
साहित्य -
चिकन ब्रेस्ट - ५०० ग्राम
Mozzarella चीज - पाऊण कप
चिकन स्टॉक - एक ते दीड कप
क्रीम - पाऊण कप
चेरी टोमॅटो - १०/१२ , एकाचे दोन भाग करून
बेसिल पाने - ५/६ खुडून
पार्सले - तीन चमचे बारीक चिरून
लसूण - १०/१२ पाकळ्या बारीक किसून किंवा बारीक चिरून
मैदा - ४/५ चमचे
स्मोक्ड पाप्रिका - ४ ते ५ चमचे
काळी मिरी - १० ते १२ भरड पूड करून
मीठ
ऑलिव्ह ऑईल - एक डाव
बटर - २ मोठे चमचे
कृती
चिकन ब्रेस्ट एका ताटात घ्यावेत. हे मोठे येतात त्यामुळे मध्ये आडवी (मध्ये उभे दोन भाग नाहीत, पाव भाजीचे पाव कसे कापतो तसे) चीर देऊन एकाचे दोन भाग करावेत. त्यावर आधी मीठ, बारीक केलेली / कुटलेली काळी मिरी घालावी. आता त्यावर मैदा भुरभुरावा (चिकन कोरड्या मैद्यात घोळवायचे नाही) नंतर पाप्रिका भुरभुरावा. आता ज्या बाजूला हे जिन्नस लावलेत ती बाजू पलटावी आणि दुसऱ्या बाजूने पण हीच कृती करावी आणि जिन्नस लावावेत. ही थोडक्यात मॅरीनेशन प्रक्रिया. आता एका पसरट पॅन मध्ये एक डाव ऑलिव्ह ऑइल घ्यावे. त्यातच दोन मोठे चमचे बटर घालावे. आता चिकन तुकडे त्यात अलगद ठेवावेत. गॅस मंद आचेवर असू द्या. दहा मिनिट एक बाजूने शिजू द्या. आता दहा मिनिटांनी बाजू पलटून दुसऱ्या बाजूने दहा मिनिट शेक द्या. बाजू पलटताना पापडासाठी जो चिमटा वापरतो तो वापरा.
आता हे तुकडे चांगले खरपूस भाजले गेले असतील, ते परत मोठ्या ताटात काढून घ्यावेत.
आता त्याच पॅन मध्ये लसूण घालावा. ह्यात पुन्हा तेल घालण्याची गरज नाही थोडे तेल राहतेच. दोन मिनिट लसूण परतला की त्यात चिकन स्टॉक घालावा. एक हलकी उकळी आली की क्रीम घालावे. दोन मिनिटांनी त्यात चीज घालावे आणि चांगले एकजीव करावे. आता त्यात चिकनचे तुकडे अलगद ठेवावेत. एक एक करून चेरी टोमॅटो ठेवावेत. पार्सले आणि बेसिल घालावी. आणि झाकण न ठेवता मंद आचेवर पंधरा मिनिट ठेवावे. सॉस मधून मधून छोट्या चमचाने चिकन तुकड्यांवर घालावा. जर सॉस फार आटत आहे असे वाटत असेल तर गॅस बंद करावा कारण चिकन पहिल्या प्रक्रियेतच शिजलेले आहे.
पंधरा मिनिटांनी गॅस बंद करून सॉस मधून फक्त चिकन ताटात घ्यावे, सुरीने वडी सारखे त्याचे काप करावेत. पेल्टिंग करताना हे काप केलेले चिकन ठेवावे, वरून चमच्याने सॉस घालावा आणि चेरी टोमॅटो ठेवावेत.
ही कृती अजिबात अवघड नाही. फक्त लिहिताना मी डिटेल मध्ये लिहिले आहे. पूर्ण पाकृ चाळीस पन्नास मिनिटात होते.
सदर पाकृ खास अमांच्या स्मृतीसाठी _/\_
पार्सले, बेसिल, स्मोक्ड पाप्रिका, चेरी टोमॅटो पुण्यात दोराबजी मध्ये सहज मिळतात. अगदी वाजवी दरात. कोथिंबीर जुडी जास्त महाग असेल मंडईत स्टॉक साठी मी ब्रेस्ट बरोबर दोन चिकन लेग पीस मागवले होते ते लेग पिस तीन चार कप पाण्यात मीठ आणि काळीमिरी घालून शिजवले आणि तोच स्टॉक म्हणून वापरला. चिकन licious मधून मागवले होते.
पाप्रिका स्मोक्ड (च) वापरावी.
प्लेटिंग दोन वेगळ्या डिश मध्ये केले आहे.
मस्त! सोपं वाटतंय. करून बघेन.
मस्त! सोपं वाटतंय.
करून बघेन.
तुमच्या पनीर घोटाळा सारखी ही
तुमच्या पनीर घोटाळा सारखी ही पाकृ पण एकदम हिट होणार.
मुलांना नक्की आवडेल असा पदार्थ आहे. नक्की करून बघणार.
चिकन साठी licious is THE बेस्ट...
नंतर दुसरीकडचे आजिबात बरोबर वाटत नाही.
थोडे महाग आहे पण क्वालिटी बघता एकदम worth वाटते.
हे बरेचसे त्या marry me
हे बरेचसे त्या marry me chicken सारखे दिसतेय.म्हणजे कृती जवळपास तशीच आहे. चेरी टॉमॅटो ऐवजी सन ड्रायड टोमॅटो वापरतात त्यात. आणि ते वरून न घालता क्रीम बेस्ड सॉस मध्ये घालतात. Mozzarella नाहीये त्यात, parmesan आहे. चवीत आणि टेक्स्चर मध्ये फरक पडेल नक्कीच.
करून बघेन. आवडेल नक्कीच घरी.
तुमच्या पनीर घोटाळा सारखी ही पाकृ पण एकदम हिट होणार.>>> हो ती एकदम हिट डिश आहे. आजच सकाळी डब्यासाठी घोटाळा बनवला होता मी.
रेसिपी छान वाटतेय. लिशियस
रेसिपी छान वाटतेय. लिशियस चिकन मीही मागवले होते बेलापुरला. आवडले होते. रेसिपी करुन पाहायचा मोह होतोय, बेसिल व पार्सले सोडुन बाकी सगळे घरात आहे.
रेसिपी वाचुन आठवले. नव्या मुंबैच्या एका पेपरात एका इटरीचा रिव्यु वाचुन ती शोधत गेलो होतो. रिव्युमध्ये लिहिलेल्या जागेपासुन तो मुव झाला होता. मग नेटवर शोधाशोध करुन गेलो. नावही धड माहित नव्हते. ताजमध्ये काम केलेला कोणी बाबु नावाचा शेफ होता, त्याने बाबुज ऑबर्ग म्हणुन दुकान सुरु केले होते, ते शेवटी नव्या पनवेलमध्ये सापडले. त्याच्या टपरीचा लुक पाहुन आत जायची हिम्मत होईना. इतक्या लांब शोधत आलोत तर जाऊयाच म्हणुन आत गेलो. मेन्यु कार्डात इतालियन व तत्सम गोष्टीच जास्त दिसत होत्या आणि क्राऊड यंग पिपल, सकाळी ११ वाजता उठुन त्याच कपड्यात थेट ब्रंचला आलेल्यांचा होता. मला खावेसेही वाटत नव्हते पण तरी सोबतच्या टिनेजर्सनी काही मागवले. काय जबरदस्त फुड होते.. बापरे बाप. एक चिकन डिश खाल्ली ती वर दिलेल्या रेसिपीशी मिळतीजुळती होती. नंतर एकदोनदा गेलो परत पण लांब असल्याने नंतर कंटाळा केला.
अमित, अल्पना, धनवंती आणि
अमित, अल्पना, धनवंती आणि साधना धन्यवाद. धन्वंती हो आमच्या कडे पण दोन्ही मुलांना फार आवडले. लिशियस बद्दल सहमत. ट्राय करा आणि सांगा.
अल्पना ह्याच्या काही version मध्ये आहे parmesan. पण मुलांनी खाल्ले नसते, त्याची चव अजून त्यांना नाही आवडत. काही ठिकाणी मोझारेला होते म्हणून मी ते वापरले.
साधना नक्की ट्राय करा, नक्की आवडेल. पार्सले नसेल तरी चालेल. बेसिल मिळत असेल तर बघा. त्याला एक खूप स्ट्राँग फ्लेवर असतो. जो छान लागतो.
मस्त क्रिमी चिकनची रेसिपी आहे
मस्त क्रिमी चिकनची रेसिपी आहे. असे बाहेर खाल्ले आहे. पण घरी करून पाहिले नाही अजून.
अल्पना म्हणते तसे सन ड्राईड टोमॅटो चे पण खाल्ले आहे.