बरं झालं मी छक्का झालो !

Submitted by गणेश कुलकर्णी on 3 October, 2024 - 16:17

बरं झालं मी छक्का झालो !

या अख्या भारतात...
एकदा टाळ्या वाजवत फिरेन म्हणतो
दोन चार राज्यात राहून
तिथली उग्र, हलकट माणसे पाहून
परत पुण्यात येऊन पी एच डी करेन म्हणतो...!
ट्राफिक, दुकाने, रस्त्या-रस्त्यावर
शाळा आणि कॉलेज मध्ये
जाऊन लहान मोठ्यांना आशीर्वाद देईन म्हणतो...!
“मनपाच्या पुलावर”, “बुधवार पेठेतल्या”
येणार्‍या जाणाऱ्या वेश्या मला पाहून
रात्री क्षणभर थबकून, सुस्कारत म्हणतील...
बरं झालं हा छक्का झाला !
उगाच वासनांध “पुरुष” होण्यापेक्षा..!

शाळेत आणि कॉलेजमध्ये एका
एनजीओ सोबत मी गेल्यावर
लहान मोठी मुले मुली...
माझ्याही नकळत मला पाहात पाहात
विचारतील सर आणि मॅडमना
हा सूर्यकिरणांतून वाट काढत काढत
येणारा कोण आहे म्हणून?
ते म्हणतील हा “नटराज” आहे म्हणून!
मी गालातल्या गालात हसत म्हणेन
बरं झालं मी छक्का झालो!
उगाच कुणाचा नातेवाईक दादा होण्यापेक्षा..!

आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल चॅनल्स
आता त्यांच्याही “मैनेजमेंटच्या” नकळत
घेतील माझीही खरी खुरी मुलाखत
रांगा लावून....!
विचारतील मला मी कसा जगलो म्हणून?
मी सांगेन त्यांना जन्मापासूनचा
माझा अवघड प्रवास!
त्यांचा वाढलेला “टीआरपी” पाहून ते म्हणतील...
बरं झालं आपण छक्क्याची मुलाखत घेतली
उगाच कुठल्या “सेलिब्रिटी” ची खोटी-खोटी
मुलाखत घेण्यापेक्षा!

मी गेल्याचे कळेल
पेपरात आणि टीव्ही वर एक बातमी म्हणून
पण कुणी मला शेवटचे बघू शकणार नाही
मला ओळखणारी लोकं हळहळतील
आणि म्हणतील आपल्या घरातल्यांना
बरं झालं हा बलात्काऱ्याचा खून
करत करत गेला
उगाच न्यायाची
दहा वीस वर्ष वाट पहात बसण्यापेक्षा!

कवी: गणेश विजयकांत कुलकर्णी (समीप)
नवी सांगावी, पुणे.
मूळ गाव: मुकाम पोस्ट: तुगाव, ता: उमरगा, जिल्हा: धाराशिव
पिनकोड: ४१३६०४
दिनांक: २६ ऑगस्ट २०२४,
वेळ: रात्री: १०:०७
(श्रीकृष्ण जन्माष्टमी)
मोबाईल नंबर : +91 9518047449 & 9764773257

(प्रिय कवी श्री. संदीप खरे यांच्या "बरं झालं मी झाड झालो" ह्या कवितेच्या शीर्षकावरून सुचलेली कविता)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hi trans person aahe ka? Write detailed about journey . Best wishes for your tough experience. Hijra community yellamma temple baddal liha.

>>>>>>>Hi trans person aahe ka? Write detailed about journey .
प्रत्येक कवि आणि लेखकाने लिहीलेले कथन त्याचे आत्मकथन किंवा स्वानुभव नसतो. जे न देखे रवि ते देखे कवि.
असो कवि महाशय सांगतीलच.

कविता आवडली, डिस्टर्ब करणारी वाटली.

जबरदस्त कविता. समाजात तुम्हाला वावरताना आलेले चांगले वाईट अनुभव आणि त्यातून तुम्ही कसे पुढे गेलात हे वाचायला आवडेल.

नमस्कार मित्रांनो!
ही कविता माझा स्वानुभव नाही पण मला तृतीयपंथीयांचे
दुःख कळते.
आज काल जे काही होत आहे त्यावर ही कविता सुचली ( कोलकाता आणि बदलापूर च्या घटना).