खरडवही भाग ६: पदस्पर्श

Submitted by अतरंगी on 27 December, 2021 - 06:43

रोजच्या जगण्यात अनेक छोटे मोठे प्रसंग घडत असतात. त्यातले काही प्रसंग, तेव्हा मनात आलेली भावना कुठे तरी खोलवर रुतुन बसते. तसं बघायला गेलं तर त्यात फार काही विशेष नसते, पण त्यावर लिहावेसे वाटते. अगदी महत्वाचे नाही, वेगळे नाही. तरी पण असेच आयुष्यात लक्षात राहिलेल्या छोट्या मोठ्या प्रसंगांची नोंद...... असंच, उगीचंच.....

का काय माहित, पण मला कोणाला पदस्पर्श करुन नमस्कार करायला आवडत नाही. आई, बाबा, आज्जी आणि बायकोचे आज्जी आजोबा हे सोडून मी कोणाला मनापासून कधीच वाकून नमस्कार केला नाही. या सर्वांना पण करण्याचे कारण की माझ्या मनात या सर्वांबद्दल अतिशय आदर आहे. कोणी फक्त आपल्यापेक्षा वयाने/ पदाने मोठे आहे म्हणून, रितभात म्हणून, औपचारिकता म्हणून, मला कोणालाही नमस्कार करायला आवडत नाही. मुलांना मी कधीही स्वतःच्या पाया पडू देत नाही. पत्नीने कोणत्या सणावाराला नमस्कार केला तर मी लगेच तिला नमस्कार करतो. मला शक्यतो कोणालाही नमस्कार करायला का आवडत नाही हे माझे मलाच नक्की माहित नाही. त्यामागे ठाम असे विचार नाहीत. कदाचित मनात आदर नसताना पदस्पर्श करुन नमस्कार करणे हे कमीपणाचे आहे असे मला वाटत असावे.

१.

आमच्या लहानपणापासून घरी गणपती बसवायला गुरुजी येत असत. घराच्या जवळच राहायचे. त्यांचा मुलगा माझ्याच शाळेत होता, माझ्या पेक्षा दोन वर्षे लहान. आमच्या आसपासच्या जवळ जवळ सर्व प्रतिष्ठापना तेच करत. ते एका नामांकित कंपनीत कामाला होते आणि हे सर्व ते सुट्ट्यांच्या दिवशी किंवा गरज पडेल तेव्हा रजा टाकून करायचे. त्यांचे आमचे एरवीही घरी येणेजाणे असायचे. त्यांची मुले, आम्ही शाळेत एकत्र जायचो, संध्याकाळी एकत्र खेळायचो.
कॉलेजला गेल्यावर का कोण जाणे, माझे मुर्तीपुजा, कर्मकांडे याविषयी मत प्रतिकुल होत गेले. मी मंदिरात जाणे सोडले, पुजा वगैरे पण मी कधी करत नसे. अस्तिकता, नास्तिकता, देव, धर्म कसे थोतांड आहे यावर घरच्यांशी अल्पमतीने वाद घालत असे. घरी गणपती बसले की आरतीला मात्र मी ऊभा रहायचो. कॉलेज संपले, जॉब चालू झाला. आधी मुंबईला नंतर मग परदेशी एकटाच रहात असल्याने या सगळ्याशीच संबंध कमी यायला लागला. साधारण २००९ की २०१० साली मी पुण्यात होतो. आम्ही नविन घर घेऊन दोन अडीच किमी लांब रहायला गेलो होतो. कित्येक वर्षांनी मी गणपती बसणार त्या काळात घरी होतो. ईतक्या दिवसात आता गुरुजींचे वय झाल्याने, शिवाय त्यांना आजुबाजुच्या घरी पुजा असल्याने, आमच्या घरी प्रतिष्ठापना करायला त्यांचा मुलगा यायला लागला होता. तो पण त्याच नामांकित कंपनीमधे कामाला लागला होता, नोकरी वगैरे करुन हे सर्व करत होता. तो पुजा सांगायला आला तेव्हा मी सोफ्यावर लोळत पडलो होतो. त्याला काय कसं काय म्हणत जरा औपचारिकतेच्या गप्पा मारल्या. पुजेची तयारी झाल्यावर तो तिकडे वळाला. आरती वगैरे झाल्यावर आई बाबांनी त्याला श्रीफळ, दक्षिणा वगैरे दिली आणि त्याच्या पाया पडले. त्याने हात वर करुन त्यांना आशिर्वाद दिला. हे पाहिल्यावर माझा पारा चढला. तो बाहेर पडल्याक्षणी माझ्या तोंडाचा पट्टा सुटला. त्याच्या पाया पडायची गरज काय होती? मी आई बाबांवर जाम चिडचिड केली. त्यांचे म्हणणे," अरे वय कमी असलं म्हणून काय झालं? गुरुजी म्हणून आलेत, मान असतो." हे मला आजही पटलं नाही. पण त्यानंतर मी ऊठ्सुठ आरडाओरड करून गणपतीची पुजा गुरुजींच्या कडून करुन घेणं बंद केलं. आईने पुजा कशी करायची हे शिकून घेतलं, बाबा पुजेला बसत आणि आई त्यांना पुजा सांगत असे.

आजही तो प्रसंग आठवला तरी मला प्रचंड राग येतो. शिवाय एका गोष्टीचे राहून राहून आश्चर्य, वैषम्य वाटत राहते की त्या मुलाला काहीच कसे वाटले नाही? ईतके वयाने मोठे कोणीतरी आपल्याला वाकून नमस्कार करत आहे, त्याचे अवघडले पण येऊन खरे तर "मी तुम्हाला नमस्कार करायला हवा" असे म्हणून आपण त्यांना नमस्कार करावा हे सोडून एक पंचविशीचा तरूण, पन्नाशीतल्या जोडप्याला आशिर्वाद कसा देऊ शकतो? ही कसली मानसिकता? हे कसले संस्कार? ही कसली विचारसरणी?

२.

कामानिमित्त अनेकदा ज्युनिअर पोस्ट साठी वगैरे मुलाखती घ्याव्या लागतात. त्यात आमच्या फिल्ड मधे तर काही काही वेळा ऑपरेटर पण आधी तोंडी मग प्रात्यक्षिक परिक्षा घेऊन मग भरती केले जातात. त्यामुळे मला अनेक वेळा स्टाफ, वर्कर्स पोस्ट साठी अनेकांच्या मुलाखती, प्रात्यक्षिक घ्यावं लागली. आता कित्येक कंपन्या बरीच कामे sub contractors कडून करुन घेतात. ह्यात काही वेळा माझा sub contractors त्यांचे man power suppliers यांच्याशी पण संबंध येत असे.

असेच एकदा एका sub contractor कडे मी मुलाखत, प्रात्यक्षिक घेण्यासाठी गेलो होतो, स्टाफ, वर्कर मिळून ३२ जण, आठ ते दहा तासात सर्व आटपायचे होते. त्याच वेळेस माझ्या डाव्या पायास काहीतरी दुखापत झाली होती. मला तो पाय शक्यतो सरळच ठेवावा लागे. मी टेबल समोर बसताना पण तो पाय बाहेर सरळ ठेवून बसलो होतो. स्टाफच्या मुलाखती आटपून मी वर्कर्स कडे वळालो. आमच्या फिल्ड मधे काम करताना अनेक प्रकारची रिस्क असते, एक छोटीशी चुक आपल्या आणि सहकार्‍यांच्या प्राणावर बेतू शकते. त्यामुळे मी मुलाखत सेफ्टी संबंधीत प्रश्नांनी सुरु करत असे. त्यात जर समाधानकारक उत्तरे मिळाली तरच पुढे जात असे. त्या दिवशीच्या २६ वर्कर्स मधे काही काही जण असेच होते ज्यांनी पेट्रोकेमिकल प्लांट मधे कधीही काम केले नव्हते. असेच एक मध्यमवयीन गृहस्थ होते. त्यांना काम तर येत होते पण सेफ्टी संबंधीत प्रश्नांना त्यांना नीट काहीच सांगता आले नाही. त्यांना तीन महिने under review ठेवून मग परत एक मुलाखत घ्यावी, असा शेरा मी टाकून त्यांना जायला सांगितले. जाताना ते पटकन पुढे वाकले आणि माझ्या पायाला हात लावून हात जोडून, " सर, पास कर दिजीएगा" म्हणाले. मला त्यांची ही कृती एकदमच अनपेक्षित होती. ईतक्या वर्षात असे कधीच कोणी केले नव्हते. मी त्यांना असे करु नका वगैरे म्हणून त्यांना किमान नमस्कार तरी करायला हवा होता. पण त्या क्षणी ते सुचलेच नाही. मला काय करायचे हे न कळून मी नुसताच 'हं' म्हणालो. परत कधी साईट वर दिसले तर त्यांना नमस्कार करावा, चार शब्द बोलावे असे मनात ठरवून ठेवले. पण कसे काय, काय माहित, ते मला साईटवर कधीच दिसले नाही, कधीच कुठे भेटले नाही.

Luckily का होईना, कधीतरी ते कुठे तरी भेटावे, मला त्यांना नमस्कार करुन, विचारपूस करायची संधी मिळावी.

३.

मागच्या महिन्यातील गोष्ट...
करोना मुळे बरेच महिने सगळ्या जुन्या मित्रांना एकत्र भेटायचा योग आला नव्हता. एके दिवशी अचानक सगळं जुळून आलं. जवळच्याच एका बार मधे निवांत पेयपान चालू होतं. एक एक जण येत होता, गप्पा, जोक्स, खेचाखेचीला ऊत आला होता. एक मित्र यायचा राहिला होता. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे, राजकारणात येण्यासाठी हालचाल चालू आहे, त्याचे त्या भागात थोडेफार वजन आहे.. तो अल्मोस्ट पेयपान संपल्यावर जेव्हा जेवायची ऑर्डर द्यायची होती त्या वेळेस ऊगवला. सगळ्यात शेवटी आलेला तो पर्यंत बाकी सर्वांवर आळीपाळीने जोक्स होऊन गेले होते. तो आल्यावर सगळेच त्याच्यावर घसरले. त्याच्यावरच जोक्स चालू होते तेवढ्यात स्टार्टर्सची ऑर्डर घेऊन वेटर आला, त्याने याला पाहिलं आणि लगेच 'सर, नमस्ते सर!' म्हणत अक्षरशः खाली वाकून पायाला हात लावून नमस्कार केला. तो ऑर्डर सर्व्ह करुन गेल्यावर सगळे जण परत या विषयावरुन पण मित्रावर घसरले. मी मात्र त्यानंतर जरा त्या सर्वातून अलिप्त झालो. मला ते चांगलंच खटकलं. का त्या वेटर ला वाटले असावे की याला ईतके वाकून नमस्कार करावा? ओळख रहावी? कधी गरज पडली तर फायदा होईल ? टिप साठी? नक्की कशासाठी? हे सगळं तर फक्त जस्ट 'नमस्ते सर' ने पण साध्य झालं असतं ना? पदस्पर्श कशासाठी? हे काय आहे गरिबी? लाचारी? survival ची धडपड? ईतकं का झुकावे कोणासमोर? आपण बरे आपले काम बरे. आपले काम चांगले असेल तर होईलच की प्रगती. चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण का कोणासमोर झुकावे? त्याक्षणी, त्या ठिकाणी हे सगळे विचार माझ्या मनात तरळून गेले.
दोन चार दिवस तो प्रसंग माझ्या मनातून गेला नाही. एखादा प्रसंग डोक्यातून गेला नाही की त्याची दुसरी बाजू पण दिसू लागते. आपल्याला काय कळणार त्या माणसाची धडपड, तो कोणत्या परिस्थितीतून आलाय , कोणत्या परिस्थितीत आहे, कशाशी झगडतोय, कोणती जबाबदारी वीस पंचवीस वर्षाचा असताना खांद्यावर घेऊन लढतोय? आपण आजवर सरळ सोट मध्यमवर्गीय आयुष्य जगलो. जे हवे ते हव्या त्या वेळेला नशिबाने मिळाले, कधी कोणत्या अडचणीचा, संकटाचा सामना करावा लागला नाही. आपला कणा ताठ ठेवायला नशिबाने भरपुर मदत केली आहे. आपण आपल्या सुखासीन, privileged जागी बसून का त्याला जज करतोय?

पण परत आहे रे वर्गातले पण कित्येक जण अशा प्रकारे झुकणारे आपण आपल्या आजुबाजुला पाहतोच की! पैशासाठी, सत्तेसाठी किंवा अजून कशासाठी, कोणासमोर तरी झुकणारे आहेतच की? त्यांना कसे काही वाटत नाही? हे वाकून केलेले सगळे पदस्पर्श आदरानेच केलेले आहेत की कोणत्या हेतूने?

पण मला या सर्व प्रसंगात केल्या जाणार्‍या पदस्पर्शात कमीपणा का वाटतोय? तो खरेच आहे का? की मीच विनाकारण सहज म्हणून केल्या जाणार्‍या कृतीचा, औपचारिकतेचा, त्या मागच्या मानसिकतेचा/ भावनेचा अतिविचार करतोय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठिक

एखाद्याने वाकून पदस्पर्श केला म्हणजेच फक्त झुकणे असते का?तसे न करताही बोलण्यातली अजिजी, लाळघोटेपणा , उगाच पुढेपुढे करणे हे देखील एक प्रकारचे झुकणे असतेच की. अगदी हस्तांदोलन केले तरी ते बरोबरीच्या नात्याने आहे की एका बाजूने लाचारीतून झुकणे आहे ते बाकी देहबोली सांगून जातेच. मनात नसताना केलेला जबरदस्तीचा पदस्पर्शही समजतो आणि नुसत्या हस्तांदोलनातही वाटणारा आदर, आपुलकी पोहोचवता येते.
पूजा सांगणारे गुरुजी वगैरे मंडळींना नमस्कार केला जातो तेव्हा त्या व्यक्तींचे वय बघितले जात नाही. तुम्ही आम्हाला हे देव-धर्म कार्य पूर्ण करायला सहाय्य केले या कृतज्ञतेतून तो नमस्कार असतो. समोरुन सर्व मंगल होवो अशी सदिच्छा अपेक्षित असते. अशावेळी ते गुरुजी अवघडले की मग यजमानांनी अवघडणे, आज तुमचा मान असे म्हणत त्या नवख्या गुरुजींना समजावणे वगैरे घोळ वाढतात.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती....
वयाचा हिशेब गौण होतो मग...

वयाच्या सोळाव्या वर्षी जगाला ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत देणारे ज्ञानेश्वर नुसते ज्ञानेश्वर न राहता माऊली होतात लाखोंची. जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागतात.

किती तरी महान विभूती वयाने कमी पण त्यांचे कर्तृत्व अगाध आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई खूप कमी वयात वीरमरण कवटाळतात... भगतसिंग फाशी गेले वय वर्ष 23.
त्यावेळीही सर्व थरातल्या लोकांचे ते आदर्श होते.

आता लहान वयाचे गुरुजी... तुमच्या पेक्षा ज्ञानाने मोठे....

आई-वडील आपलं मन राखतात. हट्ट पुरवतात. एखादी गोष्ट तिही नमस्कारा सारखी ज्यात तुमचा काहीच तोटा नाही ती केली त्यांच्या आनंदासाठी तर कुठे बिघडलं. माझा एक नास्तिक मित्र त्याच्या आईचा उपास असेल त्या दिवशी उपवास करायचा...दोन उद्देश...आईचे समाधान आणि तिला वेगळं काही करावं लागू नये...

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती....
वयाचा हिशेब गौण होतो मग...>>>

मान्य आहे. तुम्ही दिलेली ज्ञानेश्वर, भगत सिंग आणि अशा सर्व व्यक्ती वंदनीय आहेतच.
दिव्यत्व, ज्ञान हे जिथे असेल तिथे नतमस्तक होणे हे अगदी स्वाभाविक आहे.

स्वाती२, दत्तात्रयजी, तुमचे मुद्दे समजले.

नुस्ता घोकंपट्टी करुन मंत्रोच्चार करणे, पुजा कशी करावी याची माहिती असणे, हे माझ्या मते ज्ञान नव्हे. आणि त्यात आपल्या वयापेक्षा निम्म्या वयाच्या व्यक्तीला पदस्पर्श करुन नमस्कार करणे मला मान्य होत नाही.

लग्न कार्यांमधे वधूपित्याने नवर्‍यामुलाचे पाय धुणे, मुलीच्या मामा- मामींनी पदस्पर्श करुन नमस्कार करणे, ईथे सुद्धा हे आज लक्ष्मी-नारायण आहेत, हा नमस्कार या व्यक्तींना नसून त्यांच्या रुपात असलेल्या लक्ष्मी नारायणाला आहे, असे लॉजिक सांगितले जाते.

(मुलीच्या मामा- मामींनी पदस्पर्श करुन नमस्कार करणे, ही प्रथा लग्नांमधे (बहुतेक नाशिकच्या बाजूला) पाहिली आहे.)

बन्या,

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

नमस्कारे लीनता घडे | नमस्कारे विकल्प मोडे |
नमस्कारे सख्य घडे | नाना सत्पात्रासी ||
नमस्कारे दोष जाती | नमस्कारे अनन्य क्षमती |
नमस्कारे मोडली जाती | समाधाने ||
नमस्कारे कृपा उचंबळे | नमस्कारे प्रसन्नता प्रबळे |
नमस्कारे गुरुदेव बोले | साधकांसी ||
नमस्कारास वेचावे नलगे | नमस्कारास कष्टावे नलगे |
नमस्कारास काहीच नलगे | उपकरण सामग्री

मी करते नमस्कार गुरुजींना देवळात. कोणाचे आशीर्वाद मिळत असतील तर का नाही घ्यायचे? एक डिट्टो टेंबे स्वामींसारखे दिसणारे. तेजस्वी डोळ्यांचे वृद्ध से गुरुजी आहेत. त्यांनी मला इतका मनापासून आशीर्वाद दिलेला आहे. मला वाटते मला आशीर्वाद लाभतो.
------
लहानपणी एक तृतियपंथी बसमध्ये, शेजारी बसलेला होता. मी असेन पाचवीत त्याने बर्‍याच गप्पा मारल्या. त्याला शिकता आले नाही म्हणुन खंत होती त्याला. मला कुठले काही कळायला पाचवीत. पण जाता जाता त्याने आशीर्वाद दिला - खूप शिका.
माझ्या मते तो आशीर्वाद मला लाभला. त्या लोकांचे आशीर्वाद लाभतात असे म्हणतात. मला तरी लाभला.

अगदी तुझ्यासारखे विचार आहेत.
नमस्कार करायची वेळ फार कमी येते. मला जी माणसे आवडतात त्या मोठ्या माणसांना नमस्कार करतोच. रादर ते अंगवळणी पडलेले आहे. त्याच्याकडे गेलो ते आले की निघताना नमस्कार करावा ह्या शिकवणीतून तो घडतेच. कोणी नमस्कार एक्सपेक्ट केला की अजिबात करत नाही. गुरुजी वगैरे प्रकार आले की जनरली पूजेत ते आता देवाला मोठ्या माणसांना आणि मला नमस्कार करा इतक्या स्पष्ट सूचना देतात. त्यामुळे त्या यंत्रवत फॉलो करतो. आई बाबा नमस्कार करत आहेत म्हटल्यावर आपण करावा असं वाटल्याने तो करतो. चारचौघात 'तो त्यांचा मान आहे' लेक्चर ऐकण्यापेक्षा देखल्या देवा सोपं आहे.
देवळात वगैरे जात नाही कधी प्रसंग आलाच तर अगेन देखण्या देवा!

नमस्कारापेक्षा मला तीर्थ प्रसादाची भीती वाटते. त्या तीर्थ प्रकारातून सुटका करायला वाट्टेल ते खोटं बोलावे लागते. तीर्थ मिळालं, अजून दर्शन घेतलं नाही, होऊदे बाकीच्यांचे.. असं करत कोणी घोळका आला की पटकन नमस्कार केल्यासारखं करून दूर कोणाशी गप्पा मारायला सटकणे.. तरी कोणी दिलेच तर प्यायला सारखे करून पटकन वॉश बेसिन शोधायचे. ते तीर्थ डोक्याला पुसायची विचित्र आयड्या कोणाची आहे कोण जाणे. काय मिळतं ते चिकट हात केसाला पुसून! का एकदम त्या सत्यनारायणाचा डोक्यावर हात वगैरे येतो! साबणाने हात धुवून मग करा की!

छान लिहिलेय.

आपल्याला जे खटकते ते इतरांसाठी नॉर्मल असु शकते त्यामुळे कशाला इतके मनाला लाऊन घ्यावे असे वाचुन वाटले. Happy

मी टिनेजमध्ये असताना माझ्या आजीला एका लहान भटजींच्या पाया पडताना बघुन आधी धक्का बसला आणि मग चिडचिड झालेली हे आठवले. तेव्हा आजीने उलटे मलाच दटावले होते की ते भटजी आहेत वगैरे.. नंतर मला असे वाटले की पुजा करणे हे कर्मकांड स्विकारले तर त्यासोबत येणारे बाकी कर्मकांडही स्विकारायला हवे. नाहीतर सगळेच नाकारायला हवे.

मला सहजी कोणाच्याही पाया पडणे जमत नाही. मला एवढा अहंकार कसला असावा ह्याचे मनोमन आश्चर्यही वाटते. तरीही चार लोक ज्याला नमस्कार करतात त्याला मी चटकन नाही करत हेही खरेय. तेवढी लीनता माझ्यात असायला हवी असे जरुर वाटते पण हातुन कृती घडत नाही हेही तितकेच खरे आहे.

मला सत्यनारायणाचा प्रसाद खुपच आवडतो. कुठलेही तिर्थ घेताना मी सांगते की अगदी दोनच थेंब घाला हातावर म्हणुन. पण प्रसाद मात्र भरपुर घेते मागुन Happy

पूजा सांगणारे गुरुजी वगैरे मंडळींना नमस्कार केला जातो तेव्हा त्या व्यक्तींचे वय बघितले जात नाही. तुम्ही आम्हाला हे देव-धर्म कार्य पूर्ण करायला सहाय्य केले या कृतज्ञतेतून तो नमस्कार असतो. .... +१
तरीही मला पटकन नमस्कार करणे आवडत नाही.
तीर्थाबाबत सहमत.तो एक कंटाळवाणा भाग असतो.

माझे फंडे सिंपल आहेत. आपल्या ओळखीच्या लोकांच्या भावना जपायच्या.

मी नास्तिक असल्याने स्वतःहून गणपतीच्यासुद्धा पाया पडत नाही. म्हणजे सोसायटीमध्ये साजरा केला जाणारा गणपती असो किंवा मुलांना सार्वजनिक गणपती दाखवायला नेतो तेव्हा एकदाही पाया पडत नाही. पण ते मुद्दामून नास्तिक आहे म्हणून पडत नसून आपसूकच पडल्या जात नाहीत.
पण तेच जर कोणाच्या घरच्या गणपतीला किंवा पूजेला गेलो असेल तर मात्र तिथे सगळे काही इतके साग्रसंगीत करतो की कोणाला संशय येऊ नये की मी नास्तिक आहे. म्हणजे हळद कुंकू फुले देवाच्या चरणी अर्पण करून आपल्याही माथ्यावर टीका लावणे. देवाच्या पायावर डोके ठेवणे. पाया पडताना डोळे मिटून प्रार्थना केल्यासारखे पुटपुटणे.. मी काय पुटपुटतो माझे मलाच माहीत नाही. फक्त ओठांची हालचाल असते पण तरी ते करतो कारण ज्यांनी आपल्या घरी गणपती बसवला असतो किंवा पूजा ठेवली असते त्यांना त्याचे फार कौतुक असते. मला त्यात मी देव वगैरे मानत नाही म्हणून कुठला मिठाचा खडा टाकायचा नसतो.

जे पूजा सांगतात त्यांच्या पाया पडण्याबाबत सुद्धा हेच लागू. पाया पडतो आणि मोकळा होतो. त्यात कुठला अहंकार दुखावला जात नाही. उलट माझे आईवडील जिथे पाया पडत असतील तिथे आपण न पडणे हे मला हट्टीपणाचे वाटते. जसे कर्मकांड करणारे बरेच जण हेकट असतात तसेच आपणही नास्तिकत्व जपण्याबाबत झालो तर त्याला काय अर्थ असे वाटते.

पण माझे आईवडील सुद्धा कमाल आहेत. त्यांना असे वाटले की हे आता याच्यासाठी जास्त होतेय तर ते स्वतःच त्या भटजींना सांगतात की आमच्या पोराचा या सगळ्यावर विश्वास नाही Happy

तीर्थ बरेच लोकांना का आवडत नाही बरे.. लहानपणी आमच्या घरी पूजा असताना मी छान अर्धा पाऊण ग्लास लस्सीसारखे घटाघट प्यायचो. तुम्ही म्हणता ते तीर्थ कदाचित वेगळे असावे का..

आणि हो ते अमितव यांनी म्हटल्याप्रमाणे तीर्थाचा हात डोक्यावरून फिरवणे हे सुद्धा मी आजही न चुकता सवयीने करतो. पण तो हात डोक्याला टच नाही करत. तर मै हू ना च्या शाहरुखसारखे हवेत फिरवून काढतो Happy
(कधी कधी वाटते हा शाहरुखच माझा देव आहे. त्याचा संदर्भ आपसूक कुठे ना कुठे येतोच)

माझ्या लहानपणी आमच्याकडे नवरात्रात नऊ दिवस कुमारिका पूजन करून ती जेवायला बसल्यावरच बाकीचे जेवत.
वयाच्या दहा वर्षांपर्यंत मिच कुमारिका असायचे घराची ( मासिक पाळी चालू होण्याच्या वयात मुलगी गेली की दुसरी लहान मुलगी शोधायचे).
माझे आईवडील अगदी भक्तिभावाने पूजन करून मला नमस्कार करायचे. मला खूपच मजा वाटायची तेव्हा (शिवाय त्या दिवसात मला कुणी रागवायचे नाही, घरची देवी म्हणून).
माझे भाऊ मात्र चार हाका मारल्यावरच यायचे आणि जेमतेम नमस्कार केल्यासारखं करायचे. (त्यांचा देवावर विश्वास होता, माझ्यावर नाही.) मला वर किंवा शाप काहीच देता येत नसल्यामुळे मी फक्त तक्रार करायचे त्यांची.

शिक्षण क्षेत्रात आल्यावर शिक्षक दीन, दसरा... असे दिवस आले की धडकीच भरायची. वर्गात शिरल्याबरोबर एक सुरू झाला की इतर सगळी मुलं पायांवर धाड घातल्यासारखी धावत यायची. त्यातल्या कित्येकांना मनापासून यायचं नसायचंचंचं. ... पण इतर मुलं करताहेत तर आपणही करायलाच पाहिजे असं त्यांना वाटत असावं.

आता मला कुणाला नमस्कार करण्याची वेळ फारशी येत नाही. ... जवळचे भाचे वगैरे सोडून इतर कुणी केला तर अवघडल्यासारखं वाटतं.

ही सिरीज पूर्ण वाचली. छान लिहिलेत आणि relatable.

तीर्थप्रसाद आणि वाकून नमस्काराबाबत मी तुमच्याच पक्षात. एकतर घरी वाकून कुणाच्या पाया पडण्याची मनाई आहे. त्यामुळे चरणस्पर्शाची सवयच नाही. Makes me look like a sour thumb in the crowd, अनेकांना ते गर्विष्ठपणाचे लक्षण वाटते. Can’t help.

आजूबाजूला सर्वजण पटापटा गुडघ्याला जेमतेम हात लावल्यासारखे करण जौहरी स्कूल ऑफ फिल्मी “पैरी पौना” करतात त्याचे हसू येते. करायचाच असेल तर नीट नमस्कार करावा ना?

आदर दाखवण्यासाठी दोन्ही हात जोडून नीट मान तुकवून नमस्कार करतो.

कुणी पाया पडू लागले की प्रचंड अवघडल्यासारखे होते, त्यांना पटकन आवरतो. शेकहँड करतो किंवा प्रेमाने आलिंगन देतो.

ही सिरीज पुढेही सुरु ठेवावी असा आग्रह.

मला हे वाचून एकदम आठवलं की इथे आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुणाचे आईवडिल वगैरे आले आणि पहिल्यांदा भेटले की बरेच जणं त्यांना पायाला हात लावून वगैरे नमस्कार करतात. नुसतं हात जोडून नमस्कार करता येतोच की. आम्हांला घरी असं कोणी वयाने मोठं आलं की लगेच पायालान्हात लावून नमस्कार वगैरे शिकवलं गेलेलं नाही. फक्त आम्ही भारतातून निघताना किंवा घरी वयाने मोठं कोणी आलं असेल तर ते परत निघताना तेवढा नमस्कार करतो.

इथे भारतिय नवी पिढी अंकल आंटी म्हणते ते मला अजिबात आवडत नाही. 'आंटी मत कहोना' होते अगदी. शेजारच्या तरुण जोडप्याला बोलावलेले जेवायला. ती मुलगी आंटी आंटी करत होती.

नॉर्थ ईंडियन लोकामध्ये हे पायलागु प्रकरण खुप आहे. कोणीही वयाने जेष्ठ घरी आला की आख्खे घर पाया पडणार. साऊथी लोक इतरांच्या पाया पडताना पाहिल्याचे आठवत नाही.

आम्ही लग्न ठरल्यावर कोणीही वयाने मोठे आले कि जोडीने त्यांच्या पाया पडत असू. यामुळे काही वेळेस दोघं डॉक्टर असून किती नम्र आहेत हेही ऐकायला मिळाले.

मला स्वतःला एखाद्यामध्ये असलेले अंगभूत गुण पाहिले तर कोणाच्याही पाया पडायला अजिबात लाज/ वाईट वाटत नाही मग ते आपल्यापेक्षा वयाने लहान असले तरी.

मी स्वतः गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो तेथे असलेल्या गायक वादकाने अप्रतिम सादरीकरण केले तर वयाने जास्त असले तर त्यांना अगदी वाकून नमस्कार करतो. उदा पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित जयतीर्थ मेवुंडी ( हे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत). पण त्यांचा त्यांच्या क्षेत्रात अधिकार केवढा मोठा आहे.

आणि वयाने कमी असले तर अगदी वाकून नाही तरी पदस्पर्श केल्याचे हावभाव करतो.

यामागे माझा विचार असा आहे कि आपण त्या माणसातील देवत्वाला नमस्कार करतो आहोत त्या माणसाला नसेल तरी.

याउलट मला कोणी वाकून नमस्कार केला तरी कानकोंडे झाल्यासारखे होते मग यात माझी मुलं असली तरी मी शक्यतो त्यांना अगदी पायाला स्पर्श करेपर्यंत वाकू देत नाही. बऱ्याच वेळेस रुग्ण कृतज्ञता म्हणून पाया पडायला येतात तेंव्ह मी त्यांना थांबवतो आणि सांगतो कृपा हि परमेश्वराची आहे माझी नाही.

माझे विद्यार्थी ज्यांना मी शिकवलं आहे असे पण पाया पडायला लागले तर मला फार संकोचल्यासारखं होतं कारण कुणी आता प्राध्यापक आणि विभागप्रमुख झाले आहेत किंवा प्रथितयश डॉक्टर झाले आहेत.

कारण अजून मला ज्यासाठी आपल्याला कुणी नमस्कार करावा असे आपण आयुष्यात काय मोठंसं केलंय? असच वाटत राहतं.
यात काही लोकांना मानभावीपणाही वाटत असावा. पण मला कुणीही माझ्या पाया पडू नये असंच वाटत असतं हे खरं