खरंतर रंगवायला दिली होती ती फक्त ओढणी. बाकी माझा पहनावा माझ्या आवडीचा, माझी ओळख सांगणाराच असायला हवा, नाही का? अगदी मोठ्या हट्टाने प्रियतमाच्या रंगात रंगवायला सांगितली होती. तेवढंच त्याला मोठेपणा दिल्यासारखंही होईल, चारचौघांत त्याची लाडकी म्हणून मिरवताही येईल, आणि माझी मी असताना वाटलं तर काढून बाजूला ठेवेन - अशी आपली माझी कल्पना!
पण जळलं मेलं लक्षण त्या रंगार्याचं आणि या कापडाचं! ओढणीवरचा त्याचा रंग नुसता कपड्यांवरच लागला नाही, तर
बघता बघता मी अंतर्बाह्य त्यात रंगून गेले! हा बसंती रंग असा पक्का बसला तनामनावर, की दुसरं काही दिसेसुचेनासं झालं!
तश्शी तरातरा गेले जाब मागायला रंगार्याकडे - तर तो उलट मलाच विचारायला लागला, 'कुठल्या रंगाबद्दल म्हणताहात?'!
म्हटलं, 'काय गांजाबिंजा चढवलास की काय! रंगांबद्दल मी तुला सांगायचं की तू मला?!
वेगवेगळ्या मोसमांत वेगवेगळे रंग ल्यायला किती आवडायचं मला! आणि आता बघ हे काय करून ठेवलंस! दिवस, मास, ऋतू बदलले तरी जाता जात नाहीये हा रंग! वेड लागायची पाळी आली आहे नुसती!
पण खरं सांगू, आता हाच रंग हवाहवासाही वाटतो आहे मला!
आता असं कर ना, याचाच आणखी एखादा थेंब प्रेमाने घाल तुझ्या त्या मिश्रणात, आणि माझं म्हणून जे काही उरलंसुरलं असेल नसेल तेही रंगवून काढ त्याच्या छटेत! घरदारच का, सारं चराचर, सार्या दिशा, सार्या मर्यादा, सारे अडसर, सारे यमनियम आणि देवधर्म, इह आणि परलोक, आसक्ती आणि तृप्ती, स्वप्नं आणि जागृती, मीलन आणि वियोग, सारं सारं माझ्या प्रियसख्याच्या रंगात न्हाऊन जाऊ दे!
मी भांडायला म्हणून आले आणि आता हे असं बोलते आहे म्हणून हसतोस मला? पण थांब, आधी सांग, तू कोण आहेस रंगरेज़ा? तुझा खरा रंग कुठला आहे? मला हा रंग आणि तू निराळे कसे ते सांगताच येत नाहीये बघ!
की तू, मी, माझा प्रियतम, आपण निराळे नाहीच आहोत? कधीच निराळे नव्हतो? ज्याच्या प्रेमात मी अशी वेडी झाले आहे तो तूच होतास? तूच रंगवणारा आणि तूच रंगही? तू शय्या, तूच सखा आणि तूच त्याच्यासह केलेला संगही? तूच प्रवाह, तूच नावाडी आणि तूच नावही? बुडायचं ते तुझ्यात आणि तरलं तर गाठायचा तो तुझाच किनारा? तूच वाट, तूच वाटाड्या, अन् पोचायचं ते तुझ्याचपाशी? तारणारा तूच, मारणारा तूच, निवाडा करणाराही तूच? तूच स्वामी, तूच गुरू? तूच पूर्व आणि पश्चिमही? मग तू नाहीस असं आता उरलंच काय? तुझ्याशिवाय मी जाणार तरी कुठे? आणि कुठे जायला मी उरलेच आहे कोण!’
कबीर असंच म्हणाला होता ना,
'जब मोरी चादर बन घर आई, रंगरेज को दिनी
ऐसा रंग रंगा रंगरे ने, लालो लाल कर दिनी
चदरिया झीनी झीनी॥'
तीच तऱ्हा
‘अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग।
मी-तू-पण गेले वाया। पाहतां पंढरीच्या राया॥’
म्हणणाऱ्या संत सोयराबाईंची!
देहभान हरपून केलेलं उत्कट प्रेम आणि भक्ती यांत फरक कुठे असतो नाहीतरी?
मोठमोठे योगी, पंडित, तत्त्वज्ञानी अद्वैताविषयी बोलतात, ‘ध्याता-ध्येय-ध्यान’ या त्रिपुटीच्या पल्याड पोचण्यासाठी धडपडतात. आणि कबीर म्हणतो तशी 'ढाई आखर प्रेम का' - ‘प्रेम’ ही अडीच अक्षरं ज्याला कळली त्याला क्षणार्धात ही ‘मी-तू-पणाची बोळवण’ साधते!
क्षणार्धात आणि विनासायास! ‘तादात्म्य’ असा एक फार सुंदर शब्द आहे त्याला!
ज्याप्रमाणे आपल्या दृष्टीला जगाचा अनुभव प्रकाशामुळे होतो, अगदी अंधाराचं वर्णनदेखील ‘प्रकाशाचा अभाव’ असंच - प्रकाशाच्या संदर्भानेच करावं लागतं, तसं प्रेमात/भक्तीत प्रिय व्यक्तीच्याच अनुषंगाने सगळ्या जगण्याचा अर्थ लागतो!
म्हणूनच आमचा ग़ालिब नवल करतो,
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद
फ़िर ये हंगामा ऐ ख़ुदा क्या है?!
क़ैसची गोष्ट ऐकली असेल तुम्ही. वाळवंटात सोडून आले होते बादशहाचे शिपाई त्याला! अन्नपाण्यावाचून फिरत होता रखरखाटात, पण त्याला ना तहानभुकेची तमा होती, ना उन्हाचे चटके जाणवत होते! एकच वेड होतं त्याला - लैलाचं. असा 'जुनून' डोक्यावर सवार झालेला म्हणून त्याला मजनू म्हणायला लागले लोक. लैला भेटायला आल्याचं कुणीसं सांगायला गेलं तर म्हणे हा म्हणाला, 'लैला? ती कशी येईल? ती तर माझ्यातच आहे! लैला तर मी आहे!'
असं वेड ज्यांना लागतं ते भाग्यवान, नाही का?!
**************************
तळटिपा:
'तनु वेड्स मनु' चित्रपटातल्या 'ऐ रंगरेज़ मेरे' गाण्याबद्दल लिहिण्याची मागणी अस्मिताने केली होती. मला कळला, जमला तसा भावानुवाद लिहिला आहे.
राजशेखर यांनी लिहिलेल्या, आणि कृष्णा सोलो यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचे शब्द आणि कठीण शब्दांचे अर्थ खाली देते आहे.
सादरीकरण मात्र वडाली बंधूंनी गायलेलंच ऐका अशी आवर्जून शिफारस करेन.
ऐ रंगरेज़ मेरे ऐ रंगरेज़ मेरे, ये बात बता रंगरेज़ मेरे
ये कौन से पानी में तूने कौन सा रंग घोला है
कि दिल बन गया सौदाई, मेरा बसंती चोला है
अब तुमसे क्या मैं शिकवा करूँ, मैनें ही कहा था ज़िद कर के
रंग दे चुनरी पी के रंग में, पर मुए कपास पे रंग न रुके
रंग इतना गहरा तेरा कि जान-ओ-जिगर तक भी रंग दे
रंगरेज़ तूने अफ़ीम क्या है खा ली, जो मुझसे तू ये पूछे कि कौन सा रंग
रंगों का कारोबार है तेरा! ये तू ही तो जाने कौन सा रंग!
मेरा बालम रंग, मेरा साजन रंग,
मेरा कातिक रंग, मेरा अगहन रंग
मेरा फ़ागुन रंग, मेरा सावन रंग
पल पल रंग दे रंग दे मेरे आठों पहर मन भावन रंग
एक बूँद इश्किया डाल कोई तू मेरे सातों समन्दर जाएँ रंग
मेरी हद भी रंग, सरहद भी रंग, बेहद रंग दे, अनहद भी रंग दे
मंदिर मस्जिद मैकद रंग दे!
रंगरेज़ मेरे दो घर क्यूँ रहें? एक ही रंग में दोनों घर रंग दे
पल-पल रंग दे रंग दे रंग दे रंग दे, नैहर-पीहर का आँगन रंग
पल-पल रंग दे रंग दे रंग दे मेरे आठों पहर मन भावन रंग
नींदें रंग दे, करवट भी रंग, ख़्वाबों पे पड़े सलवट भी रंग
ये तू ही है, हैरत रंग दे, आ दिल में समा, हसरत रंग दे
अब आजा और वसलत रंग दे, जो आ ना सके तो फ़ुरक़त रंग दे
दर्द-ए-हिज्रा लिए दिल में मैं ज़िंदा रहूँ, ज़रूरत रंग दे
रंगरेज़ मेरे, रंगरेज़ मेरे, तेरा क्या है असल रंग?
अब तो ये दिखला दे!
मेरा पिया भी तू, मेरी सेज भी तू, मेरा रंग भी तू, रंगरेज़ भी तू
मेरी नैया भी तू, मझधार भी, तुझमें उभरूँ, तुझमें डूबूँ
तेरी हर इक बात सर आँखों पे, मेरा मालिक तू मेरा साहिब तू
मेरी जाँ मेरी जाँ तेरे हाथों में! मेरा कातिल तू मेरा मुंसिब तू
तेरे बिना कुछ सूझे ना! तेरे बिना कुछ सूझे ना!
मेरी राह भी तू, मेरा रहबर तू, मेरा अकबर तू, सर्वर भी तू
मेरा मग़रिब तू, मेरा मशरिक़ तू, जाहिद भी मेरा, मुर्शिद भी तू
अब तेरे बिना मैं जाऊँ कहाँ? तेरे बिना मैं जाऊँ कहाँ??
रंगरेज : कापड रंगवणारा (dye करून देणारा) रंगारी
सौदाई : वेडा (आणखी एक अर्थ व्यापारी असाही आहे, पण इथे contextनुसार हा अर्थ लागू होतो)
बसंती : साधारणपणे पिवळ्या झेंडूच्या फुलाचा असतो तसा रंग. अगदी केशरी-भगवा नाही, आणि पार पिवळाही नाही. दोन्हीच्या मधली छटा.
भगवं वस्त्र जसं आपण वैराग्याचं प्रतीक समजतो तसाच एखादा ध्यास लागून त्यापायी बाकी सगळं जग विसरणार्यांनी 'बसंती चोला' परिधान केला आहे असं म्हणतात. शहीद भगतसिंगांची 'मेरा रंग दे बसंती चोला, माये' ही रचना आठवते ना?
शिकवा : तक्रार
मुए : कलमुहा - ‘काळतोंड्या’सारखी शिवी
कपास : कापूस / सूत
कातिक : कार्तिक, अगहन : अग्रहायण (मार्गशीर्ष), फागुन : फाल्गुन, सावन : श्रावण हे महिने
इश्किया : प्रेमाखातर (in the name of / for the sake of love)
हद : मर्यादा, सरहद : सीमारेषा, बेहद : अमर्याद, अनहद : अपार
मयक़द/मयक़दा : मद्यशाला
नैहर-पीहर : माहेर-सासर
करवट : कूस बदलणे, स(सि)लवट : चुणी
हैरत : नवल (sense of wonder), हसरत : इच्छा
वसलत : भेट / मीलन, फ़ुरक़त : ताटातूट, फारकत
हिज्र : विरह
मझधार : नदीच्या पात्राच्या मध्यातला वेगवान प्रवाह (काठापाशी प्रवाहाचा वेग कमी असतो)
क़ातिल : मारेकरी, मुन्सिफ़ : न्यायाधीश
रहबर : वाटाड्या, अकबर : थोर नेता, सर्वर : तत्त्वज्ञ
मग़रिब : पश्चिम, मशरिक़ : पूर्व
जा़हिद : धर्मगुरू, मुर्शिद : गुरू
वाह! कमाल! खूप छान
वाह! कमाल!
खूप छान
Ecstatic to be the reason....
Ecstatic to be the reason....!
कलाकृतीच्या संपूर्ण झळाळीचा अंदाज यावा यासाठी 'पांढऱ्यावर काळं' करावंच लागतं. मी पण म्हटलं होतं नं
'राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे'. पसाऱ्याचं वर्णन करत राहिले की 'निरंजनाची' अनुभूती येते. ती जशीच्या तशी चिमटीत पकडून - त्यातून स्वतःला अलगद सोडवून, वाचकांपर्यंत ते पोचवणं. असं 'तेरे बिन खाली आजा खालीपनमें' सोपं नाही. हे लेखकाचं/तुझं श्रेय
'चादर झिणी झिणी' हे 'बरसे कम्बल भींजे पाणी' सारखं तांत्रिक साधनेतील पायऱ्यांवर रूपकात्मक लिहिल्यासारखं वाटलं. फक्त तत्त्वज्ञान नाही ते.
फार सुंदर रसग्रहण!!
फार सुंदर रसग्रहण!!
गाण्यापेक्षा रसग्रहण आवडलं. सगळे प्रतिसादही दाद देण्याजोगे आहेत..
छान लिहीले आहे
छान लिहीले आहे
हे गाणं इतकं नीट कधी ऐकले
हे गाणं इतकं नीट कधी ऐकले न्हवते.
खूप सुरेख गाणं आहे आणि रसग्रहण सुद्धा. धन्यवाद अस्मिता आणि स्वाती. खूप छान काही वाचायला दिलेत.
छान लिहिलं आहेस. सुरुवात
छान लिहिलं आहेस. सुरुवात वाचता वाचता मला जब मोरी चादर बन घर आई - हेच आठवत होतं, आणि तोच संदर्भ लगेचच पुढे आला हे बघून सुखावलो.
खाली दिलेला रेख्ता अत्यंत उपयोगी. शिकवा : तक्रार ने सुरुवात माझ्यासारख्या लोकांसाठी करावी लागते. "तुझ्याविना आयुष्यात कोणी शिकवायला नाही" असा अर्थ लावणारे लोक आम्ही (तेरे बिना जिंदगी से कोई).
>>>>>अतिशय सुंदर गाणं आणि
>>>>>अतिशय सुंदर गाणं आणि त्याच ताकदीने केलेलं रसग्रहण.
मनीमाऊ यांना +१. फार सुरेख केलय रसग्रहण. माझे आवडते गाणे आहे हे.
सर्व नवीन अभिप्रायदात्यांचे
सर्व नवीन अभिप्रायदात्यांचे आभार.
ह.पा., 'शिकवा' आणि 'रुसवा' हे दोन गनीम नवख्यांना हमखास चकवतात.
वा! खूप सुंदर लिहिलंय!
वा! खूप सुंदर लिहिलंय!
एक सुधारणा:
एक सुधारणा:
‘पीहर’ म्हणजेच नैहर म्हणजेच माहेर असं दुसऱ्या एका धाग्यावरील चर्चेतून समजलं. आता मला लेख संपादित करता येत नाहीये, पण लेखात मी दिलेला या शब्दाचा अर्थ चुकीचा होता.
नितांत सुंदर! मनापासून
नितांत सुंदर! मनापासून धन्यवाद.
गाणे कधी ऐकले नाही.आज त्या गाण्याचे शब्द वाचताना त्यांच्या प्रवाहीपणा आणि उत्कटतेमुळे अंगावर काटा आला.सावकाश ऐकेन.
वाहनांच्या मागे लिहिलेल्या
वाहनांच्या मागे लिहिलेल्या वाक्यांचा असाही उपयोग - वाचायचे राहून गेलेले सुंदर असे काही वाचायला मिळते
अगदी तरल लिहिलंय.
वडाली ब्रदर्सचं आणखी एक आवडणारं आणि याच अर्थाचं - छाप तिलक सब छिनी - https://www.youtube.com/watch?v=Bu9-fzhi7bQ
पण त्यांच्याहूनही जास्त आवडतं ते फना-फी-अल्लाह यांच सादरीकरण. ते योगायोगानेच मिळाले आणि भारीच आवडले - https://www.youtube.com/watch?v=0fOSWsdbNbk
कशावर ऐकताय ते ही महत्त्वाचं आहे. >>> @अमित, एकदम सोला आने सच. कधी ऐकताय त्यावर पण अवलंबून असते बहुदा - मनात खूप कल्लोळ उठला असताना वडाली ब्रदर्स ऐकणं मला आवडतं. मनातला कल्लोळ आणि त्यांचा कल्लोळ या दोघांची रिलेटीव व्हेलॉसिटी शून्य होते आणि आत कुठेतरी शांत व्हायला होतं.
हे विवेचन देखील छान आहे.
हे विवेचन देखील छान आहे.
असंच कुन फाया कुनचंही रसग्रहण होउन जाउ देत.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
माधव, लिंक्स ऐकते, पण माझ्या डोक्यात नुसरतची ही व्हर्जन फिट्ट बसली आहे हे आधीच कबूल करते.
विनायक, पाहाते तुमचीही लिंक, धन्यवाद.
'कुन फाया कुन' - वा वा! नक्की प्रयत्न करेन.
विनायक, लिंक एकदमच आवडली .
विनायक, लिंक एकदमच आवडली .
धन्यवाद.
हो, मस्त आहे लिंक. त्यानेच
हो, मस्त आहे लिंक. त्यानेच ‘कुन फाया कुन’वरही व्हीडिओ केलेला दिसतोय.
<<त्यानेच ‘कुन फाया कुन’वरही
<<त्यानेच ‘कुन फाया कुन’वरही व्हीडिओ केलेला दिसतोय.>>
होय. पण तुम्ही केलेलं रसग्रहणही वाचायला आवडेल.
कुन फाया कुन वरचा हा व्हिडीओ
कुन फाया कुन वरचा हा व्हिडीओ ही छान आहे. आणि त्या चॅनेल वरचे सगळेच.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=R-dXS5TI_dQ
https://www.youtube.com/watch?v=DGIrIFQlAAw
ह्या दोन लिंकही पहा.
विनायक तुम्ही खजिनाच दाखवलात!
विनायक तुम्ही खजिनाच दाखवलात!
_/\_ अभिषेक मिश्राच्या तर प्रेमातच पडलो. काय कन्व्हिक्शनने बोलतो.. मस्तच! 
स्वाती नक्की मनावर घे.
सुंदर लेख आणि रसग्रहण .गाणं
सुंदर लेख आणि रसग्रहण .गाणं सुंदर आहेच दोन्ही वर्जन गायलेही छान आहेत पण त्याचे लिरिक्स खूपच आवडले . त्याबद्दल इतकं छान उलघडून सांगितल्याबद्दल.धन्यवाद.
कुन फाया चा व्हिडीओ ही मस्त आहे .
त्यावर तुम्ही केलेलं रसग्रहणही वाचायला आवडेल. +1
वडाली ब्रदर्स चं वर्जन आज
वडाली ब्रदर्स चं वर्जन आज ऐकलं. तेही छानच आहे.
Pages