होऊ कशी उतराई (१)

Submitted by प्रज्ञा९ on 1 January, 2026 - 05:18

(डिस्क्लेमर : हे नक्की कशात लिहू समजेना म्हणून विषय: अवांतर निवडला. डॉ. कुमार यांनी काढलेल्या सिझेरिअनच्या धाग्यावर, वाहत्या गप्पांच्या धाग्यावर मी अधूनमधून याबद्दल लिहिलं, पण ते तेवढ्यापुरतं. आज जरा नीट आठवून लिहून काढावं वाटलं. मला मेडिकलचं ज्ञान नाही, आत्ता याक्षणी कागद हाताशी नाहीत पण लिहायचा एक फ्लो मनात तयार आहे म्हणून जसं जमेल तसं लिहायला घेते. गरजेनुसार/ काही तांत्रिक माहिती असेल तर बदल करीन. केवळ "हे असं घडू शकतं, इतरांचे अनुभव माहिती असलेले बरे असतात" या हेतूने लिहिते आहे. बघा मी कित्ती कित्ती सोसलंय .... वगैरे नाही. जे मिळालं आहे ते आमचं आजवरचं कमाल आनंदाचं गाठोडं आहे. )

शिकायची हौस फार म्हणून लग्नाच्या अडीच वर्षांनी मी एम ई ला अ‍ॅडमिशन घेतली. २०११ च्या दिवाळीत अमेरिकेतून कायमचे परतलो होतो. मी आयटीतली नोकरी २००९ मधे लग्नानंतर परदेशी जावं लागणार हे नक्की झाल्यावर सोडली होती. शिक्षकी पेशाचा मोह होताच. २०११ ला डिसेंबरात मला तशी संधी मिळाली. माझा नवरा पुन्हा २-३ महिन्यांसाठी अमेरिकेत गेला आणि माझी नवीन नोकरी सुरू झाली. त्यावेळी फक्त बी ई नाही तर एम ई पण अनिवार्य झालं होतं. मी ६ महिने नोकरी केली, मग एम ई ला प्रवेश मिळाल्यावर ती सोडावी लागली आणि जून २०१२ ला रीतसर विद्यार्थीदशा सुरू झाली. नवरा फेब्रुवारीतच परतला होता. मग सकाळी उठून दोघांचे डबे, सासू-सासर्‍यांचं दुपारचं जेवण वगैरे तयार करून ८ चं कॉलेज करायचं, ३ पर्यंत घरी यायचं, मग उरलेली आवराआवरी, झोप, थोडा व्यायाम, घरकाम-बाजारकामं ... रात्रीचं पुन्हा आवरून अभ्यास. एक वर्ष रेग्युलर कॉलेज असायचं ते पूर्ण केलं. मग दुसरं पूर्ण वर्ष एम ई चा मुख्य प्रोजेक्ट. जिथे नोकरी करत होते त्या कॉलेजच्या सरांनी आधीच सांगितलं होतं की दुसरं वर्षं चालू झालं की भेटा, व्हेकन्सी असेलच. पर्स्युइंग एम ई असेल तरी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम देता येतं. मला तेही मिळालं. मात्र जुलैमधे प्रेग्नन्सी राहिल्यावर मी ते एक सेमिस्टर पूर्ण करून नोव्हेंबरनंतर घरीच थांबले. नशिबाने एप्रिलमधे ड्यू डेट होती, माझं काम माझ्या अपेक्षेप्रमाणे फेब्रुवारीत संपवून मी मार्चच्या सुरूवातीलाच रिपोर्ट वगैरे करून निवांत आराम करणार हे ठरवलं होतं.

पण देवाच्या योजना समजत नाहीत आपल्याला. २७ का काहीतरी डिसेंबरला मी अ‍ॅनोमॅली स्कॅन केलं आणि त्यात बाळाची वाढ २ आठवडे कमी आहे असं निदान झालं. म्हणजे वजन भरलेलं नव्हतं. त्यावेळी तिसर्‍या- चौथ्या महिन्यात वगैरे करायच्या डबल मार्कर-ट्रिपल मार्कर आणि इतर चाचण्या निर्दोष होत्या. पण या स्कॅनमधे वजन पाहिजे तसं नव्हतं. सातवा महिना लागला होता. माझ्या गायनॅकनी ते रिपोर्ट्स बघितले आणि ती दोघंही (गायनॅक सर-मॅडम) विचारात पडली. कारण नवव्या महिन्यात शेवटी वगैरे पाणी कमी होऊ शकतं, माझं सातव्यातच पाणीही कमी झालं होतं. Placental Insufficiency + Oligohydramnios + अजून काहीतरी असं वैद्यकीय निदान झालं होतं. मला हायपोथायरॉईड होतंच पण त्याचा कुठेही प्रेग्नन्सी-रिलेटेड परिणाम दिसत नव्हता. विचारांती, मला प्रोटीन इन्टेकसाठी सलाईन्स घ्यावी लागतील हे ठरलं. पुण्यातच अजून एका खूप नावाजलेल्या डॉक्टरांचं सेकंड ओपिनिअन घेतलं. एंडोक्रायनॉलोजिस्टना कन्सल्ट केलं. एकूण, आहे हे स्वीकारून उपचार करायचे असाच निर्णय घेणं हातात होतं. माझ्या घरातच ४ डॉक्टर आहेत. माझी ताई-भाओजी आणि नणंद-भाओजी. योगायोग असा की ताई आणि नणंद दोघीही दुसर्‍या वेळी प्रेग्नंट होत्या. त्यामुळे त्यांच्या गायनॅकलाही त्यांनी रिपोर्ट दाखवून उपचारांची दिशा नक्की बरोबर आहे ना विचारून घेतलं होतं. ३० का ३१ डिसेंबरला मी अ‍ॅडमिट झाले. आयुष्यातलं पहिलं सलाईन. आम्ही दोघंच घरी होतो, साबा-साबु गावी गेले होते. नवर्‍याच्या मदतीने स्वयंपाक करून जेवून मी "सलाईन खायला" गेले.
"दुखेल का रे खूप?"
"म्हणजे काय? तू कधी सलाईन घेतलं नाहीस का?" जसं काही स्वतः खूप अनुभवी होता! कैत्तरी!
"ती काय लिमलेटची गोळी आहे का गंमत म्हणून घ्यायला?"
"तसं नाही... पण कधी अशी आजारी नव्हती पडलीस का? टॉन्सिल्स, दातदुखीचं एखादं ऑपरेशन... खूप ताप येऊन अ‍ॅडमिट वगैरे.. "
"नाही. तू मुद्द्याचं बोल ना पण! इथे मी आधीच थंड पडलिये आणि तू काय मुलाखत घेतोयस.."
"इंजेक्शन तर घेतली आहेस ना? थायरॉईड टेस्ट करताना ब्लड घेतात तो अनुभव आहे ना... बास मग. टोचतात तेव्हा दुखतं. मग एकदा बाटली चालू केली की नाही दुखत."

पहिल्यावहिल्या सलाईनसाठी मी थोडी उत्साहात आणि थोडी काळजीत अ‍ॅडमिट झाले. मजा आली! "आठवड्यात २ अशी एकूण ४ आय व्ही इन्फ्यूजन्स देऊ, मग बघू आणि पुढचं ठरवू" असं डॉक.नी सांगितलं. मला तेव्हा खरं तर काहीही गांभीर्य नव्हतं. कुणालाच अंदाजही नाही आला. जानेवारीत ठरलेलं डोहाळजेवण मात्र रद्द करावं लागलं. आईबाबा नुसतेच ४ दिवस भेटायला आले होते त्यांना मग थांबवून घेतलं. ४ सलाईन्स खाऊनही सुधारणा नव्हती. आता मात्र डॉक्टरांच्या कपाळवर काळजीने आठी दिसायला लागली.
"आपण आठवड्यात ३ इन्फ्यूजन्स करू. सकाळी ९ ला नाश्ता करून यायचं इथे. अ‍ॅडमिशन प्रोसिजर करायची. आय व्ही लावून घ्यायचं, आणि संपलं की घरी जायचं. जेवायचं आणि झोपायचं. तुझा जॉब आणि अभ्यास आता बाजूला ठेव. बाळ महत्त्वाचं. समजलं?"
"हो. पूर्ण वेळ झोपून रहायचं?"
"हो. हालचालही मर्यादित असायला हवी. हात हलवतानाही विचार कर, की न हलवून चालेल का... त्या ऐवजी ते जे काही ४-५ ग्लुकोज मोलेक्यूल्स वापरायचे आहेत ते बाळासाठी राखून ठेवता येतील का... अगदीच वाटलं तरच हात हलव. नाहीतर सगळी एनर्जी आता बाळसाठीच ठेव. अगदी पर्सनल केअरसाठी १ तास देतो मी तुला. आंघोळही रोज नाही केलीस तरी चालेल. अ‍ॅड्मिट होताना करून ये, एरवी स्किप करू शकतेस. फक्त जेवायला उठायचं."
"एवढं करायचं?"
"हो. हे पेन बघ... कसं धरलंय मी?"
"उभं."
"हां. आता कसं धरलं?"
"आडवं केलंत."
"बरोबर. तू या पेनसारखी आडवी रहायचं आहेस. तेही डाव्या कुशीवर जास्तीत जास्त जमव. काय? जमेल ना?"
"हो. आता न करून कसं चालेल?"
"शाब्बास! पेशंटने असंच सहकार्य करायचं असतं. नवीन गोळ्यापण देतो. औषध चुकवायचं नाही. काय?!!"
इथवर ठीक होतं. पण काहीतरी राहून जातंय असं गट फीलिंग मला येत होतं. तरी मी तशीच घरी आले. आई होती माझी बरोबर. घरी आल्यावर सगळा इतिवृत्तांत सगळ्यांना सांगितला तिने. (एव्हाना दोन्ही आईबाबा आणि नवरा असा सगळा कोरम फुल होता घरी) काळजीचं सावट काय ते समजायला लागलं. पुढच्या सलाईनला परत गेलो दोघी. माझे बाबाही असायचे. मग नेहमीप्रमाणे तपासणी. (तेव्हा साबा-साबु घरातलं सगळं बघायचे. कामाच्या मदतनीस ताई, नवर्‍याचा डबा... आलं गेलं, फोन वगैरे... खूप व्याप होते.)
"हे बघ, बाळ ७-८-९ व्या महिन्यात वजन धरायला लागतं. तुला लाथा-ठोसे जाणवतात का?
"हो. हालचाल कळते."
"गुड. मग ९ महिने पुरे होताना हे प्रमाण वाढतं. मग बाळच जोरदार हालचाली करतं आणि तुम्हाला लेबर पेन्स येतात."
मला समजावं किंवा काळजी कमी वाटावी म्हणून असेल, पण ते बरंच डायल्यूट करून सांगतायत, पण काहीतरी लपवतायत हे मला समजत होतं.
"पण तुझ्या केसमधे असं काही होईल असं वाटत नाहिये. कारण सुदैवाने बाळाची बौद्धिक वाढ तपासायच्या टेस्ट्स जरी नॉर्मल असल्या तरी बाळाचं वजन अजूनही कमीच आहे. त्यामुळे तेवढी हालचाल ज्यामुळे लेबर पेन्स येतील...ते बाळ करू शकेल असं वाटत नाही. सिझेरिअनची तयारी ठेव."
मॅडमपण असायच्या तपासणीच्या वेळी.
"घाबरू नको, वजन सोडता बाकी सगळं नीट आहे. आणि एकूण ३६ आठवडे लागतात. आत्ता २६ होतायत, जमेल तेवढं पुश करूया... पण तू पॉझिटिव रहा."
हे ऐकून काय वाटू शकतं? ते सगळं मला वाटलं त्या क्षणी. एक मिनिट पिन्ड्रॉप सायलेन्स. नेमके माझे बाबा नव्हते त्यावेळी तिथे. घरी आले होते. साबा-साबुंना अर्जंटली एकांकडे जावं लागलं होतं. नवरा कामाला गेला होता.
"जमेल तेवढं म्हणजे? बाळ नीट आहे ना?" माझा काळजीचा प्रश्न.
"आहे गं... पण अपेक्षेप्रमाणे वजन वाढत नाहिये, जरा सावकाशच वाढतंय."
"आणि आत्ता २६-२७ आठवड्याचं बाळ बाहेर काढून आपण काय करणार आहोत! त्यापेक्षा जमेल तेवढं वजन वाढवू बाळाचं" एकदम नकळत किंवा काय माहिती नाही...पण डॉक्टर हळूच बोलून गेले. ते मी आणि आईने ऐकलेलं त्यांनाही समजलं. पण मला धीर देणं आणि उपचार करणं इतकंच हातात होतं. पण या त्यांच्या वाक्याने मला चांगलाच धक्का बसला होता. मी घरी आले आणि खूप रडले. आईबाबा धीर देत होते. शेवटी मी उद्वेगाने बाबांना म्हटलं, "सांगा तुमच्या विष्णूला, मला हे बाळ सुखरूपच हवंय! काहीही होऊदे, मी कितीही उपचार घेईन पण बाळाला काहीही होऊ देणार नाही!"

एकूण सगळंच गंभीर झालं होतं. संध्याकाळी सगळे घरी असताना विचित्र ताण होता घरात. दुसर्‍या दिवशी नवरा डॉक्टरना भेटून आला. एव्हाना दर आठवड्याला ३ सलाईन्स, वाढीव गोळ्या चालू होत्या. ताई आणि नणंद आयुर्वेदाचार्य त्यामुळे त्यांनी अजून काही औषधं पाठवली होती. (इथे कोणती उपचार पद्धती, आयुर्वेद- अ‍ॅलोपॅथी... विषय मुद्दाम टाळला आहे. कारण जे काही मी पोटात ढकलत होते ते माझ्या गायनॅकना पूर्ण माहिती होतं, मला आणि ते खाऊ घालणार्‍या तज्ज्ञांना त्याची पूर्ण जाणीव होती, आणि त्याची सगळी जबाबदारी स्वीकारून आम्ही ते करत होतो.) एकूण वेगवेगळ्या प्रकारच्या १८ गोळ्या, प्रोटीन्ससाठी १ वाडगा भाजलेले मखाणे, शतावरीच्या मुळ्या ठराविक प्रमाणात पाण्यात शिजवून निम्म्यावर पाणी आटवून तो काढा, त्यात भिजवून साळीच्या १ मूठ लाह्या हे रोज चालू होतं. शतावरीच्या मुळ्या कहर कडू असतात. त्यात त्याचा अर्क असलेला काढा.... रामा शिवा गोविंदा! औदुंबराच्या झाडाच्या खाली मिळणारं, शुद्ध औदुंबरजल एक दिवसाआड पीत होते. ताईने ते कोल्हापुरातून पाठवलं होतं मोठी बाटली भरून. आयुर्वेदानुसार म्हणे, ज्या झाडाच्या मुळांशी पाणी असतं ते गर्भजलासाठी उत्तम असतं. माझं तेच निदान झालं होतं म्हणून तो उपाय चालू होता. पण ते पाणी अगदी साध्या पाण्यासारखं दिसतं; आणि लक्षपूर्वक प्यायलं तरच चवीत फरक आहे हे कळतं. २ प्रकारची तुपं (एक आठवतंय - ज्येष्ठमधादि घृत.) १ चमचाभर खाऊन वर कपभर गरम पाणी प्यायचं. ज्येष्ठमध जरी चघळायला गोड लागत असला तरी हे घृत कारल्याशी तगडी स्पर्धा ठरेल इतकं कडू असतं. तर असं सगळं चालू होतं. शिवाय रोजचं जेवण, नाश्ता होताच. कॉफी पूर्ण बंद होती.

मी ना, एका पॉईंटनंतर एकूणच सतत रडा चेहरा करून बसू शकत नाही. त्यामुळे मग स्वतःचा जीव रमवणं चालू होतं. घरी सगळे होतेच काळजी घ्यायला. मला काय, नुसतं डाव्या कुशीवर पडून रहायचं होतं. मग लॅपटॉप गादीवर ठेवून घ्यायचा कोणाकडून तरी आणि गाणी लावायची, गर्भसंस्कार सीडी ऐकायची... मग स्वत:च त्यातल्या अमिताभची नक्कल करायची असं काहीही चालू असे. अनायसे डाव्या कुशीवर पडून पुस्तक वाचायचं कौशल्य समहाऊ मला आधीच अवगत होतं तेही इथे कामी आलं! (मोस्टली मी ते "झोप गं आता... पुरे झालं वाचन!" या कटकटीतून सुटायला म्हणून स्वतःहून शिकून घेतलं होतं.)
दिवसभर झोपा काढताना मधेच झोपेत कूस बदलली तर बाबा हलकेच उठवून कूस बदलायला लावायचे. रात्री मात्र शांत झोप यायची. नवरा कामावरून आला की गप्पा मारायचे मी.
"बोलताना ग्लुकोज खूप नाही डिकम्पोज होणार. आणि मी बडबडी आहे, मला गप्प बसता येणार नाही. मी बोलले तर चालेल ना?" असा थेट प्रश्न मी डॉक्टरना केला होता. ४ सलाईन्सनंतर आमचं छान ट्यूनिंग जमल्यामुळे ते मस्त गप्पा मारायचे त्यामुळे मी हे असं बिनधास्त बोलू शकत होते.
"पण इतके घरी काळजी घेतात, नवरा चांगलाय, तू पण तशी बरी आहेस.... मग त्रास काय झाला तुला म्हणून ताण आला? कारण अ‍ॅपरंटली काहीच दिसत नाहिये की ज्यामुळे तुझं पाणी कमी होईल.... जास्त विचार करतेस का? कारण तुझ्यासारख्या केसेसमधे न दिसणारा ताण हे मोठं कारण असू शकतं."
"ते काय आहे ना डॉक्टर, मला खूप पाणीपुरी खायची होती पण सासूबाईंनी आणि नवर्‍याने खाऊ नाही दिली म्हणून पाणी कमी झालंय माझं. तुम्ही एकदा सलाईनमधून पाणीपुरी द्या बरं... अस्सं झटाक्कन वजन वाढेल बाळाचं की बास!"
मी अगदी नॉर्मल आवाजात हे सांगितलं तर डॉक्टर बघतच बसले होते!

एव्हाना मी या रूटीनला सरावले होते. सलाईन मात्र डॉक्टर स्वतः येऊन लावायचे. सिस्टरना नाही सांगितलं. १-२ वेळा सिस्टरनी चुकीची व्हेन टोचली. मग बोलणी खाल्ली. मग काही दिवस एक इंटर्न असायची. ती बिचारी अगदी टॉर्निक्वे वगैरे लावून व्हेन शोधायची. मी तिला "ही नाही ती बघा... ती प्रॉमिनंट आहे पण तुम्ही आधी सरांना बोलवा..." असं करून काही करू देत नसे. उगाच काय दुखवून घ्यायचं! आणि मग ते सलाईन आऊट गेलं की पुन्हा "इन" करताना खूप दुखायचं! नसत्या उठाठेवी!

"मी तुझ्या २ प्रॉमिनंट व्हेन्स सिझेरिअनसाठी रिझर्व ठेवल्या आहेत. आणि आता बर्‍याच व्हेन्स पंक्चर झाल्या आहेत. त्यामुळे सिस्टरनी तुला आय व्ही लावण्यात काही अर्थ नाही. मलाच ते केलं पाहिजे."
"हाताच्या संपल्या तर पायातून नाही का देऊन चालत?" माझा खरंच जेन्युइन प्रश्न.
"ते लहान अर्भकांना देतात. तू बालिश असलीस तरी वयाने लहान नाहीस त्यामुळे तुला त्याचा उपयोग नाही. आता प्रश्न पुरे. शांत बसायचं."
"बरं. अजून किती दिवस?"
"ते तुम्हा दोघा मायलेकरांवर अवलंबून आहे. तुझं बाळ वारेतून सुखासुखी खाल्लं-प्यायलं असतं तर त्याने भरपूर शू केली असती पोटात, मग तुझं गर्भजल वाढलं असतं. तुझं बाळ नखरेल आहे. त्याला सलाईनच हवंय. बघ आता किती हवंय ते."
"पण मला सुरूवातीला थोडी सर्दी झाली त्याचं काय! किती थंड असायचं ते पाणी!"
"पाणी नाहिये ते! हाय प्रोटीन अमायनो चालू आहे तुला! पाणी काय म्हणतेस!"
"हो पण ५-६ सलाईननंतर ते पचलं ना मला... सर्दी कमी झाली हे ठीक, नाहीतर सर्दीचं औषधही प्यायला लागलं असतं."
"झालं आता... थोडेच दिवस!"
हे असं चालू होतं.

मी रोज बाळाशी खूप बोलायचे मनातल्या मनात. आणि वाटलं की केव्हाही नवर्‍याला मेसेज करायचे, पण बाळ बोलतंय असं वाटेल असे असायचे मेसेज.
"बाबा, मी आज मस्त गोडाचा शिरा खाल्ला. आजीने केलाय. तुला मिळेल संध्याकाळी. आजी देणार आहे. लवकर ये." किंवा "आई ऐकत नाहिये. मला गाणी ऐकायची आहेत पण ती झोपते आहे. तू आल्यावर गाणी लाव आणि आईला रागव.. आणि येताना मला बाकरवडी किंवा खाऊ आण." असं काहीतरी लिहून पाठवायचे. नवराही मग त्यावर रिप्लाय द्यायचा. आत्ता मला हे लिहिताना हसू येतंय, पण तेव्हा जो करीन तो उपाय बाळाचं आणि माझं मानसिक आरोग्य सुधारणार होता! डॉक्टरी उपायांना प्रचंड सकारात्मकतेची जोड असणं गरजेचं होतं!

एक एक करत आठवडे सरकत होते. मी अ‍ॅडमिट असताना मॅडम जेव्हा इंटर्नल राऊंडला यायच्या तेव्हा कोणतंही मशीन न वापरता केवळ स्पर्शाने आणि अनुभवाच्या जोरावर काही आडाखे बांधायच्या. एकदा मला तपासल्यावर छानसं हसल्या.
"आज तुला अल्ट्रासाऊंडला शेवटी घेते. थोडा उशीर होईल पण मला स्वतः बघूदेत." असं म्हणून त्या गेल्या. त्या दिवशी बाळाने १ किलो वजनाचा टप्पा ओलांडला होता, माझे ३२ आठवडे भरले होते आणि १ किलोच्या माईलस्टोनमुळे थोडासा का होईना, ताण कमी झाला होता! हे सगळं सोनोग्राफीत दिसलं आणि घरी येऊन देवाला साखर ठेवली आम्ही. असेच मग ३५ आठवडे ढकलले. ३६ वा आठवडा आणि तारखेने नववा महिना लागला आणि मग नवव्यात करतात ती सोनोग्राफी करायला मला त्या स्पेशल खोलीत नेलं.
इतके दिवस मी बाकीच्या पेशंट्सना तिथे नेताना नुसती बघायचे. २६-३६ आठवड्यांचा तो संवाद आठवला की मी इतके आठवडे ढकलून, नववा महिना धडपणे लागून त्या खोलीत जाऊ शकेन ही अपेक्षाच ठेवली नव्हती. पण शेवटी तो दिवस उजाडला एकदाचा! मला आनंदही झाला आणि एक्साईटमेंटही होती. आईबाबा होतेच बरोबर.

(मीनव्हाईल, माझ्या नणंदेला एक गोड मुलगी झाली म्हणून सासू-सासरे नाशिकला गेले होते आणि तिथे थोडे दिवस रहाणार होते. आम्ही इथे मॅनेज करू शकत होतो.)

त्या दिवशी सगळं नीट पार पडलं.
"बरं का, इथवर आलीस हे कौतुक गो बायो तुझं! आता थोडी कळ काढ, जोशीकाकू म्हणाल्या नवव्याची सावली पडली तरी पुरते.. तेव्हा घाबरू नको! आता बाळंतपण जरा सोपं जाईल हो बाळे..." आणि माझ्याच आईने मला कुशीत घेतलं. "नवव्याची नुसती सावली जरी पडली" म्हणजे थोडक्यात, तेवढे दिवस भरले तर बरं असा तो अर्थ. अपुर्‍या दिवसांच्या केसेस मधे असं पूर्वी म्हणत त्या बाईला धीर द्यायला.

दुसर्‍या दिवशी माझं सलाईन होतं. नेहमीसारखी अ‍ॅडमिट झाले. नियमित सलाईन सुरू झाल्यापासून माझी आठवड्यात २ वेळा सोनोग्राफी होत असे. या दिवशीपण झाली. नवर्‍याने आधीच साबा-साबुना फोन करून बोलवून घेतलं होतं. आईबाबा माझ्याबरोबर होते. आज खूप उशीर झाला होता. ४ वाजले होते. माझी सोनोग्राफी झाल्यावर मला एरवी घरी पाठवत, आज बाहेरच्या वॉर्डमधे झोपायला सांगितलं आणि गायनॅक सर-मॅडम आणि सोनोग्राफीचे डॉक्टर केबिनमधे बोलायला बसले. आईबाबांना टेन्शन आलं. १० मिनिटांनी त्यांनी मला आणि आईबाबांना आत बोलावलं. मेडिकल भाषेत काय प्रॉब्लेम झालाय तो सांगितला. कुठलेतरी फ्लो रिव्हर्स झाले आहेत, १-२ दिवसांत सिझेरिअन केलं पाहिजे. म्हणजे उद्या किंवा जास्तीत जास्त परवा.
हे अनपेक्षित नसलं तरी काळजीत टाकणारं होतंच. पण तरी आम्ही लगेचच "उद्या करूया!" असं ठरवलं. फक्त, एकदा नवरा, साबा-साबु आले की बोलतो आणि संध्याकाळी सांगतो म्हटलं. ७ वाजता पुन्हा त्यांनी बोलावलं. घर जवळ होतं त्यामुळे शक्य होतं.
मार्च महिना होता, पण त्याच संध्याकाळी काही लक्षणं नसताना दणादण पाऊस आला! सगळे काळजीत पडले! पण माझं पावसाशी काहीतरी गूज होतं. अवेळच्या पावसाने मला कायमच साथ दिली होती. मी म्हटलं त्याला, "आलास का आत्ताही! आता उद्या येऊ नको असा अवेळी! उद्या मला काहीही त्रास होणार नाही ही जबाबदारी तुझी!"

घरी येऊन बॅग भरली. जेवले. जेवण जात नव्हतं. हुंदका येत होता. आईच्या कुशीत शिरले. सगळेच जवळ गोळा झाले.
"इतका धीर धरलास... आता डोळ्यात पाणी नको आणू! आम्ही आहोत सगळे, नीट होईल सगळं." असं म्हणून मला साखर भरवली.

१०-१२ आठवड्यांत मी २६ सलाईन्स पचवली होती, हातावर भरपूर डाग पडले होते टोचल्याचे. दोन्ही आईबाबा पाठीशी होते, नवरा धीर देत होता. साबा-साबुंनी माझं रूटीन सांभाळणं, बाबांचं रोज विष्णूसहस्रनाम म्हणणं, आईचं शिवमहिम्न, माझ्याबरोबर हॉस्पिटलमधे थांबणं, नवर्‍याचं न थकता मला जपत, रात्री-बेरात्री जागून मी नीट झोपले आहे ना हे बघणं आणि नियमित सलाईनसाठी मला हॉस्पिटलमधे सोडणं ... असं सगळं संचित घेऊन मला जायचं होतं.
रात्री अ‍ॅडमिट होताना माझ्याबरोबर आई थांबू शकत होती. आम्हाला हॉस्पिटलमधे सोडून सगळे घरी परतले.
बाळासाठी निओनॅटल वॉर्ड लागेल हे माहिती होतं, ती सोय माझ्या या हॉस्पिटलमधे नव्हती म्हणून पेडिअ‍ॅट्रिशिअन आणि निओअ‍ॅम्ब्युलन्स आधीच सांगून ठेवली होती.
पहाटे उठून मी तयार झाले. देवाचं नाव घेऊन ऑपरेशन थिएटरमधे निघाले. घरून सगळे आले होते. शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळाले.
मला हळूहळू भूल चढली आणि मग फक्त अगम्य संवाद ऐकू येत होते. थोड्याच वेळात बाळाने जोरात रडून जगात एंट्री केली!
"अभिनंदन! मुलगी झाली! अगदी मातृमुखी आहे गं! छान आहे बघ..." म्हणुन ती इवलीशी बाहुली मला दाखवली. मी अर्ध्या शुद्धीत होते पण मान वर करून तो इवलासा जीव बघितला. अवघा १२०० ग्रॅमचा ऐवज होता तो!
"काही काळजी करू नको, जोरात रडून तुझ्या लेकीने तिची लंग्स कपॅसिटी दाखवून दिली आहे! जबरदस्त ठणाणा करून तिने सगळ्या हॉस्पिटलला जाग आणली!" असे शब्द ऐकून मी थोडी निश्चिंत झाले!
"माझं बाळ!" इतकंच मी बोलू शकले आणि मग मात्र पूर्ण गुंगीत गेले!

बाळाला दुसर्‍या हॉस्पिटलमधे शिफ्ट केलं तेव्हा नवरा तिथे गेला.
पालकत्वाचा नवा अध्याय सुरू झाला होता.

(क्रमश:)
(१. ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या/ संवेदनशील/ टर्निंग पॉईंट असतात त्याबाबतीत घडलेले बरेचसे संवाद माझ्या बिनचूक लक्षात रहातात, त्यामुळे वरचे संवाद पूर्ण खरे आहेत. इथे लिहायचं म्हणून कोणताही अधिकचा शब्दही मी घातलेला नाही. मेडिकल टर्म्स मात्र मला फार समजत नाहीत/ लक्षात रहात नाहीत.
२. यथावकाश आम्हाला माझ्या या अवस्थेला नक्की कुठली गोष्ट कारण ठरली हे उमजत गेलं. तसं ते त्याही वेळी समजत नव्हतंच असं नाही, पण काही गोष्टी स्वीकारताना अहं आडवा येतो. तसा तो आला. खोलात शिरण्यात अर्थ नाही. अनुभव वाचल्यावर कदाचित "असं का झालं असेल पण?" असा स्वाभाविक प्रश्न पडू शकतो म्हणून आधीच सांगितलं.
३. माझी लेक जन्माला यायच्या आधी Survival साठी आणि नंतरही काही काळ निरोगी रहाण्यासाठी झगडली आहे. पुढच्या - कदाचित शेवटच्याच भागात तिचा संघर्ष लिहायचं मनात आहे.)

https://www.maayboli.com/node/87579 भाग २ लिंक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अशा अवघड परिस्थितीतून जन्माला आलेली तुझी लेक माझी छोटी मैत्रीण आहे. अतिशय गोड, चुणचुणीत मुलगी आहे. तू आणि तुझ्या घरचे कुठल्या मनःस्थितीतून गेला असाल, ह्याची कल्पना करता येत नाहीत.
तुझ्या लेकीला माझे खूप आशीर्वाद.

खुप मनापासून लिहिले आहेस..
काही गोष्टी कस बघतात आपला, त्यातून तरुन जाण्यासाठी प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात असते....

प्रामाणिक अनुभव लिहिले आहे. असे अनुभव वाचून इतरांनाही अश्या परिस्थितीतून जाताना बळ मिळेल. तुमच्या सहनशीलतेचे कौतुक.
यथावकाश आम्हाला माझ्या या अवस्थेला नक्की कुठली गोष्ट कारण ठरली हे उमजत गेलं. >>> हे कारण पुढील भागात लिहाल हि अपेक्षा. जर टाळता येण्याजोगे असेल तर इतरांना टाळता येईल.
अश्या अवस्थेत मानसिक ताण कमी करण्यासाठी काही औषधे दिली होती का? कि प्रेग्नन्सी सेफ नसतात अशी औषधे?
बाकी अश्या नाजूक अवस्थेत इतर औषधे (आयुर्वेद, इत्यादी) घेणे धोक्याचे ठरू शकत असावे का हा विचार मनात येतो.

हे कारण पुढील भागात लिहाल हि अपेक्षा. जर टाळता येण्याजोगे असेल तर इतरांना टाळता येईल.>> पुढच्या भागातही लिहू शकणार नाही. मलाच ते विचार नकोयत म्हणून. पण इन जनरल, एका व्यक्तीला सर्वतोपरी बिनचूक वाटणारी गोष्ट कुटुंबातील इतरांना पटणारी नसेल तर संवादाने मार्ग न काढता मनात अढी ठेवली की कौटुंबिक गुंता वाढतो आणि मग ताण वाढतो.

बाकी अश्या नाजूक अवस्थेत इतर औषधे (आयुर्वेद, इत्यादी) घेणे धोक्याचे ठरू शकत असावे का हा विचार मनात येतो.>>> पूर्ण विचार करूनच आम्ही हे केलं. अर्थात हा निर्णय वैयक्तिक होता. (तुमचा प्रतिसाद प्रामाणिक आहे हे लक्षात येतंय त्यामुळे मी मुद्दा खोडून काढायचा म्हणून हे लिहिलं नाहिये)

बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत की.
डिटेल लिहिले आहेस ते एक बरं.
सकारात्मक विचार, सगळ्यांचा असलेला सपोर्ट, उत्तम डॉ उपचार सर्व संयोग झाला.
अश्या वेळी माझ्याच वाट्याला का हे, असे विचार येतात सुरवातीला.