"श्रवणसंस्कार" - रेडिओ, नाटक, गाणी, गप्पांच्या आठवणी

Submitted by प्रज्ञा९ on 10 December, 2025 - 05:35

मायबोलीकर अमित ने एक लिंक काल गप्पांच्या धाग्यावर दिली. बघायला सुरूवात केली तर लिंकमधला कार्यक्रम अप्रतिम आहे! मी फार विचार करून अभ्यासाचं ठरवलं होतं ते बाजूला ठेवून मी कार्यक्रमच बघत बसले! माझ्या मनाला आजकाल शिस्तीत विचार करायची सवय राहिली नाहिये, ते सैरावैराच पळतं. त्यामुळे सुरूवात करताना एक विषय धरला तरी संपताना त्याचा अनेक फांद्या फुटलेला वृक्ष होईल हे आधीच सांगून ठेवते! गप्पा मारतेय असं समजा आणि वाचा.

मी लहान असताना रेडिओ खूप ऐकायचे. मध्यम लहरी १६३० वर आमचं रत्नागिरी केंद्र लागायचं. शाळकरी वयात आमच्या सांस्कृतिक विकासाची जबाबदारी घेतलेल्या (कै.) अभ्यंकरबाई आम्हाला बाल(नभो)नाट्य वगैरे बसवून आकाशवाणी केंद्रात न्यायच्या. मग तो कार्यक्रम रेडिओवर कधी लागेल ते समजलं की त्या दिवशी ती वेळ साधून रेडिओजवळ बसायचं. लवकरच बसायचं म्हणजे वेळ नको चुकायला. पण मग तोवर बातम्या, "माझं आवार माझं शिवार", हवामान अंदाज वगैरे ऐकायला लागायचे! आमचा कार्यक्रम संपला की बरेचदा नाट्यसंगीत लागायचं. जातायेता तेही कानावर पडायचं. आई आवर्जून ऐकायची. तिला ही आवड होती. त्यामुळे लहानपणीच मी डॉ. वसंतराव देशपांडे, प्रसाद सावकार, प्रभाकर कारेकर, रामदास कामत, मधुवंती दांडेकर, आशा खाडिलकर, बकुळ पंडित, शरद जांभेकर अशी नावं ऐकली होती आणि कानावर यांची गाणीही पडायची. बालगंधर्व हे अर्थात मुकुटमणी, पण त्यांचं ऐकायला मिळालं नाही रेडिओ वर फारसं. शिवाय "आम्ही आणीबाणीत भरपूर भाषणं ऐकली, नाटकं बघितली..." असं आई खुद्द सांगायची. आणीबाणीची बंधनं आणि बाबा कारावासात होते त्यामुळे भाषणं ऐकण्यामागे, आणीबाणीसंबंधी लोकांना, कुटुंबियांना भेटणं हा मूळ हेतू होता, तोच नाटक बघताना होता. शिवाय आई ज्या शाळेत शिकवायची त्याच आमच्या शाळेचं नाट्यगृह होतं, घरासमोरच. आणि तिथे सगळी नाटकं, व्याख्यानं होत संध्याकाळी शाळा संपल्यावर. शिवाय शालेय कर्मचारी म्हणून पिटात बसायला बरेचदा फुकटात सोय होई. किंवा अगदी १-२ आणे तिकिट लागायचं. असो.

तर, अशी रेडिओमुळे ओळख झाली माझी संगीत नाटक या प्रकाराशी. रत्नागिरीतच रहाणारी, त्याच शाळेत शिकवणारी माझी मावशी आणि नाना (तिचे मिस्टर) यांच्याकडे नाट्यगीतांचा खूप मोठा संग्रह होता. नानांना कुमार गंधर्वही आवडायचे. एकूणच त्यांना गाणं आवडायचं. शास्त्रीयसुद्धा आवडायचं. मग मी कधी त्यांच्याकडे गेले की १-२ कॅसेट्स घेऊन यायचे. पैसे साठवून आईने एक टेप्रेकॉर्डर बाबांना घ्यायला लावला होता. आईला अशा वेगळ्या गोष्टी आवडायच्या. नानांचा तिच्यावर लहान बहिणीसारखा जीव होता. मावसभावाच्या मुंजीत तिने नानांना "मला आहेरात साडी नको, त्याच बजेटमधे असेल तर कॅमेरा घ्याल का?" असं विचारून कॅमेरा घेतला होता. तर सांगत काय होते, टेपरेकॉर्डर. हां! मग अधूनमधून गाणी ऐकली जायला लागली. आमच्या शेजारी एक गृहस्थ रहायचे, दादा म्हणत त्यांना. त्यांचं सड्यावर दुकान होतं. लहान गाव, शिक्षकी पेशा त्यामुळे सगळे एकमेकांना ओळखत. नाना-मावशी दादांच्या दुकानाजवळ रहायचे. कधीतरी दांदांची ठरलेली रिक्षा आली की आम्हाला मावशीकडे जायचा चान्स मिळायचा. मग आधीच्या कॅसेट्स देऊन मी नव्या कॅसेट्स आणायचे. दादा पट्टीचे गाणं ऐकणारे! रिक्षात बसून "बघूं कांय तें!" म्हणून कॅसेट्स बघायचे. "छान छान!" म्हणून हसायचे. तोंडात पान असायचं कायम. उरलेली श्रवणदीक्षा दादांकडून मिळाली.

दादा ब्रह्मचारी होते. आमच्यासारखेच वाड्यातले भाडेकरू. एका खोलीत चहा-साखरेपुरता संसार. दुकान संपलं की ठरलेल्या घरी जेवून खोलीवर आले की रेडिओ चालू. ते ठरलेलं घरही त्यांच्या दुकान पार्टनरचं होतं. बाकी त्यांच्या त्या खोलीला आईने "ब्रह्मकुटी" नाव ठेवलं होतं. म्हणजे त्यांच्या माघारी. अर्थात ते दिलखुलास होते, समोरून म्हटलं असतं तरी भरपूर हसून दाद दिली असती. तर गमतीची आठवण अशी, की ती ब्रह्मकुटी होती आमच्या वाड्याच्या कॉमन संडासच्या विरुद्ध बाजूला. कधीकधी आम्हा मुलींच्या मागे "सोबत" म्हणून रात्री आईला यावं लागलं की ती दादांच्या कुटीच्या बाहेर ओसरीवर बसायची. दादा ९ नंतर आले की रेडिओ लावायचे. मग १०-१५ मिनिटं नेमकी नाट्यगीतं लागायची. मग दादा काय काय किस्से सांगायचे. त्यांनी बरीच नाटकं मूळ संचात बघितली होती आणि किस्से सांगायची हातोटी जबरदस्त! "दादांचं काय ऐकत्येस! नकलाच जास्त करतात" म्हणून आईपण खुदुखुदु हसत दाद द्यायची. पण दादांच्या गप्पा भारी असायच्या! "अगो तुला सांगतो सीते, अस्सा वन्स मोअर घेfunction at() { [native code] }अलायन रामदास कामताने.... आधी आवाज लागत नव्हता, पण मग इंटरवल झाला नि बहुतेक तीर्थ मिळालं असेल... जो काय आवाज तापला होता म्हणून सांगू! भयंकर गायला तो!" असं आईला सांगायचे. आईला "सीता" म्हणायचे वाड्यात कारण बाबांचं नाव श्रीराम (तसंही आईचं वैदेही होतंच). आणि "भयंकर" हे बंगाल्यांच्या "भीषोण भालो" सारखं "भयंकर सुंदर" या अर्थी असायचं.

हे असं गमतीगमतीत नाट्यसंगीत मनात झिरपत गेलं. नानांकडच्या कॅसेट्सनी त्याला खतपाणी मिळालं. नांदीदर्शन - २० प्रसिद्ध नांद्या, नांदीऑर्गन - सगळ्या नांद्या नुसत्या ऑर्गनवर - असं ऐकलं गेलं. त्यावेळी आजच्याइतकं "इन्स्ट्रुमेंटल" चं कौतुक नव्हतं. त्यामुळे नांदीऑर्गन जास्त अप्रूपाचं होतं. शिवाय गोविंदराव पटवर्धनांची पेटीवरची नाट्यगीतं, कुमारांची नाट्यपदं हे त्याकाळच्या हिशोबाने चैनीच्या बाबींत गणलं जाणारं संगीत कॅसेट्समुळे ऐकायला मिळालं. अर्थात कुमार गंधर्व आवडायला कित्येक वर्षं लागली. का ते नाही सांगता येणार. ते गायकीतलं वेगळेपण पचनी पडायला वेळ लागला. पण अजित कडकडेंची नॉनस्टॉप नाट्यगीतं, वर उल्लेख केलेल्या गायकांच्या रेकॉर्डस असा बराच ऐकायचा प्रवास नकळत घडला हे मोठेपणी जाणवत गेलं. मागे जेव्हा मी यमन रागाबद्दल लिहिलं तेव्हा माझ्या दोन मैत्रिणींचा उल्लेख केला होता. त्या गाणं शिकत होत्या. त्यांच्याशी माझी मैत्री अपेक्षेपेक्षा लवकर झाली त्याला बहुधा मी नाट्यसंगीत ऐकलेलं असणं हे क्वालिफिकेशन कामी आलं असावं. शिवाय त्यापण कोकणातल्याच. कोकणी माणसाला संगीत नाटकाचं जरा जास्त वेड असावं बहुतेक. उत्सवात नाटक कंपनी असतात. स्थानिक असल्या तरी मेहनत घेऊन नाटक बसवतात. आता प्रसिद्ध झालेले दशावतार, शिमग्याचे खेळे, माघी गणेशजयंतीसारखे घरगुती उत्सव असतात त्यात रोजचं कीर्तन आणि मग काल्याचं कीर्तन वगैरे काही ना काही संगीत सेवा ही परंपरा म्हणून केली जातेच. जुन्या काळी कधी कुठे शतचंडी अनुष्ठान वगैरे झालं तरी श्रमपरिहाराला गावजेवण (त्यात कोकणातली प्रसिद्ध गरम मसाल्याची आमटी-भात म्हणजे ढकूभात) आणि मग हौशी लोकांचा गाण्याचा कार्यक्रम असायचा असं जुनीजाणती लोकं सांगत असत.

मी जरी इतकी जुनीजाणती नसले तरी जेव्हा नाटकातलं काम हा निव्वळ हौसेचा मामला होता तेव्हा घरकाम आणि हौसेचा संगीत क्लास करणारी एखादी माहितीतली काकू-वहिनी नाटक असेल तर संध्याकाळी भरजरी कपडे नेसून "नरवर कृष्णासमान" म्हणताना मीही बघितली आहे. तेव्हा ती संपूर्ण रुक्मिणीच असायची. तिचं कौतुकही व्हायचं. उत्सवात भजनानंतर एखादं नाट्यपद म्हणायचा आग्रह होत असे. मग उत्सवाचं पावित्र्य सांभाळायला "राधाधर..." किंवा "मुरलीधर शाम.." वगैरे म्हटलं जायचं.

"कट्यार .." ने मात्र अनेकांची "टेस्ट" घडवली/ बदलली असावी. नुसतं एक पद आळवत न बसता वेगळ्या धाटणीतलं काहीतरी अद्भुत ऐकायला मिळालं असं दादा म्हणायचे. "वसंतराव अशा सणसणीत ताना घेत.... बास्स!" असं म्हणत. आणि अजून वेगळं म्हणजे रेडिओवरून प्रसारित होणारी स्वा. सावरकरांची गीतं. ती पेलणं हे गाणारा आणि ऐकणारा दोघांना दमवणारं असे. "शतजन्म शोधिताना शत आर्ती व्यर्थ झाल्या शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या" हे सोपं असेलच कसं?! पण आमच्या सुदैवाने, रत्नागिरीतले काही गुणी लोक कार्यक्रमाचं निवेदन करताना जमेल तसं ते सोपं करून सांगत. त्याबाबतीत रेडीओवाल्यांचे आम्ही कायम ऋणी आहोत. तिथे मुख्य केंद्रसंचालक, निवेदक हे बरेचसे माहितीचे झाले होते. शाळेचे कार्यक्रम असायचे त्यामुळे ओळखी होत्या. "फीडबॅक" हा शब्द न वापरता थेट आणि उत्तम संवाद असायचा. माहितीची, मतांची खुलेपणाने देवाणघेवाण असायची. त्यामुळे रेडिओ कधी परका न वाटता आपलाच वाटत राहिला. अनेक उत्तम निवेदक हे अभ्यासू असत आणि नुसतंच कोरडं निवेदन न करता "संवादक" म्हणून महत्त्वाचं काम करत असत. एरवी नीरस वाटणारी बातमीसुद्धा त्यांच्या आवाजात ऐकली तर लक्ष जास्त दिलं जायचं.

रेडिओने मला भरपूर जुनी हिंदी गाणीही ऐकायला शिकवली. सकाळी ८:४० ते ९:१० जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा 'चित्रबेला' हा कार्यक्रम असायचा. मग, पाडवा ते रामनवमी, चित्रबेला संपल्यावर विशेष सभा (म्हणजे वाढीव वेळ) ठेवून ९:१० ते १० असा गीतरामायणाचा कार्यक्रम असायचा. माझे एक कीर्तनकार मामाआजोबा महिन्या-दोन महिन्यातून एकदा रेडिओवरच्या कीर्तनासाठी यायचे. त्यांच्या ओळखीतून मग कोर्‍या कॅसेट्सवर गीतरामायणाचं पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला मिळालं होतं. मग मी त्या कॅसेट्स घरी लावायचे. काम करताना गाणी किंवा चांगल्या मुलाखती ऐकायची सवय तेव्हाच लागली मला. आजही मी बरेचदा तसं करते. चांगलं ऐकायला मिळणं ही खूप मोठी श्रीमंती आहे हे आता पूर्ण पटलंय! कदाचित "ऐकायच्या" सवयीमुळे असेल, पण माझ्या शाळेत/ कॉलेजात किंवा अगदी घरातही घडून गेलेल्या पण लक्षात राहिलेल्या बर्‍याच प्रसंगांमधे मला त्या वेळी मी काय ऐकलं, ते कोणी कसं सांगितलं होतं हे खूप आठवतं. वर दादांच्या १-२ आठवणी सांगितल्या त्याही तश्शाच घडलेल्या मला आत्ताही आठवतायत!

पुलंनी त्यांच्या "वंगचित्रे" मधे "पाठांतर ही रोकड मालमत्ता आहे" असं म्हटलं होतं. ते आणि त्यांचे बंगाली स्नेही सलील-दा एकदा भल्या पहाटे खजुराची नीरा प्यायच्या निमित्ताने फेरफटका मारत असतात आणि सलीलदांना शेकडो कविता पाठ असतात ते त्यावेळी म्हणत असतात अशी ती आठवण आहे. तिथे हा उल्लेख आहे. या न्यायाने, पाठांतर ही रोकड "श्रवण" या बँकेतून मिळते असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी नसलेली अनेक साधनं आता आपल्या हाताशी आहेत. किंबहुना आता कंटेंटचा काही वेळा अ ति रेक होतो. पण तरी, मोजकं चांगलं ऐकलं तर काही ना काही "मिळतंच" हे नक्की!

पुढच्या पिढीला मी काय देऊ शकते हा विचार माझ्या मनात कधीतरी नुसताच येऊन जातो. काही महिन्यांपूर्वी मला त्याचं उत्तर सापडलं. वाचनाचा आणि ऐकण्याचा वारसा मी देऊ शकते हे मला समजलं. आम्ही बहिणी एकमेकींना पेपरातल्या सदरांचे फोटो, आपल्याला आणि मुलांना ऐकायला आवडतील अशी चांगल्या पुस्तकांची अभिवाचनं, उत्तम पद्धतीने म्हटलेलं एखादं स्तोत्र, गाण्याशी संबंधित काही ना काही असं फॉर्वर्ड करतो. पूर्वी जेव्हा लेखनकला नव्हती, छपाई नव्हती तेव्हा लोक "ऐकत" आणि असं खूप काही "ऐकलेला" म्हणजे "बहुश्रुत" मानला जात असे. ज्ञानी वेगळा, बहुश्रुत वेगळा. पण बहुश्रुत असायलाही तुम्ही तितके सजग असणं गरजेचं आहेच ना! आणि या ऐकलेल्या गोष्टींच्या आठवणी खूप खास असतात.
पहाटे आमच्या शेजारच्या कलावती आईंच्या ध्यानमंदिराजवळ रहाणारे शेजारी स्पीकरवर तरीही हलक्या आवाजात मनाचे श्लोक लावत असत. कुठलीही साथसंगत नसलेले ते मनाचे श्लोक त्या अंधार्‍या वेळी जागल्याचं काम करत. अर्थ कळत नसूनही मेंदूचा ताबा घेत. एकाच श्लोकात गणाधीश अर्थात गणपती, विद्येची देवी शारदा आणि साक्षात राम यांचं स्मरण आपण करू शकतो, नकळत करतोय, हे तेव्हा नाही समजलं, आता समजतं याचं सगळं श्रेय ते "ऐकलं गेलं" यालाच आहे!

आजही, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मी लेकीला शाळेत पाठवते, मी कॉलेजात ध्वजवंदनाला येते तेव्हा माझं शाळकरी वय मला आठवतं. लेकीच्या नादाने मला २ वेण्या घातलेली, इस्त्रीचा युनिफॉर्म घालून निघालेली मी आठवते. रेडिओवर "जयोस्तुते.." ची सुरूवातीची ललकारी लागल्याचा भास होतो. निरागस वय तर केव्हाच निघून गेलंय, पण तरी, पुन्हा एकदा तो भाबडा क्षण जगल्याचा एक निर्मळ आनंद मला मिळतो त्यामागे हे "श्रवणसंस्कार"च आहेत. मनाच्या खोल कप्प्यात असलेल्या आठवणी जाग्या करून मला हव्या त्या जगाची सैर करून आणायची ताकद फक्त "ऐकण्यात"च आहे!

रेडिओचं प्रकाशचित्र - लंपन यांनी प्रतिसादात दिलेलं आहे तेच वापरलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रज्ञा लेख प्रचंड रोचक दिसतोय. आज संध्याकाळी वाचेन. आत्ता ऑफिसची गडबड आहे. ही फक्त पोच.

छान लिहिले आहे. “ऐकणे” is precious. पटले.

खूप काही "ऐकलेला" म्हणजे "बहुश्रुत" मानला जात असे. … हे नव्याने समजले, आवडले.

अनिंद्य, बंगालचा आणि वंगचित्रांचा संदर्भ देताना तुमची आठवण झाली.

सगळ्यांचे मनापासून आभार.

प्रज्ञा, लेख मस्तच.
अगदी समोर बसून तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकतोय असे वाटले.

प्रज्ञा लेख आवडला.
मी फारसं नाट्य किंवा शास्त्रीय संगीत ऐकलेलं नाही. तरीही खात्रीने सांगते की त्यावेळी इतर शहरांच्या मानाने छोटुकलं असलेल्या रत्नागिरीतलं वातावरण प्रचंड संगीतपोषक होतं.

खूप सुंदर लिहिलय. अनेकांच्या आठवणी जागवल्या तुम्ही.... मी देखील हा संपूर्ण प्रवास अनुभवलेला आहे.....माझ्या श्रवणभक्तीची सुरुवात तुम्ही उल्लेख केलेल्या दिग्गजांच्या कॅसेट्स मधूनच झाली. उत्तम गतकाल विव्हलता रंजन

किती सुंदर आणि भरभरुन लिहीलय. खूपच हृद्य आठवणी. बालपण सांस्कृतिक श्रीमंतीत गेलय तुमचं. कोकणात इतके मस्त मस्त कार्यक्रम होतात - हे माहीत नव्हते.

खूप छान लेख. रेडिओ खूप ऐकला आहे लहानपणी आणि कॉलेजात असताना पण. पुणे केंद्र पण खूप छान होते. सकाळी शाळेला जाताना रेडिओ चालू असायचा. बातम्या सुरू झालेल्या असायच्या, आई खोबरेल तेल डोक्याला थापायची आणि त्याच तेलकट हाताने दोन्हीं गाल घट्ट पकडून भांग पाडत बसायची Happy अशा सुरुवातीच्या आठवणी. नरकासुर वध हे कीर्तन तर दिवाळीचा नरकचतुर्दशीच्या पहाटेचा अविभाज्य भाग. आजही तो आवाज स्पष्ट आठवतो. पुणे केंद्रावर रविवारी दुपारी श्रुतिका पण असत. कथा वाचन असे. लंपन पूर्ण सिरीज आली होती पुणे रेडिओ वर.
फारसा डामडौल प्रसिद्धी नसलेले छोटेखानी कार्यक्रम दीर्घ ठसा उमटवून जातात. अशा ठिकाणी झालेला कार्यक्रम तर आठवतोच पण तिथल्या काकू मावशी काका आजोबा मित्र सुगंध दिवे लायटिंग वाद्ये असे सारे सारे लक्षात राहते. हे सगळे अनुभवायला मिळाले ऐकायला पहायला मिळाले हे भाग्यच.
हा आमचा जुना रेडिओ, वाड्यात फोटो टाकला होता एकदा. ह्या लेखाला संयुक्तिक वाटला म्हणून टाकत आहे
IMG20231130213338~3.jpg

लंपन, मस्त आठवणी. दिवाळीचं कीर्तन आम्हीपण ऐकायचो.
आई खोबरेल तेल डोक्याला थापायची आणि त्याच तेलकट हाताने दोन्हीं गाल घट्ट पकडून भांग पाडत बसायची>>> किती गोड आठवण..

फोटो तर एकदम भारी. हेडरमधे टाकू का?

फार भारी लिहिलंय.
भरपूर सकस ऐकायला मिळालं आहे की.
आमच्याकडे सांगली केंद्र लागत असे.
वेळ सांगायचे, आपली आवड, बरीचशी गाणी, बातम्या, कादंबरी अभिवाचन ( त्यातलं झाडाझडती हे प्रामुख्याने असायचं ) हे आठवतंय.

फार सुंदर लेख. लंपन यांच्याही आठवणी छान.
मला माझ्या आईमुळे रेडियो ऐकायची सवय लागली आई सकाळी चपात्या करताना रेडिओ लावायची. पुढे रेडियो बिघडला टेप आला त्यावर मीच जास्त एफ एम ऐकला ,जेव्हा जेव्हा परीक्षेसाठी केबल काढली जायची ,रेडियो विरंगुळा असायचा.अजूनही कधी कधी प्रवासात नेट वापरण्यापेक्षा एफ एम ऐकते. आतातर वडिलांना गिफ्ट म्हणून घेतलेल्या रेडिओ कारवा मध्ये रेडिओ मीच जास्त ऐकते. पप्पा रेडियो नशा ऐकतात Proud रेडियो मिरची की नशा यावरून चॅनल चेंज ची भांडणं पण रोजचीच आहेत. खरंतर रेडियो आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
जुन्या टेप चा फोटो आहे सापडला तर डकवेन.