विरंगुळ्यासाठी कुणी आलेले या बागेत
पाना फुलांचा बहर होता वसंत डौलात
उभा कोप-यात चाफा श्वेत फुले लपेटूनी
फोफावे सोनमोहोर सोन उसळी अस्मानी
झुलती लोलक हळदवे सजे छत बहाव्याचे
कोकीळ कुजणी रंगलेले आराधन प्रीतीचे
ते ताटवे मोगरीचे सडा चांदण्याचा उन्हात
सावलीला कुणी बैसले मारीत गप्पा निवांत
भारलेले सारे भोवती होता तोही बहरला
निढळाच्या घामाने होता तोही डवरला
काय सोहळे तया रंगारंगी वसंताचे
मनोरथ चालले तिथे कोरभर भाकरीचे
श्रमाचाच वसंत त्याचा त्याला घामाचा सुंगध
कुदळ फावडे सांगाती मातीशी खेळात धुंद
नाही भान बहराचे सफेदपोस जगाचे
भाकरीचे युद्ध तिथे चाललेले निकराचे
वस्रे फाटकी मळकी काया रापली उन्हाने
काम कर पटापट दिला दम मुकादमाने
विरंगुळा हा शब्दच नसे त्याच्या कोषात
हाता तोंडाशी गाठ कुठे मराया उसंत
विसावतो सरणावरच जीव त्याचा चिंतातूर
नाही मोल कवडीचे त्याला व्याधीचा भार
पानांफुलांतून त्याचे हात किमया करती
पाहता जन सुखावले डोळे त्याचे निवती
त्यानेच सजविले येथे पाना फुलांचे सोहळे
सावलीतल्या जगाला ऊन त्याचे न कळे
© दत्तात्रय साळुंके
आवडली.
आवडली.
अतिशय ह्रदयस्पर्शी आणि
अतिशय ह्रदयस्पर्शी आणि वास्तवाचे दाहक रुप समोर उभी करणारी कविता....
जबरदस्त लिहिलत साळुंकेजी......
वह!! फार सुरेख.
वह!! फार सुरेख.
>>>त्यानेच सजविले येथे पाना
>>>त्यानेच सजविले येथे पाना फुलांचे सोहळे
सावलीतल्या जगाला ऊन त्याचे न कळे
_/\_ माळी!!!
आवडली, छान लिहिले आहे.
आवडली, छान लिहिले आहे.
केशवकूल
केशवकूल
शशांकजी
सामो
नितनवे
धन्यवाद