'नरकातला स्वर्ग'- पुस्तक परिचय

Submitted by संप्रति१ on 20 May, 2025 - 14:45

तुरुंगवासातील अनुभवांवर बेतलेली काही चांगली पुस्तकं; उदाहरणार्थ दोस्तोवस्कीचं 'द हाऊस ऑफ डेड्स', कोबाड गांधींचं 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम', अज्ञेय यांचं 'शेखर एक जीवनी', बु-हान सोनमेझ यांचं 'इस्तंबूल इस्तंबूल', कोसलरचं 'डार्कनेस ॲट नून' अशी काही प्रतिभावंत लेखकांची पुस्तकं वाचनात आली होती.

या पार्श्वभूमीवर अलीकडे आलेलं संजय राऊत यांचं 'नरकातला स्वर्ग' वाचलं. अनपेक्षितरीत्या हे एक चांगलं वाचनीय पुस्तक आहे, असं वाटलं. एरव्ही टीव्हीवर बाईट्स देणाऱ्या राऊतांचे इतर वेगवेगळे पैलू यात दिसतात. वर्तमानपत्रीय अल्पजीवी लिखाणाहून अधिक गांभीर्याने केलेलं हे आत्मवृत्तपर निवेदन आहे.

एकूण दोनशे चाळीस पानांपैकी, सुरूवातीच्या नव्वद पानांमध्ये अटकेच्या आधीच्या पडद्याआडच्या घडामोडी, ज्यामध्ये ईडीच्या रेड्स, चौकशीसत्रं, प्रश्नोत्तरं, तपास अधिकाऱ्यांची मेंटॅलिटी-अगतिकता, फोनाफोनी हे सगळं थेट नावानिशी आहे. हा भाग रोचक, थरारक आणि वेगवान आहे. ईडीच्या चौकशीला आणि ईडीला भस्मासुर बनवणाऱ्या पीएमएलए कायद्याला नेते नक्की का घाबरतात,(आणि सत्ताशरण होतात), हे या भागातून लक्षात येण्यासारखं आहे.‌

त्यानंतरच्या उर्वरित भागांमध्ये आठ दिवसांची ईडीची कोठडी आणि नंतर ऑर्थर रोडमधील शंभर दिवसांचा मुक्काम, याबद्दलचे अनुभव, किस्से, संवाद आहेत. डायरी फॉर्मॅटमधल्या काही नोंदी आहेत.

आपल्या तुरुंगांमधली परिस्थिती/व्यवस्था भयाण हादरवणारी आहे. अंडर ट्रायल कैदी, सिस्टीमच्या अक्षम्य बेपर्वाईमुळे वर्षानुवर्षे विनाकारण खितपत पडलेले बंदी, अमानवी कोंडवाडे, भ्रष्टाचाराची बजबजपुरी, माफिया-ड्रग्ज-रॅकेट्स, अजूनही आउटडेटेड ब्रिटिशकालीन जेल मॅन्युअलनुसार चाललेल्या सिस्टीम्स, यांबद्दलची राऊत यांची निरीक्षणं एक अनुभवी पत्रकार प्राप्त परिस्थितीत भवतालाकडे कसा बघतो, याची साक्ष देणारी आहेत. संवेदनशील मानवी निरीक्षणं आहेत ही. सक्तीच्या एकांतवासाचं रूपांतर लिहिण्यासारख्या सर्जक कृतीत करणं, त्यांना जमलेलं दिसतं. या पुस्तकाच्या निमित्ताने जेल्समधील परिस्थितीत सुधारणांच्या दिशेने किंचित जरी पाऊल पडलं तर पुस्तक सार्थकी लागलं, असं म्हणता येईल.

जेल ही काही चांगली जागा नाही. जीवन खडतर, काळ कटत नाही. मनाची बैठक मोडून पडते. पोटाची/प्रकृतीची प्रचंड आबाळ होते आणि त्याचे दुष्परिणाम पुढे आयुष्यभर भोगावे लागतात. घालमेल, असुरक्षितता, एकटेपणा, कौटुंबिक चिंता माणसाला आतून बाहेरून पोखरून काढतात. मानखंडनेचे प्रसंग वारंवार येतात, डिग्निटी राहत नाही. भल्याभल्यांची हेकडी उतरते. हे सगळं डोळसपणे स्वीकारत त्याबद्दल लेखकीय तटस्थतेनं लिहिणं राऊत यांना बऱ्यापैकी साधलेलं आहे. त्यांनी मूळ खेळ ओळखलेला आहे. हे सगळं त्यांना टाळता येण्याजोगं होतं. गप्प बसण्याचा पर्याय त्यांच्यापुढेही होताच. तरीही त्यांनी ठरवून या संकटात उडी घेतलेली दिसते. नुसत्या कोरड्या डरकाळ्या फोडायच्या आणि खरोखरीचा वेळप्रसंग आला की पळून जायचं, हे केलं नाही. त्यामुळे वैयक्तिक त्रासांचं भांडवल करण्यापेक्षा, किंवा उगाच गा-हाणी मांडून वाचकांना उबग आणण्याऐवजी, ते यामध्ये अधिक महत्त्वाच्या इश्श्यूंकडे लक्ष वेधताना दिसतात.

'पत्रास कारण की..' या भागात त्यांच्या मुलींशी त्यांचे पत्रसंवाद यात छापलेले आहेत. एरव्ही न दिसलेल्या, 'फॅमिली मॅन' राऊतांची झलक या पत्रांतून मिळते. आपण एकदम डॅशिंग आहोत असं बेअरिंग घेऊन वावरले तरीही, एक-दोन ठिकाणी ते वाचकाच्या भावनांना स्पर्श करण्यात आश्चर्यकारकरित्या यशस्वी झालेले आहेत. शेवटाकडे जाताना पुस्तक पुन्हा एकदा वेग पकडतं. कोर्टरूम ड्रामा, वातावरणातला तणाव, अनिश्चितता, सुटकेचा क्षण, हे त्यांनी प्रोफेशनल लेखकासारखं उभं केलं आहे.

राजकारणी माणसांना पुस्तक लिहिता येत नाही, अनुभव शब्दांत नीट बांधता येत नाहीत. लिहिलं तरीही ते फार सावधगिरी बाळगून फायद्यातोट्याचा हिशेब बघून लिहितात, किंवा घोस्ट रायटर्सकडून लिहून घेतात, असे काही योग्य समज आहेत. समकालीन महाराष्ट्रात यशवंतराव गडाखांसारखे क्वचितच एखादे राजकारणी आहेत, ज्यांनी फार चांगली आत्मवृत्तपर पुस्तकं लिहून हे समज खोडून काढले आहेत. याबाबतीत राऊत यांचं हे पुस्तक आणखी एक अपवाद म्हणता येईल. सदर पुस्तक लेखक म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा उंचावणारं आहे. (राजकारणी माणसांच्या मानाने राऊत यांचं वाचन बरंच चांगलं आहेसं दिसतं. शिवाय दांडगा लोकसंपर्क आणि अस्सल जीवनानुभव आहेत.‌ एक रसरशीत, हॅपनिंग आयुष्य ते जगलेले आहेत. भविष्यात त्यांनी आणखी आत्मवृत्तपर पुस्तकं लिहायचं मनावर घ्यायला हवं. मराठी साहित्याला झालेला त्याचत्याच मिडलक्लास शिळेपणाचा संसर्ग दूर होऊन थोड्याफार झणझणीत फोडण्या मिळाल्या तर बरंच आहे.)

राऊत यांच्याकडे चांगलाच 'मारक' असा सेन्स ऑफ ह्युमर आहे. आणि पुस्तकात त्याचा सढळ हाताने वापर करण्यास त्यांनी मागे-पुढे पाहिलेलं नाही. पुस्तकात बऱ्याच अशा 'जागा' आहेत, ज्यामुळे वाचता वाचता फाटकन् हसू फुटतं. डिप्रेसिंग परिस्थितीत तग धरून राहण्यामागे त्यांच्या या तल्ख विनोदबुद्धीचा मोलाचा वाटा असावा, अशी शंका येते.!

लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा छाप लिहिण्याच्या शैलीत ठळकपणे उतरलेला दिसतो. पुस्तकाचा टोन 'बोलका'/ 'संवादी' आहे. हे 'बोलण्याच्या शैलीत' लिहिलं गेलं आहे. कृत्रिम साहित्यिक अभिनिवेश टाळून, ज्या टोकदार भाषेवर त्यांची जडणघडण झालेली आहे, ती भाषा नैसर्गिकपणे यात आलेली आहे. (यावर आता कुणी म्हणेल की 'राऊत तसलेच आहेत! '.‌ तर होय. तसंही असू शकतं. पण या कारणास्तव एखादं पुस्तक न वाचताच ते निकालात काढणं योग्य नाही, हे ही खरं आहे.)

सत्तेचं दमनचक्र अंगावर घेताना कुठल्या टोकाला जायची तयारी ठेवली पाहिजे, याअनुषंगाने या पुस्तकातील अनुभव विरोधी नेत्यांना महत्वाचे ठरतील. भले ते नेते/सामाजिक कार्यकर्ते कुठल्याही विचाराचे, कुठल्याही राज्यातले, कुठल्याही देशातले, कुठल्याही काळातले असोत.

सोशल मिडियाच्या महापुरात, न्युजचॅनेल्सच्या मासळीबाजारात रोज कोण काय बोललं हे वाहून जातं. ते टिकत नाही. पुस्तकं टिकतात. हे पुस्तक एका अर्थाने आजच्या राजकीय संस्कृतीचं डॉक्युमेंटेशन आहे. भविष्यात तीसचाळीस वर्षांनंतरच्या पिढीला आजच्या सर्वंकष सत्तेची व तपासयंत्रणांच्या वेपनायझेशनची कार्यप्रणाली समजून घ्यावीशी वाटली, तर त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. (जसं की 'घोषित' आणीबाणीच्या काळातील तुरूंगवास-राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी विनय हर्डीकरांचं 'जनांचा प्रवाहो चालिला', हे पुस्तक आज पन्नास वर्षांनंतरही उपयोगी ठरतं.)
IMG_20250519_171247~3.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख पुस्तक ओळख. संजय राउतांची माध्यमातील वक्तव्ये / बेअरिंग ऐकून हे पुस्तक घेतले गेले नसते. पुस्तक ओळख का गरजेची आहे याचे हे एक उत्तम उदाहरण.

पहिल्या परिच्छेदातील उदाहरणांबद्दल - कोबाड गांधीचे फ्रॅक्चर्ड फ्रीडम, दस्तयव्हस्कीचे हाउस ऑफ डेड ही सेमाय बायॉग्राफिकल म्हणता येतील. डार्कनेस अ‍ॅट नून यात नाही बसणार. ते पूर्ण काल्पनिक आहे. सोल्झेनित्सेनचे 'वन डे इन द लाइफ ऑफ इवान डेनिसोविच' हे तुरुंगवासाच्या स्वानुभवावर आधारित प्रकारातले सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हटले जाते.

पुस्तक ओळख छान आहे.
बूक गंगा वर पुस्तकातले मनोगत वाचले आणी कंगना, केतकी वगैरे अनेक लोक आठवल आणी 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म' असे झाले.
पण तरीही हे पुस्तक कधी मिळाले तर नक्कीच घेण्यात येईल.

१.तुरुंगातले जीवन मांडले आहे पण राऊत हे कोणत्या प्रकारचे कैदी होते? राजकीय, आर्थिक, खून, चोरी, फसवणूक आणि शिक्षा झालेले कैदी का ज्यांच्यावर आरोप आहेत ते कैदी? फरक असतोच. तुरुंगातले वर्णन हे पुस्तकाचा विषयच आहे आणि ते राउतांनी खुमासदार शैलीत केले आहे असं म्हणतात. अनुभव,सत्य आणि शैली यांचा मेळ. पुस्तकाची पहिली प्रत केव्हाच संपली आहे. दुसरी अधिक रकमेचे निघणार म्हणतात.
२. तुरुंगातले जीवनावर पापिलॉं हेसुद्धा गाजलेले पुस्तक आहे.
३. PMLA कायदा झाला युपिए सरकारात.त्या अगोदरच्या चर्चेत पवार म्हणाले की हा कायदा आपण सत्तेत नसू तेव्हा आपल्यावर उलटेल. तसा विडिओ आहे.
४. PMLA कायदा - यामध्ये आरोप झालेल्या गुन्हेगारांविरुद्ध पुरावे द्यायचे नसतात तर आरोपीनेच सिद्ध करायचे असते की तो कसा निर्दोष आहे.
५.( अकरा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली व ती त्यांना परत मिळवता आली नाही. ) मालमत्ता खरेदीचे पैसे कुठून आणले आणि दिले हे दाखवायचे होते. " आमच्याकडे जे होतं ते ईडीने नेलं" असं त्यांनी एक दोनदा भाषणात सांगितलं आहे.
६. तुरुंगात का गेले तर पत्रा चाळ विकास कामात घोटाळा झाला त्यात मदत करण्यात यांचा सहभाग होता हा आरोप. पण मुद्दे क्रमांक ३.४.५.६. पुस्तकाचे विषय नाहीत. यांची उत्तरे मिळवण्यासाठी पुस्तक वाचायचं नाही.
७. एक स्वतंत्र पुस्तक म्हणून हे नेहमीच साहित्य वर्तुळात चर्चेत राहील.

परिचय आवडला.
पहिल्या परिच्छेदातल्या यादीत किटाळ - लक्ष्मण माने ही एक भर घालतो.

संजय राऊत राजकारणात येण्यापूर्वी किंवा सामनात जाण्यापूर्वी लोकप्रभाचे ( इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे मराठी साप्ताहिक) संपादक की उपसंपादक होते. हे साप्ताहिक आमच्याकडे बरीच वर्षे नियमितपणे वाचले जाई. त्यामुळे राउतांचा पुढचा प्रवास विस्मयजनक वाटला.

अनिल देशमुखांचंही पुस्तक आलं की यायचं आहे ना?

परिचय आवडला.
इतक्यातच रवींद्रनाथ पाटलांचीही मुलाखत यूट्यूबवर पाहण्यात आली. त्यांचं 'तुरुंगरंग' पुस्तक येतं आहे त्या निमित्ताने.
खेरीज सावरकरांचं 'माझी जन्मठेप' आहेच.

एक विदेशी मुंबईच्या तुरुंगात बरेच दिवस होते. त्यांनी लिहिलेले पुस्तक बरेच गाजले. कुणाला आठवतंय त्यांचे नाव?
शांताराम? कुणाला आठवत असेल तर प्लीज सांगा.
मी राउतांचा रोख ठोकचा नियमित वाचा आहे. त्यांच्यावरचे "आरोप" सिद्ध झाले का?
सम्प्रति त्यांना तुरुंगवास का सोसावा लागला? त्याविषयी त्यांनी काही लिहिले आहे का ?

हो.. शांताराम..
ग्रेगरी डेव्हिड राॅबर्टस्
अनुवाद : अपर्णा वेलणकर.

केकू, शांताराम बद्दल मी माझे इम्प्रेशन इथे लिहीलेले आहे - https://aisiakshare.com/node/1050
फार मस्त आहे. जरुर वाचा. पण नंतर नंतर थोडा कंटाळा आलेला कारण माझा विश्वास बसत नव्हता आणि फिक्शन मला आवडत नाही.
परत वाचेन एकदा. लेखाखालील अशोक पाटील यांची प्रतिक्रियाही जरुर वाचा. आणि मुख्य म्हणजे कसे वाटले ते लिहाच.

सामो
तुम्ही लिहिलेले परिक्षण वाचले. कमी शब्दात बराच काही सांगणारे.
अशोक पाटीलांची प्रतिक्रियाही वाचली.
तुम्ही आता संपूर्ण पुस्तक वाचले असणार. तेव्हा आता इथेही नव्याने एक लिहा.
एव्हढेच समजले की पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय मत बनवू नये.
संजोप राव ह्यांची प्रतिक्रिया मात्र धक्कादायक होती.

सन्जोप रावांची वाचते. मला आठवत नाही. मी पूर्ण पुस्तक वाचले नाही.
------
सन्जोप रावच कशाला, ननिंची प्रति क्रि या तशीच आहे की.
---------
बहुतेक (९९%) मृणालिनीही वाचत होती. मृ जमल्यास, तुझी प्रतिक्रिया/ स्वतंत्र लेख येउ देत.
------------
आता थांबते. संप्रतींचा धागा हायजॅक व्हायला नको. विपूत बोलू. धन्यवाद.