपट - कलंक
द्विरुक्ती झाली.
रूपला म्हणे सोनाक्षीच्या
रूपला म्हणे सोनाक्षीच्या मृत्यूनंतर कित्येक महिने तिची उणीव भासत भासत होती. ही बाई सोनाक्षीशी बोलताना तर कधी दिसली नाही. मुळात घरापेक्षा जास्त तर ही हिरामंडीमध्ये असायची आणि उरलासुरला वेळ पब्लिशिंग हाऊसमध्ये. सोनाक्षीला मिस करण्याइतपत यांचे बॉण्डिंग झाले कधी?
नेमकं ईदीच्याच दिवशी देव एक मुल्क एक अवाम याबद्दल काहीतरी लेख लिहून तो छापायला देतो. व्ही वि अहमद देवला समजावण्याचा प्रयत्न करतो की अब्दुलचा पक्ष आता स्ट्रॉंग आहे. या आर्टिकलविषयी परत विचार करा. मला आर्टिकलविषयी हे काय ऑब्सेशन आहे तेच समजत नाही. अरे अब्दूल वरचढ होतोय तर कशाला त्याला चिथावतो आहेस? तो तुमच्याच ऑफिसमध्ये तुम्हाला धमकी देऊन गेलाय तर आधी आपलं कुटुंब, व्यवसाय वगैरे वाचवण्याकडे लक्ष द्याल की नाही? ऑफिसमधून निघताना अहमदला रूप भेटते. यावेळी तो तिला स्पष्ट विचारतो की तुझ्या नवऱ्याला समजतं आहे का ती तो काय करतो आहे. आधीच लोक त्याला मारण्यासाठी टपले आहेत. रूपचं काही ऐकून न घेता सोनाक्षीच्या आठवणीत देव नदीच्या काठी जाऊन दारू पित बसतो. सगळे पब, क्लब उलथले काय?
आणि तिथे त्याला भेटतो, यू गेस्ड इट करेक्ट, जफर. आणि दिग्दर्शकाने किमान २ डीटेल्ड सीन्स आणि पानभर डायलॉग वाया घालवून आपल्या मनावर ठसवले आहे की हे दोघे एकमेकांना ओळखत नाहीत. त्यांच्या गप्पांमधून एकटं दारू पीत बसलं तर तुम्ही दुःखी असता आणि गोतावळ्यासोबत दारू पीत बसला असाल तर तुम्ही आनंद साजरा करत असता अशी मौलिक माहीत आपल्याला मिळते. तसंच हुस्नाबाद नामक गावात (जे मुस्लिम लीग जिंकल्यामुळे पाकिस्तानात जाण्याची शक्यता असते) तिथे ईद साजरी करण्यासाठी गंगाआरतीसारखे दिवे पाण्यात सोडत असे विविधता में एकता दर्शवणारे दुर्मिळ दृश्य आपल्याला दिसते.
पण आपण विषयाकडे वळू. त्यासाठी आपण हिंदी चित्रपटातला एक महत्वाचा नियम लक्षात घेऊ. जर एकाच बाईशी बाप, भाऊ किंवा तत्सम सात्विक नात्याने न जोडलेले तरुण पुरुष चित्रपटात असतील तर त्यातला एक तिचा माजी प्रियकर (किंवा एकतर्फी आशिक) आणि दुसरा तिचा सद्य नवरा (किंवा मंगेतर) असण्याची शक्यता ९९.९९% असते. त्याचा एक उपनियम असाही आहे की ते जर एकमेकांना भेटले नसतील तर ते एकाच सीनपुरते आणि अश्या ठिकाणी भेटतात जिथे त्या क्षणी इतर माणसांचा वावर शून्य असतो. उपनियम क्रमांक २ असा आहे की अशा वेळी आयुष्यात पहिल्यांदाच भेटलेल्या माणसाशी स्वतःचं नाव, गाव, 'मुंबईत पावसात फार चिकचिकाट असतो नाही' किंवा 'तुम्हांला काय वाटतं स्पेन जिंकेल का अर्जेंटिना?' असल्या रँडम विषयांवर गप्पा न मारता ते एकदम आपापले दर्द ए दिल बयाँ करतात. उपनियम क्रमांक ३ असा आहे की या गप्पा साधारण कोल्डवॉर दरम्यान एकमेकांची सीक्रेट्स चोरताना ती जेवढी जास्तीत जास्त क्रिप्टीक ठेवायचे त्याच लेव्हलच्या किंवा 'एक नाम हैं प्यार उसी का, दूसरा नाम जवानी' अश्या ओळखा पाहू कॅटेगरीतल्या असणे गरजेचे असते. उपनियम क्रमांक ४ नुसार या गप्पानंतर संबंधित पात्रं (किंवा मेषपात्रं) जिगरी दोस्त बनतात आणि नवीन मैत्री गाणे गाऊन साजरी केली नाही तर फाऊल धरलं जातं.
त्याला अनुसरून जफर आणि देव कृती सॅनॉनसोबत ‘सैंया मेरा ऐरा गैरा नत्थु खैरा’ नामक टुकार गाण्यावर डान्स करून आपली नयी नवेली दोस्ती आणि ईद साजरी करतात. त्यांना एकत्र पाहून अब्दूलचं ‘ई का हुई गवां’ होतं.
इकडे देवची वाट बघून बलराज रूपला म्हणतो की ‘सत्याने या घराला सांभाळलं होतं, तू तुझी जबाबदारी लक्षात घे.’ रूप सांगते की ‘मला शक्य नाही ही जबाबदारी घेणं.’ बलराज म्हणतो की ‘तुझा नवरा कित्येक रात्री घरी आलेला नाही.’ एक, एक मिनिट बलराज. आज इथे ईद सेलेब्रेट होतेय, नवरात्र नाही का टाईम वार्प झालाय तुझ्यासाठी? तर गोष्ट अशी की सासरा सुनेला सांगतो की नवऱ्याकडे लक्ष दे आणि सून सरळ हात वर करते. सासरा शेवटचा बॉम्ब टाकतो की ‘१५ दिवसात आपण हुस्नाबाद सोडून जातोय.’ चला एकाला तरी परिस्थीतीचं भान आहे म्हणून आपण हुश्श करतो तोवर सून त्याला डिफ्यूज करते ‘मी काही हुस्नाबाद सोडू शकत नाही. माझं या शहरावर प्रेम जडलं आहे.’ ही बाई डोक्यावर पडली आहे का? ‘फाळणी होणार आहे हे वास्तव स्वीकार’ असं हिनेच अर्ध्या तासापूर्वी नवऱ्याला सांगितलं होतं ना? बरं जफरनेही हिला हिरवा सिग्नल दिला नाहीये ही कशाच्या जोरावर थांबणार आहे?
एकदा नवऱ्याची जबाबदारी झुरळासारखी झटकून टाकल्यावर रूपला काय होतं कुणास ठाऊक. ती एक स्टायलिश शाल घेऊन बाहेर पडते ते थेट हिरामंडीत जाते. हिला काय स्वप्न पडलं होतं का नवरा हिरामंडीत आहे याचं? आणि बदनाम वस्तीत रात्री ही बाई एकटी गाडी घेऊन जाते? दिवसढवळ्या तर ड्रायव्हरसोबत यायची. इकडे सावधान पोझिशनमध्ये उभं राहून अचिंत कौर बलराजला रूप आणि जफरविषयी सांगते. आत्तापर्यंत बलराजला माहितीच नव्हतं? मग तो देवला सावध कशावरून करत होता?
दरम्यान आपण हिरामंडीत काय चालले आहे ते बघू. रूप पोहोचते ते नाचणाऱ्यांच्या घोळक्यात. तिथे तिला अर्थातच जफर आणि देव दिसतात. जफरला ती आधी दिसते. पण देवचं तिच्याकडे लक्ष गेल्यावर साहजिकच त्याला ती आपल्यासाठी आली आहे असं वाटून तो पुढे होतो. रूप त्याला घेऊन घरी जाते आणि इकडे फायनली जफरला समजतं की हाच आपला आर्च-नेमेसिस.
इकडे जफरशी मन मोकळं केल्यामुळे का बाटलीभर दारू प्यायल्यामुळे का रूप आपल्याला न्यायला आली म्हणून देव 'आय एम रेडी टू टॉक' मोडमध्ये येतो. ’गेल्या वर्षभरात मी तुझ्याबरोबर जे वागलो त्यामुळे जर तुला वाईट वाटत असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो.’ नाही रे बाळा. आपल्या नवपरिणीत दुसऱ्या पत्नीला सुहागरात के दिन माझं फक्त माझ्या पहिल्या पत्नीवर प्रेम आहे असं सांगितलं की तिला आनंद होतो. वाईट वाटलं असेल तर म्हणे. पुढे तो म्हणतो ‘तुला हवं तर तू वेगळी होऊ शकतेस किंवा आपल्या लग्नाला अजून एक चान्स देऊ शकतेस. तुझा कुठलाही निर्णय मला मान्य असेल.’ तुला ढीग मान्य असेल रे. तुझ्या बापाचं काय?
इकडे संजय दत्तने गोष्टी आता आपल्या हातात घेतल्या आहेत. तो ही त्याच रात्री बहारकडे येतो. तिथे कुठलेही कलारसिक नाचगाण्याचा आस्वाद घ्यायला उपस्थित नसताना २०-२५ बायका ड्रेस अप करून उगीचच नाचताहेत. ऑलमोस्ट मध्यरात्री बहारच्या वेणी घातलेल्या केसांना कियारा धूप दाखवत आहे. पण आपल्याला काय करायचंय? असेल तिचं am-pm routine.
ख़ालिस उर्दूमध्ये एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढून झाल्यावर बलराज बहारला सांगतो की तुझ्या मुलाला समजाव. तेवढ्यात जफर तिथे पोहोचतो. परत एकमेकांना शिव्याशाप देऊन झाल्यावर जफर त्याला सांगतो की तू मला स्वीकारणार तर नाहीस पण तू मला नाकारूही शकत नाहीस. मला तुझं काहीच नको. मला तुझ्या मुलाच्या वाटची रूप तेवढी मला दे. दे काय? कॅरमची सोंगटी आहे का ती? बलराज अर्थातच त्याला धमकावतो की माझ्या मुलाच्या वैवाहिक आयुष्यापासून लांब रहा. नाहीतर परिणाम ठीक नसतील. आता जफरही सुनावतो की तिच्या प्रेमावर माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अरे स्वराज्याची मागणी नाही करत आहेस तू. आणि ती जेव्हा स्वतःच्या पायाने तुझ्याकडे चालत आलेली तेव्हा तू तिला झिडकारलंस. तिला विचारलंस का तिने निर्णय बदलला आहे का? तुझ्यासमोर नवऱ्याला घरी घेऊन गेली ना रे ती? असो. तो तावातावात निघून जातो. बलराज बहारला सांगतो की तुझ्या माझ्याविषयी खूप तक्रारी आहेत. पण तुलाही मान्य आहे की माझं आजचं म्हणणं चुकीचं नाही. इकडे बहारकडून बाहेर पडलेल्या जफरवर प्राणघातक हल्ला होतो.
आत्तापर्यंत वाचताना असेच
आत्तापर्यंत वाचताना असेच जाणवले की पिक्चर बघिल्याशिवाय हे नीट कळणार नाही.
>>>>>
पिक्चर पाहूनही हा काय प्रकार आहे ते कळणार नाही. आडातच नाहीये पोहऱ्यात कुठून येणार? करण जोहरने तरी हा चित्रपट पूर्ण पाहिला असेल का याविषयी मला शंका आहे.
पहायचा रेको मी फक्त 3 प्रकारच्या माणसांना देईन
- ज्यांना कशाची तरी पिसं काढायची तीव्र इच्छा आहे
- सॉफ्ट फेमिनाईन एनर्जीवाल्या ताई. त्यांना उदाहरणं द्यायला भरपूर मटेरियल मिळेल
- ज्यांना एखाद्या समारंभासाठी pinterest board वगैरे न वापरता लूक्स डिझाईन करायचे आहेत.
बाकीच्यांनी टायटल व बोनस ट्रॅक पाहून संपूर्ण पिक्चर समजून घ्यावा.
श्रावणातल्या कहाण्या - हो हो. सेट डिझाइन्स त्यावरूनच घेतले असावे अशी दाट शंका आहे मला.
आलियाच्या नावावर चाललेला अजून
आलियाच्या नावावर चाललेला अजून एक पिक्चर.
अल्फा सारखा पिक्चर तर फक्त आलिया साठीच बनवला. भारताची पहिली लेडी सुपरस्टार जिच्या साठी असे पिक्चर बनतात.
ना शर्मिला ना वहिदा ना नूतन ना मधुबाला
ना हेमा ना रेखा ना जया आणि सुषमा.
ना श्रीदेवी ना माधुरी ना जुही ना दीपिका.
कुठलेही कलारसिक नाचगाण्याचा
कुठलेही कलारसिक नाचगाण्याचा आस्वाद घ्यायला उपस्थित नसताना २०-२५ बायका ड्रेस अप करून उगीचच नाचताहेत. ऑलमोस्ट मध्यरात्री बहारच्या वेणी घातलेल्या केसांना कियारा धूप दाखवत आहे. पण आपल्याला काय करायचंय? असेल तिचं am-pm routine.>>>> अर्रे देवा


खूप हसलेय..
मुलाच्या वाटची रूप तेवढी मला दे. दे काय? कॅरमची सोंगटी आहे का ती? >>>
पण हा हल्ला घडवून आणलेला असतो
पण हा हल्ला घडवून आणलेला असतो अब्दूलने. जफर अर्थातच हिरो असल्याने तो सर्वांचा निःपात करतो.
इकडे बहार बेगमला हिंदी चित्रपट नियम आठवतो की त्याग हेच तवायफ़चे भूषण. पण बलराजने तिचा ऑलरेडी त्याग केल्यामुळे तिला त्याचा त्याग करता येणार नसतो. मग उरला बिचारा जफर. पण त्याचाही तिने त्याग केलेला आहे. आता काय करावं? मग ती सत्याचा (म्हणजे सोनाक्षीचा नाही. तिचा दिग्दर्शकाने ३० मिनिटांपूर्वी त्याग केलेला आहे.) त्याग करू इच्छिते. त्यामुळे ती उठून रुपकडे येते. ती रूपला सांगते की जफर तिचा व बलराजचा मुलगा आहे आणि फक्त बलराजला उध्वस्त करण्यासाठी त्याने तिचा वापर करून चेतला आहे. रूपवर आकाश कोसळलेले आहे.
इकडे अब्दूलही उठून जफ़रकडे येतो आणि त्याला रूपविषयी भडकवण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत त्याने फक्त एका आर्टिकलपायी धमक्या देणे आणि इल्लॉजिकल गोष्टींवरून लोकांना चिथावणे असली फुटकळ कामे केली असल्याने त्याच्या अन्गात वीरश्री संचारलेली असते. तो म्हणतो की 'तू रूपच्या प्रेमात आंधळा झाला आहेस आणि तिला वापरून चौधरी तुला खेळवतोय. पण तुझा बदला मी घेईन.' जफर त्याला धमकी देतो की रूपला इजा केलीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही. दोन मित्रांमध्ये व्देषाची ठिणगी पडते. इकडे मित्र म्हणून जफर अब्दूलला सत्य परिस्थिती सांगतो पण परिणाम उलटाच होता. आत्तापर्यंत तू तुझ्या स्वार्थासाठी मला घाणेरड्या राजकारणात अडकवलंस. आता या आगीत मी हे शहर जाळून टाकेन. हा काय प्रकार आहे? यारी दोस्ती तुमची. त्याने तुला वापरलं तेव्हा तुला डोकं नव्हतं का? तू मूर्ख ठरलास यात शहराचा काय दोष?
इकडे बहार बेगम कियाराला सांगते की जफरच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून मी हे केलं. कियारा म्हणते की त्याचा जगण्याचा हेतूच तू हिरावून घेतलास. चाणाक्ष प्रेक्षकांनी इथे हि. चि नियम ओळखलेला आहे.
नवीन प्रेक्षकांसाठी थोडक्यात रिपीट करते.
नियम क्रमांक १. तुम्ही उपस्थित असताना (हे फार महत्वाचे आहे) जर तुमचे लग्न झाले असेल आणि जर समोरचा माणूस प्राण, जीवन, शशिकला कॅटेगरीतला नसेल किंवा काहीतरी उदात्त कारणास्तव त्याने तसा अविर्भाव आणला नसेल तर तुमची सुटका नाही.
अपवाद एकच - तुम्ही जिवंत नाहीत असा समोरच्याचा समज करुन देण्यात यशस्वी ठरलात तर थोडाफार चान्स आहे.
नियम क्रमांक २ : तुमचा गांधर्व विवाह झाला असेल/तुम्ही पुरणमासी के दिन किंवा तत्सम सुमुहूर्तावर चुकून जरी एखाद्याच्या गळ्यात माळ घातली असेल/तुम्ही भातुकली खेळताना जरी नवराबायको झाला असाल तरी नियम क्रमांक १ लागू.
नियम क्रमांक ३: तुम्ही केवळ नाईलाजाने व्हॅम्प, तवायफ़, कॅब्रे डान्सर झाला असाल पण इतर वेळी सात्विक, सोज्वळ, शक्यतो साडी नेसून देवपूजा वगैरे करणाऱ्या असाल तर तुम्हाला नायक/नायिकेला वाचवताना मरण्याचे सौभाग्य प्राप्त होते आणि नायक तुमच्या कपाळावर शक्यतो त्याच्या रक्ताने टिळा लावून अल्टिमेट औदार्य दाखवतो. नॉर्मल लग्न, संसार वगैरे गोष्टी तुमच्यासाठी नाहीत याची खूणगाठ बांधून ठेवा.
नियम क्रमांक ४ : तुमच्यासाठी सोज्वळ, सात्विक, किमानपक्षी चारचौघांत नेल्यावर लाज काढणार नाही असा जोडीदार उरला नसल्यास हा तुमची इहलोकीची यात्रा लवकरच संपणार असल्याचा सिग्नल मानावा. इतर ग्रहमान चांगले असल्यास काही निवडक लोकांना इहलोकातच परंतु दूरदेशी जाऊन मुख्य जोडीच्या लेकरांना खेळणी वगैरे पाठवून मामा बनावे लागते.
तर आपण चित्रपटाकडे वळू.
कोणीच ऐकत नाही म्हणताना संजय दत्त म्हणतो ‘मरा तिकडे. हा मी चाललो हुस्नाबाद सोडून.’ जाताना तो देवला सांगतो की ‘तू ज्याला ईदीच्या दिवशी भेटलास तोच तुझा भाऊ आहे.’ आता हे ऐकून देवने चेहऱ्यावर अनाकलनीय भाव आणलेत ज्याचा अर्थ मी सांगू शकत नाही.
इकडे एडी कारण जोहरकडे धावत आलाय.
एडी : सर माधुरी मॅम शॉट देणार नाही म्हणतात.
कजो: क्यों लेकिन?
एडी: सर त्या म्हणतात की तुम्ही त्यांना तवायफ़चा रोल दिलात. पण एक पण डान्स नाही.
कजो: असं? एक काम कर. एक डान्स देऊन टाक.
एडी: सर आत्ता? अजून आपली दंगल बाकी आहे.
कजो: अरे कुछ दुःखी गाना दे दे यार.
एडी: सर पण दुःखी तर रूप आहे.
कजो: मग तिला दुखी शॉट दे आणि माधुरी मॅमना डान्स करु दे. हाकानाका.
एडी: ओके सर
तर बहार आता ‘तबाह हो गये’ करत नाचते आहे. तेवढीच सुटका म्हणून कियारा जफ़रकडे जाते. इकडे काहीतरी निश्चय करून रूप देवकडे जाते.
रुपला आठवतं की आपलं वैवाहिक
रुपला आठवतं की आपलं वैवाहिक जीवन चालू ठेवायचं का नवऱ्याला सोडून जायचं याचा निर्णय देवने आपल्यावर सोपवला आहे. त्यामुळे ती तातडीने लग्न कंटिन्यू करायचा निर्णय घेते. हे सांगायला ती देवकडे जाते. देवचा 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे'वर प्रचंड विश्वास असावा. शिवाय त्याच्या रूमला काचेचे दरवाजेही नाहीत. त्यामुळे तो लगे हाथो much delayed सुहागरात पण उरकून टाकतो.
इतके दिवस जफर फ्लर्ट करत होता, रुपला टाळत होता तेव्हा त्याच्या मागे पार हिरामंडीपर्यंत गेली .पण आता बहार बेगमने सांगितलं तर लगेच विश्वास ठेवला. खरं खोटं करण्यासाठीही वेळ घेतला नाही. यांचा कम्युनिकेशन मॅट्रिक्स खरंच गंडला आहे.
कियाराचं मात्र डोकं ठिकाणावर आहे. ती माधुरीला सोडून जाते ती थेट जफ़रकडे आणि त्याला सांगते की त्याच्या मातोश्रींनी काय घोळ घातला आहे तो. तो ही धावत रूपकडे जातो. तिथे तिला पाहतोसुद्धा पण ती त्याच्याकडे पाठ फिरवून निघून जाते. संतापून बहारकडे आलेला तो अखेर आपली हार कबूल करतो.
सकाळ होते. जफर बहार बेगमच्या हवेलीतून घरी जायला निघतो. वाटेत त्याचं स्वागत करते ती पेपरमध्ये स्टील फॅक्टरी उघडल्याचे बातमी आणि (फायनली) दंगल.
हस्तिदंती मनोऱ्यात राहणाऱ्या देवची सकाळ मात्र प्रसन्न आहे पण थोड्याच वेळापुरती. ब्रेकफास्ट टेबलवरच रूप त्याला सांगते की 'मी हिरामंडीमध्ये कुणाच्या तरी प्रेमात पडले होते. तू सुरुवातीपासून मला खरं सांगितलं आहेस त्यामुळे आपण वैवाहिक जीवन सुरु करताना मलाही सगळ्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. जमले तर मला माफ कर.' थोडक्यात त्याने लग्नादिवशी मारलेले डायलॉग बूमरँग होऊन आता देवकडे आलेले आहेत.
नावातच देव असलेला आदर्श फिल्मी नवरा बायकोवर रागावेल भांडेल का? तो मुलाखत घेतल्यासारखा तिला विचारतो ‘मग काय झालं?’ ती म्हणते ‘मी त्या माणसाची इज्जत करत नाही.’ तो म्हणतो ‘मग प्रेम संपलं का? मी सत्याला सांगितलं होतं की जबरदस्तीने लादलेली नाती बरेचदा विस्कटतात. पण तिच्या खुशीकरता मी स्वतःची मर्जी नाकारली आणि या सगळ्यात तुझी ख़ुशी हिरावून घेतली. या गोष्टीची मला लाज वाटत होती. ती कधी प्रेमात बदलली मला माहीती नाही. (त्याचं बरोबर आहे म्हणा. कारण त्याच्या तिच्याविषयीच्या भावना प्रेमात बदलल्याचं लेखक किंवा दिग्दर्शकलाही माहीत नव्हतं. पण असो.) तुझ्यासमोर अख्खं आयुष्य पडलंय. रागात घेतलेल्या निर्णयामुळेच चुका होतात. परत एकदा स्वतःशी खरं बोलून बघ. किमान तेवढा सन्मान तरी या लग्नाला आणि मला दे. पती पत्नीचं नातं रीती रिवाजांनी नाही तर प्रेमाने बांधलं गेलं पाहिजे.’ Atta boy.
पिक्चरमधला हा दुसरा प्रसंग आहे ज्यात कुणीतरी काहीतरी सेन्सिबल बोललंय. पण टेबलावरचे ते दोन ऑरेंज ज्यूसचे ग्लास मला डिस्ट्रॅक्ट करताहेत. फुकट जाणार ना आता ज्यूस. आधी नीट खाऊन पिऊन घ्यायचं आणि मग काय ते लग्नाचं भवितव्य ठरवायचं. तो परत निर्णय रूपवर सोडून पब्लिशिंग हाऊसमध्ये निघून जातो.
इकडे जळणाऱ्या पेपरच्या गठ्ठ्यांच्या पार्श्वभूमीवर जफर आणि अब्दूल भेटतात. अब्दूल सांगतो देव चौधरीने आपल्याविरुद्ध निर्णय घेतला आहे. म्हणून मी ही या चौधरी खानदानाला संपवायचा निर्णय घेतला आहे. अरे काय चाललंय काय? फॅक्टरी ब्रिटिश आणणार होते ना? देवने काय केलं? मी आता 'एक साला मच्छर'च्या धर्तीवर 'एक साली स्टील की फॅक्टरी ....' ऐकायच्या मनस्थितीत पोहोचले आहे. इथेच अब्दूल Either you are with us चं हिंदी ट्रान्सलेशन आपल्याला ऐकवतो. त्यानंतर जनरली सर्वत्र डिस्ट्रक्शन आणि कोलाहल असतो हे काय आपल्याला सांगायची गरज नाही.
भल्या मोठ्या घरात रूप अचिंत कौरला शोधते आहे. तिकडे देवच्या पब्लिशिंग हाऊसबाहेर डेली टाईम्स मुर्दाबादच्या घोषणा देत हिंसक जमाव गोळा झाला आहे. देवसोबत ऑफिसमध्ये फक्त व्ही वि अहमद आणि अनंगपाल आहेत. ऑफिसवर आता दगडफेक सुरु झाली आहे.
इकडे जफर रूपकडे आला आहे. तो तिची माफी मागतो. रूप म्हणते ‘एवढंच?’ तो म्हणतो ‘तू तुझा निर्णय तर घेतला आहेस ना?’ ती म्हणते ‘मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलं आणि तू मला सत्य परिस्थितीही सांगू शकला नाहीस.’ तो म्हणतो ‘माझ्या मनात वडिलांविषयी फक्त द्वेष होता. तू माझ्या मनात प्रेम निर्माण केलंस. माझ्या मनातला द्वेष नष्ट होत होता. मला या घराकडून जे हवं होतं ते आपलेपण तू दिलंस. तुला खरं सांगितलं असतं तर ते गमावण्याची भीती मला वाटत होती. ती म्हणते ‘खोटं बोलून तरी कुठे मिळाले तुला मी?’ तो म्हणतो ‘आपल्या नशिबात एकमेकांची साथ नाही रूप.’
या दोघांना एवढं सेन्सिबल बोलताना पाहून मी आश्चर्यचकित झाले आहे. पण माझा आनंद पुढचे ५ सेकंदही टिकत नाही. कारण रूप त्याला विचारते 'तू कधीच माझ्यावर प्रेम केलं नाहीस का?' अगं, आत्तापर्यंत फ्रेंचमध्ये बोलत होता का तो? तो ही (बहुतेक वैतागून) म्हणतो की 'या प्रश्नाचं उत्तर मला द्यावं लागत असेल तर तो तुझ्या प्रेमाचा अपमान आहे.' त्यावर ती म्हणते की 'सरळ उत्तर द्यायला काय झालं?' पण जालीम जमान्याला त्यांची प्रेमळ गुफ्तगु बघवत नाहीये. त्यांच्या घरावर दंगलखोरांनी हल्ला केलाय. त्यात अचिंत कौर तिची परीटघडी न मोडता स्वर्गवासी होते. ती आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल किंवा कलोन घालण्याऐवजी मूठभर स्टार्च घालते का विचारायला हवं होतं कुणीतरी.
जफर आणि रूप पळतात. तिकडे फायनली देवच्याही डोक्यात प्रकाश पडला आहे. तो व्ही वि अहमद व अनंतपालसोबत मागच्या दाराने बाहेर पडायचा प्रयत्न करतो. पण हाय रे दैवा! अब्दूल त्याच्या गुंडांना घेऊन तिथे येतो. त्याच्याशी मुकाबला करताना व्ही वि अहमद आणि अनंतपाल जीव गमावून बसतात. आता अब्दूल देववर हल्ला चढवतो. देवला सगळं संपलं आहे याची लख्ख जाणीव होते. पण तेवढ्यात रूप आणि जफर तिथे घोडागाडी घेऊन येतात आणि देवला वाचवतात. अब्दूल त्याच्या गुंडांना तिघांचा पाठलाग करून ठार मारून टाकायला सांगतो.
जफर या दोघांना बहारच्या हवेलीत घेऊन येतो. पण तिथेही गुंडांनी जाळपोळ केलेली असते. बहार त्यांना सांगते की ‘यांना मी इथे आश्रय देऊ शकत नाही. कारण हिंदूंना मुसलमानांच्या घरात शोधून शोधून मारलं जातंय. यांना स्टेशनवर घेऊन जा.’ जफर बहारलाही आपल्याबरोबर चल म्हणून सांगतो पण आपल्या कोठ्यावरच्या हिंदू मुलींना सोडून जायला ती नकार देते.
जीवाच्या आकांताने स्टेशनवर पोहोचलेल्या तिघांचा पाठलाग करत अब्दूलचे गुन्डही स्टेशनवर पोहोचतात. पण कजोचा पिक्चर असल्याने स्टेशनवरच्या गोंधळातही ते फक्त या तिघांचा शोध घेऊन त्यांच्यावर हल्ला करतात. गाडीची शिट्टी वाजते. गुंडांना रोखण्यासाठी देव आणि रूपला गाडीत शिरायला सांगून जफर प्लॅटफॉर्मवर थांबतो. हाणामारीही करतो. पण रूपच्या आग्रहाखातर परत गाडी पकडण्याचा प्रयत्न करतो. इकडे तळमळीने जफरची वाट पाहणाऱ्या रूपला पाहून देवला जाणीव होते की ती कुणाच्या प्रेमात पडली होती.
पुढे काय होतं, जफर गाडीत शिरतो का, देव काय निर्णय घेतो हे जाणण्यासाठी वाचा हिंदी चित्रपट नियम. यशस्वी विजेत्यांना टायटल सॉन्गची लिंक देण्यात येईल. फ्री फ्री फ्री!!!
हा meme इथे द्यायचा मोह
हा meme इथे द्यायचा मोह आवरेना.
करण जोहरचे काही सिनेमे खूप
करण जोहरचे काही सिनेमे खूप आवडतात. हसी तो फसी खूप वेळा पाहिलाय. खूप आवडतो. रॉकी रानी भारी.
(दुरुस्ती - HTP करण जोहर निर्मित आहे, दिग्दर्शित नव्हे./
बॉम्बे टॉकीज नामें एक लघुपट अँथॉलॉजी आहे. त्यातला राणी मुखर्जी आणि रणदीप हुडा असलेला करण जोहरचा लघुपट फार आवडतो.
माम, जबरदस्त धमाल लिहिले आहेस
माम, जबरदस्त धमाल लिहिले आहेस
Pages