पाककृती स्पर्धा १: पदार्थ आमचा सजावट तुमची

Submitted by संयोजक on 11 August, 2025 - 23:35

नमस्कार मायबोलीकरहो!

दरवर्षी मायबोली गणेशोत्सवात सर्वांना प्रतिक्षा असते ती म्हणजे पाककृती स्पर्धेची ! मायबोलीकर बल्लवाचार्य आणि सुगरणी आपापली उपकरणे आणि साधनसामग्री घेऊन तयार असतात. तर पहिली स्पर्धा आहे पदार्थ आमचा सजावट तुमची.

तसे म्हणाल तर सोपा विषय आहे आणि विचार केला तर थोडा अवघड आहे. पदार्थ तुम्हाला आम्ही देणार आहोत. तोच पदार्थ तुम्ही करायचा आहे. साहित्य, कृती तुम्ही विचार करून ठरवा. पण या स्पर्धेमध्ये सर्वांत कौशल्याचे काय असेल तर ते म्हणजे तुमची सजावटीची ( प्लेटींगची) कल्पकता. इथे मायबोलीकर मतदान करणार ते तुमच्या सजावटीकरता.

तर या स्पर्धेकरता तुम्हाला आम्ही दोन पर्याय देतो आहोत. पहिला पर्याय आहे वरण - भात आणि दुसरा पर्याय आहे गोड शिरा. या आपल्या नेहमीच्या घरगुती मराठमोळ्या पदार्थांना तुम्ही सजवायचे आहे आणि त्यांना मिशेलिन स्टार रेस्टॉरेंट मध्ये पण वाढता येतील असे दाखवायचे आहे.

नियम :

१) शिरा किंवा वरण - भात यांपैकी एक पदार्थ करायचा आहे.
२) साहित्य तुम्हाला हवे ते घेवू शकता. उदा: शिरा करण्याकरता तुम्ही पारंपारिक रवा वापरू शकता किंवा राजेशाही बदामाचा शिरा करू शकता. आवडीनुसार फळे किंवा इतर सुकेमेवे वापरू शकता.
३) तसेच वरण भाताकरता तुम्ही साधे, लाल, इतर कुठलेही तांदूळ वापरू शकता.
४) वरण सुद्धा कुठल्याही डाळीचे करू शकता. वरणाला फोडणी देऊन त्याची आमटी/फोडणीचे वरण करू शकता. डाळीत कुठल्याही प्रकारच्या भाज्या वगैरे टाकू शकता पण भातात असे काही नको.
५) सजावटीची स्पर्धा असली तरी पाककृती लिहीण्यात सूट नाही. ती पूर्ण लिहीणे गरजेचे आहे.
६) आपल्या अंतिम पदार्थाचा फोटो काढून तो पाककृती धाग्यावर टाकण्यास विसरू नका.
७) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - पाककृती स्पर्धा १ - पदार्थाचे नाव - तुमचा आयडी
८) प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
९) एकाच वेळेस एक शिर्‍याची आणि एक वरण-भाताची प्रवेशिका पाठवली तरी चालेल.
१०)प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
११)'मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
१२)याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).
१३) पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.
१४) पदार्थ शाकाहारी असावा.

चला तर मग, घ्या बाप्पाचे नाव आणि करा सुरूवात आपापली पाककृती तयार करायला!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विषय आहे...
स्वयंपाकात कच्चे असणाऱ्यांना सुद्धा यात भाग घेता येईल..

हाही उपक्रम मस्त!
वरचे फोटो सुद्धा काय कातील आहेत. शिरा उचलून तोंडात घालावासा वाटला!

चांगली. स्पर्धा

एक शंका आहे . प्लेटिंग करताना पदार्थाचे मूळ रूप दिसणे महत्वाचे आहे का ? म्हणजे शिरा केला आणि त्याला कलात्मक पद्धतीने आकार दिला तर चालेल का

पण जाई तुम्ही बदामाच्या (हार्ट शेप) साच्यातून शिरा काढला तरी शिरा शिराच दिसणार.
.
हां आता कोणी वाटीभर स्ट्रॉबेरी सिरप घालून ठेवल्यास, शिर्‍याचे रुपडेच लोप पावेल. मग खाली पोहे आहेत का शिरा ते कळणार नाही. तसे नसावे असे मला वाटते.

तसे नसावे असे मला वाटते.
>>>

तसे असायला हरकत नाही.
सजवले पूर्ण केक सारखे तर काय झाले..
लहान मुले आवडीने खातील.
आणि स्पर्धेत मत द्यायचे की नाही हे मायबोलीकर ठरवतील..

फक्त शिरा केला आहे याचा पुरावा म्हणून एक वेगळा फोटो द्यावा म्हणजे संयोजकांची खात्री पटेल आणि नियमात बसेल... असे मला वाटते.

संयोजक, वरण भातामध्ये फक्त वरणच अपेक्षित आहे कि कडधान्ये पण चालतील? आख्खा मसूर, आख्खे मुग किंवा इतर काही?

कुठल्याही डाळीचे वरण चालेल. इतर कडधान्येही चालतील पण वरणात ५०% पेक्षा अधिक कडधान्ये नको. पूर्ण कडधान्ये नको.

स्पर्धेकरता नाही. करुन पाहीले पण जमले नाही. हे ओबडधोबड चित्र टाकते आहे बस्स!
बदामाचा एक साचा वापरला, वरण (जे की नीट घोटलेले नाही. तुमच्या बै फारच अपेक्षा Wink ) थापायला एक चिट्टूला तेलाचा चमचा वापरला. वरती विकतचे मारवाडी लोणचे ठेवले. तूप घातले.
.