पुण्यात स्त्रिया पोहू लागल्या त्याची गोष्ट

Submitted by चिनूक्स on 4 December, 2025 - 13:51

१९३७ सालची गोष्ट. जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू झाली आणि पुण्यातल्या मुळा - मुठा नद्यांना पूर आला. लकडीपूल आणि संगम पूल यांचे स्तंभ पाण्यात बुडले. पूर बघायला स्त्रीपुरुष बाहेर पडले. २५ जुलैला लकडीपुलावर विशेष झुंबड उडाली. सकाळी आठ वाजल्यापासून शेकडो स्त्रीपुरुष पुलावर आणि जवळ उभे होते. घड्याळात दहा वाजले आणि पन्नासेक मुलांनी - पुरुषांनी एका मागोमाग पाण्यात उड्या टाकल्या. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कुमार किशा गाडगीळ आणि हरी दीक्षित या अनुक्रमे अकरा आणि बारा वर्षांच्या मुलांसाठी विशेष टाळ्या पडल्या. तेवढ्यात एक मुलगी गर्दीतून वाट काढत आली आणि तिनं पुलावरून उडी मारली. त्या दिवशी अनेकजण या क्षणाची वाट बघत होते. ती मुलगी सपसप पोहत पाण्याच्या खळाळत्या प्रवाहाबरोबर पुढे जात होती. काठावर उभं राहून लोक तिला उत्तेजन देत होते. सफाईदारपणे पोहत ती ओंकारेश्वराला काठाशी लागली.

त्या मुलीचं नाव होतं सुमती धारप. पुण्यात पुरात उडी टाकून पोहणारी ही पहिली मुलगी होती. त्यावेळी तिचं वय होतं चौदा वर्षं. लकडीपुलावरून तिनं ’निर्भयतेनें व आत्मविश्वासानें’ मुठा नदीच्या पुरात उडी टाकली आणि तिथून ’ऐटींत’ पोहत ती ओंकारेश्वरापर्यंत आली, असं ’ज्ञानप्रकाश’ या मराठी वर्तमानपत्रानं २९ जुलै, १९३७च्या अंकात लिहिलं.

नद्यांना पूर आला की त्या प्रवाहात उड्या टाकून शौर्य दाखवण्याची अनेकांना हुक्की येई. पुरात पोहू नये, असं पोलिसांनी वारंवार बजावूनही लकडीपुलावरून नदीत उडी मारून ओंकारेश्वराजवळ काठाला लागण्याचा खेळ दरवर्षी होई. जास्त पोहायला मिळावं म्हणून काही दमदार मंडळी मढेघाटावरूनही सुटत असत. पाण्याचा ओढा खूप असल्यामुळे उड्या टाकलेले तरुण झपाट्यानं ओंकारेश्वरापर्यंत जाऊन पोहोचत. या पोहण्याच्या चढाओढीत कित्येक तरुण विशेष कुशलतेनं पाण्यातले भोवरे टाळून इष्ट स्थळी जात. ओंकारेश्वराच्या देवालयानजीक पाणी बरंच संथ असल्यामुळे तिथे नवशिकी मंडळीही पाण्यात पोहायचं धाडस करीत. पोहण्यात तरबेज असलेले मात्र लकडीपुलावरून उड्या मारत. यांमध्ये कॉलेजांतले विद्यार्थी आणि तालमींतले पहेलवान यांचा भरणा अधिक असे. पुरात बुडून मरण पावलेल्यांची नावं वर्तमानपत्रांत छापून येत. सुमती धारपनं उडी मारली त्याच्या दोनच दिवस आधी माधव अनंत करमरकर हा अठरा वर्षांचा तरुण पोहताना वाहून गेला होता.

पुरात उड्या टाकणारे अनेक तरुण कॅ. शिवरामपंत दामले यांनी सुरू केलेल्या ’महाराष्ट्र मंडळा’त पोहायला शिकले होते. मंडळाच्या आवारात मोठी विहीर होती. तिला बंगल्याची विहीर म्हणत. या विहिरीवर पोहण्याचे वर्ग भरत. विद्यार्थ्यांना गढूळ पाण्याची भीती वाटू नये आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी पुरात उड्या मारण्याचा उपक्रम १९२६ सालापासून दरवर्षी आयोजित केला जाई. श्री. व्ही. के. भिडे आणि दामले या चमूचं नेतृत्व करत. पण लोकांसमोर पोहणारे, नद्यांमध्ये उड्या मारणारे सर्व पुरुष होते. सुमतीनं पुरात उडी टाकेपर्यंत पुण्यात एकाही तरुणीनं तसं धाडस दाखवलं नव्हतं.

भारतीयांना उत्तम पोहता येत नाही, त्यांना पाण्याची भीती वाटते, असा ब्रिटिशांचा समज होता आणि तो खराही होता. गरज असेल तरच ते पाण्यात उतरत. ग्रीक आणि रोमन साम्राज्यातल्या किंवा आफ्रिकेतल्या लोकांप्रमाणे मजेसाठी ते पोहत नसत आणि लहानपणी आपल्या मुलांना पोहायला शिकवतही नसत. पाणी पवित्र आहे, पंचमहाभूतांपैकी एक आहे, त्याची उपासना केली पाहिजे, त्याला घाबरून राहिलं पाहिजे, या भावना दृढ होत्या.

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय वांङ्मयात पोहण्यापेक्षा बुडण्याचे किंवा बुडताना नदीतून किंवा तलावासमुद्रातून बाहेर आलेल्या देवतेनं वाचवण्याच्याच कथा अधिक आहेत. मोहेंजोदडोत एक सार्वजनिक तलाव होता. ऋग्वेदात स्नानाचे उल्लेख आहेत, मात्र पोहण्याचे नाहीत. खोल पाण्यात बुडणार्‍यांना वाचवायला इंद्राला यावं लागतं. काही जैनसूत्रांमध्ये आणि ’मनुस्मृती’त पोहण्याचे उल्लेख आहेत. संगमकाव्यांमध्ये मौजेसाठी पुरुष जलक्रीडा करतात. तिसर्‍या शतकात लिहिल्या गेलेल्या ’ललितविस्तारा’त तलवारबाजी, नेमबाजी, कुस्ती आहेत, पण जलतरण नाही. जातककथांमध्येही स्त्रीपुरुष पोहत नाहीत. चौदाव्या शतकात भारतात आलेल्या इब्न बतुत्यानं पोहता येणार्‍या गुलाम स्त्रियांचा उल्लेख केला आहे, पण तो गंगेत जीव देणार्‍या पुरुषांबद्दलही लिहितो. मुघल भारतात आले ते त्यांची पाण्याबद्दल वाटणारी भीती बरोबर घेऊनच. ’अकबरनाम्या’त अकबर रावी नदीत बुडणार्‍या आपल्या दोन सेवकांकडे हताशपणे बघतो. काठावर अनेक सैनिक आणि गावकरी उभे आहेत, पण तेही त्या दोघांना वाचवू शकत नाहीत.

इजिप्त, रोम, ग्रीस इथल्या पुढारलेल्या संस्कृती जलतरणाला महत्त्व देणार्‍या होत्या. त्यांच्या लेखी पोहता येणं हे सुसंस्कृतपणाचं, श्रीमंतीचं, उच्च शारीरिक क्षमतेचं लक्षण होतं. या संस्कृतींमध्ये जलतरणाला मिळणार्‍या महत्त्वाला भुलून एरवी पाण्यापासून दूर राहणारे युरोपीय पाण्यात उतरले. पण त्यांच्या वसाहतींमध्ये पूर्वापार राहणार्‍यांना, पोहता येणार्‍यांना ते आपल्यापेक्षा कमी दर्जाचे समजत राहिले. समुद्रात बुडी मारून मोत्यें गोळा करणारे, खलाशी, किंवा आनंदासाठी नौकाविहार करणारे, पोहणारे त्यांच्या दृष्टीनं गुलाम व्हायच्याच लायकीचे होते. पोहून अंग भिजवणं, हे असंस्कृत होतं.

पुढे अठराव्या शतकाच्या अखेरीस पोहण्याच्या खेळाला इंग्लंडमध्ये मान्यता मिळाली. पोहण्यासाठी खास तलाव बांधले गेले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात शाळांमध्येही जलतरण तलाव बांधायला सुरुवात झाली होती. भारतात सुरुवातीला ब्रिटिशांनी बांधलेले पोहण्याचे तलाव फक्त सैनिकांसाठी होते. त्यांना ’स्वीमिंग बाथ’ म्हणत. पुण्यातला पहिला स्वीमिंग बाथ १८६८ साली छावणीत बांधण्यात आला. दोनच वर्षांत तो अपुरा पडू लागल्यानं दुसरा तलाव बांधला गेला. ११ जुलै, १८७० रोजी ’नेटिव्ह ओपिनियन’नं लिहिलं होतं - ’पुणे एथें पोहण्या करितां नवीन जागा तयार करण्याचा विचार आहें. आमच्या लोकांत आणि त्यातंतूनहि मुख्यत्वेकरून वरिष्ठ प्रतीच्या लोकांत पोहण्याचा तर अभावच होऊन गेला आहे; कर्मणूक ह्मटली ह्मणजे नाच, बैठका व नाटकें ह्मणजे सीमा झालीं.’ कलकत्ता, मुंबई, मद्रास, पुणे असा शहरांमध्ये काही क्लबांनी पोहण्याचे तलाव बांधले होते. विसाव्या शतकापर्यंत तिथे सहसा स्त्रियांना पोहण्याची परवानगी नव्हती. जिथे परवानगी होती, तिथे स्त्रियांसाठी वेगळी वेळ राखून ठेवलेली असे. युरोपीय, पारशी, अँग्लो-इंडियन समाजांतल्या स्त्रिया सहसा पोहत. पण या स्त्रियांनाही कैकदा ’आधुनिक’, ’पुरुषी’ अशी विशेषणं लावली जात.

ब्रिटिशांनी भारतात पाय रोवल्यावर पश्चिमात्त्य शिक्षणाचं वारं भारतात वाहू लागलं. ब्रिटिश आमदनीत शिक्षण म्हणजे लिहिणं, वाचणं, आणि हिशोब करणं एवढाच होऊ लागला असून त्यामुळेच भारतातला सुशिक्षित वर्ग शारीरिक - बौद्धिकदृष्ट्या अतिशय दुबळा झाला आहे; या दौर्बल्यामुळे पारतंत्र्यातून बाहेर पडणं कठीण झालं आहे, असा सूर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून जोरकस झाला. आळस, वक्तशीर नसणं यांचाही संबंध दौर्बल्याशी जोडला गेला. या दौर्बल्यावर बहुतेकांच्या मते अक्सीर इलाज एकच होता - शारीरिक शिक्षण. नव्या राष्ट्रउभारणीसाठी पुरुषांची शारीरिक क्षमता वाढवणं समाजधुरिणांना आवश्यक वाटत होतं. बलवर्धनामुळे परकीय धर्म आणि सत्ता यांचं जोखड भारतीय झुगारू शकणार होते.

१८८५ साली महाराज सयाजीरावांनी बडोदे संस्थानात शारीरिक शिक्षण सक्तीचं केलं. महाराष्ट्रातही याचं अनुकरण व्हावं, अशी अपेक्षा साहजिकच निर्माण झाली. महाराष्ट्रातले सुशिक्षित तरुण अल्पायुषी का ठरतात, हा प्रश्न लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे रानडे, डॉ. भांडारकर इत्यादींनी विचारला होता. न्यू इंग्लिश स्कूलच्या संचालकांनी हा प्रश्न उचलून धरला होता. शाळांमधून सक्तीच्या शारीरिक शिक्षणाची मागणी त्यांनी केली. पुढे प्लेगची साथ आली, जोडीला दुष्काळ होता आणि शारीरिक शिक्षणाचा प्रश्न मागे पडला. पण भारतीय स्त्रिया व पुरुष यांचा दुबळेपणा घालवण्यासाठी व्यायामशाळांच्या उभारणीची निकड ’केसरी’, ’सुधारक’, ’काळ’, ’केरळकोकीळ’ इत्यादी नियतकालिकांमधून वारंवार व्यक्त होत राहिली. हल्लीची पिढी कमकुवत झाली असून ताबडतोब उपाययोजना केली नाही तर राष्ट्राचं वैभव असलेल्या या पिढीचा लवकर नाश होईल, ही भाषा शारीरिक शिक्षण सक्तीचं करण्याच्या बाजूचे सगळेच वापरत होते. निरनिराळ्या शहरांमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झालेले जिमखाने सुशिक्षितांमधल्या या ’स्वकर्मजागृती’चे प्रतीक होते.

एकीकडे मुलांमध्ये ’मर्दानी’ खेळांबद्दल आवड निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना मुलींना वीणकाम, शिवणकाम, पाकशास्त्र असं ’स्त्रियोपयोगी’ शिक्षण देण्यात यावं, अशी भावना होती. मुलींना आणि मुलांना एकाच पद्धतीचं शिक्षण द्यावं, असं आगरकर म्हणत होते. त्यांच्या विरोधात अर्थातच समाज उभा होता. मात्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्त्रियांना शिक्षण द्यावं अगर न द्यावं, असा प्रश्न न उरता शिक्षण कोणतं आणि कसं द्यावं, याबद्दल मतभेद दिसू लागला. शिक्षणामुळे स्त्रिया घरकाम विसरल्या असून त्या दुर्बळ झाल्या आहेत, असं केवळ सनातनी पुरुषच म्हणत नव्हे, तर समाजात सुधारक म्हणवणारे स्त्रीपुरुषही म्हणत होते. मुलींना मुलांबरोबर शिक्षण द्यावं की स्वतंत्रपणे शिकवावं यावर दोन पक्ष असले, तरी स्त्रियांच्या शिक्षणाचं मुख्य ध्येय त्या सुगृहिणी व सुमाता व्हाव्या, हे आहे, यांबद्दल बहुतेकांचं एकमत होतं. युजेनिक्स्‌ अर्थात सुप्रजाजननशास्त्र महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांमध्ये प्रिय झालं होतं. भावी पिढी उत्तम निपजावी यासाठी स्त्रिया शिकायला हव्यात, हे त्यांना पटलं होतं. म्हणून स्त्रियांना शिकवताना त्यांचा शारीरिक, नैतिक, आणि बौद्धिक या तीन बाजूंनी विकास होण्याजोगे विषय, म्हणजे गृहव्यवस्था, शिशुसंगोपन, पाकशास्त्र, त्यांना शिकवावेत, असं त्याचं म्हणणं होतं.

१९३१ साली जुलै महिन्यात पं. मदनमोहन मालवीय पुण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्रीय मंडळातर्फे कन्याशाळेत त्यांचं स्त्रियांसाठी जाहीर व्याख्यान झालं. आपल्या भाषणात ते म्हणाले की, ’पुरुषांना जितकी व्यायामाची आवश्यकता आहे, त्याहून, किंबहुना जास्तच आवश्यकता स्त्रियांना आहे; पूर्वी आपल्याकडे बायका तुळशीला फेर्‍या किंवा नमस्कार घालीत असत, परंतु देशकामाप्रमाणे आता बायकांना जंबीया, पोहणे, लकडी वगैरे गोष्टी जरूर यायला हव्यात. पौराणिक काळीं कुंती, द्रौपदी वगैरेसारख्या वीरमाता होत्या म्हणूनच त्यांना वीरपुत्र झाले; दिवसेंदिवस स्त्रिया फार अशक्त होऊं लागल्या आहेत. माता मुलांना अंगावर पांजूं शकत नाहींत ही फार खेदाची गोष्ट आहे’.

१९३८ साली हिंदुधर्म भगिनी मंडळानं सांगलीत स्त्रियांसाठी मोफत शारीरिक शिक्षण-वर्ग आयोजिला होता. त्याच्या समारोपावेळी केलेल्या भाषणात क्षात्रजगद्गुरूंनी स्त्रियांच्या व्यायामाचा संबंध त्यांच्या उत्तम माता असण्याशी जोडला होता. स्त्रियांचं गृहशिक्षण, शिशुसंगोपन यांचा प्रचार आणि प्रसार करणारे केवळ पुरुषच नव्हते. यमुनाबाई हिर्लेकर, यशोदाबाई भट, मनुताई बापट अश्या सामाजिक कार्यकर्त्याही स्त्रीशिक्षणाचा, शारीरिक शिक्षणाचा उपयोग उत्तम माता होण्यासाठी आहे, हे सांगत होत्या.

१९२० सालानंतर मुलींसाठी सक्तीच्या शिक्षणाबरोबरच सक्तीच्या शारीरिक शिक्षणाचीही मागणी अखिल भारतीय महिला परिषदेनं केली. मुलींच्या शाळांत क्रीडांगणं उघडण्यात यावीत आणि दर सहा महिन्यांनी सर्व मुलींची वैद्यकीय तपासणी करावी, असं परिषदेचं म्हणणं होतं. १९२७ साली मुंबई प्रांतीय सरकारनं विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण कसं द्यावं, यावर विचार करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष श्री. कन्हय्यालाल मुन्शी होते. या समितीनं मुलामुलींना सक्तीचं शारीरिक शिक्षण द्यावं, अशी शिफारस केली. अहवालात खेळांची जी यादी होती, त्यात पोहणंही होतं. मात्र त्यासाठी साधनं उपलब्ध नसल्यानं आधी इतर खेळांवर लक्ष केंद्रित करावं, असं सुचवलं होतं. त्याला अनुसरून स्वीडिश ड्रिल, पी.टी., जोडी लेझीम, लकडी, लाठी, दंड, बैठक, नमस्कार, मल्लखांब, कुस्ती, लष्करी कवायत, डबलबार, सिंगलबार, रोमन रिंग्ज्‌, तलवार, झोला, फरीसदगा, बोथाटी, नेमबाजी, भाला, आणि तोलाची कामं हे खेळ काही शाळांमध्ये आणि व्यायामशाळांत शिकवले जाऊ लागले. पुण्यात रग्बीचाही एक वर्ग भरत होता. पण पोहणं शिकण्याच्या योग्य सोयी नव्हत्या. स्त्रियांसाठी शारीरिक शिक्षणही मागे राहिलं होतं.

या बाबतीत पुण्याच्या मैनाबाई जैन विद्यार्थिनीगृहानं पुढाकार घेतला. या संस्थेच्या मोठ्या विहिरीवर मुलींना १९२० सालापासून पोहणं शिकवलं जाई. आता ही संस्था बंद झाली असल्यामुळे मला इतर तपशील मिळाले नाहीत. हुजूरपागा आणि नाथीबाई कन्याशाळा या दोन संस्थांनीही स्त्रियांच्या शारीरिक शिक्षणासाठी हालचाली केल्या. कन्याशाळेनं मुंबई प्रांतीय शारीरिक शिक्षण समिती स्थापन होण्यापूर्वीच १९२५ साली व्यायामशाळा बांधण्यासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. ’सध्याच्या मुली भावी पिढीच्या माता होत व ह्या मातांना बौद्धिक शिक्षणाबरोबर योग्य शारीरिक शिक्षण मिळालें तर भावी पिढीची उन्नति झाल्यांवाचून राहणार नाहीं’ असं या आवाहनात म्हटलं होतं. १९२८ सालापासून कन्याशाळेत मुलींना शारीरिक शिक्षण देण्यास सुरुवात झाली. त्या कामी पाच शिक्षिकांची नेमणूक झाली होती. पोहण्याचा व्यायाम मात्र दुर्लक्षित होता. लवकरच हिंगण्याच्या शाळेत पोहण्याचा तलाव बांधला गेला. मुलींच्या शाळेतला हा महाराष्ट्रातला पहिला तलाव होता.

१९३१ साली एप्रिल महिन्यात महाराष्ट्रीय मंडळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण न. चिं. केळकर यांच्या हस्ते झालं. नूतन मराठी विद्यालय, कन्याशाळा, सेंट हेलेना स्कूल, हिंगण्याचा महिलाश्रम, महिला पाठशाळा इथल्या मुलींना तोवर शारीरिक शिक्षण महाराष्ट्रीय मंडळातर्फे दिलं जात होतं. या कार्यक्रमात केळकरांनी मुलींसाठी वेगळी व्यायामशाळा बांधावी, त्यांनाही शारीरिक ’मर्दानी’ खेळ शिकवावे, पोहणं शिकवावं, असं संचालकांना सुचवलं.

१९३२ सालापासून मंडळाच्या विहिरीत स्त्रियांसाठी मे महिन्यात पोहण्याचे वर्ग सुरू झाले. दामले आणि जेजुरीकर हे पुरुष शिक्षक होते. मुली सुरुवातीला आठनऊ दिवस पाण्यात जायला तयार नव्हत्या, दामल्यांनी त्यांची भीती घालवली आणि पंधराच दिवसांत वरून उड्या टाकून मोकळं पोहण्याइतकी तयारी केली, असं सौ. इंदुबाई मराठे यांनी अहवालात नोंदवलं. कु. मालती गोळे, कु. पद्मा केळकर या हुजूरपागेच्या विद्यार्थिनी पहिल्या बॅचमध्ये पोहणं शिकल्या. त्यांचे अनुकूल अभिप्राय ’ज्ञानप्रकाशा’नं छापले होते.

सुरुवातीची तीन वर्षं हे वर्ग मोफत होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधल्या या वर्गांची लोकप्रियता वाढल्यावर मंडळानं मुलींसाठी वसतिगृह सुरू केलं. मुंबई, ठाणे, दादर, सांगली, मीरज, नाशिक, नगर, सातारा, वाई, धारवाड, अहमदाबाद, बडोदे, बनारस, इंदूर या ठिकाणांहून मुली व स्त्रिया पुण्याला शारीरिक शिक्षणासाठी येतात, असं 'ज्ञानप्रकाश'नं १९ एप्रिल १९३६च्या अंकात म्हटलं होतं. या वसतिगृहाची एका महिन्याची फी रु. १८ इतकी होती. पोहण्याशिवाय लाठी, काठी, लेझीम, जोडी, फरीगदगा, तलवार, पट्टा, जंबिया, बोथाटी, फिजिकल ड्रील, लष्करी कवायत इत्यादी मुलींना शिकवले जात. शिवाय प्रथमोपचार, शरीरशास्त्र या विषयांवर व्याख्यानं दिली जात.

पहिल्या वर्षी तीस मुलींनी पोहण्याचं प्रशिक्षण घेतलं. १९३८ साली ही संख्या दीडशे इतकी झाली. दुपारी बारा ते चार विहीर स्त्रियांसाठी खास राखून ठेवण्यात येत असे. पाणी रोज उपसून स्वच्छ करण्यात येतं, त्यात योग्य ती औषधं टाकण्यात येतात, असं वर्गाच्या जाहिरातीत नमूद केलं जाई. सौ. इंदिराबाई बर्वे आणि सौ. इंदिराबाई वाटवे हे वर्ग चालवीत. उड्या मारायला विहिरीत शिड्या बसवल्या होत्या. धरण्यासाठी साखळ्या होत्या. पोहण्यासाठी लागणारं भोपळा, दोर इत्यादी सामान संस्थेतर्फे पुरवण्यात येई. वर्गात दाखल झालेल्या सर्वांना उड्या मारणं, सूर, मुटका वगैरे शिकवण्यात येत. अनेक मुली चारपाच दिवसांत पोहणं आल्यावर वर्गात येईनाश्या होत. मग नवीन विद्यार्थिनी घेतल्या जात. वर्गामध्ये उत्कृष्ट रीतीनं पोहणं शिकणार्‍यांना प्रमाणपत्रं देण्यात येत.

मात्र पुण्याची लोकसंख्या बघता पोहणं शिकणार्‍या मुलींचा आकडा मोठा नव्हता. पाण्यात उतरून ओलं होणं, या क्रीयेशी लाज ही भावना जोडलेली होती. शारीरिक शिक्षण घेणार्‍या, पोहणार्‍या स्त्रिया छचोर, पुरुषी आहेत, असं मानणारे अनेक होते. व्हिक्टोरिअन इंग्लंडात पुरुषांच्या पोहण्याच्या शर्यती पाहणार्‍या स्त्रिया हलक्या समजल्या जात. हाच प्रकार भारतातही होता. पुरुषांच्या, मुलांच्या खेळांच्या स्पर्धांना सहसा स्त्रियांना प्रवेश नसे. मुलींच्या खेळांच्या स्पर्धा क्वचित भरवल्या जात. पुण्यात मुलांच्या आंतरशालेय स्पर्धा १९२६ सालापासून भरवल्या जात. मुलींच्या स्पर्धा मात्र पहिल्यांदा १९३८ साली भरल्या. त्या बघायला केवळ स्त्रियांना प्रवेश होता.

स्त्रिया पोहण्याचा पोशाख घालत नसत. घट्ट नेसलेल्या नऊवारीत पाण्यात उड्या मारत. पण घरातल्या मुलीनं ओल्या कपड्यांत वावरणं चालवून घेणारे थोडे होते. १९३८ साली भरलेल्या मुलींच्या स्पर्धांमध्ये एकूण बेचाळीस संघांनी भाग घेतला होता. त्यांपैकी फक्त हिंगण्याच्या महिलाश्रमाच्या संघानं खेळण्यासाठी योग्य असा - गुडघ्यापर्यंत विजार आणि कोपरापर्यंत बाह्यांचा शर्ट - असा पोशाख केला होता. केसाच्या वेण्या शर्टाचा आत घातल्या होत्या. बडोद्याच्या आर्य कन्या विद्यालयाच्या मुलींचाही असा पोशाख होता. या पोशाखामुळे ’कोणतेही प्रकारचा त्रास अगर अडथळा होत नाहीं व त्यामुळें त्यांचें खेळांतील चापल्य व धडाडी यांस पूर्णपणें वाव मिळतो’, असं ’ज्ञानप्रकाशा’नं नोंदवलं होतं.

मुलींच्या शारीरिक शिक्षणात, पोहण्यात अडसर ठरणारी महत्त्वाची घटना होती १९२८ सालचा पाणंदीकर - खान विवाह. या आंतरधर्मीय विवाहामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलींना शाळाकॉलेजांतून काढलं, त्यांची लग्नं लावून दिली. शिकलेल्या स्त्रिया अविवाहित राहतात, किंवा त्यांना बीजवराशी लग्न करावं लागतं, असा समज होता. त्यात भर पडली महाराष्ट्रीय मंडळातल्या फोटो प्रकरणाची.

कन्याशाळा, महिला विद्यालय, आणि सेंट हेलेना स्कूल या शाळांमधल्या विद्यार्थिनींना शारीरिक शिक्षण देण्याचं काम महाराष्ट्रीय मंडळाकडे १९३० सालापासून देण्यात आलं होतं. ज्या स्त्रियांना मंडळात शारीरिक शिक्षण दिलं जाई, त्यांचे ग्रूपफोटो कार्यालयात लावले होते. हे फोटो कन्याशाळेच्या सुपरिंटेंडंट असलेल्या बाळूताई खरे यांच्या परवानगीनं मंडळानं काढले होते. पालकांची वेगळी परवानगी घेतली नव्हती. हे फोटो मंडळानं १९३४ सालच्या मार्च महिन्यात ’यशवंत’ मासिकात छापून आणल्यावर मंडळाला श्री. सदुभाऊ गोडबोले या सभासदानं नोटीस पाठवली. एका ग्रूपफोटोमध्ये कु. विमल साठे ही विद्यार्थिनी होती. गोडबोल्यांची ती भाची होती. त्यांच्या म्हणण्यानुसार ते तिचे पुण्यातले पालक होते आणि तिचा फोटो मासिकात छापून आल्यामुळे तिची बदनामी झाली होती. मंडळानं तिचा फोटो कार्यालयातून काढून टाकावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र तिचा स्वतंत्र फोटो नव्हता, त्यामुळे तो फोटो काढून टाकता येणार नाही, असं मंडळानं गोडबोल्यांना कळवलं. त्यानंतर गोडबोल्यांनी ते फोटो मंडळाच्या कार्यलयातून काढून घरी आणले.

या प्रकारामुळे खटला उभा राहिला. जबान्या, तक्रारी यांत स्त्रीशिक्षण, हुजूरपागा - सेवासदन इत्यादी शाळांमधले अभ्यासक्रम, खेळांची आवश्यकता, पोहण्याचे पोशाख, ’चित्रमयजगत’सारख्या नियतकालिकांतून छापून येणारे स्त्रियांचे फोटो असे अनेक विषय चघळले गेले. स्त्रियांनी शिकणं, खेळणं यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन केवळ प्रतिगामीच नाही, तर माणुसकीला सोडून होता, हे तत्कालीन बातम्या वाचून लक्षात येतं. चारचौघांसमोर मुलींनी खेळणं, किंवा तसे फोटो लावणं गोडबोल्यांना पसंत नव्हतं. स्त्रियांचे फोटो - खेळतानाचे किंवा नुसत्या चेहर्‍याचेही - नियतकालिकांत छापू नयेत, ते सार्वजनिक ठिकाणी लावू नयेत, या त्यांच्या मागणीला पुण्यात मोठा पाठिंबा मिळाला होता.

या काळात पोहण्याच्या प्रसाराला श्री. अनंतराव काळे यांनी मोठा हातभार लावला. डेक्कन जिमखान्याच्या तलावावर ते पोहणं शिकवत. २ मे, १९२२ रोजी डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावाचा प्रवेश समारंभ श्री. न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला होता. शहर म्युनिसिपालिटीचे चीफ ऑफिसर श्री. शंकरराव भागवत तेव्हा जिमखान्याचे सचिव होते. केळकर आपल्या भाषणात म्हणाले की, पुण्यात अनेक विहिरी असूनही मुलं त्यात पोहू शकत नाहीत, कारण त्या अस्वच्छ आहेत; या तलावामुळे आता आपण आजवर दुर्लक्ष केलेला पोहणं हा खेळ मुलं खेळू शकतील. लोकमान्य टिळक पट्टीचे पोहणारे होते. ते तासन्‌तास नदीत डुंबत. काशीला गेल्यावर एका दमात पोहत गंगापार जात. केळकरांनी सर्वांना टिळकांचा आदर्श ठेवण्याचं आवाहन केलं. हा तलाव खडक फोडून बांधला गेला होता. जिवंत झरे होते, त्यामुळे पाणी स्वच्छ होतं.

काळ्यांच्या वर्षभर चालणार्‍या वर्गात फक्त मुलं आणि पुरुष असले, तरी उन्हाळ्याच्या वर्गांमध्ये मुली आणि स्त्रिया असत. मुलींचे वर्ग १९३३ साली सुरू झाले असावेत, असा माझा कयास आहे. १९३५ सालानंतर ’ज्ञानप्रकाशा’त प्रसिद्ध झालेल्या बातम्या वाचल्यास अनुमान काढता येतं की, या वर्गांमध्ये ’सुशिक्षित मुली व प्रौढ कुलीन स्त्रियांचा’ भरणा अधिक होता. याच काळात मुलांच्या शर्यती जशा होत, तश्या मुलींच्या पोहण्याच्या शर्यती सुरू झाल्या. पण मुलींना शर्यतींत पोहता येत नसे. घरून परवानगी नसणं, हे एक कारण. शिवाय पोहण्याचा सराव करण्याची संधीही नसे. एकदा पाण्यावर तरंगता येऊ लागल्यावर पुन्हा कधीकाळी कपिलाषष्ठीचा योग आल्यास पाण्यात उतरायला मिळणार. त्यांच्याकडे विद्यार्थी प्राथमिक पोहणं शिकायला येत. नेहमीचं पोहणं आणि कमी अंतराच्या खुल्या शर्यतीत पोहणं, यांत फरक होता. मुलींची शारीरिक तयार पुरेशी नसे. नंतर जूनमध्ये वर्ग बंद होई. एकदा पोहता आल्यावर पुन्हा पुढच्या वर्षी पोहायची परवानगी मिळणं कठीण असे.

महाराष्ट्रीय मंडळ आणि डेक्कन जिमखाना यांचा आदर्श समोर ठेवून ’शारीरिक आरोग्य व आत्मविश्वास उत्पन्न व्हावा’, हे हेतू जाहीर करत टिळक रस्त्यावरील वनिता समाजानंही याच काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्त्रिया आणि मुली यांच्यासाठी देशी व्यायामाचे वर्ग सुरू केले. महाराष्ट्रीय व्यायाम शाळेचे शिक्षक तिथे लेझीम, लाठी, जांबिया वगैरे खेळ शिकवत. वर्गातल्या मुली मंडळाच्या विहिरीवर पोहणं शिकत. या वर्गांवर देखरेखीसाठी प्रौढ स्त्रिया उपस्थित असतील, हे मुद्दाम जाहीर केलेलं असे. वनिता समाजाच्या कार्यकारी मंडळांत सामील असलेल्यांमध्ये एरंडवणा कॉलेजच्या प्रिन्सिपाल डॉ. कमलाबाई देशपांडे, महिला स्नेहवर्धक मंडळाच्या सौ. इंदिराबाई नातू, पूना वुईमेन्स्‌ कौन्सिल सेक्रेटरी सौ. येसूताई कुळकर्णी, महिला समाज वेताळ पेठ सेक्रेटरी सौ. इंदिराबाई भाजेकर, कु. वारुताई शेवडे इत्यादी होत्या. त्यांच्या घरातल्या मुली-स्त्रियाही पोहणं शिकल्या, असं नंतर आवर्जून जाहीर केलं गेलं.

शारीरिक शिक्षणाचा प्रसार आरोग्यासाठी हितकर असला तरी तो लिंगभेद आणि जातिभेद यांना बळकट करणारा होता. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य संस्थांमध्ये दिलं जाणारं शारीरिक शिक्षण उच्चवर्गीय - मध्यमवर्गीय आणि तथाकथित ’उच्चवर्णीय’ - ’उच्चजातीय’ यांच्यापुरतं मर्यादित होतं. फेब्रुवारी १९३४मध्ये मुठानदीच्या काठी जलक्रीडा तलाव बांधण्याचा ठराव पुणे शहर म्युनिसिपालिटीनं केला. शहरात मुतार्‍यांची गरज आहे, उघडी गटारं आहेत; असं असताना केवळ मोजक्या सभासदांच्या मनात आलं म्हणून तलाव बांधू नये, असं काही सदस्य म्हणाले. मात्र तत्कालीन नदीसुधार प्रकल्पाअंतर्गत या तलावाचं बांधकाम करायचं ठरलं. या सभेत श्री. लालमहंमद यांनी विचारलं की, सदर तलाव मुसलमान, अस्पृश्य या लोकांना वापरता येईल की नाही? या प्रश्नास होकारार्थी उत्तर आल्यावर ठराव मंजूर झाला.

शारीरिक बल वाढवणं हा पुरोगामित्व-प्रोजेक्टाचा एक महत्त्वाचा भाग होता. हे पुरोगामित्व समाजातल्या सर्वांना धरून चालणारं, एकत्र आणणारं नव्हतं. मध्यमवर्गानं उचलून धरलेलं हे पुरोगामित्व राष्ट्रवादाच्या मदतीनं बहरण्याचा प्रयत्न करत होतं. पुण्यात पोहणं शिकणार्‍या स्त्रिया मुख्यत: ब्राह्मण होत्या. त्यांच्या सामाजिक स्थानामुळे त्यांना पोहण्याची साधनं सहज उपलब्ध झाली. त्यांनी विहिरीत, नदीत उड्या मारणं हे त्यांच्या सबल असण्याचं लक्षण ठरलं. पण तरी त्यांचं पोहणं शिकणं अथवा न शिकणं घरातल्या पुरुषांच्या मर्जीवर अवलंबून होतं. स्त्रियांनी पोहणं शिकावं, अशी पुरुषांची इच्छा होती, कारण सशक्त स्त्रिया राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक होत्या. त्या जन्माला घालणार असलेलं मूल सुदृढ, हुशार, तेज:पूंज इत्यादी होणार होतं. राष्ट्राला स्वतंत्र करण्यात त्यांचा हातभार लागणार होता.

महाराष्ट्रीय मंडळाचा चौदावा वाढदिवस १२ ऑक्टोबर, १९३७ रोजी ना. कन्हय्यालाल मुनशी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. लक्षणराव भोपटकर हे त्यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष होते. बिनीचे व्यायामशास्त्रज्ञ असा त्यांचा लौकिक होता. राष्ट्रउभारणीसाठी हिंदूंचं एकीकरण, सबलीकरण वगैरे त्यांचे आवडते प्रकल्प होते. या कार्यक्रमात ते म्हणाले - ’यावर्षी या संस्थेतील कु. सुमती धारप हिनें भरपुरात उडी टाकून यशस्वीपणे एक मैलपर्यंत पोहून दाखविलें, पुढील वर्षी मुलीच काय पण सौभाग्यवतीही पुरांत उड्या टाकतील. याचें कारण या संस्थेतील तद्न्य शिक्षक असू्न त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे हें होय. विश्वास इतका की, त्या पाताळांत गेल्या तरी त्यांना तेथून ओढून काढतील’.

१९३८ साली मुठेला पूर आल्यावर मंडळात पोहणं शिकलेल्या बारा स्त्रियांनी २२ ते २७ जुलैदरम्यान पुरात उड्या मारून पोहून दाखवलं. त्यांपैकी चार स्त्रिया विवाहित होत्या. त्यात कुमुद भोपटकर व लीलू भोपटकर या लक्ष्मणराव भोपटकरांच्या स्नुषाही होत्या. कु. गंगू धारप, कु. इंदू भट, कु. सुमन करंदीकर, बेबी जोगळेकर, कमल घारपुरे, सुमती धारप यांचाही उपक्रमात सहभाग होता. पोहण्याचा आनंद मिळावा, म्हणून स्वखुशीनं पोहणार्‍या त्यांपैकी किती असतील, हे माहीत नाही.

पुरात उड्या मारण्याचा हा उपक्रम पुढे तीनचार वर्षं सुरू राहिला. दरम्यानच्या काळात यमुनाजळीं खेळ खेळणार्‍या मीनाक्षीबाई पुरोगामित्वाचा घोष करणार्‍या महाराष्ट्राला हादरवून गेल्या. यूट्यूबवर मध्यंतरी हिंगण्याच्या आश्रमातला स्त्रियांच्या पोहण्याचा १९३८ सालचा एक व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. त्यात गुडघ्यापर्यंत घट्ट लुगडं नेसलेल्या स्त्रिया पोहण्याचा आनंद घेत होत्या. शहरात पोहण्याचे तलाव वाढले, तसं पोहणार्‍या स्त्रियांची संख्याही वाढली. पण लोकसंख्येचा विचार करता ती किरकोळच राहिली. स्वीमसूटच्या भीतीनं पोहण्याच्या तलावाकडे न फिरकणार्‍या स्त्रियाच आजही अधिक आहेत. आनंदासाठी पोहण्याचं सुख आजही बहुतेकींच्या नशिबात नाही. गेल्या शतकात पुरुषांनी पाण्यात ढकललं आणि असंख्य तरुणींनी, महिलांनी धाडस दाखवलं. पोहण्यातला आनंद त्यांनी उपभोगला असेल का, हा प्रश्न वारंवार मनात येतो.

***

आभार -
प्राईम मिनिस्टर्स लायब्ररी अ‍ॅण्ड म्यूझियम, नवी दिल्ली (पूर्वाश्रमीचे नेहरू मेमोरियल म्यूझियम अ‍ॅण्ड लायब्ररी, नवी दिल्ली)
केसरी - मराठा ट्रस्ट, पुणे
शासकीय विभागीय ग्रंथालय, गोखले हॉल, पुणे

***

Swim 1.jpg

कु. सुशीला वाटवे या इंदिराबाई व प्रा. के. ना. वाटवे यांच्या कन्या होत. इंदिराबाई वाटवे मंडळात पोहणं शिकवीत. सुशीलानं १९३८ साली पुरात उडी मारली तेव्हा तिचं वय बारा वर्षं होतं. कुमार शंकर बापट (वय सात वर्षं) आणि इंदिराबाई बर्वे (वय पस्तीस वर्षं) हेही त्यावेळी पुरात पोहले. या सर्वांच्या सत्कार कार्यक्रमात बर्वे म्हणाल्या की, त्यांनी एका बावन्न वर्षांच्या महिलेलाही मंडळाच्या विहिरीवर पोहणं शिकवलं होतं. (केसरी, ९ ऑगस्ट, १९३८)

***

Swim 2.jpg

श्री. अनंतराव काळे आणि त्यांचे टिळक तलावावरील विद्यार्थी (ज्ञानप्रकाश, १६ जून, १९३७)

***

Swim 3 (1).jpg
मैनाताई जैन विद्यार्थिनी गृहातील पोहण्याच्या वर्गातील यशस्वी विद्यार्थिनी (मासिक मनोरंजन, फेब्रुवारी १९२०)

***

Swim 4.jpg

नव्या पुलावरून नदीत उड्या मारणारे तरुण (यशवन्त, जून १९२९, फोटो - श्री. दाते, पुणे)

***

Swim 5.jpg

टिळक तलावात पोहणारा तरुण (यशवन्त, जून १९२९, फोटो - श्री. दाते, पुणे)

***

पूर्वप्रसिद्धी - मुक्त - संवाद, दिवाळी, २०२४.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार इन्टरेस्टिंग माहिती! लेख एका दमात वाचला, पुन्हा नीट वाचायला हवा.
आपण आता गृहित धरून चालतो अशांपैकी किती गोष्टी समाजातील काही गटांना अगदी परवापर्यंत दुर्लभ होत्या! वळणा-आडवळणाने अजूनही असतात!

>>> पोहण्यातला आनंद त्यांनी उपभोगला असेल का, हा प्रश्न वारंवार मनात येतो.
हे भिडलंच!

पण जातं ओढणार्‍या, हंड्याकळशांनी पाणी आणणार्‍या बायकांना दुर्बळ समजत?
कुपोषित (ठेवत) असतील त्याचं काय!

>>> प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय वांङ्मयात पोहण्यापेक्षा बुडण्याचे किंवा बुडताना नदीतून किंवा तलावासमुद्रातून बाहेर आलेल्या देवतेनं वाचवण्याच्याच कथा अधिक आहेत
महाभारतात शेवटी दुर्योधन तलावात पाण्याखाली लपून बसला होता ना? त्यावरून तो पट्टीचा पोहणारा असणार.
गंधर्वांच्या जलक्रीडांचेही उल्लेख महाभारतात तसंच जमदग्नी-रेणुकेच्या कथेत आहेत. मग ती कला सर्वसामान्य मानवांना शिकवली जात नसेल का?

फारच सुरेख लेख. अजूनही मुलींना पोहता येत नाही. माझ्या लहानपणी छोट्या गावातून तरणतलाव नसल्याने विहिरीत - नदीवरच पोहायला जाता येई. आजही हीच परिस्थिती आहे बहुतेक. त्यामुळे तिसरी-चौथीच्या आतल्या मुलीच पोहायला शिकत व तितवरच पोहायला येत. त्यापेक्षा मोठ्या झाल्या की विहिरीवर / नदीवर कपडे वगैरे बदलण्याची सोय नसल्याने व एकूणच ओले छोटे कपडे यांची लाज वाटणे यामुळे प्रौढ स्त्रियांना पोहण्याची संधीच नाही.

नदी असलेल्या गावातून्/खेड्यातून साधारण पोहायला येतच नाही असा पुरुष विरळाच. पण फ्रीस्टाइल वगैरे शास्त्रशुद्ध वा व्यायामासाठी जसे पोहायला लागते ते पोहायला कोणीच शिकवत नाही. त्यासाठी स्विमिंग पूलच पाहिजे.

माझ्या आईच्या एका चुलत बहिणीने साठी नंतर पोहायला शिकून आता तिच्या वयोगटातल्या स्पर्धात बक्शिसे मिलवली आहेत. आणि ती साध्या पुण्यातल्या कनिष्ट मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे.

फार रोचक माहिती. आमच्या शाळेच्या संस्थेची ( प्राथमिक शाळेच्या अंगणात ) विहीर होती. उन्हाळी सुट्ट्यांमधे मुलांसाठी आणि मुलींसाठी क्लासेस असायचे . प्राथमिक शाळेच्या एका वर्गात मुलींसाठी कपडे बदलायची सोय असायची. तेंव्हा ती फार प्रिमिटिव्ह आणि अपुरी वाटायची. पण आता असं वाटतंय की एवढी देखील सोय फार कमी ठिकाणी होती.

नेहमीप्रमाणेच एकदम इंटरेस्टींग माहिती. आपण केव्हढ्या गोष्टी गृहित धरतो ह्याची जाणीव झाली. भारतातून आलेल्यांपैकी बर्‍याच जणांना पोहता येते पण शास्त्रशुद्ध स्ट्रोक्स शिकलेले बरेच कमी असतात (मुलांमधेही ) असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

फक्त लेख भारी विस्कळीत झाला आहे असे वाटते. सणावळ्या सारख्या मागे पुढे होत आहेत .

पुण्यात पोहलेल्या बाईचा हा जाहिर नोंद केलेला अनुभव असावा. पण त्याआधी कोणी स्त्री हि पोहलीच नाही असेही नाही. फक्त तो किस्सा नमुद झाला नसेल.

माझी आजी पट्टीची पोहणारी होती, ती सुद्धा नववारीत. ती दुसरी इयत्ता शिकलेली एका खेडेगावात.
नदीत पोहुन यायची जयगडच्या खाडीतून शाळेत जायला. ते ही तिच्या इतर बहिणी व सर्व भावांसोबत.
पुर्वी पाठीला सुकलेले शहाळी लावून विहिरीत उड्या मारत घरातील सर्व मुली व मुलं व पोहणे शिकत. आणि ती गरज आणि मजा म्हणून दोन्ही असे असेच एकलेय/पाहिलेय.
आता हा मोकळेपणा त्यावेळी जाती/वर्गानुसार, घरानुसार बदलत असेल. आणि त्यात त्या काळानुसार बायकांना बाहेरील वावर बंदी असेल काहि घरात.
तरीही स्त्रीयांना पोहायला येतच नव्हते किंवा शिकवत नसत हा खुपच चुकीचा समज वाटतो. कामकरी/ कुंणबी बाया आमच्याकडे कामाला असत, नदीत मस्त पोहत(१९६०च्या आसपास), मजेसाठी. आणि बर्‍याच स्त्रीया पहाटे पहाटे अंघोळ सुद्धा नदीत करत.

भारतीय मजेसाठी पोहत नाहित हा ब्रिटीशांचा समज हा "त्यांनी" करून घेतलेला समज असेल असे वाटते.

फारच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण लेख.

एवढ्या गर्दीत पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे डेरिंग करणाऱ्या सुमती धारपचे कौतुक.

कोकणात शंभर वर्षांवर वर मुली पोहणं शिकायची परंपरा असावी, आमच्या घरातल्या, नात्यातल्या कित्येक मुली शिकल्या. एक आते तर आता 97 वर्षाची आहे, आमच्या घराजवळच्या विहिरीतच शिकल्या सर्व आते, एक तिच्यापेक्षा मोठी आते नाही आता पण तीही शिकलेली. त्या सर्वांना आवडायचं. या उलट मलाच पोहता येत नाही आणि आवडही नाही. अर्थात पोहणं आमची विहीर आणि गावची नदी इथपर्यंतच सीमित असावं.

बाबांच्या काही आते बहिणी (सख्ख्या नाही, चुलत) दादर आणि ठाण्यात मुलींना स्विमिंग शिकवायच्या असं मी लहान असताना ऐकलंय.

फोटो फार मस्त आहेत, विशेषतः 1920 सालचा स्त्रियांचा आवडला.

1938 सालीच्या स्पर्धेत हिंगण्याच्या महिलाश्रमाच्या मुलींचा पोशाख आणि बडोद्याच्या आर्य कन्या विद्यालयाच्या मुलींचा पोहण्यासाठीचा योग्य पोशाख वाचून फारच कौतुक वाटलं.

फार सुंदर लेख आणि माहिती!

पोहण्यातला आनंद त्यांनी उपभोगला असेल का, हा प्रश्न वारंवार मनात येतो. >>> इथे आपण थबकतोच वाचताना.

नदीच्या पुरात उड्या मारणे नंतर बंद केले असावे.

लेख आवडला. अत्यंत इंटरेस्टिंग.
माझ्या नवऱ्याच्या आजीनेही १९४० च्या सुमारास हा लकडी पूल ते ओंकारेश्वर, पुराच्या पाण्यात पोहण्याचा पराक्रम केलेला आहे Happy

माझ्या आजीलाही पोहता येत होतं. ती कोकणात वाढलेली होती. कोकणात बऱ्याच ठिकाणी विहिरीत पोहायला शिकवलं जायचं आणि तिथे मुलं-मुली भेद नसायचा असं वाटतं. मीही विहिरीतच पोहायला शिकले. पण अर्थात नंतर अलीकडे परत क्लास लावून फ्रीस्टाईल शिकले.

लेख फारच रोचक आणि माहितीपूर्ण झाला आहे.

पुराच्या पाण्यात पोहताना लोकं मरायची तरीही तसे करण्यास प्रोत्साहन दिले जायचे हे दहीहंडी सारखे झाले. थ्रिल आणि किल संगतच.

कोकणातील मुलींना तेव्हाही पोहता यायचे याच्याशी देखील सहमत जेवढे आजीआजोबा यांच्याकडून त्यांच्याही आधीच्या पिढीचे किस्से ऐकले आहेत. एकूणच प्रथा परंपरा पाहता कोकणात मुले–मुली भेद कमी आहे हे जाणवते आणि जिथे विहिरी नदी नाले ओढे समुद्र एकूणच पाण्याचे स्रोत मुबलक आहेत तिथे पोहण्याची संस्कृती रुजणे स्वाभाविक आहे.

इंटरेस्टिंग.

हा लेख आधी वाचल्यासारखा वाटला. मग “पूर्वप्रसिद्धी“ वाचले आणि डोक्यात प्रकाश पडला.

मस्त माहिती आणि फोटो.

पोहणं फार फार आवडीचं आहे. त्यामुळे मनोभावे लेख वाचला.
टवणे सरनी लिहिलंय तसं मी लहानपणी मामाकडे विहिरीत पोहायला शिकले आहे. सुरुवातीला पाठीवर भोपळा किंवा सुक्या गवताचा भारा बांधून. पुढे स्विमींग टँकमध्येही काही वर्षं पोहायला मिळालं.

कोकणात बऱ्याच ठिकाणी विहिरीत पोहायला शिकवलं जायचं आणि तिथे मुलं-मुली भेद नसायचा असं वाटतं. .> सहमत!

लेख भारी आहे ..नेहमीप्रमाणेच Happy

फार रोचक व माहितीपूर्ण लेख. आधी वाचला होता , कुठं ते लक्षात नाही (पण दिवाळी अंकात नाही) , पण परत पूर्ण वाचला, तेवढाच रोचक वाटला.

विषयांतर अलर्ट:
"शारीरिक तयार पुरेशी नसे." physical fitness ला "शारीरिक तयार" हा शब्दप्रयोग आहे की तयार हा टायपो आहे? (हे जरा धाडस करूनच विचारतोय, कारण तयार फक्त विशेषण म्हणुनच माहीत आहे.)

छान लेख. बदलत्या मानसिकतेचा नेमका आलेख !
( 1940 च्या दरम्यान ' ब्रह्मचारी ' सिनेमात अभिनेत्री मीनाक्षी नदीच्या घाटावर गाणं म्हणत - यमुना जळी खेळ खेळूया का - अंग प्रदर्शन न करतां स्नान करताना दाखवलं होतं . त्यावर प्रचंड टीका झाली होती व तें गाणंही निषिद्ध मानलं जात असे, असं ऐकण्यात व वाचनात आलं होतं. अशा वातावरणात पोहायला शिकणं व पोहणं याबद्दल त्या स्त्रियांचं व संबंधितांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे ! )

सुंदर लेख आणि माहिती. दक्षिण कर्नाटकातील एका छोट्याशा खेड्यात बालपण घालवलेली माझी आजी लहानपणीच गावातील नदीत पोहायला शिकली. तिथे दळणवळणाची साधनं जेमतेमच असल्याने एक गरज म्हणून हे अनिवार्य कौशल्य तिनं स्वतःहून आत्मसात केलं होतं. साधारण १९४०च्या आसपासचा काळ असेल तो. अशा दुर्गम आणि मागास ठिकाणी एक लौकिकदृष्ट्या अडाणी मुलगी पोहायला स्वतःहून (इतरांचे निरीक्षण करून) शिकली असेल तर पुण्यासारख्या शहरात स्त्रियांना पोहणं शिकायला इतका काळ जावा लागला असेल हे वाचून आश्चर्य वाटलं. शिवाय आजीचा अभिमान वाटला.

माझ्या नवऱ्याच्या आजीनेही १९४० च्या सुमारास हा लकडी पूल ते ओंकारेश्वर, पुराच्या पाण्यात पोहण्याचा पराक्रम केलेला आहे Happy >>> भारीच.

शिवाय आजीचा अभिमान वाटला. >>> खरंच. दुर्गम मागास खेड्यातून मुली पोहणं अगदी सहज शिकण्याची परंपरा शंभर सव्वाशे वर्ष जुनी आहे. वावेने लिहीलंय तसं मुलं मुली भेदभाव नव्हता.

मोठ्या शहरात जास्त लिमिटेशन्स असतील का मुलींवर, तरी पुण्यात मला फार उशीर नाही वाटला पण तिथे म्हणून एक्सपोजर जास्त मिळालं. खेडेगावातल्यांना तसं नाही मिळालं.

जिथे मुलींनाही कष्टाची कामे करावी लागत असतील तिथल्या मुली अश्या इतर शारीरिक कौशल्यात पारंगत होण्याचे प्रमाण जास्त असेल का..

स्त्रिया त्या काळाच्या आधीपासून पोहत असतील, अनेकांनी ते लिहिलं ही आहे. पण खेड्यातल्या घटनांची बातमी होत नाही, कुठे नोंद होत नाही शहरातल्या होते.
बाकी लेख वाचायला मजा आली. यशवंत मासिकाचे अंदाजे शंभर वर्षांपूर्वीचे अंक माझ्याकडे आहेत त्यामुळे मासिक मनोरंजन संदर्भ वाचताना जास्त मजा आली.

इंटरेस्टिंग लेख आहे. जिथे लोक पोहणार्‍यांना , तेही पुरात पाहायला जमले आहेत, अशा ठिकाणी एखादी मुलगी पहिल्यांदा पोहली तरी त्याची बातमी होणे स्वाभाविक आहे. शिवाय रीतसर क्लास लावून शिकणं हाही फरक आहे.
स्त्रियांनी आणि बहुजनांनीही काहीही शिकण्याबद्दल समाजात किती अपसमज होते, विरोध होता , अनास्था होती हे या लेखात पुन्हा अधोरेखित झाले.
लेखातला तपशील आणि प्रतिसादांत आलेल्या माहितीवरून अभिजनांच्या कामगिरीची काय ती इतिहास दखल घेतो, बहुजनांनी तसं करणं दखलपात्र नसतं की काय असंही वाटलं.

पुराणे इ.मधील उल्लेखावरून मला नदीत डुंबणार्‍या गोपिकांची वस्त्रे पळवणारा आणि नदीत कालियामर्दन करणारा कृष्ण आठवला.

फरीसदगा हा प्रकार माहीत नव्हता. शोधलं तर फरीगदगा मिळालं. दोन्ही एकच का?

कोकणात बऱ्याच ठिकाणी विहिरीत पोहायला शिकवलं जायचं आणि तिथे मुलं-मुली भेद नसायचा असं वाटतं. .> सेम पिंच आमच्याकडे लहानपणा पासून अगदी आजीकडूनही पोहणे मस्ट आहे असेच ऐकले आहे. स्त्रियांना पोहायला येते / येत असे हे ही.

ह्या लेखाने छान माहिती मिळाली. लहानपणी टिळक तलाव किंवा महाराष्ट्र मंडळात शिकले नाही तर फाऊल का धरला जाई ते ही कळाले Happy

माझे बाबाही पुरात पोहत असत असे त्यांनी सांगितल्याचे आठवते आहे. मी अजूनही पोहायला शिकले नाही याची नेहमीच खंत आहे. बाबांची फार इच्छा होती, त्यांच्या मते जेवणे-खाणे इतकेच पोहणे महत्वाचे आहे. ते function at() { [native code] }इशय उत्तम पोहणारे होते. आम्हाला, लहान असताना, पाठीवर घेऊन सुळकन इंद्रायणीत फिरवून आणायचे.

बाकी आमच्याकडेही चिपळूणच्या नदीवरच सगळ्यांचे पोहण्याचे शिक्षण झाले. बाबा शिकवत असत, चिपळूणच्या नदीच्या, ओमळीच्या विहीरीच्या आठवणी सांगत असत. बाबांच्या पोहण्याच्या आठवणी या निमित्ताने जागृत झाल्या, त्यासाठी धन्यवाद !

कन्याशाळेचा उल्लेख वाचून मी तेथील विद्यार्थिनी असल्याने भारी वाटले.

पुराणे इ.मधील उल्लेखावरून मला नदीत डुंबणार्‍या गोपिकांची वस्त्रे पळवणारा आणि नदीत कालियामर्दन करणारा कृष्ण आठवला. >> यावरून वाटले, पूर्वी नदीवरच आंघोळीला जायची प्रथा होती मग पोहणे आवश्यकच असेल ना..

'पोहणे' ह्या आवडत्या विषयावरचा लेख आवडला. कल्याणला खाडीत पोहायला शिकताना स्ट्रोक्स वगैरे काही शिकलो नव्हतो. ते नंतर कळलं. आनंद फार मिळाला. कपड्यांची, मुलांबरोबर पोहण्याची कुठलीही बंधनं न घालणारे पालक असल्यामुळे तो आनंद मोकळेपणाने उपभोगला.

Pages