पात्र म्हणजे प्रोटॅगनिस्ट अशा अर्थाने पात्र.
तर याच्यामध्ये एकतर पात्र आहे, दुसरा पात्राच्या डोक्यातला आवाज आहे आणि तिसरा मी आहे. असे तीन जण आहेत.
मला पात्राला गोव्याला पाठवायचं आहे. काही नाही. सहजच. जेनझी लेखक पात्राला धरमशाला ला पाठवतात. एलएसडीचे वगैरे नाद असतात त्यांना. मी मिलेनियल. 'दिल चाहता है'नं आमच्या पिढीला गोव्याची वाट दाखवली. माझी मजल तिथपर्यंतच.
पात्र कारण नसताना शरीर एका जागेवरून दुसऱ्या जागी न्यायला नाखुश असतं. म्हणून याठिकाणी तीन मित्रांचं नियोजन केलं आहे, ज्यांनी पात्राला ॲंबुश करून गोव्याचा घाट घातला आहे. लक्ष्मी नारायण थिएटर जवळ प्रायव्हेट बसेस चा अड्डा आहे. तिथून रात्री दहा वाजता पात्र बसमध्ये चढलं. चढलं म्हणण्यापेक्षा मी त्याला आत ढकललं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या रेस्टॉरंट मध्ये फ्रेश व्हायला बस थांबली तिथं आधीपासूनच खूप बसेस थांबलेल्या. त्यांचा ठरलेला स्टॉप असावा. पात्र उतरलं. समोरच स्त्रियांची एक मोठी रांग दिसली. 'सुंदर स्त्रिया वॉशरूमच्या बाहेर अशा सकाळच्या अवतारात बघवत नाहीत. हे असलंच दृश्य बघून सिद्धार्थ राजवाडा सोडून पळालेला.', या त्याच्या मताशी कुणीही सहमत झालं नाही. खरंतर कुणी ते ऐकलंही नाही. कारण ती काही फिलॉसॉफीची वेळ नव्हती. घाई असते सकाळची.
बाकी, पुरूषांचं ह्या एकाबाबतीत बरंय. रांगांमध्ये ताटकळण्याची गरज नसते. काय कुठंही जा. एवढं सगळं वावर मोकळं पडलेलंय. काय समजा ढुंगणाला कुसळं टोचतात थोडीफार, पण त्यात तक्रार करण्यासारखं काय आहे?
सकाळी नऊला बसनं पात्राला म्हापशा ला सोडलं. एसी बसमधून उतरल्यामुळं ह्युमिडीटी जास्तच जाचायला लागली. कॅंडोलिमला रिसॉर्टचं बुकींग होतं. तर टॅक्सी बोलावली जिच्या ड्रायव्हरचं नाव विजय साळगावकर होतं. नाही नाही, तो साळगावकर वेगळा. दोन ऑक्टोबरला फॅमिलीसोबत पणजीला सत्संगाला जाऊन पावभाजी हादडणारा आणि त्यामाध्यमातून आलम दुनियेस च्युतिया बनवणारा साळगावकर वेगळा.
'काय मग? एंजॉय करायचाय का?' असं आडवळणाने विचारत होता. परंतु एकूण ठीक वाटला. तर नंबर घेऊन ठेवला.
दुपारच्या जेवणासाठी मित्रांचं 'चंद्रकांत' नामक घरगुती खानावळीचं नियोजन होतं. तिथं चोनक नावाचा बिगरकाट्याचा मासा सरस होता. त्या दुपारी मी पात्राला झोप काढू दिली, कारण आदल्या रात्री बसच्या वरच्या डेकवर सतत हलत असल्याने क्षणभरही झोप लागली नव्हती. शिवाय मित्रांनी संध्याकाळ आणि रात्र पणजीमध्ये बुक करून ठेवल्या होत्या. तर त्यासाठी किंवा त्याआधी झोप गरजेची होती.
संध्याकाळी साळगावकरनं पणजीला सोडलं.
साळगावकरला सारखे एका विदेशी महिलेचे व्हिडिओ कॉल येत होते. महिला रशियन वाटते असं मित्राचं मत पडलं. पात्राला त्यातलं काही कळत नाही. साळगावकर मस्त फ्लाईंग किस वगैरे देत होता. साळगावकर रसिक आहे.
'काय एंजॉय करायला चालले काय?' त्यानं लोकेशनला ड्रॉप करताना आणखी एकदा विचारलं.
आता आपल्याला मसाज पार्लर मध्ये जायचंय तर तिथं गूगल पे नको. ते रिस्की आहे. तर सगळ्यांनी एटीएममधून कॅश काढा. तीन हजार मसाजचे आणि नंतर आत गेल्यावर तुमचं तुम्ही बघा तुमच्या हिशेबाने. एक सूचना.
एक संशयास्पद इमारत. लिफ्टमधून बाहेर पडताच समोर एक अंधारं रिसेप्शन. काऊंटरवर बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसतो तसा गळ्यात मफलर टाकलेला रणजीत सारख्या चेहऱ्याचा इसम. प्रत्येकी तीन हजार कॅश मोजून दिली जाते. नोटा मोजताना पात्राच्या आविर्भावात गिल्ट. कॅश ड्रॉवरमध्ये टाकताना रणजीतच्या हालचालीत चोरटेपणा.
माझं पात्र या प्रकारासाठी मानसिक किंवा तत्सम नैतिक वगैरेदृष्ट्या तयार नाही. पण मित्रांपुढं भीड तुटत नाही. मित्र एकेक करून आत कुठेतरी गुडूप होतात. अत्यंत नाईलाजाने पात्र त्या फ्लोअरवरील अंतर्भागात प्रवेश करतं. पावलांमध्ये जोर नाही. आपण एका अंधाऱ्या गुहेतून गिलोटिनकडे चाललोय आणि आता आपला शिरच्छेद केला जाणार आहे, अशी भावना.
गुहेच्या शेवटी एक रूम. आत डीम लाईट्स. क्षीण अशक्त उजेड. एक बेड. एक बेसिन. ॲटॅच्ड वॉशरूम. पात्र बेडच्या कडेला शरीर टेकवतं. कधीही उठता येईल अशा बेतानं. खाटकानं सुरी फिरवण्याआधी कोंबडीच्या डोळ्यात जो थिजलेला भाव दिसतो, तसे पात्राचे डोळे. दारावर टकटक. छातीत धडधड. दार उघडून एक स्त्री आत प्रवेश करते आणि तिच्यासोबत परफ्यूमचा उग्र दर्प. मन आणखीनच विरजतं. स्त्रीसोबतचा पात्राचा अनुभव अगदीच तुटपुंजा. त्यामुळे अनोळखी स्त्रीसोबत अशा प्रकारे बंदिस्त असण्याचा मनावर पडलेला अतिरिक्त ताण. पात्र नजर टाळतं. संवादाच्या वाटा बंद करून टाकतं. आलिया भोगासि असावे सादर म्हणून पात्राचं शरीर पडून राहतं. स्त्रीचे हात सराईतपणे चालत राहतात. एक एक नस सुटी सुटी पकडून मोकळी करणं हे खायचं काम नाही, ह्याला कौशल्य लागतं, हे नंतर जाणवतं. परंतु त्यावेळी मात्र पात्राचं हृदय वेगानं रक्त पंप करत असतं. वरवर पाहता पात्राला वाटतंय की हा प्रकारच आपल्याला मंजूर नाही. याच्या मुळाशी सर्व पातळ्यांवर भयाण शोषण आहे.
परंतु नीट बघितलं तर असं दिसतं की पात्रावर हिंदी सिनेमांचा प्रभाव आहे. त्याला भीती वाटतेय की पिच्चरमध्ये दाखवतात तशी आता इथंपण पोलिसांची रेड पडणार. आपली आणि पलीकडे एंजॉय करत असलेल्या मित्रांची इथून वरात निघणार.! गुन्हेगारांसारखं चेहरा काळ्या कपड्यानं झाकलेल्या अवस्थेत धरून नेणार आपल्याला. कदाचित पोलिसांचं आणि ह्या मसाजवाल्यांचं सेटींग असलं तर? मघाच्या त्या रणजीत सारख्या चेहऱ्याच्या माणसानंच पोलिसांना टीप दिली तर? आता काय खरं नाय. आता पोलिस आणि मसाजवाले दोघे मिळून पार नागडं करूनच सोडणार आपल्याला.! ''सेक्स रॅकेट चा पर्दाफाश. पुण्यातील चार तरूण नको त्या अवस्थेत सापडले'' अशी हेडलाईन झळकायला लागली डोळ्यांसमोर. काही रिपोर्टर पात्राच्या घरापर्यंत पोचलेले वास काढत.
आणि पात्राच्या डोक्यात इकडे हे सगळं चाललेलं असताना त्या स्त्रीला त्याची गंधवार्ताही नाही. तिचं तिचं मसाजचं काम चाललेलंच आहे.
'एनीथिंग एल्स?' ती विचारते शेवटाकडे.
'नो. नो. यू प्लीज गो. यू गो फास्ट. थॅंक यू.!'- पात्र.
त्यानंतर वादळी वेगानं हालचाली करत पात्र रिसेप्शनला येऊन बसतं. एक सुटकेचा निःश्वास. एक रिलीफ. रणजीत पात्राला पाण्याची बॉटल देतो. तीच ती अंगठ्याएवढी पाण्याची छोटी बिस्लेरी. अश्लील आकाराची.
त्यानंतर अर्ध्या तासाने एकेक मित्र आतून प्रकट होतात. खुश दिसत होते.
'काय बे? काय केलास का नाय?'- मित्र क्रमांक एक.
'हॅ हॅ हॅ! तेचं तोंड बघ. हे काय करनार! काय यंत्राचा वापरच नाय एवडी वर्षं. आता गंजून गेलं असनार सगळं.' - मित्र क्रमांक दोन.
सगळे इमारती बाहेर पडले. चहा सिगरेटसाठी टपरी शोधत रस्ते पालथे घातले. त्यादरम्यान आकर्षक डार्क रंगात पेंट केलेल्या सरकारी इमारती दिसल्या. कलात्मक पद्धतीने डिझाईन केलेले सिटीबसस्टॉप्स दिसले. सिटीस्केपच्या मागे किमान काहीतरी सौंदर्यबोध आहे असं दिसलं. 'मराठीला राजभाषेचा दर्जा द्या' म्हणून आझाद मैदानाकडे चाललेला मोर्चाही दिसला. फक्त पानटपरी हा प्रकार दिसला नाही कुठे.
रात्री आठच्या सुमारास पात्र बोटीतून कसिनोकडे जाताना दिसलं. एक पूर्ण फ्लोअर जुगाराचा. तिथं एका टेबलला एक गावठी टप्पू उर्फ गुंठामंत्री टाईप मराठी तरूण बसलेला दिसला. बाकी बरेचसे बॅगा भरून कॅश घेऊन आलेले गुजराती शेठ. स्टाफ सगळा नॉर्थ ईस्टचा.
आणि दारूचा महापूर. महापूर हा शब्दही कमीच आहे इथे.
टॉप फ्लोअरला स्काय बार. पब्लिक बऱ्यापैकी बेहोश.
मित्रांचं दारूकाम ऐसपैस. रात्री बारा वाजले तरी उठायची लक्षणं दिसेनात. समोर डान्स परफॉर्मन्स चाललेला. कपडे अत्यंत तोकडे. त्या नृत्यांगनेकडे बघत असताना तिच्यामध्ये पात्राला अचानक अर्धनग्न गांधीजींचा भास व्हायला लागला. चरख्यावर सूत कातणारे गांधीजी. होय. तुम्ही बरोब्बर ओळखलं. असाच भास 'सामना'मध्ये श्रीराम लागूंना झाला होता. अभिनंदन तुमचं.!
हा कोलाहल पात्राला बघवेना ऐकवेना. म्हणून पात्र व्हर्जिन मोहितोचा ग्लास हातात घेऊन सगळ्या फ्लोअर्सवर वरखाली फिरत राहिलं.
अर्धे पिऊन उरलेले शेकडो ग्लासेस चहुकडे. अर्धं खाऊन सोडून दिलेल्या प्लेट्स चौखुर. दारू आणि अन्नाची नासाडी प्रचंड. हा सगळा माहौल बघून एखादा म्हणायचा, कुठाय गरिबी वगैरे? काय सांगता? काहीतरी अफवा पसरवता.
रात्री एकच्या सुमारास बघितलं तर तो गुंठामंत्री अजून त्याच टेबलला बसलेला दिसला. किती लाख उडवले आज यानं काय माहित. पिला एवढा होता की उभंही राहायला येत नव्हतं. दारू प्लस जुगार. या कंबाईन्ड नशेमुळे मनावर एक बधिर हिंसक मग्रूरीचा रंग चढलेला. त्वेषाने ओरडत होता की 'आज यांची ** मारल्याशिवाय जात नाय.'
अरे बाबा, तुझीच मारली जातेय. तू काय यांची मारणार.!
फिरता फिरता एका फ्लोअरवर भांडण चाललेलं दिसलं. बाऊन्सर्सच्या समोर दोन तरुण गयावया करताना. आणि काही बघे वगैरे.
नक्की कारण कळलं नाही. पण एका मुलीला ती दोन मुलं काहीतरी बोलली असं कळलं.
मुलगी फॅमिलीसोबत आलेली होती. जॉईंट फॅमिली होती. सगळी फॅमिली घोळका करून एकत्रच एंजॉय करायला आली होती बहुतेक. त्या पोरांना हे माहिती नसणार. त्यांनी खडा टाकून बघितला असेल. ते अंगलट आलं.
'तुला एवडी जवानी चढलीय तर जा बाहेर. मिळतात तिकडं'-- एक नातेवाईक.
'तुम्हाला केस करायचीय का? करायची असेल तर सांगा आम्ही पोलिसांना बोलावतो. करायची नसेल तर मी यांना इथून हाकलून देतो.'- बाऊन्सर्सनी नातेवाईकांना अंतिम प्रस्ताव दिला.
नातेवाईक जे होते तेही बऱ्यापैकी दारूच्या प्रतापाने डुलताना दिसत होते. त्यामुळे केस वगैरे करून प्रकरण वाढवण्यातला त्यांचा इंटरेस्ट अचानक कमी झालेला दिसला. बाऊन्सर्सनी त्या दोघांना बखोटीला धरुन लिफ्टमध्ये ढकलल्याचं दिसलं. हे शेवटचं दृश्य.
रात्री एक वाजता कसिनोमधून परत येताना लॉंचमध्ये एक म्हातारं कपल. दोघांवर मद्याची लाली चढलेली दिसून आली. आजोबा लाडात आलेले, आज्जीला मिठ्या वगैरे मारत होते. आज्जीचं काही खरं नाही आज रात्री.!
पात्र रस्त्याला लागलं तेव्हा दीड वाजलेला. मित्र पूर्णपणे फकाट.!
पात्रानं साळगावकरला फोन केला. त्यानं उचलला नाही. झोपला असणार घरी. किंवा त्या विदेशी महिला-मैत्रिणीकडे गेला असेल.
पात्र टुन्न मित्रांसोबत फूटपाथवरून चालत राहिलं.
एक टॅक्सीवाला मागं मागं येत राहिला. पात्र त्याला म्हणालं की तू असा मागं येऊ नकोस.
तर तो बोलला की ते कामच आहे आमचं.
टॅक्सीवाला अडीच हजार म्हणत होता पण शेवटी बाराशेत तयार केलं. परिणामी तो नाराज झालेला दिसून आला. कारण ड्रायव्हिंग फारच रफ केलं. कचाकच दामटत आणली रिसॉर्टपर्यंत. नशीब कुठं ठोकली नाही. किंवा असं समजा की मीच ठोकू दिली नाही. पात्र ॲक्सिडेंटमध्ये गचकलं असतं तर मग मी गोष्ट कशी सांगणार होतो? तुमच्या कानात येऊन?
अशाच एका दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून बीचवर. मग ॲगोडा फोर्ट. नंतर दुपारी 'चंद्रकांत' ला जेवून दाट झोप.
संध्याकाळी पुन्हा बीचवर. पायऱ्या उतरून खाली जावं लागतं तोवाला बीच. वॅगॅटॉर. तो बीच बसायला चांगलाय. नंतर बागा बीच वर हुक्का वगैरे करून मार्केटमध्ये शॉपिंग. लय म्हणजे लय म्हणजे लय चालवलं पात्राला. घामाची चिकचिक. घामाची आंघोळ. सकाळी आंघोळ करण्यात काही पॉईंटच नाही.
रात्री जेवून साळगावकरच्या टॅक्सीनं रिटर्न.
कसिनोचा विषय निघाला. तर साळगावकरनं सांगितलं की लोकल्सना कसिनो मध्ये अलाऊड नाही. आमच्या बायकांनी सरकारला सांगितलं की एकतर कसिनो बंद करा किंवा आमच्या नवऱ्यांना कसिनोमध्ये बंदी घाला. सुरूवातीच्या काळात आमच्या इथल्या लोकांना चटक लागली आणि ते रोजच उडवायला लागले. त्यात बरबाद झाले. सगळ्यात बेकार नाद. आता बाहेरून पर्यटक येतात. त्यांचं वेगळं पडतं. चार दिवस येतात आणि पैसे उडवून जातात. ते काही रोज रोज येत नाहीत.
शेवटच्या दिवशी चेक आऊट करून दिवसभराची टॅक्सी केली साळगावकरची. त्याचा का कुणास ठाऊक कन्नड भाषिकांवर राग आहे असं दिसलं.
मंगेशी टेंपल. तिथे भलीमोठी रांग खोळंबलेली. आत आरती चाललेली. रांग बघूनच पात्र साईडला सरकलं. सावलीत जाऊन बसलं. अरे रांग केवढीय बघा. वरती ऊन कसलंय बघा. कोण उभं राहणार.! बिनादगदगीचा देव असला तर बघा एखादा.
नंतर मग साळगावकरच्या शिफारसीला मान देऊन गोवा स्पाईसेस फार्म. तिथलं दुपारचं जेवण पात्राला चांगलं वाटलं.
साळगावकर म्हणणं पडलं की संस्कृती इथं आहे. संस्कृती कलंगूटला नाही.
साळगावकरला त्याचं म्हणणं नीट शब्दात मांडता आलं नाही. पण पात्रानं त्यामागच्या भावना समजून घेतल्या. संस्कृती एखाद्या ठिकाणी असते आणि दुसऱ्या ठिकाणी नसते, असं कसं होईल?
नंतर ओल्ड गोवा चर्च. आत काही ख्रिश्चन महिला प्रेयर वाचत वाचत रडत होत्या. तर मग बाहेरच बरंय. उन्हाच्या कारात बसायला आणि लवंडायला झाडी चांगली गर्द आहे चर्चच्या आवारात.
तिथून पणजी. मित्रांच्या दारूच्या खरेदीसाठी. सात खंबे सोबत न्यायला. आठ वाजता साळगावकरनं म्हापशाला सोडलं.
'एंजॉय केलं ना?' असं प्रॉपर विचारून मगच त्यानं निरोप घेतला.
लोकांना एंजॉयमेंट पुरवण्याचा साईड बिझनेस दिसतोय साळगावकरचा. साळगावकर चाबरा आहे. एका मित्राचं म्हणणं पडलं. माझ्या पात्राला असं जजमेंट पास करणं पटलं नाही. माझ्यावरच गेलंय माझं पात्र.
म्हापशावरून रात्री दहाची बस. थोडीफार झोप लागली बसमध्ये. जाग आली तेव्हा उजाडलेलं. शिरवळच्या पुढं आलेली बस. आणि मग लक्ष्मी नारायणला जेव्हा पात्र पाकसूरत उतरलं तेव्हा सव्वासात वाजलेले सकाळचे.
छान लिहिलंय... कॅसिनोच वर्णन
छान लिहिलंय... कॅसिनोच वर्णन अगदी चपखल!
आवडलं लिखाण.
खूप आवडलं लिखाण.
छान स्टाईल आहे लिखाणाची.
मस्त लिखाण. नेहमीप्रमाणे.
मस्त लिखाण. नेहमीप्रमाणे.
आवडले.
हटके लिहिता एकदम.
हटके लिहिता एकदम.
आवडतं.
खूपसे relate होते.
छान लिहिलंय. सगळं काही जणू
छान लिहिलंय. सगळं काही जणूकाही डोळ्यासमोर घडतंय असं वाटलं.
गोव्याच्या टॅक्सीवाल्यांबद्दल मात्र मला फारशी आपुलकी वाटत नाही. (व्यक्तिगत मत)
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
वेगळ्या शैलीमुळे आवडलं.
.
👌