साल 2001
रविवार संध्याकाळ, साधारण साडेपाच सहाची वेळ.
त्या दिवशी कितीतरी दिवसांनी, दररोजच्या सकाळी ६.३० ते रात्री १०- १०.३० ह्या चक्रातून निसटून, दिवसा-उजेडी क्लासच्या सगळ्या assignments संपवून बाहेर पडायला मिळालेलं. खर तर 28 नंबरची बस पकडायची CST ला जायचं आणि तिकडून घरासाठीची ट्रेन पकडायची हा शिरस्ता!
पण अंधार पडला नाहीये, घरी जायला थोडा उशीर झाला तरी चालण्यासारखे आहे… मग विचार कसला करायचा? मी आणि मैत्रीण पायीच निघालो, मध्ये चर्चगेटच्या सबवेमध्ये शेवपुरी चापू मग तिकडून चालतच CST गाठता येईल इतका साधा सरळ प्लॅन.
नरिमन पॉइंट भागात रविवारी संध्याकाळी पूर्ण शुकशुकाट असतो त्यामुळे दुकान बंद होती. रुंद चारपदरी रस्ते ओस पडलेले, तसच बाजूचे मोठाले फूटपाथसुद्धा पूर्णपणे मोकळे होते. दुडक्या चालीने हसत खेळत, गप्पा मारत आमची दुक्कल निघाली. सब वे मधील शेवपुरी म्हणजे एक नंबर! कित्येक दिवसांनी त्याची चव निवांत चाखायला मिळणार होती.. त्याच नादात माझं फुटपाथ वरून कधी पाऊल खाली पडल कळलही नाही.. मी रस्त्याच्या अगदी कडेला आणि मैत्रीण फुटपाथवर… आपल्याच नादात चाललोय..
अचानक एक जबरदस्त झटका बसला आणि काही कळायच्या आत मी धाडकन फुटपाथवर पडलेले. एखाद क्षणात समजलं की एक भरधाव गाडी मला चाटून गेली होती. जोराचा वारा आला की रस्त्याच्या कडेचा पालापाचोळा कसा उडायला लागतो पण वाऱ्याला त्याचे काय तो आपल्याच जोशात. तसच काहीस त्या वायुवेगाने सुसाट सुटलेल्या लक्श्मीपुत्राला बहुदा जाणीवही झाली नसावी की कुठे तरी काहीतरी त्याने बिघडवलय, उडवलय, disrupt केलंय.
मी हळुहळू उठायचा प्रयत्न केला, हात पाय खरचटले होतेच पण टाणकन डोकही आपटलेल, तिकडे मागे हात लावून पाहिलं तर हाताला रक्त लागल, ड्रेसवर पण थोडे डाग पडले… डोक्याच्या मागच्या बाजूने ( न दिसणाऱ्या ठिकाणाहून) रक्त येतय म्हंटल्यावर माझी तर तंतरलीच पण मैत्रिणही घाबरली… जखम किती होती किंवा किती शारीरिक दुखापत झालेली ह्याहीपेक्षा जो जोरदार झटका बसलेला त्याने बहुदा मानसिक धक्काच जबर बसला होता.. भयंकर ताण आला असावा कारण सगळं अवसान गळल्यासारख झालं. मैत्रिणीने एक तातडीने टॅक्सी थांबवली, अर्थात त्या वेळी तिला टॅक्सी ही लगेच मिळाली असेल असे नाही. क्लासच्या जवळच होतो त्यामुळे तिने टॅक्सी क्लासजवळ थांबवली आणि लॅबमध्ये कोणाची मदत मिळाली तर बघावी म्हणून ती वर गेली.. काहीच मिनटात दोघांसह खाली आली.
रक्त काही थांबलं नव्हतं, केसांमुळे जखम नीटशी दिसतही नव्हती. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरला दाखवणं आवश्यक होत. रविवारी संध्याकाळी, त्या तशा काहीशा अपरिचित भागात, डॉक्टर शोधत निघालो म्हणजे टॅक्सीवाला निघाला( तो स्मार्ट फोन असण्याच्या आधीचा काळ होता). एक दोन खाजगी दवाखान्यात टॅक्सीवल्याने नेले, पण तिकडच्या स्टाफने बहुदा माझी अवस्था किंवा रस्त्यावरचा अपघात म्हंटल्यावर डॉक्टर नाहीत, आता काही करता येणार नाही म्हणत आमची बोळवण केली.
शेवटी तो टॅक्सीवाला आम्हाला CST जवळच्या सरकारी इस्पितळात घेऊन गेला.
सरकारी इस्पितळात मात्र नकारघंटा न वाजवता आमचं स्वागत केलं आणि काही मिनिटांत नर्स निवासी डॉक्टरांना घेऊन आली. ते निवासी डॉक्टर म्हणजे बहुदा आमच्यापेक्षा काही वर्षांनी मोठी मुलचं होती. त्यांनी चेक तपासून सांगितलं, जखम थोडी मोठी आहे. नर्सने वस्तरा आणून त्या छोट्या जागेवरील केस भादरले. डोक्याला जखम झालिये, डोकं दुखतंय , हातीपायी धड आहोत आणि थोडक्यात जीव वाचलाय ह्या सगळ्या ताणातही, डोक्यावरचे केस अशा विद्रूप पद्धतीने कापल्याच मला अतोनात वाईट वाटत होतं. .
त्या डॉक्टरांनी २-३ आवश्यक तसे टाके घातले. त्यांच्या कडची औषधे दिली. पैसे विचारले असता ते म्हणाले फक्त गोळ्यांचे १० रुपये, बाकी ट्रीटमेंट मोफत. आश्चर्याचा धक्काच बसला.
सरकारी दवाखाना म्हटलं की इतक्या शंका कुशंका मनात येतात; स्वच्छता, डॉक्टरांची कुवत, उगाच कितीतरीतरी अढी… ते सर्व दूषित पूर्वग्रह त्या दिवशी गळून पडले. ( दोन दिवसांनी आमच्या जवळच्या डॉक्टरकडे टाके काढायला म्हणून गेले तर त्यानी २ मिनिटात १०० रू तरी कमावले..)
हे सर्व नाट्य संपेपर्यंत बराच उशीर झाला होता. ती दोघंही त्यांना वरांवर सांगूनही परत न जाता शेवटपर्यंत थांबून होते.
तो मोबाईल आधीचा काळ होता. त्यामुळे मैत्रिणीने १ रू च्या फोनवरून स्वतःच्या घरी फोन केला आणि तिच्या वडिलांना गाडी घेऊन स्टेशनला बोलावले. आम्ही ट्रेन पकडली रविवार रात्र असल्यामुळे गाडीत बसायला जागा मिळाली. वाऱ्याच्या झळुकानी थोडी तरतरी आली. स्टेशनवर तिचे बाबा आलेच होते… माझं न ऐकता ते मला घरी सोडायला आले. मैत्रीण घरी वरपर्यंत सोडायला आली…
तोपर्यंत रात्रीचे साडे अकरा वाजल्याने आई खूप काळजीत होती. त्यातच बरोबर मैत्रीण, माझा एकंदर अवतार, कपड्यांवराचे डाग पाहून तिच्या डोळ्यात एकच वेळी भीती, काळजी, राग, गंगा जमुना सर्व एकत्र दिसून आलं… आणि मी तर अगदीच खजील झाले होते.
त्या एका शेपुरीच्या अट्टाहासापायी, बहकण्यापायी त्या तिघांची अख्खी संध्याकाळ वाया घालवली होती, मनस्ताप झाला होता.
ही एकी म्हणावं तर छोटीशी घटना, पण त्यानिमित्ताने अनेक मनुष्य स्वभावाचे कंगोरे खळकन समोर येतात, अगदी एखाद्या कॅलिडोस्कोप सारखे..
चविष्ट खाण्याच्या प्रेमापोटी माझ्याकडून झालेली आगळीक, तर त्या रस्ता आपल्या पिताश्रीचाच आहे ह्या समजात सुसाट वेगाने गाडी हाकणार, आपण कुणाला तरी ठोकल आणि ती व्यक्ती हातीपायी धड आहे हेही न बघण्याइतका अंगी मुर्विलेला उन्मत्पणा - मुजोरी, रविवारी संध्याकाळी जखमी व्यक्तीला दवाखाना शोधायला मदत करणाऱ्या टॅक्सीवाल्याची माणुसकी, रविवारी संध्याकाळी त्या डॉक्टरांनी निभावलेली आपली व्यावसायिक जबाबदारी, आपली महत्वाची कामे बाजूला ठेवून आमच्या मदतीसाठी धावून आलेल्या, वेळ देणाऱ्या त्या दोन वर्गमित्रांचे माणुसकीच्याही पुढे जाणारे वर्तन, आणि सगळ्यावर कडी म्हणजे अवघ्या वीस एक वयाच्या तरुणीने ( माझ्या मैत्रिणीने ) दाखवलेले प्रसंगावधान, तिची हिंमत - टॅक्सी मिळविणे( त्यावेळी विद्यार्थी दशेत टॅक्सी तशी चैनीचीच गोष्ट होती आमच्यासाठी), आमच्यासाठी तसा नवखा भाग, संध्याकाळची वेळ हे सगळं भान ठेवून परत क्लासला जाऊन सोबत दोघांना घेवून येणे, स्वतः च्या बाबांना स्टेशन वर बोलावणे, जबाबदारीने मला घरापर्यंत सुखरूप पोहोचविणे… येवढं सगळं अचूकतेने, शांतपणे, आणि कुठलही त्रागा न करता उत्तम रीतीने हाताळलं.
खर तर ते वर्गमित्र, मैत्रीण, मी, ते डॉक्टर , आणि तो ड्रायव्हर साधारण एकाच वयोगटातील (किंवा पिढीतील ) पण वागण्याचा, स्वभावाचा केव्हढा मोठा स्पेक्ट्रम दिसून आला.
आज इतक्या वर्षानंतर ( विशेषतः अमेरिकेत काही वर्षे घालवल्यानंतर इकडची thank you संस्कृती जपता जपता) झालेली जाणीव की आपण त्या तिघांना विशेष करून त्या माझ्या मैत्रिणीला कधी नीटपणे थँक यू ही म्हटलं नाही …. की भारतीय परंपरेला / संस्कृतीला अनुसरून तिच्या ऋणा तच राहाणे पसंत केलं.. बहुदा तसंच काहीसं झालं असावं. ह्या लेखनिमित्ताने त्या सगळ्त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा हा एक छोटासा प्रयत्न.
***
कितीतरी महिन्यांपासून हे लिहायचं मनात होतं, पण नुकतीच पुण्यात जी घटना घडली. त्याने ही आठवण उफाळून आली.
पुण्याच्या त्या घटनेत दुर्दैवाने त्या दोघांचा मृत्यू झाला. आता पुढे आरोप प्रत्यारोप होत राहतील. न्याय होईल का किंवा कसं माहीत नाही. मुख्य म्हणजे त्या दोघा तरुणांचं त्यांच्या कुटुंबियांचे जे नुकसान झालंय त्याची भरपाई कशी होणार?
काही वर्षांपूर्वी ICU च्या बाहेर एक आई डोक्याला हात लावून बसली होती, तिचा तरुण मुलगा कडेला उभा असताना एका भरधाव बाईकने येऊन त्याला उडविले. मेंदूला धक्का लागून तो कोमात गेला होता.. परत शुद्धीवर येईल की नाही , नंतर त्याची परिस्थिती कशी असेल .. तिच्या डोळ्यातली त्यावेळची वेदना शब्दांच्या पलीकडली होती.
ह्या आणि अशा कितीतरी घटना नित्य घडत असतात काहींची बातमी होऊन आपल्याला समजते तर कित्येक पोलीस फाईल ही बघत नाहीत. या अपघातांचे impact / आघात ही वेगवेगळ्या तीव्रतेचे असतात काहीं अपघातग्रस्तांचं थोडक्यावर निभावत तर काहींना जीवही गमवावा लागतो.
बेशिस्तपणा, मुजोरी, उन्मत्तपणा ही स्वभवानुरुप किंवा तत्कालीन करणे आहेतच. पण मुख्यतः कठोर वाहतूक नियमन, शिस्त, कायदे आणि त्यांचं काटेकोर पालन यांचा मुळातच असलेला अभाव हे मुख्य कारण आहे.
विकसित देशांप्रमाणे भरधाव वेगाने जाणाऱ्या अद्ययावत गाड्या येत राहतील, त्यांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत जाईल पण त्याचबरोबर पायाभूत सुविधा, वाहतूक नियमन, शिस्त, आणि जबाबदारीच भान यांवर मुळापासून काम केलं तर ह्या वा अशा घटनांना आळा बसेल.
#mumbaistories #littlemoments
बापरे.खूपच व्याप आणि ताप
बापरे.खूपच व्याप आणि ताप.थोडक्यात निभावलं म्हणायचं, कार चा मोठा धक्का लागला नाही हे बरं झालं.
.थोडक्यात निभावलं म्हणायचं>>
.थोडक्यात निभावलं म्हणायचं>> हो खर आहे
बापरे!! करायला गेलो एक ..
बापरे!! करायला गेलो एक .. तशातली गत झाली. नशीबच बलवत्तर म्हणायचे.. !
करायला गेलो एक .. तशातली गत
करायला गेलो एक .. तशातली गत झाली. नशीबच बलवत्तर म्हणायचे.. !>> खर आहे.
Mi_ anu आणि anjali तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
बाप रे! माझं गेल्यावर्षी असंच
बाप रे! माझं गेल्यावर्षी असंच एका कारवाल्यामुळे जबरदस्त नुकसान झालं.... मोबाईलवर बोलत गाडी चालवत गेटाबाहेर... रिव्हर्स घेत होता आणि मी मागे चालत होते... त्याचं लक्ष नाही याचा अंदाज आल्याने पटकन क्रॉस करण्याच्या नादात फूटपाथवर पडले... दोन्ही पायांना दुखापत झाली. डावा अँकल जॉईंट fracture!! इतर लोकं धावले पण गाडीतील मस्तवाल बाहेरही आला नाही
एक वर्ष दुखणं भोगलंय!!
abhishruti तुमचा अनुभव
abhishruti तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद!
चूक कोणाची आणि कोणाला भोगायला लागत...