आधीच्या भागाकडे जाण्यासाठी इथे टिचकी मारा.
२
२
कोलकत्यावरून दिघाचा तीन साडेतीन तास प्रवास करून आल्यावर पुढे विचित्रपूरचा फाटा फुटतो.
या रस्त्यावर आहे चंदनपूर.
तुम्हाला बस चौकात सोडेल. काही खासगी बसेस चौकातच बाजूला थांबलेल्या असतात. रिक्षा असतात. आता इथे आलिशान इमारती दिसतील. चौक सुंदर आहे. दोन्ही बाजूला टुमदार वसाहती आहेत. रोड डिव्हायडर सजवलेला आहे. चौकात गुप्ता मिष्टी दोकन दिसेल. गुप्ताचं हे दुकान पन्नास वर्षांपूर्वीचं आहे. याच्या दुकानात बंगाली मिठाया मोठ्या प्रमाणावर बनतात आणि विकल्या जातात.
पण पन्नास वर्षांपूर्वी गुप्ताचं दुकान असं नव्हतं. पन्नास वर्षांपूर्वी चंदनपूर तरी असं कुठे होतं ?
या चौकात एकही घर नव्हतं तेव्हां. गुप्तांनी राजस्थानी आणि पंजाबी मिठाया इथे विकायला ठेवलेल्या होत्या. चंदनपूर रस्त्यापासून आत आहे. समुद्राच्या कडेला. तिथून एक पायवाट जाते दिघ्याला. सायकल वर जाता येतं. नाही म्नाही, पन्नास वर्षांपूर्वी दोन चाकी गाड्या कुणाकडे असायच्या ?
तालेवार लोकांकडे बुलेट असायच्या. पण त्या एक दोनच. मिलिट्रीचे लोक रूबाबात बीएसए मोटरसायकलवरून फिरत. तर निजामियत खालसा झालेल्या मुर्शिदाबाद सुभ्याच्या नबाबाच्या वंशजांकडे मॅचलेस मोटरसायकल होती. ब्रिटीश देश सोडून जाताना त्यांनी अशा गोष्टी विकायला काढल्या होत्या आणि तू माझा खास म्हणून तुला देतोय असं म्हणत उपकृत पण केलं होतं. एव्हढेच काय ते.
चौकात उतरल्यावर चालत चंदनपूरला यावं लागायचं. चौकात चार रस्ते होते. एक दिघाकडून येणारा, पुढे विचित्रपूरला तोच जातो. डावीकडे चंदनपूर आणि उजवीकडे चंदनपूर चं वीज केंद्र आणि छोटी वर्कशॉप्स होती. एक कारखाना होता त्याला लोक रेल्वेचा कारखाना म्हणत. बंगाल वॅगन नावाचा बोर्ड होता त्यावर. कोलकत्याच्या मुख्य बंगाल वॅगन फॅक्टरीसाठी लागणारे अनेक पार्टस इथे बनत होते. हा कारखाना त्याच्या सप्लाय चेनचा भाग होता. त्याचं खरं नाव चंदनेश्वर इंजिनिअरिंग वर्क्स होतं.
लोकेंद्रनाथ रॉयचौधरी या कारखान्यात सुपरवायजर होते. लवकरच एच आर मॅनेजर होणार होते.
कारखान्यात संप बिंप नको म्हणून रॉयचौधरींना बळेबळेच मालकाने कामाला ठेवलेले होते. नाही आवडलं तर नका करू काम इतकं मागे लागून त्यांना कामावर ठेवलं होतंं. अर्थात लोकेंद्रनाथांनाही वेळ घालवण्यासाठी हे खूपच छान वाटलं. त्यांना कामाची गोडी लागली.
लोकेंद्रनाथ इथले जमीनदार. पण अगदी नम्र होते. त्यांचे आजोबा इंग्लंडला जाऊन वकील झालेले होते. जमीनदारी ब्रिटीशांच्या कायद्यांमुळं केव्हांच हातातून गेली होती. पण पैसा अजून शिल्लक होता. कोलकत्यात आल्यावर काही वकीली चांगली चालली. पण लवकरच क्रांतीकारकांच्या केसेस सतत लढत असल्याने पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलं. मग दिवस फिरले. तरीही त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आली नाही. गावातलं सामाजिक स्थान मोठं असल्याने आजही त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यामुळंच आताच्या पिढीतल्या मोठ्या चौधरींकडे म्हणजे लोकेंद्रनाथांकडे पुढारीपण होतं.
गावचे लोक, आमदार, खासदार सुद्धा त्यांना मान देत.
कामाला जाताना ते रोजच्या सवयीने कालीमातेच्या देवळात डोकं टेकवत. तर येताना चंदनेश्वरच्या मंदीरात जाणं व्हायचं. दोन्हीकडे श्रद्धा होती, पण चंदनेश्वरला जाताना कधी काळी त्यांच्या देखरेखीखाली असलेली कुळं ,त्यांच्या जमिनींचं गतवैभव पाहून ते स्मरणरंजनात हरवून जात.
त्यांच्या आयुष्यात चंदनेश्वर , गतवैभव आणि त्यांचं कुटुंब हे सर्वात जास्त महत्वाचं होतं.
तीन मुलं आणि दोन मुली. सर्वांना त्यांनी उत्तम शिक्षण दिलं होतं. दिघ्याला इंग्लीश मेडीयम स्कूल मधे शिकवलं होतं. त्यामुळं मुलांना इंग्लीश च्य बरोबरीने हिंदीही उत्तम यायची. त्याचा त्यांना कोण अभिमान !
नाहीतर गावकर्यांना ना इंग्लीश यायची ना हिंदी. लोकेंद्रनाथांनाही हिंदी तोडकी मोडकीच यायची. काही काम पडलं कि मग दिघाच्या हिंदीच्या मास्तरांना मस्का लावावा लागायचा .
लोकेंद्रनाथांच्या दोन्ही मुली अत्यंत सुंदर होत्या. तिलोत्तमा अजून लहानच होती, पण मोठी अभिरूपा त्यांच्या अभिमानाचा विषय होती. एव्हढी देखणी, सर्वगुणसंपन्न मुलगी असल्याने तिचं सर्वत्र कौतुक व्हायचं. स्वयंपाकापासून ते मिठाया बनवण्यात ती पारंगत होतीच. गोड गळा असल्याने गाणंही शिकून घेतलं होतं. त्यामुळं चंदनेश्वराच्या मंदीरात सेवा म्हणून तिला गायला बोलवत.
त्या आधी कालीमातेच्या देवळापुढे नवरात्रीचा मोठा मंडप उभा केला जाई. त्या मंदीराच्या आवारातच कृष्णाचंही एक छोटंसं मंदीर होतं. छोटं म्हणजे कालीच्या देवळापुढे छोटं. नवरात्रीत रास चा कार्यक्रम होई. त्यात मुली नटून थटून येत आणि रात्रभर नृत्य करत शेवटी कृष्णाचं दर्शन घेत. एका मुलीला कृष्ण बनवले जाई. सर्वांचं दर्शन झालं कि मग कॄष्ण मैदानात येई. त्यानंतर गोपिका आणि कृष्ण अशी रासलीला सादर केली जाई. वाद्यं वाजत असत. आजूबाजूच्या गावातूनही लोक चंदनपूरची रास बघायला येत. या गावातले कलाकारही कला दाखवण्यासाठी येत असत. तब्बलजी, बासरी वादक, वीणा वादक यांची कमी नसे.
चंदनेश्वरच्या महोत्सवातही मग या कलाकारांना कला दाखवायची संधी मिळे. तिथे मात्र सांस्कृतिक कार्यक्रम भरत. ज्याचं सादरीकरण प्रभावी त्याला लोक पैसे, भेटवस्तूही देत..
अभिरूपाचं नृत्य आणि गायन हा कौतुकाचाच नाही तर अभिमानाचा विषय होता. बंगाली फिल्म इंडस्ट्री त्या वेळी जोरात होती. अभिरूपा जर चित्रपटात गेली तर संपूर्ण बंगाल मधे प्रसिद्ध होईल याबद्दल सर्वांचं एकमत होतं. पण लोकेंद्रनाथांना कोण सांगणार ? चित्रपटात काम करणं त्या काळात फारसं चांगलं समजलं जात नव्हतं. मात्र चित्रपटांचं आकर्षण मोठं असायचं.
******
कारखान्यात पाय ठेवताच जनरल साहेबांचा निरोप त्यांना मिळाला. मालकांनी जीएम ना टेलिफोन करून कलकत्त्याच्या बंगाल वॅगन च्य वतीने एक इंजिनीयर साहेब इन्स्पेक्शन साठी येणार असून त्यांची चांगली बडदास्त ठेवण्याचा आदेश दिला होता. इंजिनीयर साहेब पुण्याचे होते आणि रेल्वेने त्यांना इन्स्पेक्शन साठी साईन केलेलं होतं. ते बंगालला येऊन जाऊन असल्याने बंगाली एव्हढी समजत नव्हती. त्यामुळं हिंदी किंवा इंग्रजीतच संभाषण करणे गरजेचे होते. जनरल मॅनेजर साहेबांपासून अनेकांचा हिंदीचा प्रॉब्लेमच होता. आणि सर्वांना इंग्रजी तरी कुटे येत होती ?
लोकेंद्रनाथ इंग्रजी बरी बोलायचे पण हिंदी ?
पण अभिरूपाच्या हिंदी बद्दल मालकांनाही ठाऊक होतं. साहजिकच दुभाषी म्हणून तिने मदत करावी हाच लोकेंद्रनाथांची नेमणूक करण्यामागचा हेतू असावा असं जीएम साहेबांना वाटलं होतं.
राजवर्धन महात्मे !
लोकेंद्रनाथां च्या टेबलवर सर्व डिटेल्स होते. उद्याच पहाटे ते खरगपूरमधून दिघ्याला निघणार होते. तिथून त्यांना चंदनपूरला गाडी पाठवावी लागणार होती. पण गोंधळ नको म्हणून लोकेंद्रनाथ स्वतःच जाणार होते.
घरी आल्यावर त्यांनी अभिरूपाला हाक मारली.
"अभिरूपा बेटा, उद्या कुठे जाणार आहेस का ?"
"नाही बाबा, तुम्हाला विचारल्याशिवाय कुठे जाणार ? पण बाबा, ठाकुमा ला घेऊन जावं लागेल"
" का ?"
" मां ची पूजा आणि दुसरं काय ?"
" बरं, उद्या तिलोत्तमेला सांगीन मी. तू उद्यापासून एक काम करायचंय "
" काय बाबा ?"
" हे बघ, आपल्याकडे एक मोठे इंजिनीयर साहेब येणार आहेत. त्यांना बंगाली अजिबात येत नाही "
अभिरूपा हसू लागली. "मग ?"
" हे बघ त्यांना हिंदी आणि इंग्रजी येते ,पण आपल्याकडे माहिती आहे ना ?"
" लखनौचे आहेत का ते ?"
" नाही गं. पुणे. तिथून येणार आहेत ."
" पुणे ? कुठे आहे ते ?"
" अगं पुणे माहिती नाही का ? मुंबईजवळचं "
" उरी बाबा ! इतक्या लांबून ? बाबा तिथे हिंदीच बोलतात ना ?"
" हो. हिंदी बोलतात पण मातृभाषा मराठी आहे त्यांची. बरं या चौकशा थांबव आणि उद्यापासून सगळी कामे बाजूला ठेव "
रात्रीच्या जेवणानंतर पण लोकेंद्रनाथांनी तिला पुन्हा एकदा बजावलं.
सकाळी सकाळीच ते दिघ्यासाठी मोटार घेऊन रवाना झाले.
*************
रात्री उशिरा अभिरुपाने गाडीचा आवाज ऐकला.
तिला इंजिनीयर कसा दिसतो हे बघायची उत्सुकता होती.
पण बाबा एकटेच आले होते.
" हे काय बाबा ? एकटेच आलात ? ते नाहीत आले का ?"
"अगं वेडे, त्यांच्या साठी कारखान्याचं गेस्ट हाऊस आहे ना. सगळी सोय आहे तिथे. बावर्ची आहे, हीटर, कुलर , गरम पाणी सगळं आहे"
"माझी ड्युटी कधीपासून सुरू होणार बाबा ?"
लोकेंद्रनाथ हसले.
" अरे बेटा, बाबाला मदत म्हणजे ड्युटी का गं ? बोलावतील तेव्हां जाऊ आपण "
ती झोपायला चालली तेव्हां बाबांनी रेडीओ लावला होता.
त्यावर ऑल इंडीया रेडीओ वर बातम्या चालू होत्या.
ती पुन्हा गर्रकन वळून आली.
ती बातमी निसटली होती. तिने कलकत्ता स्टेशन लावलं.
चीन आणि भारताच्या चर्चेची फेरी चालू होती. तिला त्यात काहीच रस नव्हता.
दोन तीन अन्य बातम्यांनंतर निवेदिकेने ती बातमी सांगायला सुरूवात केली.
"केंद्र सरकारने काल एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. काही लोक अफवा पसरवत आहेत कि नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत. अशा कोणत्याही गोष्टीचे केंद्र सरकार खंडन करते. तसेच अशा अफवा पसरवणार्या व्यक्ती, संस्थांवर कडक कारवाई केली जाईल "
तिने मनाशी नवल केलं आणि झोपायला गेली पण किती तरी वेळ तिच्या मनातून सुभाषबाबू जात नव्हते.
फक्त बंगालचेच नाही तर देशाचे लाडके हिरो होते ते !
तिच्यासाठी तर प्रेरणास्थान.
बंगाल मधे गुरूदेव रविंद्रनाथ टागोर, सुभाषबाबू, बंकिमबाबू आणि सचिन देव बर्मन ही दैवतं प्रत्येकाचीच होती.
मग अशी अफवा कोण पसरवेल ? अशी बातमी का आली असेल?
विचार करता करता तिला कधी झोप लागली समजलंच नाही.
स्वप्नात ती सुभाषबाबूंना शोधत कुठल्यातरी गुहेत शिरली होती. तिच्यासोबत एक तेज्:पुंज पुरूष होता. संपूर्ण शुभ्र वस्त्रात. त्याचा चेहरा काही दिसत नव्हता. पण ती त्या गुहेत त्याच्या सोबत निर्धास्त होऊन शिरली होती.
आणि समोर ?
तिचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता !
पुढच्या भागाकडे जाण्यासाठी इथे टिचकी मारा.
पूर्व भारतीय पार्श्वभूमिवर तू
पूर्व भारतीय पार्श्वभूमिवर तू खूप छान लिहितेस.
तिकडे राहिली आहे का आधी ?
वाचतेय! दोन्ही भाग मस्त!
वाचतेय! दोन्ही भाग मस्त!
धन्यवाद स्वाती, धनवन्ती.
धन्यवाद स्वाती, धनवन्ती.
धनवन्ती, या प्रश्नाचं उत्तर मी नंतर कधीतरी देईन

सध्या कॉम्प्लिमेण्ट म्हणून स्विकारतेय.
अंदाज वाचायला आवडतील.
अंदाजच करायचा तर तू गेल्या
अंदाजच करायचा तर तू गेल्या जन्मात तिथे चौधरी कुटुंबातील सुंदर बंगाली ब्युटी होतीस
इंटरेस्टींग. लवकर पुढचे भाग
इंटरेस्टींग. लवकर पुढचे भाग टाक.
हा भाग पण छानच!
हा भाग पण छानच!
गेल्या जन्मात >>>
गेल्या जन्मात >>>

बंगाली ब्युटी
माम, आबा धन्यवाद.
निवडक लेखाना खूण ठेवून
निवडक लेखाना खूण ठेवून रविवारचे रिझरवेशन केलेले असते, निवांत वाचायला... तसा आधी हा वाचून काढला. छान झालाय हा ही भाग. ह्या सर्व कथा भाग पूर्ण झाल्यावर संपूर्ण मालिकेची ऐकण्याची सोय जमली तर भारी वाटेल हे मा वै म.
सर्व भाग पूर्ण झाल्यावर वाचेन
सर्व भाग पूर्ण झाल्यावर वाचेन. तुझ्या कथा फार मस्त असतात. लेयर्ड काळ असतो. फक्त एकाच दिशेने सरकत नाहीत, असे स्मरते.
थँक यू अni आणि सामो.
थँक यू अni आणि सामो.

सामो
कुणी तरी वाचतंय ही भावना धीर देणारी असते. मग पुढचे भाग लिहायला उत्साह टिकून राहतो.
हा ही भाग छान..
हा ही भाग छान..
दोन्ही भाग सुंदरच!! खूप मस्त
दोन्ही भाग सुंदरच!! खूप मस्त वाटतंय वाचायला..
कधी प्रतिसाद लिहला नाही आज पहिल्यांदाच लिहतेय