https://www.maayboli.com/node/87576 भाग १ लिंक.
लेकीला जन्मानंतर लगेचच दुसर्या हॉस्पिटलमधे हलवलं आणि आमची तात्पुरती ताटातूट झाली. ३-४ दिवस मला तिला भेटता येणार नव्हतं. पहिल्या दिवशी तिला फॉर्म्युला मिल्क दिलं. तिच्या नाकातून फीडिंग ट्यूब पोटात जाईल अशा प्रकारे घातली होती कारण अपुर्या वजनामुळे तिचे स्नायू विकसित झाले नव्हते. दिवस नीट पूर्ण भरून डिलिव्हरी झालेल्या केसेसमधे, आईचं दूध पिताना बाळांना ते ओढून घेणं आणि घशातून गिळणं यासाठी उपजत स्नायूबळ मिळतं. पण कोणत्याही कारणामुळे जेव्हा बाळ अपुर्या दिवसांचं/ अपुर्या वजनाचं असतं तेव्हा हे बळ कमी पडतं आणि मग अशी फीडिंग ट्यूब वापरतात. एक गोष्ट मात्र झाली. इतकी शतावरी पोटात ढकलली म्हणून की काय न कळे, पण दुधाचा प्रश्न कधी आला नाही. मॅडमच्या मदतीने मी डब्यात दूध काढून द्यायला शिकले आणि दुसर्या दिवशीपासून लेकीची फॉर्म्युला मिल्कची गरज संपली. घरून स्टरलाईज कंटेनर मिळाला की मी दूध पाठवत असे. गाडीच्या एसीतून ते तिच्या हॉस्पिटलच्या स्टोरेजमधे जायचं आणि वेळ झाली की नर्स तिला ते द्यायच्या. सिरिंजमधून ते ट्यूबमधे हळूहळू घालावं लागे. शिवाय एक आड एक फीडिंगच्या वेळी एक प्रोटीन पावडर त्यात ठराविक मापात मोजून घातली जायची. ती विरघळवून मग ते दूध तिला द्यायचं. हे सगळं पहिले ४-५ दिवस निओ आयसीयूत चालू होतं. तिला तिथे ठेवल्यावर लगेचच, प्रिकॉशन म्हणून सगळ्या लाईफ सपोर्ट सिस्टिम्स सुरू केल्या होत्या. मग २४ तास निरीक्षण पूर्ण होऊन बहुतेक करून सगळं ओके आहे हे समजल्यावर एक एक करून गरज नसलेल्या सिस्टिम्स काढून टाकल्या. मला ५व्या दिवशी घरी सोडलं. घरी येऊन १ दिवस कम्पल्सरी आराम केला. दुसर्या दिवशी पुन्हा बॅग घेऊन तिच्या हॉस्पिटलमधे मीही गेले. आता तिथे तिच्या नावाची खोली होती आणि माझी एंट्री "तिची आई" म्हणून झाली. नंतर मग रीतसर "बेबी ऑफ मिसेस प्रज्ञा" असं लेबल लागलं.
"ओ मॅडम, तुमची पोरगी लय आगाऊ हाए! एक रात्र तर काय झोपू देईना. निस्ती ठणठणते भूक लागली की!" - नर्स. आता यावर मी काय बोलणार! ती गंमत करत होती ते तिच्याकडे बघून समजत होतं.
"पण एक हाय हां मॅडम, तिला आई समजली!" म्हणजे? आई कशी समजेल? जन्मल्याक्षणी तर तिला तिथून नेलं... मग मला कशी ओळखेल? माझ्या डोक्यात प्रश्न.
"कशी काय? मी तर आजच आले ... "
"तसं नाई, जेवापासून तुमचं कंटेनरचं दूध येतंय नाय का, तेवापासून पोरीनं फार्मुला दूध पिलंच नाई! लय आगाव! चव कशी बरोबर समजती!"
नुसतं रडता येणारं ते इतकुसं गाठोडं इतकं शहाणं असेल असं मला का वाटेल! पण तशाही अवस्थेत मला तिचा अभिमानच वाटला! थोड्या वेळात आम्हाला "रूमिंग इन" साठी एक खोली मिळाली. रूमिंग इन म्हणजे अशी नाजुक बाळं आणि आई यांना एकत्र ठेवून एकमेकांची सवय होऊ देणं. कांगारू थेरपीमधे आई-बाळाचा थेट स्किनटच असतो. आईच्या छातीशी बाळाला चक्क झाशीची राणी पद्धतीने ओढणीने किंवा कांगारूबेल्टने नीट बांधतात. आईच्या हृदयाचे ठोके ऐकून बाळ शांत होतं आणि ओळखीच्या स्पर्शाने त्याची मानसिक आणि पर्यायाने शारीरिक वाढही अधिक सशक्तपणे होते. अशा नाजुक बाळांची काळजी कशी घ्यायची, मुख्य म्हणजे त्यांना फीडिंग ट्यूबच्या मदतीने दूध कसं पाजायचं, प्रोटीन पावडर कशी आणि किती द्यायची, त्यांचे कोणते पॅरामीटर्स सतत बघायचे... रोज किती वजन वाढलं पाहिजे... सगळं रूटीन बसवणं वगैरे... ४ दिवस नीट रूमिंग इन करून जमलं की घरी सोडणार हे ठरलं. जमत होतं. भिती होती, काळजी होती, मी झोपले की शेजारची बाहुली दिसतच नाही इतकी लहान आहे याची खंत वाटायची, दर २ तासांनी फीडिंग हे तर अखंड थकवणारं होतं.
खोलीजवळ बाहेर एक मायक्रोवेव्ह होता. घरून मावेसेफ बोल आणला. २-३ वाट्या होत्याच. बाकीचा संसार लागेल तसा होताच. तर, बोलमधे पाणी भरून त्यात स्टीलची वाटी घालायची. ते सगळं मावेत ठेवून नीट उकळून घ्यायचं. हे निर्जंतुकीकरण झालं की वाटीत दूध काढायचं. त्यात ठरलेली पावडर घालायची. सिरिंजमधे ते मिश्रण मोजून घ्यायचं. हळूहळू तिच्या फीडिंग ट्यूबमधून ते तिला "पाजायचं". हे दर २ तासांनी न चुकता करायचं. मागची-पुढची आवराआवरी आणि वाटी निर्जंतुकीकरण धरून मधे फक्त जेमतेम दीड तास मिळे. त्यात माझं जेवण, आंघोळ, तिचं स्पंजिंग, अधेमधे होणारे तिचे सारखे शीशू ब्रेक्स, राऊंडला आलेल्या डॉक्टरांशी संवाद .... विश्रांती नव्हतीच. बरं रात्रीसुद्धा दर २ तासांचं फीडिंग झालंच पाहिजे त्यामुळे राऊंड-द-क्लॉक म्हणतात तसं हे सगळं २४ तास सुरू होतं. सुदैवाने आम्ही दोघींनी एकमेकींना स्वीकारलं(!) आणि आमची रवानगी घरी झाली.
"काय हे.... घरी यायचं नव्हतं का गं बाळे.... शोभतं का हे... असं बाहेर आईबरोबर रहाणं... बाबाबरोबर कुशीत झोपा काढणं.... लबाड नुसती!" असं कौतुकाचं जंगी स्वागत झालं. जरा निश्चिंत होत होतोच तोवर भगवंतांनी अजून एक योजना आखली. लेक आजारी पडली. पण कमी प्रोटीन्स = अपुरं वजन = अपुरी प्रतिकारक्षमता याची आम्हाला कल्पना आधीच दिलेली असल्यामुळे घाबरलो नाही. उपचार केले. पण ताप कमी होतोय-चढतोय असं २४+ तास झाल्यावर तिला पुन्हा हॉस्पिटलमधे नेलं. तिथे गेल्यावर ती जरा बरी झाली. २ दिवसांत डिस्चार्ज ठरला. सकाळी आवराआवरी केली तोवर परत तिला ताप चढला. आता मात्र काळजी वाटली. लगेच डॉक्टरना बोलावलं. त्यांना जरा शंका आली. काविळ वगैरे टेस्ट्स आधीच केल्या होत्या प्रोटोकॉलनुसार. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. म्हणून त्यांनी या तापाची लक्षणं बघून सरळ लंबर पंक्चर करूया म्हटलं. मला जाम काळजी वाटली. मणक्यातून पाणी काढून ते तपासायला द्यायचं..... आधीच नाजुक, दीड किलो पण असेल-नसेल... त्यात लंबर पंक्चर.. पण इलाजच नव्हता! तिचा रडण्याचा आवाज इतका मजबूत होता की सॅम्पल घ्यायला खोलीत नेलं की बरोबर अर्ध्या मिनिटांत अख्खा मजला ती गाजवून सोडायची. दुखत असणार यात शंकाच नाही, पण जितकी तब्येत नाजुक तितका आवाज मजबूत होता. "इतका जोर येतोय कुठुन ओ!" असं तिच्या नर्सेस मला विचारायच्या. त्यांनी अशी नाजुक बाळं सांभाळलेली असल्यामुळे त्यांच्यासाठी ते रूटीन होतं. माझी गंमत करायच्या, कधी काहीबाही बोलून काळजीत टाकायच्या...
तर, मणक्यातून पाणी काढलेलं आम्हाला दाखवलं, पेडि. मॅडमनीही बघितलं. मेजर इन्फेक्शनचं निदान झालं होतं. मेंदूला सूज आल्यावर असे रिझल्ट्स येतात... पुढच्या तपासणीसाठी आधी समोरच असलेल्या सोनोग्राफी सेंटरमधे आणि मग प्रभात/ भांडारकर रोडला जोशी हॉस्पिटलमधे स्कॅन करायला न्यावं लागेल असं समजलं. माझ्या बाळीची परीक्षा काही संपत नव्हती!
"डोक्याची सोनोग्राफी करायची आहे. प्रोटोकॉलमधे करावीच लागली असती, पण आता लगेच जा. डॉक्टरांना मी फोन करून कळवते, आधी तुमचा नंबर घेतील ते." वाक्यागणिक नुसता ताणच वाढत होता. त्यावेळी तिला इन जनरलच कोणतंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून साधा स्पर्श करतानाही मी स्टरिलिअम हाताला चोळून तिला हात लावायचे. तपासण्या करताना तिला गुंडाळायचे २-३ सेट मी तयार करून ठेवले होते. मऊ साडी, ओढण्या... सगळं रोज घरून कडकडीत गरम पाणी आणि डेटॉल वापरून तशाच प्रकारे धुतलेल्या ओढणीत बोचकं नीट बांधून मिळायचं. गाडीची सीटसुद्धा स्टरिलिअम शिंपडून घ्यावी लागायची. हे सगळं आमची अ ति चिकित्सा म्हणून नव्हे तर डॉक्टरी सल्ल्यानुसार चालू होतं. तिला नीट गुंडाळून मी सोनोग्राफीसाठी नेलं. अशा बाळांची डोक्याची हाडं पूर्ण जुळलेली नसतात त्यामुळे सोनोग्राफी करता येते. आणि प्रिमी बेबीज ची सोनोग्राफी (आणि त्यांची वाढ बघताना डोळे, कान वगैरे ज्ञानेंद्रियांची तपासणी) करणे हे त्यांच्या प्रायमरी केअरच्या प्रोटोकॉलमधेच येतं. आणि हा निर्णय बाळाची तब्येत बघून अनुभवी, निष्णात पेडि. ने घ्यायचा असतो. आमच्या मॅडम सगळं नीट आम्हाला समजावून सांगून करत होत्या. पण नेमकं नशीब असं की या सोनोग्राफीच्या दिवशीच त्यांचं देशाबाहेर जायचं आधीच ठरलं होतं. आम्ही तरी काय बोलणार!
सोनोग्राफी झाली त्यात ३०% सूज दिसली. तसंच तिला घेतलं. मॅडमनी फोन करून जोशी हॉस्पिटलमधेही आमचा नंबर आधी घ्यायची विनंती केली होती. आम्ही तिथे गेलो. स्कॅन करताना भूल देणं गरजेचं होतं. तिच्या वजनाप्रमाणे तिला औषध दिलं. मला किंवा कोणालाच स्कॅनिंग रूम मधे जाता येणार नव्हतं. मी आपली देवाचं नाव घेत वेटिंग लाऊंजमधे बसून होते. जरा वेळाने तिथले डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले,
"भूल नीट चढली नाहिये. मी बरोबर मोजून दिलाय डोस, पण बाळ खूप चळवळ करतंय. आता लगेच डोस देता येणार नाही. ४० मिनिटं थांबून मग रिवाईज करून डोस द्यावा लागेल. तिला तुमच्याकडे देतो. भूक लागली तरी फीड करू नका प्लीज!"
हे नवीन धर्मसंकट! मी तिचं सगळं स्टरिलाईज मटेरिअल घेऊन आले होते भुकेसाठी. इतकासा जीव तो... आणि ते चळवळ म्हणाले तरी बाहेर आणताना तिचं रडणं मला ऐकू आलंच! पण तिला हातात घेतल्यावर ती शांत झाली. भूक नव्हती, आई जवळ हवी होती बहुतेक. असंच झालं तर स्कॅन कसं करणार.... पण मग तसंच तिला फिरवून शांत केलं मी. मग माझ्या हातूनच डॉक्टरांनी हळूच रिवाईज डोस दिला. भूल चढली आणि डॉक्टरांनी पटकन स्कॅन करायला तिला आत घेतलं. स्कॅन झालं. रिपोर्ट्स थेट हॉस्पिटलला जाणार होते. आम्हाला हातात मिळणार नव्हते त्यामुळे थांबायची गरज नाही म्हणून निघालो. तोवर भूल उतरून तिने सूर धरलाच होता. आता भूकही लागली होती. फीडिंगची परवानगी मिळाली होती म्हणून तेही करून घेतलं.
"जराही सोडत नाहिये ती तुम्हाला... आम्ही करतो प्रिमी केसेसचं स्कॅन, पण भूल लगेच चढते आणि बाळं इतका हट्ट करायला जागीच रहात नाहीत. तुमची मुलगी चिवट आहे.... पण चांगलं आहे, तुमचा हात लगेच कळतोय तिला!"
मला हे ऐकलं की कुठेतरी आतून खूप खूप खूप भरून यायचं. कुठेतरी माझे कष्ट कामी येतायत असं वाटायचं. तर, आम्ही हॉस्पिटलला परतलो. एव्हाना निदान झालं होतं (ते मी इथे लिहायचा अजूनही धीर होत नाहिये. पण मेंदू थेट अफेक्ट झाला होता इतकंच सांगते.) ट्रीटमेंट ठरली होती. लेकीचं बाकीचं सगळं वागणं, रिफ्लेक्सेस, वजन वाढण्याचा वेग हे अपेक्षेप्रमाणे होतं ही खूप मोठी जमेची बाजू होती. मॅडम देशाबाहेर गेल्या आणि तात्पुरते डॉक्टर जे राऊंड्ला यायला लागले ते तर देवमाणूस ठरले! जबरदस्त योगायोग असा की आमच्या घराच्या खाली त्यांचं नव्यानेच क्लिनिक चालू झालं होतं आणि ते आम्ही नाव वाचून त्यांना ओळखलं! त्यांनी लेकीला खूप छान ट्रीटमेंट दिली. (पुढे आजतागायत तेच तिचे पेडी. आहेत. क्लिनिकच्या जागा बदलल्या तरी तेच आहेत.)
२१ दिवसांचा अँटिबायोटिक्सचा कोर्स तिथे राहूनच करावा लागणार होता. रोज तिला पायातून इंजेक्शन द्यावं लागणार होतं. नर्सेस तिला न्यायला आल्या की माझा जीव वरखाली व्हायचा!
एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितली पाहिजे... तिच्या अंगात जोर नव्हता, लोह, प्रोटीन, कॅल्शिअम आणि अजून काहीतरी सप्लिमेंट्स होती, आजार तर होताच.. पण रोज नियमित वजनवाढ होत होती आणि फॉर्म्युला मिल्क अजिबात न घेता माझी बाळी कणाकणाने वाढत होती! आईच आपलं भरण-पोषण करतेय हे तिला समजलं होतं की काय देव जाणे! जुन्याजाणत्या नर्स म्हणायच्या, "आई कळती ओ पोरांना... नका काळजी करू..."
बाकी मनाविरुद्ध काही करून घ्यायचं नाही हे मात्र ती पहिल्या आठवड्यात शिकली. फीडिंग ट्यूब ही नाकातून थेट पोटात गेलेली असते. म्हणजे ती ओढून काढणं सोपं नसतं. माझी लेक इरिटेट होऊन दर ४-५ दिवसाला एक ट्यूब ओढून काढायची. कुठून जोर यायचा कळेना. मध्यरात्री कधीतरी, किंवा दिवसभरात कधीही तिला फीडिंगला घ्यावं, सगळा सरंजाम-सिरिंज तयारी घ्यावी तर बाईसाहेबांची ट्यूब बेपत्ता! गादीवरच कुठेतरी पडलेली असायची. ती पुन्हा वापरता येत नाही हे एक, आणि ती नाकातून पोटात घालणं हे डॉक्टरचंच काम आहे, अगदी नर्सेसचंही नाही. मग असिस्टंट डॉक्टरना बोलवा... त्यांना कारण सांगावं लागे कारण ट्यूब सरकवली की स्टेथो घेऊन तपासावी लागायची की चुकून फुफ्फुसात गेली नाही ना... पोटातच गेली आहे ना... मग दर ४-५ दिवसांनी हा सोपस्कार असायचा. ५-६ ट्यूब्स तिने बदलायला लावल्या!
"तुमची पोर म्हणजे जिवाला घोर हाए... निस्ती चुळबुळी! इतक्या काय कोण टूबा बदलत नसतंय! सारकी निसती डाक्टरांना बोलिवती... " एक अनुभवी मावशी बोलून गेल्या!
मी एकूणच कोणाचंही काहीही ऐकलं तरी मनावर न घ्यायच्या अवस्थेला पोहोचले होते! रोज तिला कांगारू पोझिशनला घेऊन मी बसत असे. माझी पाठ भरून यायची. मग नवराही ओढणीने बांधणं आणि कांगारू पोझिशन शिकला आणि मला रिलीव्ह करायला अर्धा-पाऊण तास त्यालाही ते जमायला लागलं. एव्हाना २-३ वेळा तपासणीसाठी बाबाच्या गाडीतून फिरायची सवय आणि बाबा अवतीभोवती असतो ही सवय लागल्यामुळे असेल.. तिला बाबाही नीट समजला होता. अर्थात आईचा चिकटगुंडा जास्त होती ती. थोडा वेळ झाला की कुरकुर सुरू व्हायची, की पार्सल पुन्हा माझ्याकडे! (या काळात बाबाने घरून कामाची विशेष परवानगी घेतली होती. हॉस्पिटलात दुसर्या बेडवर हापिस थाटून काम चालू असायचं.)
असे नाना प्रकार करत, स्वतःला जास्तीत जास्त शांत ठेवत २१ दिवस ढकलले. नवरा, सासरे आणि गरज पडेल तसं इतर काही नातेवाईक यांची हॉस्पिटल फेरी असे. साबा घरात सगळं बघत होत्या. मला सपोर्ट होता सगळाच. डबा घरूनच यायचा. तिची ट्रीटमेंट संपवून पुन्हा घरी आलो. एव्हाना तिने पावणेदोन किलो इतकं वजन धरलं होतं त्यामुळे शेवटच्या १-२ दिवसांत ट्यूबची गरज संपली होती. (तेही ट्रेनिंग मी तिला द्यायचं होतं आणि मी ते मॅडमच्या मदतीने तिला दिलं. मांडीवर उशी ठेवून बाळ कसं धरायचं... किती वेळ तिला शिकवायचं- कारण वजन अजूनही काही भरभक्कम झालं नव्हतं - तर ती दमली नाही पाहिजे... असं करत तिचं-माझं ट्यूनिंग जमवलं होतं.)
पुन्हा एक सोनोग्राफी आणि एक स्कॅनिगं करून ती पूर्ण रिकव्हर झाल्याची खात्री करून घेतली आणि मगच घरी सोडलं होतं आम्हाला. या सगळ्यात आमचा १ महिना संपला. यथावकाश ती ४ महिन्याची झाल्यावर कुशीवर आणि मग पालथी वळली. जोर कमी पडला की तिचा तिलाच राग येऊन सूर धरायची. पण जन्मत: वजन जे किमान अडीच किलो लागतं ते गाठायला ५ महिने पूर्ण व्हावे लागले आणि मग त्या शुभदिनी तिला आयुष्यातली पहिली लस टोचून आणली, जी जन्मताक्षणी देतात. बहुतेक बीसीजी (आठवत नाही). मग जसंजसं वजन वाढत गेलं तसंतसं लसीकरण होत होतं.
मोठी परीक्षा पार पडली होती. पण भगवान विष्णुपंतांचा पुढचा प्लान माहिती नव्हता. जेव्हा हॉस्पिटलमधे आम्ही १ महिना होतो तेव्हा नवरा अनेक डॉक्टरांना भेटत होता. नणंद-भाओजी आणि माझी ताई गरजेप्रमाणे फोनवरून काही ना काही सुचवत होते. माझ्याही ताईला तोवर मुलगा झाला आणि मग आई-बाबा तिच्याकडे गेले. मी तोवर स्थिरावले होते, साबा-साबु होते आणि मुख्य म्हणजे, कधी ना कधी माझं मला स्वतंत्रपणे सगळं हाताळावंच लागणार होतं.
तर, असंच आम्हाला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधे एका डॉक्टरांचं नाव समजलं होतं, तिला एकदा घेऊन जायचं ठरलं. एव्हाना ती ६-७ महिन्यांची झाली होती. प्रगती तशी समाधानकारक होती. पण तरी दीनानाथला नेलं तिला. तिथे गेल्यावर लक्षात आलं की तिचा १ माईलस्टोन असाच २ आठवडे मागे आहे आणि त्याची रिकव्हरी करावी लागेल. पेडिअॅट्रिक फिजिओथेरपी सेशन करावे लागतील. तिची प्रगती बघून किती सेशन ते ठरेल. झालं. पुन्हा नवीन आव्हान!
रांगायला सुरूवात करण्याआधी मुलं बसतात तेव्हा त्यांचा त्यांना तोल सांभाळता यायला हवा. माझ्या लेकीला बसताना जोर पुरत नव्हता. म्हणजे डोक्यात असायचं तिच्या की बसायला हवंय, पण स्नायूबळ पुरत नव्हतं. मग पडलं की चिडचिड, रडारड. हे त्या ताईच्या (ती चांगली डॉक्टर होती, स्पेशलायझेशन म्हणून इंटर्नशिप करत होती. एकदम उत्साही आणि गोड होती!) लक्षात आल्यावर तिने लेकीला १-२ वेळा वेगवेगळ्या प्रकारे कमरेतून नुसता हात लावून सपोर्ट दिला आणि जमलं की! लेकीला एकदम आनंद झाला! २-३ सेकंद का होईना आपण बसू शकलो म्हणून ती खूप हसायला लागली आणि आम्हाला उत्तर मिळालं! तिला नक्की कसा सपोर्ट दिला की जमतंय हे मी बघितलं आणि तसा सपोर्ट द्यायला शिकले. मग तिला जोर पुरावा म्हणून स्नायूना हलका मसाज आणि ठराविक हालचाली कशा करून घ्यायच्या हेही मी शिकून घेतलं आणि अवघ्या २ सेशन्समधे आम्ही मायलेकींनी सॉलिड टीम सक्सेस मिळवलं!
इतके दिवस तिला साबा आंघोळ घालायच्या. चिमुकल्या टबात फुलपात्राने पाणी घालत बाईसाहेबांचं स्नान चालायचं. आंघोळ परमप्रिय होती! एकूणच मसाज, आंघोळ आवडायचं. ६ महिन्याची झाल्यावर चांगला दिवस बघून घरातच उष्टावण करायचं ठरलं. छान गायीच्या दुधात थोडं पाणी घालून नीट उकळून खीर केली आणि तिला चमचाभर घातली. आवडलं प्रकरण! १-२ चमचे देऊन मग बास केली. मग काय.... आलीच पुढची इमर्जन्सी! आणि ती अगदीच अनपेक्षित होती! पाऊण तास झाला असेल-नसेल... प्रचंड आणि एकामागून एक उल्ट्या केल्या तिने! म्हणजे उलटून काढण्याइतकं मटेरिअल पोटात नव्हतंच तर इतकं कसं उलटून पडतंय...काय चाललंय हे समजेचना आम्हाला. तसंच तिला उचललं आणि घराखालच्या क्लिनिकमधे (तेच देवमाणूस असलेले डॉक्टर) नेलं. तिथे इमर्जन्सी सांगून आत गेलो. सगळा प्रकार अनाकलनीयच होता. आम्ही नीट सगळं सांगितल्यावर,
"डोण्ट वरी, प्रिमी बेबीजमधे मिल्क इंटॉलरन्स असायचं प्रमाण नॉर्मल बेबीजपेक्षा १०% जास्त असतं. त्यांना पोटात इमिजिएट रिअॅक्शन येऊन अल्सर डेवलप होतो आणि वॉमिटिंग होते... घाबरू नका, पण अजिबात दूध देऊ नका!"
असं म्हणून औषधपाणी देऊन आम्हाला निश्चिंत केलं. आता परीक्षाच होती खरी! पण सुदैवाने, बाकी वरणाचं पाणी... आणि मग पुढचा आहार नीट पचायला लागला. एकदा प्रवासात लागलं तर असूदे म्हणून नॅन-प्रो का सिरिलॅक असंच काहीतरी आणलं आणि पहिल्याच ट्रायलला घरी पुन्हा सगळं उलटून पडलं. मग पुन्हा वरात दवाखान्यात. मग डॉक्टर म्हणाले एकदा घटक पदार्थ बघा, मिल्क एक्स्ट्रॅक्ट्स असतील तर पुन्हा अजिबात देऊ नका. इतकं कुठलं आमच्या लक्षात यायला! बघितलं तर तेच निघालं! आम्ही मारे मिक्स ग्रेन खिचडी वगैरे बघून आणलं होतं! (पर्सनली मला कधीही बेबीफूड्स पटली नव्हतीच! असो)
यामुळे एक झालं, बाहेरचं बेबी फूड, आईस्क्रीम्स, क्रीमने माखलेले केक्स, मिल्क पावडर घातलेली असल्यामुळे चॉकलेट्स... कधीही खाल्लं नाही तिने!
"मया एलल्जी येते, मया नतो!" असा बोबडकांदा बोलून दाखवायचा बाहेरही गेल्यावर!
अशी मजलदरमजल करत, सव्वादोनची झाल्यावर प्ले-गृपात घातली तिला. कारण आई-बाबा-आजी-आबा सोडून माणसांची सवयच नव्हती. मग पोरांच्या मिसळल्यावर सारखी इन्फेक्शनं होत, दर अल्टरनेट शुक्रवारी डॉक्टरांची वारी करत आमचं प्रिस्कूल साजरं झालं. उंची, वजन आणि एकूणच सगळं इतर मुलांसारखं होईतो तिला वयाची ५-६ वर्षं पूर्ण करावी लागली आणि मग कोविडने मोठीच सत्त्वपरीक्षा मांडली! ती तर सगळ्या जगानेच दिली!
एवढं होऊनही, माझी लेक माझा मोठा सपोर्ट आहे. हो, ती लहान असूनही माझा सगळ्यात मोठा सर्व्हायवल सपोर्ट आहे! मला दीर्घकाळ पोस्टपार्टेमचा त्रास झाला. तब्येत, नोकरी, करिअर (चालू असलेलं एम ई ब्रेक केलं आणि मग ती सव्वा वर्षाची झाल्यावर पूर्ण केलं कसंबसं) सगळंच डिस्टर्ब झालं. ऐन अडचणीत कुटूंब सोबत असलं तरी वेगवेगळ्या व्यक्ती म्हणून स्वभावातल्या फरकांचा खूप त्रास होत होता. काही वेळा तर काही वाद शिगेला गेले होते आणि ते नंतरही बरीच वर्षं पुरले. कोणी एक बरोबर कोणी एक चूक असं नसतं काही, पण ताणायचं नाही हे पथ्य सांभाळलं गेलं नाही. असो. अधिक तपशिलात नकोच ते आता. कारण वय-अनुभव-परत्वे सगळ्यांनाच शहाणपण आलेलं आहे. आता कुठल्याही प्रॉब्लेमपेक्षा आपण संवादाने सगळं हाताळू शकतो हा विश्वास सगळ्यात मोठा ठरला आहे. बहुतेक सगळ्याच कुटूंबात हे थोड्याफार फरकाने असंच असतं हे बघून आम्ही फार काही जगावेगळे नाही हे पटलेलंही आहे!
आम्ही लेकीसमोर हे तिच्या आजाराचे विषय मुद्दाम काढत नाही. सहज जाताजाता तिला जेवढं माहिती आहे तेवढं आहे. शाळेत विज्ञान शिकताना कुठली विटॅमिन्स आणि कुठल्या कमतरता आणि काय नि काय.. सगळंच शिकतेय ती. मधेच कधीतरी "तुला काही डीफिशिअन्सीज झाल्या होत्या का गं आई..." असं विचारते. अजूनही तिला आई आणि आपण फिजिकली इन्सेपरेबल आहोत असंच वाटतं. साधं दळण आणायला मी निघाले की "येतेस का..." म्हटलं तर यायला तयार असते. त्यासाठी अगदी भारी ठिकाणी जाऊ असं म्हणायचीही गरज नसते. आईबरोबर कुठेही यायला तय्यार! कांगारू थेरपीतून माझं लेकरू अजूनही बाहेरच आलं नाही की काय असं वाटावं असं वागणं असतं कधीतरी... "यु नो आई, मॉम-डॉटर्स आर इमोशनली ऑल्वेज इन्सेपरेबल!" असं काहीतरी सेंटी डायलॉग मारून मला ती गप्प करते... बाहुलीपेक्षा लहान आणि हलक्या वजनाचं माझं हे गाठोडं एकदम मोठं झालंय असं वाटतं आणि मी तिला कुशीत घेते. कांगारू थेरपीतून मी तरी कुठे बाहेर आलेय अजून!
दोन्ही भाग एका दमात वाचुन
दोन्ही भाग एका दमात वाचुन काढले. हा भाग वाचताना तर इतक्यांदा आवंढा दाटुन आला घशात..
मनापासुन आलेलं प्रांजळ लेखन...
माझी पुतणी प्रीमी आहे.. जाउबाई वेगळ्या दवाखान्यात, आम्ही बाळासोबत वेगळ्या दवाखान्यात, नळ्या, फीडींग ची कसरत हे सगळं घरात बघितलं आहे त्यामुळे त्या ताणाची कल्पना आहे... प्रीमी पोरी म्हणजे झाशीच्या राण्या असतात.. माझी पुतणी मृदुल तशीच आहे... पहिल्या दिवसापासुन चिवटपणे सगळ्या परिस्थितीशी लढा देतात.. आणि नियतीला आव्हान देत ठाम उभ्या रहातात.
तुम्हाला आणि तुमच्या लेकीला खुप खुप प्रेम आणि शुभेच्छा
केवढ्या अवघड परीक्षा दिली
केवढ्या अवघड परीक्षा दिली तुम्ही प्रज्ञा!
तुम्हाला आणि तुमच्या लेकीला
तुम्हाला आणि तुमच्या लेकीला खुप खुप प्रेम आणि शुभेच्छा>> __/\__ बाकी पूर्ण पोस्टला मम.
शर्मिला, धन्यवाद. परमेश्वरी कृपेने बाहेर पडलो!
तुझी लेक प्रीमि आहे हे माहीत
तुझी लेक प्रीमि आहे हे माहीत होतं. आणि भाच्याच्या निमित्ताने NICU च्या वाऱ्या झाल्या होत्या त्यामुळे जीव टांगणीला लागणे हे काय असतं ते माहीत होतं. पण खासच सत्वपरीक्षा झाली आहे तुझी आणि तिचीही. ते लंबर पंक्चरचं वाचून धस्सच झालं. कारण बऱ्यापैकी मोठ्या वयात यातून गेलो आहे.
पण सर्वानीच धीराने घेऊन त्यातून मार्ग काढलात हे महत्वाचं. लेख लिहिलंस हे ही चांगलं केलंस. कारण या परिस्थितीतून जाणाऱ्यांना हे ही दिवस जातील हे स्वानुभवाचे बोल इतर कोण सांगणार?
प्रज्ञा,
प्रज्ञा,
दोन्ही भाग नुसते वाचतानाही सारखा जीव वरखाली होत होता. तुम्ही तर प्रत्यक्षात एवढी मोठी लढाई लढलात! तुझ्या लेकीला खूप खूप आशिर्वाद!
वाचतोय.
वाचतोय.
माझा आतेभाऊ neonatal surgen आहे. ६००-७०० ग्राम वजन असलेल्या premature yet fighter babies बद्दल तो सांगतो ते किस्से ऐकून थक्क व्हायला होते. प्रत्येक केस वेगळी हेच खरे.
असे धैर्यशील कुटुंब नशिबात घेऊन आली आहे, तुमची आणि तुमच्या आईची मुलगी लकी आहे.
चश्म - ए - बद - दूर 🧿
फारच सुंदर लिहीलेले आहे.
फारच सुंदर लिहीलेले आहे.
बाळाला साधे नेहमीचं ट्रिपल डोसवाले, इन्जेक्शन दिले तरी माझ्या डोळ्यात पाणी आले होते. तू तर कशा कशातून गेलेली आहेस. मागे वळून आता हे सर्व लिहीताना आता हायसं वाटत असेल पण तेव्हा किती घालमेल होत असेल.
हा भाग वाचताना मलाच खूप दडपण
हा भाग वाचताना मलाच खूप दडपण आले ..
खूप सोसले तुम्ही, आता काही सोसावे लागू नये..
धनवन्ती, प्रतिसादाबद्दल आभार.
धनवन्ती, प्रतिसादाबद्दल आभार.
पण पहिल्याच भागात म्हटलंय तसं, मी हे खूप सोसलं हे यापेक्षा "हे घडलं" हे सांगावंसं वाटलं. व्यक्त व्हावंसं वाटलं.
मी त्यावेळी जे बरोबर वाटेल ते करत गेले.. त्याचे सगळे परिणाम स्वीकारायची तयारी होतीच. माझी माणसं सोबत होती.
सगळी परिस्थिती समजल्यावर बाळांचा वेगळा वॉर्ड असलेलं हॉस्पिटल निवडता आलं असतं. मी फक्त आणि फक्त ॲलोपॅथीचीच औषधं घ्यायचा निर्णय घेऊ शकत होते. अजून ही यादी वाढेल पण मुद्दा हा आहे की मला माझा आणि बाळाचा विचार करून योग्य वाटलं ते मी केलं. मला तेव्हाही आणि नंतरही अनेकांनी बाळाचा जीव मी जोखमीत टाकला असं ऐकवलं होतं. ते त्यांच्या जागी बरोबर होतं पण या मताचा मी जास्त विचार नाही केला. खूप खूप गोंधळ मनात झाला की आपलं अंतर्मन आपल्याला बरोबर काय ते सांगतं यावर माझा विश्वास आहे.
आजवर तरी मला चांगलाच अनुभव आलाय. असो.
पुन्हा एकदा मनापासून आभार.
बर्याच त्रासाचे वर्णन असले
बर्याच त्रासाचे वर्णन असले तरी फार सुंदर लिहीले आहे. हा भाग पहिल्या भागापेक्षाही चांगला झालाय एक लेख म्हणून. कांगारू थेरपी इथे स्पेसिफिक उल्लेख म्हणून आणि लेखाची थीम म्हणूनही मस्त जमली आहे.
असे धैर्यशील कुटुंब नशिबात
असे धैर्यशील कुटुंब नशिबात घेऊन आली आहे, तुमची आणि तुमच्या आईची मुलगी लकी आहे. +1
दोन्ही भाग एक दमात वाचले अगदी छान लिहिले आहे भावनांची रोलर कोस्टर राईडच. प्रीमॅचुअर बेबीज खरच फायटर असतात त्यातून मुली तर तश्याही फायटर असतात. तुमच्या छोट्या फायटर ला आणि तिच्या ममा फायटरला खूप खूप प्रेम आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
केवढ्या अवघड परीक्षा दिली
केवढ्या अवघड परीक्षा दिली तुम्ही प्रज्ञा!...+१.
शेवटच्या पॅराने डोळे पाणावले.शुभम भवतू.
चालू असलेलं एम ई ब्रेक केलं आणि मग ती सव्वा वर्षाची झाल्यावर पूर्ण केलं कसंबसं) ...... यासाठी मानलं.
आता तुझी मुलगी खेळते वगैरे
आता तुझी मुलगी खेळते वगैरे इतकी छान आहे हे माहित असून ही एका दमात श्वास रोखत वाचलं. छान लिहिलं आहेस.
हा ही भाग पटकन वाचून काढला
हा ही भाग पटकन वाचून काढला
ती घरी येइपर्यंत तर कधी नेट आहेत घरी असे वाटले.
पुढचे एपिसोडस देखील रोलर कोस्टर एकदम.
माझा पुतण्या आहे असाच.
त्यामुळे बऱ्याच गोष्टी relate झाल्या
प्रज्ञा, खूप कठीण काळातून
प्रज्ञा, खूप कठीण काळातून धीराने मार्ग काढलात .

मला फक्त राहून राहून या गोष्टीची नवल वाटते आहे, की मुलीचं आजारपण हे एक..पण त्यात घरच्या लोकांचे टोमणे बोलणी, विचित्र स्वभाव...ही सगळे तुम्हाला किती सहन करावे लागले असेल! आधीच आपले मन हळवे झालेले असते, आणि प्रत्येक जण तोच कसा बरोबर आणि आपण काय चूक केली हे पटवून द्यायच्या तयारीत.
बापरे !! मानलं तुला!
आनंदी रहा. लेकीला खूप शुभेच्छा.
ओहहह.... खूप मोठी परीक्षा.
ओहहह.... खूप मोठी परीक्षा. ग्रेट. लिहीलंयही खूप छान.
प्रज्ञा , तू लिहीते खूप छानच
प्रज्ञा , तू लिहीते खूप छानच पण दोन्ही लेख वाचले नाही. प्रतिसाद वाचून लेख वाचायची हिंमत झाली नाही. मागच्या वर्षी नातं झाली ती premature ! सी सेक्शन करावं लागलं काही कारणाने पण सुदृढ होती NICU तर ठेवावे लागले नाही पण सगळं सुरळीत पार पडेपर्यंत प्रचंड ताण होता. मागच्या महिन्यात वर्षाची झाली. धरून उभी राहते. आरामात प्रगती सुरू आहे. त्यामुळे सगळं समजून शकते. तुझ्या कुटुंबाचं कौतुक , अभिनंदन व खूप शुभेच्छा!
सगळ्यांचे मनापासून आभार.
सगळ्यांचे मनापासून आभार.
मधल्या मोठ्या कालावधीत एक कुटुंब म्हणून तिच्यासाठी जे उत्तम करता येईल ते केलं. करतोय. एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारूनही चांगला बॉण्ड होतो आणि हीच एक मोठी सपोर्ट सिस्टीम असते. कसोटीच्या वेळी हे खूप जाणवतं. भले मतभेद का असेनात, पण एक टीम म्हणून ठरवलं तर जमतं.
दोन्ही भाग वाचले
दोन्ही भाग वाचले
काय लिहू
डोळ्यात पाणी आलंय
आनंदाने राहा अशाच ❤️
दोन्ही भाग वाचले. मोठ्या
दोन्ही भाग वाचले. मोठ्या दिव्यातून गेलात तुम्ही सगळेजण. माउस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो.
दोन्ही भाग वाचले.
दोन्ही भाग वाचले.
खूप कठीण लढाई जिंकण्यात तुम्ही यशस्वी झालात त्या
बद्दल अभिनंदन.
दोन्ही भाग वाचून काढले.
दोन्ही भाग वाचून काढले.
खूप धीराच्या आहात तुम्ही.
तुमच्या कुटुंबाचं कौतुक.