दशावतार – थोडे कौतुक थोडी निराशा!
चित्रपट अगदी दुसर्या दिवशी बघायचा असेल तरी जाण्याआधी आपण त्याचा थोडा अभ्यास करून जातो. चित्रपट कुठल्या विषयावर अन कुठल्या जॉनरचा आहे, कलाकार कोण आहेत, गाणी कशी आहेत वगैरे जुजबी माहिती घेतो. त्यासाठी ट्रेलर बघतो, youtube वर गाणी ऐकतो, सोशल मीडियावर रिव्ह्यू वाचतो. यातून चित्रपट कसा असेल याचे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होते, आणि त्यातून चित्रपटाबद्दल आपल्या काही अपेक्षा निर्माण होतात.
अगदी शून्य माहिती घेऊन बहुधा एखादा वाळवीच मी बघायला गेलो असेन. आणि त्यानेही अचानक भयानक मध्ये सुखद धक्का दिला होता. पण दशावतारचा मात्र फर्स्ट टीजर जेव्हा आलेला तेव्हापासूनच याला बघायचे म्हणून शॉर्टलिस्ट केले होते. त्या टीजर मधील बॅकग्राऊंड म्युझिक प्रचंड आवडले होते. काल चित्रपट बघायला जाण्याआधी पुन्हा ट्रेलर पाहिले, एकदोन गाणी ऐकली आणि छान मूड तयार करून गेलो. पहिल्या शनिवारीच जात असल्याने रिव्ह्यू फार वाचनात आले नव्हते, पण जे काही वाचले त्यात दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यांना तश्याच ताकदीची भूमिका मिळाली तर ते काय करू शकतात याची कल्पना असल्याने त्यांना बघायची उत्सुकता दुप्पट होती.
चित्रपटाला सुरुवात झाली, प्रभावळकरांची एंट्री झाली आणि आज काही ते निराश करत नाही अशी बेअरींग त्यांनी पकडली. चुरचुरीत, हलकेफुलके आणि जगात गोड अश्या मालवणी भाषेतील संवादांसह चित्रपट पुढे सरकू लागला. मोजक्याच प्रसंगातून बापलेकाचे नाते खुलू लागले. लेकाच्या भुमिकेत सिद्धार्थ मेनन होता. दोघांतील केमिस्ट्री मस्त जुळत होती. सोबतीला कोकण होताच. कोकणातील घरे, पायवाट, मंदीर, तलाव, झाडे छान दाखवलीच, पण एका झाडाखालचा लव्हर स्पॉट फार आवडला. अरे हो, त्या भुमिकेत प्रियदर्शिनी होती. छान सुंदर दिसत होती. ईतर गावकर्यांमध्ये उठून दिसत होती. माझ्या एका मित्राला एवढ्यासाठीच तिचे कास्टींग ऑड वाटले. याऊलट मला चित्रपटातील आवडलेल्या गोष्टीत तो एक नेत्रसुखद भाग वाटला. कोणाचे काय तर कोणाचे काय
एकीकडे दशावतार म्हणजे श्वास असलेला बाप तर दुसरीकडे उतारवयात त्याचे हे असे नाटकात काम करणे त्याच्याच जीवावर उठेल याची कल्पना असलेला मुलगा. ज्याला आपल्या बापाचे हे नाटकाचे वेड माहीत असूनही त्याच्याच काळजीपोटी मनावर दगड ठेवून त्याच्या या वेडाला विरोध करावा लागतोय.
ही जर वेबसिरीज असती तर त्या बापलेकांची थोडी हसवणारी, तर थोडी हळवी करणारी द्रुश्ये मी ब्रिन्ज वॉच करत सलग अडीच-तीन तास सहज बघितली असती. पण चित्रपटात सुरुवातीच्या आर्ध्या पाऊण तासात ही पार्श्वभूमी तयार करून नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली आणि तासाभरातच ईंटरव्हल झाला. ईथून पुढे जंगलाची/पर्यावरणाची रक्षा आणि त्याच्या जीवावर उठलेल्याविरुद्ध बदल्याचा खेळ सुरू होणार हे समजले.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच राखणदार म्हणून एक जंगली श्वापद दाखवले आहे. त्यामुळे कांतारा चित्रपटाची आठवण आल्यावाचून राहत नाही. मला कांतारा बिलकुल आवडला नव्हता म्हणून चटकन आठवण आली. तुम्ही ती काढू नका आणि काढली तरी कॉपीचा शिक्का मारू नका. कारण राखणदार ही कोकणवासीयांची ओरिजिनिअल कन्सेप्ट आहे. पुढे या लढ्यात दिलीप प्रभावळकर यांना तो राखणदार मदत करतो, की तो स्वतःच चमत्कार घडवून हे काम करतो हे चित्रपटातच बघा.
या रक्तरंजित खेळात आपल्याला भगवान विष्णूची दहा रुपे म्हणजे दशावतार बघायला मिळतात. हे दशावतार म्हणजेच चित्रपटाचा हाय पॉईंट. शीर्षकात उल्लेखलेली निराशा ईथे पदरी पडली. यातले काही जमले तर काही फसले, किंवा पुरेसा प्रभाव पाडू शकले नाही असे वाटले. मराठी चित्रपटात बजेट ईश्यू असू शकतो, त्याने स्पेशल ईफेक्ट द्रुश्यात मर्यादा येऊ शकतात, पण आपल्याकडे दिलीप प्रभावळकर यांच्यासारखा बहुरुपी बहुआयामी कसलेला कलाकार असताना अश्या प्रसंगात त्यांच्या अभिनयक्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायला हवे होते. पण त्यांचा चेहरा रंगवून, माती चिखलाने माखवून, अंधारात आणि क्लोजअपमध्ये चित्रित केलेली द्रुश्ये फार प्रभाव पाडू शकली नाही असे वाटले. हे आपण अभिनयाची मर्यादा असलेल्यांसोबत करतो असे वाटले.
चौकट राजामधील चारचौघांपेक्षा वेगळा नंदू, झपाटलेला मधील तात्या विंचू, पछाडलेलामध्ये सूड दुर्गे सूड, ते मराठी मालिकेतील गंगाधर टिपरे आणि हिंदी चित्रपट लगे रहो मुन्नाभाई मधील बापू अश्या कैक कॅरेक्टरना त्यांनी अजरामर करून सोडले आहे. हा चित्रपट संपता संपता यातील "बाबुली" या सर्वांच्या पलीकडे जाईल असे वाटले होते पण ती पुरेशी संधी त्यांना मिळाली नाही असे वाटले.
अर्थात, वयोमानानुसार फिजिकल एनर्जीबाबत त्यांच्या मर्यादा सुद्धा आता लक्षात घ्यायला हव्यात. हे वाक्य लिहितानाच गूगल केले तर ८१ वर्षे वय दाखवत आहेत त्यांचे. म्हणजे जिथे त्यांनी बापाचा रोल केला तिथे ते प्रत्यक्षात आजोबांच्या वयाचे होते. हे आधीच गूगल करून आणि ध्यानात ठेवून गेलो असतो तर कदाचित आदर अजून दुणावला असता.
चित्रपटात कोकणातील दशावतार दाखवला गेला. तो किती तंतोतंत जमला हे तिथले प्रेक्षकच सांगू शकतील. पण ज्यांच्यासाठी तो नवीन आहे त्यांना हे नव्याने माहीत पडलेले प्रकरण आवडेल असे वाटते. मी कोकणात गणपतीतील भजने पाहिली आहेत, त्यावेळचा माहोल अनुभवला आहे. त्यामुळे दशावतार तेथील लोकांसाठी किती जिव्हाळ्याचे प्रकरण असावे हे समजू शकतो.
शेवटचे पथनाट्य वाटावे असे सामाजिक संदेश देण्याचे द्रुश्य मात्र अनावश्यक आणि चित्रपटाची गंभीरता घालवणारे वाटले. पर्यावरणाच्या संरक्षणाचा जो विचार मार्मिक पद्धतीने सांगायची संधी या चित्रपटाने दिली होती ती अशी बाळबोध पद्धतीने सांगण्यात वाया घालवली असे वाटले. तो संदेश या चित्रपटाचा आत्मा होता तो अजून प्रभावी पद्धतीने लोकांच्या मनावर ठसायला हवा होता.
बॅकग्रांऊड म्युजिकबद्दल ट्रेलर बघूनच अपेक्षा फार होत्या. त्याने निराश नाही केले. ना कॅमेरा वर्क वगैरे ईतर तांत्रिक बाबींनी केले. फक्त वर उल्लेखलेली क्लोजअप द्रुश्ये यातून वगळा. उत्तरार्धात संकलन अजून चांगले होऊ शकले असते.
बापलेकाचे गाणे आवशिचो घो फार आवडले. त्यातील शब्दात चित्रपटात दाखवलेल्या बापलेकाच्या नात्याचे सार उतरले आहे. त्यामुळे चित्रपटात अजून आवडले.
रंगपूजा हे दुसरे आवडते गाणे. ते ऐकताना ज्या भावना मनात उतरतात त्या भावना चित्रपटात ज्या ज्या द्रुश्यात जाणवल्या ती द्रुश्ये आवडली.
ऋतुचक्र म्हणून जे रोमँटीक गाणे आहे त्याचा स्वानंदी सरदेसाई मुळे एक वेगळाच फॅन क्लब तयार झाला आहे.
चित्रपटात महेश मांजरेकर सुद्धा आहेत. त्यांची मध्यतरानंतर स्पेशल एंट्री आहे. त्यांना भावखाऊ भुमिका आणि संवाद दिले आहेत. त्यांची आणि प्रभावळकरांची जुगलबंदी अजून बघायला आवडली असती. ते एक कुठेतरी मिस झाले असे वाटले.
छोट्याश्या भुमिकेत भरत जाधव आहेत. आपल्या सर्वांचेच आवडते कलाकार असतील. पण यात ते नकारात्मक भुमिकेत आहेत. आता हे छान की वाईट हे तुम्हीच ठरवा. त्यांच्यासोबत सुनिल तावडे यांना मोठी भुमिका आहे हे बघून मात्र छान वाटले.
अभिनय बेर्डे देखील यात आहे हे मला आताच समजले. चित्रपटात मी त्याला ओळखलेच नाही. तसे तर नकारात्मक भुमिकेत होता, पण आधी कल्पना असती तर कदाचित लक्ष्याचा मुलगा म्हणून एक जिव्हाळा वाटला असता.
सस्पेन्स आणि थरारनाट्य असलेल्या चित्रपटात पटकथा घट्ट बांधलेली असावी आणि लूपहोल कमीत कमी असावेत अशी ढोबळमानाने अपेक्षा असते. यात त्या अनुषंगाने फार विचार केला असे वाटत नाही. त्यामुळे एखाद्याने शोधल्यास चटकन काही लूपहोल सापडतील. चित्रपट प्रेक्षकांना आवडल्यास त्यांना याचे काही घेणे देणे नसते हे ही तितकेच खरे. पण न आवडल्यास मात्र काही खरे नाही.
कोणाला कुठला चित्रपट आवडेल आणि त्यात नेमके काय आवडेल हे अगदीच वैयक्तिक असते. मला जिथे पुर्वार्ध आवडला आणि उत्तरार्धाने माझ्या अपेक्षा पुर्ण केल्या नाहीत असे वाटले तिथे माझ्यासोबत पुर्वार्ध संथ वाटून उत्तरार्ध नाट्यमय म्हणून जास्त आवडणारे देखील होते.
जर तुम्हाला दोन्हीपैकी एखादे अर्ध आवडणे पुरेसे असेल तर चित्रपट थिएटरात जाऊन बघायला हरकत नाही. किंबहुना मी म्हणतो बघूनच या. म्हणजे चर्चा करता येईल. प्रत्येकाची वेगवेगळी मते वाचायला आवडतील 
धन्यवाद,
- तुमचा अभिषेक
रॉय
रॉय

झी ५ वर आला आहे ना आता
झी ५ वर आला आहे ना आता
हो. बघितला. लेखाशी पूर्ण सहमत
हो. बघितला. लेखाशी पूर्ण सहमत.
मी ही झी५ वर बघितला. बहुतांश
मी ही झी५ वर बघितला. बहुतांश आवडला मला. कामे सर्वांचीच मस्त आहेत. ते बापलेकाचे गाणे आणि रंगपूजा दोन्ही छान आहेत. तिसरे ते रोमॅण्टिक वाले लक्षात नाही. मी पळवले बहुधा. पहिल्या अर्ध्या भागातील दशावतार किंवा नाटकांमधले प्रसंग व त्यातली गाणी अस्सल वाटतात. त्यामानाने शेवटचे हनुमानाच्या सीनच्या वेळचे नृत्य एकदम कोरिओग्राफ्ड वाटून उपरे वाटते, निदान सुरूवातीला.
मलाही तो शेवटचा सीन आवडला नाही. जनता मशाली वगैरे घेउन क्रांती करत आहेत हे एकदम ६०ज ७०ज टाइप झाले. त्यातील संवाद व सादरीकरण बाळबोध वाटते हे बरोबर.
नाना वयामुळे कदाचित जास्त सूट झाला असता पण नाना सूड घेईल यात आश्चर्य वाटले नसते
दिलीप प्रभावळकरच्या बाबतीत ते इतके ऑब्व्हियस वाटत नाही. अभिनयात तो कोठेही कमी पडलेला नाही हे नक्की. मात्र त्याचे वय, चालणे ई पाहता पुढे पुढे दाखवले आहे ते तो घडवून आणू शकेल असे वाटत नाही.
सुरूवातीची कोकणी हेल असलेली मराठी फार मस्त वाटते ऐकायला रत्नागिरीत व तेथील लोकांच्या बोलण्यात ऐकली आहे. बापलेकाचे सीन्स सुंदर आहेत. माधव साकारताना तेथेही टिपिकल बंडखोर मुलाची टेम्प्लेट वापरली नाही हे चांगले केले आहे.
स्पॉइलरः तांडेलचे पात्र कृत्रिम वाटते. तो त्या मातीतलाच आहे. जरी स्वार्थासाठी खाणवाल्यांना सामील झाला, तरी इतका निर्ढावलेला असेल असे वाटत नाही. त्याचे संबंध यांच्याशी चांगले दाखवले आहेत. तो नाईलाज म्हणून विरोध करताना दाखवला असता तर जास्त विश्वासार्ह वाटला असता. इथे तो फिल्मी वाटतो. पण रवी काळे बर्याच दिवसांनी दिसला. काम चांगले करतो तो.
अभिनय बेर्डे देखील यात आहे हे मला आताच समजले. चित्रपटात मी त्याला ओळखलेच नाही. तसे तर नकारात्मक भुमिकेत होता, पण आधी कल्पना असती तर कदाचित लक्ष्याचा मुलगा म्हणून एक जिव्हाळा वाटला असता. >>> अरे मी तर सुरूवातीला नावही पाहिले होते नामावलीत, तरीही ते कॅरेक्टर पाहताना आठवले नाही. मग शेवटी पात्राचे नाव व कलाकारांची नावे एकत्र दाखवली तेव्हा लक्षात आले
फा +१२३
फा +१२३
>>>>>हा माणूस खरा अभिनेता आहे
>>>>>हा माणूस खरा अभिनेता आहे याची खात्री पटते.
भरत जाधव गुणी अभिनेता आहे.
दशावतार काल अर्धा पाहीला. उरलेला मग.
प्रभावळकर दशावतारी आहेत. नट,
प्रभावळकर दशावतारी आहेत. नट, भूमिका करणे आणि त्यात अवतार वगैरे ची भूमिका, प्रत्यक्ष अवतात.... असं जॉईनिंग द डॉट्स मी समजुन घेतलं. आणि बाबुली ते करतोय असं मला कधीच वाटलं नाही तरी तो परिणाम पटला आणि चित्रपट आवडला.
त्यात दशावताराच्या आरती सारखे सहावा अवतार परशु- राम प्रकटला, सातवे अवतारी बळीच्या दाराला जाशी करत टिकमार्क करत बसलेले नाहीत हे ही आवडलेलं. जे अवतार कथेत बसत होते त्यांना बसवलं आहे. अंकलिपीचे पुस्तक केलेलं नाही.
मला चित्रपट बघताना मजा आलेली आठवते. प्रभावळकरांचे वय, अभिनय, शक्ती यात काही उणं जाणवलेलं आठवत नाही. ती मुलगी तर आवडलेलीच होती. कोकणातील मुली अशाच बघितलेल्या आहेत.
त्यात दशावताराच्या आरती सारखे
त्यात दशावताराच्या आरती सारखे सहावा अवतार परशु- राम प्रकटला, सातवे अवतारी बळीच्या दाराला जाशी करत टिकमार्क करत बसलेले नाहीत हे ही आवडलेलं. जे अवतार कथेत बसत होते त्यांना बसवलं आहे. अंकलिपीचे पुस्तक केलेलं नाही. +१२३
आरती सारखे सहावा अवतार परशु-
आरती सारखे सहावा अवतार परशु- राम प्रकटला, सातवे अवतारी बळीच्या दाराला जाशी करत टिकमार्क करत बसलेले नाहीत >>
त्यात तू खुबीने परशु- राम असा चालीमुळे होणारा यतिभंग अचूक पकडला आहेस. त्यासाठी स्पेशल
सहावा अवतार परशु- राम प्रकटला
सहावा अवतार परशु- राम प्रकटला, सातवे अवतारी बळीच्या दाराला जाशी करत टिकमार्क करत बसलेले नाहीत हे ही आवडलेलं >>> आवडलं म्हणण्यापेक्षा मी सुटकेचा निश्वास सोडला. पहिल्या बळीनंतर मला खरच भिती वाटली होती की आता हा बालीशपणा किमान ९ वेळा पहावा लागणार आणि कदाचीत बाबुली हाच कल्की असे दाखवून दहावा बळी पण दाखवतील.
जे अवतार कथेत बसत होते त्यांना बसवलं आहे. >>> दोन अवतार अगदी बालीशपणे बसवले आहेत. कुणाला कुठला अवतार मारणार हे आधीच समजतं, त्यात नाट्यमयता उरतच नाही. नरसिंह अवतार आणण्यामागचा संदर्भ मात्र लागलाच नाही.
परशु- राम असा चालीमुळे होणारा यतिभंग अचूक पकडला आहेस. >>> +१
विषय दशावतार आहे म्हणुन इथे
विषय दशावतार आहे म्हणुन इथे लिहुन ठेवते. मलाही हे माहित नव्हते.
तुलसी विवाह झाला की दुसर्या दिवसापासुन कोकणातल्या जत्रा सुरु होतात. सगळ्या गावात एकदम जत्रा असे नसते तर क्रमाक्रमाने गावागावात जत्रा असतात. दशावतारी नाटक हा जत्रेतील एक कुळाचार असतो, हे नाटक करावेच लागते. तशी श्रद्धा आहे.
आ़णि ही नाटके नेहमीच खुप उशिरा सुरु करतात. आमच्या गावात तिन जत्रा असुनही मी एकही नाटक पाहु शकलेले नाही कारण ते रात्री २ च्या सुमारास सुरु होते.
माझा मामा त्याच्या आजोळच्या व इथल्या गावातल्या जत्रा व नाटक दोन्ही सोडत नाही, आता वय आहे ८० वर्षे. माझ्या पणजोळची जत्रा गेल्या आठवड्यात होती ती त्याने कॅलेंडर नीट न पाहिल्याने त्याची चुकली हे त्याला काल कळले आणि त्यामुळे तो हळहळत होता.
जत्रेचा विषय निघाला तेव्हा मी त्याला म्हटले हे लोक जरा लौकर नाटक सुरु करतील तर मीही पाहु शकेन. रात्री २ पर्यंत वाट पाहणे मला शक्य होत नाही.
तेव्हा मामा म्हणाला ते शक्य नाही कारण नाटक संपल्यानंतर पुढचा कुळाचार देवळात करायचा असतो त्याची वेळ सकाळी सहाची असते. त्यामुळे नाटक २ ला सुरु करुन सकाळी पाच साडेपाचपर्यंत संपवतात. मेकप उतरवुन देवळात एक दहीहंडी बांधलेली असते ती सहा वाजता फोडतात आणि मग पेटारा उचलुन जातात. हे दहीहंडीचे मी कधी ऐकले नव्हते. तो म्हणाला हे करावेच लागते. ह्याला धयकालो म्हणतात. तेव्हा मला आठवले माझे वडिल वगैरे त्या पिढीतले कधी दशावतारी नाटक म्हणायचे नाही तर धयकालो कधी ही चर्चा करायचे. कोकणावर आधारीत साहित्यात पण धयकालो शब्द वाचलाय पण त्याचा दशावतारी नाटकाशी संबंध आहे हे माहित नव्हते. पावसाळ्यात कृष्णजन्मानंतरही धयकालो असतो.
हा एक मस्त लेख सापडला
https://majhasindhudurg.wordpress.com/2015/11/21/konkantalodhaykalo/
साधना फार छान माहिती.
साधना फार छान माहिती दिलीस.
साधना! वस्त्र हरण आठवल.
साधना!
वस्त्र हरण आठवल.
साधना , चांगली माहिती
साधना , चांगली माहिती धन्यवाद!
लेख वाचते..
साधना हा लेख फारच आवडला.
साधना हा लेख फारच आवडला. मालवणीतच लिहिलेला असल्याने वाचायला जाम मजा आली.
यात शेवटी दहिकाल्याचो उल्लेख रवाक! पण फोटो, व्हिडिओ आणि भाषा या सगळ्यामुळे वातावरण निर्मिती एकदम मस्त केली आहे.
छान आहे तो लेख! दशावतारी
छान आहे तो लेख! दशावतारी नाटकातले बहुतेक संवाद हे मुद्दाम लिहिलेले नसून उस्फूर्त घेतात , हे फार मस्त वाटते. काम करणार्यांना अनुभव आणि वर्षानुवर्षाची परंपरा असल्यामु़ळे हे सर्व झकास मिळून येतेही! ती कोकणी भजनं पण किती मस्त वाटतात ऐकायला. बेसिक पेटी , तबला /ढोलकी वाजवणारे , गाणारे , नाटकात कामे करणारे, शिवाय तो मेक अप वगैरे - किती प्रकारच्या कला अनेकांच्या अंगी असतात किंवा जोपासल्या जातात हे फार सुंदर वाटते,
बहुतेक संवाद हे मुद्दाम
बहुतेक संवाद हे मुद्दाम लिहिलेले नसून उस्फूर्त घेतात , हे फार मस्त वाटते>>> मला वाटतं त्याच्यामुळे त्यातील ताजेपणा, उत्साह , सहजता टिकून राहते.
बहुतेक लोककलांबाबत असेच असावे.. गोंधळ , खेळे मध्ये ही बघितले / अनुभवले आहे.
***
साधना तुम्ही तो लेख इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद! खूप आवडला.
मनोरंजक आणि माहितीपर!
*"
काही आठवड्यांपूर्वी पुण्यामध्ये ( माझ्या आठवणी प्रमाणे भाडिपा ने ?) दशावताराचे काही (?) प्रयोग लावले होते. कोकणातून आलेले दशावतारी कलाकार त्यात होते.
दिलीप प्रभावळकरांनी त्यांच्या मुलाखतींमधून अनेकदा कौतुकाने उल्लेख केला होता,कलाकारांनी स्वतःचा कपडेपट सांभाळणे, मेकअप/रंगरंगोटी करणे या सगळ्याचा. दशावतार चित्रपटामुळे या लोककलेला उत्तेजन ( कलाकारांना चांगले मानधन etc. ) मिळावे याचा.
या कलाकारांना वर्षभर काम
या कलाकारांना वर्षभर काम उपलब्ध होत नाही. जत्रेचे तिनचार महिने काम असते आणि पुर्ण कोकणात १०-१२ किंवा त्याहुन कमी कंपन्या असाव्यात ज्यात हे काम विभागुन जाते. हा लोककलेचा वारसा आहे. इतर वेळी यातले कलाकार इतरांसारखीच सुतार, गवंडी, लोहार, एलेक्ट्रिशियन अशी कामे करुन पोटे भरतात. यातली कलाही काय खुपच उच्च दर्जाची असते असे नाही. ४० वर्षांपुर्वीपर्यंत जेव्हा रेडिओ हाच मनोरंजनाचा मुख्य आधार होता तेव्हा तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने यांनी खुप मनोरंजन केले. तेव्हा नाटकाला पुर्ण गाव लोटायचा. आज ४०-५० लोक जरी जमले तरी खुप गर्दी झाली म्हणतात. पण लोकांवर प्रचंड गारुड आजही आहे हे महत्वाचे. माझ्या घरातली बच्चे कंपनी घरात दशावतारी प्रयोग लावते. शाळेत स्नेहसंमेलनात गेल्या वर्षी दशावतारी नाटक बसवले होते त्यात मुलांनी मस्त पात्रे रंगलेली. असा आश्रय अजुन या कलेला आहे तोवर मरण नाही. बाकी मानधन वगैरे म्हणायचे तर कोकणात या बाबतीत सगळ्यांचीच रड आहे पण तरी दशावतार्यांना ऐपतीप्रमाणे देतात.
साधना मस्त माहिती व लेख.
साधना मस्त माहिती व लेख.
छान लेख. शेअर केल्याबद्दल
छान लेख. शेअर केल्याबद्दल धन्यवाद, साधना.
तो लेख वाचताना ( आणि दशावतार
तो लेख वाचताना ( आणि दशावतार बघताना) मला आठवले ते नमन - खेळे.
माझ्या आठवणीत लहान असताना कधीतरी पाहिले होते - (गुहागर तालुक्यात) ते खेळे आठवले.
ते ही दशावतारा सारखेच परंतु छोटेखानी असतात कमी वेळ चालणारे, कमी रंगरंगोटीचे..
अंगणात एका बाजूलाही मंडळी सदर करतात आणि समोर प्रेक्षक बसतात. मला वेळ आठवत नाही पण रात्री उशिरा दिव्याच्या उजेडात कार्यक्रम होतो.
सुरुवातीला नमन - " पह्यलं नमन.." ह्या गाण्याने होते. - गणपती,रिद्धी-सिद्धी नाचत येतात, त्यांच्या मागे पडदा धरला जातो.. सगळेच नाचत असतात.
मग आठवतो तो शंखसुराचा प्रवेश. आमच्यापेक्षा थोड्या मोठ्या एका मामानेच ते पात्र केलं होतं. त्याचा पोशाख वरील लेखातील शंकासुरापेक्षा वेगळा होता. त्या शंख सुराच्या हातात एक छोटा दोरखंड होता आणि तो हवेत फिरवायचा आणि मध्येच येऊन प्रेक्षकांमध्ये कोणीतरी डोक्यावर टपली मारून जायचा. आता मला पूर्ण डिटेल मध्ये आठवत नाहीये पण एकंदर खूप धमाल चालली होती. त्यावेळी सुरुवातीला भीती वाटलेली शंकासुराची, त्याचं रूप बघून, पण तो मामा होता हे आधी सगळ्यांना माहिती होत.
स्त्रियांचे कामही पुरुषच साड्या नेसून करत होते.त्यानंतर मग बहुतेक गोपी/ पेंद्या असे काही झाले. मला सगळे बारकावे आठवत नाहीत .
पण मजा आलेली आणि तोपर्यंत असं कधी काही अनुभवलं नव्हतं.
खेळे शिमग्याला तसेच घरातील एखाद्या शुभकार्यनंतर करविले जातात.
थोडी माहिती काढल्यावर कळले की दशावतार आणि खेळे, कर्नाटकातील ‘यक्षगान’ या मूळ प्रकारापासून कोकणात आले. पैकी दशावतार तळ कोकणात ( दक्षिण कोकणात) तर खेळे उत्तर कोकणात प्रचलित झाले..
धन्यवाद सगळ्यांचे.
धन्यवाद सगळ्यांचे.
आमच्या गावात होळीच्या आधी जती गातात. दर रात्री सगळे जमतात. जती गाणारे बाकड्यांवर बसतात. समोर थोडी मोकळी जागा. ज्यांना भाग घ्यायचाय ते येऊन गाणी गाऊन भाग घेतात. कोणीच नसते तेव्हा बाकड्यांवर बसलेले गातात. विषय गावातल्यांची थट्टा मस्करी हेच असतात. मुळ गाण्यात आपले थोडे आधिकचे गाणे घुसवुन मनोरंजन करायचे.
खालचा विडुओ आमच्याच गावातला आहे. हे गावातले मुख्य घर. सगळे महत्वाचे, एकत्र येऊन साजरे करायचे सण इथे साजरे होतात.
https://youtu.be/FUWfNu3_WWg?si=l1CDs80nNEXpZL33
साधना, खूप छान माहिती दिली
साधना, खूप छान माहिती दिली आहे.
दशावतार करणारे कलाकार गरीबच राहतात हे ऐकून माहिती आहे.
काही अमेरिकन मित्रांनी दशावतार पाहिला. त्या आधी त्यांनी दशावतार म्हणजे काय हे समजून घेतलं. त्यांना बेहद्द आवडली कॉन्सेप्ट.
कमी खर्चात दर्जेदार कण्टेण्ट असा अभिप्राय आहे त्यांचा. ( मीच पाहिला नाही अजून. फिरत फिरत मोबाईलवर बघायचा पिक्चर नाही म्हणून.)
आपले चित्रपटविषयक लेखन चांगले
आपले चित्रपटविषयक लेखन चांगले आहे.
वर्तमानपत्रात लिहीता काय ?
काल पाहिला एकदाचा दशावतार.
काल पाहिला एकदाचा दशावतार. थिएटर मध्ये बघायला आवडला असता, तरी पण मला बराच आवडला हा.
सुरुवात ते जे काजवे चमकून झाली, तिथे मला वाटलं मनमंदिरा गाणं सुरू होतं की काय! पूर्ण पिक्चरभर काजवे आणि काळा बिबट्या फारच जेमतेम प्रतीच्या VFX ने बनवलेत. जंगलाचा top view थेट पहिल्या कांताराची आठवण करून देतो.
बऱ्याच बाळबोध गोष्टी आहेत. माधवला काय उद्योग चाललेत हे नेमकं माहित असतानाही तो फक्त "काहीतरी शिजतंय" असं उगीचच मोघम बोलतो. रंगपूजा गाणं खूप छान आहे, पण तिथे बाबुलीला लिप सिंक करायला नको होतं. तो आवाज एक तर सूट होत नाही, आणि ते नीट जुळलेलं नाहीये. मला तर एकदा वाटलं की भीष्म काहीतरी मंत्र म्हणतोय. बाकी पुढे व्हीलन पात्रांना नक्की कोण मारतं आहे, हे प्रेक्षकांना माहित आहे आणि कथेत पडद्यावर निदान पोलिस आणि मुकादम यांना माहीत आहे तरी नंतर ममा आल्यावर कसा उलगडा करतात हे जणुकाही साप्ताहिक सकाळमध्ये पूर्वी शेवटच्या पानावरचे इ प्रधान असल्याच्या थाटात दाखवलं आहे, ते बघताना मजा येत नाही. बाकी सर्व प्लॉट मराठी पद्धतीचा, पण ममा आल्यावर त्या पात्रापुरता चित्रपटाचा बाज साऊथ इंडियन होऊन जातो. बहुतेक ममांनी तशी मागणी केली असणार. बघता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश असताना बघून पण गोळ्या न घालणं खटकतं. शेवटी वंदूचे "जनता" वगैरे शब्दातले भाषण तर धन्यवाद आहे. क्लायमॅक्सला पोहोचलेला पिक्चर तिनं पाडलाय (सॉरी हा स्पॉयलर होता. बहुधा वंदू हीच स्पॉयलर आहे).
प्रभावळकर यांचं काम भारी. त्यांच्यासाठी लिहिलेली भूमिका आहे. अनेक ठिकाणी त्यांनी कमाल केली आहे. विशेषतः भीष्माच्या पोशाखात असताना बातमी आल्यावर ते खिन्न होऊन डोळे मोठ्ठे करून एकटक बघत बसतात, तिथे विजा चमकतात असा सीन आहे. इतके प्रखर दिवे उघडझाप करत असताना डोळे मोठे आणि उघडे करून ठेवणे, ते पण त्या वेळचे हावभाव बदलू न देता, सोपे नाही. संगीत छान आहे, पार्श्वसंगीत सुद्धा. मूळ कथा चांगली आहे. पिक्चरायझेशन आवडलं. ते मोठ्या पडद्यावर फार छान दिसलं असणार आहे. एकंदर पिक्चर छान आहे.
दशावतार झाला.
दशावतार झाला.
आता काही दिवसांपासून ' गोंधळ ' चित्रपटा विषयी ही चांगल ऐकायला मिळतंय.
देवखेळ - गुंतवून ठेवणारा!
देवखेळ - गुंतवून ठेवणारा!
दशावतार बघितल्यावर कधीतरी कोकणात पाहिलेल्या नमन/ खेळे आणि शंखासू राची ही आठवण झाली.
देवखेळ ही वेबसिरीज कोकणातील शिमगा, पालखी, खेळे आणिं त्यात नाचणारा शंखासूर याभोवती केंद्रित आहे.
देवतली, गावात शिमग्याला गावातील एका पापी माणसाला, अवचित येऊन शंखासुर मारतो… कधी, कसा याविषयी कोणाला थांगपत्ता लागत नाही, पण दुसऱ्या दिवशी प्रेत सापडते. सलग पंधरा वर्ष हा प्रकार चालू असतो, पण रूढींच्या भीतीमुळे, जन प्रक्षोभाच्या भीतीने त्या केसेस अशाच बंद केल्या जातात.
त्या गावात नव्याने बदली झालेला अंकुश चौधरी ( इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे) याच्यावर याचा तपास करण्याची जबाबदारी येऊन पडते.. तो ती कशी पार पडतो, शंखासुराचे सत्य जे असते, खून होत असतात की काही अमानवी शक्ती कार्यरत असते.. सिरीज बघितलेत की कळेल. २५ मिनिटांचा एक एपिसोड , असे ७ एपिसोड आहेत.
मला आवडली .
अंकुश चौधरीने चांगल काम केलंय. बऱ्याच वर्षांनी, त्याच काम बघायला मिळालं. प्राजक्ता माळी, अरुण नलावडे, यतीन कारेकर यांची कामेही चांगली झाली आहेत. पण त्यांच्या भूमिका खूप कमी लांबीच्या आहेत.
लहानपणी जेव्हा शंखासुर बघितला हित तेव्हा प्रथम मनात भीती वाटली होती. ते भीती किंवा गुढतेचे वलय इथेही वाटत राहते.
कोकण दर्शन फारच नेत्रसुखद! सगळ्यात भावल ते संगीत - लोकसंगीताचा बाज, असलेल गूढता, धूसरता या छटा ही जाणवत राहतात.
मातीतले विषय घेऊन थोडी हटके आणि थोडी वेगवान अशी ही सिरीज आवडली.
Pages