क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम
ज्यांना पानभर पोस्ट वाचायचा कंटाळा असेल त्यांना सुरुवातीलाच थोडक्यात सांगतो, पिक्चर मस्त टाईमपास आहे. शेवट मनाला भिडणारा आहे. एका प्रश्नाकडे लक्ष वेधणारा आहे.
जर तुम्ही थिएटरची पायरी चढावी की नाही याबाबत साशंक असाल तर बिनधास्त माझ्या गॅरंटीवर बघायला जा. म्हणजे नाहीच आवडला तर खुशाल या पोस्टवर येऊन मला चार शिव्या हासडून हलके व्हा. पण त्याची शक्यता कमीच आहे. कारण आमच्या थिएटरमध्ये सगळी पब्लिक एन्जॉय करत होती. शेवटी चार टाळकी तर "जय महाराष्ट्र" घोषणा देऊनच उठली. या नवी मुंबईची पब्लिक थोडी वेगळीच आहे. पण याचा अर्थ चारच जण चित्रपट बघायला होते असे नाही, तर शो हाऊसफुल होता. यासारखे अजून रिव्ह्यू पडतील तसे अजून काही आठवडे शो असेच हाऊसफुल जातील.
तर आता परीक्षणाकडे वळूया,
मी बोलतो मराठी, मी लिहितो मराठी, मी वाचतो मराठी... मी तर जगतो मराठी!
मी थिएटरमध्ये जाऊन आवर्जून, पिक्चर सुद्धा बघतो मराठी. कारण मराठी भाषेच्या प्रसाराचे एक महत्वाचे माध्यम वाटतात मला मराठी चित्रपट. त्यामुळे "मराठी शाळा वाचवा आणि मराठी भाषा जगवा" असा संदेश घेऊन येणारा "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" चित्रपट मला पहिल्याच आठवड्यात बघायचाच होता.
झिम्मा आणि फस्सक्लास दाभाडे सारखे चित्रपट बनवून हेमंत ढोमेने अपेक्षा वाढवल्या होत्या. तसेच कलाकारांची जवळपास तीच टीम बघून त्या पूर्ण होणार याची खात्री सुद्धा होती. आणि अगदी तसेच झाले.
चित्रपटाची सुरुवात कोकणातला एखादा एरियल ड्रोन शॉट घेऊन करणे हे जणू अनिवार्य आहे हल्ली. तसेच अध्येमध्ये कोकणातले छान छान लोकेशन टिपून दाखवायचे. त्यामुळे थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायला आल्याचा निर्णय योग्य आहे असे इम्प्रेशन तयार होत असावे. अर्थात तक्रार काही नाही. कोकणाचे हे रूप आवडतच आहे 
तर आपली मराठी शाळा बंद होतेय म्हणून मुख्याध्यापक सचिन खेडेकर यांच्या विनंतीला मान देऊन शाळेला शेवटचा निरोप द्यायला आणि जुन्या मित्रांसोबत एक गेट टुगेदर करायला शाळेचे माजी विद्यार्थी जमतात. त्यांनी उगाळलेल्या आठवणींमुळे चित्रपट सुरुवातीपासूनच आपल्याला देखील दर दृश्यागणिक नॉस्टेलजिक करत सुटतो. मग आपली शाळा कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातील आहे की मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातील याने काही फरक पडत नाही.
कारण शाळेतल्या मित्रांचा ग्रुप, त्यांच्यासोबत केलेले कांड आणि किडे, त्यात एखादी आवडणारी मैत्रीण आणि तिच्या नावावरून चिडवणे.. आवडते शिक्षक, आवडत्या बाई, त्यातही कोणी चांगले शिकवते म्हणून आवडीचे, तर कोणी छान दिसते म्हणून आवडीचे.. शाळेत केलेल्या कविता आणि बोर्डावर लिहिलेले सुविचार, कुठेतरी आपणच पेन वापरून रंगवलेल्या भिंती आणि कर्कटक वापरून कोरलेले लाकडी बाक.. शाळेतले लक्षात राहिलेले शिपाईमामा, शाळेबाहेरच्या चिंचबोराच्या टपऱ्या आणि वडापावच्या गाड्या, शाळेचाच गणवेश शिवणारा टेलर.. मधल्या सुट्टीत एकत्र शेअर करून खाल्लेले डबे, शाळा सुटल्यावर मित्रांसोबत पडून राहायचे अड्डे, मित्रांसोबतच्या वार्षिक सहली.. हुशार मुलांचे वेगळे ग्रुप तर बॅकबेंचर मुलांचे वेगळे आणि त्यांची एकमेकांबद्दलची मते, मित्रांमध्ये एकमेकांना अगदी त्यांच्या तीर्थरूपांच्या नावाचाही उद्धार करत चिडवणे आणि ज्याचा कोणालाही राग न येणे, तर दुसरीकडे एखाद्याला त्याच्या परिस्थितीवरून किंवा व्यंगावरून त्या न कळत्या वयात अजाणतेपणी चिडवून दुखावणे.. मित्रांशी भांडणे आणि पुन्हा एकत्र येणे.. मित्रांसोबत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईच्या हातचे आवडीने खाणे आणि ती चव देखील कित्येक वर्षांनी लक्षात असणे.. सगळे काही फार खुसखुशीत आणि विनोदी पद्धतीने दाखवले आहे. सारेच काही रिलेट होते.
पूर्ण चित्रपटभर लोकं हसायचे थांबत नव्हते. आणि यापैकी सत्तर टक्के हश्या एकटा अमेय वाघ वसूल करत होता. तो आणि त्याच्या मुलाचा ट्रॅक फारच मस्त जमला आहे. एखाद्या बोलीभाषेची बेअरिंग अचूक पकडणे हे त्याने आधीही केले आहे आणि हे तो नेहमीच कमाल करतो. या चित्रपटात त्याने आगरी भाषेत धमाल केली आहे.
तर अशा सगळ्या जुन्या आठवणी उगाळत शाळामित्रांच्या सहवासात असताना अचानक त्यांना जाणीव होते की ज्या शाळेने आपल्याला या आठवणी दिल्या, आपल्याला घडवले, आजची आपली ओळख जिने बनवली तिचीच ओळख आज कायमची मिटली जाणार आहे. आणि मग ते तसे होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न करणे अगदी आतून येते.
– शाळा बंद पडू नये यासाठी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा अजून संघर्षपूर्ण दाखवता आला असता – असे मी चित्रपट बघण्याआधी काही रिव्ह्यूमध्ये ऐकले होते. मलाही चित्रपट शेवटाकडे सरकताना थोडेफार तसेच वाटले होते... पण, नंतर जाणवले की मुळात हा लढा कुठल्या प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध किंवा शिक्षण माफिया विरुद्ध नसून त्या आधी तो आपल्याच विचारांशी होता. मराठी माणसांनी ठरवले तरच मराठी शाळा वाचू शकतात. त्यामुळे आधी मराठी शाळा वाचवण्याची गरज आहे का? तर हो, आहे आणि ती का आहे हे आपल्यालाच समजून घ्यायला हवे. आणि हेच सचिन खेडेकर योग्य प्रकारे समजावत शेवटाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.
अन्यथा एक शाळा हिरोगिरी करून वाचली इतकाच चित्रपटाचा शेवट घेऊन आपण थिएटरबाहेर पडलो असतो!
आणि मग कुठलेच प्रश्न पडले नसते..

धन्यवाद तिता,
धन्यवाद तिता,
अजूनही लोकं चित्रपट बघत आहेत आणि अजूनही थेटरमध्ये आहे ही चांगली गोष्ट आहे.
कालच आमच्या ऑफिस मधील एक जण म्हणाला 26 जानेवारी लॉंग विकेंड येतो आहे पण कुठला चांगला नवीन चित्रपट रिलीज झाला नाही..
त्याला सुद्धा मी हा चित्रपट बघायला सुचवला. त्यावर लंच टेबलवर चर्चा झाली आणि अजून दोन तीन जण जायचा विचार करत आहेत
आम्ही मराठी लोकांनी हा
आम्ही मराठी लोकांनी हा चित्रपट काल प्रिमियर शो सिंगापोर ला पाहिला. आम्हाला आवडला & सद्यपरिस्थिती शी रीलेट झाले. वाईट वाटले, नॉस्टॅल्जिक ही झाले. कॉमेंट मधे १ल्या पानावर कुणीतरी लिहिलेय नाव आवडले नाही म्हणुन बघणार नाही..
खरेच वाईट वाटले !
अमेय वाघ फार च अफलातून आहे
अमेय वाघ फार च अफलातून आहे अख्खा कॉमीक भार सांभाळलाय त्याने. प्राजक्ता कोळी मराठी उच्चार ठिक होते (सई पेक्षा बरे) मला ती त्या मुलांमधे विजोड वाटली.
कोळी नाही माळी.
कोळी नाही माळी.
एक लेखक तुमचं ज्ञान परत एकदा
एक लेखक तुमचं ज्ञान परत एकदा तपासून पाहता का?
मला धुरंदर जास्त आवडल्याने मी मुलाना उर्दू शाळेत घालून जासूस बनवायचा विचार केला आहे.>>>> मला ही कॉमेंट जामच आवडलीये
तिता नी ह्या धाग्यामुळे चित्रपट पाहिला हे वाचून आनंद वाटला
लग्न होऊन माचीको झाली असेल तर
लग्न होऊन माचीको झाली असेल तर माहिती नाही. पत्रिका आली नाही.
कोळी नाही माळी.
कोळी नाही माळी.
Submitted by एक लेखक on 2 February, 2026 - 02:22 >>>>>.
कोळीच आहे माळी नाही .
कॉमेंट मधे १ल्या पानावर
कॉमेंट मधे १ल्या पानावर कुणीतरी लिहिलेय नाव आवडले नाही म्हणुन बघणार नाही.. Sad खरेच वाईट वाटले !>>> पिक्चरच्या सुरवातीला सगळे विद्यार्थी शाळेत जमून चर्चा करत असतात तेव्हा त्यातला एक बोलतो इंग्रजी शाळा बेस्ट आणि सगळ्यांशी भांडून निघून जातो त्याचा आयडी आहे तो.
मोस्टली सेन वाली प्राजक्ता
मोस्टली सेन वाली प्राजक्ता कोळी आहे का त्यात. फोटोत ती वाटतेय. क्वचित बघितलेत तिचे vlogs पण फार गोड आहे ती. तिची आई मस्त आहे.
हो तीच प्राजक्ता कोळी आहे
हो तीच प्राजक्ता कोळी आहे
बोकलत
कोळी नाही माळी >> माळी
कोळी नाही माळी >> माळी म्हणाला? चक्क तुम्हाला माळी म्हणाला??? - हा बनवाबनवीमधला डायलॉग आठवला.
हरपा
हरपा
एक लेखक तुमचं खरच काहीतरी कंफुजन झालंय कारण दोघींचं नाव प्राजक्ता आहे ,दोघीही छान दिसतात आणि छान हसतात
)


प्राजक्ता माळी,(वा दादा वा वाली
प्राजक्ता कोळी (मोस्टली सेन)(ऍक्टर इन्फ्लुइन्सर)
क्रांतीज्योती विद्यालय मध्ये ही आहे.
ओह. हिला पाहिलेले नाही कधी.
ओह. हिला पाहिलेले नाही कधी.
दोघींचा रदीफ आणि काफिया जुळतोय म्हणून कन्फ्युजन झाले.
आवडला. आजचा ज्वलंत विषय आहे.
आवडला. आजचा ज्वलंत विषय आहे. अमेय वाघला जास्त फुटेज मिळालय.
पण शाळेच्या आठवणींमधे खुप वेळ घालवलाय. ईतकी उपकथानकं थोडक्यात आवरून मुळ विषयाला लवकर वळायला पाहिजे होतं.
बरं ह्या उपकथानकांचा मेन विषयाशी काही संबंधही नव्हता.
चिन्मयी सुमीत रिअल लाईफमधे मराठी भाषा, मराठी शाळांविषयी ईतकं बाजू घेऊन बोलतात त्याचा वापर या चित्रपटातही करून घ्यायला हवा होता. त्यांना फक्त मुलीचं लग्न जमवायचं काम दिलय.
शेवटी शाळेची कमान पाडत असताना सगळे slow motion मधे पळत येऊन फक्त बघत ऊभे रहातात. कोणी त्याला विरोध करत नाही, थांबवत नाही. अमेय वाघ मात्र हे थांबवायला बघतो तर सचिन खेडेकर त्यालाच थांबवतो..!
का?
फक्त तोंडी बडबड करून काय होणारे, जगताप तू हे बरोबर करत नाहीयेस, म्हणून.
मराठी शाळा वाचवायला आलेली पोलीस इन्स्पेक्टर क्षिती जोग फोनवर बोलताना हिंदीत बोलत असते.
शाळा पाडायला आलेल्या माणसाला (अनंत जोग) गप्प करण्याचा तिचा ऊपाय अगदीत बालिश.
आणि तोही लगेच घाबरतो.
शेवटी दिपची एक रिल व्हायरल होते. आणि लाखो लोक सरसावतात शाळा वाचवायला त्याच्या एकाच्या रिलवर.
लगेच दिपचे बाकीचे मित्र खूष त्याच्यावर काय भन्नाट आयडिया काढली म्हणून.
बाकीच्यांनी पण अशीच आपापली रिल करून hashtag करून टाकली असती तर विषय अजून जास्त लोकांपर्यंत पोचला असता.
छोटा प्रिंसुली क्युट आहे
छोटा प्रिंसुली क्युट आहे .कोकणचं निसर्ग सौंदर्य अप्रतिम.
हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि
हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चांदेकर अभिनित 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा मराठी चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
बरेच दिवस हा धागा सापडत
बरेच दिवस हा धागा सापडत नव्हता.
थिएटरला जाऊन पाहिला.
पिक्चर खूप म्हणजे खूप आवडला. शाळेच्या मित्रांबरोबर पहायला जात मजा आली असती.
सिनेमातील बऱ्याच सीन मुळे नॉस्टॅल्जिक व्हायला झाले. शेवटी काही सीन मधे डोळ्यात पाणी आले.
ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांनी नक्की बघा.
बरेच दिवस हा धागा सापडत
बरेच दिवस हा धागा सापडत नव्हता.
थिएटरला जाऊन पाहिला.
पिक्चर खूप म्हणजे खूप आवडला. शाळेच्या मित्रांबरोबर पहायला जास्त मजा आली असती.
सिनेमातील बऱ्याच सीन्स मुळे नॉस्टॅल्जिक व्हायला झाले. शेवटच्या काही दृश्यांत तर डोळ्यात पाणी आले.
ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांनी नक्की बघा.
आता झी 5 वर आला आहे. तिथे पण पाहिला.
अरे वाह थिएटरमध्ये जाऊन
अरे वाह थिएटरमध्ये जाऊन बघितला हे चांगलेच केले.
नुकतेच Zee ५ वर आला आहे. पण हल्ली हल्ली पर्यंत लोकं थिएटरमध्ये अजूनही बघत होते.
न बघितलेले आता ओटीटी वर नक्की बघतील
मी ओटीटीवर पाह्यला. आवडला.
मी ओटीटीवर पाह्यला. आवडला.
काल सुरू केला आहे. ओळखपरेड
काल सुरू केला आहे. ओळखपरेड लांबली आहे.
हेमंत ढोमे आमच्या शाळेचा
हेमंत ढोमे आमच्या शाळेचा विद्यार्थी निघाला.
मी नाशिकला गेलो होतो तेव्हा
मी नाशिकला गेलो होतो तेव्हा तिथे नव्हता थिएटरमध्ये.
आता झी५ चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. बघतो या विकांताला किंवा आधी जमले तर.
गोवा ट्रीपच्या थोडा पुढे
गोवा ट्रीपच्या थोडा पुढे पर्यंत पाहिला. चांगला विषय आहे. चांगला मांडलाय.
यातल्या शिर्के सरांच्या कित्येक गोष्टी फॉर्वर्ड म्हणून आल्या तर त्या काकाफॉ वर येतील. पण सिनेमात कसं संदर्भासहीत, प्रत्यक्ष कुणाच्या तरी तोंडून ऐकताना ते खटकत नाही.
काल पाहिला. आवडला. मधे मधे
काल पाहिला. आवडला. मधे मधे विस्कळीत वाटला तरी एंगेजिंग होता. सचिन खेडेकर, प्राजक्ता कोळी आणि अमेय वाघ तिघांचं काम खूप आवडलं. चिन्मयी राघवनची सुद्धा छोटी पण छान भूमिका आहे. निर्मिती सावंत प्रचंड थकल्यासारखी वाटत होती. आपल्याला शाळेचा नॉस्टॅल्जिया येतोच पहाताना. उगाच ताणून रडवले नाही पण इमोशनल मात्र ठेवले हे आवडले. खूप खूप विनोदी न वाटता हलकाफुलका वाटला. प्राजक्ता कोळी मला फारच आवडते, अगदी अकृत्रिम अभिनय वाटतो तिचा. प्रिची असला तरी जे सांगितले ते काही अगदी चुकीचे वाटले नाही, तथ्य होते सगळ्या संवादात. ओव्हरॉल एकदा बघण्यासाठी चांगला आहे. अनंत जोग खूप दिवसांनी दिसला.
काल रात्री आणखी थोडा वेळ पुढे
काल रात्री आणखी थोडा वेळ पुढे पाहिला. दोन टीम बनवणे आणि त्यांनी अधिकार्यांना "उल्लू" बनवणे हा टिपीकल मराठी बालीशपणा हास्यास्पद आहे. ढोमेची बुद्धी एव्हढीच. अशा सीन्ससाठी अधिक माहिती घ्यावी. सरकारी कामकाज कसं चालत याची माहिती घ्यावी. हे असं असं चालत असणार असं स्वप्नात बघून प्रसंग लिहीलेत.
मग एका सरकारी कार्यालयात ( पी डब्ल्यू डी ) तिथल्या बाईला स्ट्रक्चरल ऑडीटच माहीती नसणे हे ढोमेच्या बालबुद्धीतून आलेलं चालवून घ्यावं लागतं. कितीही ढ असला तरी एखाद्या कार्यालयात पंधरा वीस वर्षे काढल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडीट माहीती नसेल का ? त्यातच पुढे एखाद्या जबाबदार अधिकार्याला सांगा असं म्हटल्यावर "नाही तुमच्या हाताखालच्या अधिकार्याला सांगा " हा संवाद ढोमेनी का पेरला आहे याची कल्पना आलीच असेल. सगळेच गलगोटोया विद्यापीठातून आलेले नसतात. मराठी सिनेमासाठी वाईट वाटून घ्यावं तर निर्माता दिग्दर्शकाची ही मानसिकता काही जात नाही. याच मानसिकतेने प्रेक्षक वर्ग रोडावत चालला आहे. जरा चालायला लागले कि ती मानसिकता डोके वर काढते. कशाला कोण आपला वेळ काढून, पैसे खर्च करून जाईल ? पुढे बघावा का असे वाटून गेले.
मुळात मराठी शाळा वाचवण्याची थीम ही खूप मोठी सर्कस आहे. सुरूवातीला विरोधी विचार दाखवलेत पण पिक्चरभर ते खोडून काढण्यातच स्क्रीप्ट खर्च पडते. मराठी शिकून जर नोकरी मिळणार नसेल तर पालक का आपल्या मुलांना तिकडे टाकतील ? परदेशी जायलाही इंग्रजीची परीक्षा चांगल्या मार्काने पास व्हावी लागते. मराठी भाषा शिकवण्यासाठी सगळेच विषय मराठीत शिकवायचा आग्रह धरणे हे आता चुकीचे वाटते.
शिर्के सर म्हणतात तू मराठी खूप वाचलंस म्हणून चांगला नट झालास. उत्तम मराठी बोलणार्यांची कमी आहे. पण किती जण नट होऊ शकतात आणि नट झाल्यावर त्यांचे सिनेमे चालतात ? अशा दर्यामे खसखस उदाहरणांनी मुद्दा पटणेच शक्य नाही. मराठी भाषा व्यवहारात पोट भरू देईल तेव्हां आपोआपच शाळा सुद्धा वाचतील. शाळा बंद पडताहेत हे सत्य आहे. पण पालकच मुलांना पाठवत नाहीत हे खरं आहे आणि पालक सगळेच चुकीचे आहेत का ? फक्त मराठी पिक्चर चालावेत किंवा काही लेखकांची पुस्तके खपावीत म्हणून लोका मराठी शाळा जगवायच्या का ?
नाही आवडला. कथा, पटकथा, संकलन
नाही आवडला. कथा, पटकथा, संकलन पार गंडलेलं वाटलं. शाळेचा nostalgia दाखवण्याच्या नादात विषय हरवून गेला आहे. एक ना धड भाराभर चिंध्या! नाही पाहीला तरी चालेल.
काय आवडलं - अमेय वाघ आणि प्राजक्ता कोळी यांचं काम खूप आवडलं! छोटा प्रिंन्स एक नंबर!
आज पाहिला हा सिनेमा.
आज पाहिला हा सिनेमा. कंटाळवाणा. इथल्या एक लेखक यांच्या प्रतिक्रियेशी सहमत.
>>मराठी भाषा व्यवहारात पोट भरू देईल तेव्हां आपोआपच शाळा सुद्धा वाचतील. शाळा बंद पडताहेत हे सत्य आहे. पण पालकच मुलांना पाठवत नाहीत हे खरं आहे आणि पालक सगळेच चुकीचे आहेत का ? फक्त मराठी पिक्चर चालावेत किंवा काही लेखकांची पुस्तके खपावीत म्हणून लोका मराठी शाळा जगवायच्या का ?
++ अगदीच!
प्राजक्ता कोळी विसंगत दिसते त्या कंपूत. वर aashu29 म्हणाल्यात तशी फारच विजोड वाटते.
Pages