दोघांत 'तिसरा' : एक मुलायम स्पर्शक

Submitted by कुमार१ on 23 May, 2023 - 19:52

स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडेतील सुखाची सर्वोच्च पातळी म्हणजे संभोग. ही क्रिया संबंधित जोडप्याला सुख देण्याबरोबरच मानवी पुनरुत्पादनाशीही जोडलेली आहे. सुयोग्य काळात केलेल्या संभोगातून स्त्री-बीजांडाचे फलन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. जेव्हा एखाद्या जोडप्याला नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती नको असते त्या काळात विविध गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जातो. या प्रकारची साधने पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

condom 1.jpg

तात्पुरत्या गर्भनिरोधनासाठी पुरुषाने संभोगसमयी वापरायचे साधन हे तुलनेने सोपे असते. निरोध हे या दृष्टीने खूप सुटसुटीत व लोकप्रिय माध्यम आहे. त्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास त्याची गर्भनिरोधक म्हणून उपयुक्तता बऱ्यापैकी चांगली आहे. याव्यतिरिक्त, निरोधच्या वापरामुळे वापरकर्त्यांना काही गुप्तरोगांपासून काही प्रमाणात संरक्षण देखील मिळते. आज बाजारात लॅटेक्स आणि अन्य अत्याधुनिक साधनांपासून बनवलेले निरोध मुबलक उपलब्ध आहेत. त्यांचा वापरही जगभरात मोठ्या प्रमाणावर होतो. निरोधची मूळ संकल्पना, त्याचा शोध आणि कालांतराने होत गेलेला विकास हा सर्व इतिहास खूप रंजक आहे. तो या लेखाद्वारे सादर करतो.

इतिहासात डोकावता निरोधच्या वापराबाबत एक गोष्ट लक्षणीय आहे. प्राचीन काळी निरोध म्हणून जे काही वापरले गेले, त्याचा उद्देश संबंधित स्त्री-पुरुषांच्या संपर्कातून गुप्तरोगाचा प्रसार होऊ नये, हा होता. (गर्भनिरोधन हा विचार कालांतराने पुढे आला).

निरोधच्या वापराची पहिली ऐतिहासिक नोंद ख्रिस्तपूर्व 3,000 वर्षांपूर्वी झालेली आढळते. तत्कालीन Knossos या राज्याचा Minos हा राजा होता. त्याच्या संदर्भातील दंतकथा विचित्र आहे. त्याच्या वीर्यात म्हणे “साप आणि विंचू” ( = विष ) असायचे ! त्यामुळे त्याने संभोग केलेली एक दासी मरण पावली. या धोक्यापासून त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी एक ‘निरोध’ तयार करण्यात आला. हा निरोध बकऱ्याच्या मूत्राशयापासून तयार केलेला एक पडदा होता. राजाराणीच्या संभोगादरम्यान हा पडदा राणीच्या योनीमध्ये बसवण्यात आलेला होता. म्हणजेच तेव्हा निरोध हे मुख्यत्वे पुरुषाचे साधन असते ही संकल्पना अजून आलेली नव्हती. थोडक्यात, स्त्री-पुरुष संभोगादरम्यानचा हा एक आंतरपाट अर्थात अडथळा !
या राजाराणीने संभोगसमयी या प्रकारचा प्राणीजन्य निरोध नियमित वापरूनही त्यांना तब्बल आठ अपत्ये झाली !

यानंतर जशी सामाजिक प्रगती होत गेली तसे जगातील विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निरोध वापरले गेले. प्राचीन इजिप्तच्या लोकांनी प्रथमच लिननच्या आवरणाचा निरोध म्हणून वापर केला. रोमन लोकांमध्ये लिनन तसेच प्राण्यांच्या मूत्राशयापासून बनवलेले निरोध वापरात होते. न्यू गिनीतील टोळ्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण स्त्री-निरोध बनविला होता. तो 6 इंच लांब असून त्याला कपासारखा आकार होता. योनीच्या दाबाने तो योनीत घट्ट बसत असे.

यानंतर चिनी व जपानी संस्कृतीत वापरले गेलेले निरोध अजून वैशिष्ट्यपूर्ण होते. चीनमध्ये ते रेशमी कागदापासून बनवले गेले आणि त्यात वंगणाचा देखील वापर केला गेला. जपानी निरोध कासवाचे कवच किंवा वेळप्रसंगी चामड्यापासून देखील बनवलेले असायचे. काही आशियाई संस्कृतींमध्ये छोट्या आकाराचे शिस्न-निरोध देखील वापरात होते.

इसवी सनाच्या 15 ते 18 व्या शतकांदरम्यान युरोपीय वैज्ञानिकांनी निरोधच्या विकासामध्ये मोठा हातभार लावला. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने Gabriele Falloppio या इटालिय शरीररचनाशास्त्रज्ञाचे नाव घ्यावे लागेल (त्यांनी स्त्रीच्या गर्भाशयापासून निघालेली fallopian ही नलिका शोधलेली आहे). त्या काळी सिफिलिस हा गुप्तरोग खूप जोरात होता. म्हणून Falloppioनी असे सुचवले, की संभोगादरम्यान पुरुषाने निरोध चढवल्यानंतर मागच्या बाजूस तो रिबिनीने बांधावा.

17 व्या शतकात निरोधचा गर्भनिरोधक म्हणून देखील महत्त्वाचा उपयोग आहे हा विचार प्रबळ झाला. इंग्लंडमध्ये निरोध मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले. परिणामी तिथल्या जन्मदरात लक्षणीय घट झाली. तत्कालीन लष्करात सिफिलसचे प्रमाण बऱ्यापैकी असायचे. त्यावर उपाय म्हणून लष्करात मोठ्या प्रमाणावर निरोधचे वाटप होऊ लागले. ते निरोध मासे, गुरे व मेंढ्या यांच्या आतड्यांपासून तयार केलेले होते.

यानंतरच्या काळात प्रचलित असलेली इंग्लंडमधील एक दंतकथा मोठी रंजक आहे.
इंग्लंडचा राजा चार्ल्स (दुसरा) एका समस्येने त्रस्त झाला होता. अनेक स्त्रियांनी असा दावा केला होता की त्यांना झालेली मुले या राजापासून झालेली आहेत. त्यामुळे राजाची औरस आणि अनौरस मुले कुठली यासंदर्भात बराच गोंधळ निर्माण झाला होता. हे सगळे पाहिल्यानंतर राजाचे डॉक्टर असलेले “कर्नल कंडोम” यांनी त्याला लैंगिक क्रियेदरम्यान नियमित निरोध वापरण्याचा सल्ला दिला. त्यांनी सुचविलेला निरोध हा कोकराच्या आतड्यांपासून तयार केलेला होता. कर्नल कंडोम यांनी ही गोष्ट सुचवल्यामुळे त्या साधनाला कंडोम हे नाव पडले अशी एक उपपत्ती आहे. ही उपपत्ती जरी सर्वाधिक लोकप्रिय असली तरी डॉ. कंडोम यांच्या अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावे काही मिळालेले नाहीत
म्हणून या व्यतिरिक्तही अन्य काही व्युत्पत्ती असल्याचे मानले जाते:

१. Condus या लॅटिन शब्दाचा अर्थ साठवण्याचे भांडे किंवा पात्र..
२. kemdu या पर्शियन शब्दाचा अर्थ आतड्यांपासून तयार केलेले साठवण्याचे साधन.
३. Guantone या इटालीय शब्दाचा अर्थ ‘मोजा’.

सन 1785 मध्ये कंडोम हा शब्द इंग्लिश शब्दकोशामध्ये समाविष्ट करण्यात आला. विविध प्रांतातील इंग्लिश बोलीभाषेनुसार त्याला wetsuit, the rubber, jimmy आणि nightcap अशी अनेक मजेदार नावे आहेत. आधुनिक शब्दकोशांमध्ये condom या शब्दाची व्युत्पत्ती ‘अज्ञात’ असे उल्लेखिलेले दिसते. मराठीत देखील निरोधसाठी फुगा आणि टोपी ही सोपी नावे प्रचलित आहेत.

अठरावे शतक संपण्याच्या सुमारास निरोधची घाऊक प्रमाणात विक्री सुरू झाली. परंतु तेव्हा जास्ती करून समाजातील सधन वर्गच त्यांचा वापर करीत होता. समाजातील सर्व स्तरांमध्ये लैंगिक शिक्षणाचा तेवढा प्रसारही झालेला नव्हता.
हळूहळू निरोधचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरांमध्ये होऊ लागला त्यातून त्याचा वापर वाढला. परंतु समाजातील काही वर्गाकडून निरोधच्या वापराला विरोध देखील होऊ लागला या विरोधाची सर्वसाधारण कारणे अशी होती:

१. मुळातच गर्भनिरोधन करणे ही निसर्गविरोधी कृती आहे.
२. निरोधच्या वापरामुळे संभोगादरम्यानचे स्पर्शसुख बरेच कमी होते .
३. समाजात जर निरोधचा वापर खूप प्रमाणात होऊ लागला तर एकंदरीतच पुरुषांचा बाहेरख्यालीपणा वाढेल.
४. काही ‘ नैतिक पोलिस’ मंडळींनी गुप्तरोग प्रतिबंधासाठी निरोधचा वापर या संकल्पनेला कडाडून विरोध केला. त्यांच्या मते बाहेरख्यालीपणा/ वेश्यागमन यासाठी गुप्तरोग ही निसर्गानेच दिलेली एक मोठी शिक्षा होती !

अशा तऱ्हेने निरोध समर्थन आणि विरोध हे दोन्ही हातात घालून वाटचाल करीत होते. दरम्यान निरोध कारखान्यांत तयार करताना त्यासाठी लिननचा वापर बऱ्यापैकी होऊ लागला आणि त्या लिननला विविध रसायनांनी अजून मऊ केले गेले. निरोध बनवून तयार झाल्यानंतर त्याची तंदुरुस्ती तो प्रत्यक्ष फुगवून बघून देखील केली जात असे.

Condom infl.png

जसजसे समाजातील लैंगिक शिक्षण वाढू लागले तशी निरोधची विक्री अनेक ठिकाणी होऊ लागली. त्यामध्ये औषधांच्या दुकानाव्यतिरिक्त केशकर्तनालये, मद्याचे गुत्ते आणि अन्य काही खुल्या बाजारांचाही समावेश होता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत निरोध समाजातील गरीब वर्गापर्यंत देखील पोचलेला होता. साधारण सन 1920 च्या दरम्यान इंग्लंडमधील बिशप मंडळींनी, सार्वजनिक ठिकाणी लोकांनी वापरुन फेकून दिलेल्या निरोधांबद्दल जाहीर नापसंती व्यक्त केली होती.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निरोधचा वापर या विषयाला एक नवा आयाम मिळाला. तेव्हा पाश्चात्य जगतात स्त्रीमुक्ती चळवळींचा उदय झालेला होता. त्यातील स्त्रियांनी,
“गर्भनिरोधनाचे साधन पुरुषांच्या हातात एकवटता कामा नये”,
असा विचार समाजात सोडून दिला. त्यातून पुरुष-निरोधा ऐवजी स्त्री निरोध वापरण्याची संकल्पना विकसित झाली. संभोगादरम्यान स्त्रीने विशिष्ट प्रकारचा पडदा (diaphragm) वापरावा आणि संभोग समाप्तीनंतर योनी शुक्रजंतूविरोधी द्रावणांनी धुवून काढावी असे सल्ले दिले गेले.

1960 च्या दशकात गर्भनिरोधनासाठी स्त्रियांनी खायच्या हार्मोनल गोळ्यांचा शोध हा एक क्रांतिकारक टप्पा होता. या शोधानंतर निरोधच्या वापरात काही प्रमाणात घट झाली. बघता बघता पुढील काही वर्षांत स्त्रियांच्या या गोळ्या जगभरात गर्भनिरोधनाचे प्रमुख आणि लोकप्रिय साधन बनल्या. पण पुढे कालांतराने पुन्हा एकदा निरोधच्या वापरांमध्ये लक्षणीय वाढ झाली.

जसजसा समाजात निरोधचा खप वाढत गेला तसे उत्पादकांनी त्याच्या दर्जात विविध सुधारणा केल्या.. अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा निरोध बनवले गेले तेव्हा ते सायकलच्या रबर ट्यूब इतक्या जाडीचे असायचे. हे निरोध उत्पादनानंतर जेमतेम तीन महिने टिकत असत. संशोधनातील पुढील प्रगतीनुसार रबरा ऐवजी latex चा वापर प्रचलित झाला. यांची टिकण्याची क्षमता तब्बल पाच वर्षांपर्यंत असायची. साधारणपणे सन 1990 च्या दरम्यान latex ची जागा Polyurethane या साधनाने घेतली. आधुनिक निरोध हे जास्तीत जास्त पातळ आणि तरीही मजबूत असतात. तसेच तयार झालेल्या निरोधमध्ये अतिसूक्ष्म छिद्रे नाहीत ना हे इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमार्फत तपासले जाते. विविध उत्पादकांमध्ये निरोधच्या पातळपणाबाबत स्पर्धा चालू असते.

“आमचा निरोध इतका तलम व मुलायम आहे, की तुम्हाला दोघांना मध्ये ‘तिसरा’ असल्याचे जाणवणार देखील नाही”
या प्रकाराच्या त्याच्या जाहिरातींनी ग्राहकांना आकर्षून घेतले जाते.

पारंपरिक निरोध पुरुष लिंगावर पूर्ण ताणल्यानंतर गुळगुळीत असतात. त्यामध्येही काही वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा पुढे केल्या गेल्या. अशा सुधारित निरोधांचा पृष्ठभाग खवल्यांचा (ribbed) बनवलेला असतो. या प्रकारच्या निरोध वापरामुळे संभोगादरम्यान पुरुष व स्त्री अशा दोघांनाही अधिक सुख मिळते असा दावा केला जातो. परंतु या बाबतीत जोडप्यांमध्ये बरीच अनुभवभिन्नता आढळते. निरोधच्या अंतर्गत भागात शुक्रजंतूमारक रसायन घालायचे किंवा नाही हा अत्यंत वादग्रस्त विषय आहे. काही उत्पादकांनी अजूनही त्याचा वापर चालू ठेवलाय परंतु बऱ्याच उत्पादकांनी आता त्याचा वापर थांबवलेला आहे.

Condom 3.jpgअत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध येत्या भविष्यकाळात बाजारात येतील. त्यामध्ये प्रामुख्याने खालील तंत्रांचा समावेश आहे:

१. Graphene निरोध: यामध्ये कार्बन स्फटिकांचा वापर केलेला असल्याने ते अत्यंत तलम आणि तितकेच मजबूत असतात.

२. nano-वंगणयुक्त : यामध्ये पाण्याच्या रेणूंचा अतिसूक्ष्म थर वापरलेला असतो.

३. ‘अदृश्य’ निरोध : यामध्ये पुरुषाने प्रत्यक्ष परिधान करण्याचे साधन एक जेल असते. संभोगादरम्यान त्याचा योनिशी संपर्क आल्यानंतर तिथल्या तापमानामुळे ते कडक होते.

निरोधचे उत्पादन केल्यानंतर त्याचे आकर्षक वेष्टण बनवण्यात देखील बरीच कलात्मकता दिसून येते.
आज बाजारात पुरुष-निरोधांचाच वाटा मोठा आहे. त्यानुसार त्याच्या विक्री पाकिटांवरील चित्रांत स्त्रीदेहाचा मुक्त वापर केलेला आढळतो. आजच्या घडीला संपूर्ण जगात मिळून होत असलेली निरोधची व्यापारी उलाढाल कित्येक दशअब्ज रुपयांमध्ये आहे.

निरोध हे तात्पुरत्या गर्भनिरोधनाचे आणि ‘सुरक्षित’ संभोगाचे एक महत्त्वाचे साधन असल्यामुळे त्याचा सरकारी आणि खाजगी पातळीवरून भरपूर प्रचार केला जातो. त्याच्या विविध माध्यमांतील जाहिराती हा विषय देखील गेल्या शंभर वर्षांपासून वादग्रस्त ठरलाय. अनेक देशांत गेल्या शतकात त्याच्या जाहिरातींवर बंदी असायची; कालांतराने ती उठवली गेली. अजूनही निरोधच्या जाहिराती टीव्ही सारख्या माध्यमातून कोणत्या वेळेस दाखवायच्या यावर चर्चा झडताना दिसतात.

आजपासून सुमारे पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी, संभोगादरम्यान निरोधचा वापर ही संकल्पना उगम पावली. त्याचा शास्त्रशुद्ध विकास गेल्या काही शतकांत झाला. या लेखात आपण निरोधची जन्म आणि कर्मकथा पाहीली. आरोग्याच्या दृष्टीकोनातून निरोधची उपयुक्तता, मर्यादा आणि त्याच्या काही वापरसमस्या यासंबंधीचे विवेचन सवडीने नंतर कधीतरी स्वतंत्र लेखात करेन.
************************************************************************************************************************८
चित्रसौजन्य : ‘विकी’.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख, संपूर्ण आढावा. .... आणि तिसरा फोटो Happy

जाहिराती :-
जगभरात कंडोमच्या जाहिराती अत्यंत कल्पक असतात. आपल्याकडे अजून थोड्या परदानशीन आहेत पण वी आर गेटिंग देयर.

या विषयावरचे मीम्स फार हसवतात.

Condom एवढ्या प्राचीन काळात माहित होता आणि वापरला जात होता ही माहिती नविनच. आणि आश्चर्यकारक सुध्दा आहे.
प्राण्यांच्या अवयवापासुन ते आताच्या advanced material, technology, flavours, patterns पर्यंतची प्रगती म्हणजे मानव sex फक्त पुनरोत्पादनसाठी नाही तर pleasure म्हणुन ही करतो याचाच पुरावा आहे.

जसे sanitory pads dispose करायला त्याचं स्वतःचं wrapper reuse करायचं असतं, तसं condoms dispose करायला काही सोय करत नसावेत? लोकांनी वापरून वाट्टेल तसे फेकलेले condoms इथे तिथे दिसतात. फक्त आपल्याकडे नाही, तर युरोप मधे जंगलात देखील दिसले होते.

रोचक इतिहास....

माफ करा थोडे अवांतर.... पापुआ न्यू गिनीचा उल्लेख मुळ लेखात आला त्या अनुषंगाने.... पंतप्रधान भेटी नंतर लोकसत्तेत लेख आला... तेथील ७० टक्के महिला या सामुहिक बलात्कार, कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहेत.. कौटुंबिक कायदा नुकताच झाला....
लोकसंख्या 95 लाखांवर
बोलल्या जाणाऱ्या भाषा 800
आकारमान जपान पेक्षा मोठे

धन्यवाद !
..
*जाहिराती अत्यंत कल्पक असतात. आपल्याकडे अजून थोड्या परदानशीन>>> + ११ Happy

* condoms dispose करायला काही सोय करत नसावेत? >>>

चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. तो वापरल्यानंतर व्यवस्थितपणे गुंडाळून टाकणे हे तर खरे सामान्यज्ञान आहे.
निरोधच्या काही प्रकारांचे जैविक विघटन होऊ शकते असे इथे दिले आहे:

https://www.conserve-energy-future.com/are-condoms-biodegradable.php
अर्थात त्याचे वेस्टण कटाक्षाने कोरड्यात कचऱ्यातच टाकले गेले पाहिजे.

आपल्याकडे रा.धों. कर्वेनी कुटुंबनियोजनाकारता तैलचिंधी वापरण्याचा सल्ला दिला होता, असे एका लेखात वाचल्याचे स्मरते. तो नक्की काय प्रकार होता, निरोधसारखा काही प्रकार होता का ह्याबाबत आपल्याला काही माहिती असल्यास लिहावे.

काही प्रकारच्या तेलांना शुक्रजंतूमारक गुणधर्म आहे. त्या उद्देशाने कर्वे यांनी त्या काळात तेलचिंधीचा सोपा घरगुती उपाय सांगितला असावा. अर्थात त्याचे यशापयश (टक्केवारी इत्यादी) याचा अभ्यास झाला होता का, याची कल्पना नाही.

आधुनिक वैद्यकाच्या संदर्भात मला इथे एक संदर्भ मिळाला आहे:
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/3169889/#:~:text=All%20the%20volatile%20....

त्यात त्यांनी दालचिनी व लवंगेचे तेल आणि अन्य (वायूरूप होऊ शकणाऱ्या ) तेलांना तसा गुणधर्म असल्याचा उल्लेख केला आहे.

या संदर्भात अजून एक मुद्दा आहे. प्रयोगशाळेतील डिशवर तसा मारक गुणधर्म दाखवणे आणि प्रत्यक्ष संभोगानंतर योनीत तसा गुण दिसायला तेलाचे प्रमाण किती, वगैरे सर्व मुद्दे विचारात घ्यावे लागतील.

र. धों. कर्वे यांच्या सर्व लेखनाचे तपशील या संकेतस्थळावर आहेत:
https://radhonkarve.com/

परंतु आत्ता ते संकेतस्थळ खूप ‘मंद’ झालेले दिसते. मला काही त्यातील संततीनियमन हा विषय उघडण्यात यश आलेले नाही. बघा प्रयत्न करून…

आगआग नाही होणार का?
>>>
मुद्दा बरोबर आहे .

ती तेले योग्य त्या डायलूशनमध्ये वापरलीत.
वर मी जो संदर्भ दिला आहे त्यात त्यांनी ते प्रयोगशाळेमध्ये करून पाहिलेले आहे.
मानवी शरीरात हे प्रयोग करायचे झाल्यास योग्य तितकेच (पुरेसे सौम्य) डायल्युशन वापरावे लागेल.

लवंग तेल हे खूप भयंकर आग आग करते.
एक दोन थेंब लवंग तेल dilute करण्यासाठी ,100 ते 150 ml Pani लागते.
Pure तेल कोणतीच त्वचा सहन करणार नाही

लवंग तेल गर्भ निरोध साठी वापरा असे कोण सांगत असेल तर त्याचा अर्थ एक च.
योनी च लवंग तेलाशी संबंध आला तर संभोग ची ईच्छा कुठल्या कुठे पळून जाईल.
आणि संभोग च होणार नाही.
आपो आप गर्भ निरोधक

लवंगेच्या तेलात Eugenol हा रासायनिक घटक आहे. त्याचे शुक्रजंतूंवरील परिणाम या विषयासंबंधी बराच अभ्यास झालेला आहे. बरेचसे प्रयोग हे उंदरांवर आणि प्रयोगशाळेत केलेले दिसतात. त्या रसायनाच्या प्रमाणानुसार त्याचे शुक्रजंतूवरील वेगवेगळे व काहीसे भिन्न परिणाम देखील झालेले दिसतात. लवंगेचा अर्क काढण्याची काही विशिष्ट पद्धत असावी ज्यातून हा घटक अधिक प्रमाणात राहील

थेट मानवी शरीरातील प्रयोगांचा संदर्भ अद्याप सापडला नाही.

https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0890623822001332

कृपया त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवू नका.
त्यांनी सांगितलेल्या घरगुती उपायात कदाचित घरात जे उपलब्ध असते ते गोडतेल / खोबरेल तेल सुद्धा असण्याची शक्यता आहे.

कर्वे यांच्या लेखांचे ते संस्थल अजूनही नीट काम करत नाहीये. नाहीतर आपल्याला मूळ लेख वाचायला मिळाला असता.
त्यांचे मूळ लेखन वाचल्याशिवाय कुठलीही प्रतिक्रिया देणे बरोबर नाही

https://www.mayoclinichealthsystem.org/hometown-health/speaking-of-healt....
इथे एक आधुनिक वैद्यकातील या संदर्भातील सामान्य माहिती देणारा संदर्भ आहे.

तिथे म्हटल्यानुसार संभोगसमयी जर विविध प्रकारची वंगणे वापरली (उदाहरणार्थ, खोबरेल तेल), तर त्यांचा शुक्रजंतूंच्या गतीवर परिणाम होतो. त्यातून गर्भधारणा होणे अवघड होते.
वंगणे वापरायचीच असली तर विशिष्ट प्रकारचीच वापरावीत- जी शुक्रजंतूना पोषक असतात, असे तिथे दिलेले आहे.

सारांश: योनीमार्गात जर तेल लावलेले असेल तर त्याचा शुक्रजंतूंवर विपरीत परिणाम होतो.

उपयुक्त माहीतीपूर्ण लेख.
>>>आज बाजारात पुरुष-निरोधांचाच वाटा मोठा आहे.>>> स्त्रियांचे निरोध फारसे कोणी वापरताना दिसत नाही.

धन्यवाद !
स्त्रियांचे निरोध

>>> ते योग्य प्रकारे बसवणे हे कौशल्याचे काम आहे. पुरुषांच्या बाबतीत ते खूप सुटसुटीत आहे आणि पुरुष निरोधाची परिणामकारकता स्त्री निरोधापेक्षा जास्त आहे.

खूप छान लेख. बरीच रोचक माहिती कळली. विशेषतः निरोधाचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे हे वाचून आश्चर्य वाटले. वरचे युरोपीय चित्र मजेशीर आहे.

धन्यवाद !
निरोधचा उगम इतका प्राचीन कसा याचे काहींना आश्चर्य वाटलेले दिसते. मानवजातीच्या पुराणकाळापासून गुप्तरोग अस्तित्वात आहेत. वेश्याव्यवसाय, सार्वजनिक अंघोळी आणि युद्धांमुळे हे रोग समाजात झपाट्याने पसरले.

या रोगांपासून बचाव हे निरोधच्या शोधामागचे प्राथमिक उद्दिष्ट होते. त्यामुळे ती संकल्पना इतिहासात बऱ्यापैकी लवकर अस्तित्वात आलेली दिसते.

हो, तुमचा लेख वाचल्यावर ते पटले. सध्या त्याचा उपयोग हा जास्त करून संतती नियमनासाठी होत असल्यामुळे मुळात त्याचा शोध वेगळ्या कारणासाठी लागला ही माहिती नव्हती, त्यामुळे आश्चर्य वाटले होते.

Pages