पाककृती स्पर्धा ३ - प्लमची चटणी - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 7 September, 2025 - 08:36

प्लम ची चटणी

आंब्याच सासव आणि पेरूचं पंचामृत हे अपवाद वगळता फळांचे नमकीन पदार्थ विशेष केले जात नाहीत. ," फळांवर जास्त प्रोसेसिंग करू नका " हे वाचल्यापासून फळं आणा ,धुवा ,कापा / सोला आणि खा हा स्वतःच्या फायद्याचा शॉर्ट कटच अवलंबिला जातो. पण हे माबो संयोजक पण ना अतिच करतात. पाकृ स्पर्धेचा विषय काय तर फळांपासून केलेले तिखट पदार्थ. असो. सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा म्हणून ही प्लम ची चटणी केली आहे.

साहित्य
प्लम पाव किलो
साखर आवडीप्रमाणे
गरम मसाला , भाजलेली जिऱ्याची पूड आणि मीठ प्रत्येकी अर्धा छोटा चमचा, लाल तिखट एक छोटा चमचा.
एक चमचा बेदाणे आणि दोन चमचे मेलन बिया भाजून

कृती

प्लम धुवून कापून बिया काढून टाका. मिक्सर मध्ये ह्याची प्युरी करून घ्या. पातेल्यात ही प्युरी आणि अर्धा कप पाणी घालून तीन चार मिनिटं उकळवा, मध्ये मध्ये ढवळत रहा नाहीतर पातेल्याला लागेल. नंतर त्यात साखर (मी चार चमचे घातली तेवढी ठीक्क झालीय)घालून पुन्हा ढवळत रहा. नंतर त्यात सगळे मसाले, बेदाणे, मेलन बिया घालून ढवळत रहा. साधारण घट्ट झालं की गॅस बंद करा. आंबट, गोड, थोडीशी तिखटसर चटपटीत चटणी तयार आहे.

अधिक टिपा

१) ह्यात साखरेऐवजी गूळ ही घालू शकता.
२)सैलसर असतानाच गॅस बंद करा कारण गार झाल्यावर आळते चटणी.
३) पराठा, पोळीबरोबर छान लागेल.
४) रंग सुंदर येतो आणि मेलनच्या पांढऱ्या बिया मध्ये मध्ये मस्त दिसतात आणि लागतात ही छान त्यामुळे त्या घालाच.
५) कोणाकडे परदेशात प्लमच झाड असेल दारात आणि घरची फळं असतील भरपूर तर ही चटणी नक्की करून ठेवा. व्हिनिगर घातला थोडा आणि फ्रीज मध्ये ठेवली तर खूप दिवस टिकेल.

हा फोटो.

20250907_164418.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

^^^सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा^^^^
हे खूप आवडले मनीं मोहोर ..
असाच उत्साह राहू दे.. तुमची एनर्जी बघून , वाचून हुरूप येतो.

रेसिपी नेहमीप्रमाणे उत्तम, सुटसुटीत आणि चविष्ट.
फोटो भारी आहे.
तुमचे लिखाण सफाईदार असते.

धनवन्ती थँक्यु.. केलं दुरुस्त. मी लिहिलेलं तपासत होते तेवढ्यात मुलाचा मुलगा आला, त्याने उलट सुलट बटणं दाबली तर लिहिलेलं सगळ जाईल एखाद वेळी म्हणून पटकन् save बटण प्रेस केलं. असो.

एकदम कातील रंग आलाय ममो .

मस्त लागत असणार ही चटणी. मागे एकदा प्लम्स आणलेली सगळी आंबट निघालेली तेव्हा मिळाली असती ही रेसीपी तर करून पाहिली असती. आता परत असे काही झाले तर करणार Happy

मस्त लागेल ही चटणी
आंबट गोड तिखट
+७८६

दोन्ही फोटो मस्त!
मला ब्लॅक प्लेट वाला जास्त आवडला.

घरात दोनच मेलन शिल्लक होती. त्याचीच उलुशी चटणी केली ॲज सकाळी आणि नाल सापडला म्हणून घोडा आणावा तसे त्यासाठी अर्धा ब्रेडचा पुडा घेतला विकत आणि दोन स्लाईसवर स्प्रेड करुन खाल्ली. टेस्टी लागतेय. उरलेली थोडी अगदी छोट्या, लोणचं घेऊन यायच्या डबीतून लंच बॉक्समधे घेऊन आलेय.

चव आणि रंग दोन्ही आवडले मला. त्याहून आवडले ते हे सगळं जमवून आणायला वेळही लागला नाही आणि कष्टही फार नाही. मी शेगडी ऐवजी मावेत केली. पॉवर सुरवातीला high नंतर ८०% ठेवली. एखाद मिनिटाचा टायमर लावून ढवळत होते आणि अंदाज घेत परत लावत होते टायमर. इतर कामे करत असतानाच हे काम पण होऊन गेले माझे मावेमुळे.

दिल्लीत चाट सोबत जी मिठी सौंठ देतात ना, तशी दिसतेय ही चटणी. खूपच छान रंग आलाय.

मला यावेळची ही फळांच्या तिखट पदार्थाची स्पर्धा खूपच आवडली. फारसे गोड पदार्थ आवडत नसल्याने यात आलेल्या सगळ्याच प्रवेशिका आवडल्यात.

धन्यवाद सर्वांना.
धनवंती , कशाला खोडलस, राहू द्यायचं होतं ना .. तू लिहिलंस म्हणून लक्षात आलं आणि सुधारलं ही लगेच.

ही चटणी चवीला छानच लागत होती पण अगदी कितीही खात्रीचा फळवाला असला तरी फळांबद्दल एवढी गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. प्लम चांगली निघाली तर कापूनच खायची पण आंबट निघाली, कोणी खात नसेल तर ही चटणी हा बेस्ट ऑप्शन आहे. रंग मात्र जबरदस्त येतो. जेवायला कोणी येणार असेल तर स्पेशल म्हणून विकत आणून करू शकता ही चटणी.
मेथांब्या सारखी लागत नाही अजिबात ललिता प्रीती. अल्पनाने लिहिलंय तशी चाट बरोबर किंवा सामोश्या बरोबर कचोरी बरोबर देतात तशी चव लागते.
कविन करून बघितलीस म्हणून छान वाटलं. तू म्हणालीस म्हणून बघितलं कोणता ब्रँड आहे प्लेटचा ते. लाओपेला नाहीये. काहीतरी वेगळंच लिहिलंय. ठाण्यातूनच घेतल्या आहेत पण मेड इन uae वगैरे लिहिल आहे. असो. त्या प्लेटी खूप म्हणजे खूप जुन्या वीस पंचवीस वर्ष जुन्या आहेत. रोज वापरत असून टिकल्या आहेत एवढ्या हे विशेष.
ऋ, दोन प्लेट वेगळ्या आहेत एवढ नोटीस केलस आणि वर काळी आवडली हे ही लिहिलंस कमाल वाटली. मला ही काळीच बरी वाटली जास्त.

फारच छान

मेलन बियांची आयडिया सुपर कूल, कारण ती रंगात कॉन्ट्रास आणि टेक्शचर मधे क्रंच आणेल. Very thoughtful addition !