सुदूर अंतस्थ
एका वर्षात चार बहिणींना भेटायचा योग येणं ही केवळ किमया आहे.
आत्तापर्यंत ह्या चारही बहिणींबद्दल फक्त ऐकलं होतं पण त्या प्रत्यक्षात भेटतील इतक्या लवकर असं वाटलं नव्हतं..ह्या वर्षात ते दान पदरात पडलं हे विलक्षणच म्हणायचं..
जानेवारीमध्ये मध्यप्रदेशात नर्मदा भेटली.ओंकारेश्वराच्या कपारीतून तिचं धडकवणारं पण एकदा होडीत बसल्यावर शांत वाटणारं दर्शन झालं आणि दुसऱ्याच दिवशी नर्मदा जयंतीच्या पावन शुभ मुहूर्तावर माहेश्वरला तिचं शांत सौख्यपूर्ण दर्शन झालं. नर्मदेच्या दुसऱ्या तीरावर तिची साडी पसरुन पूजा चालली होती.नदीच्या साथीनं, तिच्या जीवावर वस्ती आणि संस्कृती वसवलेले आपण त्या ऋणातच राहणं इति मानतो तरीही एक छोटं आभारप्रदर्शन करतोच करतो. ते मावळतीच्या प्रकाशातलं सौम्य चमकणारं पाणी. नर्मदामैय्या म्हणून भक्तिभावानं हात जोडणारे लोक.आपण उगाच काळ काम वेगाची गणिते प्रत्यक्ष सोडवीत बसलो असा भाव मनात आला आणि त्या मावळतीच्या प्रकाशात सगळे हिशेब काही काळ विसरायला झाले.तिच्या त्या पाण्याकडे बघत रहावं असं सौष्ठव..अहिल्याबाईंच्या किल्ल्यातून दिसणारी नर्मदामैय्या आणखी वेगळी..काहीतरी सुंदर होतं ते सगळं..ती संध्याकाळ विलक्षण वेगळी होती, कितीतरी काळ पुढे तीच सोनेरी नर्मदा मनात भेटत राहिली..मग वेगवेगळ्या ठिकाणी आपसूक भेटायला लागली.एखाद्या ठिकाणी जाऊन आलो की तिथल्या गोष्टी परिचित वाटायला लागतात, अगदी सहज तशी..
काही वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा पायी केल्याचं एकांकडून व्याख्यानात ऐकलं होतं,तो थरार,ती निष्ठा,ती जिद्द ती श्रद्धा! सगळं आठवलं..
महेश एलकुंचवार ह्यांच्या न गंगासदृश्याम तीर्थंम ह्या लेखातून नर्मदेची झालेली तोंड ओळख, एलकुंचवार लिहितात की शोणभद्र / सोनभद्र ह्या नदावर असणारं तिचं प्रेम, मग प्रेमभंग आणि म्हणून ती खडक फोडत वाहते आहे,ही कथा विलक्षण वाटली होतीच. काका काकू जबलपूरला होते तेंव्हा त्यांच्याकडून ऐकलेलं भेडाघाटचं थरारक वर्णन, मांडवगडमधून रुपमतीची तिला बघायची तळमळ!हे सगळं वाचलं होतं पण तिची भेट झाल्यावर अगदी आपलंसं वाटलं हे खरं!
आणि अचानक डिसेंबरमध्ये मोठ्या बहिणीनं आमंत्रण दिलं असावं आणि सगळ्या गोष्टी सहज जुळून आलं आणि निघाले.. तिची पहिली भेट त्रिवेणी संगमावर, बाकी दोघींबरोबर झाली. विस्तीर्ण , डोळ्यात चटकन मावणार नाही असा तो संगम, स्थलांतरित सिगल पक्षांची दादागिरी बघत बघत संगमापर्यंत गेलो, नाविकानं दोन्ही प्रवाह दाखवले, गंगेचा काहीसा पांढरेपणाकडे झुकणारा आणि यमुनेचे कृष्ण आणि पारदर्शक पाणी , तिथं हलत्या तरफ्यावर उभं राहून अलगद खाली पाच फुटांवर लेकाचा हात धरुन, पाण्यात तीन डुबक्या घेतल्या आणि परत होडीत येऊन बसले.ऊर धपापत होता, पाण्याचा रेटा होता की त्या तिघींचा जादुई स्पर्श की पाण्याचा थंडावा ,की दोन स्पष्ट नद्या आणि एकीचा आतून कळत नकळत जाणवणारा ओघ! काही क्षण शांत ,स्तब्ध गेले.दोन दिवस आधीपर्यंत न ठरलेली ही भेट काय वेगळं पांथेय देऊन गेली.दुसऱ्या दिवशी वारणसीमध्ये गंगा आरती बघितली, एका मोठ्या ,भल्या मोठ्या समुदायाकडून देवनदीची नव्हे तर मातेची आरती,भारुन गेलेलं, धुरकट वातावरण, देशी विदेशी विविध धागे मनात घेऊन आलेली, डोळे मिटून नव्हे तर उघडे ठेवून, डोळ्यात आणि कॅमेऱ्यात क्षण साठवत बसलेली माणसं, ती थंडी सगळं सगळं serene म्हणावं असं!
आणि तिसऱ्या दिवशी पहाटे पहाटेच काशी विश्वेश्वराचं मन भरुन दर्शन झालं आणि त्या कॉरिडॉरमधून घाटाच्या पायऱ्या उतरताना समोर होणारा सूर्योदय,गंगेच्या पाण्यावर हलणाऱ्या नावा आणि ते घट्ट धुकं दिसलं!ती जवळ जवळ नीरव शांतता.. निःशब्द व्हायला झालं.. कधीही न विसरता येणारे, आयुष्यभराचा खजिना देऊन गेलेले ते क्षण! आयुष्य काही काळासाठी थांबलंय ह्या ठिकाणी असं वाटणारे काही सुखाचे क्षण असतात त्यातले क्षण ..सुकून, tranquility, quietude, placidity असे मायबोलीतले नसलेले पण मदतीला आलेल्या शब्दांचे प्रत्यक्ष अनुभव!
दुपारी होडीतून अस्सी घाटापासून बघितलेले चौऱ्यांशी घाट.काहीतरी वेगळं होतं ते,गंगेच्या पाण्यात काहीतरी विलक्षण होतं पण काय समजत नाहीये अजूनही.. माझी खूप हिम्मत होत नव्हती.तिचं ते विशाल विस्तीर्ण रुप माझ्या छोट्या डोळ्यांत मावत नव्हतं..डोळे पुनःपुन्हा मिटत होते. एलकुंचवार लिहतात तसं आत्मभान असणारी स्त्री माझ्या डोळ्यांना पेलवत नव्हती..कधी नतमस्तक होऊन दिपले जात होते, कधी खूप मोठ्या श्रद्धेय व्यक्तीच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही तसं काहीसं होत होतं..तिचं ते घरंदाज, समृद्ध तर काही घाटांपाशी विरक्त असणं सगळं अजब! काही ठिकाणी स्वच्छ नितळ तर काही ठिकाणी पाण्यात मिसळली गेलेली घाटावरची राख सगळं समान स्वीकारणारी ती समजूतदार,पोक्त!
होडी चालवणारा आकाश सहानी, धाकट्याच्या वयाचाचं होता, त्याला खूप माहिती होती घाटांची, गंगेची तिथल्या हवेची, पक्षांची आणि अतीव आपलेपणा होता.अगदी वाराणसी शब्दाच्या ( वरुण आणि अस्सी) उत्पत्तीपासून बनारसच्या मल्लाइय्योपर्यंत सगळं सांगण्यात रस होता..त्याच्या ह्या पिढीजात व्यवसायाबद्दल अभिमानही होता.
त्या दीड दोन तासात आकाशच्या साथीनं गंगा वेगवेगळ्या प्रकारे उलगडत चालली होती. आकाशनी सांगितलं की तो रोज पहाटे पाच वाजता येतो ते रात्रीपर्यंत लोकांना घाट दाखवत असतो. पण पहाटे आल्यावर आणि रात्री घरी जायच्या आधी गंगास्नान करतो, थंडी ऊन पावसाळा काही असलं तरी.."हलका लगता हैं" हे कारण सांगत असला तरी आतून त्याची श्रद्धा जाणवत राह्यली.घाटांवर असणाऱ्या हवेल्या, राजवाडे, देवळं ह्यांची त्याला यच्चयावत माहिती होती..महाराष्ट्रातून आलो आहेत म्हणल्यावर भोसले घाट आणि पेशव्यांनी बांधलेला गणेश घाट आवर्जून दाखवण्याचं कौशल्यही तो बाळगून होता.माझ्या धाकट्याला गंगा स्नान करण्यासाठी सुरक्षित जागा शोधणं,तिथे आधी काठी खाली रोवून खात्री करणं हे सगळं काळजीकाट्यानं करत होता.मुंबई पुण्याबद्दल विचारताना कुतूहल होतं पण हाव नव्हती. त्याच्या नजरेतून दिसणारी गंगामाई फार गोड होती,त्याच्या डोळ्यात व्यावसायिक भावना नव्हत्या.व्यवहार होडीत बसताना पूर्ण झाला होता पण आपल्या जवळचं काहीतरी सुंदर जडजवाहिर दाखवायचं आहे ह्या भावनेनं सातत्यानं रोज शंभरदा करत असलेलं काम तो नावीन्यानं करत होता.मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाटांवर धडाडून पेटलेल्या चितांना प्रत्येक वेळी नमस्कार करत होता..
घाटाघाटांवर मंडळी स्नान करत होती,सिगल कलकलाट करत होते.पायऱ्या पायऱ्यांवर फोटो सेशन्स चालू होती..
अगर चाह बनारस देखने की हो तो मन गंगा होना चाहिए।दुसऱ्या बाजूला गोमती आहे आकाश नदीच्या वाळवंटाकडे बघून सांगत होता..
धाकटा मोठ्या लेन्समधून फोटो काढत होता आणि मी डोळ्यात साठवत गेले..
आकाशचा निरोप घेताना त्यानं खाली वाकून नमस्कार केला आणि उगाच गलबलून आलं!
परत आले तरी एक हुरहूर राहिली गंगेला पुनः भेटण्याची .. भीड चेपली आहे थोडी थोडी असं वाटतंय, पुढच्या वेळी ती जरा जास्त उमजेल, उलगडेल का!
ज्येष्ठ लेखक आणि कवी शांताराम आठवले ह्यांनी लिहिलं आहे की हिंदू धर्मात तीन 'ग'कार फार महत्त्वाचे आहेत गाय, गीता आणि गंगा!त्यांच्या ह्या शब्दांचे अर्थ थोडे लागावेत इतपत पाणी वाहून गेलंय पुलाखालून!
गंगा लहरीबद्दल नुकतंच वाचलं आणि ऐकलं.एका मुलानं आपल्या आईकडे आपल्या चुकांची कबुली द्यावी तशी जगन्नाथ पंडितांनी गंगामातेकडे केलेली कबुली आणि गंगेनी आपल्याला मुक्ती द्यावी अशी केलेली आर्त याचना, त्यातलं गंगेचं रसभरीत वर्णन, तिच्या गुणांचं वर्णन, गंगा आणि गौरी ह्या दोघींच्यातली नोंकझोंक आणि शेवटी आईनं त्यांना आपल्याला माफ करावं ह्यासाठी मनधरणी आणि तिनं सामावून घेणं हे सगळं फार वेगळं आहे. प्रत्येक श्लोकासरशी एकेक पायरी वर येणारी गंगा, बावन्नाव्या श्लोकांनंतर आपल्या लेकराला पोटाशी धरते,ही सत्यकथा, कविकल्पना काही असो फार विलक्षण आहे..बावन्न पायऱ्यांचा जगन्नाथ घाट साक्षीदार असणार आहे अशा प्रतिभेला आणि त्याला दाद आणि शरण देणाऱ्या मातेला..
कित्येक वर्षांनी खरी नदी इतकी जवळून बघितली.
हिंगण्याच्या शेतात मुठा नदीला फारा वर्षांपूर्वी कडकडून भेटले आहे,आता पुण्यात पावसाळ्यात एकदोनदा दिसते तशी! नवरा कोल्हापूरचा आहे त्यामुळे पंचगंगा पात्राबाहेर आली अशा बातम्यांवर नजर ठेवून असतो.त्याच्या मूळ गावाशी त्याला जोडून ठेवणारा धागा आहे तो.कृष्णाबाईच्या उत्सवाचं रसाळ वर्णन मैत्रिणीकडून ऐकलंय.कुठंही नदी दिसली तर हात जोडून डोळे मिटणारे ,नारळी पौर्णिमेला पुण्याला कुठला समुद्र म्हणून मुळा मुठा संगमावर मुद्दाम नेणारे बापू आणि त्यामुळे
नदीला आई मानणारं भारतीय मन आपलं..नदी दिसली की आपसूक हात जोडले जातात, डोळे मिटतात,इथे तर साक्षात गंगामैय्या!
गंगेला भेटायला जाताना आईची आठवण न राहवून येत होती.आई काही फार फिरली नव्हती.बेळगावला माहेरी, किंवा मामाकडे दौंड सोलापूर ह्यापलीकडे तिची मजल जायची नाही.त्याकाळी प्रवासाची माध्यमं कमी, प्रवासाचा खर्च म्हणजे वायफळ वाटण्याचे दिवस होते ते.बापूंना सवड व्हायची नाही आणि एकत्र कुटुंबाच्या घमासणात तिला प्रवास जमलाच नाही. पण त्याची भरपाई म्हणून की काय, बापूंनी त्यांना प्रेस क्लब कडून आमंत्रण आल्यावर तिचा खर्च स्वतः करुन युरोपला नेलं पण ती चेष्टेनं त्यांना तुम्ही आल्प्स दाखवलात पण महाबळेश्वर नाही असं म्हणायची,
पण तिला वाराणसीला काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायची इच्छा होती असं मला वाटतं कारण तिनं माझ्या भावाला तो त्याच्यात एका चित्रीकरणा निमित्त काशी बघून आल्यावर विचारलं होतं आणि त्याबरोबर गंगेबद्दल..पण कोणाला काही सांगण्याचा आणि अट्टाहास करण्याचा तिचा स्वभाव नव्हताच. आणि जेंव्हा सर्वार्थानं सवड झाली तेंव्हा तिची शारीर अवस्था नव्हती. त्यामुळे तिच्या हयातीत ही दोन्ही दर्शनं झाली नाहीत.मला त्या अर्थानं गंगेचं दर्शन घ्यायचं नव्हतं म्हणजे तिची इच्छा पूर्ण करतीये असं नाही पण तरीही तिची आठवण खूप झाली..तिला आवडली असती गंगा काठावरून बघायला.. बापूंनी मात्र डुबकी घेतली असती , होडीतून सगळं बघितलं असतं. आई निसर्गाच्या फार जवळ जायची नाही.जे निसर्गानं दूर ठेवलं आहे ते तसंच असावं हे तिचं मत! थोडं अंतर बाळगावं असं तिला वाटायचं.पण कामानिमित्त खूप फिरलेले बापू मुळात धाडसी, असलं काय काय ते करायचे! He always listened to his heart. ..तिचा जीव मात्र थोडा थोडा व्हायचा..पण नक्की गंगेचे घाट तिला फार आवडले असते.घाटाच्या पायऱ्यांवर बसली असती ,दुरुन न्याहाळत, तिच्या आवडत्या संस्कृत श्लोकांमधले काही म्हणत किंवा तिच्या आवडत्या ओळी गुणगुणत! कल्पनेनंसुद्धा तिला मानस गंगा दर्शन केल्याचं समाधान मिळालं.. गंगेला भेटायला जाताना तिचा खऱ्या मोत्यांच्या चौकडा घालून गेले..ह्या चौकड्याची एक गोष्ट आहे..आईकडे दोन कुड्यांचे जोड होते.त्यातला एक जोड गहाळ झाला,तिला फार रुखरुख लागली, आजीच्या कुड्या,तिच्या भाषेत 'चांगल्या खऱ्या' मोत्यांच्या.. काही दिवसांनी त्या मला सापडल्या,एका छोट्या बटव्यात. पण कशाखाली तरी दबल्यामुळे एक कुडी मोडली होती,दोन चार मोतीही चेपून खराब झाले होते,हळहळली पण मग तिनं त्या दुरुस्त करुन आणून मला त्याचा चौकडा करुन दिला,बक्षीस म्हणून आणि माझ्या अत्यंत आवडत्या दागिन्यांपैकी एक आहे तो ,तर तो चौकडा घालून गेले..आई बरोबर असल्याचा एक आभास आणि समाधान.मला गंगा बघताना मुळीच रुखरुख नव्हती पण आईची आठवण होती बरोबर..तिचं शुद्ध सात्विक आचरण, विमळ मन, तिचं सम्यक वागणं आणि मूळ आत्यंतिक समाधान हे मनाच्या तळात होतं कुठंतरी.. देवनदीला नमस्कार करतानाही आई होती मनात..काळाच्या ओघात नैसर्गिकपणे लुप्त झालेली, शारीर दूर गेलेली पण तिचा प्रवाह तिच्या विचारांच्या रुपात,समाधानी,धारावाही स्वरुपात मजसमेत वाहतोय ह्या भावनेनं आलेली शांतता!
गंगेचं दर्शन फार वेगळं होतं, विस्मयकारक होतं. परत आल्यावर डोळे मिटले तरी पुनः पुन्हा डोळ्यासमोर उभं राहणारी तिची रुपं. भारताच्या उत्तर भागातली ती दक्षिणेकडे वाहताना वाराणसीला थबकून हिमालयाकडे वळून बघणारी, काही जणांच्या मते स्वतःकडे वळून बघणारी अशी ही उत्तरवाहिनी परत पूर्वेकडे वळणारी,सगळं सगळं समेटून घेणारी धीरगंभीर गंगा
,भूमिगत असून प्रवाहमान सरस्वती, आपल्या विस्तीर्ण प्रवाहासकट गंगेत मिसळून जाणारी यमुना आणि त्यांची तितकीच गुणी बहीण नर्मदा, ह्या सगळ्यांनी मला ह्या वर्षी वेगळ्या अर्थानं किती समृद्ध केलं..ह्या निमित्तानं वेगळं वाचलं ,ऐकलं, बघितलं वेगळा स्पर्श झाला. भौगोलिक अंतरामुळे नेहमी भेटणार नाहीयेत ह्याची कल्पना आहे पण त्यांनी दिलेलं पांथेय फार लांबवर पुरणार आहे..
ह्या चारही बहिणी आणि आई सुदूर आणि अंतस्थ!सुदूर तरीही अंतस्थ!ज्येष्ठागौरी
सुदूर अंतस्थ
Submitted by ज्येष्ठागौरी on 22 December, 2023 - 23:16
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कसलं भारी लिहिलंय..
कसलं भारी लिहिलंय..
आई ची नर्मदा परिक्रमा झाल्यापासून (वर्णन ऐकून) तिथे जाण्याची ओढ लागली आहे..
पण गंगा पाहायला जावं असं पहिल्यांदाच वाटल आयुष्यात, तुमचं स्फुट वाचून!
फार छान लिहीलं आहे. आई
फार छान लिहीलं आहे. आई-वडिलांबरोबर एकदा वाराणसीचं दर्शन घडावं, अशी फार इच्छा आहे. बघूया योग येतो का ते.
नानबा मनापासून धन्यवाद!
नानबा मनापासून धन्यवाद!
अनया धन्यवाद जरुर जमेल
अनया धन्यवाद जरुर जमेल तुम्हांला, लवकर योग्य येऊ देत!
फारच छान लिहिले आहे . काशी ला
फारच छान लिहिले आहे . काशी ला मनापासून जायचे आहे वडिलांना घेऊन . त्यांचे वय ८१ आहे . त्या दृष्टीने देऊळ , घाट फिरणे एवढेच करायचे आहे . चालणे वगैरे फार आहे का ? तुम्ही बुकिंग कुठून केले होते ? टूर्स ची चौकशी केली तर काशी, गया, अयोध्या अशाच trips आहेत. तिकडचे कोणी भरवशाचे ओळखीचे असतील तर बरे म्हणून विचारते आहे.
अश्विनी आमचं आम्ही बुकिंग
अश्विनी आमचं आम्ही बुकिंग केलं होतं पण बरोबर ज्येष्ठ व्यक्ती असल्यानं कोणाची तरी मदत घ्यावी हे उत्तम कारण देवळात महान गर्दी असते आणि आपल्याकडे लोकांना धक्काबुक्की करण्यात फार धन्यता वाटते..तीन दिवस असतील तर उत्तम ,निवांत बघता येईल.दशाश्वमेघ घाटापाशी wheelchair facility भरपूर वापरताना दिसलं..अलकन्नदा नावाची क्रूज आहे बघण्यासाठी, मी फार आयत्यावेळी गेल्याने ती मिळाली नाही..जानेवारी फेब्रुवारी टाळावा असं लोकांचं मत आहे..
धन्यवाद सविस्तर
धन्यवाद सविस्तर प्रतिसादाबद्दल . जानेवारीत जायचा विचार होता . जानेवारी/फेब्रुवारी टाळण्याचे कारण कळू शकेल का ? राम मंदिराचा कार्यक्रम ?
खूप सुंदर लिहीलंय! १५
खूप सुंदर लिहीलंय! १५ वर्षांपूर्वी अनुभवलेली ऋषीक्शची गंगारती आजही मनात घर करून आहे
अश्विनी, माघ स्नानासाठी गर्दी
अश्विनी, माघ स्नानासाठी गर्दी असते असं समजलं आहे पण तरीही कोणी जाणकार असेल तिथे तर विचारा..
अश्विनी, माघ स्नानासाठी गर्दी
अश्विनी, माघ स्नानासाठी गर्दी असते असं एका नातेवाईकांकडून समजलं आहे पण तरीही कोणी जाणकार असेल तिथे तर विचारा..गर्दी आणि थंडी पण तरी मला अजून काही समजलं तर कळवते..
सुंदर लिहिलयं !
सुंदर लिहिलयं !
धन्यवाद !! गर्दी टाळून जावे
धन्यवाद !! गर्दी टाळून जावे लागणार आहे . पुढचेच ठरविन मग.
अश्विनी मी जरा शोध घेतला तर
अश्विनी मी जरा शोध घेतला तर ह्या वर्षी माघ पुढे आहे फेब्रुवारीत, आणि जानेवारीत हवा गार पण चांगली असते असं कळलं! ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनाची व्यवस्था उत्तर प्रदेश सरकार करत असतं अशी माहिती मिळाली..प्रयागराजला पण खूप गर्दी असते माघात असं कळलं..तुमचं दर्शन लवकर आणि छान होऊ देत!
आपण उगाच काळ काम वेगाची गणिते
आपण उगाच काळ काम वेगाची गणिते प्रत्यक्ष सोडवीत बसलो असा भाव मनात आला आणि त्या मावळतीच्या प्रकाशात सगळे हिशेब काही काळ विसरायला झाले.तिच्या त्या पाण्याकडे बघत रहावं असं सौष्ठव..अहिल्याबाईंच्या किल्ल्यातून दिसणारी नर्मदामैय्या आणखी वेगळी..काहीतरी सुंदर होतं ते सगळं..ती संध्याकाळ विलक्षण वेगळी होती, >>हे फार भावलं. कैक वर्षापूर्वी हिमालयात Valley of Flowers ट्रेकला भेटलेली दूधासारखी शुभ्र अलकनंदा अजून मनात ठसलेय. तिच खाली हरिव्दारला भेटली गंगेच्या रूपात..पण अजिबात भावली नव्हती.
सुंदर लिहिलं आहे. फार भावले.
सुंदर लिहिलं आहे. फार भावले.
अमितव आणि रायगड मनापासून
अमितव आणि रायगड मनापासून धन्यवाद!
फारच सुंदर लिहिलं आहे
फारच सुंदर लिहिलं आहे
तुमचं लिखाण आवडत. मनभावन असत.
महेश्वर ल जाणार आहे आणि त्यातच हा लेख वाचला. धन्यवाद
फारच सुंदर लिहिलं आहे.
फारच सुंदर लिहिलं आहे.
खूप छान. तुमचे लिखाण वाचून
खूप छान. तुमचे लिखाण वाचून नेहमी थंडावा मिळतो. शीतलता, गारवा.
खूप सुंदर लिहिलं आहे!
खूप सुंदर लिहिलं आहे!
मलाही नद्या 'बघायला' किंवा नद्यांना 'भेटायला' फार आवडतं. प्रत्येक नदीला आपपलं एक व्यक्तिमत्त्व आहे असं वाटतं. देशविदेशातल्या नद्या त्यांच्या प्रदेशातल्या माणसांसारख्याच व्यक्तीमत्त्वाच्या भासतात किंवा मग त्या नद्यांच्या तश्या व्यक्तिमत्त्वामुळे माणसही तशी होतात, काय माहित!
खुप खुप छान, पुन्हा पुन्हा
खुप खुप छान, पुन्हा पुन्हा वाचावं असं लेखन.
सामो, पराग आणि आबा मनापासून
सामो, पराग आणि आबा मनापासून धन्यवाद..
नदी आणि तिथल्या माणसांचा
नदी आणि तिथल्या माणसांचा स्वभाव हे जरा निरखून बघावं लागेल.तिथली भेटलेली माणसं म्हणजे रिक्शा चालवणारे, दुकानदार जास्त ' तयारीची' वाटली, कदाचित मुख्य व्यवसाय पर्यटन आणि बाकी exposure कमी म्हणून असेल पण एवढ्या भीषण ट्रॅफिक मध्येही भांडत बसत नाहीत त्यामुळे गोडवा असावा!