खरेखुरे आयडॉल्स - युनिक फीचर्स

Submitted by चिनूक्स on 22 December, 2009 - 01:29
दोन महिन्यांपूर्वी पुण्यात एका प्रसिद्ध वृत्तसमूहानं त्यांच्या एका साप्ताहिकाच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. टिळक स्मारक मंदिरात हा कार्यक्रम होणार होता. त्या आधी काही महिन्यांपूर्वीच प्रकाशकाका आणि मंदाकाकूंची एक मुलाखत तिथेच झाली होती. लोकांनी त्या मुलाखतीला प्रचंड गर्दी केली होती. तशीच गर्दी याही कार्यक्रमाला असेल, असं मला वाटलं होतं. म्हणून सहाच्या कार्यक्रमाला साडेपाच वाजता पोहोचलो, आणि थक्कच झालो. सभागृह अगोदरच प्रेक्षकांनी तुडुंब भरलं होतं. आतमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. स्टेजच्या पायर्‍यांवरही लोकांनी गर्दी केली होती. खाली आवारात पाचसातशे लोक जमले होते. तेवढेच लोक जागा नसल्यानं परत गेले होते. लोकांनी दुपारी तीन वाजेपासूनच रांगा लावल्या होत्या.

मुलाखत लोकांनी खाली उभं राहून लोकांनी शांतपणे ऐकली. या गर्दीचं भारलेपण केवळ बघण्यासारखं होतं. कार्यक्रम संपल्यावर मात्र प्रत्येकाला आमटे दांपत्याला भेटायचं होतं. काकाकाकूंना परत घेऊन जाणारी गाडी लोकांनी अक्षरशः अडवली. काका गाडीतून खाली उतरून परत एकदा सगळ्यांशी बोलले. गाडी परत निघाली तेव्हा गर्दी परत एकदा त्या गाडीमागे पार रस्त्यापर्यंत धावली..

आजही हा प्रसंग आठवला ही आनंद होतोच, पण आश्चर्यही वाटतं. अगदी आत्ताआत्तापर्यंत लोकांना हेमलकसा महाराष्ट्रात कुठे आहे, हे माहीतही नव्हतं. काकाकाकूंना मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यानंतर रेडिओ जॉकी असलेली माझी एक मैत्रीण 'मी पुण्याहून आत्ता निघू शकते, तू काकांशी बोलून मला दुपारची वेळ मिळवून देतोस का? म्हणजे माझ्या संध्याकाळच्या प्रोग्रॅममध्ये मी तो इंटरव्ह्यू ब्रॉडकास्ट करेन', असं म्हणाली होती... मुक्या प्राण्यांना, फुटपाथवर झोपलेल्यांना मारणारा बॉडीबिल्डर तुरुंगातून सुटून आल्यावर त्यानं हवेत फेकलेला त्याचा बनियन झेलायला तत्पर असलेली, तमाम बुवाबापूअम्मांच्या नादी लागणारी, भ्रष्ट नेत्यांच्या मागे खुळावलेली गर्दी दूर जंगलात राहून शांतपणे काम करणार्‍या, अजिबात भाषणं देता न येणार्‍या एका डॉक्टरची गाडी अडवते, याचं म्हणून मला अप्रूप वाटलं.

गर्दीची ही परस्परविरोधी रूपं आपण बघतो, तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकतं आहे, असं सारखं वाटत राहतं. ज्यांच्या मागे आपण धावतो, ज्यांचा प्रत्येक आदेश आपण मानतो, त्यांची खरंच तितकी लायकी आहे का, हा विचार बहुधा केला जात नसावा. दूरचित्रवाणीवर झळकणारे कचकड्याचे आयडॉल्स, चिथावणीखोर व खोटारडे राजकीय नेते यांच्यामुळं वेडावून जाऊन आपण नक्की काय गमावतो आहे, याचाही विचार होत नसावा.

काही वर्षांपूर्वी 'अनुभव' मासिकातून 'खरेखुरे आयडॉल्स' ही लेखमालिका प्रसिद्ध झाली. ज्यांना आयडॉल म्हणून मिरवलं जात आहे ते 'खरेखुरे' नाहीत आणि अशा लोकांना डोक्यावर घेण्यापेक्षा तळातल्या माणसासाठी जे लोक काम करतात, त्या खर्‍याखुर्‍या व्यक्तींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, याची जाणीव करून देण्यासाठी ही लेखमालिका लिहिली गेली होती. या लेखमालिकेचं पुस्तकरूप म्हणजे युनिक फीचर्सचं 'खरेखुरे आयडॉल्स'.

या पुस्तकातील 'आयडॉल्स' गेली अनेक वर्षं समाजाच्या भल्याचं काम करत आहेत. त्यांच्या कामातून लोकांना अनेक वर्षं भेडसावणारे प्रश्न सोडवले गेले आहेत. कुठे न्याय मिळवून दिला जात आहे, कुठे मूलभूत संशोधनामुळे जीवन सुकर झालं आहे, कुठे नवे चांगले पायंडे पडत आहेत, कुठे स्थानिक बुद्धी-शक्तीचा मिलाफ होतो आहे. या माणसांच्या कामामुळे समाजव्यवस्थेत सकारात्मक बदल झाला आहे. आपलं आयुष्यही सुखकर होऊ शकतं, हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

दुसरं असं की, स्वतःपलीकडे जाऊन समाजासाठी काम करणारी ही मंडळी बहुतांशी दुर्लक्षित राहिली आहेत. त्यांचे प्रकल्प, त्यांचे प्रयोग लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण जगताना पदोपदी येणार्‍या अडचणींसाठी आपण समाजव्यवस्थेला दोष देतो. अपुरं पाणी, वीजटंचाई, महागाई, भ्रष्टाचार, गुन्हेगारी या सार्‍यांसाठी व्यवस्थेला, शासनयंत्रणेला जबाबदार धरतो. मात्र याच व्यवस्थेचा आपणही एक भाग आहोत, हे विसरतो. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपणच पुढाकार घेऊन काही केलं पाहिजे, हा विचार केला जात नाही. व्यवस्थेतली वैगुण्यं पाहून हताश न होता या खर्‍याखुर्‍या आयडॉल्सनी मात्र थेट काम करायला सुरुवात केली. सामान्य लोकांना आपल्या कामात सामावून घेतलं. लोक एकत्र आले तर काहीही अशक्य नाही, हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं. 'खरेखुरे आयडॉल्स' हे पुस्तक पाणी, जमीन, शेती, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास अशा अनेक क्षेत्रांत पथदर्शक काम करणार्‍या महाराष्ट्रातील कार्यरत मंडळींना केलेला सलाम आहे.

या पुस्तकात अण्णा हजारे, मेधा पाटकर, डॉ. भरत पाटणकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर, उल्का महाजान अशा कार्यकर्त्यांबद्दल वाचायला मिळेलच, परंतु नवे विचार मांडणार्‍या आणि त्या विचारांची अंमलबजावणी करणार्‍या व्यक्तींबद्दलही वाचायला मिळेल. सुरेश खोपडे यांच्यासारखे ज्येष्ठ पोलीस अधिकारी, मनीषा म्हैसकर यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकारी, वसंतराव टाकळकरांसारखे वनसंवर्धन अधिकारी आपापल्या नोकरीतील जबाबदारी सांभाळता सांभाळता नवा विचार प्रत्यक्षात कसा आणतात, हे वाचण्यासारखं आहे. विंचूदंशावर उपचार शोधण्यासाठी आयुष्य वेचणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर, डॉ. अभय-राणी बंग, डॉ. आनंद कर्वे यांच्यासारखे संशोधक, आनंदवन उभारणारे डॉ. विकास आमटे, डॉ. चंद्रकांत पोळ, अपंगत्वावर मात करून इतर अपंगांना नवं जीवन देणार्‍या नसिमा हुरजूक, शेतीक्षेत्रात भरीव काम करणारे बी. आर. बारवाले आणि गणपतराव पाटील या सार्‍यांच्या अफलातून कामाची ओळख या पुस्तकाद्वारे करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

असेच एक 'खरेखुरे आयडॉल' म्हणजे श्री. पोपटराव पवार. नगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार या गावाचे सरपंच. एकेकाळी विपन्नावस्थेत असणारं हे गाव श्री. पवार यांच्या परिश्रमांमुळं आज आदर्श गाव ठरलं आहे. गावात पाणी, वीज मुबलक आहे. इतर अनेक गावांपेक्षा लोकांचं दरडोई उत्पन्न कितीतरी अधिक आहे. बहुतेक सगळा गाव साक्षर आहे. गावात एड्सची विवाहपूर्व चाचणी बंधनकारक आहे. ध्वनिप्रदूषण होऊ नये, म्हणून वरातीत बॅण्ड वाजवला जात नाही. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी गावातील गरिबीला कंटाळून गाव सोडून मुंबईला निघून गेलेली सगळी कुटूंबं आज गावात परतली आहेत. 'आमचे गावकरी परतले म्हणून मुंबईचं रोजचं दोन लाख लिटर पाणी वाचतं', असं पोपटराव पवार अभिमानानं सांगतात.

हिवरे बाजारच्या या भन्नाट सरपंचाची तितकीच भन्नाट गोष्ट त्यांच्याच शब्दांत..

[pp_aksharwarta.mp3]

युनिक फीचर्सच्या 'खरेखुरे आयडॉल्स' या पुस्तकातील ही काही पानं...

kki1.jpg


श्री. पोपटराव पवार


१९७२ हे वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासातलं काळं वर्ष म्हणून ओळखलं जातं. त्या वर्षीच्या महाभयंकर दुष्काळाने राज्याच्या अर्थव्यवस्थेचं पेकाट मोडलं. जनावरंच काय, पण माणसंसुद्धा पाण्यावाचून तडफडून मेली. शेतात पेरणीपुरताही पाऊस पडला नाही. विहिरी कोरड्या ठणठणीत झाल्या. जमिनीच्या पोटात थेंबभरही पाणी उरलं नाही. या दुष्काळात मुंबई-पुण्यासारखी शहरंही हेलपाटली, पण खेडी मात्र पार उद्ध्वस्तच झाली. अशाच उद्ध्वस्त खेड्यांपैकी एक गाव म्हणजे हिवरे बाजार.

खरंतर बहात्तरच्या दुष्काळाआधी या गावाची स्थिती फारशी वाईट नव्हती. नगर जिल्ह्यातल्या इतर विपन्न गावांशी तुलना केली तर चांगलीच होती असं म्हणावी लागेल. लोकांकडे आपापली शेती करण्याइतकं पाणी होतं. घराघरात जनावरं होती. दूधदुभत्याचा धंदाही जरा बदलला होता. थोडक्यात, चार पैसे गाठीला असले नसले तरी गाव खाऊन पिऊन सुखी होतं. गावात भरणारे कुस्तीचे फड आणि रात्रीची भजनीमंडळं हे त्याचंच लक्षण होतं. पण दिवस फिरले. दुष्काळाने निसर्गाचं चक्र उलटं फिरवलं. आधी पाऊस गायब झाला. मग विहिरी आटल्या. झाडं वाळली. डोंगर उघडेबोडके झाले. जनावरं दूध देईनाशी झाली. विकायला सोडाच, पण खायला धान्य उगवेनासं झालं आणि चार पैसे गाठीला असणारी माणसं कर्जाच्या विळख्यात अडकली. वैफल्य विसरण्यासाठी दारू जवळची झाली. विपरीत परिस्थिती किंवा दारिद्र्य पाहुण्यासारखं येत नाही, असं म्हणतात. येतं ते थेट मुक्कामालाच येतं. हिवरे बाजारमागचं हे दुष्टचक्र तब्बल सोळा वर्षं फिरतच राहिलं. १९८८ सालाने मात्र या दुष्टचक्राच्या गतीला करकचून ब्रेक लावला.

१९८८ साली गावात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. मूळचे हिवरेबाजारचेच असलेले, पण शि़क्षणाच्या निमित्ताने आधीपासून दूर आजोळी राहणारे पोपटराव पवार आता नगरमध्ये होते. एम.कॉम.चं शिक्षण पूर्ण करतानाच आंतरविद्यापीठीय क्रिकेट त्यांनी गाजवलं होतं. त्या जोरावर मोठमोठ्या कंपन्यांच्या नोकरीच्या ऑफर्स त्यांना येत होत्या. नेमक्या त्याच वेळी गावातल्या त्यांच्या मित्र-मंडळींनी त्यांना गावात निवडणुकीला उभं राहण्याची गळ घातली. करिअरचा विजयपथ नजरेसमोर असताना पोपटरावांनी गर्तेत गेलेल्या गावाची वाकडी वाट का स्वीकारली, हे कळायला मार्ग नाही. पण ते गावात आले. त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा.

पोपटरावांचं वैशिष्ट्य म्हणजे सरपंच झाल्यानंतर गाव बदलण्याच्या ईर्ष्येने पहिल्याच दिवसापासून पोपटराव कामाला लागले. त्यांना मदत करायला चार मित्रमंडळी होती. पण विरोध करायला अवघा गाव होता. आपण हलाखीतच जगणार आणि खितपतच मरणार अशी खूणगाठच त्यांनी मनाशी बांधलेली होती. खेड्यातल्या लोकांना नवीन काही पटवून देणं ही महाकठीण गोष्ट असते, त्यामुळे पोपटराव उपदेशाचे डोस पाजण्याच्या भानगडीत पडले नाहीत. थेट कामाला लागले.

अनेक वर्षं बंद पडलेला हरिनाम सप्ताह त्यांनी सर्वप्रथम सुरू केला. त्या निमित्ताने रात्री ’चांगल्या’ कामासाठी लोक जमू लागले. रात्री दारुड्यांची अर्वाच्च शिवीगाळ ऐकण्याची सवय असलेल्या गावकर्‍यांना तबला पेटीचे आणि संतांच्या अभंगांचे स्वर ऐकू येऊ लागले. मग गावकर्‍यांसाठी आळंदी आणि पंढरपूरच्या यात्रा आयोजित केल्या गेल्या आणि लोकांना देवदर्शनाला नेऊन आणलं. या दोन उपक्रमांमधून त्यांनी गावकर्‍यांचा विश्वास थोडाफार मिळवलाच, गावातला विरोधही बर्‍याच अंशी मावळला. त्याचा उपयोग करून घेत गावचा हातपंप वर्गणीतून दुरुस्त करणं, शाळेसाठी श्रमदान करून नियमित वर्ग भरतील हे पाहणं यासाठी गावकर्‍यांना तयार केलं. अशा रीतीने एका दिशेने वाटचाल सुरू झाली म्हटल्यावर तरुणांचं संघटन उभं करायला सुरुवात केली. तरुणांच्या या गटाला घेऊन पोपटरावांनी अण्णा हजार्‍यांच्या राळेगण सिद्धीला भेट दिली. राळेगणची विकासगाथा अण्णांच्या तोंडून ऐकताना सगळीच मंडळी अक्षरश: भारावून गेली. राळेगणहून गावाकडे परतताना प्रत्येकाच्या बोलण्यात एकच विषय होता, आपलंही गाव राळेगणप्रमाणे बदलण्याचा. एकेक पाऊल पुढे पडत होतं.

या सार्‍या घडामोडींमध्ये ४ वर्षं गेली आणि १९९२ साली महाराष्ट्र शासनाने 'आदर्श गाव योजना' जाहीर केली. अण्णांच्या शिफारसीमुळे शासनाने या योजनेत हिवरे बाजारचा समावेश केला. खरं तर राज्यातल्या ३०० गावांचा 'आदर्श गाव योजनेत' सहभाग केला गेला होता. पण हिवरे बाजाराला या योजनेचा अधिक फायदा झाला. कारण योजना राबवण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वमशागत आधीच्या चार वर्षांमध्ये या गावात झालेली होती.

'आदर्श गाव योजना' आल्यानंतर झालेल्या पहिल्याच ग्रामसभेत गावकर्‍यांनी मंजूर केलेला ठराव खूपच महत्त्वाचा ठरला. नशाबंदी, चराईबंदी, कुर्‍हाडबंदी, नसबंदी आणि श्रमदान ही पंचसूत्री गावकर्‍यांनी एकमुखाने आणि मन:पूर्वक मान्य केली. त्यामागची उत्स्फूर्तता आणि 'गावासाठी काम हे स्वत:साठी काम' ही भावनाच विकासाची नांदी ठरली.

पण याचा अर्थ लगेच सगळं आबादीआबाद झालं, असा नव्हे. कारण विकासाची वाट पूर्णपणे मोकळी होण्यासाठी आणखी थोडा वेळ जाणं आवश्यक होतं. त्यासाठी आणखी काम करण्याची गरज होती. आधीच म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागात एखादी गोष्ट पटवून देणं खूप अवघड असतं. शिवाय गावकर्‍यांना कंदिलाच्या प्रकाशात विकासाचं स्वप्न दाखवणं वेगळं आणि दिवसाच्या रखरखीत उन्हामध्ये, उघड्याबोडक्या डोंगरावर प्रत्यक्ष कामाला उतरवणं वेगळं. एकूणच साधनांची कमतरता असल्यामुळे श्रमदानाला पर्याय नव्हता. पण श्रमदानासाठी गावकर्‍यांची मनं वळवताना अडचणी येत होत्या. जलसंधारणाचं, माथा ते पायथा हे सूत्र त्यांच्या लक्षात येत नव्हतं. आपलं आयुष्य बदलण्यासाठी जलसंधारण हाच एकमेव उपाय आहे हेही पुरेसं पटत नव्हतं. पण गावकर्‍यांचं मन:परिवर्तन होईपर्यंत थांबणं पोपटरावांना शक्य नव्हतं. त्यामुळे एकीकडे गावकर्‍यांशी चर्चा त्यांनी सुरू ठेवली पण गावातल्या तरूण मंडळींना बरोबर घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली.

हिवरे बाजारच्या भोवती चोपाळा, कुकड्या, हरणजोई, माळिंबा, पाखरण अशा नावाच्या डोंगरवजा टेकड्या आहेत. या टेकड्यांच्या माथ्याकडून चर खणायला सुरुवात केली गेली. एक फूट खोल आणि दोन फूट रुंदीचे सलग समपातळी चर खणण्यात आले. जवळजवळ १५० हेक्टरवर हे काम केलं गेलं. शिवाय दोन वनतळी, ४१ दगडी बांध, ६ सिमेंट नालाबांध बांधले गेले. या सगळ्यांतून काय झालं? तर माती आणि पाणी अडवण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र प्रत्यक्षात आणलं गेलं. दुसरीकडे पावसाळ्याच्या तोंडावर खैर, भेंडा, जांभूळ, काशिद, रामकाठी, साबर, शिसू, चिंच आणि तत्सम दोन लाख झाडं लावली गेली. पावना आणि शेडा या दोन प्रकारच्या सकस गवताचीही लागवड केली गेली. ही सर्व लागवड अर्थातच सरकारी मालकीच्या जमिनीवर केली. म्हणजे संपूर्ण गावाचा त्यावर हक्क तयार झाला. भविष्यामध्ये ग्रामपंचायतीला उत्पन्नाचं हे महत्त्वाचं साधन होईल, असा विचार त्यामागे होता. हे करत असतानाच गावातल्या व्यक्तिगत मालकीच्या जमिनींवर झाडं लावा - झाडं जगवा ही मोहीम राबवली गेली. ही सर्व कामं पाच वर्षांत झाली. सोबत चराईबंदी आणि कुर्‍हाडबंदी ही दोन तत्त्वं कसोशीनं आचरणात आणली गेली.

या सर्व प्रयत्नांचं, कष्टांचं त्यामागच्या दृष्टीचं, गावाच्या एकीचं मोल खूप मोठं आहेच. पण नेमक्या त्याच वर्षी या प्रयत्नांना निसर्गानं दिलेली साथही तितकीच महत्त्वाची आहे, हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. त्यावर्षी पाऊस चांगला पडला. १५० हेक्टरवर खणलेल्या चरांमधून तब्बल दोन कोटी पंचाहत्तर लाख लिटर जमिनीत मुरलं. मुख्य म्हणजे माती वाहून जाणं बंद झालं. ओढ्यांना पूर येणं बंद झालं. पण विहिरींमध्ये पाणी दिसेना. हा नेमका काय प्रकार आहे हे लोकांच्या लक्षात येईना. विहिरींना पाणी नाही हे पाहून लोक वैतागले. डोंगरावर पाणी अडवल्यामुळे आपल्याला पाणी मिळणार नाही, असं त्यांचं मत झालं. आपण आधीपेक्षा अधिक अडचणीत आलो, असं त्यांना वाटलं. अर्थात ही भावना फार काळ टिकली नाही. कारण महिनाभरातच जलसंधारणाने आपली कमाल दाखवली. डोंगरात झिरपलेलं पाणी भूगर्भातून विहिरीत अवतरलं आणि पाहता पाहता विहिरी काठोकाठ भरल्या. नंतर पावसाळा सरल्यावरही विहिरींमध्ये पाणी तसंच राहिलेलं पाहिल्यावर मात्र गावकर्‍यांच्या जिवात जीव आला. आपल्या वर्षानुवर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटल्याची त्यांची खात्री पटली.

एकदा पाणी उपलब्ध झालं म्हटल्यावर गावात पिकांचे पॅटर्न्स बदलले. पूर्वी केवळ ज्वारी आणि बाजरी घेणारे शेतकरी आता गहू, कांदा, बटाता, कापूस, सोयाबीन अशी नगदी पिकं घेऊ लागले. काही शेतकरी फळबागा लावू लागले. हे क्षेत्र पाहता पाहता आधीपेक्षा पाचपट झालं. गावात पैसा येऊ लागला. पिण्याचं पाणी आणि पोटभर अन्नाची सोय झालेले गावकरी आता पुढचा विचार करू लागले. पोपटरावांच्या नव्या कल्पना आता उत्साहाने समजावून घेऊ लागले. गावातला दूधदुभत्याचा धंदा पुन्हा एकदा तेजीत आला. गावात घराघरांमध्ये जर्सी गायी दिसू लागल्या. पूर्वी शंभर-दीडशे लिटर इतकं कमी असलेलं दुधाचं उत्पादन आता पंचवीसशे लिटरपर्यंत पोहोचलं. नगरच्या बाजारामध्ये दररोज दोन ते तीन टेम्पो भरून भाजीपाला जाऊ लागला. डाळिंब, आंबा, चिकू, पेरू या फळांचं उत्पादनही खूपच वाढलं. गावात फिरताना सुबत्तेची अनेक लक्षणं दिसू लागली. पूर्वी एखादी सायकल दिसायची मारामार असलेल्या गावात कितीतरी मोटरसायकली दिसू लागल्या. घराघरांत टीव्ही आले. काही शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर घेतले. गावातलं शिक्षणाचं प्रमाण वाढलं. दर्जा सुधारला आणि 'आदर्श गाव योजने'तलं पहिलं यशस्वी गाव म्हणून हिवरे बाजारचा लौकिक महाराष्ट्रभर पसरला.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र, राजस्थान, हरियाणा, बिहार यांसारख्या कितीतरी राज्यांमधल्या स्वयंसेवी संस्थांनी गेल्या काही वर्षांत हिवरे बाजारला भेटी दिल्या. पाणलोट विकास कार्यक्रमातून झालेला ग्रामविकास आपल्या डोळ्यांनी पाहिला. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका या देशांच्या प्रतिनिधींनी हिवरे बाजारचा मुक्त कंठाने गौरव केला. पारितोषिकांची तर खैरात झाली. भारत सरकारचा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार, राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार, वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार, ग्राम अभियान पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार, लोकमत पुरस्कार असे अनेक पुरस्कार आजवर या गावाला लाभले आहेत. तसं पाहता दहा वर्षं हा कालावधी एखाद्या गावाच्या आयुष्यामध्ये फारसा मोठा नव्हे; पण केवळ दहा्च वर्षांत भणंगातल्या भणंग अशा या गावाचं रूपांतर संपन्न म्हणता येईल अशा आदर्श गावात झालं. ही ग्रामविकासाच्या क्षेत्रातली सुखद वस्तुस्थिती आहे.

हिवरे बाजाराच्या यशस्वी प्रयोगाचा जरा तटस्थपणे आपण विचार करू लागतो, तेव्हा नकळत तुलना सुरू होते ती राळेगण सिद्धीच्या प्रयोगाशी. शासकीय योजनांची मदत, शासकीय अधिकार्‍यांचा पाठिंबा आणि गावकर्‍यांचा सक्रीय सहभाग हे तीनही घटक दोन्ही गावांमध्ये समान आहेत. नगर जिल्ह्यातली अगदी जवळजवळची ही दोन्ही गावं असल्यामुळं गावातले निसर्गासह सर्व अनुकूल-प्रतिकूल घटकही दोघांसाठी समान आहेत. एकाच व्यक्तीने झोकून देऊन, संपूर्ण गाबाला बरोबर नेणं आणि संपूर्ण गावाचा विकास घडवणं हा सर्वांत महत्त्वाचा घटकही दोन्ही गावांमध्ये अगदी समान आहे. मग फरक कुठे आहे? फरक आहे, आणि तो महत्त्वाचा आहे.

फरक आहे अण्णा हजारे आणि पोपटराव पवार या दोन माणसांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये. अण्णा हजारे म्हटल्यावर त्यांची लष्करातली नोकरी, आयुष्यात आलेल्या वैफल्यातून आत्महत्येचा विचार डोकावण्यापर्यंतचा प्रवास, विवेकानंदांच्या विचारांनी त्यांच्या आयुष्याला दिलेली नाट्यपूर्ण कलाटणी, त्यांचं ब्रह्मचर्य, यादवबाबांच्या देवळातला निवास, गांधीवादी राहणी आणि विचारसरणी हे सारं डोळ्यांपुढे येतं. थोडक्यात, अण्णा म्हणजे त्यागाचं प्रतीक, असं चित्र निर्माण झाल्यामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती एक वलय निर्माण होतं. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे राळेगण सिद्धीचा प्रयोग बघणारे अनेक गावचे कार्यकर्ते भारून जरूर जातात, पण असं काम आपणही करू शकतो, असं मात्र त्यांना वाटत नाही. कदाचित आपण असा प्रयत्न करू शकू, इतकंच त्यांना वाटतं.

पोपटरावांचं व्यक्तिमत्त्व याच्या एकदम विरुद्ध आहे. पोपटराव चारचौघांसारखे संसारी गृहस्थ आहेत. १९८८ साली सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर पुढच्या निवडणुकांमध्ये ते बिनविरोध निवडले गेले आहेत. याचा अर्थ गावाचा संपूर्ण विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. पण नेतृत्वाची दुसरी आणि तिसरी फळी निर्माण करण्यात त्यांना यश आलेलं दिसत नाही. ते काम त्यांना लवकरात लवकर करावं लागेल अन्यथा या एकूण प्रयत्नांची व्याप्ती पोपटरावांच्या व्यक्तिमत्त्वापुरतीच सीमित राहण्याची शक्यता आहे. अर्थात त्यामुळे त्यांच्या कामाचं मोल कमी होत नाही. त्यांचं काम बघायला, त्यांना भेटायला आलेल्या माणसांना त्यांच्या गुणदोषांसकट ते आपले वाटतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती कसलाही करिष्मा नसल्यामुळे, जे पोपटराव करू शकतात ते आपण का नाही करू शकणार? हा विचार हिवरे बाजार पाहताना लोकांच्या मनात येतो. पोपटरावांच्या मदतीने आणि सल्ल्याने आज महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये पाणलोटाचे उपक्रम सुरू झाले आहेत, होत आहेत. पोपटरावांना मिळणारे मानमरातब आणि प्रसिद्धी पाहून अनेक गावांमधले तरूण सरपंच उत्साहाने कामाला लागले आहेत.

पोपटरावांच्या कामातली सर्वांत महत्त्वाची खासियत म्हणजे सर्व लोकांना बरोबर घेऊन पुढे जाणं. 'विकासाची कामं करताना राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवावेत' असं बोलणं सोपं आहे; पण प्रत्यक्ष गावच्या मातीत काम करताना मात्र स्थानिक राजकारणाशी पाला पडतोच. तंटे बखेडे उद्भवतातच. पोपटरावांनी त्यांच्यापुरता सोपा मार्ग शोधला आहे. ते प्रत्येक प्रश्नावर गावकर्‍यांची सविस्तर बैठक होऊ देतात. सर्वांना आपापली मतं मांडण्याची संधी देतात. शेवटी सर्वांनुमते जो होईल तोच निर्णय सर्वांसमक्ष घेतात. अर्थात हे सारं करण्यासाठी भरपूर वेळ आणि सहनशक्तीची गरज असते. पण ज्या ज्या व्यक्तीला लोकशाही चौकट मान्य करून सार्वजनिक क्षेत्रात काम करायचं आहे त्या व्यक्तीपुढे दुसरा पर्यायही नसतो. विकास एका रात्रीत होत नाही म्हणतात ते त्यामुळेच.

पोपटरावांच्या कामाचा आपल्या धोरणात्मक पातळीवरही परिणाम झालेला दिसतो. हिवरे बाजारच्या उदाहरणावरून केंद्र सरकारने 'हरियाली' नावाची योजना आखलेली आहे. पूर्वी गावाच्या विकासाचं काम शासकीय यंत्रणेने आणि स्वयंसेवी संस्थांनी करणं अभिप्रेत असे. आता या नवीन योजनेप्रमाणे या कामासाठी ग्रामसभेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणार आहे. ग्रामसेवक आणि सरपंचांनी मिळून ग्रामसभेमार्फत विकासाचं नियोजन आणि अंमलबजावणी करणं अभिप्रेत आहे आणि ग्रामसभेमार्फत ते शक्य होत नसेल तरच शासकीय यंत्रणेनी काम हाती घ्यावं आणि त्यातून गरज लागलीच तर स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा अशी ही योजना आहे. या योजनेच्या उपयुक्ततेविषयी यथावकाश चर्चा होत राहीलच पण पोपटरावांच्या कामाला मिळालेली ही सर्वांत मोठी पावती म्हणावी लागेल.

शासनातल्या बहुतांश अधिकार्‍यांनी आजपर्यंत आपापल्या भागातल्या ग्रामसेवक-सरपंचांसह हिवरे बाजारला भेट दिली आहे. आपापल्या गावात हिवरे बाजारचं हे मॉडेल राबवणं त्यांना सहज शक्य आहे, असं अधिकार्‍यांनाही वाटतं आहे.

२००० सालापासून २००३ पर्यंत सलग तीन वर्षं महाराष्ट्रात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला. हिवरे बाजारला ३०० ते ४०० मि.मि. इतका कमी पाऊस एरवीही असतो. या तीन वर्षांत तर हिवरे बाजारला पावसाने जवळजवळ दर्शन दिलं नाही. पण आश्चर्य म्हणजे तीन वर्षांत पिण्याला पाणी नाही, असा प्रसंग गावात एकही दिवस उद्भवला नाही. महाराष्ट्रातल्या इतर हजारो अवर्षणग्रस्त गावांनी जर हिवरे बाजारचा कित्ता गिरवला तर पुढचे अनेक दुष्काळ त्यांनाही हा सुखद अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.



kki2.jpg


**************** खरेखुरे आयडॉल्स

युनिक फीचर्स
समकालीन प्रकाशन

पृष्ठसंख्या - १९९
किंमत - रुपये दोनशे

****************

टंकलेखन साहाय्य - श्रद्धा द्रविड व अंशुमान सोवनी
**************
मायबोली खरेदी विभागात हे पुस्तक उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17129
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वाचले आहे मी. खूप चांगली माहिती असलेले पुस्तक आहे. खरेच यातील बरेच जण फोटोवरून ओळखता आले नाहीत आणि काही जण तर माहीतच नव्हते हे पुस्तक वाचेपर्यंत.

चिन्मय तुझे वरचे ३-४ परिच्छेद ही छान आहेत. श्रद्धा आणि आर्फी ला धन्यवाद.

वाचलय. फार प्रेरणादायी पुस्तक आहे. संवेदनशील वयातील मुलांना आणि त्यांच्या पालकांना आणि मुख्य म्हणजे सामाजिक जाण असलेल्या आणि आर्थिक मदत करु इच्छिणा-या NRI's ना गीफ्ट द्यायला माझं आवडतं पुस्तक आहे ते.

धन्यवाद चिनुक्स, श्र, आर्फी.

पोपटराव पवारांबद्दल काहीच माहिती नव्हती. तरी या उपक्रमातून हे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल चिन्मय, श्रद्धा व अंशुमानचे आभार Happy

खूप छान लेख. पोपटराव पवारांच्या हिवरे बाजार बद्दल आधी कधी तरी ऐकलं आहे.

छान पुस्तक. हे पाहिल्यावर काहीतरी करावेसे नक्की वाटते. चिनूक्स तुझी कामगिरी अगदी प्रशंसनीय.

हिवरे बाजारची कथा या पुस्तकाबद्दल बहुदा बी ने लिहीले होते मागे वाचू आनंदे मध्ये त्यामुळे त्या गावाबद्दल थोडीफार माहिती झाली होती. इथे या पुस्तकात अश्या बर्‍याच लोकांची, वेगवेगळ्या कामांची माहिती आहे तर. सही.
धन्यवाद अक्षरवार्ता मंडळ.

फार उपयुक्त आणि प्रेरणादायी माहिती ! हे पुस्तक नक्की वाचणार. कधी कधी नाही, माझं बर्‍याचदा असं होतं, की समाजासाठी, लोकांसाठी काहीतरी चांगलं करायची खूप इच्छा आहे पण नक्की काय करावे तेच सुचत नाही. परिस्थिती उद्भवली की जमेल तसे आपण ते करतच असतो पण असं काहीतरी ध्येयवेडे होऊन ते साध्य करण्याची ऊर्मी मनुष्यबळ, आर्थिकबळ आणि सरकारी यंत्रणा यांचा विचार करता करता मनातल्या मनातच विरघळते. हे पुस्तक वाचल्यावर तरी आपल्याला हवा असलेला खराखुरा मार्ग नक्कीच दिसेल.
धन्यवाद चिनूक्स, श्रध्दा आणि आर्फी.

खुप धन्यवाद!
माझी अन त्यांची भेट आजही आठवते. आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद!

माझा मित्र बालाजी मंजुळे जुन २००९ ला आय ए एस होण्याअगोदर मार्च २००९ मध्ये एम्पीएस्सी मधुन जिल्हा परिषद चा मुख्य कार्यकारी अधिकारी झाला होता, तेंव्हा पंचायत राज मधील शेवटचे टोक असलेले, ग्रामपंचायत हे युनिट पाहण्या साठी मी अन तो हिवरे बाजार ला गेलो होतो. श्री. पोपटरावांनी आमचे आदराने स्वागत केले. त्या दिवशी नेमके दोन लग्न समारंभ होते, तेंव्हा त्यांची लोकप्रियता अन गावावरील आदरयुक्त दरारा ही पाहिला Happy भन्नाट व्यक्तीमत्व आहे! सिंपल अन ब्युटीफुल Happy

अनेक सरकारी अन खाजगी भेटी ची सवय असलेल्या पोपटरावांना, सरकारी योजनेतुन नव्हे तर स्वतःहुन गावाला भेट दिलेले एक भावी सरकारी अधिकारी (बालाजी) अन परदेशी शिकलेला विद्यार्थी (मी) यांचे फारच अप्रुप वाटले...!

त्याच दिवशी दुपारी राळेगण ला भेट दिली. अण्णा भेटले नाही, पण ग्रामस्थांनी चांगली माहिती दिली.

चंपक, तू या संबंधी काही टाकलं होतंस का इथे ? जसं पोपटराव यांनी केलेलं भाषण इत्यादी ? काहीतरी रेफ. आठवतोय.

नाही भो... बालाजी च्या सत्कार समारंभाचे व्हिडिओ टाकले होते माझ्या रंगीबेरंगी पानावर...
हिवरे बाजार भेटी बद्दल नव्हते लिहिले...

नाही भो... बालाजी च्या सत्कार समारंभाचे व्हिडिओ टाकले होते माझ्या रंगीबेरंगी पानावर...
हिवरे बाजार भेटी बद्दल नव्हते लिहिले...

अरे व्वा! बरं झालं चिनूक्ष तू या पुस्तका बद्दल लिहीलयस, आवडलं. सामाजिक जाणिवा जिवंत राहाण्यासाठी अशी तटस्थ दृष्टीकोनातून लिहिलेली अधिकाधिक पुस्तक समोर येणं आवश्यकच आहे. युनिक फीचर्स त्याबतीत खरोखरच 'युनिक' आहेत. त्यांचच 'खरी खुरी टीम इंडीया' हे अजून अशा प्रकारचं गाजलेलं पुस्तक.
पुस्तकाबद्दल इथे लिहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद!
माझ्या ब्ळॉग वर दीड वर्षापूर्वी मी ह्या पुस्तकाबद्दल लिहिलं होतं, त्याची लिंक -
आपले खरे खुरे आयडॉल्स

हिवरे बाजार आणि पोपटराव पवारांबद्दल थोडीफार माहीती होती त्यात भर घातल्याबद्दल धन्यवाद .

मस्त पुस्तक आहे, संग्रही असाव अस . ( मधे सह्याद्री वाहीनी वर श्री .पोपट रावांची सविस्तर मुलाखत घेतली होती, त्यांच्या कार्याबद्दल तर ऐकुन होतोच, पण प्रत्यक्ष मुलाखत ऐकल्यावर अक्षरशः अचंबित झालो. )

वरील पुस्तक वाचलं,लेखकाचे आभार ! पण या सगळ्या लोकांबद्दल असताना त्यांच्या कामाची व्याप्ती,आवाका किती आहे,याच्या वरून लिखाण ठरला पाहिज्ये,थोडक्यात एका गावाचा सरपंच हा ज्यास्तीज्यास्त एका गावाशीच समाधीत असतो,काही लोकांचा काम हे एका गावापुरता,आमदाराचा एका तालुक्यापुरता,या प्रकारे मर्यादित असू शकता,यात राजू शेट्टी यान्ह्च्या बद्दल लेखकाला अजून थोडं ज्यास्त लिहिता आला असतं,काही लोकांना सगळ्याबद्दल सगळं माहित असेल असं नाही ,पण ती प्रामाणिकपने/निष्पक्षपने गोळा केली पाहिजे,प्रतापराव पवार यासारख्याच काम हे खूप अवघड नाही,ते कुणीही दुसरा करू शकतो,कारण प्रवाहाबरोबर जावून,सरकार वर टीका न करता,हांजी -हांजी करून खूप काही करता येईल,पण सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध,प्रस्थापिता विरूद्ध,जे हजारो कोटींचे मालक आहेत असे साखर सम्राट,दुध सम्राट यांच्या विरूद्ध अखंड लढा उभा करणं,ते हि पैसा ,गोड फाठेर कुणी हि नसताना,निसस्वार्थी पने, हे धाडस करणं हे खूप दुर्मिळ काम आहे,याचा संबध लाखो-करोडो कोलांशी ,त्यांच्या कुतुम्बाश्च्या अर्थकारणाशी निगडीत आहे ,पूर्ण महाराष्ट्रात ल्या बळीराज्याचा विचार करणारा,उस आणि दुध उत्पादक साठी साठी प्रसंगी रक्त सांडणारा,खर्या अर्थानं लोकशाही बळकट करणारा राजू शेट्टी नक्कीच विरळा आणि या सगळ्यात ज्यास्त हिम्मतीचा आणि मोठ्या उंचीवर आहे, कारण बरेच जन आपला जीव सांभाळून लिखाण,कोणताही काम करतात ,पण या माणसानं मरेपर्यंत मार खाल्ला,कितेकदा जीव धोक्यात घातला,संपूर्ण कुटुंब धोक्यात आल तरी! कारण त्यांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं होते,त्यांच्या वर्षानुवर्षे बिनदिक्कत चाललेल्या दुकान दारीला इतका मोठ्ठा धक्का दिला,शेत्कारायचा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्ठ्या प्रमाणात एकत्र केलं होते,त्यांना कसा फसवलं जातंय ते पटवून दिलं,त्य्नाचे हक्क त्यांना समजून सांगितले,अनेक मोठ-मोठी आमिषे लाथाडली,कोणत्याही पक्ष्यात उडी मारली नाही,किती हि दबाव आला तरी,हे सगळं करताना त्यांना किती दबाव,अन्याय,त्रास सहन करावा लागला असेल,त्याची कल्पना पण काही लोक नाही करू शकत,कारण आज काल १०० तले ९५ लोकांना काही लाख-करोडे दिले कि एका रात्रीत सरास विकले जात्तात, त्यामुळे या परिस्थितीत फक्त लोकांच्या वर्गणी तून आमदार झालेल्या (असा प्रयोग भारता मध्ये पहिलाच असेल,ज्यासाठी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी त्यांचा सत्कार केला ) आणि आज हि ५ वर्षे आमदार म्हणून अभूत पूर्व,भ्रष्टाचार विरहीत काम केल्यानंतर,पुन्हा एकदा लोकांनी दिलेल्या वर्गणीतून खासदार झालेल्या हा माणूस एका सध्या ,सामान्य शेतकरी म्हणून जगतोय,कोणताही मोठ्ठा बडेजाव,अभी मान,गर्व नाही, गाडी देखील लोकांनी भेट दिलेली,आमदार होण्या पूर्वीच्याच जुन्या कौलारू घरात हा माणूस अजून राहतोय,कोणतीही जमीन,बंगला खरेदी नाही (कुणीही जावून चौकशी करावी) ,वृत्तपत्र देखील म्हणावीशी तेवढी दाखल घेताना दिसत नाही,कारण पेड नुय्स chya या जगात हा माणूस अजून फाटकाच आहे,अन तोही फक्त फाटक्या आणि करपलेल्या चेहरयाच्या पण स्वाभिमानी शेतकऱ्याच्या पाठींब्यावर !

अनिल : भावणा पोचल्या!

श्री सुरेश खोपडे साहेबांबद्दल अजुन सविस्तर माहिती साठी खालील लिंक पहा.
http://sureshkhopade.com/index.html

त्यांचे नवी दिशा हे पुस्तक वाचायलाच हवे!

वा.. नक्की वाचायला हवं हे पुस्तकं..
चिन्मय, प्रस्तावना छान आहे. चिन्मय, आर्फी, श्रध्दा आभार. Happy

सुंदर लेख. पोपटराव पवारांबद्दल माहीत नव्हतं...ग्रेट काम केलंय त्यांनी.

रच्याकने यूनिक फीचर्स म्हणजे कोण?

'खरेखुरे आयडॉल्स'चा दुसरा भागही आला आहे.
(आणि आता तिसर्‍या भागाचं काम सुरू आहे. त्याच्या संपादनकामात माझा थोडाफार सहभाग आहे. Happy )

बाय द वे,अक्षरवार्ता उपक्रम मी मिस्स करतेय खूप.

(अवांतर - सनव, हे पाहा - युनिक फीचर्स.
गेल्या वर्षी अनुभवच्या अंकात युनिक फीचर्सच्या वाटचालीवरचे असे १० लेख प्रकाशित झाले आहेत.)

Pages