
तुम्ही म्हणाल ही द्विरुक्ती आहे तर दोष माझा नाही.
सगळे म्हणतात करण जोहर नेहमी फ्लफी, सोबो आणि साऊथ देल्ही क्राऊड दाखवणारे पिक्चर काढतो. आता तो तिथेच राहत होता ना? सकाळी कल्याण नाहीतर भायंदरवरून २० किलोची सॅक घेऊन ८:१७ ची लोकल पकडून वझे केळकर, पाटकर, रुईया नाहीतर इंटिग्रेटेडवाले ॲलन, फिजीक्सवाला गाठणारे विद्यार्थी त्याला कुठे माहिती? शहाड, नायगाव तर त्याने ऐकलं पण नसेल. मग निम्मं मुंबईकर महाविद्यालयीन पब्लिक क्रिकेट नाहीतर फुटबॉल खेळत असताना तो बास्केटबॉल खेळणारे, झेवियर्समधे
वावरणारे स्टुडंटसच दाखवणार ना? त्याचा बिचाऱ्याचा काय दोष?
पण झालं काय की सोनम कपूरलापण नॅशनल अवॉर्ड मिळालं. तेव्हापासून हिरूआंटींनी किटी पार्टीत जाणं बंद केलं. तसा ‘कुछ कुछ होता हैं’ला बेस्ट पॉप्युलर फिल्म म्हणून अवॉर्ड मिळाला होता. आता नॅशनल अवॉर्ड्समध्ये पॉप्युलर फिल्म म्हणजे
गावकुसाबाहेरची वस्ती, ओळख असली तरी मान नाही, ताऱ्यांच्या प्रभावळीत त्यांना स्थान नाही. घरात ‘कल की आयी हुई लडकी’चा गजर सुरू झाला. ढिगाने मिळवलेल्या फिल्मफेअर आणि स्क्रीनच्या बाहुल्यांवर कुणी फडकं मारेना. छान छान सुंदऱ्या आणि सुंदरांसोबत सुखाने गॉसिप करत लाते प्यायला जावी तर नेमकी समोर काऊचवर कंगना यावी आणि अमेरिकानोचा घोट घ्यायला लागावं तसं आयुष्य झालं.
कुणीतरी सांगितलं की सन्माननीय उल्लेख हवा असेल मल्याळी पिक्चर काढला पाहिजे. पण मल्याळी म्हणजे मद्रासी नाही (हे पण रहमानमुळे माहीत झाले) हाच त्याच्यासाठी शोध होता. विमनस्क मनस्थितीत चॅनेल्स सर्फ करत असताना खत्रीकाका ‘वड्डी वड्डी जमीनें थी हमारी’ असं कायतरी म्हणाले आणि बिंगो (युरेका म्हणण्यासाठी आर्किमिडीज नाव माहीत असावं लागतं) आपण सिंधी --> सिंध --> पार्टीशन --> विषय मिळाला. आणि आपला USP रोमान्स. चला पार्टीशनमधली प्रेमकथा काढू. तेवढ्यात लेखक कुजबुजला.
ले: सन्नी पाजीचा गदर येऊन गेलाय ऑलरेडी.
कजो: हैं? रोमान्स था क्या? मैं तो हैंडपंप उखाड़ने का सीन देखने के लिए गया था. हम रिअल रोमान्स दिखाएंगे. तिकडे सकीना अमृतसरवरून लाहोरला गेली आणि परत आली. आपण हिरोईनला लाहोरवरून अमृतसरला पाठवू. हाकानाका?
ले: पण सर लाहोर सिंधमध्ये येत नाही.
कजो: मग काय झालं? ट्रेन लाहोरवरूनच येते ना?
ले: ट्रेनच कशाला पाहिजे?
कजो: हे बघ, मूव्हीच्या शेवटी हिरोईन पळत येऊन ट्रेनमध्ये चढली की मूव्ही हिट होते. जब जब फूल खिले, DDLJ देखी नही क्या?
ले: पण सर सिंध?
कजो: प्रांतीयवाद करू नकोस. आपला उद्देश नॅशनल अवॉर्ड आहे. चल आलिया आणि वरुणला फोन लाव.
कास्टिंग डिरेक्टर: (मनात 'आलिया भोगासी') सर वरूणपेक्षा पगडी जड होईल.
कजो: असं म्हणतोस? एक काम कर वरुणला मुस्लिम कर. डोळ्यात सुरमा घालू आणि पठाणी देऊ.
काडि: पण अभिनय कोण करणार?
कजो: अभिनय?
काडि: नॅशनल अवॉर्ड, सर.
कजो: एक काम कर श्री मॅमना फोन लाव. नको थांब, बोनी अंकल आपली स्क्रिप्ट चोरतील. माधुरी मॅमना फोन लाव. त्यांना पण नॅशनल अवॉर्ड हवंय.
काडि: सर माधुरी मॅम आल्या तर संजू अंकलना घेऊया का? कास्टिंग कू होईल.
कजो: चालेल. लाव फोन.
ले: पण माधुरी मॅम आणि संजू अंकलना रोल काय द्यायचा?
कजो: मॅमना तवायफ करू. एक चंद्रमुखी स्टाईल डान्स होऊन जाईल. आधा अधूरा प्यार पण दाखवू. एकदम हिट जोडी.
ले: पण ते पार्टीशन?
कजो: दाखवू रे बाबा ते पण. काय घाई आहे?
असिस्टंट डायरेक्टर: सर शत्रू अंकलचा फोन आहे. बोलायचं आहे म्हणतात तुमच्याशी.
कजो: दे त्यांना. दोस्तानामुळे सोबोमध्ये आलो आम्ही.
हां, शत्रू अंकल
हो, हो. नवीन मूव्ही काढतोय.
पिरियड फिल्म आहे.
सोनाक्षी?
अच्छा ठीक आहे. नो प्रॉब्लेम.
एडी त्या लेखकाला बोलव जरा.
ले: बोला साहेब.
कजो: त्या सोनाक्षीला घेतोय आपण पिक्चरमध्ये. तिला वरुणच्या अपोझिट छोटासा काहीतरी रोल दे.
ले: सर 'वहिनीच्या बांगड्या' बनवूया का?
कजो: क्काय? Let me think.
नॅशनल अवॉर्ड??? गांधीजी?
मला सांग गांधीजींची फिलॉसॉफी काय होती?
ले: सत्य आणि अहिंसा
कजो: अहिंसा नाव कसं वाटतंय? नको. सत्या बरं वाटेल त्यापेक्षा.
एक काम कर तिला सत्याचा रोल दे.
काडि: सत्या? त्यापेक्षा भिकु म्हात्रे जास्त हिट होता.
कजो: एय हिरो. रामूवाला सत्या नाही. गांधीजींचा सत्या.
ले: 'सत्य' असतं ते.
कजो: तेच ते. ती सत्याचा आवाज बनेल. नॅशनल अवॉर्ड…
ले: सत्याचा आवाज? तिला पत्रकार बनवू का?
कजो: जर्नलिस्ट? गुड आयडिया. पण नको. आपण आलूबेबीला जर्नलिस्ट बनवू. तिचे पणजोबा काढायचे पेपर.
ले: सोनाक्षीचं काय?
कजो: एक काम कर. तिला संजू अंकलची बहू बनव.
ले: पण संजू अंकलना बेटा कुठाय?
कजो: मग दे त्याला एक बेटा.
काडि: सिद्धार्थला फोन करू?
कजो: नको. आजकाल फारच उडतोय तो. स्वतःचं स्क्रिप्ट घेऊन फिरतोय म्हणे. एक काम कर. तो आशिकी २ वाला आदित्य आहे त्याला फोन कर. सोनाक्षीसमोर तसा दणकट माणूसच पाहिजे. शिवाय त्याला घेतलं तर viacom18 ला विचारता येईल की
डिस्ट्रिब्यूट कराल का म्हणून.
काडि: येस्सर..
एडी: viacom18! गुड आयडिया सर.
कजो: कमिंग बॅक टू आलूबेबी. तिला आपण इंग्रजांविरुद्ध वर्तमानपत्र काढायला लावू.
ले: पत्रकार बातम्या लिहतात. पब्लिशर्स पेपर काढतात.
कजो: एक काम कर. संजू अंकलना पब्लिशर करून टाक.
ले: बरं.
कजो: बरं ते आलूबेबीचं पिक्चरमधलं नाव हुस्ना ठेव. साधना आण्टीचं मेरे मेहबूबमध्ये तेच नाव होतं. किती क्यूट दिसायच्या
साधना आण्टी.
ले: हुस्ना आपल्यात नसतं सर. साधना आण्टी मुस्लिम सोशलमध्ये होत्या.
कजो: मग आलूबेबीला मुस्लिम कर.
ले: सर मग तिला अमृतसरवरून लाहोरला पाठवायला लागेल.
कजो: काय शिंची कटकट आहे? हुस्नाचं हिंदीत काय होईल?
ले: रूपा कसं वाटतं?
काडि: रूपा नको सर. झिनीबेबी आठवून लोकांच्या अपेक्षा भलत्याच वाढतील.
एडी: रूप ठेवूया का सर?
कजो: रूप नाईस नेम. पण मला हुस्ना पाहिजे कुठे तरी.
ले: माधुरी मॅमचं ठेवूया का?
काडि : नको. हुस्ना + तवायफ. लोकांना एकदम 'दीदार ए यार' आठवेल.
एडी: गावाचं नाव हुस्नाबाद ठेवूया का जिथे आलूबेबी आणि माधुरी मॅम सारख्या सुंदर बायका राहतात?
कजो: चालेल. नेक्स्ट पिक्चरचा तुलाच डायरेक्टर करतो.
ले: सर पण लाहोरमधली स्टोरी आहे ना? हुस्नाबादवरुन कुठली ट्रेन?
कजो: लाहोरच्या जवळ हुस्नाबाद गावातली स्टोरी आहे असं लिही मग.
ले: (स्वतःचे केस उपटत) ओके सर
तेवढ्यात सुट्टा मारायला गेलेल्या सेट डिझायनरला रद्दीवाल्याकडे चातुर्मासाच्या कहाण्यांचे पुस्तक मिळाले.
सेडि: सर हे बघा काय?
कजो: व्हॉट इज चातुर्मास?
सेडि: सर ते सोडा. काय लिहिलंय ते वाचा. ‘निर्मल मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे’
कजो: लेट्स डू धिस. या वेळी भन्साळीला टफ कॉम्पिटिशन देऊया.
१९४४ लाहोरजवळ हुस्नाबाद …..
सोनाक्षीला समजलं आहे की रोल छोटा करण्यासाठी तिला मारणार आहेत पिक्चरमध्ये. त्यामुळे ती 'मरते हुए को अपने कर्म ठीक करने चाहिए, ना की तबियत, जो मेरे हाथ में हैं' अश्या प्रचंड कन्फ्युजिंग पण ठाम बाण्याने वावरत आहे. एरवी तेरवी मारायचंच आहे तर कशाला इतर ऍक्टर्सच्या शिफ्टचा वेळ फुकट घालवा म्हणून डॉक्टरकडे जातानाही तिला कुणाची सोबत दिलेली नाही. त्या काळात चांगल्या घरातल्या बायकामुली केस मोकळे सोडून फिरायच्या नाहीत असं कानावर आल्यामुळे हेअर स्टायलिस्ट
प्रचंड अपसेट झाला आणि त्याने आत्ता सुटेल की मग सुटेल एवढी लूज वेणी घालून दिली आहे. चंदेरी रंगाची बॉर्डर लावलेली फेक शिफॉनची साडी नेसवून आणि बंगालमध्ये फेमस असलेले लेसचे ब्लाऊज देऊन कॉश्च्यूम डिरेक्टरने तिच्याबाबतीतला राष्ट्रीय एकात्मतेचा कोटा पूर्ण केलेला आहे. तिला आपल्या पतीसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून ती माहेरी राजपुतान्यात आली आहे. भलतीच एकात्मता.
फायनली आलूबेबी स्क्रीनवर अवतरते. अच्छे घर की बहुबेटियों के कायदे तिला लागू नसावेत. कारण समोर किती वयाचा माणूस आहे त्यावर किती लांबीचा घुंगट घ्यायचा हे ठरवणाऱ्या राजपुतान्यात ती केस मोकळे सोडून आणि ओढणी दूरदर्शनवर समूहगीत गाताना घडी घालतात तशी घडी घालून एका खांद्यावर अडकवून 'लाई दे रजवाड़ी ओढ़नी' करत नाचत सुटली आहे. बाई आहे ती तर नीट वापरायला शिक आधी.
गाण्यात पतंग फ़ेकताहेत, रंग खेळताहेत. नेमका कसला सीझन सुरु आहे याचा पत्त्या लागू देत नाहीत. पण विनोद प्रधानचे
छायाचित्रण सुंदर आहे. गाणं गाऊन आणि बागडून झाल्यावर ती घरी येते तर तिथे राखाडी रंगाची साडी नेसलेली आणि यावेळी केस मोकळी सोडलेली सोनाक्षी आहे. एक पगडी घालून राजपुतान्यातल्या भर उन्हाळ्यात जॅकेट आणि वरून कुलूची शाल
घेतलेला माणूस पण आहे. सोनाक्षीला रूपला आपल्यासोबत घेऊन जायचे आहे. आणि रूपच्या बाबांची याला सहमती आहे. ते शास्त्रीय संगीत शिकवतात आणि त्या कमाईवर आपल्या मुलींचे लग्न करू शकत नाहीत. सोनाक्षीच्या वडिलांचे त्यांच्यावर उपकार आहेत. रूपचा याला ठाम नकार आहे. बरोबर आहे म्हणा. कोण मुलगी अश्या भलत्याच ठिकाणी कुणाच्या घरात जाऊन राहील आणि नेमकं JD काय आहे यावर कुणी बोलतच नाही.
फायनली रूप तिला अट घालते की तुझ्या नवऱ्याने माझ्याशी आत्ताच लग्न केलं तर मी तिथे येईन. अशीच येणार नाही. सोनाक्षी तिला समजावू पाहते की तू आत्ता त्याला समजावून घे आणि माझ्यानंतर तो तुझ्याशी लग्न करेल. पण रूपचं डोकं ठिकाणावर आहे. ती म्हणते की तू जाशील तेव्हा तू दिलेलं वचन कोण निभावणार?
रूप तिची पुस्तकं जाळून टाकते. पण पतंग उडवण्याऐवजी त्या डिक्शनरीएवढ्या जाड्या पुस्तकांचा वापर करून नोकरी का नाही मिळवली तिने हा प्रश्न अनुत्तरित आहे. सोनाक्षी स्वतःच्या नवऱ्याचं तिच्याशी लग्न लावून देते. अश्रुभरित नयनांनी लग्न करणारा हा पहिलाच फिल्मी नवरा. चाणाक्ष प्रेक्षक आणि वाचक यावरून रूपची वैवाहिक स्थिती ओळखतील. चाणाक्ष नसलेल्यांनी सहन करण्याची क्षमता असल्यास संलीभचा देवदास बघावा.
रुपला सुहागरातसाठी तयार करताना पडद्यावर एंट्री होते ती वरुण धवन उर्फ जफरची. त्याला लखनवी चिकनकारी केलेला पठाणी ड्रेस देऊन राष्ट्रीय एकात्मतेला हातभार लावलेला आहे. तो अरिजित सिंगच्या आवाजात 'बाकी सब फस्क्लास हैं' गातो. इथे माझा धीर सुटायला लागलेला आहे. प्रत्येकाच्या इंट्रोडक्शनला एक गाणं परवडणार नाही हे लक्षात घेऊन आता बाकीच्यांचं पण इंट्रोडक्शन उरकून घेत आहेत. त्यात एकगठ्ठा नाचणाऱ्या तवायफ आहेत. उगीचच मध्ये आलेली कियारा अडवाणी आहे. एकाच
मुलाचं दोन वेळा लग्न लावून जेरीस आलेला संजय दत्त आहे. आणि गढीसदृश महालात राहणारी माधुरी दीक्षित आहे. तिच्या
गढीसमोर छोटं तळंसदृश प्रकार आहे. तिच्या घरात राहणारे आणि तिचे सर्व चाहते लॉन्ग जम्पची प्रॅक्टिस करत असतील का? जफर आणि माधुरीमध्ये काहीतरी खुन्नस आहे.
कियारा आणि जफर फ्रेंड्स विथ बेनेफिट्स आहेत. तिच्याकडून त्याला समजतं की देव चौधरी (आदित्य) लंडनवरून शिकून आलेला आहे, त्याने परत आल्यापासून बंटवारे के खिलाफ आर्टिकल्स लिहिली आहेत, त्याची बायको काही दिवसांची सोबती आहे आणि म्हणून त्याचे दुसरे लग्न आपल्या हिरोईनीशी करवले गेले आहे. बीबीसीवर द्यायचे का या न्यूज?
मध्यरात्री बाल्कनीत ५० मेणबत्त्या लावून माधुरी गाण्याचा रियाझ करत आहे. विझत कश्या नाहीत मेणबत्त्या?
इकडे आदित्य येऊन डिक्लेअर करतो की मैं अपनी पत्नी से बहोत प्यार करता हूँ. या घरात तुला मान सन्मान मिळेल पण मी प्रेम देऊ शकणार नाही. अरे गाढवा ३-४ तासापूर्वी तू ह्या बाईलाही पत्नी बनवलंस हे विसरलास का? असो. आदित्य सफेद
शेरवानीमध्ये छान दिसतो. पण मला प्रश्न वेगळाच पडला आहे. ट्रान्स्परन्ट काचेचे दरवाजे असलेल्या खोलीत सुहागरात कोण
साजरी करतं? तो निघून गेला म्हणून ठीकाय. पण घरातली सगळी डोक्यावर पडलीत का? का पडदे घ्यायचे पैसे पण उरले नाहीत २-२ लग्न करवून.
हिरामंडीतल्या तवायफ़ांसोबत जिस्मानी ताल्लुक़ात प्रस्थापित करणे, अरिजीतच्या आवाजात गाणे यातून वेळ मिळाला तर जफर लोहारकामही करतो, खास करून तलवारी बनवतो. आमच्या लहानपणी लोहार बैलगाडीच्या चाकांना रीपा बसवणे, कुदळी-घण बनवणे वगैरे अहिंसक कामं करायचे. वर्ष ६ महिन्यातून एखाद कोयती बनवली तरी खूप.
आता आपलं इंट्रोडक्शन अब्दुलशी (कुणाल खेमूशी) होतं, तोही सुरमा लावत असतो. तो अवामी हक़ पार्टीचा कार्यकर्ता असतो, बँटवारे के पक्ष में असतो आणि मीटिंगा घेत असतो. तो म्हणतो की ‘औजार बनाने की मशीने आ गयी तो हमारे कारखाने बंद हो जायेंगे| इस बार हमारी कौम पे नहीं हमारे पेट पे हमला होगा’ कजोला मध्येच आपण पार्टीशनवर पिक्चर बनवतोय की नया दौर याचं विस्मरण झालं बहुतेक.
यावर जफरचं उत्तर असं की 'अगर हम मेहनत करें कभी बेरोज़गार नहीं होंगे| मैं हरामी हूँ जिसे अपने बाप ने नाम नहीं दिया| जो अपने हक़ के लिए नहीं लड़ सका, वो अवाम के लिए क्या लड़ेंगा'? 'शहाणा गं बाळ माझा' म्हणेस्तोवर तो अब्दुलला फुकट सल्ला देतो की 'अपनी आवाज़ दुनियातक पहुंचाने के लिए बलराज चौधरी के अखबार से ज्यादा बेहतर तरीका नहीं हैं' आणि हा पण की ‘इन्क़िलाब खून बहा के लाया जाता हैं, बातों से नहीं’. संवादलेखक त्याच्या गोळ्या घ्यायला विसरला असावा बहुतेक. तो पुढे
म्हणतो की 'भाई हैं आप मेरे| आप के लिए जान भी दे सकता हूँ| लेकिन ये चौधरियों के झमेले से मुझे दूर रखिये' मी
आल्मोस्ट माझ्या गोळ्या शोधायला लागले.
इकडे बलराज चौधरीला (संजय दत्त) लेकाचा ‘एक मुल्क, एक अवाम’ विचार पसंत नाही. इन्ग्रजांशिवाय आपण आपला देश
सांभाळू शकत नाही आणि आपला मुलगा सगळ्यांना बहकवतोय असं बापाचं म्हणणं आहे. गांधीजींनी पूर्ण स्वातंत्र्याचा ऐलान करून २ वर्ष झालीत हे बिचाऱ्याच्या गावी नसावं. सोनाक्षी दोघांकडे बघतेय. खादीसदृश चेक्सच्या जॅकेटमध्येही आदित्य चांगला दिसतो. आणि घरात नवीन आणलेल्या सुनेला कुणी नाश्त्याला पण बोलावत नाही हे पाहून माझं मन भरून आलेय. पण पुढच्या
संवादात रूप नाश्त्याला खाली येऊ इच्छित नाही हे एस्टॅब्लिश होतं आणि माझा जीव जरा भांड्यात पडतो. १ वर्षाची मुदत दिलेली सोनाक्षी अगदी टवटवीत दिसते आहे.
फारसा मेकअप नसलेली रूपही सुंदर दिसते आहे आणि तिच्या रूमची खिडकी तर अप्रतिम. तिला वाऱ्यासोबत कुठून तरी गाण्याचे सूर ऐकू येतात. त्याबद्दल चौकशी केली तर अचिंत कौर AI मोड मध्ये जाऊन आवाज डिकोड करून तो बहार बेगम (माधुरीचा) असल्याचे तिला सांगते. मला उगीचच मुगल ए आझम मधली निगार सुलताना आठवली. माधुरी तेवढी तिखट दिसत नाही. अजून थोडी चौकशी केल्यावर ती हिरामंडीमध्ये राहते आणि तो बदनाम इलाका आहे वगैरे जाहीर करते. अचिंत कपूरला BMC हॉस्पिटलमधल्या आया नेसतात तशी सुती गुलाबी साडी दिली आहे आणि कोरा चेहरा तिचा स्वतःचा आहे.
आता अचानक सगळ्यांना आठवतं की बँटवाऱ्यासाठी हिंदू मुस्लिम यांच्यात काहीतरी तेढ निर्माण झालेली दाखवणे गरजेचे आहे. म्हणून एक मुन्शी तलवारी विकत घेण्याचा सौदा करताना उगीचच जफरच्या नाज़ायज़ असण्याचा उल्लेख करून वर तो मुस्लिम आहे, माझे पैसे घेऊन पळून गेला तर वगैरे डवायलॉक मारतो. आणि डायलॉग कोणासमोर? तर अब्दुलसमोर. परिणामी जाफर त्याला नडतो. मग त्याला पेढीवरून हाकलताना परत तो मुन्शी त्याच्या नाज़ायज़पणाचा उल्लेख करतो. तिकडून बहार येत असते. तिच्यासमोर अश्या शिव्या घातल्याने जाफर सरकॅस्टिकली हसतो. चाणाक्ष प्रेक्षकांना काय गुपित आहे हे समजले असेल. पण
त्याहीपेक्षा मोठे गुपित म्हणजे पेढीवरले मुन्शी कधीपासून तलवारी घ्यायला लागले? पेढी जनरली अमुकतमुक लाला किंवा सेठची असायची आणि मुन्शीजी कारकुनी करत असायचे. बोरूला टोक काढायला तलवारीची गरज काय? पण असो.
इकडे सोनाक्षी रुपला आपल्या अखबारमध्ये काम करण्याचा सल्ला देते. त्या निमित्ताने तुझी देवशी जवळीक होईल हे सांगते.
रुपला गाणे शिकायचे आहे. ती रुपसाठी एखादा चांगला गुरु शोधून देईन असं सांगते. पण रूपने लग्नापूर्वी दाखवलेला सगळा शहाणपणा बासनात गुंडाळून ठेवला आहे.
तिला हिरामंडीमध्ये जाऊन बहार बेगमकडून गाणे शिकायचे आहे. सोनाक्षी साफ नकार देते. रूप म्हणते की तसं असेल तर मी अखबारमध्ये काम करणार नाही. सोनाक्षी म्हणते नको करूस. पहिल्यांदा सोनाक्षी काहीतरी सेन्सिबल बोलली आहे. पूर्ण सीनमध्ये प्रकाशयोजना अप्रतिम आहे आणि रूप खरोखर सुंदर दिसते. ती विमनस्क मनाने आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पण सोनाक्षी रदबदली करून संजय दत्तकडून तिला हिरामंडीमध्ये जायची परमिशन मिळवून देते. अरे पण बहार बेगमला विचारलंय का कुणी कि तू हिला गाणं शिकवशील का? आणि मुळात काही मैलांवरून आलेल्या सुरांनी रुपला कसं समजलं की ही चांगली
गायिका आहे?
रूप हिरामंडीत येते तेव्हा अब्दुल अजून स्टीलचे कारखाने आणि अवामी हक़ यांचं फ्यूजन करण्यात गुंतलेला आहे. तिकडे चौधरी यांच्या पेपरला जाहिराती कमी पडताहेत. एक व्हिस्कीवाला जाहिराती देण्यासाठी तयार आहे. पण त्या जाहिराती
पाहून मुस्लिम लोक पेपर घेणार नाहीत म्हणून एका बोर्ड मेम्बरचा विरोध आहे. देव (आदित्य)ही त्याच मताचा आहे.
बहुतेक तो जिनांना भेटला नसावा कधी.
हिंदी चित्रपटांच्या परंपरेनुसार रूप तिथे येऊन आपण पेपरात साड्या आणि मेकअपच्या जाहिराती देऊया असं सांगते. इथे लक्स साबणाची प्रॉडक्ट प्लेसमेंट केलेली आहे. तर बोर्ड मीटिंग मध्ये ती देवला भेटायचं आहे असं त्यालाच सांगते. तो ही तिला तू कोण विचारतो. ती सांगते मी त्याची पत्नी. तिची साडी का शरारा जे काय आहे ते फार सुंदर आहे. बोर्ड मेम्बर थक्क झालेले आहेत.
अब आगे….
तरी एक बोर्ड मेम्बर म्हणतोच की 'कमाल हैं एक दुसरे को नहीं जानते'. पण हे पार्टीशनपूर्व काळातले लोक असल्याने त्यांना 'घूंघट की आड़ से दिलबर का दीदार अधूरा रहता हैं' हे समीरभाईंनी सांगितलेले वैश्विक सत्य माहिती नाही. त्यामुळे त्यातला व्हिस्की
विरोधी अहमद (हितेन तेजवानी) म्हणतो की 'निकाह हुआ हैं इनका शायद| उस दिन अगर परदे के पीछे आप भी होते तो देवसाब को पता नहीं चलता'. व्हि वि अहमद पुढच्या जन्मात नक्कीच मायबोलीवर घाऊक पिसं काढून देत असेल.
मध्येच कुणाला तरी आठवतं की सोनाक्षीचा रोल आपल्याला लवकर संपवायचा आहे त्यामुळे ती खोकत बाथरूमकडे पळत जाते. सामान्य परिस्थितीत एवढ्या धनाढ्य घरात आजारी बाईच्या उशापायथ्याशी ४ लोक नुसते बसून असतील. पण इतर एक्टर्सचा वेळ वाया जायला नको म्हणून इथेही ती एकटीच आहे. तिची बेज/लाईटेस्ट ब्लू किंवा पिस्ता कलरची साडी आणि डार्क आमसुली रंगाचं ब्लाऊज फार सुंदर आहे.
इकडे रूप बग्गीत बसून हिरामंडीत आली आहे. सोबत शॅपरॉन म्हणून अचिंत कौर आहे. ती रूपला सांगते की आज हिरामंडीका सबसे बडा त्योहार हैं दशहरा. फक्त हिरामंडीचा? चौधरींकडे सुनांना सणवार साजरे करावे लागत नाहीत का? इथे माधुरीचं
पाठमोरं दर्शन होतं. ती एका आयताकार स्विमिंग टॅंक सदृश प्रकारावर टांगलेल्या झोपाळ्यावर बसून झोके घेतेय. तिची एक ओढणी झोपाळ्यावरून टॅन्कमध्ये लोळते आहे आणि ओढणीवर व टॅन्कभर गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या आहेत. माधुरी गाते आहे 'रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाये पर वचन न जाई'
थोडक्यात उदकाचे तळे फार सुंदर दाखवले आहे. नाहीतर आपल्याकडे नुसते असे सांगायचे आणि भलते भलते उपास तापास करायला लावायचे, ते सोडायला परत अमुक शेर तूप आणि तमुक शेर गहू याचे पदार्थ करायला लावायचे.
इकडे बाहेर हिरामंडीत दोऱ्यावरून लटकणारे पुरुष, एशियन पेंटचा रॉयल ब्लू फासलेला राम, लक्ष्मण व सीता त्यांच्या
स्वागताकरता ढोल वाजवणारे पुरुष आणि नाचणाऱ्या बायका, पांढऱ्या रिच लेहेंग्यात गोड दिसणारी रूप आणि तिच्यावर एक नजर पडल्यावर 'कुण्या गावाचं आलं पाखरू' करत तिच्या मागे मागे फिरणारा जफर असा फुल्ल उत्सवी माहौल आहे.
कट टू बहार बेगमची हवेली. आता ती बैठकीवर बसली आहे आणि तराणा गात आहे. माझ्या डोक्यात प्रश्नांचं मोहोळ उठलंय की झोपाळ्यावरून उतरून पाय आणि लेहंगा न भिजवता ती तळ्यातून बाहेर आली कशी? दुसरी ओढणी बऱ्याच वेळ पाण्यात राहिली तर रंग जाईल का? त्या गुलाबाच्या पाकळ्या कोण गोळा करणार नंतर? तिला कसली चिंता नाही. तिने आता 'घर मोरे परदेसिया, आओ पधारो पिया' गायला घेतलेलं आहे.
आता मैलभर अंतरावरून तिच्या आवाजाने इम्प्रेस झालेली रूप साहजिकच इतक्या जवळून तिच्या आवाजाने खेचली जाणार यांत नवल ते काय? अचिंत कौर बहुतेक जत्रेत भिंगरी घ्यायला थांबली असावी, कुठे दिसत नाही. तर बहारच्या हवेलीच्या दिशेने
एकटीच जायला निघालेली रूप 'रामलीला - एक पथनाट्य' मधली लक्ष्मणरेषा लिटरली आणि मेटॅफोरिकली ओलांडते. डायरेक्शन डायरेक्शन म्हणतात ते हेच.
दिवसा बहारच्या हवेलीच्या बाहेरचं तळं ओलांडण्यासाठी छोट्या होड्या नाविकांसहित तैनात असतात. आपल्या दाराबाहेर कुंडीत जरी पाणी असलं तरी मनपा नोटीस काढते, इथे प्लास्टिक कमळांसोबत अख्खं तळं आहे तर फ्युमिगेशन करून घ्या पण सांगत नाही. गरिबाला कुणी वालीच नाही. तर रूप होडीत बसून बहारच्या हवेलीत जाते. हाऊसबोटी आणि शिकाऱ्यांचा टाय अप असतो तसा बहारची हवेली आणि होडीवाल्यांचा टाय अप असावा कारण रूप होडीवाल्याला पैसे देत नाही.
गाणं ऐन भरात आहे तर न राहवून रूपही जॉईन करते. दोघींचं घराणं एकच असावं बहुतेक. अगदी तानापलटेही एका सुरात घेत आहेत. नाचणाऱ्या इतर तवायफ़ांना बघून रूपही नाचायला लागते. अगं बाई तू शास्त्रीय गायकाची मुलगी आहेस आणि खानदानी बहू आहेस, नच बलियेची काँटेन्स्टन्ट नाहीस. बरं झालं अचिंत कौर नाहीये सोबत. तिला फेफरं आलं असतं. असो, तिचा नाच
इफेक्टिव्ह वाटावा म्हणून बहार बेगमना नुसतंच गायला लावलं आहे.
तर हिचा परफॉर्मन्स संपल्यावर बहार म्हणते 'आवाज अच्छी हैं, बस नमक थोड़ा कम हैं. और राग में नमक लाने के लिए नमकीन ज़िन्दगी जिनि पड़ती हैं'. आँ? १४ वर्ष झाली दांडी यात्रेला. अजूनही तुम्हांला नमक कमीच पडतंय? मग लक्षात येतं की ती देश का नमक विषयी बोलत नाहीये तर गुलज़ार अंकलनी सांगितलेल्या नमकविषयी बोलतेय. रूप म्हणते 'और नमक ज्यादा हो जाए तो कड़वी हो जाती हैं ज़िन्दगी.' ती आणि संवादलेखक आयुष्यात कधी स्वयंपाकघरात गेले नसावेत. खारट असा शब्द आहे गं बाई त्यासाठी. मग ती बहारला सांगते की 'मैं आप से संगीत सीखने आयी हूँ'. बहार म्हणते 'हमारे यहां संगीत को गाना कहते हैं'. एवढे क्यूज देतेय बहार पण ही ऐकायचं नाव घेत नाही. मग बहार विचारते 'आप शादीशुदा हैं? हमारा तजुर्बा यह हैं के एक बार जो उस आग के फेरे काट ले, उसके अंदर की आग बुझ जाती हैं'. बहारने नवऱ्यांचं जनरल मत विचारात घेतलं असतं तर तिचा असा
गैरसमज झाला नसता. असो. रूप म्हणते 'उसी बुझी हुई आग को फिर से जगाने आ गयी हूँ'. बहार आहे का गारगोटी? येथे
ठिणग्या पाडून मिळतील?
एकदाची अचिंत कौर येते. भिंगरी मिळालेली दिसत नाही. ती म्हणते 'शाम हो रहीं हैं, हमें चलना चाहिए|' मग जरा लवकर निघायचं ना घरातून बाई.
बहार रूपला कटवते की ‘उद्या परत ये. उद्याही तुझा आवाज आवडला तर शिकवेन तुला.’ संपूर्ण सीनमध्ये बहारचे कपडे जास्त मॉडेस्ट आहेत. दागिनेही मोजके परंतु उठावदार आहेत आणि चौधरीची सून उघड्या गळ्याने फिरते आहे. अर्थात दोघींचे कपडे खूप सुंदर आहेत. बाकीच्या तवायफांचे कपडेही हलका गुलाबी ते हलका ऑरेंज/ पीच या शेडमध्ये आहेत. महागड्या डिनर सेटचा
राखाडी निळा रंग आणि गोल्ड ट्रिमिंग असते साधारण त्या डिझाईनचा फ्लोअर पॅटर्न आहे. झुंबरं, समया, नटराज सगळंच फार
अस्थेटिक आहे.
अचिंत कौर परत गायब झालेली आहे. (क्या शॅपरॉन बनेगी रे तू?) तिची पण चूक नाही म्हणा. उद्या तिच्या घरच्यांनी बघितलं तर तिचे वांधे.
रूप बहारकडून परत निघत असताना अचानक तळ्यातून १०-१५ राम आग लावलेले बाण आणि धनुष्य घेऊन बाहेर येतात आणि त्या पार्श्वभूमीवर जफरही तिच्याकडे येतो आहे. त्याची आणि रूपची नजरानजर होते, ती डोळे चुकवून पुढे जायला बघते तर तो
म्हणतो 'मैंने इस बाज़ार के सभी तवायफों के गाने सुने हैं| आप की आवाज़ में दर्द से ज्यादा इश्क़ हैं| कैसे?' आता भलेही हिरामंडीत आलेली असेल पण तवायफ नसलेल्या एखाद्या बाईची तवायफशी कम्पॅरिझन केली तर ती पटकन तोंड उघडून सांगेल की नाही की बाबा तू जे समजतो आहेस ती मी नाही. पण नेमकी इथे ती मुग गिळुन बसते. सरळ आहे त्याचं धारिष्ट्य वाढतं. तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो 'जितना दूर जाएँगी उतनाही नज़दीक पाएंगी आप मुझे| अपनी आँखों की कशिश को अपने पलकों के ऐतराज़ से छुपाने की कोशिश न कीजिये|' एवढं सलग वाक्य म्हणून दाखवलं. टाळ्या. आता याचा अर्थ पण सांग भौ. इतकं सगळं झाल्यावरही ती त्याला हडकवत नाही.
घरी आल्यावर ती नवऱ्याला सांगते की मला हिरामंडीतल्या लोकांवर लेख लिहायचा आहे. एक बहार बेगम सोडल्यास तुला कोण माहिती आहे गं हिरामंडीतलं? तो ही म्हणतो वाचण्यासारखा असेल तर छापेन मी. ती नवऱ्याला हे ही सांगते की मला माहिती आहे हे लग्न आपल्यासाठी समझोता आहे. माझी काही स्वप्नं नाहीत. तुम जब चाहो इस समझौते से रिहा हो सकते हो| इथे ओरिजिनल देव असता तर 'तेरी ज़ुल्फ़ों से जुदाई तो नहीं मांगी थी' वगैरे गाऊन मोकळा झाला असता. नाहीतरी ती केस मोकळे सोडून आली होती. पण हा सपोजेडली सोनाक्षीच्या प्रेमात पडलेला देव असल्याने तो फक्त 'मैंने इस रिश्ते से रिहायत की बात तो नहीं की थी|
लेकिन आप के ख़याल जानकार ख़ुशी हुई|' असं म्हणून विषय टांगत ठेवतो. तो मोकळा झाला तर तू जाणार कुठे याचा विचार
केलास का कधी बाई?
दरम्यान त्या सोनाक्षीला कुठे गायब केलंत नेमकं? तिच्याकडे लक्ष ना नवऱ्याचं लक्ष, ना सासऱ्याचं. हिच्याकडून तर अपेक्षाच नाही.
रूप आपल्याला वाटते तेवढी बिनडोक नाही. हिरामंडीवर लिहिण्यासाठी ती अब्दुलचा पत्ता शोधत येते. तिलाही माहितेय की नेमकं कोण इन्फ्लुअन्शिअल आहे.
अब्दूल अर्थातच जफरच्या कारखान्यात पडीक असतो का तो अब्दुलचा कारखाना असतो? कुणास ठाऊक. आता जफर बाकायदा लोहार असल्याने त्याला त्याची बॉडी दाखवण्याची संधी आहे आणि तो ती पुरेपूर वापरतो. पण त्याचं लोहारकाम म्हणजे फक्त भट्टीत कोळसे ढकलणे. त्यासाठी शर्ट कशाला काढायला पाहिजे? अख्ख्या चित्रपटात तो एकदाच ऐरणीचा वापर करताना
दिसलाय तेव्हा तो ठोकण्यासाठी हातोडी वापरतो. तिच्यापेक्षा मोठी हातोडी प्लेझोनमध्ये मुलांना खेळायला देतात.
जफर तिला पाहून परत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा फायनली बया त्याला सांगते ‘मैं शादीशुदा हूँ’. तो म्हणतो ‘तो मुझे
कौनसा निकाह पढ़ना था आपसे?’ अट्टाबॉय. अशी क्लॅरीटी पाहिजे एन्ड गोल विषयी. नाही तर मग इस्लामाबाद टॉक्स कराव्या लागतात.
आता त्याचे डायलॉग संपल्यामुळे तो तिला अब्दूलकडे पाठवतो. ती अब्दूलला सांगते की मी पत्रकार आहे, मला हिरामंडीवर
लिहायचं आहे. तो परत अम छोड़ेगा नहीं जी करत कारखाना, मशिन अमुक तमुक यांविषयी बोलून ‘क्या आप का अखबार ये छाप
पाएगा’ असं म्हणून तिला उडवून लावतो.
रूप निराश होऊन परत जात असताना जफर येऊन तिला सांगतो की मी इथेच वाढलो. या भागाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखणार? सियासी मसलों से दूर इस इलाके में कुछ ऐसी खास चीजें हैं अगर आप देखना चाहती हैं तो? रूप लगेच तयार होते. पुढच्या शुक्रवारी ते कलाम वादीमध्ये भेटायचं ठरवतात. बाई तुला हिरामंडीवर लेख लिहायचा होता ना? कलाम वादी कुठून आली मध्येच. निघताना तो तिला सांगतो की 'फ़िक्र ना करें| मैं इज़ाज़त या कीमत के बगैर औरतों को हाथ नहीं लगाता'. आता याबद्दल तुला व्हिक्टोरिया क्रॉस द्यावा की काय? आणि काल तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हा तू थेट तिचा हात पकडला होतास हे विसरलास?
अगले जुम्मे से पहले वरुण, करण, पटकथाकार, लेखक, संवादलेखक, एडी, गीतकार यांची मिटींग चालली आहे.
वः करण दोन दिवस झाले मी उघडा फिरतोय. आलिया काय इंप्रेस होईना. डास मात्र चावले. आता कलाम वादीत जाऊन काय करू?
कः लेखक काय करणार होता हा कलाम वादीत?
लेः मला काय माहित. माझ्या स्टोरीत असलं काय नव्हतं.
पः सर तुम्ही कायतरी ‘वादी ए इश्क’ म्हटला होतात. शुटच्या दिवशी डिटेल्स बघू म्हटला होतात.
कः त्या लिरिसिस्टला एक गाणं लिहायला सांग ‘ये हसीं वादियाँ’ टाइप.
एडीः सर तिकडे फक्त उघडे बोडके डोंगर आहेत. तुम्हीच हेलिकॉप्टर राईड घेताना चूज केलं होतंत लोकेशन.
संलेः तरी मी सांगत होतो तो कशिश, ऐतराजवाला डायलॉग फ्लर्ट करताना वापरू नका. इकडे वापरला असता. तेव्हा नाही ऐकलंत माझं. २ दिवस रेख्तावर आरएनडी केली होती मी.
कः ते जाऊ दे. आता काय करायचं ते बोल.
संलेः मी काय सांगू?
एडीः रेस लावूया का?
कः नको. फरहानने पार्टीशन आणि रेसचा कॉपीराईट घेतलाय.
एडीः सर कुस्ती करवुया का?
कः कुणाशी?
पः आदित्य आहे ना? जो जिंकेल त्याला फायनली आलियाबरोबर सेटल करू.
कः आपण परदेस काढतोय का? शिवाय त्याची मान्यवरची ऍड आपल्याच सेटवर शुट होतेय. कपडे खराब होतील त्याचे.
एडीः सर ग्लॅडीएटरसारखी सिंहाबरोबर फाईट करवायची का?
लेः लाहोरच्या झूमध्ये पण सिंह नाहीये सर.
पः रडू नको रे. सर स्पेनमधे बुलफाईट करतात. बुलफाईट चालेल का?
कः गुड आयडीया. बुल इट इज.
आपण आता कलाम वादीमध्ये आलोय. तिथे नदीच्या काठावर जोधा अकबर टाईप खूप सारे तंबू आहेत. कलाम वादी लाहोरपेक्षा खैबर पख्तुनवा किंवा तोरा बोरा मध्ये असेल असं वाटतं. आजूबाजूचे पुरुष पण पठाणी ड्रेस आणि पगडी घातलेले आहेत, हातात कलाश्निकोव्ह नाहीये एवढंच. बायका मात्र शरारा घालून फिरताहेत. तिथे ग्लॅडिएटर इन्स्पायर्ड अर्धच स्टेडियम आहे. तर रूप
जफरच्या गँगबरोबर थांबलेली आहे. तिला नेमकं काय होणार आहे याची खबर नाही त्यामुळे ती साधारण मैत्रिणीच्या लग्नाला
जाताना घालतो तितपत हेवी शरारा घालून आलेली आहे.
बुलफाईट सुरु होते. जफर या सांडासमोर ७ सेकंद टिकला तर तो जिंकेल असं जफरचा एक मित्र रूपला सांगतो. सांडाला काबूत आणण्याच्या पहिल्याच प्रयत्नात सांड जफरला मैदानाच्या कडेवरून सरळ दरीत उडवून टाकतो. रूपचा श्वास अडकलाय. त्याचे
मित्र थोडेफार चिंतेत असले तरी दरीच्या कडेला जाऊन बघावं, गरज पडल्यास जफरला मदत करावी असं काय त्यांच्या डोक्यात येत नाही. आपल्यालाही माहिती आहे की अजून पावणेदोन तासाचा पिक्चर बाकी आहे, जफरला काय होत नसतंय.
तिकडे जफर घोरपडीसारखा कातळाला चिकटून वर येतो. सांड तयारीतच असतो. यावेळी जाफर त्याच्यावर चढून बसतो पण सांड त्याला भिरकावून देतो. त्याला पुढच्या दोन खुरांनी तुडवतो, तेही छातीवर. एखादा डॉक्टर तिथे असता तर त्याने ऍम्ब्युलन्सऐवजी थेट शववाहिनी बोलावली असती. पण जफर हिरो आहे. तो एट पॅक्स दाखवत उठतो आणि बैलाच्या शिंगांना धरून त्याच्यावर स्वार होतो. ७ सेकंद झाल्यावरच खाली पडतो. सांड बहुतेक प्रौढ शिक्षा अभियानात जाऊन आकडे मोजायला शिकला असावा. कारण यावेळी वरुण खाली पडल्यावर त्याच्यावर हल्ला न करता तो निमूटपणे त्याच्या एनक्लोजरमध्ये परत जातो.
दरीत पडून आणि सांडाकरवी तुडवून घेतल्यवरही वरुणच्या अंगावर मामुली स्क्रॅचशिवाय काही जखम झालेली नसते. तर तो नदीवर हातपाय धूत असताना आलीया तिथे येऊन त्याला एकेरीत शिव्या घालते, म्हणते 'तुम मर सकते थे'. तो म्हणतो 'मौत से डर नहीं लगता'. ती म्हणते 'जिस दिन मोहोब्बत हो जाएगी, उस दिन मक़सद भी मिल जाएगा और मौत से डर भी लगेगा'.
अब्दुल तिथे येऊन त्याला फाईट जिंकल्याचे पैसे देतो आणि सांगतो 'कम से कम इसे छोड़ दे'. वरुण म्हणतो 'एक दिन छोड दूंगा'. अब्दुल म्हणतो 'अच्छी लडकी हैं| सुना हैं के शादीशुदा हैं| आप जानते हैं ना आप क्या कर रहे हैं|' कलाम वादीतून रात्री बेरात्री घरी पोहोचलेल्या रूपला पाहून देव फक्त घड्याळात पाहून तिला जाणीव करून देतो.
हिरामंडीवर लेख लिहिण्याच्या निमित्ताने रूप आणि जफर भेटत राहतात. रूप हळूहळू जफरकडे आकर्षित होते आहे. इकडे
वृत्तपत्राच्या ऑफिसमध्येही तिच्या सूचना लक्षात घेतल्या जाताहेत, व्ही वि अहमद सारखे कलीग तिला ऑफिसमध्ये सामावून घेत आहेत, सोनाक्षी आपल्या नात्यात माघार घेते आहे आणि रुपला देवसोबत पार्टीजना वगैरे पाठवते आहे. देव स्वतःच्याही नकळत रुपला एक पार्टनर म्हणून पाहू लागला आहे पण सोनाक्षीवरचं त्याचं प्रेम त्याला रुपबरोबर पुढे जाऊ देत नाही. या सगळ्या
पार्श्वभूमीवर अरिजीतच्या आवाजातलं टायटल सॉन्ग हा या चित्रपटातला एकमेव हाय पॉईंट म्हणता येईल.
आगे की स्टोरी ब्रेक के बाद....
ब्रेकनंतरचं पण येऊ दे लगेच
ब्रेकनंतरचं पण येऊ दे लगेच
मस्तच. येऊ द्या पुढे.
मस्तच. येऊ द्या पुढे.
सगळे संदर्भ समजले नाहीत कारण
सर वरूणपेक्षा पगडी जड होईल. >>>
काडि: पण अभिनय कोण करणार?
कजो: अभिनय? >>
लेट्स डू धिस. या वेळी भन्साळीला टफ कॉम्पिटिशन देऊया. >>>
चंदेरी रंगाची बॉर्डर लावलेली फेक शिफॉनची साडी नेसवून आणि बंगालमध्ये फेमस असलेले लेसचे ब्लाऊज देऊन कॉश्च्यूम डिरेक्टरने तिच्याबाबतीतला राष्ट्रीय एकात्मतेचा कोटा पूर्ण केलेला आहे >>>
गाण्यात पतंग फ़ेकताहेत, रंग खेळताहेत. नेमका कसला सीझन सुरु आहे याचा पत्त्या लागू देत नाहीत >>>
पेढीवरले मुन्शी कधीपासून तलवारी घ्यायला लागले >>>>
ट्रान्स्परन्ट काचेचे दरवाजे असलेल्या खोलीत सुहागरात कोण
हे सगळे भारी आहे 
साजरी करतं? >>>
काचेचे दरवाजे म्हंटल्यावर राकु म्हणेल जिनके अपने घर शीशेके हो, वो घरपर सुहागरात नही मनाते
एक काम कर. संजू अंकलना पब्लिशर करून टाक. >>> हे म्हणजे लिटरली रावसाहेबांचे "बाप बदला की हो तिचं" झाले
सर माधुरी मॅम आल्या तर संजू अंकलना घेऊया का? कास्टिंग कू होईल. >>>> कास्टिंग "कू कू कू कू" होईल खरे तर
खतरनाक सुरू आहे.
खतरनाक सुरू आहे.
अचिंत कपूरला BMC हॉस्पिटलमधल्या आया नेसतात तशी सुती गुलाबी साडी दिली आहे आणि कोरा चेहरा तिचा स्वतःचा आहे.

<<<<<<
And I need a break.
<<<<< वरती एक पॅरा दोनदा आल्याने कळलंच ते! मला वाटलं मी चुकून दोनदा वाचला की काय?
(साहजिक आहे. कलंक पाहणे सोपे काम नाही.)
तर बोर्ड मीटिंग मध्ये ती
तर बोर्ड मीटिंग मध्ये ती देवला भेटायचं आहे असं त्यालाच सांगते. तो ही तिला तू कोण विचारतो. ती सांगते मी त्याची पत्नी.
<<<<< ही काय भानगड? त्यांनी लग्न करताना एकमेकांना पाहिले नाही का? की दूल्हे का सेहरा सुहाना वाटल्याने त्याने तो काढूनच ठेवला नाही?
कसली भारी पिसे काढलीत तू...
कसली भारी पिसे काढलीत तू...
खूप ठिकाणी ही ही, ह्या ह्या झाले.
एकदम श्रद्धा किंवा फार एंड च्या लेवलचा जमलाय हा मामला...
हिरामंडीतल्या तवायफ़ांसोबत
हिरामंडीतल्या तवायफ़ांसोबत जिस्मानी ताल्लुक़ात प्रस्थापित करणे, अरिजीतच्या आवाजात गाणे यातून वेळ मिळाला तर जफर लोहारकामही करतो, खास करून तलवारी बनवतो. आमच्या लहानपणी लोहार बैलगाडीच्या चाकांना रीपा बसवणे, कुदळी-घण बनवणे वगैरे अहिंसक कामं करायचे. वर्ष ६ महिन्यातून एखाद कोयती बनवली तरी खूप.>>> इथे मी टोटली फुटले!!
सर वरूणपेक्षा पगडी जड होईल. >>>
काडि: पण अभिनय कोण करणार?
कजो: अभिनय? >>
कोरा चेहरा तिचा स्वतःचा आहे.>>>
राष्ट्रीय एकात्मतेचा कोटा>>>
काय लिहिलंय ते वाचा. ‘निर्मल मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे’>> याचा असा वेगळा संदर्भ घेऊन डोळे गळेपर्यंत हसून हसून पुरेवाट!!
करण जोहर राष्ट्रीय पुरस्कार
तुम्ही म्हणाल ही द्विरुक्ती आहे
करणच डोळ्यासमोर होता
करण जोहर राष्ट्रीय पुरस्कार फिल्म मॅकिंगचे संवाद भारी जमलेत
अश्या लेखाखाली प्रतिसादात फा हसायचा जागा शोधून देतो. त्या वाचून पुन्हा हसून घ्यायचे असते
बाकी काही संदर्भ समजायला कलंक बघावा की तुमचा लेख पूर्ण झाल्यावर त्यातून स्टोरी वेचावी हा विचार करतोय
कलंक पाहिलेला नाही
कलंक पाहिलेला नाही
पाहण्याची इच्छा नाही
मात्र ही चिरफाड पूर्ण होउ दे लवकर.
पहिल्याच ओळीतल्या द्विरुक्ती पासूनच हास्यधबधबा सुरू झालाय. अख्खा लेखच प्रचंड विस्फोटक आहे.
हास्यबारुद कूट कूट के भरा है.
मजाच आलीय वाचताना.
भारी लिहिलं आहे कोरा चेहरा
भारी लिहिलं आहे

कोरा चेहरा तिचा स्वतःचा आहे हे सगळ्यात जास्त आवडलं
हा पिक्चर माहितीच नव्हता मला.
माझा आवडता सिनेमा आहे हा
Jldi आवडता सिनेमा आहे हा
असाच prdp सुद्धा आवडला होता
कपडेपट सुंदर आहे
..
धमाल लिहिलं आहे
म्हणूनच म्हणते असे सिनिमे बनले पाहिजेत
कसलं खुसखुशीत लिहिलंय,
ते एक फेमस गाणं आहे ना त्यावरून मला वाटलं, वरुण आणि आलियाचं एकमेकांवर प्रेम असतं की काय.
बरं ब्रेक के बाद, लवकरच परत कधी येणार.
मला जफरचे खरे आई बाबा संजू माधुरी असावेत असा संशय येतोय.
ह ह पु वा.
ह ह पु वा.
भारीच जमलंय. येऊ दे पुढचं. मध्यंतर फार लांबवू नका.
(No subject)
भन्नाट लिहिले आहेस, पंचेस
पंचेस अफाट आहेत. विनोद
पंचेस अफाट आहेत. विनोद intelligent आहेत...
+ १
पुढे वाचायला उत्सुक आहे.
फार मस्त पंचेस जमले आहेत!
फार मस्त पंचेस जमले आहेत!
मलाही कोरा चेहरा तिचा स्वतःचा आहे हे सगळ्यात जास्त आवडलं
किती हुशार आहेस तू !
हौसला अफ़ज़ाई के सगळ्यांचे आभार
हौसला अफ़ज़ाई के लिए सगळ्यांचे आभार...
पुढचा थोडा भाग पोस्ट केला आहे.
^^^तिच्या आवाजाने खेचली जाणार
^^^ अचिंत कौर बहुतेक जत्रेत भिंगरी घ्यायला थांबली असावी, कुठे दिसत नाही^^^^
इथे कित्येकदा तरी फुटले..
आता अजून एक संशय, कधी संपणार
आता अजून एक संशय, कधी संपणार माझे अनेक संशय (बहुतेक यावेळच्या ब्रेक के बाद नंतर फिटतील). रूपच बहारची मुलगी आहे का.
बहार आहे का गारगोटी? येथे
बहार आहे का गारगोटी? येथे ठिणग्या पाडून मिळतील?

ट्रेलरमध्ये हे हिरामंडीतले सीन्स होते बहुतेक.
येथेही हिरामंडी च शब्द आहे का
येथेही हिरामंडी च शब्द आहे का ?

मला मागे हिरामंडी वेबसीरीज वर झालेली आपली धमाल चर्चा आठवली..
त्यातली ती आलमझेब आणि तिचे शेर!
एक बार देख लिजिये, दिवाना बना दिजिये...
असे काहीतरी
हो, हिरामंडी ही लाहोरमधली
हो, हिरामंडी ही लाहोरमधली पूर्वापार बदनाम वस्ती आहे.
एक बार देख लिजिये, दिवाना बना दिजिये
जबरदस्त लिहिला आहेस, माझेमन.
जबरदस्त लिहिला आहेस, माझेमन. पुढचा भाग लवकर येऊदे.
भारी लिहिलं आहे.
भारी लिहिलं आहे.
ते केजो आणि लेखक संभाषण अगदी डोळ्यासमोर आले. आणि मग फिसकन हसू आले
हे वाचुन कलंक बघायला घेतला...
हे वाचुन कलंक बघायला घेतला... इतके वर्ष धाडस केलंच नव्हतं.... प्रत्येक सीन ला इथली वाक्य आठवुन हहपुवा होत होती.
जितकं इथे लिहिलय तिथपर्यंत बघुन झाला. त्याच्या पुढचे १-२ सीन बघायचा प्रयत्न केला पण बोअर झालं मग बंद केला.
तर मुद्दा असा की आता पुढचं लवकर लिहा ताई
वाचला पुढचं लिव्हा की
वाचला
पुढचं लिव्हा की
भारी लिहिले आहे .मी थोडाफार
भारी लिहिले आहे .मी थोडाफार पाहिलेला आहे पिच्चर त्यामुळे पंचेस समजले , सगळेच पंचेस मस्त.
सगळ्यात आवडलं.
मलापण "कोरा चेहरा तिचा स्वतःचा आहे."
पुढचा भाग येऊद्या...
व्हय व्हय
व्हय व्हय
पुढचं कुठंय?
लवकर लिवा
मी हा पिक्चर अर्धा पाऊण तास
मी हा पिक्चर अर्धा पाऊण तास पाहिला होता. आता हा लेख वाचून पुन्हा पाहायचा आहे
माझेमन - पुढचा भाग इथेच अपडेट केलेला दिसतोय. तो वाचला नाही अजून.
Pages