मराठी भाषा गौरव दिन - स.न.वि.वि. - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 February, 2023 - 09:47

प्रिय प्लूटो,

स.न.वि.वि.

तुला लिहायची ही माझी पहिलीच वेळ. परवा माझ्या मुलीशी झालेल्या खगोलशास्त्रासंबधीच्या चर्चेत (चर्चा म्हणजे ज्यात ती बोलते आणि मी श्रवणभक्ती करते, असा एकतर्फी संवाद) तुझा उल्लेख आला आणि योगायोगाने तेव्हाच मायबोलीवर संयोजकांनी कोणालाही पत्र लिहायची परवानगी दिली म्हणून ही संधी घेत आहे.

तू ग्रह आहेस असा खगोलशास्त्रज्ञांचा ग्रह झाला तेव्हा, म्हणजे १९३० साली मीच काय, माझे आईबाबादेखील जन्माला आले नव्हते. आणि परवा २००६ साली तुझे ग्रह पालटले तेव्हा माझं वय... जाऊ दे, तुला पृथ्वीवरची कालगणना कळणार नाही.

तू आपला परिसर स्वच्छ ठेवत नव्हतास म्हणून तुला खुजा ठरवलं म्हणे. आमच्यात असं काही करणाऱ्यांना तोंडावर खुजंबिजं म्हणत नाहीत हो. कॉलनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर आडून आडून टोमणे मारतात फक्त.

एकूण पाच पाच चंद्र असूनसुद्धा तुझं चंद्रबल कमी पडलं म्हणायचं. पाच नव्हेत म्हणा आता, त्यातला एक मोठा होऊन तुझी बरोबरी करायला लागला ना? आमच्याकडे बापाच्या चपला मुलाला आल्या की त्याला बरोबरीचा मित्र समजावं असं म्हणत असत. आता मुलाचे आऊट ऑफ फॅशन गेलेले चपलाबूट बाप घालतो, आणि तरी मुलगा त्याला बरोबरीचा समजत नाही एकेकदा! असो.

तर, खूऽऽप वाईट वाटलं हो मला हे ऐकून!
त्या 'खू'नंतरच्या चिन्हांना 'अवग्रह' म्हणतात, बरं का. तुला 'खुजा' म्हणण्याऐवजी 'अवग्रह' म्हटलेलं आवडेल का? संस्कृतोद्भव भासणारं नाव असलं ना, की अर्थ काहीही असो, आवडतं काही लोकांना!

कधीकाळी तारे होते, पण आता राहिले नाहीत अशी उदाहरणं माहिती होती हो मला. आमच्याकडे तशांवर चित्रपट काढतात, आणि त्यात सहसा सुबोध भावेला ती भूमिका देतात. पण एखादा पूर्वग्रह आता ग्रह राहिला नाही असं प्रथमच ऐकलं!

तुझ्यावर कोणी नाही काढला तो चित्रपट? मेले परग्रहांबद्दल चित्रपट काढतील, पण आपल्याच शेजारी काय चाललंय ते पाहाणार नाहीत! परधार्जिणेपणा म्हणतात तो हा!

आमचे एतद्देशीय पूर्वज बाकी हुशार हो! त्यांना सग्गळं सग्गळं माहीत होतं म्हणतात ते उगाच नाही! त्यांच्या नवग्रहांच्या यादीत तुझं नाव कधीच नव्हतं. उद्या या पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांना राहूकेतू सापडले आणि सूर्य हा ग्रहच आहे हे एकदाचं कळलं, की मगच त्यांना आमच्या संस्कृतीचं महत्त्व समजेल.

बाकी नुसते ग्यासेस झालेले गोळे जिथे ग्रह म्हणून मिरवतात तिथे तुझ्यासारख्या दगडामातीच्या घट्ट वस्तूवर अशी वेळ यावी हे काही मनाला पटत नाही. पण त्याच्या इच्छेपुढे कोणाचं काही चाललंय का! त्याच्या म्हणजे कोणाच्या हे विचारू नकोस, मला माहीत नाही. काहीच बोलायला सुचलं नाही की असं म्हणायची पद्धत आहे आमच्यात, इतकंच.

सूर्याचा आधी अकबरासारखा नवरत्न दरबार होता, त्याऐवजी आता आमच्या शिवाजी महाराजांसारखं अष्टप्रधान मंडळ झालं एवढंच काय ते दु:खात सुख मानायचं झालं.

म्हणजे तुला नसेल रे दु:ख, मलाच म्हातारीला वाटतं आपलं. तू शहात्तर वर्षांचा होतास ना हे झालं तेव्हा? आमचेही उतारवयात जगाकडे उघडणारे एकेक खिडक्यादरवाजे बंद होतात, आणि मग कालपरवा सहज आत्मविश्वासाने वावरत होतो तेच जग अगदी अक्राळविक्राळ झालंय आणि आपण खुजे खुजे होत चाललोय असं वाटतं. मग कालची पोट्टेपोट्टी आपल्याला शहाणपण शिकवत येतात. असलं खुजेपण वाईट हो! चालायचंच.

तू बाकी काळजी घे हो.

- स्वाती आंबोळे
मु. पो. पृथ्वी (सूर्यापासून तिसरा ग्रह)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>आमच्यात असं काही करणाऱ्यांना तोंडावर खुजंबिजं म्हणत नाहीत हो. कॉलनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर आडून आडून टोमणे मारतात फक्त.
Lol
>>>>>>संस्कृतोद्भव भासणारं नाव असलं ना, की अर्थ काहीही असो, आवडतं काही लोकांना!
Lol
>>>>>उद्या या पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांना राहूकेतू सापडले आणि सूर्य हा ग्रहच आहे हे एकदाचं कळलं, की मगच त्यांना आमच्या संस्कृतीचं महत्त्व समजेल.
खी: खी:

अगं काय सुंदर लिहीलयस. कल्पक आणि खाचाखोचांनी खच्चून भरलेले. मस्त मस्त!

कल्पक

दूरवर आकाशगंगेत पाठवलं पत्र Happy

कोट्या धमाल आहेत. मलाही प्लूटोचं डिमोशन झालेलं पटलं नाही, त्यामुळे त्याचा कोतबो+प्रतिक्रिया या पत्ररूपातून आणल्याबद्दल आभार. Happy

एक नंबर भारी आहे हे पत्र Rofl Rofl Rofl

एक कुठलीतरी ओळ कोट करून दाद द्यायची सोयच नाहीये ह्यात. सगळाच लेख तुफान जमलाय. >>> +१२३४५६७८९

एक कुठलीतरी ओळ कोट करून दाद द्यायची सोयच नाहीये ह्यात. सगळाच लेख तुफान जमलाय. >>> +१२३४५६७८९ +++
कोपरखळ्या आवडल्या खूप.

मस्त पत्रलेखन
कल्पनाशक्ती भारी एकदम..!

छान खुसखुशीत लिहिले आहे.
'ध्यानात ठेव मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले आहेत' ही म्हण आता मागे पडून 'ध्यानात ठेव मी प्लुटोला तो ग्रह असतांना पाहिले आहे' अशी म्हण सुरू करावी.
बिगबँगथिअरी मधला शेल्डन पार्टीमध्ये, प्लुटोला आता ग्रह मानू नये म्हणून नासाला सुचवणार्‍या खगोल शास्त्रज्ञावर डाफरतो तो सीन आठवला Proud

अथपासून इति पर्यंत जबरदस्त जमलाय, सगळ्या कोपरखळ्या एकदम परफेक्ट लागल्यात. शेवट पॉज घेऊन एकदा परत वाचायला लागला - खासच एकदम !

Pages