योद्धा

Submitted by पायस on 17 May, 2025 - 06:47

बॉलिवूडने आपल्याला अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत, कैक चांगले चित्रपट दिले आहेत, आणि अगणित अस्तित्ववादी कलाकृतिही (ज्या अस्तित्वातच का आहेत?) दिल्या आहेत. एवढी व्हरायटी असूनही शास्त्रार्थ करण्याच्या भानगडीत कोअर बॉलिवूड सहसा पडत नाही, तो समांतर वाल्यांचा प्रांत.
पण अधून मधून बॉलिवूडमधले कुमारिल भट्ट जागे होतात, त्यांना शास्त्रार्थ करायची लहर येते आणि त्यातून महान कलाकृति जन्माला येतात. मग अगम्य तत्वज्ञानात शोभतील असे मूळ संकल्पनांना छेद देणारे प्रश्न विचारले जातात.
राहुल रवैल दिग्दर्शित १९९१ सालचा योद्धा हा या पठडीतील चित्रपट आहे. त्याने विचारलेला कळीचा प्रश्न म्हणजे घणी खम्मा नक्की काय आहे? ते अभिवादन आहे, नाम आहे, विशेषण आहे, न्यायाधीश आहे, डॉन आहे, भिकारी आहे, की तनननना आहे?
अशी ही एका घणी खम्माची गोष्ट.

~*~*~*~*~*~

सिनेमाच्या सुरुवातीला चार मर्सिडिज एका आडबाजूच्या बंगल्यात प्रवेश करतात. अर्ली ९०ज चे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे पब्लिक टेलिफोन बूथ. त्यामुळे व्हिलनच्या खूफिया अड्ड्याबाहेरही एक पब्लिक टेलिफोन बूथ आहे, ज्याच्यावर व्हिलनने जराही आक्षेप नोंदवलेला नाही. या बूथच्या आडोशाने शफी इनामदार या अड्ड्यावर पाळत ठेवून आहे. पण हा अड्डा कोणाचा आहे?

व्हिलन म्हणून टकाटक सूट घातलेल्या डॅनीशी आपली ओळख करून दिली जाते. व्हिलन्सची गोलमेज परिषद सुरु आहे. इतर महत्त्वाचे भिडू परेश रावल आणि अंजन श्रीवास्तव. तसेच डॅनीचा उजवा हात म्हणून दादासाहेब खापर्ड्यांचा फेटा बांधलेला अन्नू कपूर. फुल्ल डिसक्लोजर - या सिनेमाचा एमव्हीपी अन्नू कपूर आहे. किंबहुना अन्नू कपूर आहे म्हणून घणी खम्मा आहे आणि हा सिनेमा आहे.
डॅनीचे नाव डागा तर परेशचे नाव छगनलाल. अंजन श्रीवास्तव मंत्री. डॅनी आपल्याला माहित असावे म्हणून सांगतो की हे सर्व व्हिलन असले तरी त्यांच्यात एकी आहे. मग पुन्हा आपल्या माहितीसाठी सांगतो की कोणीतरी त्यांना धोका देऊन परस्पर स्वत:चा धंदा करतो आहे. मग त्यांना वॉर्निंग देऊन घरी जायला सांगतो. हा गद्दार परेश रावल आहे. त्याच्या पॅनिक मोडमधल्या हालचाली गच्चीतून अन्नू कपूर फक्त बघतो. केवळ वॉर्निंग देण्यासाठी व्हिलन्सची गोलमेज परिषद घेऊन ऑलरेडी "व्हिलन्सची गोलमेज परिषद भरवण्यामागची कारणे" या संकल्पनेवर प्रेक्षकाला विचारात पाडले आहे आणि अजून पुरती पाच मिनिटेही झालेली नाहीत.

त्याहून कहर म्हणजे हे बाहेर पडणारे व्हिलन्स, त्यांचे ड्रायव्हर्स, बंगल्याचे गार्ड्स, गच्चीत उभा असलेला अन्नू कपूर या सर्वांना दिसेल अशा बेताने शफी इनामदार उजेडात उभा राहिला आहे पण त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. "पाळत ठेवणे" या संकल्पनेच्या मूळावरही घाव घातला गेला आहे आणि सिनेमा पुरता सुरुही झालेला नाही. प्रेक्षकाला कळून चुकते की संकल्पनांच्या शेवाळाने मातलेले आणि शास्त्रार्थाच्या डोहात साचलेले, एक असीम, अनंत गहिरे पाणी आपल्याला बघायला मिळणार आहे.

शफी इनामदार चंद्रकांत म्हणून एक तडफदार पत्रकार आहे. घरी बायको अंजना मुमताज आहे पण याला स्टिंग ऑपरेशन करायची हौस असल्याने रात्र रात्र तो व्हिलन्सच्या अड्ड्यांवर हेरगिरी करतो आहे. त्याच्याकडे काही लोक शांतीनगर वस्ती जमीनदोस्त करणार असल्याची बातमी घेऊन येतात. तो म्हणतो फिकर नॉट. हे सर्व आधी कोर्टात जाईल आणि आपल्याकडे वर्ल्ड क्लास वकील आहे, माझा मुलगा करण. करणच्या भूमिकेत सनी पाजी आहेत. वकील सनीपाजी म्हटल्यावर दामिनी सर्वात आधी आठवतो पण योद्धामध्ये त्यांनी सर्वप्रथम वकीलाचा काळा कोट परिधान केला.

करण आपला पक्ष मांडताना म्हणतो की शांतीनगर गेली चाळीस वर्षे त्या जागेवर आहे, प्लीज त्याला जमीनदोस्त करू नका. हे ऐकून न्यायाधीश महोदय इंप्रेस होतात आणि न्यायाधीश आहे - डॅनी? वर विरोधी वकील म्हणून चप्पट भांग पाडलेली संगीता बिजलानी? पुढे काय वाढून ठेवले आहे याचा विचार करत प्रेक्षक सनीपाजींवर फोकस करतो. सनीपाजी म्हणतात की हे डिमोलिशन बेकायदेशीर आहे कारण तिथल्या लोकांच्या भावना त्या जागेत गुंतल्या आहेत. संगीता म्हणते की भावनेच्या भरात न्यायसंस्था डिमोलिशनवर स्टे आणू शकत नाही. सनी म्हणतो की मायलॉर्ड माझी फ़ाज़िल मैत्रीण फाजीलपणा करत आहे. मग दोघे भारतीय न्यायव्यवस्थेला भ्रष्ट वकीलांनी लावलेला सुरुंग यावर मिनिटभर चर्चा करतात. डॅनी म्हणतो तुम्ही फाजीलांनी शांतीनगरविषयी एकही चांगला मुद्दा न मांडता वायफळ चर्चा करुन न्यायदेवतेला खजील केले आहे. टायब्रेकर म्हणून दोघांमध्ये सनीची अ‍ॅक्टिंग चांगली असल्याने मी त्याच्या बाजूने निर्णय देतो.

खटला संपताच कोर्टातले विरोधक प्रेमी युगुल बनून बागेत डान्स करायला जातात. सनी विचारतो की “प्यार बडा मुश्किल है, प्यार करने को तयार हो?” हा प्रश्न ऐकताच संगीताचे चप्पट केस डोळे विस्फारतात तसे विस्फारतात आणि ती त्याला बिलगते. संपूर्ण गाण्यात सनीपाजींची काळजी वाटते कारण अतिशय चीप सेटवर त्यांना डान्स करायला लावला आहे. एका ठिकाणी त्यांना उडी मारून रेलिंगवर बसायला लावले आहे. ते रेलिंग इतक्या गदागदा हलते की सनीपाजी म्हणाले बास मी एवढाच डान्स करू शकतो. मग त्याचा वचपा म्हणून सरोज खानने त्यांना वॉटरस्लाईडवर मोटरसायकल चालवायला लावली आहे. या सर्व गमतीजमती चड्डी बनियन घातलेली संगीता बघते. उर्वरित गाण्यात एस्सेल वर्ल्ड, मुंबई दर्शन झाल्यावर पुन्हा विवादाच्या संरचनेतून पाझरणार्‍या गहिर्‍या पाण्यात जायची वेळ होते.

सनी संगीतासोबत डॅनीकडे चहा प्यायला जातो. इथे कळते की संगीताचे नाव विद्या असून ती डॅनीची मुलगी आहे. जेमतेम स्मॉल टॉक होते तोच अन्नू कपूर येऊन घणी खम्मा करतो. डॅनी त्याच्यासोबत जातो तर कळते की जज डॅनी आणि डागा एकच व्यक्ती आहेत. हिंदी चित्रपटात या पॉईंटपर्यंत जज मुख्य व्हिलन नसत. पण ९०च्या दशकात बॉलिवूडच्या संकल्पना आणि शैलींमध्ये अमूलाग्र बदल घडून आले. त्यात न्यायाधीश मुख्य व्हिलन असू शकतो हा बदल योद्धाच्या तर्कार्थातून आलेला आहे. भेटायला आलेला शांतीनगरचा बिल्डर डॅनीला म्हणतो की याला काय अर्थ आहे डागासाहेब? डॅनी डोळ्यात कीव दाखवत त्याला समजावतो की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे. मी उद्याच सूरजला तिकडे पाठवतो.

सूरज म्हणजे संजू बाबा जाऊन शांतीनगरवाल्यांना धमकावतो की चौदा ऑगस्टपर्यंत निघून जा. पंधरा तारखेला झेंडावंदनासोबत कन्स्ट्रक्शन सुरु होईल. सनीपाजी येऊन म्हणतात की खूप पाहिले तुझ्यासारखे. संजू हसून निघून जातो. सनीपाजी आणि शफी इनामदार पोलिसात तक्रार करतात तर संजू वस्तीतल्या एका माणसाला हाणतो. पुन्हा कोर्टात सगळे जमतात - सनीपाजी, जज डॅनी, आणि चप्पट संगीता. संजूचा मित्र, शफी इनामदार, आणि चक्क मंत्री अंजन श्रीवास्तवही बसलेले आहेत. सनीपाजी म्हणतात की संजूने या माणसाला हाणले तरी त्याला तुम्ही शिक्षा द्या. संजूचा वकील म्हणतो की हाणामारी झाली तेव्हा संजू रिमांडमध्ये होता तो हे करणे शक्यच नाही. डॅनी म्हणतो की दर वेळेस शास्त्रार्थ करायला माझ्याकडे वेळ नाही, संजूला सोडा. शफी सनीचे सांत्वन करत त्याला सांगतो की संजूला जेल होणं महत्त्वाचे नाही, वस्ती वाचणे महत्त्वाचे आहे.

कट टू वस्ती. ज्या माणसाला हाणले त्याच्या घरातील भांडी कुंडी फेकण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मनिषा नाव दिलेल्या बिल्डिंगच्या दारात बसून संजू विडी फुकतो आहे. तोच सनीपाजी वकील पेहरावात अवतरतात. शारिरिक शास्त्रार्थ (पक्षी: फायटिंग) करायचा असल्याने सनी पाजी काळा कोट व शर्ट काढून टाकून बनियनमध्ये येतात. दोघेही एकमेकांना तू स्वत:ला योद्धा समजू नकोस बजावतात आणि फायटिंग सुरु होते. फाईट करता करता अचानक दोघे मासे ठेवलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये येतात. तिथे एका फळ्यावर “कोल्ड स्टोरेजमध्ये _____ जाण्यास परवानगी नाही” अशी गूढ सूचना आहे. झूम केल्यास त्या गाळलेल्या जागेत “महिलांना” अशी पुसट अक्षरे आहेत. यातून राहुल रवैलला काय शास्त्रार्थ करायचा आहे हे अस्मादिकांच्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडले आहे. तरी सनी-संजू बर्फात जाऊन मारामारी करतात. दोघे इतके हॉट आहेत की ते बर्फ वितळते आणि ते पाण्यात फाईट करतात. मग पोलिस येऊन दोघांना अटक करतात. अंजन श्रीवास्तव संजूची तर वेणीवाली संगीता सनीपाजींची जामीनावर सुटका करते.

सनीपाजींमुळे धंद्याचे नुकसान होत असल्याने डॅनी पुन्हा एकदा गोलमेज परिषद भरवतो. यावेळेस तो म्हणतो की सनीपाजी अनस्टॉपेबल आहेत पण गद्दारामुळे होणारे नुकसान तर आपण थांबवू शकतो. उम्मीद सिंग अर्थात अन्नू कपूरने मधल्या वेळात परेश रावलच्या पार्टनरच्या गाडीच्या डिक्कीतून ड्रग्जने भरलेली ब्रीफकेस काढून आणली आहे. एकतर हा बावळट प्राणी माल स्वत:च्या पर्सनल गाडीच्या डिक्कीत वागवतो आहे. केवळ या कारणास्तव त्याची इहलोकीची यात्रा संपवणे तर्कसंमत ठरावे. डॅनी म्हणतो की हा आणि परेश रावल आपल्या सिंडिकेटला धोका देत आहेत आणि स्वत:ची तुंबडी भरत आहेत. मग काही कारण नसताना डॅनी ड्रग्जची किंमत (प्रति किलो १ कोटी), इंजेक्शन कसे घ्यायचे, किती घेतले की नशा, किती घेतले की ओव्हरडोज वगैरे माहिती देतो. डॅनीच्या मते इंजेक्शन कोटावर फेकून मारले की लागते. ते शिरेत जाते आहे का नाही, मुळात कोट-शर्ट-बनियन आवरणातून त्वचेत सुई घुसली आहे का नाही याच्याशी काही संबंध नाही. अन्नू कपूर डॅनीने फेकलेली सिरिंज पार्टनरच्या आत रिती करतो आणि तो इन्स्टंट मरतो. आपल्या पार्टनरची अवस्था बघून प.रा. चा कावळा होतो. तो म्हणतो की मला मारू नका, मी हे शहर सोडून निघून जातो. डॅनी म्हणतो की जा मुली पुरवण्याचा धंदा कर, तुला तेच जमेल. परेश रावलही हे चक्क मान्य करतो (!!).

अन्नू कपूर म्हणतो की घणी खम्मा, या धंद्यात तर घणो फायदो आहे. हा धंदा घणी खम्मांनी केलाच पाहिजे. घणी खम्मा लगेच जाऊन कोणा तलरेजाला भेटतो. तलरेजा म्हणतो की छोट्या वस्त्यांमध्ये हा माल चांगला खपेल. डॅनीला कोणीतरी प्रति किलोची किंमत सांगितल्याने त्याला वाटते की अरे हे कांदे बटाटे विकण्यासारखेच आहे. तो संजय दत्तला जाऊन म्हणतो की चल दुकान टाकू. संजय दत्त म्हणतो कसलं? डॅनी म्हणतो अशा भाजीचं जिची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत प्रति किलो एक कोटी रुपये आहे. संजय दत्त लगेच ओळखतो - ड्रग्ज!
*प्रति किलो एक कोटी हा आकडा इतका हॅमर केला आहे की मला तर खात्री आहे राहुल रवैलने संजय दत्तला बाजूला घेऊन विचारले असणार - बा संजया, तू तर अनुभवी माणूस. ड्रग्जची प्रति किलो किंमत किती असते रे? संजय दत्तने कपाळावर हात मारून मनात आला तो आकडा रवैलला चिकटवला असावा.*

संजूबाबा म्हणतो की डागा साब ड्रग्जने समाजाचे नुकसान होते, तरी या धंद्यात पडू नका. डॅनी म्हणतो की अरे आपण गुंड आहोत, आपण बाय डेफिनिशन समाजकंटक आहोत. संजू म्हणतो की ते मला काही माहित नाही, जर तुम्ही हा धंदा केलात तर मी तुम्हाला सोडणार नाही. डॅनी विचारी व्हिलन असल्यामुळे तो रागाचे हलाहल शांतपणे पितो (आदल्या वर्षीच्या अघोरी रुपात विषाचे शॉट मारण्याची प्रॅक्टिस कामी आली). तो म्हणतो की ठीक आहे. तू माझा खास आदमी आहेस, तरी एक डाव मी तुझं ऐकतो, रागावू नकोस.

डॅनी निघून गेल्यानंतर संजूचा मित्र विचारतो की आता तुज्या दिलाचा राज खोल. संजू फ्लॅशबॅकमध्ये जातो तर तिथे ऑल इंडिया यूथ फेस्टिवल सुरु आहे. फेस्टिवलच्या नावाखाली जंगलात तंबू उभारले आहेत आणि कोळीण बनलेली शिल्पा शिरोडकर दिनतारा दिन करते आहे. ती म्हणते मी सतरा वर्षांची तो अठरा वर्षांचा. "लडका कंवारा, आशिक आवारा". आशाताईंच्या आवाजात गाणे सुरु होते. यूथ फेस्टिवलची सिचुएशन घेतल्याने शिल्पाचा गॅदरिंग डान्स खपून जातो. संजूही थोडी लेझिम खेळून घेतो. शिल्पा शिरोडकर हा गहन स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तिचा सिनेमात कॅमिओ आहे तरी रसग्रहणात तिचा अभ्यासही मर्यादितच ठेवूयात. उदा. तिला चवड्यांवर जागच्या जागी उडी मारून पुढे मागे कंबर हलवण्याची सोपी स्टेप करायची आहे. पण काही परावकाशीय हस्तक्षेपामुळे ती दीडपायावर उडी मारू बघते आणि ऑलमोस्ट आपटते. मग तोल सावरताच फ्लो मध्ये ती स्टेप्सचे चक्र पुढे सुरु ठेवते आणि हा ऑफबॅलन्स हळू हळू वाढत जातो. पुढच्या आवर्तनात मागच्या एक्स्ट्रा फ्रान्समधल्या आयफल टॉवरसारख्या सरळ आणि ही इटलीमधली पिसाच्या मनोर्‍यासारखी कललेली असा युरोपचा नकाशा आपल्याला दिसू शकतो.

या ओपन एअर प्रांगणातच एक तंबू टाकून तिथे संजू अ‍ॅन्ड फ्रेंड्सची टोचाटोचीची सोय केलेली आहे. संजू टोचून येतो आणि त्याचा धुंद चेहरा पाहून शिल्पाच्या चेहर्‍यावर भारतभूषण अवतरतो. गाणे संपल्यावर शिल्पा संगीताचा विग उसना घालून नशेत टुन्न संजूला कुरवाळते आहे. त्याचे धूम्रसहचर म्हणतात की आमच्या फुफ्फुसातला धूर जरी विरळ असला तरी आमची मैत्री म्हणजे दाट, गडद गहिरे पाणी. ती म्हणते की तुम्ही संजूच्या आयुष्याचे गहिरे वाटोळे करत आहात. याने ते भडकतात आणि तिच्या मुसक्या आवळतात. ती आपल्या परीने त्यांचा प्रतिकार करू बघते पण तिचा प्रतिकार तोकडा पडतो. तिकडे संजू नशेत चूर! आपला प्रियकर समोर असूनही मदतीला येऊ शकत नाही याचा तिला प्रचंड शॉक बसतो आणि ती फुटक्या कंदिलाची काच वापरून कॅमिओ संपवते. कट टू संजू आणि त्याची बहीण शिल्पासोबत हॉस्पिटलमध्ये. मृत्युशय्येवर शिल्पा त्याच्याकडून वचन घेते की नशेच्या वाटेला जाणार नाही. तो वचन देताच ती गचकन मरते. फ्लॅशबॅक संपला. संजू त्याच्या मित्राला सांगतो की मी या गुंडगिरीच्या धंद्यात ड्रग्ज विक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी आलो. माझ्या बहिणीला या सर्वाची झळ लागू नये म्हणून मी तिला माझ्या आयुष्यापासून खूप दूर पाठवले आहे. कट टू बाल्डविन एज्युकेशनल ट्रस्ट यांचे बोर्डिंग स्कूल. संजूची बहीण कोणी पदार्पण केलेली नवोदित अभिनेत्री आहे, तिचे सिनेमातले नाव भारती. तिचा मित्र पवनच्या भूमिकेत अभिनव चतुर्वेदी. अभिनवचा भारतीने असा समज करुन दिला आहे की तिचा भाऊ कोणीतरी फार मोठा माणूस आहे. अभिनव म्हणतो की मी तर फार गरीब आहे, तुझ्या भय्याला चालणार का? ती म्हणते की हो चालेल.

दोन तद्दन बुळबुळीत चेहरे दाखवल्यानंतर चित्रपट भरपाई म्हणून कडक शास्त्रार्थ करतो. व्हिलनचा खुफिया अड्डा भेदण्याच्या शास्त्रावर अनेक विद्वानांनी आपले मत मंडित केले आहे. योद्धा या सर्वांवर कडी असे मत देऊन या शास्त्राच्या अर्थाचा अनर्थ करतो. पुन्हा गोलमेज परिषद, तोच बंगला, तोच पब्लिक टेलिफोन बूथ, आणि सेम कपड्यातला शफी इनामदार. या खेपेला डॅनी अनुपस्थित असून अन्नू कपूर येणार्‍या मालाचे वर्णन करतो आहे की खालिस विदेसी माल, फारिन रिटर्न, चोख्खो माल, शुद्ध ड्रग्ज इ. इ. त्याला अभिमानाने जाहीर करायचं आहे की हा चोख्खो माल एक खास व्यक्ती आणणार आहे. पण शफी इनामदार या आनंदात मिठाचा खडा बनून फोन फिरवतो. त्याच्याकडे व्हिलनच्या खुफिया अड्ड्यातील गोलमेज परिषदेच्या खोलीतील टेलिफोनचा नंबर आहे आणि तो नंबर सामान्य पब्लिक टेलिफोन बूथवरुन रिचेबल आहे. हॉटलाईन कनेक्शन्स आणि व्हिलन अड्डा खुफिया असणे म्हणजे काय यावर याहून अधिक गहन शास्त्रार्थ काय असू शकतो? शफी इनामदारकडे अतिंद्रिय शक्ती असल्याने तो बरोब्बर अन्नू कपूर त्या खास व्यक्तीचे नाव जाहीर करण्याच्या ठोक्याला रिंग देतो. अन्नू कपूर एकाला म्हणतो की बघ कोण आहे. फोन उचलल्यावर शफी इनामदार चिडीचूप. हाय हॅलो कशालाच उत्तर नाही. असे दोन तीन वेळा झाल्यावर अन्नू कपूर चिडतो. त्याचा राग बघून फोन उचलणारा शफी इनामदारला इडियट म्हणून खुशाल कॉल चालू ठेवतो. शफीचे फावते. तो लाईन होल्ड करून सर्व कारस्थान ऐकतो. ती खास व्यक्ती म्हणजे मंत्री अंजन श्रीवास्तव!

अतिंद्रिय शक्ती असल्या तरी शफी इतर कलमवाल्यांप्रमाणेच ओव्हरस्मार्ट आहे. तो दुसर्‍या दिवशी पेपरात बातमी छापतो की परदेशवारीवरुन परतणारा अंजन श्रीवास्तव सोबत ड्रग्ज घेऊन येत आहे. ती बातमी वाचून अन्नू कपूर सर्वात आधी एका शिंप्याला बोलावून घेतो. डॅनी विचारतो की हा कोण आणि इथे काय करतो आहे? अन्नू कपूर म्हणतो की घणी खम्मा मी फुचरचा विचार करणारा माणूस आहे. आता तुम्हाला किमान पंधरा-वीस वर्षांची शिक्षा होणार बघता मी म्हटलं घणी खम्मांच्या मापाचे कैद्याचे कपडे शिवून घ्यावेत. डॅनी त्याचे बखोट धरून ओरडतो - ही काय सार्काजमची वेळ आहे? काय झालंय ते स्पष्ट शब्दांत सांग. अन्नू कपूर मग शफीचे प्रताप विदित करतो.
*इथे डॅनी वाचत असलेल्या वर्तमानपत्रात "बॉम्बे गर्ल इन यूके सेक्स स्कँडल" मथळा आणि पॅमेला सिंह (बोर्डेस) या फॉर्मर मिस इंडियाचा फोटो स्पष्ट दिसू शकतो. ही १९८९ ची सत्यघटना आहे. घणी खम्माचे बिंग फुटू शकते या संदर्भात ही सत्यघटना उद्धृत करुन राहुल रवैलने घणी खम्माला एका नवीन आयामात नेऊन ठेवले आहे.*

डॅनीला आठवते की संजू पेपर वाचत नाही. मग तो त्याला जाऊन खोटेच सांगतो की मी अंजनला माझ्या स्विस बँकेची पासबुके भरायला पाठवलं होतं. आता तो पकडला गेला तर आपले काळे धंदे बंद पडतील. मी तुला मजबूत पैसे देतो पण अंजनला वाचव. संजू म्हणतो ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. दुसर्‍या दिवशी अंजन श्रीवास्तव इटलीहून (अलिटालियाचे विमान दिसते) परततो. त्याला पोलिस अडवतात तर त्यांच्या समोर विमानतळ कर्मचार्‍याच्या वेषात संजू येतो आणि बॅगांची अदलाबदली करतो. ही अदलाबदली इतकी ढळढळीत आहे की ती अंजनला अडवणार्‍या सगळ्या पोलिसांना, त्याला कशी अटक होते हे बघायला आलेल्या बघ्यांना, सर्वांना दिसली पाहिजे. पण सनीपाजींसमोर काही बघे उभे राहिल्याने त्यांना ती दिसू शकत नाही आणि त्यामुळे संजूने ती अदलाबदली सफाईने केली असे नाईलाजाने म्हणावे लागते.

सनीपाजी हैराण की अजून काही सापडलं कसं नाही. तेवढ्यात संजू वाट वाकडी करुन त्यांना जाऊन धडकतो. सनीपाजींची ओळख पटताच तो जिवाच्या आकांताने धावत सुटतो. सनीला दिसते की संजूकडे अंजनसारखीच दिसणारी बॅग आहे. सनीच्या चंद्रविलासमध्ये दिवट्या पेटतात आणि तो संजूचा पाठलाग करतो. बॅगेज बेल्ट, स्कायब्रिज, विमान धावपट्टी अशी स्टेशने घेत अखेर सनी संजूला गाठतो. संजू त्याच्या परीने प्रयत्न तर करतो पण त्याचे एक चालत नाही. त्यात हातून बॅग सुटून आतली सगळी पावडर सांडून वाया जाते (प्रति किलो एक कोटी रुपये). ड्रग्जचे कनेक्शन समजताच संजू आत्मसमर्पण करतो.

संजू कबूल करतो की ही अंजनची बॅग आहे आणि मला खोटं सांगून हे नीच काम माझ्याकडून मंत्री आणि जज धर्मेश अग्निहोत्रीने करवून घेतलं. एक तृतीयांश सिनेमा संपल्यानंतर आपल्याला डॅनीचे शरीफ नाव समजते. अंजनला तर लगेच अटक करतात. पण डॅनीवरच्या आरोपांचे काय? कमर्शिअल व्हिलन असा धाडकन संपत नसतो. कलमवाल्या शफी इनामदारला आपल्या ज्ञानाचा उजेड पाडण्याची हौस येते. तो म्हणतो की धर्मेश अग्निहोत्री इतका सज्जन मनुष्य या अलम दुनियेत नाही. तुझी साक्ष अंजन विरुद्ध मात्र नक्कीच ग्राह्य आहे पण डॅनीविरोधात मी एक शब्द ऐकून घेणार नाही. सनीपाजीही जोशात संजूला दोन शब्द ऐकवतात. संजू दुश्मनी आजमावयला परत येईन म्हणून अंजनसमवेत कोठडीत जातो. या यशाला सेलिब्रेट करायला बागेत फ्रॉकवाले संगीता वाटच पाहते आहे. चारवेळा उव्वू उव्वू केल्यावर अलका याज्ञिक गाऊ लागते "होल डे होल नाईट दिल तरसे, जाने सावन कब बरसे". प्रेक्षकाला विश्रांती द्यायला म्हणून टाकलेले एकदम सिंपल गाणे. सनी संगीता दोघेही ओक्के नाचले आहेत. नाव ठेवण्यासारखे विशेष काही नाही पण आवर्जून कौतुक करावे असेही काही नाही.

=================

अंजन श्रीवास्तव कोठडीत निवांत झोपला असता संजय दत्तलाही नेमकी तीच कोठडी मिळते. तो आल्या आल्या अंजनच्या पोस्ट ऑफिसवर लाथ मारून त्याला उठवतो आणि दे मार दाणादाण! हवालदार येऊन संजूला घेऊन जातात आणि अंजनची सुटका करतात. या शॉटचा काही पॉईंट नाही. फिल्म फेस्टिव्हल सर्किट्समध्ये अशा निरर्थक शॉट्सची वारेमाप प्रशंसा केली जाते पण ते शॉट्स चंदन-वंदन-गहिरे-स्पंदन छाप मिळमिळीत स्टॅटिक फ्रेम्स असतात. निरर्थक स्टॅटिक शॉटच्या जागी अंजनला डायनॅमिकली बडवून रवैलने निरर्थकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा शास्त्रार्थ साधला आहे.

कट टू शफी इनामदारची मुलाखत. त्याने केलेल्या पराक्रमाबद्दल असतील नसतील तेवढे सर्व पत्रकार त्याच्या दिवाणखान्यात जमले आहेत. फ्रेमच्या नैऋत्य कोपर्‍यात एक टीव्ही तीच मुलाखत दाखवत आहे ज्यातून हे थेट प्रक्षेपण असल्याचे आपल्याला कळते. आणि जो कॅमेरा थेट प्रक्षेपण करतो आहे तो कॅमेरामनसकट फ्रेमच्या पूर्वेस आहे. या प्रकारचे फ्रेम विदिन अ फ्रेम शॉट्स पर्स्पेक्टिव्ह अनसेटल करायला बरेच नामवंत दिग्दर्शक वापरतात (उदा. यासुजिरो ओझू) पण टीव्हीत सेम फ्रेम दाखवून फ्रेम विदिन फ्रेम साधणे ही लेट ८०ज/अर्ली ९०ज कोअर बॉलिवूडची खासियत आहे. योद्धा, मेहुलजींचे चित्रपट असे कितीक या शास्त्रार्थाचे उद्गाते म्हणावे लागतील. त्यात इथे रवैलने प्रेक्षकाची नजर पूर्व-नैऋत्य फिरवून अँटी-नॅचरल परस्पेक्टिव्ह फ्रेम लावली आहे. याचे आर्टहाऊस इंटरप्रिटेशन 'एक्सपेक्ट द ओपोझिट' असे करून इथे डॅनी जो दिसतो त्याच्या विरुद्ध आहे याचा क्लू आहे असे म्हणता येईल आणि या कलाकृतीला उंचावता येते. तात्पर्य काय, एकदा तुम्ही नीट निरीक्षण करायचे ठरवले की कोणत्याही कलाकृतीत वाट्टेल तितके कंगोरे सापडतात!

तर शफी इनामदारची मुलाखत! शफीला विचारतात की संजूने जो आरोप केला आहे - डॅनी या सगळ्याचा मास्टरमाईंड आहे - त्याविषयी तुमचे काय मत आहे? शफी म्हणतो की त्या न्यायाच्या पुजार्‍यावर असे किंतु उपस्थित करण्याचा विचारही आपल्या मनास शिवता कामा नये. डॅनीही पी.आर. ऑप. करून शफीसाठी हार व अन्नू कपूर घेऊन येतो आणि त्याचे कौतुक करतो. शफी बोलण्याच्या ओघात सांगतो की त्याला अंजनचे सीक्रेट कसे कळाले आणि तो डॅनीला डिवचतो - आज कल के मुजरिम कुछ ज्यादा ही बेवकूफ हैं. पत्रकार गेल्यावर डॅनी विचारतो की तुला अजून काय माहिती आहे? शफी म्हणतो त्यांचा बॉस मला माहित नाही पण त्याचा अड्डा माहित आहे. डॅनी म्हणतो मला तिकडे नेऊ शकशील? शफी म्हणतो चला.

दिवसाउजेडी दिसते की डॅनीच्या बंगल्याचे नाव RUFS असे आहे. अस्मादिकांच्या मते ही शफीच्या ओव्हरस्मार्टगिरीवर प्रतिक्रिया आहे (संदर्भ - https://www.urbandictionary.com/define.php?term=RUFS&defid=7137214). दोघे बंगल्यात जातात. गोलमेज परिषदेची खोली, तो कुप्रसिद्ध टेलिफोन सगळं बघितल्यावर डॅनी शफीला घेऊन दिवाणखान्यात येतो आणि म्हणतो की ये तुझी बंगल्याच्या मालकाशी ओळख करून देतो. शफीला एका लाल फडक्याने झाकलेली तसबीर बघायला सांगितले जाते जी अर्थातच डॅनीची असते. शफीला फायनली आपण वाहवत गेल्याची जाणीव होते.

ते दोघे एका वेगळ्या घरात जातात जिथे अँथनी पिंटो, तो गुंड ज्याने फोन चालू ठेवण्याचा गाढवपणा केला, आहे. डॅनी आपल्या खिशातला एक इन्स्पेक्टरही घेऊन आला आहे. डॅनी पट्टसे हेडशॉट देतो आणि अँथनीने खून शफीने केला आहे असे इन्स्पेक्टर मान्य करतो. सनी-अंजना मुमताज मरतील या धमकीमुळे शफी गप्प राहतो. अन्नू कपूर म्हणतो की घणी खम्मा शफीने खून केला आहे हे कोणालाही पटणार नाही आणि सनीला समजेल तुम्ही गडबड आहात. त्यापेक्षा शफीला उडवून टाका. पण एमव्हीपीचं न ऐकता डॅनी आपलेच म्हणणे रेटतो आणि ही स्ट्रॅटेजिक मिस्टेक त्याला पुढे महागात पडते.

जेलमध्ये सनीपाजी शफीकडून सत्य काढण्याचा प्रयत्न करतात पण डॅनी वेळेत पोहोचून शफीला गप्प करतो. मग जेलर राणा जंग बहादूर (हे अ‍ॅक्टरचे नाव आहे. दुल्हेराजात प्रेम चोप्राचा भाऊ) आणि अंजन श्रीवास्तव डॅनीच्या सांगण्यावरुन स्वयंपाकघरात बेदम मारतात. त्याचे तोंड उकळत्या पाण्यात बुचकळतात, विस्तवाचे डाग देतात. संजूबाबा येऊन त्याला थोडक्यात वाचवतो. हॉस्पिटलमध्ये शफी सांगतो की हे सर्व मंत्री व जेलरने केलं आणि संजूने मला वाचवलं. स्टेटमेंट रेकॉर्ड करायला डॅनी. अंजना मुमताज येऊन मग बांगड्या तोडते आणि शफीचा रोल संपतो. डॅनीच्या लक्षात येते की संजूबाबाची साक्ष मंत्री/जेलर जोडगोळीला अडकवू शकते. सनी संजूला जाऊन विनंती करतो की खरी साक्ष दे, मला माहिती आहे तू मूळचा चांगला आहेस नाहीतर शफीला वाचवायला आलाच नसतास. पण दुर्दैवाने डॅनीने संजूला आधीच बहिणीच्या मुद्द्यावरून खिशात घातले आहे.

खटला भरतो. विरोधी वकील म्हणतो की शफी विष खाऊन आत्महत्या करत होता. मंत्रीने तर त्याला वाचवायचा प्रयत्न केला. पुरावा म्हणून खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडला आहे. संजूही खोटी साक्ष देतो. अखेरचा प्रयत्न म्हणून सनी डॅनीला विनंती करतो की शफीच्या अखेरच्या शब्दांचा तू साक्षीदार आहेस, तर तू तरी माझ्या बाजूने बोल. डॅनी म्हणतो की उंदराला मांजर साक्ष. सनी खटला हरतो. सगळे निघून जातात पण सनी शेवटपर्यंत 'जहां अन्याय का जन्म होता हो ऐसी अदालतों को तो तालें लगा देने चाहिए' हा डायलॉग मारण्यासाठी थांबतो. जेलमध्ये संजू त्याचा मित्राला सांगतो की हे सगळं घडलंच नसतं जर सनीने त्या दिवशी माझ्यावर विश्वास ठेवला असता. अचानक सनी येऊन म्हणतो बरोबर आहे सगळी चूक माझीच आहे. आजपासून हा काळा कोट घालणं बंद. बघच मी आता काय करतो. डोक्यात राख घालून सनी डॅनीच्या घरी जातो. डॅनी विचारतो की काय झालं? सनी म्हणतो की तू जर आयत्या वेळी पलटला तर तुझ्यावर मला संशय येणारच ना? तुझा बॉस कोण आहे? डॅनीला मौज वाटते पण सनीपाजी गॉट नो चिल. ते शिवीगाळ करत डॅनीला यथेच्छ बुकलतात. संगीता मध्ये पडून डॅनीला वाचवते तर अन्नू कपूर पोलिस घेऊन येतो. सनी हसतो कारण त्याला जेलमध्ये जायचेच होते. अन्नू कपूर म्हणतो घणी खम्मा मी म्हटलं होतं शफीला डायरेक्ट मारा, तुम्ही ऐकलं नाही. आता हा जेलमध्ये गेला तर तो मंत्री/जेलरकडून सर्वकाही जाणून घेईल.

डॅनी आधी अंजना मुमताजकरवी सनीला जामीन पाठवतो, सनी तो चुरगाळून कचर्‍यात फेकतो. खटला भरतो, एका पावट्या जजसमोर संगीता सनीविरोधात साक्ष देते. डॅनीलाही साक्षीला बोलावतात. डॅनी त्याचा पक्ष कटघर्‍यात उभे राहून न मांडता येरझार्‍या घालत मांडतो (कटघर्‍यावर शास्त्रार्थ!). तो म्हणतो की सनी एक टॅलेन्टेड वकील आहे तरी त्याच्या भविष्याचे नुकसान होऊ नये म्हणून मी तक्रार मागे घेतो आहे, पहिली चूक समजून त्याला माफ करुया. सनी हुषार आहे. तो डॅनीला सगळा प्रसंग पुन्हा सांगायला लावतो आणि वदवून घेतो की मी तुला श्रीमुखात देणार तेवढ्यात पोलिस आले. मग तो म्हणतो की युअर ऑनर जर पोलिस आले नसते तर मी डॅनीला ही अशी वाजवली असती आणि ब्रह्मांड आठवेल अशी सण्णकन कानाखाली वाजवतो. एवढे झाल्यानंतर सनीला शिक्षा द्यावीच लागते. डॅनीचा गाल लाल होतो आणि सनीचा हेतु साध्य होतो.

अभिनव भारती स्टोरीलाईन अजूनही चालूच असल्याचे कळवून काही अनाकलनीय कारणास्तव मुंबई/दिल्लीत भटकलेल्या सनीला बिहारसाईडला हजारी बाग डिस्ट्रिक्ट जेलमध्ये धाडतात. सनी हवालदार बिरबलला बोलण्यात गुंतवून कोठडीच्या किल्ल्या हस्तगत करतो. त्याच्या अंदाजाप्रमाणे मंत्री/जेलर स्वयंपाकघरातच आहेत. तो म्हणतो की मी तुमच्या जेवणात विष मिसळले होतं. दोघे सनीवर विश्वास ठेवून सनीकडील प्रतिविषासाठी एकमेकांविरोधात साक्ष द्यायला तयार होतात. सनी म्हणतो की ते सर्व ठीक आहे पण माझ्याकडे एकच डोस आहे. मंत्री म्हणतो डोस मला दे मला अजून राष्ट्राच्या वाढीसाठी खूप काही करायचं आहे. जेलर म्हणतो डोस मला दे माझं अजून लग्न झालेलं नाही. लग्न झाल्यानंतर मलाही राष्ट्राच्या वाढीसाठी खूप काही करायचं आहे. सनी म्हणतो मग खेळा डब्ल्यू डब्ल्यू एफ. झोंबाझोंबीत जेलर मंत्र्याला चाकू भोसकून ठार करतो आणि गटागटा प्रतिविष पितो. सनी म्हणतो की ते प्रतिविष नाही, विष होतं. जेलर मरता मरता सनीला सांगतो की तुझा बदला अपुरा आहे. मुख्य घणी खम्मा डॅनी अजूनही बाहेर आहे. सत्य कळल्यावर सनी सुमडीत आपल्या कोठडीत परत जातो.

डिस्ट्रिक्ट जेलमध्ये मेलेल्या मंत्री/जेलरची प्रेते डॅनीला सेंट्रल जेलमध्ये सापडतात. पोलिस सनीच्या पायावर वळ उठेपर्यंत मारतात जेणेकरुन तो कबूल व्हावा. डॅनी येऊन त्याला डिवचतो. यावर सनी सगळ्यांना ढकलून देतो आणि डॅनीची कणीक तिंबतो. त्याला कसेबसे आवरल्यानंतर सनी 'कोर्ट इज अ‍ॅडजर्न्ड" म्हणून निघून जातो. डॅनीला अन्नूचे न ऐकल्याचा पश्चात्ताप होतो पण एव्हाना उशीर झाला आहे. संजू सुटून बाहेर येतो. डॅनीच्या घरी रात्री पार्टी सुरु आहे. संजू अनंतकाळचा इन्स्पेक्टर जगदीश राजला घेऊन तिथे येतो. त्याच्या सांगण्यावरुन RUFS बंगल्यावर धाड मारुन डॅनीचा माल जप्त केला आहेच. त्याशिवाय संजूकडे डॅनीच डागा असल्याचे पुरावे पण आहेत. शहरातल्या सर्व मान्यवरांसमोर डॅनीचे तोंड काळे होते. एमव्हीपी अन्नू कपूर याही परिस्थितीत दिवे घालवून डॅनीला पळून जायला मदत करतो.

डॅनीच्या राहत्या बंगल्याची झडती घेतात तर अन्नू कपूर स्वत:हून सगळी संपत्ती दाखवायला लागतो. 'तरी मी घणी खम्मांना सांगितलं होतं, ही पापाने कमवलेली धनदौलत नकोच' असं साळसूदपणे म्हणत तो हळूच दागिने, रोकड लंपास करतो आहे हे संगीता पाहते. ती त्याला पकडून देते तर अन्नू कपूर इतक्या पोलिसांच्या गराड्यातून शिताफीने निसटून तोच खरा योद्धा असल्याचे सिद्ध करतो. पब्लिक बूथ(!) मधून डॅनी काही करता येते का पाहतो पण सगळे उलटून पडतात. अन्नू कपूर सल्ला देतो की घणी खम्मा पडता काळ आहे तरी आपण हे शहर सोडूया. डॅनी गोव्याच्या बसमध्ये बसतो तर गोव्याहून बसने अभिनव भारती येतात. डॅनी त्या दोघांना संजू रिसीव्ह करतो आहे हे बघतो. पण अजून युद्ध संपलेले नाही. भारती संजूची बहीण आहे तर अभिनव सनीचा भाऊ निघतो. संजू त्या दोघांचे लग्नाची बोलणी करायला तयार होतो आणि तिकडे सनीपाजी जेलमधून बाहेर येतात. सनी डॅनीच्या घरी जातो तर तिथे फक्त संगीता असते. डॅनी फरार आहे ऐकल्यानंतर सनी त्याला शोधण्याची प्रतिज्ञा करतो. संगीता म्हणते की माझ्यावर आगपाखड करुन काय होणार आहे? तुझ्या भावाच्या लग्नाची बोलणी होणार आहेत. त्याची वहिनी तिथे हवी असेल तर शून्य मिनिटात शांत हो. संजू आणि त्याचा मित्र थोडे बरे कपडे घालून सनीच्या घरी जातात. पांचट हास्यविनोद करुन तो अंजना मुमताजला तर पटवतो पण नेमके सनी-संगीता तिथे येऊन थडकतात. सनी-संजू जुनी धुणी काढून भांडतात आणि लग्न मोडते. अभिनव भारती डिप्रेस्ड! अंजना मुमताज आणि संजूचा मित्र त्या दोघांना पळून जायला मदत करतात. सनी-संजू आगपाखड करतात पण त्यांना ते दोघे सापडत नाहीत. अखेर हे गेले तर गेले कुठे?

अभिनव भारती लव्हट्रॅकचा या सिनेमात काय उपयोग आहे? घणी खम्मा आणि अन्नू कपूर कमबॅक कसे करतील? पराच्या कावळ्याचा कुत्रा कसा होतो? आणि या सिनेमात अखेर योद्धा कोण आहे? या सर्व प्रश्नांवर चर्चा अल्पविरामानंतर रसग्रहणाच्या क्लायमॅक्समध्ये.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आपल्या पार्टनरची अवस्था बघून प.रा. चा कावळा होतो
<<<<<< Rofl
बाकीचं वाचतेय अजून पण या वाक्यासाठी खास दंडवत घालायला आले. _/|\_ निव्वळ खतरनाक! Rofl

लहानपणी सनी देओल चा घायल बघितला होता आणि प्रचंड आवडला होता, तेव्हा VCR आणून चित्रपट बघायचे फॅड होते, तेव्हा योध्दा बघितल्याचे आठवते, बालपणी आवडला होता, हा तोच चित्रपट आहे ना ज्यात परेश रावल la कुत्रे चावतात व तो कुत्र्यासारखा वागू लागतो

एका ठिकाणी त्यांना उडी मारून रेलिंगवर बसायला लावले आहे. ते रेलिंग इतक्या गदागदा हलते की सनीपाजी म्हणाले बास मी एवढाच डान्स करू शकतो.
>> नशीब रेलिंग आहे इथे. परबतों से आज में टकरा गया मध्ये सनीला टुणकन उडी मारून घोड्यावर बसवले आहे. ते ही खुर्चीवर बसल्यासारखे एका पायाची घडी घालून.

अभिनव भारती हे दिल्लीत मुख्यालय असलेल्या एखाद्या निमसरकारी संस्थेचं नाव वाटतं. दिग्दर्शक रवैल आहे नाहीतर त्याने सावरकर वाचलेत की काय अशी शंका आली असती.

बा संजया, तू तर अनुभवी माणूस.
प.रा. चा कावळा होतो
शिल्पाचा गॅदरिंग डान्स खपून जातो. संजूही थोडी लेझिम खेळून घेतो
>>>> Rofl
तुफान हसले.

: D
भारी लिहिताय

हा चित्रपट एका खेडेगावात उन्हाळी सुट्टीमध्ये लहानपणी गेलो होतो, तेव्हा VCR कॅसेट्स आणून एका तरुण मंडळाने लावलेला तेव्हा पाहिलाय.
आवडलेला कारण 2 action हिरो आणि भरपूर फायटिंग.
हिरोईन लोकं आठवतच नव्हते.
शेवटी हिरोईन मेलेली असल्याने संजू बाबा बलिदान देतो हे आठवतंय.
काहीतरी टॉवरवर वर चढत मारामारी होती असेही अंधुक आठवतंय.

धमाल लिहीले आहे Lol

दादासाहेब खापर्ड्यांचा फेटा बांधलेला अन्नू कपूर >>> Lol इथेच पहिला फुटलो

अर्ली ९०ज चे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे पब्लिक टेलिफोन बूथ >>>> टोटली. लेट ८०ज अर्ली ९०ज. शराबी ते डीडीएल्जे (दोन्ही वगळून) हा तो रोमहर्षक काळ असेल. "शांतीनगर" असे नाव असलेली झोपडपट्टी हे ही असेच एक लक्षण. तिची इन्ट्रोच सहसा तेथे बुलडोझर आल्यावर येते Happy व्हिलन्सची परिषद हे ही एक असेल.

सर्वांना दिसेल अशा बेताने शफी इनामदार उजेडात उभा राहिला आहे पण त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. "पाळत ठेवणे" या संकल्पनेच्या मूळावरही घाव घातला गेला आहे >>> Lol पुणे-५२ मधली पाळत आठवली. ज्यांच्यावर पाळत ठेवायची त्यांच्या गेट समोर सरळ पुढे उभा असतो गि.कु.

यातला थोडा भाग मी पूर्वी पाहिला होता, तो आठवला. तो सुरूवातीचा कोर्ट सीन, मग सनी-संगीताचे गाणे आणि "बस्ती" मधल्या वल्गना वगैरे. तेथे बोअर झाले म्हणून पुढे पाहिला नव्हता. आता पाहतो.

“शांतीनगर" असे नाव असलेली झोपडपट्टी हे ही असेच एक लक्षण. तिची इन्ट्रोच सहसा तेथे बुलडोझर आल्यावर येते
>>> अगदी अगदी
रामपूर नामक गावासारखं…

Rofl

डिटेल मधे प्रतिसाद लिहिणार आहेच. पण
सनीच्या चंद्रविलासमध्ये दिवट्या पेटतात
या वाक्याला आधी हसून घेते Rofl

हा खास पायस टच!

त्याशिवाय सगळे गहिरे पाणी मेन्शन पण Lol

घणी खम्माची गोष्ट
दादासाहेब खापर्ड्यांचा फेटा बांधलेला अन्नू
व्हिलन्सची गोलमेज परिषद भरवण्यामागची कारणे
सर्वांना दिसेल अशा बेताने शफी
फ़ाज़िल मैत्रीण फाजीलपणा करत आहे
दोघांमध्ये सनीची अ‍ॅक्टिंग चांगली असल्याने मी त्याच्या बाजूने निर्णय
कोल्ड स्टोरेजमध्ये _____ जाण्यास परवानगी नाही” अशी गूढ सूचना
प.रा. चा कावळा होतो
प्रति किलो एक कोटी
बाय डेफिनिशन समाजकंटक
मागच्या एक्स्ट्रा फ्रान्समधल्या आयफल टॉवरसारख्या सरळ आणि ही इटलीमधली पिसाच्या मनोर्‍यासारखी कललेली
घणी खम्माला एका नवीन आयामात
स्विस बँकेची पासबुके भरायला पाठवलं होतं
>>>
Rofl
विशेष विशेष आवडले आहेत हे पंचेस. अजून पण आहेत. सगळा लेखच कॉपी पेस्ट करावा लागेल
ते गोलमेज परिषद तेव्हाच्या पिक्चरांचं व्यवच्छेदक लक्षण होतं. आणि उपस्थित व्हिलन तिथे बसून काहीही फालतूपणा करायचे. आता हा डॅनी कसला casually मुलींचा धंदा कर म्हणून सांगतो पराला . कसं सुचतं? Lol
संजूबाबाने टोचाटोच सीन करता केला असेल हा पिक्चर. शिवाय त्याच्या ज्ञानाचा उपयोग करण्याची नामी संधी गावली त्याला.
पुन्हा एकदा पाहायला हवा पिक्चर.

संकल्पनांच्या शेवाळाने मातलेले आणि शास्त्रार्थाच्या डोहात साचलेले, एक असीम, अनंत गहिरे पाणी
विवादाच्या संरचनेतून पाझरणार्‍या गहिर्‍या पाण्यात
आमची मैत्री म्हणजे दाट, गडद गहिरे पाणी
>>> Lol मतकरींना गहिवरून आलं असेल आज.

सनीच्या चंद्रविलासमध्ये दिवट्या पेटतात
>>> सुपरलोल. नरहरी पंत घाबरतील अश्याने Proud

वाचतेय
सध्या रुमाल
ह्या सिनेमाची link दया की कुणीतरी Happy

योद्धा-इंटरनेट आर्काइव्हज लिंक

वाचतोय..भारीच लिवलंय..
पाट्या पडायलत्या ( टायटल्स ला कोपुत असं म्हणतात) त्यात Introducing -Sanam असं होतं. ही कोण हे बहुधा पुढे कळेल !

श्रद्धा, Sadha Manus, माझेमन, झकासराव, फारएण्ड, rmd, फेरफटका, किल्ली, सुनील प्रतिसादाकरता धन्यवाद Happy

पुढचा भाग मुख्य धाग्यात अपडेट केला आहे, लाभ घ्यावा. क्लायमॅक्स लवकरच टाकेन.

हा चित्रपट तुनळीवर ये जा करुन असतो. इतकं तत्परतेने वारंवार उडवण्यासारखं कॉपीराईट स्क्वाडला यात काय दिसलं असेल हे कुतुहल हा चित्रपट बघण्यामागचे एक कारण Happy कोणी अर्काव्ह केला आहे का बघा सांगणार होतोच तरी सुनील यांनी लिंक दिली.

Introducing -Sanam असं होतं. >> सनम म्हणजे भारती.
हा तोच चित्रपट आहे ना ज्यात परेश रावल la कुत्रे चावतात व तो कुत्र्यासारखा वागू लागतो >> हो.

नशीब रेलिंग आहे इथे. परबतों से आज में टकरा गया मध्ये सनीला टुणकन उडी मारून घोड्यावर बसवले आहे. ते ही खुर्चीवर बसल्यासारखे एका पायाची घडी घालून. >>अभिनव भारती हे दिल्लीत मुख्यालय असलेल्या एखाद्या निमसरकारी संस्थेचं नाव वाटतं >> Lol

ज्यांच्यावर पाळत ठेवायची त्यांच्या गेट समोर सरळ पुढे उभा असतो गि.कु. >> Lol शफी इनामदार एक्झॅक्टली तसाच उभा आहे. #गिकुचेप्रेरणास्थान

मतकरींना गहिवरून आलं असेल आज >> Biggrin मतकरींच्या गूढ विश्वाचा आस्वाद घेताना फॅन्सची अश्रूपिंडे स्त्रवत असतातच. कधी आनंदाने, कधी बाजूला कांदा कापत असल्याने. अश्रूपिंडांमधून झिरपणारा तो चिकट द्राव म्हणजे आर्किमिडीज स्पायरल पाठीवर वागवणार्‍या गोगलगायीच्या अनंत आवर्तासारखे, सखोल, उथळ, गहिरे पाणी Proud

युरोपच्या नकाशा पर्यंत आले आहे आणि हसून हसून मेले आहे. Rofl

जबरदस्त लिहिले आहे पायस. Rofl तुफान एकदम. काय आवडले लिहायला लागले तर सगळा लेखच खाली आणावा लागेल इतके कहर आहे. हॅट्स ऑफ..! Happy

मधला तो फ्रेम विदीन फ्रेम पर्स्पेक्टिव्हचा परिच्छेदही भारी आहे. Happy

कहासे लाते हो ऐसे चित्रपट शोध शोधके… आणि आम्हाला पण पहायला लावते हो खोद खोदके Lol
जबरदस्त पंचेस एकसे एक… मजा येतेय वाचतांना…

चंदन-वंदन-गहिरे-स्पंदन छाप मिळमिळीत स्टॅटिक फ्रेम्स
एकदा तुम्ही नीट निरीक्षण करायचे ठरवले की कोणत्याही कलाकृतीत वाट्टेल तितके कंगोरे सापडतात!
अंजना मुमताज येऊन मग बांगड्या तोडते आणि शफीचा रोल संपतो.
अनंतकाळचा इन्स्पेक्टर जगदीश राज
>>>> Lol Lol