एका नास्तिकाची वारी

Submitted by विक्रम मोहिते on 16 July, 2026 - 13:16

आषाढी वारी... (शनि+१)वारी म्हणजे ११ जुलै २०२६ रोजी आयुष्यात पहिल्यांदा आषाढी वारीला जाण्याचा योग आला, आणि आपला कॅमेरा उचलून मी वाटेला लागलो (हायवेच्या). खारघरच्या ३ माकडांच्या समोर हे चौथं उत्क्रांत झालेलं माकड जेंव्हा तासभर उभं राहून बस ची वाट बघत होतं तेंव्हा ती तीन माकडं उगाच मला चिडवत आहेत असं वाटलं, आता वाट पाहणं बस झालं असं वाटत असतानाच बस आली आणि मी शेवटच्या स्टॉप वर चढणारा असल्यामुळे बरोबर शेवटची सीट मला मिळाली, कॉलेज मध्ये मागची सीट कितीही आवडणारी असली तरी बस मध्ये backbencher व्हायचा अर्थ माझ्या back ची मजबूत लागणार हे नक्की होतं, आलिया सीटवर झोपावे ताणूनच्या उक्तीनुसार डोळे बंद करणार तेवढ्यात गरमागरम खिचडीचा सुवास आणि आयोजकांची सुप्रभातची गर्जना एकाच वेळी येऊन धूमकेतू सारखं आदळले, पण साडेचारला उघडलेल्या डोळ्यांनी परत उघडण्यास असहकार आंदोलन पुकारलं, तरीहि खिचडीचे डब्बे घेऊन चार घासात संपवले, आणि पुन्हा एकदा कुंभारकर्णाला साक्षी मानून निद्रादेवीच्या शरणार्थ गेलो. मोजून साडेपाच मिनिटं झाली असतील, तेवढ्यात @abhang_repost च्या remix कानावर पडल्या, आणि मग चल रे संख्या पंढरीला म्हणत झोपेसोबत युती तोडून मी भजन आणि कीर्तनांसोबत पक्षात प्रवेश केला. पुढचा अर्धा पाऊण तास कल्लोळच चालू होता. खिचडीचा प्रसाद आणि अभंगांचा कडक डोस मिळाल्यावर गाडी पुढे सरकली. पण सकाळी साडेचारला सुटलेल्या जीवाचा खरा 'अमृततुल्य योग' अजून यायचा होता. अखेर गाडी फूड प्लाझाजवळ थांबली आणि माझ्यासारख्या चहाबाजाच्या जीवात जीव आला. चहाचे घोट घेत आणि अंगात नवी ऊर्जा भरत आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. आता वेध लागले होते ते वारीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक टप्प्याचे—'दिवेघाट'! बसला हडपसर जवळ राम राम करून आम्ही एका रिक्षामध्ये सातजण गर्दी करून बसलो आणि आमचं प्रस्थान दिवे घाटाच्या दिशेने झालं. रिक्षाच्या खडखडाटातही मनात मात्र घाटाच्या चढणीचे आणि तिथे मिळणाऱ्या दृश्यांचे विचार घोंगावत होते.
ट्रॅफिकमुळे अगदी दिवेघाटाच्या पायथ्याशी पोचता आलं नाही पण किमान पाच किलोमीटरचा टप्पा पार पडला, आणि वारी सोबत मुंबई लोकल पेक्षा जास्त गर्दीत घाटाच्या पायथ्याजवळ पोचायचं होतं, मिनिटा मिनिटाला चुकामुक होत होती, पण माझा ट्रायपॉड आणि त्यावर बांधलेला पिवळ्या बॉर्डरचा भगवा झेंडा त्या गर्दीच्या भवसागरात दीपस्तंभाचं काम करत होता. अजून दीड तास चालल्यावर समोर दिसली ती दिवेघाटाची अवाढव्य, नागमोडी आणि अवघड चढण! तो मारुतीच्या शेपटीसारखा लांबलचक रास्ता पाहून मी आ वासला पण त्या चढणीपेक्षाही तिथे भारावून टाकणारं वातावरण होतं. आजूबाजूला हजारो वारकरी, कुणाच्या डोक्यावर तुळशीवृंदावन, तर कुणी चक्क विठ्ठल-रखुमाईची मूर्ती डोक्यावर घेऊन आनंदाने चालत होतं. 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल'च्या गजराने अख्खा घाट दुमदुमून गेला होता. कॅमेरा सरसावून मीही त्या गर्दीचा भाग झालो. पण देवाला बहुदा माझी नास्तिकगिरी अंमळ जास्तच टोचली असावी! अर्धा घाट चढतो ना चढतो, तोच अचानक उजव्या पायामध्ये एक सणसणीत muscle cramp आला. एका क्षणात डोळ्यासमोर अंधारी आली आणि पाऊल पुढे टाकणं कठीण झालं. मी रस्त्याच्या कडेला थांबलो. 'आता कसं होणार?' असा विचार मनात येतोच आहे, पुढे अजून दोन चारशे मिटर तसेच कसेतरी रेमटवले आणि नेमकी मेडिकल टीम दिसली, त्यांनी muscle relaxation ची गोळी दिली पण त्याचा परिणाम व्हायला किमान अर्धा तास जाणार होताच. आता यक्ष प्रश्न होता पुढचा घाट चढायचा कसा? हाडाचा इंजीनियर मी, जुगाड जणू रक्तात वाहतो. खांद्यावर अडकवलेला कॅमेऱ्याचा 'ट्रायपॉड' मी खाली काढला आणि त्याचा वापर चक्क 'वारकऱ्याच्या काठी'सारखा करायला सुरुवात केली. एका हातात कॅमेरा आणि एका हातात ट्रायपॉडची काठी, अशा अवतारात मी हिम्मत न हारता तो अवघड घाट चढू लागलो. माझी चिडचिड सहन करत बाजूला सोबत चालणाऱ्या सहचारिणीचे शतश: आभार.
घाटाचा शेवट गाठताना जीव अगदी कंठाशी आला होता. पण जसा मी घाटाच्या माथ्यावर पोहोचलो, तसा समोरचा नजराणा पाहून पायातली वेदना आणि मनातला नास्तिकपणा क्षणभर कुठेतरी विरघळून गेला. हजारो वारकऱ्यांचा तो अथांग सागर, पताका, टाळांचा गजर आणि त्या वातावरणात साक्षात विठुरायाचं झालेलं ते प्रसन्न दर्शन! त्या विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला आणि एका सेकंदात माझा सगळा थकवा, तो पायाचा क्रॅम्प कुठल्या कुठे पळून गेला. कॅमेरा चक्क बाजूला ठेवून मी फक्त तो क्षण अनुभवत राहिलो. थोडा वेळ तिथेच विसावा घेऊन अजून एक चहाचा रीचार्ज करून तिथल्या वारकरी सोबत गप्पा मारत बसलो. १३ किलोमीटरची 'लांब लचक' वारी आणि घाटाचा थरार संपला खरा, पण वारी अजून संपली नव्हती. पुढचा प्रवास होता तब्बल ५ किलोमीटरचा! रस्ता सपाट असला तरी तो संपता संपत नव्हता. थकलेलं शरीर घेऊन ती लांब लचक वाट तुडवत आणि पुढे परत तीन पायांची वाहन यात्रा करत बस पर्यंत पोचलो. बसच्या सीटवर पाय लांब करून बसलो, आणि डोळे मस्त मिटून घेतले कारण आता कोणी उठवायला येणार नाही याची खात्री होती. बस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावू लागली होती. कॅमेऱ्याच्या मेमरी कार्डमध्ये वारीचे कैद केलेले क्षण आणि माझ्या मनात प्रचंड सकारात्मक उर्जेचा top-up करून घेऊन मी शांतपणे डोळे मिटले... यावेळेस मात्र कुंभारकर्णालाही लाजवेल अशी शांत झोप मला लागली होती!
- विक्रम मोहिते

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय! ते मेमरीकार्डातले काही क्षण इथेही दाखवा की !! दिवेघाटातून वारी जातानाचे ते दृश्य नेहमीच फार विलक्षण वाटते!

आमच्या घरावरून अनेक दिंड्या जात. घराजवळ राजाचे मोठे मंदिर असल्याने मोठ्या दिंड्या मुक्कामाला थांबत. त्यानंतर सगळा परिसर अशक्य घाण होत असे आणि अक्षरश: नाक मुठीत धरून चालायला लागे.

सुदैवाने सगळ्या बागेला कुलूप लागले आणि मंदिर परिसरात access बंद झाला. आणि घर देखील आत शिफ्ट झाले त्यामुळे हा सगळाच वारीचा गलिच्छ प्रकार दृष्टीआड झाला.

वाटेतली सगळी गावे गु घाण करत जाणारे लोक आध्यात्मिक असतात यावर माझा काडीचाही विश्वास नाही.

@मैत्रीयी इथे एकच फोटो टाकता आला, बाकी इंस्टाग्राम वर @mohitevikram अकाउंट वर पाहू शकता.

आणि ३ पोस्ट झाले म्हणजे?

@अस्मिता आणि शर्मिला धन्यवाद

@रॉय- बहुतेक तुमच्या नशिबात चांगली वारी बघायचे भाग्य अजून तरी लाभले नाही, पण त्यामुळॆ कमेंटची गु घाण या ठिकाणी करावी असं नाही ना, तुम्ही जे सांगत आहेत ती किती सालची घटना आहे माहित नाही पण वारी मध्ये गर्दी सोबत आता नियोजन सुद्धा वाढलंय आणि वारी नंतर सफाई ची सेवा देणाऱ्या संस्था सुद्धा आहेत. त्यामुळे कृपया एकदा परत वारी करा मग बघा.

खूप छान लिहिलंय! हौसे , नवसे आणि गवसे घेऊन जाणारी वारी म्हणजे फक्त प्रवास नाही; ती माणसांच्या मनातल्या श्रद्धा, ओढ आणि आपलेपणाला एकत्र बांधणारी परंपरा आहे माऊली.

एक अनुभव म्हणून ठीक आहे. पण शीर्षकात नास्तिकाची वारी वगैरे वाचून अपेक्षा वाढलेल्या, त्यामानाने विरस झाला.
फोटो इथे टाकता येत नाहीयेत का? त्यासाठी मदत हवी असेल तर सांगा. फोटो बघायला आवडतील, पण इथेच Lol इंस्टावर जाऊन काही शोधणार नाही.

>> बहुतेक तुमच्या नशिबात चांगली वारी बघायचे भाग्य अजून तरी लाभले नाही <<
पंढरपुरात लाखो लोक येतात चारी दिशांतून.

दर ५० माणसांना एक टॉयलेट पकडले तर 54,000 फिरते टॉयलेट्स या वाऱ्यांबरोबर हिंडायला पाहिजेत.

सो गिव मी ए ब्रेक प्लीज!

आयुष्यात असला गलिच्छ प्रकार करणार नाही.

@अमितव -प्रयत्न केला पण एकच फोटो टाकता येतोय, जास्त फोटो कसे टाकायचे यावर मार्गदर्शन मिळालं तर आवडेल. आणि हो- नास्तिकाची वारी म्हंटलं कि त्याला काही दिव्य अनुभव येऊन त्याचा आस्तिक झाला किंवा किमान भाविक झाला असं काहीतरी तुम्हाला अपेक्षित असावं बहुतेक, मी बस एक साधा प्रवास अनुभव मांडला आहे.

@रॉय सर - यु रियली नीड ब्रेक, अहो चारी दिशातून लाखो लोक येतात म्हणजे काहीतरी असल्याशिवाय येतात का? माझ्या सारखा नास्तिक माणूस म्हणतोय वारी हा सुंदर प्रकार आहे म्हणजे विचार करा, राहिली गोष्ट टॉयलेट्सची आणि स्वच्छतेची- तर त्यावर टीका करत राहण्यापेक्षा चांगला उपाय सुचवा, आणू अंमलात.