मराठी चित्रपट – क्रांतीज्योती विद्यालय

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2026 - 09:54

क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम

ज्यांना पानभर पोस्ट वाचायचा कंटाळा असेल त्यांना सुरुवातीलाच थोडक्यात सांगतो, पिक्चर मस्त टाईमपास आहे. शेवट मनाला भिडणारा आहे. एका प्रश्नाकडे लक्ष वेधणारा आहे.
जर तुम्ही थिएटरची पायरी चढावी की नाही याबाबत साशंक असाल तर बिनधास्त माझ्या गॅरंटीवर बघायला जा. म्हणजे नाहीच आवडला तर खुशाल या पोस्टवर येऊन मला चार शिव्या हासडून हलके व्हा. पण त्याची शक्यता कमीच आहे. कारण आमच्या थिएटरमध्ये सगळी पब्लिक एन्जॉय करत होती. शेवटी चार टाळकी तर "जय महाराष्ट्र" घोषणा देऊनच उठली. या नवी मुंबईची पब्लिक थोडी वेगळीच आहे. पण याचा अर्थ चारच जण चित्रपट बघायला होते असे नाही, तर शो हाऊसफुल होता. यासारखे अजून रिव्ह्यू पडतील तसे अजून काही आठवडे शो असेच हाऊसफुल जातील.

तर आता परीक्षणाकडे वळूया,

मी बोलतो मराठी, मी लिहितो मराठी, मी वाचतो मराठी... मी तर जगतो मराठी!
मी थिएटरमध्ये जाऊन आवर्जून, पिक्चर सुद्धा बघतो मराठी. कारण मराठी भाषेच्या प्रसाराचे एक महत्वाचे माध्यम वाटतात मला मराठी चित्रपट. त्यामुळे "मराठी शाळा वाचवा आणि मराठी भाषा जगवा" असा संदेश घेऊन येणारा "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" चित्रपट मला पहिल्याच आठवड्यात बघायचाच होता.

झिम्मा आणि फस्सक्लास दाभाडे सारखे चित्रपट बनवून हेमंत ढोमेने अपेक्षा वाढवल्या होत्या. तसेच कलाकारांची जवळपास तीच टीम बघून त्या पूर्ण होणार याची खात्री सुद्धा होती. आणि अगदी तसेच झाले.

चित्रपटाची सुरुवात कोकणातला एखादा एरियल ड्रोन शॉट घेऊन करणे हे जणू अनिवार्य आहे हल्ली. तसेच अध्येमध्ये कोकणातले छान छान लोकेशन टिपून दाखवायचे. त्यामुळे थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायला आल्याचा निर्णय योग्य आहे असे इम्प्रेशन तयार होत असावे. अर्थात तक्रार काही नाही. कोकणाचे हे रूप आवडतच आहे Happy

तर आपली मराठी शाळा बंद होतेय म्हणून मुख्याध्यापक सचिन खेडेकर यांच्या विनंतीला मान देऊन शाळेला शेवटचा निरोप द्यायला आणि जुन्या मित्रांसोबत एक गेट टुगेदर करायला शाळेचे माजी विद्यार्थी जमतात. त्यांनी उगाळलेल्या आठवणींमुळे चित्रपट सुरुवातीपासूनच आपल्याला देखील दर दृश्यागणिक नॉस्टेलजिक करत सुटतो. मग आपली शाळा कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातील आहे की मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातील याने काही फरक पडत नाही.

कारण शाळेतल्या मित्रांचा ग्रुप, त्यांच्यासोबत केलेले कांड आणि किडे, त्यात एखादी आवडणारी मैत्रीण आणि तिच्या नावावरून चिडवणे.. आवडते शिक्षक, आवडत्या बाई, त्यातही कोणी चांगले शिकवते म्हणून आवडीचे, तर कोणी छान दिसते म्हणून आवडीचे.. शाळेत केलेल्या कविता आणि बोर्डावर लिहिलेले सुविचार, कुठेतरी आपणच पेन वापरून रंगवलेल्या भिंती आणि कर्कटक वापरून कोरलेले लाकडी बाक.. शाळेतले लक्षात राहिलेले शिपाईमामा, शाळेबाहेरच्या चिंचबोराच्या टपऱ्या आणि वडापावच्या गाड्या, शाळेचाच गणवेश शिवणारा टेलर.. मधल्या सुट्टीत एकत्र शेअर करून खाल्लेले डबे, शाळा सुटल्यावर मित्रांसोबत पडून राहायचे अड्डे, मित्रांसोबतच्या वार्षिक सहली.. हुशार मुलांचे वेगळे ग्रुप तर बॅकबेंचर मुलांचे वेगळे आणि त्यांची एकमेकांबद्दलची मते, मित्रांमध्ये एकमेकांना अगदी त्यांच्या तीर्थरूपांच्या नावाचाही उद्धार करत चिडवणे आणि ज्याचा कोणालाही राग न येणे, तर दुसरीकडे एखाद्याला त्याच्या परिस्थितीवरून किंवा व्यंगावरून त्या न कळत्या वयात अजाणतेपणी चिडवून दुखावणे.. मित्रांशी भांडणे आणि पुन्हा एकत्र येणे.. मित्रांसोबत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईच्या हातचे आवडीने खाणे आणि ती चव देखील कित्येक वर्षांनी लक्षात असणे.. सगळे काही फार खुसखुशीत आणि विनोदी पद्धतीने दाखवले आहे. सारेच काही रिलेट होते.

पूर्ण चित्रपटभर लोकं हसायचे थांबत नव्हते. आणि यापैकी सत्तर टक्के हश्या एकटा अमेय वाघ वसूल करत होता. तो आणि त्याच्या मुलाचा ट्रॅक फारच मस्त जमला आहे. एखाद्या बोलीभाषेची बेअरिंग अचूक पकडणे हे त्याने आधीही केले आहे आणि हे तो नेहमीच कमाल करतो. या चित्रपटात त्याने आगरी भाषेत धमाल केली आहे.

तर अशा सगळ्या जुन्या आठवणी उगाळत शाळामित्रांच्या सहवासात असताना अचानक त्यांना जाणीव होते की ज्या शाळेने आपल्याला या आठवणी दिल्या, आपल्याला घडवले, आजची आपली ओळख जिने बनवली तिचीच ओळख आज कायमची मिटली जाणार आहे. आणि मग ते तसे होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न करणे अगदी आतून येते.

– शाळा बंद पडू नये यासाठी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा अजून संघर्षपूर्ण दाखवता आला असता – असे मी चित्रपट बघण्याआधी काही रिव्ह्यूमध्ये ऐकले होते. मलाही चित्रपट शेवटाकडे सरकताना थोडेफार तसेच वाटले होते... पण, नंतर जाणवले की मुळात हा लढा कुठल्या प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध किंवा शिक्षण माफिया विरुद्ध नसून त्या आधी तो आपल्याच विचारांशी होता. मराठी माणसांनी ठरवले तरच मराठी शाळा वाचू शकतात. त्यामुळे आधी मराठी शाळा वाचवण्याची गरज आहे का? तर हो, आहे आणि ती का आहे हे आपल्यालाच समजून घ्यायला हवे. आणि हेच सचिन खेडेकर योग्य प्रकारे समजावत शेवटाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.
अन्यथा एक शाळा हिरोगिरी करून वाचली इतकाच चित्रपटाचा शेवट घेऊन आपण थिएटरबाहेर पडलो असतो!
आणि मग कुठलेच प्रश्न पडले नसते..

IMG-20260104-WA0032.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो फाफट पसारा फार मनोरंजक आहे Happy

तरी त्याची गरज होतीच. कारण शाळेच्या गोड आठवणी जागवल्याशिवाय ते शाळेसाठी काही करतात हे विश्वासार्ह कसे वाटणार. तसेच प्रेक्षकांना सुद्धा त्यांची शाळा आठवून दिल्याशिवाय त्यांनाही ते कसे भिडणार..
अर्थात काटछाट कमीजास्त एडिट शेडीट करता आल्या काही गोष्टी असे न आवडलेल्या सीनबद्दल नंतर वाटू शकतेच.
स्पेशली सिद्धार्थ चांदेकरची लव्हस्टोरीला थोडी कात्री चालली असती. पण व्यावसायिक विचार करून चित्रपटात रोमान्स आणला असावा जरा..

छान केले आहे तिने काम.
दिसली सुद्धा छान.
पुढच्या चित्रपटात एखादी लव्हस्टोरीच मिळाली तिला तर त्यात भाव खाऊन जाईल.

सध्या थिएटरमध्ये आहे.
पण तिथे जाऊन बघावा असा आहे Happy
ओटीटीवर आल्यावर मी सुद्धा पुन्हा बघेनच

छान ओळख. इथे लागला नाही अथवा येऊन गेला.
ओटीटीवर यायची वाट बघावी लागेल किंवा पुढल्या महिन्यात नाशकात जाणे होईल तिथे तेव्हा असेल तर बघणे होईल.

नाव आणि चित्रपटाचा काहीच संबंध नसता तर गोष्ट वेगळी पण ओळख करून दिली त्यावरून नाव खटकले नाही. अन्यथा काही मराठी चित्रपटांची नावे अशी होती की कुणी विचारले आणि आपण सांगितले तरी समोरच्या व्यक्तीला वाटेल की सांगणारी व्यक्ती नाव विसरली आणि आठवण्याचा प्रयत्न करतेय. उदा: "अग बाई, अरेच्चा!"
किंवा आपण विचारतोय बोलतोय म्हणुन आपली खिल्ली उडवतेय - "पक पक पकाक!"

पुढल्या महिन्यात नाशकात जाणे होईल तिथे तेव्हा असेल तर बघणे होईल.
>>>>

पुढच्या आठवड्यात जर्मनीला जाणे झाले तरी इथे बघू शकता Happy

FB_IMG_1768059782108.jpg

काल पाहिला थेटर बर्यापैकी भरलेलं होतं. सगळ्यांना शाळेच्या आठवणी जाग्या करायच्या होत्या, हे साफ दिसत होतं .चित्रपट तुम्हाला बिलकुल निराश करत नाही जर का तुम्ही यातल्या गोष्टी रिलेट केल्या असतील किंवा लहानपणी अनुभवल्या असतील. ऋन्मेष यांच्या परिक्षणाप्रमाणेच अतिशय उत्तम असा चित्रपट आहे नक्क्की जाऊन बघा . नवीन वर्षाची सुरुवात ईतक्या चांगल्या मराठी चित्रपटाने झाली आहे, तेव्हा हा इतका छान चित्रपट थिएटर मध्ये बघण्याचा चान्स सोडू नका.चित्रपट फक्त मराठी शाळा वाचवण्यावर नाही तर मराठी भाषा टिकून राहावी यावरही आहे. मला शेवट खूप आवडला.

सगळ्यांचे रोल मस्त झालेत, सर्वात भारी अमेय वाघ. त्याचाच चित्रपटातला मला आवडलेला एक डायलॉग लिहिते.

"पत्रिका जुलतात तिथे होतं लग्न
जिथे मनं जुलतात तिथे प्रेम,
आणि जिथे अंगातले किडे जुलतात ती दोस्ती" Happy

सिमरन तो मन–प्रेम, पत्रिका–लग्न, किडे–मैत्रीचा डायलॉग तसा जुनाच आहे. पण अमेय वाघ मुळे सारेच मजेदार वाटते. त्याचे क्लायमॅक्स स्पीच आणि पत्रकार महिलेसोबतचा संवाद सुद्धा मस्त.

आम्ही पण काल दुपारी Plaza Dadar मध्ये बघितला सिनेमा. खुप आवडला. हाऊस फुल होता चक्क थिएटर बाहेर एक बाई तिकिटे ब्लॅक करत होती. खूप भारी वाटले मराठी सिनेमा चे यश बघुन

<<जिथे अंगातले किडे जुलतात>>
इथे जुळणे म्हणजे एकाच वेळी वेगळ्या दिशेने काम करणारे किडे हवेत, क्वांटम एंटॅंगलमेन्ट सारखे. नाहीतर मैत्री ऐवजी rivalry जुळेल.

ओटीटी वर आल्यावरच बघायला मिळेल मला.
बघायचा आहे हा चित्रपट. याचे छायाचित्रण आमच्या कॉलनीतल्या आणि माझ्या आई बाबांच्या मित्र - मैत्रिणीच्या मुलाने जितू ( सत्यजीत शोभा श्रीराम) ने केलं आहे.

गेल्या काही वर्षात आलेल्या बऱ्याच चांगल्या मराठी चित्रपटांचे छायाचित्रण त्याने केलंय.

किती लोकांना आवडला आणि किती लोकांनी आपल्या इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांना हा पिक्चर बघून मराठी शाळेत टाकला?

बोकलत,
मला धुरंदर जास्त आवडल्याने मी मुलाना उर्दू शाळेत घालून जासूस बनवायचा विचार केला आहे.

प्रश्न मुलांना कोणत्या माध्यमात घालणार आहात हे नसून तुम्ही मराठी भाषा कशी जिवंत ठेवणार आहात हा आहे . इंग्रजी मिडीयम मध्ये जाऊनही जर का तुम्ही मराठी भाषा शिकली जोपासली तर यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. शेवटी मराठी शाळा टिकल्या तर मराठी टिकेल ही जरी खरं असलं, तरी इंग्रजी शाळांना विरोध आहे हे चित्रपटातही दाखवलं नाहीये ,विरोध त्यातल्या बाजारू वृत्तीला आणि शिक्षणाला व्यवसाय बनून पैसे लुटण्याला आहे.

राहिला प्रश्न ऋन्मेष याच्या मुलांच्या शाळेचा तर ते कोणत्याही शाळेत शिकत असतील तरीही मराठीशी (मराठी भाषेशी)नाळ तुटणार नाही याची काळजी, त्यांचे आईबाप घेतील हे इतरत्र माबोवरच्या प्रतिसादांतून दिसून आलेच आहे.त्याबद्दल शंका नसावी. Happy

मास्तर काय मला बरोबर वाटला नाही. नशीब सगळी पोरं एकत्र आली आणि त्या डाकूचा लफरा शोधून त्याला तिथच थांबवला नायतर मास्तर त्याचा रात्री गेम करणार होता. हा पिक्चर अजून भारी करता आला असता पण ढोमे ने माती खाल्ली. स्वर्गात आकाशगंगा हे एक गाणं सोडलं तर सगळा पिक्चर सो सो आहे.
हाकामारी आली रात्रीची तिला आत घ्या लाईट बंद करून कडी लावा हे एक गाणं पण आवडलं.

>>छान केले आहे तिने काम.
दिसली सुद्धा छान.
पुढच्या चित्रपटात एखादी लव्हस्टोरीच मिळाली तिला तर त्यात भाव खाऊन जाईल.

धन्यवाद ऋन्मेष. प्राजक्तासाठी तरी बघणार आहे. ओटीटीवर कधी येतो बघायचं.

इंग्रजी मिडीयम मध्ये जाऊनही जर का तुम्ही मराठी भाषा शिकली जोपासली तर यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते >>> सहमत आहे.

तमिळनाडुसारख्या कट्टर भाषाभिमानी राज्यात काय करतात त्याचे उदाहरणही पाहता येईल.

मराठी शाळांमध्ये १ली पासून हिंदी compulsary करायची आहे. इतर माध्यमांच्या शाळांत १ली पासून मराठी compulsary आहे का?

मला वाटते दोन मुख्य गोष्टी कारणीभूत आहेत. हिंदी राष्ट्रभाषा आहे हे खुळ आणि प्रमाण भाषेला वाजवीपेक्षा अति महत्व, त्यामुळे मराठीचा स्वाभिमान म्हणजे प्रमाण भाषेचा स्वाभिमान असे झालेय. अभ्यासक्रमात प्रमाण भाषा अनिवार्य याला विरोध नाही.

लोक मराठी बोलत नाहीत हा प्रश्न प्रामुख्याने मोठ्या शहरातला आहे, अलीकडे पर्यन्त तरी होता.

मी याबद्दल अभ्यास केलेला नाही, मला जे जाणवलं त्याबद्दल लिहितो.
मी विदर्भातील गावात वाढलो. तेव्हा तिथुन सुरवात करतो, त्याबद्दलचे काही गैरसमज दूर करण्याचा आणि तिथे विदर्भी मराठी बोली कशी जपली जाते हे सांगण्याचा प्रयत्न करतो. एकेकाळी विदर्भ CP & Berar प्रोव्हीन्स असताना तिथे हिंदी अधिकृत भाषा होती.
त्यामुळे जिल्हा व तालुका कचेरीतील भाषा असल्याने तिथे बरेच लोक हिंदी शिकले व अनोळखी माणुस दिसल्यास हिंदीतून संवाद करावा व त्याला मराठी येत असल्यास मराठी अशी भावना असे व तीच सुरू राहिली. परंतु ग्रामीण भागात व आमच्या तालुका गावातही अनेकांना हिंदी येत नसे किंवा अगदी तोडकी मोडकी येत असे. याउलट बाहेरून स्थायिक झालेले राजस्थानी, मारवाडी, गुजराती, भैया, सिंधी सगळ्यांना व्यवस्थित मराठी (विदर्भी बोली) येत असे व मराठी लोकांशी मराठीतच बोलत, अजूनही बोलतात. आमच्या गावी अशा लोकांचे प्रमाण भरपूर ४०% तरी असावे. त्यात मराठी न येणारे एकच बिहारचे कुटुंब मला आठवते. त्यांची लहान (आमच्या वयाची) मुले मात्र मराठीत बोलत.

आम्ही नववीत असताना बाबांना कंपनीतर्फे क्वार्टर मिळाले तिथे राहायला गेलो. तिथे आम्ही एकटेच मराठी कुटुंब बाकी २५- ३० बहुत करून मारवाडी आणि पाच सहा कुटुंब उत्तर भारतीय. सगळे आमच्याशी मराठीतच बोलत गप्पा मारत. सगळे हिंदीत/मारवाडीत गप्पा मारताहेत, आमच्या पैकी कुणी एक जण गेलं तरी आमच्याशी मराठी बोलत, आम्हाला हिंदी येते हे माहीत असूनही. लहान मुलांना मराठी अभ्यासात काही अडलं तर आमच्याकडे पाठवत. हे एकच वेगळे उदाहरण आहे असे नव्हे तर ही तिथली सामान्य परिस्थिती आहे.

कधी असे होते की एखाद्या व्यक्ती सोबत आपला काही कारणाने इतर भाषेत - हिंदीत/इंग्रजीत संवाद सुरू होतो. मग नंतर एकमेकांना कळते की व्यक्ती तर मराठी आहे. पण डोक्यात बसले असल्याने तिच्या सोबत नंतर बोलताना पहिल्यांदा हिंदी/इंग्रजीच तोंडी येते. ते पाहुन किंवा कुणीतरी गमतीने घरात आपल्याच कुणाबरोबर हिंदी बोलताना पाहुन, विदर्भात तर मराठी लोकही घरात हिंदीच बोलतात असे पिल्लु सोडलेले असावे. वस्तुस्थिती मात्र उलट आहे. २५-३० कुटुंबात आम्ही एकच मराठी कुटुंब सगळे आमच्याशी मराठी बोलत, संपर्कात आहे ते अजूनही बोलतात. गावात तुम्ही (कोणी अनोळखी) जाऊन उतरलात तर तिथले मराठीही हिंदीत बोलु लागतील, धोतर-डोक्यावर गांधी टोपी किंवा गळ्यात शेला किंवा मराठी असल्याची कुठली सहज खुण असेल तर तिथल्या स्थायिक परप्रांतीयांसकट सगळे मराठीत बोलु लागतील.

तेव्हा परप्रांतीय मराठीत बोलत नाहीत हा प्रश्न विदर्भात राहूनही आम्हाला कधीच जाणवला नाही. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट (सांगली, कोल्हापूर) मध्येही असेच असावे असे दिसते, तिथे सुद्धा इतर राज्यातील स्थायिक मराठी बोलताना दिसले. प्रश्न प्रामुख्याने मुंबईत सुरू झाला आणि तो पुणे, नाशिक व थोडाफार नागपुरातही पसरला असावा.

प्रमाण भाषेला अति महत्व देऊ नये, बोली बोलणाऱ्यांना कमी लेखु नये, तोंडात मिठाचा खडा पाडुन घेऊ नये. ती बाहेरून स्थायिक होणाऱ्यांना शालेय शिक्षण न घेता लौकर आत्मसात होते. मराठी प्रमाण भाषा विषय शिकवताना अभ्यासक्रमात स्थानिक संदर्भ असावेत, ते का असावेत यावर कुणीतरी एका धाग्यावर छान पोस्ट लिहिली आहे. यावर 'आम्ही नाही का शिकलो?' हा प्रतिप्रश्न न करता सामान्य, अतिसामान्य ते ढ मुलांपर्यंतचा विचार व्हायला हवा, भाषेचा विषय आहे, विज्ञानाचा नाही. चौथी नंतर मराठी बोली भाषांची ओळख असा छोटा विषय असावा, तो परीक्षेत असण्याची गरज नाही.

हिंदी राष्ट्रभाषा, राष्ट्रप्रेम असेल तर हिंदी शिकायला हवे असे खुळ काढुन टाकावे. इतर राज्यात जाऊन हिंदी येत नाही म्हणुन नुकसान झाले (कुणी मुद्दाम केले तर ती वेगळी आणि चूकीची गोष्ट आहे) अशी उदाहरणे क्वचित असावीत. बोली हिंदी येते ती पुरेशी आहे, शाळेत शिकलेली हिंदी आठवतही नाही.
स्थानिक व इंग्रजी या दोन भाषा अभ्यासक्रमात असाव्यात, सीमा प्रांतात जिथे दोन भाषा चालतात तिथे ती तिसरी. इतर भाषा ऐच्छिक म्हणजे ऐच्छिक, कोणतीतरी एक घ्याच अशी सक्ती नसावी. केंद्रीय संस्था/बॅंक्स वगैरेत काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील हापुड नामक गावातील लोकांची केरळातल्या नेडूमंगाड नामक किंवा महाराष्ट्रातील मंगरूळ-दस्तगीर नामक गावात बदली करू नये. दीर्घकालीन बदली केंद्रीय विद्यालय असतील तिथे कराव्यात. केंद्रीय विद्यालयात हिंदी व इंग्रजी माध्यमांचा पर्याय असावा.

मानव,
प्रमाण भाषेला महत्त्व देऊ नये प्रमाण भाषेला महत्त्व देऊ नये असा धोशा अनेक लोक लावत असतात. बोलीभाषांना नको तितके महत्त्व दिल्यामुळेच मराठीवर ही पाळी आलेली आहे असे सलील वाघ देखील म्हणतो. आणि मला ते पटते विशेषतः युनिकोड नंतर मराठी डिजिटल स्पेस मध्ये येणे इतके अवघड होते ते नंतर व्हॉइस टू टेक्स्ट अशा तंत्रज्ञानामधून आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येणाऱ्या सगळ्या सुधारणा यांच्यामुळे थोडेसे सुकर झाले आहे. या तंत्रज्ञानाला जेवढा प्रमाण भाषेचा ॲक्सेस आहे तेवढी या तंत्रज्ञानाची क्षमता वाढते . मात्र बोलीभाषांचा नको तितका उदो उदो केल्याने आणि प्रमाण भाषेमध्ये भरपूर कंटेंट नसल्यामुळे एकूण मराठी भाषेला आणि मराठी भाषेच्या राजकारणाला खीळच बसणार आहे.

जेव्हा तंत्रज्ञान बोलीभाषा किंवा इतर स्थानिक भाषा यांचे बारीक सारीक विभाव समजू शकेल तेव्हा कदाचित या बोलीभाषा देखील जगत राहतील मात्र तोवर मराठी समाजाने शक्य तेवढा भाषेच्या प्रमाणीकरणाचा आणि प्रमाण भाषेच्या सगळीकडे झिरपण्याचा आग्रह धरला पाहिजे.

सुनो ए आय नावाच्या एका कृत्रिम बुद्धिमत्ता त्ता असलेल्या संगीत ॲप मध्ये आपण आपले लिरिक्स टाकून गाणी तयार करू शकतो. मात्र मराठीमध्ये एखादे टाकलेले लिरिक्स सुनो ए आय अगदी सर्वसाधारण हिंदी प्रमाणे उच्चारतो म्हणजे त्याला च ज इत्यादी नुकता असलेले स्वर उच्चारता येत नाही त्यामुळे ही अक्षरे असलेले शब्द तो एखादा राजस्थानी मराठी गाणे म्हणतोय अशा पद्धतीने गातो. अशा शक्तिमान कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रमाण मराठी सुद्धा अजून नीट बोलता येत नाही तर तो बोली भाषांवर काय प्रभुत्व गाजवणार आहे?
माझ्या मित्राने नुकतेच एक इलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान टाकले. त्या दुकानाचे प्रमोशन करताना त्याने वरील ॲप वापरून त्याचे स्वतःचे लिरिक्स घालून एक गाणे तयार केले. हा माझा मित्र इयत्ता नववी पास आहे त्याने दहावीतून शाळा सोडून दिली. मात्र पुढारी किंवा तत्सम लोकल पेपर वाचून त्याने प्रमाण भाषेवरती प्रभुत्व मिळवले. नशिबाने त्याला कोणी बोली भाषेचे अपार महत्व पटवून न दिल्याने मराठी किमान जगत राहील अशी एक शक्यता तयार झाली.

सिमरन +७८६ आणि धन्यवाद Happy

मानव मामा छान पोस्ट
<<<< ती बाहेरून स्थायिक होणाऱ्यांना शालेय शिक्षण न घेता लौकर आत्मसात होते.>>> खरे आहे. बोलीभाषा परप्रांतियांना लवकर आत्मसात होते कारण ती बोलली जाते.

म्हणजेच आपणही जितके जास्तीत जास्त मराठी बोलू तितके आपल्या आसपासचे परप्रांतीय मराठी सहज शिकतील आणि बोलतील. पण आपणच तडजोड करायला सुरुवात केली तर अवघड होईल.
ऑफिस मीटिंगमध्ये देखील ग्रूपमध्ये एकच अमराठी असेल आणि सर्वांनी मराठी सुरू केले तर लक्षात येते की त्यालाही समजते. कामाचे महत्वाचे बोलताना देखील समजते.

गुजराती मारवाडी सिंधी नॉर्थ साईड पब्लिक मराठी भाषा चटकन शिकते. पण ते तोवरच शिकणार जोपर्यंत त्यांना ती शिकायची गरज भासणार. उद्या आपणच मराठी बोलायचे बंद केले तर त्यांची ती गरज सुद्धा नाहीशी होईल.

कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या तंत्रज्ञानामुळे भाषिक दृष्ट्या रीजीड समाज तयार होऊ शकतो कारण ज्ञानाच्या एक्सेस साठी वेगळी भाषा शिकण्याची गरज संपून जाते त्यामुळे मूल लहानपणापासून ज्या भाषेत शिकले त्या भाषेत त्याला सहज व्यवहार करता येऊ लागला आणि ज्ञान देखील मिळू लागले तर कृत्रिम बुद्धिमत्ता भाषेसाठी भारतीय भाषांसाठी वरदान ठरणार आहे.

परंतु 2000 नंतर जन्मलेली महाराष्ट्रातील बहुतेक मुलं ही सेमी इंग्रजीतून शिकलेली आहेत आणि 2010 12 नंतर फक्त मराठी हा विषय मराठी घेऊन शिकलेली आहेत. रेडीट या तुलनेने टीनेजर मुले जास्त असलेल्या ॲप मध्ये देवनागरी मध्ये मराठी वाचणारे विरुद्ध रोमन लिपी मध्ये मराठी वाचणारे यांचा सर्वे घेतला असता बहुतेक मुलांना देवनागरी मधून मराठी वाचणे अवघड जाते असा निष्कर्ष आला आहे ही संख्या जवळजवळ 48% होती. अर्थात या सर्वे मध्ये वय विचारात घेतले नव्हते मात्र ही 48% असलेली संख्या प्रामुख् २००५ नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या असणार आहे जर याच मुलांचा फक्त सर्वे घेतला तर अगदी खेडोपाण्यातही किंवा तालुका पातळीवरच्या गावांमध्येही हेच चित्र पाहायला मिळेल. की मुलांना देवनागरीतून मराठी वाचणे अवघड जाते.

बाळबोध किंवा देवनागरी लिपीतून मराठी वाचवण्याचा विंडो पिरियड आपण संपवलेला आहे त्यामुळे फार लोड घेण्यात अर्थ नाही. मायबोलीवर देखील वीस वर्षांच्या आतला सदस्य अगदी चुकून म्हणजे अपवादात्मक परिस्थितीतच अस्तित्वात असू शकतो.

नावावरून आणि आत्ता रिलीज होण्यावरून मला सावित्रीबाई फुल्यांशी संबंधित आहे असे वाटले होते..... +१.
मानव यांचा प्रतिसाद आवडला.
प्रमाण भाषेला अति महत्व देऊ नये, बोली बोलणाऱ्यांना कमी लेखु नये, ...... हे सर्व खरे असले तरी आमच्यात (भागात/पट्ट्यात) असंच बोलतात हा हेका देखील गैर आहे.
महानोरांची एक कविता शिकवताना आलेला अनुभव लोकसत्तेत वाचला होता .ती ग्रामीण बाजाची कविता होती पण इतर आदिवासी मुलींना कळण्यासाठी वर्गातल्या एका मुलीने ज्या शब्दात कविता अनुवादित केली,ती वाचली तर कुठलाच शब्द कळेना.
कढीलिंब हा शब्द गायबच झाल्यासारखा आहे.कढीपत्ता रूढ झाला आहे.फुले माळत नाही तर घालतात.
काही गोष्टी प्रत्येकाला आवर्जून करता येतात त्या करण्यात कमीपणा मानू नये.परवाच टीव्हीवर बातम्या चालू असताना न चा ण हमखास होता होते.अशा चुका टाळण्यात/कमी करण्यात हरकत नाही.
चारुशीला पटवर्धन बातम्या द्यायच्या त्यावेळी ष चा उच्चार मस्त करायच्या.आजही बरेचजण असा उच्चार करतात तो ऐकून बरं वाटते.
बाकी परीक्षण चांगले आहे.

कढीलिंब हा शब्द गायबच झाल्यासारखा आहे.कढीपत्ता रूढ झाला आहे >>> मला हे दोन्ही वेगळे आहेत असे वाटायचे Happy

सिमरन. यांनी लिहीलेलाच मुद्दा पुढे घेउन - इंग्रजी समजणे, सफाईने बोलत येणे व मराठीशी नाळ जोडलेली राहणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकतात. मी सेमी-इंग्रजीतून शिकलो. ८वी च्या पुढे शास्त्रे व दोन्ही गणित विषय इंग्रजीतून शिकल्याने इंग्रजीचे दडपण राहिले नव्हते. पण नंतर कॉलेजमधेही सगळा ग्रूप मराठीच होता, त्यामुळे संभाषणात सफाई आली नव्हती. पहिल्या नोकरीत जरा प्रॉब्लेम यायचा. माझ्या बॅच मधे बाकीचे लोक देशभरातून आयआयटी, आरईसी वगैरे मधून आलेले. त्यांची प्राथमिक भाषाच इंग्रजी असल्यासारखे ते बोलत. इंग्रजी ग्रामर वगैरेचा कधीच प्रॉब्लेम नव्हता पण त्यांच्याशी बोलताना मी फार पुस्तकी इंग्रजी बोलतो असे मला जाणवायचे. पण तेथे सरावल्यावर दिवसातील ८-९ तास त्याच वातावरणात काम केल्याने दोन तीन वर्षांत माझ्याही बोलण्यात ती सफाई आली.

त्यामुळे दहावीपर्यंत मराठी ही मुख्य भाषा, शास्त्र व गणित इंग्रजीतून आणि पुढच्या वर्षांमधे संभाषणातले इंग्रजी व त्यातील सफाई, वागण्यातले मॅनरिजम - हे शिकवले गेले तर मराठीही मागे पडणार नाही व इंग्रजी बोलता न आल्याने मराठी लोक मागे पडत आहेत असेही होणार नाही.

मी हा चित्रपट पाहिला आणि खूप enjoy केला.
इथेच वाचून माझ्या तीन वर्गमित्रांना विचारले की एकत्र बघुयात का. नुसते मित्रच नाही तर आमच्या बायकाही येतो म्हणाल्या. त्यामुळे जास्तच मजा आली.
शेवटची साधारण १५ मिनिटे लेक्चरबाजी effective वाटली नाही. उद्देश चांगला आहे पण practical नाही. आज कुणालाही महाराष्ट्रातच नोकरी करण्याची खात्री नाही. महाराष्ट्राबाहेर जायची वेळ आली तर मुलांना कोणत्या शाळेत टाकायचे?

पण चित्रपट खूप करमणुकप्रधान आहे. मनापासून आवडला.

केवळ ह्या धाग्यामुळे हा चित्रपट पाहिला. अन्यथा नाव वाचून जायचा विचार केला नसता. आणि मित्रांमुळे आनंद द्विगुणित झाला.

Pages