अमेरिका

Submitted by सामो on 24 August, 2025 - 13:18

अमेरिका पहायला टुरिस्ट म्हणुन येणे आणि इथले वरवर दिसणारे भले-बुरे घेउन जाऊन तिच अमेरीका मानणे याहूनही इथे राहून , जनमानस, चालीरीती, प्रत्येक राज्याचा एसेन्स अनुभवणे वेगळे. आम्ही आलो ते पहील्यांदा लॉस एंजेलिसला, राहीलो चिनो-ऑन्टॅरिओच्या बॉर्डरवर आणि अनुभवले ते कंट्री लाइफ आणि सिटी लाइफ. पुढे नोकरीनिमित्त खूप म्हणजे चिक्कार राज्ये फिरणे झाले. प्रत्येक राज्याच्या 'स्टेट फेअर्स' म्हणजे राज्य-जत्रांमध्ये फिरणे झाले, वेगवेगळ्या पार्क्स पाहायला मिळाल्या आणि होय लोक जोडायला, अनुभवायला मिळाली. संकुचितपणाच्या मर्यादा गळून पडल्या आणि क्षितीजे विस्तारली. आधी वाटायचे अमेरिका म्हणजे एकसुरी अमका अमका देश आहे. लोक ओबिस आहेत, डिव्होर्स रेटस खूप आहेत, मटिरिअ‍ॅलिझम आणि कंझ्युमेरीझम प्रचंड आहे, धनवान देश असल्याने खूपच सुखसुविधा आहेत यंव अन त्यंव. प्रत्यक्षात कळले की अरे हा तर हत्ती आहे, ज्याला जो अवयव हाती लागला त्याला तसा वाटला. कोणी कानाला पकडून म्हणाले हत्ती=सूप तर कोणी पायाला धरुन म्हणाले हत्ती=खांब, कोणी शेपूटच पकडून बसले आणि ट्रिव्हिअलाइझ करत गेले हत्ती = सुतळी Happy
तर या धाग्यावर आपल्याला भेटलेल्या अमेरीकेबद्दल लिहू यात का? म्हणजे ज्या राज्यात तुम्ही रहाता त्या राज्याची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये.
------------
कॅलिफोर्निया - ज्याचे दुसरे नाव आहे गोल्डन स्टेट. इथे मी भारतातून पहील्यांदा आले आणि नवख्या डोळ्यांनी अमेरिकेचा, पहीलावहीला अनुभव घेतला. आधी आधी १ वर्ष तर स्वप्नात भारतच येई. अमेरिकन हवा, पाऊस, ऊन यांची सवय व्हायलाच कित्येक वर्षे जावी लागली. मला त्या शेव्ही वगैरे अजस्त्र धूडे पाहुन गंमत वाटे. केवढ्या मोठ्ठ्या गाड्या अबब!!! एका वेळी २०-२० कारस उघड्या टपावर घेऊन जाणारे ट्रक्स पाहून मी आश्चर्याने आ वासे. अजगरी ट्रक्स कसे टर्न घेशिर, शिताफीने वळतात हे सारेच आश्चर्यचकित करे. तर जॉब होता एल ए मध्ये आणि आम्ही रहात असू चिनो/आँटॅरिओच्या बॉर्डरवरती. एक होती सिटी (शहर) तर दुसरे होते गाव. आमच्या ऑन्टॅरिओमध्ये गुरांचा आठवडी बाजार असे. जिथे शेळ्या, शहामृग (होय!), मुनिया वगैरे पक्षी, कोंबड्या, बदके, ससे, साप सारे काही विकायला असे. हा होता स्पॅनिश लोकांचा आठवडी बाजार. आमच्या अपार्टमेन्टस च्या अगदी समोर. दर शनिवारी आम्ही जात असू. याउलट एल ए मध्ये सगळे लोक शहरी, चकाकणारे, मीडेल्स सदॄष, परफेक्ट. संपूर्ण बायपोलर अनुभव होता तो. मला वाटे इथे एल ए मध्ये प्रत्येकजण स्टार पॉवर असल्यासारखा दिसतो, वागतो. गंमतच आहे. पण आहे एल ए तसेच आहे. तुम्हाला आवडो function at() { [native code] }हवा नावडो. पण प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, टीथ व्हायटनिंग करुन प्रत्येक जण स्टार बनलेला आहे.
------------
पेनसिल्व्हेनिआ - काय निसर्गसंपन्न, सुंदर लश ग्रीन राज्य आहे पण थडग्यांचे, जिथे इतिहास घडला, यांकी फौजा आणि सदर्न फौजांची लढाई झाली तो रक्तरंजित इतिहास असलेले हे राज्य आहे. विलिअम्स्बर्ग, गेट्टीसबर्ग, व्हॅली फोर्ज या ठिकाणांच्या हवेतच पॅट्रिऑटिझम आहे, एक सळसळता उत्साह आणि देशभक्ती आहे. इतिहास किती जतन करतात इथे. इथेच अनेक ठिकाणी ऑक्टोबरमध्ये हाँटेड टुर्स होतात. मला हे राज्य आवडले पण मी तिथे परत जाउ इच्छित नाही थोडं झपाटलेले वाटते मला. आमिश लोकांचे व्हुपी पाइज, शेफर्ड पाईज अन्यही अनेक प्रकारचे पाय इथेच आम्ही चाखले. हे घोडागाडीतून जाणारे, या काळातही, दोर्‍यांवरती कपडे वाळविणारे, इलेक्ट्रिसिटी न वापरणारे लोक पाहीले.
----------------------
मग आले डेलावेअर द फर्स्ट स्टेट. मला डेलावेअर विशेष नाही भावले. अगदीच ना खेडे, ना शहर ना काही विशेष परस्नॅलिटी असे काहीसे मला वाटले. आम्ही नेवार्कला रहात असू. मात्र इथे पक्ष्यांची लयलूट पाहीली. किती बाप रे केवढे पक्षी इथे स्थलांतरासाठी उतरतात. फार फार दमलेले, अंगात त्राण न उरलेले, मैलोन मैलांचा प्रवास करुन आलेले हे पक्षी इथले हॉर्स शू क्रॅब्ज खाउन परत ताकद मिळवतात ते त्यांना दक्षीणेकडे अजुन पल्ला गाठत जायचे असते म्हणुन. इथेच लोकल सेक्शनमध्ये, हे ' हॉरसशू क्रॅबस अँड शोअर बर्ड्स' पुस्तक मला सापडले - https://www.maayboli.com/node/74587. मुलगी इवली होती तिला गोष्टी सांगायचे म्हणुन 'रेन्बो क्रो' सुद्धा इथेच सापडले. - https://www.maayboli.com/user/71579/created?page=3. बिल मॉयर्स चे लॅंग्वेज ऑफ लाईफ' हे कवितांबद्दलचे पुस्तकही इथलेच. म्हणजे मला इथे सापडले. एकंदर माझा काळ उत्तम व्यतित झाला.
-------------------------
व्हरमाँट - ग्रीन माउंटन स्टेट नावाप्रमाणेच सुंदर आणि आर्टिस्टिक. साऊथ बर्लिंग्टन मस्त ठिकाण होते. तिथे गेलात चर्च स्ट्रीट जरुर बघा. खूप कलाकार त्यांच्या कलाकृती घेउन, उन्हाळ्यात वीकेन्डला बसत. क्रो बुकस्टॉल माझे आवडते दुकान. इतकी मस्त पुस्तके मी वाचलली मी तिथे. तशी अनवट पुस्तके नंतर कुठेच दिसली नाहीत. कमीत कमी ५ अशी पुस्तके ज्यांचे मला नाव आठवत नाही पण त्यांनी माझ्यावरती सोडलेली छाप आणि मनात आलेल्या भावना मला अजुनही आठवतात आणि ती पुस्तके पुनश्च वाचण्याची ओढ लागते. दर वेळेला घर बदलले की पुस्तके देउन टाकली. निदान यादी करायला हवी होती. इथे मला संपूर्ण शीख लोकांचे धार्मिक साहित्याशी ओळख झाली. गुरमीत माझी रुममेट होती. तिच्याकडुन मी शिकुन घेतले. व्हरमाँट सलग ४ वर्षे 'हेल्दिएस्ट स्टेट' म्हणुन तेव्हा ओळखले गेले. माझे कलीग्ज उन, वारा, पाऊस, स्नो कशाचीही पर्वा न करता खिळ्यांचे बूट घालून ट्रेकिंग करत, लंच टाईममधे पळून येत. इथेच मला कम्युनिटी गार्डनची संकल्पना कळली. अशी बाग जिथे तुम्हाला वाफा मिळतो, आवडेल त्या भाज्या, फळे पिकवा, फुले लावा. किती प्रकारची सफरचंदे मी व्हरमाँटमध्ये खाल्ली बाप रे! ५० एक जाती असतील पैकी मला एक पोल्का डॉटस वाली सफरचंदे दिसायला फार आवडली. इवली इवली, ठिपकेवाली, बाळसेदार. माझ्या एका मैत्रिणीने इथेच मला 'द शॅक' नावाची सुंदर कादंबरी भेट दिली. इथली ग्रीन माऊंटन कॉफी मला आवडली.
----------------------
टेक्सास - न्यू ब्राउनफेल्स, सॅन अ‍ॅंटॉनिओ, रिव्हर वॉक, अलामो किल्ला. इथेही फार एन्जॉय केले. बाहेर ११० डिग्री फॅ. तापमानात फिरले. इथे मी पहील्यांदा ब्लू जे पक्षी पाहीला. जोडी पाहीली. विस्कॉन्सिन व न्यु जर्सी मधेही बहुधा सर्रास आढळणारा पक्षी असावा. या पक्ष्याला सर्व कवि धटिंगण म्हणतात : असा रावडी राठोर पक्षी आहे हा. जेव्हा नीरीक्षण केले होते तेव्हा दांडगटच्च वाटला होता. स्वारी नाजूक साजूक नव्हती. पुढील कविता वाचून तर खात्रीच पटली, जिच्यात याला मनमुक्त स्वच्छंद, आक्रमक असा खलनायक म्हटले आहे. आणि इतका वैट्ट वैट्ट असला तरी हा अप्रिय होऊच शकत नाही का तर तो इतका देखणा आहे की जणू निळ्या फुलांनाच पंख फुटले आहेत, अशा खल पण देखण्या पक्ष्याच्या प्रेमात आपण पडल्याशिवाय रहात नाही असे कवि नमूद करतो. इतर पक्ष्यांना घाबरवणारा, व्हिलन, गुंड. पण देखणा इतका की त्याला १०० गुन्हे माफ. . ब्लु जे बद्दलची, पुढील, कविता मला फार आवडते, माझी सर्वात आवडती कविता म्हणालात तरी चालेल.
.
Villain among the birds is he,
A bold , bright rover, bad and free;
Yet not without such loveliness
As make the curse upon him less.
If Larkspur blossoms were a-wing,
If iris went adventuring,
Or on some morning we should see
Heaven bright blue chicory
Come drifting by, we would forgive
Some little sins and let them live!
.
टेक्सामध्ये असताना, माझ्या कलीग्जनी घरात सापडलेला विंचू कसा बूटांनी चिरडला वगैरे गोष्टी ऐकलय. इथे विशिष्ठ पारदर्शक लॉलीपॉप्स मिळतात ज्यांच्या आख्खा विंचू गोठविलेला असतो ते लॉलीपॉप खातात का फक्त बघायचे असतात मला काही माहीत नाही. मला खूप अ‍ॅलर्जीज होत या कोरड्या वातावरणात त्यामुळे परत मला टेक्सासला जायचे नाही.
--------------------------
पुढे विस्कॉन्सिन - चीज स्टेट. (नाही चीझ नाही. कोणाची तरी पेट पीव्ह आहे. चीज च्या जागी चीझ लिहीणे ही Wink ) असो. तर विस्कॉन्सिनमध्ये आम्ही ज्या खेड्यात राहीलो तिथे सगळी ब्लु कॉलर्ड लोक होते. त्या एवढ्याश्या खेड्यात गुत्ते, कॅबरे, रेड लाईट एरिया यांचा सुळसुळाट होता. मुलीच्या मैत्रीणीमंध्ये टीनेज वयातच विवाहाची, अपत्यांची स्वप्ने पहाण्याची पद्धत होती. पद्धत म्हणजे बहुसंख्य लोकांची ती स्वप्न होती. काही चुकार टीनेजर्स आयाही होत्या. तर फार रुरल एरिया होता. लोकांनी बाहेर पडून जग पाहीलेले नव्हते. आम्ही तेथिल एकमेव भारतिय कुटूंब होतो. विस्कॉन्सिनमध्ये आमची ब्युईक कार रात्री अस्वलास धडकली होती आणि संपूर्ण मोडली होती. टाकून द्यावी लागली. फास्ट हाय वे वरती हे अस्वल अचानक मध्ये आले. नवरा गाडी चालवत होता, मी झोपले होते त्यामुळे मला तो प्रसंग अनुभवता आला नाही. विस्कॉन्सिन निसर्गसंपन्न, आहे, शेतेच शेते आहेत. मैलोन मैल इथे कारच नसतात. मोकळा मोकळा हायवे. खूप सुंदर आहे. इथे सुपिरीअर लेकचे नित्यनूतन रुप पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटे. कधी एका दिशेला पोर्णिमेचा चंद्र व एकीकडे उगवता सूर्य दोन्ही एकदम दिसे. कधी तळ्यावर छन छन रुप्याची नाणी लखलखत कधी नारिंगी आग पाण्यातून वाहे तर कधी (म्हणजे अनंत वेळा) तर तळे बर्फात एवढे गोठे की त्यावर स्टॉल्स घालता यावे व घालतही. मी पाहीले नाही पण ऐकलेले आहे. हे एक जग अनुभवले. इथेच एका कीर्तन इव्हेन्टला, म्हणजे सगळे अमेरिकन व मी एकटी भारतिय - पण ॐ नमः शिवाय असा कुंडलिनी योगा ध्यानमंत्र सुरु काय केला माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारांवर धारा लागल्या. अनावर अश्रूपात झाला. मला कळलेच नाही असे का होते आहे. ना मला थांबवता आले. मी असा अनुभव फक्त तिथे एकदाच घेतला. अनकंट्रोलेबल अश्रूपाताचा. मला तो परत नको कारण मला तो गूढ वाटतो. त्याचा अर्थ लागत नाही. असो. तर इथला माझा आय टी फिल्डमधला कलीग एकदा स्कूल बसचा ड्रायव्हर होता तर एकदा त्याने तुरुंगात गार्डचे काम केलेले होते. एक जणाचा साईड बिझनेस होता - घरात पूल बांधणे, गार्डन करणे, टाइल्स बसविणे वगैरे. खूपच वेगळे लोक होते ते. पण खूप आवडले मला. खूप खूप आवडले. विस्कॉनसिनची स्टेट फेअर फार मस्त असते तिथे गोट मिल्क वगैरे प्यायचे स्टॉल्स असतात Happy भाजलेली कणसे, चीज, आईसक्रीम्स अनेक स्टॉल्स असतात. प्राण्यांशी खेळण्याचे त्यांना गोंजरण्याचे स्टॉल्स असतात.
--------------------------------
आणि न्यू जर्सी - खरच गार्डन स्टेट. किती सुशोभित उपवने पाहीली इथे व न्यु यॉर्क मध्ये. या दोन शहरांच्या हेड ओव्हर हील्स प्रेमात आहे मी. न्यु यॉर्क-सिटी दॅट नेव्हर स्लीप्स. मिनी कोरिया. मिनी इटली, चायना टाउन, करी हिल - इथे विविध संस्कृतींचा संगम आहे. खरच मेल्टींग पॉट अमेरीका ती म्हणजे न्यु यॉर्क. हे सारे अजुन अनुभवते आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयी बर्‍याच आधी, काही वर्षांपूर्वी डेलावेअरला रहात असताना आम्ही नेहमी या ब्रिजने न्यु जर्सीला यायचो. होता तेव्हा तो बोर्ड. थांब गुगल करते. एखादा फोटो सापडेल.

Road Signs on Victory Bridge In Perth Amboy, N.J., Show a Suicide-Prevention Hot Line - The New York Times - https://www.nytimes.com/2008/12/14/nyregion/new-jersey/14bridgenj.html - हा पाहत असावे. पण दर वेळेस ही साइन लागायची.

The New Jersey Department of Transportation paid $5,300 to install the signs on the 150-foot-tall Victory Bridge, which arches over the Raritan River.

Pages