आईच विद्यापीठ - प्रवीण दवणे

Submitted by विश्राम कुलकर्णी on 1 October, 2023 - 10:48

प्रवीण दवणे हे ललित लेखक, गीतकार, कवी म्हणून परिचित आहेतच. पण माझ्या दृष्टीन हि व्यक्ती माणसानं कस जगावं यावर खूप छान भाष्य करते. त्यांची शेकडो व्याख्यान , त्यांनी लिहिलेली पुस्तक सर्वच प्रेरणादायी असतंच . अंतर्मुख करणार असत . मी त्यांच्या पुस्तकांचा 'वाचन वेडा ' म्हणा हवं तर , पण वाचक आहेच. 'सावर रे ',' रे जीवना '  सारखी पुस्तक मनावर एक गारुड उभं करतात. त्यांचं म्हणणं मात्र नीट समजून आलं पाहिजे इतकंच . 
परवाच खूप दिवसांनी त्यांच 'आईच विद्यापीठ ' पुस्तक हातात आलं. मी ते घेतल आणि अधाशी माणसासारखं अवघ्या १ दिवसात संपवलं. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष छोटी पुस्तक आम्ही काही तासात संपवतो. पण माझं तस नाही . मला पुस्तक वाचायला वेळ लागतो. अर्थात मी घाई करून कोणतंही पुस्तक सहसा वाचत नाही . पण या पुस्तकानं मात्र मला अधाशी बनवलं. आता काय कारण असेल 
या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावरून प्रवीणजींनी दिलेल्या व्याख्यानांच संकलन आहे. विशेष म्हणजे हि व्याख्यान विशेषतः पालक आणि शिक्षकांसाठी दिलेली होती. म्हणूनच आईच विदयापीठ असं नाव दिल गेलं आहे . 
आपण खूप वेळ ऐकतो मुलं म्हणजे मातीचे गोळे असतात , आपण देऊ तसा आकार ते घेतात. पण प्रत्यक्ष याला पहिला आकार मिळतो घरातून. आईच्या आणि बाबांच्या हातून . नंतर शाळेतील शिक्षक आणि समाज यांच्याकडून . किती जण याला खरा आकार द्यायचा प्रयत्न करतात ? या बद्दलचा उहापोह प्रवीणजीनी या व्याख्यानातून केला आहे. 
आई आणि बाबा कामाहुन थकून घरी येतात , मुलांनी काही हट्ट केला कि लगेच त्याला ते आणून द्यायचं किंवा खेळायला मोबाईल द्यायचा.  यात पालकांचा विचार एका अर्थाने बरोबर आहे , कि आधीच आपण दिवसभरची टेन्शन घेऊन आलो आणि आता परत डोक्याला कटकट नको म्हणून मुलांना शांत बसवण्याचा हा प्रयत्न असतो. पण हे कधीतरी ठीक आहे , पण मुलासोबत आपण किती संवाद साधतो. आपण मागच्या पिढीचा (आजी आजोबांचा ) आणि पुढील पिढीचा (मुलांचा ) संवाद घडवू देतो का ? कि स्वतंत्र राहण्याच्या नावाखाली आपलं भविष्य पारतंत्र्यात ढकलतो ? मी काही दिवसापूर्वी स्पृहा जोशी यांची सादर केलेली एक कविता ऐकली . 
ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप, वेगळं राहायचं भारीच सुख.
ऊन ऊन खिचडी  साजुकसं तुप,वेगळं राहायचं भारीच सुख.
एक नाही दोन नाही माणसं बारा, घर कसलं मेलं त्यो बाजारच सारा.
सासुबाई-मामंजी, नणंदा नी दीर, जावेच्या पोराची सदा पीर पीर.
पाहुणेरावळे सण नी वार, रांधा वाढा जीव बेजार.
दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक, वेगळं राहायचं भारीच सुख…
सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, प्रेमळ प्रेमळ म्हटल तरी सासू ती सासू,
अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु. 
चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,वीतभर लाकडाला हातभर झिलपी.
बाबांची माया काय मामंजीना येते,पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?
बहीण अन् जाऊ यात अंतरच खुप,वेगळं राहायचं भारीच सुख….
दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.
दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायचं.
आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतील साऱ्या आवडी निवडी.
दोघांचा असा स्वयंपाकच काय? पापड मेतकुट अन् दह्याची साय ,
त्यावर लोणकढ साजुक तुप,वेगळं राहायचं भारीच सुख….
रडले पडले नी अबोला धरला,तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.
पण मेलं यांच काही कळतच नाही, महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.
साखर आहे तर चहा नाही, तांदुळ आहेत तर गहु नाही.
ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी, घोटभर पाणि द्यायला पण बायकोच हवी.
बाळ रडल तर ते खपायचं नाही, मिनीटभर कसं त्याला घ्यायचही नाही.
स्वयपाक करायला मीच,बाळ रडल तरी घ्यायच मीच.
भांडी घासायची मीच, अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.
जिवाच्या पलीकडे काम झालं खुप, वेगळं राहायचं कळायला लागलं सुख….
सासुबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या, सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.
मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजारहाट करायला भावजी जायचे.
कामात जावेची मदत व्हायची, नणंद बिचारी ऊर नीपुर निस्तरायची.
आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,बारा महिन्याला एकच साडी.
थंडगार खिचडी, संपलं तुप,अन् वेगळं व्हायचं कळलं सुख!!!!!

प्रवीणजींची या व्याख्यानातून शिक्षकीपेशाबद्दलही अपेक्षा आहेच. किती वेळ आपण आपला सुतकी चेहरा विद्यार्थ्यांवर लादतो . आपल्या दृष्टीनं तोच तोच विषय, आहे खरा . पण आपल्यासमोर बसलेली ती चैतन्याचे चेहरे तर  नवी असतात ना? त्यांना जर आपण एखादी कविता समरसून शिकवली , तर सर्व नाही पण एखादा चेहरा तरी आपण लावलेल्या ज्योतीला जागा ठेवेल ना ? आणि नसेल ठेवली तरी राहूंदेत . पण त्यांना ती कविता समजल्याचा  चेहऱ्यावर दिसणारा आनंद .. त्याची किंमत कितीही मोठ्या पॅकेज पेक्षा कमी नाही.. अर्थात हे समजून घेतलं तर आहे . 
कविताच कशाला , एखादा इतिहासाचं युद्ध सांगताना तो प्रसंग डोळ्यासमोर उभा केला तर ? विज्ञानाचा एखादा चमत्कार आधी दाखवून मग त्यावर विश्लेषण केलं तर ? गणितामधील जादू दाखवून गणित सोडवली तर ? आता जादू अशा अर्थानं म्हणतो कि त्यातील रंजकता कधीच समोर नाही येत म्हणून . चित्रकलेचा तास घेताना निसर्ग चित्र एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन काढलं तर अर्थात कधी कधी , कारण नेहमीच हे शक्य नाही होणार ...!! विषय तेच तेच असतात फक्त ते कलात्मक रीतीने शिकवले तर ते नक्कीच समजतील .. 
मी असेही खूप शिक्षक पाहिले आहेत, जे प्रवीणजींना अपेक्षित आहेत . आमचेही शिक्षक असे होतेच. पण या विरुद्ध वागणाऱ्या शिक्षकांची संख्यादेखील तशी कमी नाही. समाजानं पण कसे आदर्श समोर ठेवले पाहिजेत या बद्दलही प्रवीणजी सांगतात . 
एकूण पुस्तक वाचनीय आहेच , पण माझं मत आहे हे पुस्तक प्रत्येक शिक्षक आणि पालक यांनी वाचावं. प्रत्येक मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या एखाद्या मिटिंग मध्ये याच जाहीर वाचन करावं .. 
शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण जिजाऊ आणि शहाजी महाराज जस जगले तस आम्हाला नको .. भगतसिंग हवेत, पण त्यांचे पालक जसे वागले तस नको .. हा जर विचार असेल तर सर्वच गोष्टी कठीण आहेत . विषय तसा फार गंभीर आहे . काही दिवसांपूर्वी काही निमित्ताने शाळेत जाण्याचा योग्य आला, त्यावेळी या सर्व गोष्टी मलाही प्रकर्षाने जाणवल्या. पु. लं नी  लिहिलेले चितळे मास्तर आज हवे आहेत . तसेच पालकहि तेवढेच जागरूक हवे आहेत . जगातील सर्व सुख पायाशी आणून देणाऱ्या पालकांपेक्षा जगातील दुःखाची जाणीव करून देणारेही हवेत . बिल गेट्स सारखा अब्जाधीश व्यक्ती आपल्या पाल्याना दुःख काय असत कळावं यासाठी काही दिवस गरीब , आदिवासी वस्तीमध्ये राहायला सांगतो. माझं म्हणणं हे करावं असं नाही . मुलांना दुःखाची झळ पोहोचू नये यासाठी धडपडणारे पालक चुकीचं वागतात असही नाही. पण त्याला मर्यादा असाव्यात . नाहीतर कधीच दुःख न आणि अपयश न पाहिल्यामुळे छोट्या छोट्या प्रसंगातही हि मुले घाबरून पळून जातात ..
प्रवीणजीनी फार मोठ्या इथे उलगडलेले आहे. आपण याचा थोडा तरी कानोसा घेऊयात का ?

Group content visibility: 
Use group defaults

अतिशय छान ओळख. प्रवीण दवणे सरांची व्याख्याने आणि लेखन दोन्हीही समग्र श्रोते व वाचकवृंदाला उद्बोधक असतात. सामान्य माणसाने असामान्यत्व कसे मिळवावे हे त्यांच्या तोंडून किंवा लिखाणातून नेहमी येते.