खुळे रंग सारे!

Submitted by mi manasi on 21 April, 2023 - 09:53

फिक्‍या चांदराती फिके चंद्र-तारे!
उडाले क्षणांचे खुळे रंग सारे!!

नको रेशमी प्रेमपाशात ओढू!
पुरे गुंतणे सांगती बंद दारे!!

कधी बोलशी तू हवेसे हवेसे!
कधी तोडशी पाश निमिषात का रे!!

नको वाट पाहू तिच्या सोबतीची!
तुझे तू नव्याने नवे गीत गा रे!!

मुक्या भावनांचा किती भार आहे!
किती आवरावे मनाचे पसारे!!

कळी पाकळीला विचारीत होती!
कसे ओळखावे विखारी इशारे!!

भली माणसे एकमेका म्हणाली!
वृथा भेटले ते गुलाबी शिकारे!!

इथे आसवांचे असे पूर आले!
जुन्या आठवांनी बुडाले किनारे!!

नशिबा पुढे कोण गेला कधी का!
मनासारखे ना वाहतात वारे!!

मी मानसी

वृत्त: भुजंगप्रयात

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users