शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?

Submitted by अभय आर्वीकर on 16 December, 2009 - 22:25

'वांगे अमर रहे !' या लेखावर शर्मिला यांच्या प्रतिसादामधिल एका प्रश्नाला दिलेला प्रतिसाद.

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?.

'वांगे अमर रहे !' हा लेख वाचुन शर्मिला यांनी जो प्रश्न उपस्थीत केला तो प्रश्न नसुन उत्तरच आहे असे मला वाटते.
कारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी 'ताज्या' हून ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषीप्रधान्,अर्थव्यवस्थेचा कना वगैरे असुनही विकसित का करु शकला नाही?.
विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे स्विकारण्यापेक्षा देशातील लोकांना रुचेल आणि देशात ज्या शेतमालाची अधिक पैदावार होते त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित व्हायला पाहीजे. उदा.
१) बोरावर आधारित बोरकुट
२) लिंबावर आधारित सरबते
३) टोमॅटो सास
या व्यतिरिक्त अजुन बरेच काही करता येण्यासारखे आहे पण या सर्व पदार्थांना देशी सुगंध हवा, तरच ते लोकांच्या पसंतीस उतरेल.सामान्य लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारले तरच त्याची किंमतही आटोक्यात राहु शकते,वेगवेगळ्या भागात स्थानिक शेतमालाची उपलब्धता आणि त्या भागातील लोकांची रुची लक्षात घेवुन पाऊल टाकावे लागेल.
हे सर्व उद्योग मोठ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करुन उपयोगाचे नाही कारण त्यामुळे शेतकर्‍यांना अथवा बेरोजगारांना फायदा होणार नाही.
मागे बायोडिझेल निर्मिती बद्दल बरीच चर्चा झाली.जेट्रोपा लागवड उपयोगी ठरली असती.
शेती विषयक तंत्रज्ञानामध्ये लहान-लहान देश पुढे-पुढे जात असतांना आमचा भल्ला मोठा देश मागे-मागे का पडतो?. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत असतांना आम्ही या विषयात अजुन पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही वाटत नाही. कदाचित असे तर नाही की उगीच माथापच्ची करुन नवनिर्माण करत बसण्यापेक्षा इतरांनी विकसित केलेले तंत्रज्ञान चोरुन-लपुन मिळवायचे,त्यात जुजबी फेरबदल करायचे आणि मेड इन इंडिया असा शिक्का मारला की आम्हीही जगाच्या समांतरच आहो हे भासविण्याचा सरळसोट 'शॉर्टकट' आम्ही निवडलाय?. हा माझा दावा नाही उगीच शंका आहे,परमेश्वर करो आणि माझी शंका खोटी ठरो.
तरी एक प्रश्न कायमचा कायमच राहतो,आम्ही त्यादिशेने पावले का टाकीत नाही?. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही?.
भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे असे मी म्हणतो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो,तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणुन म्हणतो.पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार,त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार... ही यादी किती लांब आहे देवच जाणे.
देशाचे चित्र डोळ्यासामोर ठेवुन स्वयंप्रेररणेने 'भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे' असे ज्याला वाटते त्याच्या वैचारीक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटत असते..
"कृषीक्षेत्राला भारतिय अर्थव्यवस्थेचा कणा" मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा 'अर्थव्यवस्थेचा कणा' शोधायचा प्रयत्न करतो परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा दिवाळीचा सन म्हणजे केंद्रिय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या 'कण्या'पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्व खावुन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या 'अर्थव्यवस्थेच्या कण्याला' मिळतांना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
मग ज्या देशात शेतीक्षेत्र एवढे दुर्लक्षित असेल त्या देशात स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री सारख्या इंडस्ट्रीज कशा उभ्या राहतील?. या ठीकानी एखाददुसरे किंवा तुरळक उदाहरण नव्हे तर व्यापकतेने देशातील ८० % जनतेचा विचार करावा लागेल. कारण पाचपन्नास युनिट उभारल्याने देशाचा प्रश्न सुटनार नाही.
त्याशिवाय अशी प्रक्रिया युनिटस उभारायला स्किल्,कौशल्य,व्यावसायज्ञान,अनुभव्,आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ लागेल. आमच्याकडे मनुष्यबळ सोडल तर बाकी गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. मनुष्यबळ आहे पण त्यात बुद्धीबळ कमी आणि बाहुबळ जास्त आहे. जे काही बुद्धिबळ आहे त्यात व्यवहारज्ञान/व्यावसायिक ज्ञान कमी आणि पुस्तकी किंवा कारकुनी ज्ञान जास्त आहे. म्हणुन कारखाने काढायला कोणी सामोर येत नाही पण कारखाना निघनार म्हटल्यावर रांगा लागतात. याला आजचे युवक अजिबात जबाबदार नाहीत,असलोच तर आम्ही प्रौढ मंडळी जबाबदार आहोत. आमची शिक्षणपद्धती जबाबदार आहे.आजची शिक्षण प्रणाली म्हणजे कारकुन घडवणारे आणि बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने ठरले आहेत.शाळा कॉलेज किंवा उच्च शिक्षणाचे मुख्य सुत्र 'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल एवढे ताकदवार असायला हवे.याबाबतीत वैद्यकिय शिक्षणाचा 'मॉडेल' म्हणुन उपयोग होवु शकतो.मला वाटते की कदाचीत 'डॉक्टर' हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो. बाकी क्षेत्रासाठी आपण एवढी आत्मविश्वास देणारी शिक्षणप्रणाली जर अमलात आणली तर आज गंभिर वाटणारे प्रश्न अत्यंत सुलभ होवु शकतात.दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही.
या देशावर वसाहतवादी राज्यसत्ता चालविण्यासाठी इंग्रजांना कारकुनांची गरज होती त्यानुरुप कारकुन तयार करणारी शिक्षणप्रणाली त्यांनी स्थापित केली.आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत.
शाळा कॉलेज शिकतांना विद्यार्थी,त्याचे पालक,शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते,त्याने शिकुन सवरुन या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे.अगदी कलेक्टर पासुन चपराशापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकुन व्हायचं.३ % नोकरीच्या जागा असतांना १०० % विद्यार्थ्यांना आम्ही एकाच मार्गाने ढकलतो.किमान ५० % विद्यार्थ्यांना व्यावसायीक शिक्षण द्यायला काय हरकत आहे?.
यासंदर्भात 'राजा हरिश्चंद्राचे' उदाहरण फारच बोलके आहे. राज्य गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा म्हणुन राजा हरिश्चंद्र मजुरांच्या बाजारात जावुन उभा राहिला.त्तुला काम काय करता येते ? या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. "मला राज्य चालविता येते". पण ज्यांना मजुर हवे होते त्यांच्याकडे 'राज्य' कुठे होते,याला चालवायला द्यायला?. राजा हरिश्चंद्रास कामच मिळेना. शेवटी स्मशानात राहुन प्रेताची रखवाली करावी लागली.
राज्य चालविण्याखेरिज इतर कसलेच कौशल्य नसलेला राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालविण्या खेरिज कसलेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्यात फरक काय उरतो?
डीग्री घेवुन १०० विद्यार्थी बाहेर आले की त्यात ३ लोकांना नोकरी मिळते,ते मार्गी लागतात.उरलेले ९७ नोकरीच्या शोधात भटकत फिरतात. कारण १५-२० वर्षे शाळा कॉलेजात घालवुनही व्यवसाय,स्वयंरोजगार वा अन्य उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य,व्यावसायिक ज्ञान आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास यापैकी त्याच्याकडे काहीही आलेले नसते. उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर बँका कर्ज देत नाही कारण बँकेला माहीत असते हा शंभराचे साठ करणार. म्हणुन बँका टाळाटाळ करतात.पदवी मिळवल्याने व्यवसायज्ञान मिळाले हे बँकेलाही मान्य नसते.
शेवटी एक दिवस घरात खायचे वांदे पडायला लागलेत किंवा लग्नाचे वय घसरायला लागले की मग मिळाला तो रोजगार करण्याशिवाय गत्यंतर नसते आणि आमच्या तरुणाईचे खच्चीकरण होते.त्यासोबतच असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर काढण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरते.
हे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल.. वरना कुछ नही होनेवाला...... असंभव....!
.
......गंगाधर मुटे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागोमोहनप्यारे यांची प्रतिक्रिया | 17 December, 2009 - 13:54
कदाचीत 'डॉक्टर' हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो.

देकनी बायकू दुसर्‍याची , तसंच हाय ह्ये बी....

गंगाधर मुटे | 17 December, 2009 - 14:58

<< देकनी बायकू दुसर्‍याची , तसंच हाय ह्ये बी.... >>

कॉलेजमध्ये घेतलेले शिक्षण व्यवसायामध्ये उपयोगी पडते किंवा शिक्षणाच्या बळावर व्यवसाय करता येतो,नोकरीसाठी वणवण भटकायची गरज पडत नाही,असे मला म्हणायचे आहे.

गंगाधर, तुमचा मुद्दा खरंच खुप चांगला आहे. पण लक्षात कोण घेतोय??

आता माझा नाशिक परिसरातील शेतक-यांशी परिचय आहे म्हणुन फक्त तिथलीच माहिती आहे ती लिहितेय.

तिथले मध्यमवर्गिय शेतकरी ज्यांना थोडेफार कर्ज आहे, पाण्याची नीट व्यवस्था नाहीय, ते आपल्या मुलांना शेतातुन बाहेर काढुन शिक्षण आणि नोकरी मागे लागतात कारण अर्थात शेतीतुन मिळणा-या उत्पन्नाची गॅरँटी नाही. आणि मलाही ते पटते. चांगले दिवस कोणाला नकोत? अर्थात असे असुनही ते शेती सोडत नाहीत. मुलगा इकडे आला तरी तो शेतीशी निगडीत राहतोच राहतो.

मला आश्चर्य वाटते ते तिथल्या बायकांचे. शेतीची सगळी कामे मुख्यत्वे त्याच करतात. पण तरीही मुलींना मात्र १०वी/१२ वी नंतर लगेच बीएड/इलेक्ट्रोनिक्स/काँपुटर्स डिप्लोमा करायला पाठवतात. याचे कारण काय? तर जास्त शिकलेला मुलगा मिळावा. (मुलालाही डिप्लोमावालीच बायको हवी असते) तिकडे १२वी पर्यंत कॉपी हा परिक्षा पास व्हायचा सोपा आणि लोकमान्य रस्ता आहे. त्यामुळे शेत/घर संभाळुन आरामात शिक्षण पुर्ण करता येते.

आणि ह्यातल्या बहुतेक मुली लग्नानंतर नोकरी वगैरे काही न करता घरी बसतात. हे कळल्यावर माझ्या मनातही सेम तुमच्यासारखेच विचार आले. जर घरीच बसायचंय तर मग घरच्या घरी करण्यासारखे उद्योग का शिकु नयेत? हे इलेक्ट्रोनिक्स/काँपुटर्स डिप्लोमा वर पैसा आणि वेळ का खर्च करायचा? नाशिकला शेतकी विद्यालय आहे तिथे फुड प्रीसर्वेशन वर कोर्सेस नाहित काय? नसल्यास तसे उपलब्ध करुन द्यायची मागणी केली पाहिजे. मुरंबे/जॅम/चटण्या/जेली आणि इतर प्रकारे अन्न/फळे/भाज्या टिकवण्याचे प्रशिक्षण घेतले तर तसे उद्योग सुरू करता येतील, गावातल्या गावात बायका मिळुन युनिट्स चालु करु शकतात. सगळ्यांनीच डोळे झाकुन इलेक्ट्रोनिक्स/काँपुटर्स डिप्लोमाची कास धरण्याचे कारण नाही. अर्थात तुम्ही म्हणालात तसे या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल.. वरना कुछ नही होनेवाला...... असंभव....!

<< मला आश्चर्य वाटते ते तिथल्या बायकांचे. शेतीची सगळी कामे मुख्यत्वे त्याच करतात. >>
साधना,
'तिथल्या बायका' नाही,ही सार्वत्रीक परिस्थीती आहे,शेतीमध्ये बायकाच जास्त काम करतात पण या विषयावर आपण पुढे कधितरी चर्चा करु.

<< नाशिकला शेतकी विद्यालय आहे तिथे फुड प्रीसर्वेशन वर कोर्सेस नाहित काय? . >>

कोर्सेस असतील किंवा नसतील. पण सद्यस्थितित जे शेतकी कोर्सेस उपलब्ध आहेत ते फारसे उपयोगाचे नाही,किंवा अव्यवहारीक आहेत. कॉम्प्युटर कोर्सेस व्यावहारीक आहेत म्हणुन सर्वांचा कल तिकडे असतो.

कॉम्प्युटर कोर्सेस व्यावहारीक आहेत म्हणुन सर्वांचा कल तिकडे असतो.

काँपुटर कोर्सेस व्यावहारिक आहे हे खरे, पण इथे त्यांचा उपयोग केवळ लग्नाच्या बाजारात एक जमेची बाजु इतकाच होतोय. पुढे या घरापासुन लांब राहुन मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग बहुतांशी मुली करतच नाहीत. (डिप्लोमा कोर्सेस साठी तालुक्याला किंवा मोठ्या शहरातच जावे लागते) घरात काँपुटर असेल तर थोडाफार उपयोग झाला तर तेवढाच. मग अशा वेळी मुलींनी तरी काहीतरी वेगळॅ शिकण्याकडे लक्ष द्यावे असे मला वाटते. (हे करिअरिस्ट मुलींसाठी लागु नाहीय, हे कृपया लक्षात घ्या, नाहीतर विषय यावरुन भरकटायचा)

काहीही करायचे म्हटले की अपरिहार्यपणे त्याची उपयोगीता तपासणे आलेच. शेतकी किंवा इतर बरेच काही कोर्सेस / शालेय शिक्षण ते डिप्लोमा किंवा डिग्री का असेना, ते व्यावसायात प्रत्यक्ष वापरण्याच्या कसोटीवर उपयोग शुन्य असते. करिअर करायचे असेल तरी आणि करिअर करायचे नसेल तरी, दोन्ही स्थितित उपयोग शुन्यच असते. फक्त नोकरी करायची म्हटली तर मात्र मौल्यवान असते.
सहा महीन्याचा संगणक,शिवणक्लास्,मोबाइल दुरुस्ती किंवा तत्सम कोर्स केला तरी चारपैसे नक्किच मिळवता येतात. परंतु पंधरा वर्षे खर्च करुन शिक्षण घेतलेला कृषी पदवीधर शेती करुन चारपैसे मिळविण्याची अजिबात शक्यता नसते.
मुलांनी किंवा मुलींनी काहीतरी वेगळे शिकण्याकडे लक्ष द्यावे असे तुम्हाला वाटते ते अगदी योग्य आहे. पण त्यासाठी
घरात बसुनही काहीतरी करता येईल अशा तर्‍हेचे कोर्सेस हवेत.करिअरिस्ट निर्माण करणारी शिक्षापद्धती हवी, प्रशासक निर्माण करणारी शिक्षापद्धती उपयोगाची नाही.

गंगाधर जी,

विचार करायला लावणारा लेख Happy

कॉम्युटर हा विषय शाळा शाळां मधुन अगदि प्री-स्कुल पासुन आहे तसच जर शेती वा ऊद्योगाच प्रशीक्षण देणारे विषय (पॉटरी, फार्मींग, केटरींग वै.) प्राथमीक ईयत्तांनतर अभ्यास क्रमात असतील तर कदाचित त्याचा ऊपयोग विद्यार्थ्यांना पुढे स्वःताचा व्यवसाय करण्यास होऊ शकतो...

ज्या विद्यार्थ्यांना १० वी १२ वी नंतर कुठे चांगल्या फिल्ड मध्ये प्रवेश मीळत नाही वा अभ्यासात ज्यांची गाडी धक्के खाऊन पुढे जात असते, ज्यांना अभ्यासात रस नसतो अश्या विद्यार्थ्यां साठी व्होकेशनल कोर्सेस (व्यावसायिक कोर्सेस) हा ऑपशन असतो ज्यात लहान, घरगुती व्यवसायांच प्रशीक्षण दिल जात जेणे करुन तो विद्यार्थी स्वःताच्या पायावर उभा राहु शकतो (एखादि नोकरी मीळवुन वा स्वःताचा लहानसा ऊद्योअग सुरु करुन) .. व्होकेशनल कोर्सेसचे हेच विषय शालेय अभ्यास क्रमात ठेवले आणि स्वःताच्या ईच्छे/आवडी प्रमाणे विद्यार्थ्याला विषय घेता आला तर कदाचित शाळेतुनच नोकरी करण्यात रस असणार्‍यां बरोबर व्यवसायीक हि बाहेर येतील (पण याने अजुन एका विषयाच ओझ विद्यार्थ्यावर वाढेल Sad )

थोडस विषयांतर,

शाळेत हस्तकला, चित्रकला हे विषय असतात खरे पण हस्तकलेचा ऊपयोग मोठ झाल्यावर क्राफ्ट ऊद्योग आणि चित्रकलेचा ऊपयोग पुढे पेंटिंग शी रीलेटेड ऊद्योग सुरु करण्यास होऊ शकतो अस शीक्षक सांगतात का? बरेचदा केवळ छंद/आवड म्हणुन हे विषय जोपासले जातात

आमच्या शाळेत चित्रकलेच्या परीक्षा देण्यासाठी उपयुक्त क्लासेस चालायचे पण त्यांची फी खुप कमी विद्यार्थ्यांना परवडायची शिवाय हस्तकलेचा, चित्रकलेचा पुढे काय ऊपयोग? म्हणुन पालक हि त्यात जास्त रुची घ्यायचे नाहीत...

...मुळात पालकांना हि आपल्या मुलीचा/मुलाचा ईंटरेस्ट हस्तकला, चित्रकला ई विषयात असल्यास पुढे ह्या क्षेत्रातही स्व:ताच्या पायावर ऊभ रहाता येत, स्वःताचा ऊद्योग करता येतो हि माहिती असते का? ... ...बर्‍याच पालकांचा कल मुलीला/मुलाला चांगली नोकरी मीळविण्यास फायदेशीर असलेल्या विषयां कडे असतो!

<< बर्‍याच पालकांचा कल मुलीला/मुलाला चांगली नोकरी मीळविण्यास फायदेशीर असलेल्या विषयां कडे असतो! >>
सासजी,
बर्‍याच पालकांचा नाही, थोडेफार सोडले तर बाकी सर्वांचाच....!!
आणि त्यात गैर काहीही नाही..!!!

लोकमत मधे आलेल्या बातमीची लिंक देत आहे .
अर्थात ही खुप मोठी गुंतवणुक आहे , पण सहकारी तत्वांवर असे प्रोजेक्ट्स उभे करता येऊ शकतील .
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-10-...

हा लेख वाचला होता. प्रतिक्रिया येतील म्हणून काही लिहीले नाही. कदाचित मंडळी विसरली असावीत...पण इथे कुणी जाणकार असेल तर शिक्षण पद्धती बदलण्याबाबत वाचायला उत्सुक आहे.

पुण्यामध्ये एक स्विडिश कंपनी आहे. बॉल बेअरिंगमध्ये जगभर चांगले नाव आहे. गुणवत्तेच्याबाबत या कंपनीची उदाहरणे दिली जातात. मला अशी ममाहितीदिली गेली..

स्वीडनमध्ये जिथे या कंपनीचा मूळ कारखाना आहे..तिथे शालेय शि़क्षण संपलेल्या विद्यार्थ्याला शिकाऊ म्हणून घेतले जाते. बेअरिंगमधे निरनिराळे टप्पे असतात. यापैकी बोअर हा एक टप्पा.
एका विद्यार्थ्याला फक्त बोअर इतकंच शिकवलं जातं. पण बोअरच्या बाबतीत तो जगातला सर्वाधिक तज्ञ व्यक्ती बनलेला असतो. बोअर शिकवतांनाच त्याला ग्राईंडिंग, होनिंग, सरफेस फिनिश आदि मूळापर्यंत शिकवले जाते.
या प्रक्रियेत आपण काय आणि का शिकत आहोत हे त्याला छान समजते आणि अ‍ॅप्लिकेशन माहीत असल्याने गोडी लागते ते वेगळेच.
याउलट आपल्याकडे इंजिनिअरैंगच्या पहिल्या वर्षाला एम१, एम२, स्ट्रेंन्ग्थ ऑफ मटेरिअल्स, अप्लाईड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आदि विषय असतात. मग एम३, हीट इंजिनिअरिंग, पॉवर प्लान्ट इंजिनिअरिंग, थिअरी ऑफ मशिन्स, इंजि ड्रॉईंग आदि विषय समोर येत राहतात. कुठेही खो देणे नाही. एखादी आर्ट फिल्म चालावी आणि काही न समजता ती पाठ करावी तसे...

कित्येक मेकॅनिकल इंजिनियर गाडी नादुरूस्त झाल्यावर ढकलत नेऊन रस्त्यावरच्या मेकॅनिककडे दुरूस्त करून घेतात. हा मेकॅनिक गाडीचा आवाज ऐकून सांगतो...वाल्व्ह टायमींग बघायला लागल साहेब !!

आपल्या शेतीचंही असंच आहे.

एकदा एका शेतक-याचा मुलगा कॄषी महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेऊन घरी येतो. शेतात त्याचा बा एका झाडाला खत टाकताना दिसतो. मुलाला पाहून शेतकरी त्याला या झाडाबद्दलचे मत विचारतो..
यावर तो म्हणतो.. बा... या झाडाला कधीच आंबे लागणार नाहीत.
कॄषी महाविद्यालयातून आलेल्या त्या मुलाचे बोल ऐकून बा म्हणतो
खरंय पोरा... या झाडाला कधीच आंबे लागणार नाहीत.
कारण

ते लिंबाचं झाड आहे !

किरण चांगली पोष्ट.

इंग्रजांनी त्यांच्या कामात मदत व्हावी म्हणुन इथल्या लोकांना शिकवले. नव्हे कारकुन तयार करण्याच्या फॅक्टर्‍या सुरु केल्या. अद्यापपर्यंत तेच येरे माझ्या मागल्या चालु आहे. no practical knowledge.

मी तर म्हन्ते ह्या शिक्षणाच्या आयचा घो...........

<< पण इथे कुणी जाणकार असेल तर शिक्षण पद्धती बदलण्याबाबत वाचायला उत्सुक आहे. >>
किरणजी,माझा असा अनुभव आहे की शिक्षण पद्धती बदलण्याबाबत सोडा चर्चा करण्यास सुद्दा फारसे कोणी उत्सुक नाहीत. या देशातल्या सर्व पालकांना आपला पाल्य सहाव्या वेतन आयोगाचा लाभार्थी बनवायचा आहे.
सर्व पालकांचे पहिले ध्येय,मुख्य ध्येय, अंतिम ध्येय आणि एकमेव ध्येय - एकच... लाभार्थी बनविने.

किरण राव लय भारी लवलयसा .
विंजिनियरींगच इद्यार्थी आन कला शाखंच इद्यार्थी ह्याच्यांत फरक फकस्त त्यांच्या पुस्तकी गिन्यानाचा आस्तो . ह्यांच्या परीस आयटीआयचा इद्यार्थी परवड्ला . आमची हौसा म्हणती तसं no practical knowledge .
म्या तर म्हणतु पंधरा वर्सातल ५ वरीस थेरी आन १० वरीस फकस्त प्राक्टीकल द्याया फायजे समद्यास्नी .

@ दाजीबा
किरण राव नका ना गडे म्हणू...

ती आमीर खानची बायको आहे ..!!

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पूर्वीच्या बारा बलुतेदारांना त्यांचे वंशपरंपरागत व्यवसाय वाढीला लागावेत अशा पद्धतीचे नियोजन केले गेले असते तर कदाचित भारताचे चित्र निराळेच दिसले असते. चांभाराला पादत्राण उद्योगातील बारकावे समाजावून सांगणारे व्यवसाय प्रशिक्षण दिले गेले असते तर बाटाची दुकाने मारवाड्याने टाकली नसती. लोहारांना सहकारी तत्त्वावर कारखाने टाकण्यासाठी योजना आली असती तर टाटांवर लोड आला नसता.
साळी, कोष्टी आणि विणकर यांना वस्त्रोद्योग मंत्रालयाने कारखाने काढून दिले असते तर अंबानी, बिर्ला यांना रात्रंदिवस भारतियांच्या लज्जारक्षणार्थ घाम गाळावा लागला नसता.
इंग्रज जाऊन आज साठ वर्षे झाली तरीही आपण मेकॉलेच्या नावाने खडे फोडतो आणि काहीच करत नाही. कि आपल्यालाच ही व्यवस्था बदलण्यात रस नाही ?

किरणजी अगदी शतप्रतिशत सत्य तुम्ही म्हणताय ते.
विद्वतप्रचुर जनतेने आपला मेंदु गहान ठेवुन बुद्धी विकुन चाकरी करावी-असा शासनाचा उद्देश
सरकारी चाकरी मिळणे म्हणजे साक्षात स्वर्गसुखाची प्राप्ती होते - अशी विद्वतप्रचुर जनतेची मानसिकता.
सगळा डोंबार्‍याचा खेळ चाललाय.

किरण राव नका ना गडे म्हणू...

ती आमीर खानची बायको आहे ..!!

>> किरण, you are impossible! Lol

मेकॉलेच्या नावाने खडे फोडल्याने शतकानुशतके चाललेल्या पिळवणूकीची जबाबदारी तात्काळ झटकता येते.
<<पूर्वीच्या बारा बलुतेदारांना त्यांचे वंशपरंपरागत व्यवसाय वाढीला लागावेत अशा पद्धतीचे नियोजन केले गेले असते तर कदाचित भारताचे चित्र निराळेच दिसले असते.>> म्हणजे या लोकांनी दुसरा काही पर्याय न शोधता पिढ्यांपिढ्या उच्चवर्णियांची धुणी धुवावीत असेच ना? मुळात या बलुतेदारांनी इतकी वर्षे त्यांच्या क्षेत्रात कसलेही भरीव 'इनोव्हेशन' का केले नाही ह्या प्रश्नाचे काय उत्तर आहे? पुराव्यांनुसार आपले बलुतेदार सध्या वापरत असलेली हत्यारे आणि तंत्र हजारो वर्षे जुनाट आहे. जे काही नविन आहे ते त्यांनी तयार केलेले नसून शिकून पुढे गेलेल्या वर्गाने तयार केले उदा. लोखंडी नांगराचा फाळ ना कुणब्यांनी तयार केला ना लोहारांनी तो केला किर्लोस्करांनी.
ह्या गतानुगतिकतेचे एकमेव कारण म्हणजे बलुतेदारांना मिळालेली नगण्य सामाजिक प्रतिष्ठा.त्यामुळे एखाद्या चांभाराच्या मुलाला त्याच्या कामातून काही प्रेरणा मिळणे, नविन शोध लागणे आपल्या कामाचा अभिमान असणे या गोष्टी अशक्य होत्या.वेगळ्या शिक्षणाची पहिली संधी मिळताच बलुतेदारांनी आपले परंपरागत व्यवसाय का सोडले याचे उत्तर इथे आहे.

ह्या गतानुगतिकतेचे एकमेव कारण म्हणजे बलुतेदारांना मिळालेली नगण्य सामाजिक प्रतिष्ठा.त्यामुळे एखाद्या चांभाराच्या मुलाला त्याच्या कामातून काही प्रेरणा मिळणे, नविन शोध लागणे आपल्या कामाचा अभिमान असणे या गोष्टी अशक्य होत्या.वेगळ्या शिक्षणाची पहिली संधी मिळताच बलुतेदारांनी आपले परंपरागत व्यवसाय का सोडले याचे उत्तर इथे आहे.

तुमच्य या म्हणण्याशी असहमत होण्याचे काहीच कारण दिसत नाही. उलट हा मुद्दा मांडून तुम्ही माझ्या म्हणण्याचा विस्तारच केला आहे. बलुतेदारांना जी सामाजिक प्रतिष्ठा ( नगण्य) होती त्यासाठी जे काही लढे चालू होते त्याला हातभार लागणे हे एकजिनसी राष्ट्राच्या दॄष्टीने राष्ट्रीय कर्तव्य होते. याबाबत जपानचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. जपान हे राष्ट्र म्हणून उभे करण्यासाठी सम्राट हिरोहिटो यांनी विदेशी ज्ञान स्वदेशात आणून रूजवायला सुरूवात केली. त्याचबरोबर राजघरण्याशी संबंधित सरदार, मनसबदार, उच्चभ्रू लोक यांना आपल्या सामाजिक प्रतिष्ठांच्या कल्पना सोडायचे आवाहन केले. एक राष्ट्र म्हणून उभेराहण्यासाठी हे केले गेले. त्यामुळे या विदेशी ज्ञानाचा सर्व थरात प्रचार आणि प्रसार झाला. परिणाम आपण पाहतोच आहोत.

माझे म्हणणे समजून घ्या..
ज्या काळात बलुतेदारांना शिक्षण घ्यायला धार्मिक कायद्याने बंदी होती त्याच काळात केवळ आपल्या कौशल्यावर त्यांनी भारतात प्रसिद्ध बांधकामे, शिल्पे आदी घडवलेली आहेत. या कारागिरांना आधुनिक शिक्षण दिले गेले असते आणि त्याचबरोबर अर्थकारण, व्यवसायनीती हे हि शिकवले गेले असते तर बाटा ची दुकाने दिसायच्या ऐवजी आपल्या देशातील चर्मकारांची दुकाने दिसली असती. हळूहळू त्यांच्यातली अल्पसंतुष्टता घालवून त्याचे एका मोठ्या उद्योगात रूपांतर होऊ शकले असते.

ठेविले अनंते तैसेचि रहावे हे आपल्या तत्कालीन समाजव्यवस्थेने शिकवल्यामुळे मोठी स्वप्ने बघण्याचे कुणाच्या मनातही येणे शक्य नव्हते...

तरी एक प्रश्न कायमचा कायमच राहतो,आम्ही त्यादिशेने पावले का टाकीत नाही?. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही?.

....वाटणारही नाही...कारण अजूनही आम्ही "मतदानादिवशी" मत न देता घरात बसून राहतो नाहीतर कुठेतरी फिरायला जातो ..याला आपणच लोक (सुशिक्शित की संकुचीत ?) जबाबदार आहोत ..

या देशातल्या सर्व पालकांना आपला पाल्य सहाव्या वेतन आयोगाचा लाभार्थी बनवायचा आहे.
सर्व पालकांचे पहिले ध्येय,मुख्य ध्येय, अंतिम ध्येय आणि एकमेव ध्येय - एकच... लाभार्थी बनविने.

मुटे जी, हे "दुर्दैवानं" खरं आहे ..

<< कारण अजूनही आम्ही "मतदानादिवशी" मत न देता घरात बसून राहतो नाहीतर कुठेतरी फिरायला जातो .>>
राजकारणी लोकांच्या गैरवर्तनामुळे, काही मतदारांचा भ्रमनिरास झाल्यामुळे आणि मतपत्रिकेवर एकही उमेदवार मत देण्यालायक न वाटल्यामुळे मतदारामध्ये मतदानच न करण्याचा विचार बळावतो.
त्यामुळे केवळ मतदारांना दोष देणे संयुक्तिक ठरणार नाही.

मुटे जी, तुम्ही म्हणताय तेही खरं आहे , पण जे काही ४ चांगले उमेदवार उभे राह्तात, त्यांना तरी या मतदारांचा,मेडीया वाल्यांचा पाठींबा किती मिळतो ,हाही एक प्रश्न आहेच .....

मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले.

अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?

या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
मात्र
शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली.

बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला
आणि
या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.

- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------

गंगाधर मुटे,

>> शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले.

तुमचं हे विधान खरंय. मात्र मोदी करतात काय तेही पाहायला पाहिजे. माझ्या माहीतीप्रमाणे मोदी शेतमालाचे भाव पडू देत नाहीत. इथे एक इंग्रजी लेख आहे :

>> One of Modi's biggest achievements has been the revival of agriculture in Gujarat, and he is
>> likely to replicate that nationwide. An International Food Policy Research Institute paper says
>> that between 2000/01 and 2007/08, agricultural value added grew at 9.6 per cent a year in
>> Gujarat - double the rate for India, and among the fastest rates recorded anywhere. Modi has
>> proposed a market stabilisation fund for farmers to get the optimum price for their produce.

हेच होवो अशी अपेक्षा आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

गामा_पैलवान, तुम्ही आणि त्या बातम्या सांगत असतील ते खरे होवो. तुमच्या तोंडात साखर पडो.

पण असे होण्याची अजिबात शक्यता नाही. त्याची अनेक कारणे आहेत. शक्य होईल तेव्हा मी सविस्तर लिहिनच.

बाकी, त्या बातम्या मी वाचल्या नाहित. वाचायची इच्छाच नाहिये. मी काहि काळ पत्रकारिता केली आहे. पत्रकारिता जवळून न्याहाळली आहे. शेतीसंदर्भातील कोणत्याच बातम्या विश्वासार्ह असत नाही, हे एक सत्य आहे. (त्याचीही अनेक कारणे आहेत.)

असो. बघुयात.

गंगाधर मुटे,

>> शक्य होईल तेव्हा मी सविस्तर लिहिनच.

लिहाच म्हणतो मी! Happy दुसरी बाजू कळायलाच हवी.

आ.न.,
-गा.पै.

4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांच्या कालावधीत ५५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..
विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली.
हे सर्व शासकिय धोरणाचे बळी आहेत, म्हणून शेतकरी आत्महत्त्यांना शासकियबळीच म्हटले गेले पाहिजे.
4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण गमावलेत असा त्याचा अर्थ पण ...
पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,.......
- देश हादरून जावा,
किंवा
- सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात,
किंवा
- मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी,
किंवा
- पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत......
अरे! यह करोडोका देश है. इस विशाल जनसंख्यावाले देश मे ५५९ का आकडा क्या मायने रखता है?
चलो, इस बहाने आबादी तो घट रही है!
.
.
है ना दोस्तो??????????
-----------------------------------------------------------------------------