बहिणाबाईची शाळा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 30 March, 2026 - 06:15

बहिणाबाईंची शाळा
तिले छत आभायाची
शिकविते सरसोती
तिले काजी हो लेकीची

बोट तिचं पकडून
लिही मनात मनात
झालं जगणंच गाणं
घुमं रानात वनात

दिले कष्टाले हुंकार
घरोट्यात येती सूर
बसे चटका हाताले
तव्हा मियते भाकर

गोड गाई बहिणाई
साथ सुगरण देई
पाना फुलांचेही तिथे
भान हरखुन जाई

नाही अक्षर ओळख
तिचं जगणं प्रांजळ
जसा वाहे खळाळत
वनी निर्झर निर्मळ

गिरवून अक्षरांशी
कुठं येते शहाणपण
पाखरांना शिकवलं
सांगा कोण्या गुरुजींनं

बहिणाईच्या गाण्यात
वाहे झरा करुणेचा
अरे माणसा माणसा
दिला धडा जगायचा

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
(शेवटच्या कडव्यात "बहिणाईच्या गाण्यात" असा बदल केल्यास गेयता वाढेल असे सुचवितो)

बहीणाबाईंचा एक मौल्यवान विचार. -

सोन्यारुप्याने मढला मारवाड्याचा बालाजी
शेतकऱ्याचा इठोबा पानाफुलामध्ये राजी
.
अरे बालाजी इठोबा दोन्ही एकज रे देव
श्रीमंतीने गरिबीनं केला केला दुजाभाव

बहिणाबाईंचं साधंसुधं जीवनाचं मौल्यवान होतं. त्यांना कितीतरी गोष्टी सहज समजल्या . त्यात कुठेही पांडित्य नाही. वैधव्य आलं तरी खचून न जाता शेतात राबणं, मुलांना सांभळण. कुठेही नशीबाचं रडगाणं नाही. मन जेवढं कोमल तेवढंच खंबीर. वृत्ती संताची. आजही ते एक जिवंत विद्यापीठ आहे.
सदा जगाच्या कारणी चंदनापरी घसला
अरे सोतामधी त्याले देव दिसला दिसला

कुठेही कर्मकांड नाही.

मुग्धमानसी
हर्पेन
Sparkle

अनेकानेक धन्यवाद..