गेली बहुधा

Submitted by किरण कुमार on 13 May, 2023 - 05:17

माथ्यावरची आठी अलगद पुसून गेली बहुधा
कवितेमधली ओळ शहाणी सुचून गेली बहुधा

खिसा रिकामा केला त्याने चौकामध्ये सारा
डोळ्यांमध्ये भूक मुलांच्या दिसून गेली बहुधा

घरा भोवती तिच्या रोज तो मारत होता चकरा
जाता जाता वळून मागे हसून गेली बहुधा

लिपस्टिक लाली घेण्यासाठी घाई घाई गेली
तारुण्याची लाट अचानक सुकून गेली बहुधा

कोरा कागद ,ठसा, अंगठा वाड्यावरती गेला
पोर तयाची सासर गावी रडून गेली बहुधा

आकाशी तो सोडत होता पिंजऱ्यातले पक्षी
स्वातंत्र्याची त्याला किंमत कळून गेली बहुधा

बांधावरूनी वाद पेटला भावांमध्ये सख्ख्या
स्मशानात त्या राख पित्याची विझून गेली बहुधा

रस्त्यावरती माल फेकुनी ढसाढसा तो रडला
गळ्याभोवती दोर तयाला कसून गेली बहुधा

मित्रांमध्ये एवढ्यात तो सहसा दिसला नाही
गद्दारीची कट्यार काळिज चिरून गेली बहुधा

- किरण कुमार

Group content visibility: 
Use group defaults

>>>>बांधावरूनी वाद पेटला भावांमध्ये सख्ख्या
स्मशानात त्या राख पित्याची विझून गेली बहुधा
कटू वास्तव!!

>>>>>लिपस्टिक लाली घेण्यासाठी घाई घाई गेली
तारुण्याची लाट अचानक सुकून गेली बहुधा

पुरुष कुठे लिपस्टिक लावतात?
स्त्रियांनी हे असले प्रकार करुन, अपेक्षा वाढवुन ठेवलेल्या आहेत. आता पीअर प्रेशरमुळे, हे रोगण वगैरे फासून, अप टु डेट रहावे लागते. नो रिटर्न बॅक Sad

आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद .../\...
@ निखिलजी - सुचविलेल्या बदल चांगला आहे , धन्यवाद
@ सामो Happy