Roger and Me

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

हा मूळ लेख ३१ ऑक्टो. २००६ ला लिहिला होता, आज फक्त नव्या रंगबिरंगीत टाकत आहे...
हा मायकेल मूर चा चित्रपट पाहिला. फ्लिंट या मिशिगन मधल्या गावी GM (जनरल मोटर्स) चे सुरुवातीचे काही प्लांट होते. हे डेट्रॉईट जवळचे गाव म्हणजे साधारण आपल्या जमशेदपूर सारखे एका कंपनीच्या प्लांट्सच्या आजूबाजूला वसलेले असावे. GM ने ते प्लांट बंद केल्यावर त्या गावावर जी अवकळा आली त्याचे चित्रण केलेले आहे. बरेचसे लोक ते गाव सोडून निघून गेले, स्थानिक महापालिकेने काही रोजगार निर्मितीचे असफल प्रयत्न केले वगैरे.

तर मायकेल मूर चा यात प्रयत्न असा की GM चा त्यावेळचा अध्यक्ष रॉजर स्मिथ त्याला या गावात आणून तेथील अवस्था दाखवायची. त्याला त्यात यश येत नाही. आधी तो बरेच प्रयत्न करूनही भेटत नाही आणि शेवटी भेटतो पण फ्लिंट मधे यायला तयार होत नाही.

हे दाखवताना कम्पनीचा वरिष्ठ अधिकारीवर्ग व त्यांचे कुटुम्बिय यांची सुखवस्तू राहणी व गावातील कामगारांवर आलेली अवस्था यातील विरोधाभास छान घेतलेला आहे. गोल्फ खेळणारे, कंट्री क्लब मधे जाणारे अधिकारी व भाडे न भरता आल्याने घर सोडावे लागणारी कुटुम्बे. सगळ्यात सुंदर घेतलेला शॉट म्हणजे त्या रॉजर चे ख्रिसमस चे भाषण आणि त्याच काही दिवसांत सगळे सामान रस्त्यावर टाकून ते हलवायला ट्रक मिळण्याची वाट बघत बसलेली कुटुम्बे. लोकांना ब्रेड मिळत नाही तर केक खा म्हणणारी ती युरोप मधली राणी आठवते.

फक्त यात एक मला जाणवले ते म्हणजे पूर्वीच्या हिंदी चित्रपटांप्रमाणे यात 'मेहनतवाले आणि दौलतवाले' हा टोन दिसतो. तिथे ज्याप्रमाणे सर्व पैसेवाले चोर आहेत असा समज असतो तसेच काहीसे आहे. त्या रॉजर ला त्या बाबतीत पूर्ण जबाबदार धरलेले दिसते. वास्तविक आता या विषयावर (एकूणच पब्लिक कम्पन्या कशा चालतात) जरा जास्त माहिती झाल्यावर हे वाटते तितके सोपे नाही हे जाणवते. कम्पनीचा अध्यक्ष ( CEO ला चपखल मराठी शब्द सापडत नाही) हा म्हणजे कोणीतरी कम्पनी च्या बाबतीत सर्व अधिकार असणारा व कोणालाच बांधील (उत्तरदायी) नसणारा असतो असे चित्र यातून उभे राहते. वास्तविक CEO ला कम्पनीच्या बोर्ड च्या सदस्यांना काही गोष्टी करूनच दाखवाव्या लागतात. तर बोर्ड मेम्बर हे कम्पनीच्या प्रमूख भागधारकांना बांधील असतात व ते भागधारक म्हणजे financial institutes हे त्यांच्या सभासदांना. आणि यात ते कामगार ही आले कारण बर्‍याच जणांचे 401K किंवा पेन्शन वगैरे त्यावरच अवलंबून असते.

आता इथे त्या अधिकार्‍यांची तरफदारी करण्याचा उद्देश नाही, आणि कदाचित जे खर्च कमी करण्याचे टार्गेट होते ते इतर मार्गांनीही करता आले असते, पण भागधारक बोर्ड वर प्रेशर आणणार, बोर्ड CEO ला खर्च कमी किंवा फायदा वाढवायला लावणार आणि तो मिळेल त्या मार्गाने ते करणार या सर्व साखळीत सामान्य कामगार भरडून निघतो हे खरे असले तरी हा केवळ एका अध्यक्षाला त्यात दोषी धरून सुटणारा प्रश्न नाही असे वाटते.

पण या एकदम वेगळ्या विषयावर हा चित्रपट घेतलेला आहे. अवश्य बघण्यासारखा आहे.

टीप्: यावर अधिक माहिती वाचली तेव्हा असे कळले की काही गोष्टी ज्याप्रमाणे घडल्या त्या क्रमाने दाखवलेल्या नाहीत, पण तसे असले तरी त्याने चित्रपट चुकीचा ठरत नाही जरी ही Documentary असली तरी.

विषय: 
प्रकार: 

CEO- मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी