लहान असतात मुलं तेव्हा

Submitted by abhishruti on 27 March, 2024 - 21:14

लहान असतात मुलं तेव्हाच
त्यांना कुरवाळून, जोजवून घ्यावं
लहान असतात मुलं तेव्हाच
त्यांचे भरपूर पापे घ्यावेत

लहान असतात मुलं तेव्हाच
त्यांना धाक दाखवावा, ओरडावं
त्यांना भीती घालावी
लहान असतात मुलं तेव्हाच
त्यांचा अभ्यास घ्यावा, एखादी चापटी मारावी
पाढेपरवचा एकत्र बसून म्हणावी

लहान असतात मुलं तेव्हाच
फालतू पांचट जोक्स वर खळखळून हसावं
आपलं पटवून देताना वाद घालत बसावं
लहान असतात मुलं तेव्हाच
त्यांना कुशीत घ्यावं, त्यांच्याशी खेळावं
त्यांची समजूत काढावी
लहान असतात मुलं तेव्हाच
त्यांच्याबरोबर पोssटभर बोलून घ्यावं

मोठी झाली की ती सापडत नाहीत हातात
हाकेच्या, स्पर्शाच्या पलीकडे वस्ती करतात
आभासी जगात क्षणभर स्क्रीनवर दिसतात
पण समुद्राच्या वाळूसारखी निसटून जातात

आणि
समजा चुकून सापडलीच हातात
तर ती पूर्णपणे आपली नसतात

--- अभिश्रुती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अपत्य वाढीच्या, प्रत्येक स्टेजचा आपला चार्म असतो.
बाळाचे, पापे घेता येतात तो टप्पा लोभस असतो. तर पिलाच्या, पंखात बळ आलेला टप्पा पालकांकरता खूप अभिमानाचा असतो.

जमली आहे कविता, पुढची कडवी अशी असतील तर? Happy

मुलं मोठी होतात तेव्हा
त्यांचे विश्व समजून घ्यावे लागते
त्यांच्या स्क्रिनमधले रंग
आपणच ओळखावे लागतात
त्यांच्या भाषेतले न्युआन्सेस
समजून घ्यावे लागतात

मुलं मोठी होतात तेव्हा
आपले अवकाश विस्तारावे लागते
त्यांच्या वागण्यामागचा अर्थ
समजून घ्यावा लागतो
देहबोलीतून त्यांच्या विचारांना
कळून घ्यावे लागते

अन हे सगळे करता करता
आपसुक बंध जुळत जातात
एकमेक भाषा, संवाद
जुळत, वाढत जातात
हरवली वाटणारी आपलीच मुलं
हलकेच सापडत जातात
अन ही सापडलेली मुलं मग
अज्जिबातच हरवत नाहीत
Happy

Awal+1. Esp when they take good responsible decisions on their own and you feel an inner glow.

कविता छान आहे.

अवल छान भर घातलीत. Happy
मूठ आवळली नाही तर वाळु निसटत नाही यापेक्षा अधिक छान मांडलत.

कविता छान आहे
अवल छान भर घातलीत +१

छान कविता , अवल यांची पुरवणी कविता ही मस्त !! एकाच गोष्टींकडे बघण्याचा दोन व्यक्तींचा वेगवेगळा दृष्टिकोन समजला .

हे सगळं च्या सगळं वेळेत केले तरी मुल मोठी होतातच. बहुतेक वेळा आई बाबां हुन मोठी, हुशार आणि कर्तबगार होतात.
आणि मग कवितेत म्हणलय तसं -
हाकेच्या, स्पर्शाच्या पलीकडे वस्ती करतात
आभासी जगात क्षणभर स्क्रीनवर दिसतात

ईतकी दुर जातात की आपल्या जगा बहेरच जगतात
आई बाप बिचारे दुरुनच पहातात

मुलं आनंदी असतात , आनंदाने जगतात
आई बाप मात्र लपवुन डोळे टिपतात,खोटे खोटेच हसतात.

अजय सरदेसाई (मेघ)

मूळ कविता छान आहे. अवलताईची बाजूही आवडली, कारण कालचक्राच्या गतीशी सुसंगत तरीही सकारात्मक स्विकार असलेली वाटली. स्वतंत्र जीव आहेत ती, स्वतंत्रच व्हायला हवीत.
सामो +१

छान आहे कविता..

मला वाटते मुले करीअर मुळे जास्त दूर जात नसावेत, जितके लग्न झाले की जात असावेत.
आधी ते आपल्या आईवडीलांच्या कुटूंबाचा भाग असतात, लग्नानंतर त्यांच्यावर एका कुटुंबाची जबाबदारी येते.

धन्यवाद सर्वांना मनापासून .... कवितेइतक्याच उस्फूर्त प्रतिक्रिया खूप दिवसांनी मिळाल्या... भारी वाटलं!! अवल, तुमची पुरवणी छानच!
ऋन्मेष, तुला बरोब्बर कळलं मला काय म्हणायचय ते!
मुलं लहान असतात तेव्हा ती, पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतात म्हणून असेल कदाचित, आपल्याच भोवती असतात आणि एकदा एकेकटी बाहेर पडू लागली की त्यांचं जग विस्तारत, प्रभाव पाडायला बरेच घटक असतात.... आणि हे नैसर्गिक आहे. यात कसलीही तक्रार नाही. पण एका आईला जाणवतंच ना की आता पूर्वीसारखा हक्क राहिला नाही, पूर्वीसारखा आपल्याला वेळ देणार नाही. तक्रार नाहीच पण....