आंबट ‘बुवा’ आणि खारट ‘बाई’ !

Submitted by हेमंतकुमार on 11 March, 2025 - 02:00

मुख्य पानावरील अनुक्रमणिकेत या लेखाचे वरील शीर्षक वाचून बरेच वाचक आश्चर्यचकित झाले असणार. तसेच ललितलेखनात हा काय आंबटशौकीनपणा चाललाय, असे वाटून अनेकांनी शीर्षकावर टिचकी मारलेली असावी. किंवा, हा लेख म्हणजे काहीतरी गंमतजंमत असणार असाही काहींचा अंदाज असावा.

वाचकांनो, काही हरकत नाही !
आता इथे आलाच आहात तर पाहूया काय आहे हा आंबट व खारटपणा. या लेखातून तुम्हाला मानवी शरीरासंबंधीच्या एका आगळ्यावेगळ्या संवेदनस्थितीबद्दल काही सांगणार आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत अस्तित्वात असलेली अशी स्थिती ही खरोखरच गमतीशीर वाटणारी आहे. परंतु अशा विचित्र स्थितीचा अनुभव म्हणजे कोणताही आजार वगैरे बिलकूल नाही. समाजातील सुमारे 2%–4% लोकांना असा विशिष्ट अन विचित्र संवेदनांचा अनुभव येत असतो आणि त्याला शास्त्रीय भाषेत Synesthesia असे म्हणतात - syn = एकत्र व esthesia = संवेदनक्षमता. म्हणजेच, दोन भिन्न संवेदनांचे नकोसे असलेले एकत्रीकरण किंवा भेसळ. (शरीराच्या सर्व संवेदना बधीर करणारा anesthesia आपल्याला परिचित असतोच).

एक सोपे उदाहरण पाहू. समजा, ‘पुस्तक’ असा शब्द आपल्यासमोर लिहिलेला असेल तर आपल्याला त्या शब्दापासून फक्त दृष्टीने बोध होऊन मनात त्याचा अर्थ समजतो(आणि फार तर मनात पुस्तकाची प्रतिमा उमटू शकते).
परंतु एखाद्याच्या बाबतीत पुस्तक हा शब्द बघितल्यानंतर जर त्याला तोंडात आंबट चव लागली तर तो झाला synesthesia. वरवर पाहता हे अगदीच विचित्र वाटेल परंतु ते सत्य आहे.
सुमारे दोनशे वर्षांपासून वैज्ञानिक या विचित्र स्थितीचा अभ्यास करत असून तो त्यांच्या कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. शरीरपेशींमधील विशिष्ट जनुकीय घटक या स्थितीला जबाबदार असावेत परंतु त्या संदर्भातील संशोधन अद्याप अपुरे आहे.

दैनंदिन जीवनात विविध अनुभूती घेण्यासाठी आपण ५ प्रमुख इंद्रियांचा वापर करतो. त्यांच्याद्वारे अनुभवलेल्या विविध संवेदना अशा आहेत :

  • डोळे : दृष्टी
  • नाक : वास
  • कान : श्रवण
  • जीभ : चव आणि
  • त्वचा : स्पर्श.

(या व्यतिरिक्त असलेल्या इतर काही संवेदना बाजूला ठेवू).

वरील प्रत्येक इंद्रियात निसर्गतः विशेष प्रकारच्या संवेदन यंत्रणा (receptors) असतात. त्या प्रत्येक यंत्रणेमार्फत भिन्न प्रकारची संवेदना चेतातंतूंच्याद्वारे मेंदूत पोचवली जाते. या प्रक्रियेदरम्यान विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत संदेशात केले जाते. आपल्या मेंदूत वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग नेमून दिलेले असतात. अशा शिस्तबद्ध ‘प्रोग्रॅम’मुळेच आपले एखादे इंद्रिय फक्त त्याला नेमून दिलेली संवेदनाच मेंदूत पोचवते आणि आपल्याला तिची जाणीव होते. उदाहरणार्थ, जेव्हा डोळ्यांवर प्रकाश पडतो तेव्हा आपल्याला फक्त ‘दिसणे’च अपेक्षित असते.

या उलट मेंदूत संवेदनांची भेसळ झालेल्या व्यक्तींना अनेक प्रकारचे चित्रविचित्र अनुभव येतात. एखाद्याने गिटारचा आवाज ऐकला की त्याच्या डोळ्यासमोर अचानक पिवळा रंग दिसू लागतो. तर अन्य एखाद्याच्या बाबतीत त्याने साध्या काळ्या शिसपेन्सिलने कागदावर काढलेले विविध अंक पाहिले तरी त्याच्या डोळ्यांसमोर काही रंग नाचू लागतात. Solomon Shereshevsky (१८८६-१९५८) या रशियन पत्रकाराचे प्रकरण तर अचंबित करणारे होते. त्याच्या मेंदूत पाचही प्रमुख संवेदनांची मिसळण झालेली होती. त्याने एखादा अंक नुसता मनात जरी आणला तरी त्याच्या डोळ्यासमोर अनेक प्रकारची चित्रे तरळत. उदा.,
‘१’ पाहिला असता त्याला एक धष्टपुष्ट माणूस दिसायचा तर ‘२’ च्या विचाराने एक उत्साहाने ओसंडून वाहणारी स्त्री दिसायची. ८७ या अंकाच्या विचाराने एक जाडी बाई आणि मिशा पिळणारा पुरुष एकत्रित दिसायचे. आता बोला !
तर हे झाले संवेदनांच्या भेसळीचे एक अतिरेकी उदाहरण.

आता पाहू एक दृष्टीज्ञान आणि चवज्ञान यांची मिसळण झालेले एका डच स्त्रीचे उदाहरण.
या बाईंना निरनिराळे लिखित शब्द दाखवले असता त्यांना विविध प्रकारच्या चवी किंवा वासाची संवेदना होते. पदवीपर्यंत शिकलेल्या या बाईंचा वैज्ञानिकांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे आणि त्यासाठी मेंदूची एमआरआय तपासणीसारखी आधुनिक साधने देखील वापरली आहेत. या बाईंना वेगवेगळ्या प्रकारचे डच भाषेतील शब्द दाखवण्यात आले आणि प्रत्येक शब्द पाहिल्यानंतर त्यांना कोणत्या चवीची संवेदना झाली याची नोंद घेतली गेली. उदाहरणादाखल त्यातील काही शब्दांची इंग्लिश भाषांतरे आणि बाईंनी अनुभवलेली चव अशी होती :

  • mine - गोड चव
  • dive - कडू
  • lasting - आंबट
  • woman - खारट

या प्रयोगादरम्यान त्यांच्या उत्तरांमध्ये सातत्य होते. तसेच त्या बाईंनी सांगितलेली माहिती हा निव्वळ ‘भास’ नाही ना, याची देखील खात्री करून घेतली गेली. त्यासाठी बाईंच्या मेंदूच्या विविध भागांची प्रतिमा-तपासणी आणि त्याचे शास्त्रीय पृथःकरण करण्यात आले.

संवेदना मिसळणीच्या असंख्य प्रकारांमध्ये (सुमारे ६०) दोन प्रकारच्या ‘मिसळी’ अधिक प्रमाणात ( > 50%) दिसतात :
१. विविध प्रकारचे आवाज (tones) ऐकल्यानंतर डोळ्यांसमोर विभिन्न रंग तरळणे, आणि

२. कुठलाही रंग नसलेले अंक पाहिले किंवा त्यांचा विचार जरी केला तरीसुद्धा डोळ्यांसमोर भिन्न रंग दिसणे.

synes Nos.jpg

या व्यतिरिक्तच्या अन्य प्रकारांपैकी फक्त एकाचा ओझरता उल्लेख करतो आणि त्याला mirror-touch synesthesia असे म्हणतात. त्यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श केला असता त्या दोघांसमोर बसलेल्या तिसऱ्या व्यक्तीला निव्वळ ते दृश्य पाहून आपल्यालाच कोणीतरी स्पर्श करते आहे अशी भावना होते.
MTS3p.jpg

अशी मिसळण का होत असावी हा वैज्ञानिकांपुढे यक्षप्रश्न असून त्याच्या स्पष्टीकरणासाठी काही गृहीतके मांडली गेलीत. विविध संवेदना स्वीकारणारे मेंदूचे निरनिराळे भाग गर्भावस्थेतील आयुष्यात एकमेकांशी बऱ्यापैकी जोडलेले असतात. जशी गर्भाची वाढ होऊ लागते तसतसे हे विभाग एकमेकांपासून सुटे होणे अपेक्षित असते. परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत असे न झाल्यामुळे भिन्न संवेदनांचे प्रदेश एकमेकांशी गरजेपेक्षा जास्त चेतातंतूद्वारा जोडले जातात. आपल्या मेंदूत एकूण 86 अब्ज चेतातंतू असल्यामुळे कधी ना कधी या सगळ्या जटील गुंत्यात (फोनच्या क्रॉस कनेक्शनसारखा) ‘क्रॉस ओव्हर’ असा प्रकार होताना दिसतो. तसेच या लोकांच्या मेंदूच्या अंतर्गत रचनेतही काही बदल दिसून येतात. अशा लोकांपैकी सुमारे 40 टक्क्यांच्या बाबतीत या प्रकाराची आनुवंशिकता आढळली आहे. तर काही जणांच्या बाबतीत BDNF या प्रकारच्या विशिष्ट रसायनाची पातळी अधिक दिसून आली. त्यातून एक नवी थिअरी मांडली गेली. त्यानुसार संवेदना-मिसळण ही एक प्रकारे परम जागृत अवस्था (advanced state of consciousness) असावी आणि त्याला मेंदूचा वेगळ्या अंगाने झालेला विकास (differentiated development) कारणीभूत असावा.

संवेदनामिश्रणाच्या प्रकरणांमागे एक किंवा अधिक जनुकांचा वाटा असू शकेल परंतु ते अद्याप अस्पष्ट आहे. मानवी उत्क्रांतीदरम्यान अशा प्रकारची जनुके टिकून का राहिली असावीत याचे वैज्ञानिकांना बरेच कुतुहल आहे. त्यावरील विचारमंथनातून काही गृहितके मांडली गेली आहेत त्यांची आता नोंद घेऊ :

१. एखाद्या व्यक्तीतील संबंधित जनुकीय बदलामुळे मुळात तिला एक वेगळाच भन्नाट गुणधर्म प्राप्त झालेला असतो आणि त्याचा बायप्रॉडक्ट म्हणून हा संवेदनामिश्रणाचा अतिरिक्त गुण चिकटलेला असतो.

२. वरील मुद्द्यातला वेगळा गुणधर्म कुठला असावा यावरही बराच खल झालाय. काहींच्या मते अशी माणसे सामान्य लोकांपेक्षा अधिक सर्जनशील (creative) असतात. काही गाजलेल्या कलाकारांचे निरीक्षण केले असता त्यांच्यात अशा संवेदनामिश्रणाचे प्रमाण अधिक आढळले आहे.

३. अशा व्यक्तींना अचाट बुद्धिमत्ता (savantism), आकलनक्षमता किंवा अविश्वसनीय अशी अफाट स्मरणशक्ती प्राप्त होऊ शकते.

४. या व्यक्तींचे रंगज्ञान देखील सामान्य लोकांपेक्षा अधिक सूक्ष्म आणि तीक्ष्ण असू शकते.

५. अशी मुले शालेय वयात परकीय भाषा आणि संख्याशास्त्र हे विषय इतर मुलांपेक्षा अधिक गतीने शिकतात आणि त्यात प्राविण्य मिळवतात असेही काही संशोधकांचे निरीक्षण आहे.

आतापर्यंत वर्णन केलेला संवेदना मिश्रणाचा गुणधर्म संबंधित व्यक्तीला जन्मतःच मिळालेला असतो. त्याची खातरजमा करण्यासाठी अन्य काही गोष्टींची शहानिशा करणे आवश्यक असते. काही मानसिक आजार किंवा त्यावरील औषधोपचारांच्या दरम्यान संबंधित रुग्णांना चित्रविचित्र प्रकारचे भास (hallucinations) होऊ शकतात. तसेच ड्रग्सच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना देखील काही भास होत असतात. त्यांची synesthesia या निसर्गदत्त प्रकाराशी गल्लत होता कामा नये.
अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातील मेंदूशास्त्रज्ञ डॉ. David Eagleman यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केलेला असून त्यांच्या संशोधनात त्यांना संवेदनामिश्रण असलेल्या 42,000 खात्रीशीर व्यक्ती सापडलेल्या आहेत. त्यांचे या विषयावरील Wednesday Is Indigo Blue हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

या कुतुहलजनक विषयातले संशोधन अद्याप पुरेसे नसले तरी भविष्यात त्याला गती मिळू शकेल. त्यातून आतापर्यंतच्या गृहीतकांमधून मांडलेल्या काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे कदाचित मिळू शकतील. हा शास्त्रीय विषय रोचक वाटल्याने वाचकांपुढे त्याची प्राथमिक माहिती सादर केली. आता सामान्यजन म्हणून आपण एक गोष्ट करू शकतो. जर आपल्या पाहण्यात चुकूनमाकून असा एखादा माणूस आलाच, की जो ‘बुवा’ म्हटले असता आंबट आणि ‘बाई’ म्हटले असता खारट चव लागली, असे जर म्हणाला तर त्याला चक्रमबिक्रम न समजता संवेदनांची मिसळण झालेला एक इसम(synesthete) असे समजायला हरकत नाही ! Happy
***********************************************************************************************************
संदर्भ :

  1. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3222625/
  2. https://en.wikipedia.org/wiki/Solomon_Shereshevsky
  3. https://www.frontiersin.org/journals/psychology/articles/10.3389/fpsyg.2...
  4. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC11366591/

५. https://www.bbc.com/future/article/20250224-the-people-who-see-foreign-l...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख डॉ. लेख वाचल्यावर उमजलं की मी अश्या प्रकारच्या व्यक्तींमध्ये मोडते. मला प्रत्येक अंकासोबत एखादी विशिष्ट प्रतिमा डोळ्यासमोर येते मग ते अंक मनात उच्चारला असेल तरी देखील. तसेच वेगवेगळ्या शब्दांसोबत (उदा. आडनावे, गावाची नावे, घरातील वस्तू, इ) देखील काही प्रतिमा जुळलेल्या आहेत. अक्षरशः प्रत्येक शब्द मी फोटो बघावा तसा वाचते. अर्थात् त्या शब्दाचा अर्थ आणि माझ्या मनात उमटणारी प्रतिमा यांचा एकमेकांशी संबंध नसतो.
शिवाय आणखी एका स्वनिरीक्षणानुसार अशा प्रकारच्या असोसिएशन मुळे काही गाणी, भूतकाळातले प्रसंग, विविध तारखा अगदी बारीक सारीक तपशिलासह पक्या लक्षात राहतात. अगदी आज मनगटावर लावलेले घड्याळ कधी, कुठे आणि कोणत्या तारखेला, कोणासोबत विकत घेतले आहे हे मी सांगू शकते.

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण छान लेख.

मनिम्याऊ, तुमचे अनुभव तर भन्नाटच.

काही नकोश्या व्यक्ती आठवल्यावर तोंडात कडवट चव येते मात्र.

एकदम नवीनच अँगल. लेखात असे काही असेल हे शीर्षकावरून वाटले नाही. Happy

काही नकोश्या व्यक्ती आठवल्यावर तोंडात कडवट चव येते…
डिट्टो Lol

सर्वांना धन्यवाद !
* मनिम्याऊ, तुमचे अनुभव तर भन्नाटच +१
* विविध तारखा अगदी >>>
काही लोकांच्या बाबतीत बारा महिने चक्राकार स्वरूपात दिसतात. हा पण एक या मिश्रणाचा वेगळा प्रकार आहे
https://rhymeswithfairy.wordpress.com/2013/02/17/an-explanation-of-my-sp...
. . .
* एकदम नवीनच अँगल >>> Happy

रोचक माहिती !! असे लोक माहितीत नाहीत त्यामुळे माझ्यासाठी या लेखातील माहिती नवीनच आहे .

छान लेख. रोचक माहिती. हे माहित नव्हते. वाचायला मजा आली.
हि संवेदना एकमार्गी असते कि दुमार्गी ? म्हणजे काही आंबट खाताना बुवा नजरेसमोर येतो का ?
तसेच या Synesthesia चे पावलावचे कंडिशनिंग व PTSD सारख्या आजारांशी काही नाते आहे काय ?

धन्यवाद !
. . .
* ही संवेदना एकमार्गी असते कि दुमार्गी ?
>>>> या संवेदनाचे काही प्रकार दुमार्गी काम करतात असे दिसून आले आहे. यावरून ही प्रक्रिया किती गुंतागुंतीची आहे याचा अंदाज येईल
https://jov.arvojournals.org/article.aspx?articleid=2550446#:~:text=Grap...
. . .
* कंडिशनिंग व PTSD >>> याबद्दल नंतर वाचून सांगतो.

रोचक लेख आहे.
मनिम्याऊ यांचा अनुभव सुद्धा रोचक.

क्वचितच कधी विशिष्ट सुवास जाणवला, पण तो बराच वेळ म्हणजे तास दोनतास टिकला. घरात इतर कुणाला तो सुवास जाणवला नाही. त्याचा कशाशी (दृश्य, स्पर्श, चव वगैरे) संबंध नव्हता. कशामुळे तरी मेंदूत तशी संवेदना जागृत झाली असावी. गेली कित्येक वर्षे तो अनुभव आला नाही.

अरे काय इंटरेस्टिंग लेख आहे Happy
स्वतःबाबत चेक केले असता असा काही अनुभव आढळला नाही.
अर्थात काही नंबर घेतले की काही व्यक्ती वस्तू जागा आठवतात. पण ते लहानपणी हाऊजी खेळताना नंबर उच्चारताना त्या वस्तूंशी संदर्भ जोडून मजेशीर पद्धतीने म्हटले जायचे म्हणून मनात बसले आहेत.

<<<<< त्यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श केला असता त्या दोघांसमोर बसलेल्या तिसऱ्या व्यक्तीला निव्वळ ते दृश्य पाहून आपल्यालाच कोणीतरी स्पर्श करते आहे अशी भावना होते>>>>> अच्छा, बहुधा म्हणूनच गार्डनमध्ये प्रेमी युगुल स्वतःमध्ये रममाण असताना आजूबाजूला काही रिकामटेकडे उगाच त्यांच्याकडे बघत बसले असतात. कदाचित त्यांच्यात या प्रकाराच्या संवेदना असाव्यात आणि ते अश्या प्रकारे मजा घेत असावेत Happy

* Synesthesia व पावलावचे कंडिशनिंग >>>
चांगला प्रश्न. या दोघांमध्ये मूलतः बरेच फरक आहेत :
Screenshot (17).png

* विशिष्ट सुवास जाणवला >>>
बरेच जण असे म्हणताना आढळतात परंतु प्रत्येक वेळी आपण त्याची शहानिशा करून पाहत नाही - म्हणजे आसपासच्या परिसरात खरंच काही सुगंधी द्रव्य पसरले आहे का वगैरे.
. . .
* आणि ते अश्या प्रकारे मजा घेत असावेत>>>
अशी मजा आपल्यातील बहुतेकांनी (की सर्वांनीच ?) तारुण्यामध्ये घेतलेली असते हे नाकारण्यात काय अर्थ आहे? Happy Happy

रोचक....
एखाद्या सराईत गुन्हेगारांच्या बाबतीत असे व्हावे, त्यांना एखादी चांगली गोष्ट समोर दिसावी आणि गुन्हा करणं थांबावं. जसं की दाऊदमध्दे भारत प्रेम जागांवं. इतर धर्मांचा आदर जाणवावा. पण चांगल्या गोष्टी अबाधित राहाव्यात...एक स्वप्नरंजन.

गर्दीत झालेला ओंगळ स्पर्श मला आठवतो ( अ‍ॅक्च्युअली संवेदना होते). पूर्वी प्रत्येक दिवशी आठवे. आणि सतत संतप्तावस्थेत मी राही. औषधांनी ती स्मृती विरत गेली. पण अजुनही आठवणीचा त्रास होतो. आता महीन्या - पंधरवड्यातून एक दोनदा होतो.
पण औषधे मिळेपर्यंत, पण आयुष्य फार त्रासदायक गेले. पूर्वी भर झोपेतही उठून बसले तरी मी हिंस्त्र म्हणजे अतिशय संतप्त आणि अ‍ॅग्रेसिव्ह असे.

छान लेख
ही माहिती प्रथमच कळाली.
इंटेरेस्टिंग आहे.

वरील प्रतिसादांमधून व्यक्त झालेले विचार आणि अनुभव समजले. ओंगळ स्पर्श हे अतिशय त्रासदायक प्रकरण असते.
. . .
*Synesthesia व PTSD >>>
या दोघांमध्ये risk factor सारखा काही संबंध असावा काय यावर बराच वैज्ञानिक खल झालेला दिसतोय. यावर अनुभवी मानसशास्त्रज्ञानेच बोललेले बरे.
हा संदर्भ पाहता येईल https://article.imrpress.com/journal/FBS/13/1/10.52586/S549/Scholar549.pdf

नवीन ज्ञानवर्धक माहिती. इंद्रियगोचर जगात वावरताना इंद्रियांचा आणि मेंदूचा असा काही "लोच्या" असू शकतो ह्याची कल्पना नव्हती.

वेगळ्याच विषयावरचा माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग लेख.

एखाद्या फुलाचा ( उदा: मोगरा ) उल्लेख झाला किंवा फोटो पाहिला तरी त्या फुलाचा वास नाकाशी दरवळणे याच कॅटेगरीत येतं का?

रोचक विषय. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण
माझ्यासाठी नवीनच.
काही वाईट किंवा दुःखद बातमी कळता कधी कधी तोंडात कडवट चव आढळली आहे.
बरेचदा जंगलात फिरताना काही मस्तकात जाणारे वास आले आहेत आणि ते बाकीच्यांना फारसे जाणवले नाहीत. अर्थात तुम्ही म्हणता तसं आजूबाजूला काही असलं पाहिजे.
अजून एक म्हणजे माझ्या आईला समोर एखाद्याने खरखरीत पाटीवर खडू किंवा तत्सम गोष्टींनी ओरखडा ओढल्यास त्या आवाजाने अंगावर काटा येतो. हे Synesthesia मधे येईल की नाही माहित नाही.
मनिम्याऊ, तुमचे अनुभव भारीच आहेत.

माहितीपूर्ण लेखन आवडीने वाचून त्यावर आवर्जून प्रतिसाद देणाऱ्या आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद !
तुमच्या प्रोत्साहनामुळेच नवनवे विषय शोधायला चालना मिळते.
* * *
*फोटो पाहिला तरी त्या फुलाचा वास नाकाशी >>
होय, हे पण शक्य आहे.
या गुणधर्माचे एकंदरीत साठ किंवा त्याहून अधिक प्रकार आहेत. त्यातला हा एक म्हणता येईल.

* खडू किंवा तत्सम गोष्टींनी ओरखडा ओढल्यास त्या आवाजाने अंगावर काटा येतो.
>>>>
लेखात mirror-touch synesthesia चा उल्लेख आहे.
यामध्ये जी संवेदना दुसऱ्याने अनुभवली आहे तीच तिसऱ्या व्यक्तीला तिच्या अंगाला हात न लावता देखील अनुभवता येते.
मला वाटतं की निव्वळ अंगावर काटा येणे हे या प्रकारचे नसून ते 'भावनिक' वगैरे गोष्टींशी निगडित असावे. जर तुमच्या आईला आपल्या अंगावरच कोणी ओरखडा काढला अशी भावना झाली तर ते वरील सूत्रात बसेल.

अनेक भावनिक कारणांनी अंगावर काटा येतो त्यामागे adrenaline या हार्मोनचा वाटा असतो (adrenaline surge).
अर्थात यावर अजून विचार करून पाहिला पाहिजे.

आणि एक माझ्या लक्षात आले, की या मिक्स्ड संवेदना या जास्ती करून तोंडांत येणाऱ्या चवीच्या आहेत.
म्हणजे कुठला शब्द ऐकल्यावर डोळ्यांसमोर प्रतिमा उमटली..असे कमी.
कदाचित चवीच्या संवेदना ह्या जास्ती इंटरट्वाइंड असतील.
अतींद्रिय शक्ती या संदर्भात. कशी डिफाईन करता येईल?

* जास्ती करून तोंडांत येणाऱ्या चवीच्या >>> नाही.
सर्वाधिक आढळणारे दोन प्रकार लेखात क्रमाने दिलेच आहेत.

एका अभ्यासानुसार या मिश्रणाचा क्रम साधारण असा आहे :
१. अक्षरे/ अंक पाहिले असता रंग दिसणे (>५०%)
२. आवाज ऐकला असता दृश्य दिसणे ( १५-५०%)
३. आवाज ऐकला असता चव/ वास जाणवणे (०१-१५%)
४. इतर प्रकार ( <१%)

https://www.thesynesthesiatree.com/2021/04/list-of-synesthesia-types-by-...

अच्छा... Happy

फारच इंटरेस्टिंग विषय आहे!!

Pages