दिवस निसटतो

Submitted by द्वैत on 20 January, 2023 - 10:52

दिवस निसटतो बघता बघता
प्रश्न राहती शोधत उत्तर
रात्र जागते उंबरठ्याशी
डोळ्यांवरती ओढून चादर

धावू कुठवर क्षितिज लांबते
खडकावरती फुटती लाटा
कुणा ठाऊक कोठे नेती
भरकटलेल्या पाऊलवाटा

ठिगळ जोडता ह्या टोकाला
त्या टोकाचे जाते उसवत
स्वप्नबिलोरी स्वैर पाखरू
झाडावरुनी उडते फसवत

पुढे कधी मग पलटून बघता
आयुष्याची कोरी पाने
कळते मागे राहून गेले
पैलतीरावर जीवनगाणे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users