भेट- भाग ३

Submitted by केजो on 1 November, 2023 - 20:23

"उतरतेस का? पोचलो आपण.."
"अरे हो, कळलंच नाही."
पुन्हा त्याच्या खांद्याचा आधार घेत ती पटकन उतरली. बाईक पार्क करून, हेल्मेट नीट ठेवून तो सवयीने कपाळावरून हात फिरवत आला. केस होते तेव्हा अशीच झुल्फ मागे करायचा हेल्मेट काढलं की, ते आठवून तिला हसायला आलं. आता डोक्यावर पूर्ण चमन-गोटा होता!
"हसा मॅडम, वय झालं माझं आता. तू अजूनही तशीच दिसतेयेस पण! थोडीशी लठ्ठ झालीयेस, पण बाकी काहीच फरक नाही."
"बस काय, पन्नाशी आली आता. किती खेचशील? बरं चल तिकडे एक बेंच मोकळा दिसतोय, कोणी यायच्या आधी जाऊन बसुया."
थोड्याशा आडोशाला असलेल्या बेंचवर, एकमेकांमध्ये पुरेसं अंतर ठेवून दोघं स्थिरावले. समोरच्या तलावातलं पाणी सूर्यकिरणांनी चमकत होतं. लाटांवर आकाशातली रंगपंचमी उतरली होती. आणि मंद वाऱ्यांनी तिच्या बटा डोळ्यांवर येत होत्या.
"कधीपर्यंत आहेस, पुण्यात?"
" ह्या रविवारी परत..."
"मुलं कशी आहे? आता तुझी मुलं तुझ्यापेक्षाही उंच झालीयेत ना?"
"हो ना, जिराफ झालीयेत दोघंही! तुझी मुलगी कशी आहे?"
"मस्त! बास्केटबॉल शिवाय काहीच सुचत नाही तिला. अभ्यास ऑप्शनलाच टाकलाय!"
"तुझ्यासारखाच! तुझं काय वाईट झालं? तिचंही छान होईल सगळं"
"आपला काळ वेगळा होता. आता कित्ती कॉम्पिटिशन वाढलीये. पण खरंय, होईल सगळं छान. आतापासून काय विचार करायचा, करेल तीही वेळ आली की."
इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर पुढे काय बोलायचं हे त्याला कळतच नव्हतं. आज तिचा मूड काहीतरी वेगळाच आहे एवढा अंदाज आला होता. पन्नाशीतही खरंच किती सुंदर दिसतेय ही! म्हणजे असे मेकपचे थर नाहीत, उगाच केस रंगवलेले नाहीत. साधी-सोज्वळ आणि स्वतंत्र विचारांच्या बाण्याने थोडीशी कठोर वाटणारी. बरीचशी हळवी आणि ठार वेडी! पाऊस म्हंटलं की जिथे असेल तिथे जाऊन चिंब भिजणारी, भेटायचं ठरलं की द्राविडी प्राणायम करून भेटणारी! ती लाटांकडे बघत विचारांची जुळवाजुळव करत असताना, त्याला पुढे सरकून तिचं डोकं खांदयावर ठेवून काहीच न बोलता शांतपणे बसून राहावंसं वाटत होतं.
शेवटी तिनंच त्याच्याकडे मान वेळावून बघितलं. तो तिचंच निरीक्षण करतोय हे बघून ती गोरी-मोरी झाली.
पण मग सावरून तिनी बोलायला सुरुवात केली.
"तुला खूप विचित्र वाटलं असेल ना असं एकट्यालाच भेटायला बोलावलं मी. आणि थँक्स की भेटायच्या आधी तू दहा हज्जार प्रश्न नाही विचारलेस!"
"बस काय! एवढी फॉर्मॅलिटी!", त्यानी रागावून बुक्का मारण्याची त्याची टिपिकल धमकी दिली.
तशी हसून तिनं बोलायला सुरुवात केली.
"News flash!! मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण प्लिज मध्ये थांबवू नकोस. तू काही बोलावंस अशी अपेक्षा नाहीये, पण फक्त ऐकून घे आज. नेहमी म्हणतोस ना की रागावणं सोडून दिलंयेस तू, ते आज लक्षात ठेव."
मग पुन्हा तलावाकडे बघत, त्याची नजर चुकवत तिनी जणू स्वगतच सुरु केलं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एवढा छोटा भाग....
काही हरकत नाही, उत्सुकता ताणली आहे छान....
५० शी आली की बऱ्याच राहून गेलेल्या गोष्टी कराव्याशा वाटतात, कुठेतरी व्यक्त व्हावंसं वाटण ही साहजिक आहे.
अनुभव शिदोरीला असल्याने मोकळं होताना चूका होणार नाही, कुणी दुखावणार नाही ह्याची खात्री असायला हवी.
ह्या गोष्टीतील तो आणि ती ओळखीचे वाटतात, बघुया कसे व्यक्त होतात आणि त्यांचं नात कस पुढे राहत