बेपत्ता बायको, आरोपी नवरा आणि शून्य खून-पुरावा !

Submitted by हेमंतकुमार on 24 September, 2025 - 12:14

धागा अद्यतन व पुनर्लेखन : १० ऑक्टोबर.
. .

15 डिसेंबर 2020 . . .
जगभरात कोविड-19ने थैमान घातलेले, बहुतेक देशांत अधूनमधून टाळेबंदीचे वातावरण आणि जनता हवालदिल झालेली. त्या दिवशी मध्यरात्री फ्रान्समधील एका गावात एक चक्रावून टाकणारी अन् मती गुंग करणारी घटना घडली.
चाळीशीतल्या Jubillar जोडप्यातली पत्नी त्या मध्यरात्रीपासून बेपत्ता आहे. गेल्या पाच वर्षात तिचा ठावठिकाणा लागलेला नाही आणि तिचे प्रेतसुद्धा मिळालेले नाही - अगदी आपल्याकडचा ‘दृश्यम’ आठवला असेल ना? मात्र पोलिसांनी त्या बाईच्या नवऱ्याला अटक करून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. तो खटला सध्या न्यायालयात चालू आहे.
Cedrik case Main.png
.
काय आहे तरी काय वैशिष्ट्य या प्रकरणाचे ?
बेपत्ता स्त्रीचा ५ वर्षे ठावठिकाणा नाही अन् तिचा मृतदेह आजवर मिळालेला नाही. त्या जोडप्याच्या घरात किंवा आसपास कुठेही खुनाच्या घटनेचा सबळ पुरावा सापडलेला नाही. खुनाचा कुणी प्रत्यक्ष साक्षीदार असण्याचा तर प्रश्नच नाही. बरं कुठलेही प्राणघातक हत्यार देखील त्या घरात मिळालेले नाही, ना कुठे रक्ताचे डाग किंवा डागाळलेले कपडे. मग डीएनए तपासणी तरी करणार कशाची?
दुसऱ्या बाजूला आरोपी नवरा आपण निर्दोष असल्याचे वारंवार सांगतो आहे. असे हे चक्रावून टाकणारे गूढ.

पाहूया घटनाक्रम काय होता तो :
38 वर्षीय सेड्रिक आणि 33 वर्षीय डेल्फिन यांच्या बिघडलेल्या संसाराची ही कहाणी. तो आहे एक चित्रकार व सजावटकार आणि कॅनाबिसचा व्यसनी. तर डेल्फिन जवळच्याच एका रुग्णालयातील नर्स. दोघांचे पटत नव्हते. त्यात डेल्फिनने एका परपुरुषाशी इंटरनेटवरून मैत्री व नंतर जवळीक केलेली. परिणामी या जोडप्याची विभक्त होण्याची तयारी चालू झालेली. या जोडप्याला दोन मुले - घटनेच्या वेळी मोठे सहा वर्षांचे तर धाकटे 18 महिन्यांचे. 15 डिसेंबरच्या मध्यरात्री पासून डेल्फिन गायब असल्याची तक्रार खुद्द तिच्या नवऱ्याने पोलिसांना फोन करून सांगितलेली होती. सकाळी जेव्हा पोलीस त्याच्या घरी आले तेव्हा घरच्या साध्या कपड्यांतला हा गृहस्थ त्याच्या फोनवरील ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये मग्न होता.

त्यानंतर कित्येक दिवस बेपत्ता डेल्फिनचा शोध न लागल्याने पोलिसांनी तिच्या घराच्या आसपासचा प्रदेश अक्षरशः खणून काढला परंतु त्यातून प्रेत अथवा अन्य कोणताही पुरावा अजूनही मिळालेला नाही.
या प्रकरणात आतापर्यंत खुनाचा कुठलाच ठोस पुरावा न मिळाल्याने अफवा आणि कंड्यांना तर स्थानिक परिसरात उत आलाय आणि त्यातून अनेकांच्या डोक्यात भन्नाट गुप्तहेरकथा देखील शिजताहेत.

पोलिसांनी तर त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करता -
सेड्रिकने बायकोचा खून केला आणि नंतर कणभर सुद्धा पुरावा सापडणार नाही याची तजवीज केली. आजवर पोलिसांना अज्ञात व निर्जन जागी प्रेत पुरले. त्याच रात्री घरी परतून पोलिसांना फोनवर शांतपणे बायको बेपत्ता असल्याची माहिती दिली आणि हे सगळे नाट्य घडत असताना त्या जोडप्याची दोन्ही मुले शांतपणे आपल्या खोलीत झोपलेली होती !

ज्याच्यासमोर 'दृश्यम'चा विजय साळगावकर किस झाड की पत्ती वाटावा असा हा वास्तवातील सेड्रीक. काय म्हणावे त्याच्याबद्दल ? अत्यंत बुद्धिमान गुन्हेगार, नशीबवान व्यसनी बुद्दू की गरीब बिचारा निर्दोष नवरा?
न्यायाधीशच याचा निवाडा करतील. दरम्यान खटला तर आता चालू झालाय . . .

फिर्यादी पक्षाकडून १६,००० पानी आरोपपत्र आणि ६५ साक्षीदार तर तयार आहेत.
त्यांचे मुद्दे असे आहेत :
१. या नवरा बायकोचे पटत नसल्यामुळे आणि तिने परपुरुषाशी जवळीक केल्यामुळे नवऱ्याकडे खुनाचा उद्देश (motive) आहे.
२. 15 डिसेंबरच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीरावर शारीरिक झटापटीच्या खुणा होत्या आणि तपासात एक फुटलेला चष्मा मिळाला. त्याच्या शेजाऱ्याने एका बाईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला होता.

३. सेड्रीकच्या भूतपूर्व प्रेयसीने पोलिसांना सांगितले की त्याने तिच्याजवळ खुनाची कबुली दिली होती आणि प्रेताबद्दलही बोलला होता.
४. या जोडप्याच्या मोठ्या मुलाच्या म्हणण्यानुसार त्याने आई-वडिलांची झटापट आणि धक्काबुक्की पाहिली होती. आता तो बापाकडे रागाने बघत म्हणतो आहे,
" होय, यानेच माझ्या आईला मारले".

४. डेल्फिनच्या नातेवाईकांच्या साक्षीपुराव्यांमधून Cédric हा माणूस एक निर्दयी पती व पिता असल्याचे कोर्टासमोर मांडले गेले आहे.

५. या सुनावणीत पोलीस दलातील तज्ञ तपासनीसांनी जो डिजिटल डेटा सादर केलाय त्यानुसार, डेल्फिन स्वतःहून निघून गेली किंवा प्रियकराने वा अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले, या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात तिच्या नवऱ्याचा(च) हात असावा अशी शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. डेलफिनच्या नातेवाईकांच्या साक्षीनुसार आरोपी हा क्रूर पती व पिता आहेच !

परंतु…
आरोपी अर्थातच आपण निर्दोष असल्याचा पुनरुच्चार करतो आहे आणि
गेल्या पाच वर्षात प्रेत अथवा अन्य कोणताही सबळ पुरावा न मिळणे ही बचाव पक्षाची महत्त्वाची बाजू आहे. त्याच्या जवळच्या मित्राने दिलेल्या साक्षीनुसार, हा आरोपी 'भुंकणाऱ्या कुत्र्यासारखा असून तो चावणारा नाही' असे सांगितले गेले आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून पाहता तिचा खून हे पोलिसांनी रचलेले कुभांड आहे ! अज्ञान मुलाची साक्ष ग्राह्य धरली तरी त्याचे महत्त्व मारहाणीच्या गुन्ह्यापर्यंत असेल.
बायकोशी पटत नसलेला व्यसनी सेड्रिक खरंच तिच्या खुनापर्यन्त मजल मारू शकतो का, या प्रश्नाभोवतीच खटला एकवटला आहे. यातून खुनाचा परिस्थितीजन्य पुरावा समोर येऊ शकेल ?
अशा गुन्ह्यात जेव्हा प्रेत किंवा हत्यार मिळत नाही आणि खुनाची जागाही सिद्ध करता येत नाही तेव्हा कायद्यातील "bundle of serious and consistent evidence" या तत्त्वानुसार न्यायदान केले जाते.
. . .
कौटुंबिक गुन्हेगारीच्या इतिहासात यापूर्वी देखील अशी अनेक प्रकरणे जगभरात घडलेली आहे त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकरणे आता पाहू :
१. प्रेत न सापडून देखील आरोपीवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याची अमेरिकेतली 366 प्रकरणेइथे दिली आहेत. त्यात 90% वेळा आरोपी दोषी ठरले आहेत.
एका प्रकरणात तर बायको बेपत्ता झाल्यानंतर 40 वर्षांनी तिच्या नवऱ्याला दोषी ठरवलं गेलं आहे.

२. इंग्लंडमधले एक प्रकरण
तर भन्नाटच आहे. या खुन्याने अनेकांना मारून नंतर त्यांची हाडे ऍसिडचा वापर करून नष्ट केली होती. परंतु त्याच्या शेवटच्या खुनामध्ये संबंधित मृताचा कृत्रिम दात सापडला. तो संबंधित दंतवैद्याने ओळखला आणि हा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले व फासावर चढवले.

म्हणजेच अशा प्रकरणांमध्ये परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधाराने आरोपीला दोषी ठरवतात असे दिसते.
आतापर्यंत यासारख्या घटनांनी अनेक लेखक आणि चित्रपट दिग्दर्शकांना थरारक गुन्हेगारीपटासाठी खाद्य पुरवलेले आहे. नमुन्यादाखल अशा एका गाजलेल्या कलाकृतीचा आता कानोसा घेऊ.
. .
Rear Window
हिचकॉकचा हा मूळ चित्रपट 1954 चा आहे.
Rear_Window_film_poster.jpg
जायबंदी झालेला एक फोटोग्राफर प्लास्टरमधला आपला पाय संभाळत वेळ जाण्यासाठी खिडकीतून समोरच्या बिल्डिंग मधीलहालचाली बघत बसलेला असतो. अचानक एका माणसाच्या संशयास्पद वागण्याने त्याचं कुतूहल जागृत होतं .त्यातूनच त्या माणसाने बायकोचा खून करून तिचं प्रेत खालच्या बागेत पुरलं असावं असा त्याला संशय येतो व तो खराही ठरतो. अप्रतिम दिग्दर्शन व नायकाच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तो सिनेमा अविस्मरणीय होतो. पूर्वी हा सिनेमा ज्यांनी थेटरात पाहिला होता त्यांनी सांगितलय की, जेव्हा तो खुनी माणूस नायकाला मारण्यासाठी म्हणून त्याच्या घराकडे येऊ लागतो तेव्हा थेटरमध्ये भयाण शांतता होती आणि सगळेजण अगदी श्वास रोखून स्तब्धपणे पडद्याकडे बघत होते. हिचकॉकना उत्कंठावर्धक रहस्यपटांचा बादशहा म्हटले जाते ते उगाच नाही.

या चित्रपटाची १९९८ मधली टीव्ही आवृत्ती युट्युबवर असून तिची वास्तव कथा स्तिमित करणारी आहे. Christopher Reeve हा अमेरिकी अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यात घोड्यावरून पडल्याने पॅरालिसीस होऊन जायबंदी होतो. हीच खरीखुरी भूमिका करत त्याने रेअर विंडोची टीव्ही आवृत्ती सादर केलेली आहे.
अप्रतिम अभिनय ! जरूर बघा : https://www.youtube.com/watch?v=cxHT2vhHDb4

वास्तवात या अभिनेत्याने दिव्यांग जीवन वाट्याला आल्यावर व्हीलचेअरवर बसून मणक्याच्या अपघातांसंबंधी संशोधन केलेले आहे, ज्यामध्ये मूळ पेशींच्या संशोधनाचा देखील समावेश आहे. हेही कौतुकास्पद !
. .

नवराबायकोतील बेबनावातून यासारख्या अमानुष घटना जगात अधूनमधून घडणे हे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. अशा प्रकरणातील आरोप सिद्ध झालेल्या गुन्हेगारांना कडक शासन मिळाले पाहिजेच. दीर्घकाळ बेपत्ता बायकोच्या संशयित खुनाचा भक्कम पुरावा नसलेल्या प्रस्तुत खटल्याच्या निकालाची आता प्रतीक्षा आहे.
****************************************************************************
संदर्भ :
१. https://www.bbc.com/news/articles/cz69nppezlzo
२.https://www.midilibre.fr/2025/09/30/direct-proces-de-cedric-jubillar-que...

चित्रसौजन्य : सरलनामा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक प्रकरण आहे
Online प्रियकर देखील suspect असू शकतो म्हणा

Self-declared investigators have set up countless chat groups where they swap theories and share testimony – much to the irritation of police and families.

"These groups are the equivalent of the bistro counter – but with more people," said psychoanalyst Patrick Avrane, author of a book on attitudes to crime.

बीबीसीच्या बातमीतला हा भाग वाचून मला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आठवलं. आपल्याकडेही हेच चाललं होतं. त्या लोकांना अजूनही अधूनमधून कढ येत असतात. मायबोलीवरही त्याबद्दल धागा होता.

*भाऊंकडे खजिना आहे या प्रकाराचा * - शाळा, कॉलेज व नंतरही आमच्या कंपूने अगणित इंग्लिश सिनेमा पाहिले , बहुतेक रविवारचे मॉर्निंग शो म्हणून; त्यातले कांहीं ह्या प्रकारातले असणं अपरिहार्य होतं, इतकंच ! संदर्भ आला तर नेमके ते अजूनही आठवतात, ही बाप्पाची कृपा !!! Wink

Rear Window >>>
माझ्या मामाने हा सिनेमा थेटरात पाहिला होता. त्यांने सांगितले की जेव्हा तो खुनी माणूस हिरोला मारण्यासाठी म्हणून त्याच्या घराकडे येऊ लागतो तेव्हा थेटरमध्ये भयाण शांतता होती आणि सगळेजण अगदी श्वास रोखून स्तब्धपणे पडद्याकडे बघत होते.
हिचकॉक इज हिचकॉक!

या जोडप्याला दोन मुले - घटनेच्या वेळी मोठे 18 महिन्याचे >> १८ महिन्याच्या मुलाच्या आठवणींची साक्ष ग्राह्य धरतील ?

* या जोडप्याला दोन मुले
>>> क्षमस्व ! बातमीतले मूळ वाक्य असे आहे :
The couple had two children, aged six and 18 months.
मी नजरचुकीने दोघांचीही वये महिन्यात समजलो.

घटनेच्या वेळी : बहुधा मोठ्याचे सहा वर्षे असे घ्यावे लागेल. ?
मूळ लेखात पण दुरुस्ती करतो आहे.

रंजक आहे हे प्रकरण.
आपल्याकडे निरपराध आयुष्यभर खिचपत पडतात तुरुंगात आणि आयुष्याच्या शेवटी निर्दोष सुटलेले आहेत. अशा केसेस मध्ये खरंतर ज्यांनी त्याला खोट्या केसमध्ये गोवलं त्यांना देहदंड अथवा त्या माणसाने भोगली तेवढी सजा व्हायला हवी.
एक ऐकीव किस्सा. असाच एक निरपराध मनुष्य कोर्ट खूप वर्षांनी निर्दोष मुक्त करते. तेव्हा न्यायाधीश त्या माणसाला विचारतात तुला काही सांगायचंय का तो म्हणतो तुम्ही हवालदार असायला हवे . कोर्ट खजील होते.‌ विचारते का?
तो उत्तरतो माझ्याकडे ५०००/- रुपये नव्हते हवालदाराला द्यायला म्हणून माझे आयुष्य तुरुंगात गेले.

घटनेच्या वेळी : बहुधा मोठ्याचे सहा वर्षे असे घ्यावे लागेल. ? >> हा हे जास्त बरोबर वाटते आहे.

रोचक प्रकरण. पुढे काय तपास लागतो याची उत्सुकता.

सजावटकार >> हे designer या अर्थाने लिहिलं आहे का? Designer असेल तर वेगळा अर्थ होतो त्याचा.

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !
. . .
*हे designer या अर्थाने लिहिलं आहे का? >>>
Cédric Jubillar, a 38 year-old painter-decorator

* . पुढे काय तपास लागतो याची उत्सुकता. >> +११
खटला चालू होऊन एक आठवडा उलटलाय. पोलीस दलातील तज्ञ तपासनीसांनी जो डिजिटल डेटा सादर केला त्यानुसार, डेल्फिन स्वतःहून निघून गेली किंवा प्रियकराने वा अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले, या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात तिच्या नवऱ्याचा(च) हात असावा अशी शक्यता व्यक्त केली गेलेली आहे.

डेल्फिनच्या नातेवाईकांच्या साक्षीपुराव्यांमधून Cédric हा माणूस एक निर्दयी पती व पिता असल्याचे कोर्टासमोर मांडले गेले आहे.
आरोपी अर्थातच आपण निर्दोष असल्याचा पुनरुच्चार करतो आहे.

ज्युरी ट्रायल आहे की फक्त जज असेल, ते कळले नाही. ज्युरी असेल तर आरोपी सुटायची शक्यता जास्त आहे.
फ्रान्स मधील नियम काय आहेत ते माहीत नाही. Beyond a reasonable doubt हा प्रकार असेल आणि बचाव पक्षाचा वकील चांगला असेल, तर आरोपी सुटू शकेल. पण माझ्यामते एव्हाना सहानुभूती त्या स्त्रीला मिळाली असण्याची दाट शक्यता वाटते, त्यामुळे आरोपीला बळीचा बकरा बनवून दोषी ठरवले जाईल.
( मृतदेह गायब करणे, हे वाटते तितके सोपे नसते. विशेषत: पूर्वनियोजित खून नसेल तर. माझ्या मते साधी कबर खणून प्रेत पुरायला किती वेळ आणि कष्ट लागतील, याची नुसती कल्पना जरी केली तरी अंदाज येईल की ते किती कठीण काम आहे ते.)

ज्युरी ट्रायल दिसते आहे : Assize Court

https://en.wikipedia.org/wiki/Cour_d%27assises#:~:text=For%20other%20use....

अशा गुन्ह्यात जेव्हा प्रेत किंवा हत्यार मिळत नाही आणि खुनाची जागाही सिद्ध करता येत नाही तेव्हा कायद्यातील "bundle of serious and consistent evidence" या तत्त्वानुसार न्यायदान केले जाते.
https://www.midilibre.fr/2025/09/26/affaire-jubillar-quest-ce-quun-faisc...

bundle of serious and consistent evidence >>
दिलेल्या बातमीची लिंक भाषांतर करून वाचली. bundle of serious and consistent evidence नुसार prosecution ला केस करता येते, हे मान्य आहे. पण Burden of proof सुद्धा prosecution वरच असले पाहिजे. त्यांनी निःसंदिग्धपणे आरोप सिद्ध केला पाहिजे ( beyond a reasonable doubt ) अर्थात फ्रान्स मधले नियम काय आहेत ते माहीत नाही. अन्यथा Amanda Knox प्रमाणे आरोपीला बळीचा बकरा बनवला जाईल, हीच शक्यता जास्त वाटते.

वर उल्लेख आला का माहित नाही. फ्रेडरिक फोर्सिथ किंवा जेफ्री आर्चर दोघांपैकी एकाची कथा होती.

एका गावात रस्तारुंदीकरणात एका विक्षिप्त म्हातार्‍याचे घर जाते. खणायला घेतात तर एक सापळा सापडतो. म्हातार्याची बायको काही वर्षांपुर्वी गायब झालेली असते. तपास करुनही तेव्हा म्हातार्‍याविरुद्ध काहीही सिद्ध न करता आल्यामुळे तो सुटलेला असतो.

आता त्याला परत अटक होते. तो अजिबात तोंड उघडत नाही पण सगळे शेजारी तोंड उघडतात. कोणाला गायब व्हायच्या आधी भांडण ऐकु आलेले असते, कोणाला तो खड्डा खणताना दिसलेला असतो व.व. सगळा प्रतिभेचा बहर.

दरम्यान त्या सापळ्याची फोरेंसिक तपासणी होते. त्याची उण्ची, वय, दातांची रचना, दोन तिन मुले झाल्याची पेल्विक रचनेवरुन शक्यता वगैरे सगळे बायकोशी न जुळणारे. यांना कधी मुल झालेच नव्हते. याचा अर्थ म्हातारा तिथे यायच्या आधी जो राहात होता त्याने बायकोला मारुन पुरलेले असते. शेजार्‍यांना मग तो आधीचा आठवायला लागतो आणि त्यानेच हे कृत्य केले होते याची खात्री पटुन पोलिस म्हातार्‍या ला सोडतात. म्हातारा या दरम्यान मुक असतो पण तिथेच घराच्या जागी बसुन काम बघत असतो. दुसरे काय काम.

शेवटी त्याच्या घराच्या जागी जेव्हा सिमेंट ओतले जाते त्या रात्री तो समाधानाने तिथुन हलतो. त्याचे गुपित आता कायमचे सिमेंटखाली दबले गेले असते. Happy

* सिमेंटखाली दबले गेले असते >>>
इथे 'दृश्यम'मधल्या पोलीस चौकीचे बांधकाम आठवते.
बऱ्याच ठिकाणी ही कल्पना घेतली गेली असावी . . .

इथे 'दृश्यम'मधल्या पोलीस चौकीचे बांधकाम आठवते.>>> आणी योगा योगाने आज २ ऑक्टोबर पण आहे.

ओ हो ! खंरच की. तो 'सत्संग' 2 ऑक्टोबरचा काय . . .
विसरलोच होतो Happy

( "याद है ना, दो ऑक्टोबर को क्या हुआ था?" )

@भाऊ
तुम्हाला विशेष धन्यवाद देण्यासाठी हा प्रतिसाद. वर तुम्ही Rear window सुचवल्यानंतर मला युट्युबवर Hitchcockचे अन्य चित्रपट देखील मिळाले आणि ते धडाधड बघून टाकले :

  • the 39 steps
  • the lady vanishes
  • dial m for murder
  • Shadow of a doubt

सर्व आवडले हे वे सा ..

या सर्व चित्रपटांची लांबी दीड तास किंवा त्याहून थोडीशीच जास्त आहे. चित्रपटाची आदर्श लांबी किती असावी याबद्दल Alfred Hitchcock यांचे मत रोचक आहे. आदर्श लांबी ठरवताना प्रेक्षकांच्या लघवी रोखून धरण्याच्या सरासरी क्षमतेचा विचार केला जावा, असे ते म्हणायचे !
"The length of a film should be directly proportional to the endurance of the human bladder”.

पटेश !

धन्यवाद हॉलिवूडलां फॉरवर्ड केले ! Wink
*....proportional to the endurance of the human bladder”.*-
Hope nobody thought of selling diapers at the theatre showing Hichcock movie ! Wink
( Hichcock चं आणखी एक वैशिष्ठ्य - तो आपल्या सिनेमात भूमिका साकारत नसे पण मध्येच कुठेतरी रस्ता क्रॉस करताना सिनेमात दिसायचा व चमकून घ्यायचा. तो जाडजूड असल्याने लक्षात यायचा ! )

माझ्याही तरुणपणी खूप जुना समजला जाणारा व खूप मुश्किलीने आम्हाला पहायला मिळालेला suspense चा कळस समजला जाणारा सिनेमा - Wages of Fear ! बघा अजून कुठे यू ट्यूब इ. वर मिळतो का.

* diapers at the theatre >>> ह ह ग लो Happy Happy
भारी !!

तीन तासांच्या भारतीय सिनेमामध्ये दीड तासांच्या मध्यंतराचे रहस्य आज उलगडले. मला वाटायचे पॉपकॉर्न खाण्यासाठी असतो.

आणि हीचकॉकचा भीतीदायक
सिनेमा बघताना डायपरचा दुहेरी उपयोग झाला असता.

अवांतराबद्दल क्षमस्व.

*अवांतराबद्दल क्षमस्व.* - वास्तविक मी हे म्हटलं पाहिजे !
केसचं पुढे काय झालं ?

* केसचं पुढे काय >>> सुनावणी चालू आहे. 17 ऑक्टोबरला निकाल आहे.

खटल्याच्या सुरुवातीसच जाहीर केले गेले की चार आठवडे सुनावणी चालेल. त्यांच्याकडे आठवड्यात सोम ते गुरु अशी फक्त चार दिवस सुनावणी चालते. दैनंदिन वृत्तांत लेखाच्या तळटीपेत दिलेल्या दुसऱ्या संदर्भात वाचता येईल.

या प्रश्नाच्या निमित्ताने धाग्याचे अद्यतन करून घेतो.
कृपया सहकार्य असावे.
धन्स !

Pages